अजूनकाही
हल्ली दुसऱ्या फाळणीची चर्चा होऊ लागली आहे. ती अटळ आहे किंवा आपला देश हळूहळू त्या दिशेने चालला आहे. त्याची चर्चा करण्याआधी पहिली फाळणी, तिचे परिणाम समजावून घ्यायला हवेत. प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांनी हिंदी-उर्दूतील भारतीय लेखकांच्या एकंदर १७ कथांचा या संग्रहात मराठी अनुवाद केला आहे. सआदत हसन मंटो, कृष्णा सोबती, भीष्म साहनी, कुर्रतुल-एन-हैदर, विष्णू प्रभाकर, अज्ञेय, गुलज़ार, उपेन्द्रनाथ अश्क अशा मान्यवर लेखकांच्या या कथा आहेत. ‘भय इथले संपत नाही...’ हा नावाने हा संग्रह नुकताच संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. त्याला भोंजाळ यांनी लिहिलेले हे मनोगत...
............................................................................................................................................................
२ सप्टेंबर २०१५ रोजी ग्रीसच्या कोस बेटाच्या किनाऱ्यावर एका लहान मुलाचे मृतावस्थेतील छायाचित्र जगासमोर आले. त्यातून सीरियात चाललेल्या हिंसाचाराचा आणि रक्तपाताचा खरा चेहरा उभा राहिला. त्या मुलाचे नाव ‘आयलन कुर्दी’. तो सीरियाचा. त्याला घेऊन त्याचे आई-वडील कॅनडाकडे निघाले होता. तिथे राहणाऱ्या त्याच्या मावशीने त्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचे ठरवले होते. पण त्यांचा तो अर्ज अमान्य करण्यात आला. सीरियातून तुर्कस्तान, तिथून पुन्हा सीरिया असे करत त्या कुटुंबाने जीवाच्या करारावर रात्रीच्या वेळी जेमतेम पाच मीटर लांब असलेल्या छोट्या होडीतून कॅनडापर्यंतचा प्रवास केला. आणि ती होडी बुडाली. एका पत्रकाराने आयलनच्या मृतदेहाचे छायाचित्र घेतले आणि क्षणार्धात ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. माणुसकी जागी झाली आणि हा प्रश्न अधिक तीव्रतेने जगापुढे आला.
आपल्याकडे रोहिंग्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्यानमारमध्ये त्यांचा छळ मांडण्यात आल्याने त्यांना तिथून पळ काढावा लागलेला आहे. सध्या म्यानमार त्यांच्या जीवावर उठलेला आहे. म्यानमारमध्ये ठार केलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात पोहचली आहे. आपला देश, आपले शहर, आपली भूमी सोडून जगण्याच्या शोधात इतरत्र जावे लागणाऱ्यांची संख्या जगभरात वाढत आहे. आणि त्यात आयन कुर्दीसारखी निष्पाप बळी पडत आहेत.
जगभरात दहशतवादाने धुमाकूळ घातला आहे. भारतात तर हरघडी कुणी ना कुणी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडत आहे. सीमेपलीकडून पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. हा दुसऱ्या फाळणीचा प्रयत्न आहे असाही सूर मधूनमधून आळवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर ‘भय इथले संपत नाही...’ हा फाळणीसंदर्भातील कथासंग्रह वाचकांसमोर येत आहे. या पहिल्या फाळणीच्या वेळच्या कथा आहेत. त्या फाळणीच्या जखमा अद्याप बुजलेल्या नसताना आपण दुसऱ्या फाळणीबाबत चर्चा करतो आहोत. पण अशा चर्चा करणाऱ्यांनी त्यापूर्वी फाळणीसंदर्भातील या कथा नजरेखालून घालणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
पहिल्या फाळणीचा परिणाम अनेकांवर झालेला आहे. त्या दाहक वास्तवाचे प्रतिबिंब अनेक माध्यमातून उमटलेले आपल्याला दिसते. एखाद्या देशाच्या नकाशावर रेखा आखून त्या देशाचे दोन देश कधीच होत नाहीत. भौगोलिकदृष्ट्या तसे झाले तरी माणसांची मने ते मानायला तयार होत नाहीत. त्याचेच प्रतिबिंब मग वाङमयातून चित्रपटातून, चित्रकलेतून किंवा तत्सम कलाप्रकारातून पडलेले आपल्याला दिसते.
या संग्रहातील कथांमधून फाळणीच्या या दाहक वास्तवाचे परिणाम वाचकांना जाणवल्याशिवाय राहणार नाहीत.
हिंदुस्तानची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश अस्तित्वात आले, त्याला ७० वर्षे उलटली आहेत. पण तरीही ‘पिंजर’, ‘खामोश पानी’, ‘गर्म हवा’, ‘गदर’ आणि अलिकडचा ‘भाग मिल्खा भाग’ यासारखे चित्रपट फाळणीचे वास्तव आपल्या समोर उभे करत असतात. ‘तमस’ ही दूरदर्शनवरून प्रसारित झालेली मालिका ही आपल्या स्मरणात असते. अजूनही फाळणीसंदर्भातील कथानकांवर चित्रपट काढावेसे वाटतात इतकी फाळणीची जखम ताजी आहे, असेच म्हणायला हवे.
तर साहित्यात मंटो, भीष्म साहनी, कृष्णा सोबती, मोहन राकेश, गुलज़ार यांनी फाळणीसंबंधांतील घटनांवर आधारित अनेक कथा लिहिल्या आहेत; तर रामानंद सागर यांची ‘और इन्सान मर गया’ ही कादंबरी, भीष्म साहनी यांची ‘तमस’ ही कादंबरी हिंदी साहित्यातील काही उदाहरणे देता येतील. ‘ट्रेन टु पाकिस्तान’ ही खुशवंतसिंग यांची इंग्रजी कादंबरीही याच विषयावर लिहिलेली आहेत.
इतकी पार्श्वभूमी तयार केल्यावर आपण ‘भय इथले संपत नाही’ या भारतीय भाषांमधील फाळणीच्या कथांविषयी जाणून घेऊ यात.
या संकलनातील बहुतेक कथा ज्यांनी साहित्याच्या इतिहासात आपले स्थान पक्के केले आहे, अशा साहित्यिकांच्याच आहेत. त्यातील सर्व कथांविषयी लिहिणे शक्य होणार नसले तरी महत्त्वाच्या कथांकडे मी तुमचे लक्ष वेधणार आहे. सुरुवातीला मी मंटोच्या कथांविषयी लिहितो. ‘खोल दो’ आणि ‘ठंडा गोस्त’ या कथांचा या संग्रहात मी समावेश केला आहे. या कथांमधून मंटो यांनी फाळणीची भयानकता वाचकांसमोर मांडली आहे. फाळणीचा किती विपरीत परिणाम मंटोच्या संवेदनशील मनावर झाला होता, हे या कथांमधून आपण अनुभवू शकतो. मंटोने त्या काळात जे अनुभवले, ते कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या फाळणीने लाखो लोकांचे बळी घेतले आणि द्वेषाचा वारसा मागे ठेवला, त्या फाळणीच्या भयंकर शोकांतिकेचे वर्णन या कथांमधून करण्यात मंटो अत्यंत यशस्वी झाला आहे.
‘खोल दो’ (उर्दू) या मंटोच्या कथेबद्दलही अशीच एक छोटीसी नोंद मी तुमच्यासमोर मांडून मी या संग्रहातील इतर कथांकडे वळणार आहे.
ही कथा ‘नुकुश’ या लाहोरमधून प्रकाशित होणाऱ्या मासिकात त्या काळी प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी त्या मासिकावर सहा महिने बंदीही आली होती. त्या मासिकाच्या संपादकाने पुढे मंटोवर एक लेख लिहिला! त्यात त्याने ‘खोल दो’ या कथेसंबंधी लिहिताना म्हटले होते की, “...ही कथा वाचून मी सुन्न झालो होतो. जर मंटो माझ्याबरोबर नसता तर मी ढसाढसा रडलो असतो. मी कथेचे कागद खिशात ठेवले आणि असा विचार करत परतलो, की जर या कथेलाही नग्न ठरवणारे लोक असतील तर मग आम्ही कथाकारांनी लिहिणे सोडून द्यायला हवे... ही कथा प्रकाशित होताच ‘नुकुश’वर सहा महिने बंदी घालण्यात आली. पण माझ्यावर विश्वास ठेवा, ‘नुकुश’ या माझ्या मासिकावर सहा महिने बंदी आल्याच्या दुःखापेक्षा उर्दूतील अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कथा छापल्याचा आनंद माझ्यासाठी मोठा होता!” फाळणीमुळे निर्माण झालेली भीती आणि भीषणता यांचे प्रतिबिंब या संग्रहातील सर्वच कथांमधून पडलेले आपणाला दिसेल.
‘खोल दो’ आणि ‘ठंडा गोस्त’ या मंटोच्या कथा फाळणीमुळे निर्माण झालेल्या भावनात्मक आणि मानसिक स्तरावर विकलांग करणाऱ्या प्रभाव-परिणामांच्या कथा आहेत हेच खरे.
कृष्णा सोबती यांच्या दोन कथा या संग्रहात आहेत. ‘शिक्का बदलला’ आणि ‘माझी आई कुठे आहे?’ या त्या दोन कथा होत. कृष्णा सोबती यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. त्यांचा जन्म झाला त्या वेळच्या गुजरातमधील तो भाग फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेला. त्यामुळे फाळणीनंतर त्या दिल्लीत येऊन राहिल्या. फाळणीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी जाणत्या वयात घेतला होता. म्हणूनच त्यांच्या कथा आपल्या मनात घर करतात. कारण त्यात प्रत्यक्ष अनुभूती प्रतिबिंबित होते. ‘शिक्का बदलला’ या कथेतील नायिका शाहनी ही वयस्कर आहे. तिला सत्ता बदलली म्हणून मानवी मूल्यांचे निकष बदलणे मान्य नाही. फाळणीमुळे झालेले बदल तिला अर्थहीन वाटतात. तर ‘माझी आई कुठे आहे?’ ही कथा परस्परसंबंधांवर आणि त्यातील गूढ जटिलतेवर जळजळीत कटाक्ष टाकते!
या संग्रहातील भीष्म साहनी यांच्या ‘अमृतसर आले आहे’ आणि ‘पाली’ या दोन्ही कथा फाळणीसंदर्भातील अत्यंत गाजलेल्या कथा आहेत. त्यात त्यांनी फाळणीतील मनोवस्थेचे चित्रण अतिशय तटस्थपणे केले आहे. दुर्दैवाने सांप्रदायिकतेचा मुद्दा आता सर्वकालीन झाला आहे. आज आपल्या समाजात धर्मांध शक्ती सक्रीय झाल्या आहेत! असहिष्णुता वाढलीय. वैचारिक पातळीवर लोक संकुचित झाले आहेत. अशा परिस्थितीत या संग्रहातील कथा आजच्या काळातही सुसंगत वाटतात. ‘अमृतसर आले आहे’ ही भीष्म साहनी यांची कथा फाळणीच्या वेळचे रक्तरंजित वातावरण, फाळणीमुळे समाजात पसरलेली दहशत आणि दोन समाजात वैरभावनेने उफाळलेली खुनशी वृत्ती या सगळ्याचे यथार्थ चित्रण करते. या कथेमधून लोकांच्या बदललेल्या मनोवृत्तीचे आणि सूड घेण्याच्या उन्मादाचे मोठे मार्मिक चित्रण आलेले आहे!
गुलज़ार यांनी आपल्या आयुष्यातील फाळणीच्या संदर्भातील घटनांना जोडून अशीच एक विलक्षण चित्रलिपी वाचकांसमोर कथेच्या रूपात साकार केलेली आहे. फाळणीच्या धामधुमीत हरवलेला आपला मुलगा म्हणजेच ‘गुलज़ार’ आहेत असा समज करून घेऊन एका कुटुंबाने त्यांचा कसा पाठपुरावा केला याचे अतिशय मनोज्ञ चित्रण त्यांनी ‘फाळणी’ या कथेमध्ये केले आहे. ते पटकथाकार आणि दिग्दर्शक असल्याने त्यांच्या शब्दांतून ही कथा एखाद्या चित्रपटासारखी आपल्या नजरेसमोर उभी राहते.
पण फाळणीच्या वातावरणात आप्तजनांची झालेली ताटातूट आणि कल्पना नसतानाही त्यांची झालेली अनपेक्षित भेट यावर आधारित ‘मी जिवंत राहीन’ ही विष्णू प्रभाकर यांची कथादेखील या संग्रहात आहे. त्यातील परस्परसंबंध आणि मूल्यांमध्ये झालेला संघर्ष पाहण्यासारखा आहे.
फाळणीच्या वेळी घडलेल्या घटना प्रसंगांचे अस्सल तपशील ‘बदला’ या कथेत वापरण्यात आले आहेत. कथेच्या नावावरून कुणीतरी कुणाचा तरी बदला घेतला असावा असे आपणास प्रथमदर्शनी वाटते. पण आपल्यावर जो प्रसंग आला तो दुसऱ्या कुणावरही येऊ नये असे या कथेतील सरदार म्हणतो, तोच त्याला बदला वाटतो. तो एके ठिकाणी म्हणतो- ‘‘शेखपुऱ्यात आमच्या बाबतीत जे घडले ते घडले. परंतु मला त्याचा सूड घ्यायचा नाही. कारण त्याचा काही बदला असू शकत नाही. मी बदला घेऊ शकतो आणि तो हाच की, माझ्या बाबतीत जे घडले ते अन्य कुणाच्याही बाबतीत न होवो.”
अशा प्रकारे फाळणीच्या वेळी घडलेल्या घटनांमधून मानवी स्वभावाचे विविध नमुने आपल्याला या कथांमधून भेटतात!
अहमद नदीम कासनींची ‘परमेश्वर सिंह’ ही (उर्दू) अशीच एक विलक्षण कथा आहे. परमेश्वर सिंहला फाळणीच्या धामधुमीत पाकिस्तानातून भारतात येताना पाच वर्षाचा अख्तर नावाचा मुलगा सापडतो. त्याच धामधुमीत त्याचा कर्तार नावाचा मुलगा हरवलेला असतो. त्यामुळे परमेश्वर सिंह वेडापिसा झालेला असतो. अख्तर सापडल्यावर त्याला आपला कर्तार सापडला असेच वाटते. इतर शिखांचा विरोध असताना तो त्या मुलाला आपल्या घरी आणतो... त्याला वाचवण्यासाठी, घरच्या लोकांशी भांडतो. अख्तरला शीख बनवण्याचा प्रयत्न करतो. पण तसे घडत नाही. अख्तरला त्याच्या आईकडेच जायचे असते. शेवटी तो त्याला पाकिस्तानात त्याच्या आईकडे पोहचवण्याचा निर्णय घेतो. पण पाकिस्तानी सैन्याला तो शीख असेच वाटते. त्यामुळे तिकडून झाडल्या गेलेल्या गोळीने परमेश्वर सिंह घायाळ होतो. जखमी अवस्थेत तो म्हणतो – “तुम्ही मला का मारलेत? मी तर अख्तरचे केस कापायचे विसरून गेलो होतो.” ही कथा जातीयवादी आहे असे आरोप करण्यात आले. पण ही कथा नीट वाचली तर परमेश्वर सिंह या पात्राची मनःस्थिती समजणे कठीण जात नाही.
फ़हीम आ़जमी यांची ‘कलेचा पूल’ ही प्रतीकात्मक कथा आहे. एके दिवशी एका भूभागाचे दोन भाग झाले. मध्ये एक चर खोदला गेला. पुढे त्याचे नदीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूच्या लोकांचा संपर्क जवळजवळ तुटल्यासारखा झाला. काही सगेसोयरे इकडे राहिले तर काही तिकडे.
महमंद खानच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न उभा राहिल्यावर त्याची बायको म्हणाली, “कशाची चिंता पडलीय? तुमच्या भावाच्या मुलाशी तिची शादी लहानपणीच ठरलीय ना?”
‘काय बोलतेस तू? ते लोक तिकडचे झाले. त्यांचा आपला आता काय संबंध? आपल्या भागातले स्थळ बघ.’
‘नदी मध्ये आली म्हणून रक्ताचे नाते तुटते का?’
‘हो, तुटते! नदीमुळेच तर हद्दी ठरतात. माणसं वेगळी होतात.’
या कथेमध्ये कुठेही फाळणीमध्ये घडलेल्या रक्तरंजित घटना अधोरेखित केलेल्या नाहीत, पण एका देशाचे दोन देश झाल्यावर नातेसंबंधात कसा दुरावा निर्माण होतो, हे कलात्मक पद्धतीने सांगितले आहे. पुढे दुसऱ्या तीरावरून संगीताचे सूर ऐकू येतात आणि दोन्ही काठावरचे लोक सुखावतात. दोन्ही बाजूच्या लोकांच्या मनातील अढी, तिटकारा व दुरावा सारे काही नदीला मिळते. कलात्मक आणि सांस्कृतिक आशय-विषयाशी जोडल्या गेलेल्या माणसांच्या लेखी सीमा, सरहद्दी भिंती आणि बंधने वगैरेना काहीच अर्थ नसतो. याच वाटेने चालत राहिलो तर राजसत्तेने पेरलेल्या विद्वेषाचे यशस्वी निराकरण करता येऊ शकते, हे कथा वाचल्यावरही आपल्याला पटते. पण या सगळ्या कथांमधून भयाची भावना अदृश्य रूपात दडलेली आपणास जाणवते. म्हणून या कथासंग्रहाचे शीर्षक आहे ‘भय इथले संपत नाही’.
असे इतर कथांबद्दल देखील लिहिता येईल पण वाचकांनी माझ्या चष्म्यातूनच या कथांकडे बघितले पाहिजे असे मला वाटत नाही.
आजही आपल्याकडे अनेक लोक धर्माच्या नावावर माणुसकीची हत्या करायला सरसावलेले आहेत. काही राजकीय पक्ष नेहमी ‘दुसऱ्या फाळणी’ची धमकी देतात. पण ‘दुसऱ्या फाळणी’ची शक्यता वर्तवण्यापूर्वी अशा मंडळींनी या संग्रहातील कथा आणि एकंदरच फाळणी संदर्भातील साहित्य आवर्जून वाचायला हवे. नाहीतर पुन्हा एकदा माणुसकीचा मुडदा बेवारसपणे रस्त्यावर पडलेला आपल्याला पहावा लागेल. ही धोक्याची घंटाच आहे. त्या घंटेचा नाद आपण ऐकायलाच हवा असे मला वाटते. आजच्या काळात तर तो आवश्यकच आहे. त्यासाठीच हा प्रपंच आहे.
............................................................................................................................................................
‘भय इथले संपत नाही...’ या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5156/Bhay-Ithale-Sampat-Nahi
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment