आरंभी एक साधा सिनेमावेडा प्रेक्षक... मग सिनेमाचा विद्यार्थी...फिल्म सोसायटी कार्यकर्ता... समीक्षक...अभ्यासक...संशोधक...शिक्षक... आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी... चित्रपट महोत्सव आयोजक...सल्लागार... आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा संस्थापक - संचालक...कथा - पटकथा - संवाद लेखक म्हणून मालिका आणि चित्रपटाचं लेखन... माहितीपटकर्ता...चित्रपट दिग्दर्शक... याच ओघात म्हणायचं तर दोन चित्रपटात छोट्या भूमिकाही केल्या... केवढ्या विविध भूमिकांतून वावरलो... मात्र आयुष्याच्या या वळणावर जेव्हा स्वत:लाच विचारलं... “तू नेमका आहेस कोण?’’ उत्तर आलं... “सिनेमा पाहणारा माणूस..!’’
प्रसिद्ध सिनेसमीक्षक अशोक राणे यांचं ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे आत्मकथन ७ जानेवारी २०२० रोजी मिनी थिएटर, पु.ल. देशपांडे कला अकादमी इथं समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. संधिकाल प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील हे एक प्रकरण...
.............................................................................................................................................
“तुमने आज तक ‘हिचकॉक’ नहीं पढ़ा. डोन्ट टेल मी यार. अ पर्सन लाईक यू टेलिंग मी...’’
नायर पुढे बोलत होता आणि मी त्याच्या तोंडून नुकत्याच ऐकलेल्या ‘हिचकॉक’ या पुस्तकाचाच विचार करीत राहिलो.
हा नायर महेश भट्टचा चीफ असिस्टंट होता. एकीकडे महेश भट्टच्या अत्यंत बिझी श्येड्युलमध्ये गुंतलेला आणि दुसरीकडे सिनेमाचा व्यासंग करणारा. धुवाँधार वाचन असलेला. त्याच्याशी बोलताना नवनवीन पुस्तकांविषयी कळायचं आणि माझी धडपड सुरू व्हायची ती सारी पुस्तकं मिळवून वाचायची. आता त्याने आणखी एका पुस्तकाबद्दल सांगितलं... ‘हिचकॉक’! या सुमारास नुकताच मी फ्रेंच न्यू वेव्हच्या दालनात शिरलो होतो. तिथे बरंच काही हाताला लागत होतं. त्यात या नव्या पुस्तकाची भर पडली होती.
“इट्स द बायबल फॉर पीपल लाईक अस, यार.’’ नायरचं अजून सांगून संपलं नव्हतं. मी म्हटलं,
“मला दे वाचायला. लगेच वाचून परत करेन.’’
“तुम एक काम करो. मेरे घर आकर रहो. पढ़ो और चले जाओ. ‘हिचकॉक’ मेरे घर के बाहर नहीं निकलेगा.’’
पुढे एकदा गो.नी. दांडेकरांनी मला असंच उत्तर दिलं होतं - मी त्यांच्याकडे गाडगेमहाराजांच्या कीर्तनाच्या कॅसेट्स् ऐकायला मिळतील का असं विचारलं होतं, तेव्हा.
“तुम्ही माझ्या घरी रहायला या आणि सगळ्या कॅसेट्स् मनसोक्त ऐका. त्यातली एकही कॅसेट घराबाहेर जाणार नाही.’’
१९८८मध्ये त्रिवेंद्रम् येथे मी साडेआठशे रुपयाला जे पुस्तक घेतलं, तो हाच ग्रंथराज ‘हिचकॉक’ होता.
हा भलाथोरला ग्रंथ म्हणजे फ्रान्स्वा त्रुफाँ यांनी ऑल्फ्रेड हिचकॉक यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत! ‘काहिए…’च्या फ्रेंच समीक्षकांच्या लेखी हिचकॉक हा चित्रपट भाषेची उत्तम आणि नेमकी जाण असलेला आणि तिचा परिणामकारक वापर करणारा सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक होता. अजिबात इंग्रजी न येणाऱ्या या समीक्षकांनी त्यांच्या एकूण एक सिनेमांची पारायणं करून त्यावर भरभरून लिहिलं होतं. ‘हिचकॉक’ हा ग्रंथराज आकाराला आणण्यासाठी फ्रान्स्वा त्रुफो यांनी इंटरप्रीटर - दुभाष्या - वापरला आणि आपल्या भल्यामोठ्या यादीतल्या फ्रेंच प्रश्नांना दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा असे सलग दहा दिवस हिचकॉक यांच्या हॉलिवुडमधल्या ऑफिसात त्यांच्यासमोर बसून उत्तरं मिळवली. त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून ते तोवरचे एकेक चित्रपट घेत त्यांची सविस्तर चर्चाच केली.
समीक्षक आणि कलाकार यांच्यातील परस्परांविषयीचा आदर दाखवत झालेला जगातला हा अशा प्रकारचा पहिलाच संवाद असावा. एक संवेदनशील आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्जनशील समीक्षक स्वत: बारकाईने अभ्यास करून खुद्द चित्रकर्त्याकडून त्याच्या कलाप्रेरणा, त्याच्या सभोवतालाबद्दलच्या जाणिवा असं सारं काही जाणून घेत त्याच्या कलाकृती आपल्या सार्या कुतूहलासकट विस्ताराने समजून घेतोय. केवढी अभूतपूर्व गोष्ट! नव्या पिढीसाठी केवढी मोठी ठेव! केवढा वारसा! ‘जगात जे जे आहे ते ते सारं महाभारतात आहे’, असं म्हटलं जातं. ‘हिचकॉक’ या पुस्तकाबद्दलही हेच म्हणता येईल.’ एव्हरीथिंग दॅट यू वाँट टू नो’ या धर्तीवर चित्रपट माध्यमासंदर्भात सर्व काही त्याच्यात आहे. नायर या पुस्तकाला ‘बायबल’ म्हणाला ते उगाच नाही... आणि हे पुस्तक घराबाहेर न काढण्याविषयीची त्याची भूमिकाही कळली. देवभोळी माणसं जशी घरीदारी कुठेही पोथ्या वाचतात तसंच आमचं हे बायबल हवं, तेव्हा वाचायला आम्हाला उपलब्ध असावं लागतं. ज्याला सिनेमावर समीक्षक म्हणून लिहायचंय किंवा ज्याला किंवा जिला सिनेमाच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये येऊन काम करायचंय त्या सर्वांसाठी ‘हिचकॉक’ म्हणजे पाठ्यपुस्तक आहे. अवघ्या जगाने या फ्रेंच समीक्षकांच्या नजरेतून हिचकॉक आणि त्यांचे चित्रपट समजून घेत आपली माध्यमजाण समृध्द करून घेतली. मात्र त्याबद्दल अमेरिकन समीक्षक म्हणाले,
“या फ्रेंच समीक्षकांना काय हा एवढा महान दिग्दर्शक वाटतो?’’
गंमतच आहे की नाही? म्हणजे म्हणतात नं, ‘घर की मुर्गी दाल बराबर!’ एकदा बासु भट्टाचार्य मला म्हणाले, “तुम बंगाली लोग को जानते नहीं ठीक से. एक बंगाली दुसरे बंगाली का हरदम टांग खींचता है.’’
मी म्हटलं, “दादा, हेच आम्ही मराठी माणसंही मराठी माणसांबद्दल म्हणतो... आणि बंगाली, मराठीच काय, या देशातल्या प्रत्येक भाषेत हे असंच म्हटलं जात असणार.’’
अमेरिकन समीक्षकांची प्रतिक्रिया जेव्हा वाचली तेव्हा वाटलं, ‘पाय ओढण्याची’ ही प्रथा जागतिक आहे. असावी.
आल्फ्रेड हिचकॉक यांना चित्रपटाच्या भाषेची उत्तम जाण आहे असा निर्वाळा देणाऱ्या फ्रान्स्वा त्रुफो यांना शेवटपर्यंत इंग्रजी आलं नाही. पॅरिसमध्ये जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत तेव्हा त्यांना फ्रेंच सब-टायटल्स असत. मात्र जेव्हा केव्हा त्रुफो अमेरिकेत जात तेव्हा तिथे लागलेले नवे हिचकॉकपट किंवा इतर हॉलिवूडपट पाहताना त्यात सब-टायटल्स नसायचे आणि तरीही, ‘आपल्याला त्यांचे चित्रपट संपूर्ण कळायचे’ असं त्यांनी लिहून ठेवलंय. चित्रपट करणारा आणि पाहणारा अशी दोघांना जर चित्रपट भाषेची उत्तम जाण असेल तर दोघांत असा थेट संवाद होऊ शकतो.
हिचकॉक आणि त्रुफो यांच्यातलं नातं खूप काही शिकवणारं होतं. त्यात गमतीजमतीही खूप घडल्या.
‘हिचकॉक’ या पुस्तकाचं प्रपोजल हाती घ्यायच्या खूप आधीची गोष्ट. हिचकॉक त्यांच्या एका चित्रपटाचं शूटिंग करायला फ्रान्समध्ये आले होते. ही माहिती मिळताच त्रुफो आणि क्लॉडे शाब्रॉल त्यांना भेटायला, त्यांची मुलाखत घ्यायला गेले. युरोपमधल्या कडाक्याच्या हिवाळ्याचे दिवस होते. दोघे स्टुडिओत पोचले आणि हिचकॉक यांचं शूटिंग कुठे चाललंय हे शोधत निघाले. साचलेल्या बर्फावरून चालताना अंदाज न आल्यामुळे एका खोलगट डबक्यात पडले. दोघेही पूर्ण बुडाले. मुलाखतीसाठी आणलेला टेप रेकॉर्डरही बुडाला. प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता येईना. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका बाईने पाहिलं आणि ती दोघांवर वैतागून इंग्रजीत धाडधाड बोलत सुटली. दोघांना अवाक्षर कळलं नाही. तिने हात देऊन दोघांना बाहेर ओढून काढलं. दोघंही पार गारठून गेले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिचं डाफरणं चालूच होतं. तिने त्यांना सोबत चालायला सांगितलं. ते तिच्या मागून गेले. कपडेपटात आणून तिने त्यांना अंग कोरडं करायला दोन टॉवेल्स आणि बदलायला कपडे दिले. स्वत: दाराबाहेर उभी राहिली. यांचे कपडे बदलून होताच तिने आपल्यामागून यायला सांगितलं. तिच्या हालचालीतून, हातवाऱ्यातून समजून घेत दोघं तिच्या पाठून निघाले. भयंकर संतापलेली बाई ताडताड बोलतेय खरी पण बाईला केवढी माणुसकी आहे, अशी कृतज्ञतेची भावना दोघांच्याही मनात होती. ती न भेटती तर त्यांचा पार बर्फच झाला असता.
काही वेळातच तिघं शूटिंग स्थळी पोचले. तिथे हिचकॉक यांना पाहताच हे दोघे त्या बाईला फ्रेंचमध्ये ‘एस्क्युझे मुआ मादाम’ म्हणत तिला सोडून हिचकॉक यांच्याकडे गेले आणि आपली ओळख करून देऊ लागले.
“मी त्रुफो, हा शाब्रॉल.’’
एवढ्यात बाई दाणदाण पावलं टाकीत तिथे आली आणि त्यांच्यावर डाफरू लागली. तेव्हा घोळ काय झालाय ते सर्वप्रथम हिचकॉक यांच्या ध्यानात आलं आणि प्रथम ते स्वत:च हसत सुटले. हे दोघे आणि ती बाई चक्रावून त्यांच्याकडे पाहू लागली. आपलं हसणं आवरतं घेत हिचकॉक त्या बाईला म्हणाले,
“अगं हे दोघे म्हणजे पॅरिसचे सुप्रसिद्ध समीक्षक आहेत.’’
ती अधिकच वैतागली. कारण ती ज्या दोन ज्युनिअर आर्टिस्ट्सची वाट पहात होती, तेच हे असावेत असं वाटून उशिरा आल्याबद्दल आणि वेंधळेपणाने बर्फाच्या डबक्यात पडून वेळेचा अपव्यय केल्याबद्दल एवढा वेळ ती त्यांच्यावर डाफरत होती आणि आता ते हे नव्हेत हे कळल्यामुळे भलत्यांच्याच सेवेत आपला वेळ गेला आणि त्या दोन ज्युनिअर आर्टिस्ट्ससाठी ठेवलेले त्या दृश्याचे कपडेही यांना द्यावे लागले, यानं तिची चिडचिड अधिकच वाढली. थोडा वेळ या दोघांना काय चाललंय ते कळेना. दोघे जागीच बावळटसारखे उभे. मग हिचकॉक यांनी कोणाला तरी घडला प्रकार त्यांना फ्रेंचमध्ये सांगा असं सांगितलं. तेव्हा कुठे त्यांना सगळा प्रकार कळला आणि मग त्यांनाही हसू आवेरना. त्यांना त्या बाईला ‘पार्दो (सॉरी) मादाम’ म्हणायचं होतं, पण वैतागून पाय आपटीत ती तिथून केव्हाच निघून गेली होती. पुढे हिचकॉक प्रत्यक्ष भेटीत किंवा पत्रातून त्रुफोंना सांगायचे की, मी जेव्हा जेव्हा व्हिस्की घेतो, तेव्हा ग्लासात डुचमळणारे बर्फाचे दोन खडे बघून मला दरवेळी तुम्हा दोघांची आठवण येते.
हिचकॉक आणि त्रुफो यांच्यात पत्रव्यवहार कायम चालू राहिला. त्याचं पुस्तक माझ्या संग्रही आहे.मधूनच एखादं पत्र किंवा एखाद्या विषयावरची त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं वाचणं हा सुखावणारा अनुभव असतो. त्रुफो आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटाविषयी पत्रातून हिचकॉकना आवर्जून कळवायचे. त्यांच्या अशा सततच्या पत्रांवर हिचकॉक यांनी जे लिहिलंय ते अतिशय मार्मिक आणि हिचकॉकमधल्या अस्वस्थ फिल्ममेकरची आणि त्यांच्या मिस्किलपणाचीही ओळख करून देणारं होतं.एका पत्रात ते म्हणतात,
“प्रिय फ्रान्स्वा त्रुफो,
एका पाठोपाठ तुम्ही सिनेमे करत असता याचा मला खरोखरच हेवा वाटतो आणि कौतुकही
वाटतं तुमचं. तुम्हाला इतक्या गतीने नवनवे विषय कसे सापडतात याचंही कुतूहल वाटतं. गेली तीन
वर्षं मला एकही विषय सुचलेला नाही आणि परिणामी मी एकही चित्रपट करू शकलेलो नाही.
अस्वस्थपणे माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसून असतो. कधी कधी केबिनच्या काचेतून तरुण
रिसेप्शनिस्ट दिसते. ऑफिसातले दोन तरुण आलटून पालटून तिच्याशी गप्पा मारायला येतात. तिथे मला माझ्या सिनेमाची गोष्ट दिसायला लागते. हळूहळू ती आकारालाही यायला लागते. मला हुरूप वाटायला लागतो. मात्र मग मी एका वळणावर त्यातून बाहेर पडतो. ती गोष्ट तिथेच सोडून देतो. कारण पुढे तिचा खून होणार असतो. पोर खूप गोड आहे...’’
फ्रान्स्वा त्रुफो यांच्या ‘द फिल्म्स इन माय लाईफ’ या पुस्तकाने मला कायम झपाटून टाकलं आहे. माझ्यातल्या आस्वादक रसिक प्रेक्षकाला आणि समीक्षकाला त्यातून खूप काही शिकता आलं. ‘व्हॉट डू क्रिटिक्स ड्रीम अबाऊट?’ या पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलेला त्यांच्या शाळकरी वयातला किस्साच समीक्षक कसा असावा यातलं रहस्य अगदी सहजगत्या उलगडून दाखवणारा आहे. ते वाट पहात असलेला मार्सेल कार्ने दिग्दर्शित ‘ले व्हिझितर द्यु सुआर’ एकदाचा त्यांच्या घराजवळच्या चित्रगृहात लागला. शाळेला दांडी मारून त्यांनी तो पहिल्याच दिवशी पाहून घेतला आणि बरोबर शाळेतून परतायच्या वेळी घरी पोचले. संध्याकाळी त्यांची मावशी घरी आली आणि म्हणाली,
“चल फ्रान्स्वा, सिनेमाला जाऊया.’’
तिला माहीत होतं याला सिनेमे खूप आवडतात.तो अर्थातच खूश झाला, परंतु क्षणातच त्याला टेन्शन आलं. कारण शाळेला दांडी मारून दुपारी जो सिनेमा पाहिला होता तोच मावशीला पहायचा होता. ‘दुपारीच पाहिला मी तो’ असं तोंडावर आलं होतंच, परंतु शब्द आतल्या आत ढकलत ‘चल चल’ म्हणत ते उत्साहाने निघाले.या प्रसंगाबद्दल लिहिताना त्रुफो लिहितात की, आपण प्रथमच तो सिनेमा पहायला चाललो आहोत असा भाव त्यांना मावशीबरोबर जाताना सतत चेहऱ्यावर ठेवावा लागला. इतकंच नव्हे तर तो नुकताच पाहिलेला असल्यामुळे सारं माहीत असूनदेखील प्रथमच पाहताना ज्या उस्फूर्त प्रतिक्रिया मावशी व इतर प्रेक्षक देत होते त्याच तेही देत होते. वरवर हे नाटक चालू ठेवत ते आता त्या चित्रपटाच्या गोष्टीच्या पलीकडे जात त्याचं अंतरंग समजून घेण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत होते.
त्रुफो यांनी स्पष्टपणे लिहिलं नाही, मात्र ‘समीक्षकाने गोष्टीत रमत न बसता, तिच्या बाहेर येत सबंध चित्रपटावर सारं लक्ष केंद्रित करायला हवं’ याचा तो महत्त्वाचा पाठ होता.
कधी कधी एखादा चित्रपट जाणत्या समीक्षकालाही सौंदर्यशास्त्र नजरेआड करायला लावत त्याच्यातल्या आशयामुळे कसा पार अस्वस्थ करून टाकतो त्याचं अस्सल उदाहरण ‘द फिल्म्स इन माय लाईफ’मध्ये पहायला मिळतं.
हे असं होतं असं खुद्द त्रुफोच अॅलेन रेनेच्या ‘नाईट अँड फॉग’ या डॉक्युमेंटरीवर लिहिताना नोंदवतात. ही डॉक्युमेंटरी संपली तेव्हा टाळ्या वाजवण्याचं धाडस कुणाला झालं नाही आणि कुणाच्या तोंडातून शब्दही फुटला नाही. जणू सारं भोवतालच नि:शब्द झालंय. गोठलंय. आपल्यासकट साऱ्या समीक्षकांची झालेली अवस्था त्यांनी या शब्दात वर्णन केलीय.पडद्यावर जे काही दिसलं ते दुसऱ्या कुठल्या तरी काळात, दुसऱ्या कुठल्या तरी देशात घडलं आहे असा समज करून घेऊन आपल्या जगण्यात मग्न असणाऱ्यांना या डॉक्युमेंटरीनं खडबडून जागं केलं. हे कुठलं दूरवरचं नाही. हे इथलंच...आपल्याच आसपासचं! ही उद्ध्वस्त करून टाकणारी जाणीव त्रुफो आपल्या समीक्षेत अधोरेखित करतात. ‘नाईट अँड फॉग’ पाहताना ना आपण समीक्षक असतो ना प्रेक्षक, असं म्हणत ते पुढे लिहितात की, ही डॉक्युमेंटरी आपले डोळे सताड उघडते. प्रश्नांचं मोहोळ उठवते. आजवर पाहिलेले सारे थोर सिनेमे क्षणात विसरायला लावते. जगणं, आयुष्य हे केंद्रस्थानी असतं याच्या जाणिवेने ही डॉक्युमेंटरी पाहणारे त्रुफो हे तीत जाणवलेली माध्यम वैशिष्ट्यंही नोंदवल्याशिवाय रहात नाहीत. कारण त्यामुळेच पाहणाऱ्यांवर हा परिणाम झालेला असतो. अॅलेन रेने यांच्या या डॉक्युमेंटरीत क्रूर नाझींनी उभारलेल्या कॉन्सेन्ट्रेशन कँपचं भयानक जग पहायला मिळतं. अर्काइव्हजमधल्या न्यूज रील्समधली क्लिप्स, फोटो आणि ज्याँ किरोलची कॉमेंट्री असं मोजकं साहित्य घेऊन रेने इतिहासातलं ते पान आपल्या प्रतिमांमधून पडद्यावर उभं करतात. यातून त्यांची डॉक्युमेंटरी माध्यमाविषयीची प्रगल्भ समज दिसते.
आमच्यासारख्या अभ्यासकांना, समीक्षकांना ‘द फिल्म्स इन माय लाईफ’चं महत्त्व वाटतंच, परंतु चार्ली चॅप्लीन यांनी त्याबद्दल जे म्हटलंय ते पाहण्यासारखं आहे.
‘‘त्रुफोने कधीही चित्रपट बनवला नसता तरी त्याचं पुस्तक वाचनीय, उपयुक्त आणि प्रेरक ठरलं असतं. पण दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून तो जे पाहतो ते विलक्षण आगळं वेगळं, अत्यंत मनोरंजक आणि मौल्यवान असतं. त्याच्यातल्या दिग्दर्शकाची नजर कमालीची नितळ आणि संवेदनशील आहे. जे दिसतं त्याच्याविषयी त्याला ममत्व वाटते आणि त्याची ही नजर माहीतगाराची नजर असते.’’
फ्रान्स्वा त्रुफो यांनी समीक्षकांबद्दल नोंदवलेलं एक निरीक्षण मात्र अफलातून आहे. ते म्हणतात, “या समीक्षकांना मुळातच सिनेमे पाहण्याची भरपूर आवड असते आणि आता समीक्षक म्हणून चित्रपट पाहण्यासाठी खास आमंत्रित केलं जातं. तिथे त्याला वाईनही मिळते. पाहिलेल्या चित्रपटावर तो काय लिहितो त्याबद्दल चित्रपटसृष्टीपासून सर्व थरातल्या प्रेक्षकाला कुतूहल असते. या लेखनाचे त्याला पैसेही मिळतात... आणि जेव्हा तो फिल्म फेस्टिव्हल्सच्या निमित्ताने देशात वा परदेशात जातो, तेव्हा तो कामावरही असतो आणि सुट्टीवरही! हा जगातला सर्वांत उत्तम व्यवसाय आहे...’’
.............................................................................................................................................
‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5157/Cinema-Pahnara-Manus
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment