इतर धर्मीयांनी वाचायलाच हवे आणि मुस्लिमांनी पारायण करायला हवे असे पुस्तक!
ग्रंथनामा - झलक
संजीवनी खेर
  • ‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 June 2019
  • ग्रंथनामा झलक अब्दुल कादर मुकादम Abdul Kader Mukadam इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात Islam - Dnyat Aani Adnyat

इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांचं ‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ हे पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

आजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही, तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे. ज्यांनी या धर्माबद्दल बरीवाईट अशी काहीही मते तयार केलेली नाहीत, अशांनी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे. या पुस्तकातील विचार समजून घेण्याअगोदर वाचकाला आकर्षित करते, ती लेखकाची मराठी भाषेवरील हुकूमत आणि त्याचा वापर. श्लोक, अध्याय असे शब्द वापरून त्यांनी भिन्नधर्मी वाचक आणि मुस्लीम लेखक यांच्यातील अंतर कमी केले आहे. त्यामुळे शब्दा शब्दाला न अडखळता आपण सरळ वाचत जातो. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचे सुलभीकरण केलेय. पण संज्ञा समजावून सांगताना त्यांचा आविर्भाव हा समोरच्याला यातले कळत नाही, संकल्पना फार अवघड आहेत बाबा, असे न वाटता सुरस भाषेत मध्यपूर्वेतील लोक, संस्कृती यांचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचक पुढे जात राहतात, मध्येच सोडून देत नाही, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.

खरे सांगते, पुस्तक वाचल्यावर खेद वाटला नि प्रश्न पडला की, इतक्या उदात्त विचारांबाबत जी प्रतिमा नि सत्याची गफलत आहे, त्याला आपण सर्वच जबाबदार आहोत की काय? आपणही फारसे जाणून न घेता या धर्मातील विचार, आचाराबद्दल समजूत करून घेतो की, मूळ विचारातच कट्टरता आहे. पण जसजसे वाचक वाचत जातो, लेखक त्याला आपल्या विश्वासात घेत त्याच्या धर्मातील रूढींची वाढत गेलेली गुंतागुंत स्पष्ट करतो.

जसे हिंदू म्हटला की, एकेकाळी सतीची चाल, विधवांचे केशवपन नि घुसमट समोर यायची, पण प्रबोधन काळातील धार्मिक सुधारणांनी या समाजाने कात टाकली. आधुनिकता म्हणजे स्वैर वागणे नव्हे तर नीतिमानता होय. हे समाजाला पटवून देणारे लोक आतूनच तयार व्हावे लागतात. त्या त्या धर्मावर आलेली रूढींची गच्च काजळी, जी मूठभरांच्या हितसंबंधांना जपते, ती स्वच्छ करणे अत्यावश्यक ठरते. या गोष्टी खरे तर त्या त्या समाजाने स्वत:च कायद्याचा आधार घेत करायला हव्यात.

मुकादमांनी इस्लामचा उदय ज्या भूमीवर झाला, त्याची पार्श्वभूमी देताना तेथील इस्लामपूर्व विविध टोळ्यांतील रक्तरंजित संघर्ष, धर्माच्या नावाखाली सामान्यांच्या जगण्यावर आवळलेले रीतीरिवाजांचे पाश, गरीब श्रीमंतांतील भयावह दरी, त्यामुळे होत गेलेला अन्याय याचे एक वास्तव चित्र उभे केले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर गरिबांना, स्त्रियांना न्याय देणाऱ्या विचारांचा जन्म झाला.

मूळ इस्लामची तत्त्वे पाहिली की, जाणवते की मुळातला विचार न्याय्य आचारविचारावर बेतलेला होता. नंतरच्या काळात धर्ममार्तंडांनी आपल्या सत्तेसाठी त्याची किती मोडतोड केली. त्याचे विदारक वर्णन लेखकाने केले आहे. आजतर हा धर्म म्हणजे केवळ वृत्तीतील कट्टरता नि स्त्रियांवर अन्याय असाच समज सर्वत्र पसरलेला आहे. त्याला त्या धर्मात आलेले गोठलेपण, सुधारणावादी आणि काळाप्रमाणे बदलाचे वारे न पचवलेले लोक कारणीभूत आहेत. धर्माच्या नावाने निरपराधांच्या हत्येची कृत्ये करणारे उच्चशिक्षित (?) तरुण कसे निपजतात? हे न उलगडणारे कोडे बनून राहिले आहे. या धर्माच्या शिकवणीतच असे काहीतरी असले पाहिजे, असा समज अपुऱ्या माहितीतून नि सोयीस्कर गैरसमजातून सर्वांनीच करून घेतला आहे.

सारे दहशतवादी मुस्लीम असतात, पण सारे मुस्लीम दहशतवादी नसतात, हे सत्य आज ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. द्वेषाच्या, धर्मांधांच्या, गैरसमजाच्या काळात आपल्यासारख्या हजारे वर्षांच्या संमिश्र सहजीवन जगणाऱ्या संस्कृतीचे तलम वस्त्र विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच धर्मातील कट्टरतावाद्यांनी इतरांचा धर्म, त्याची तत्त्वे थोडी समजून घतली पाहिजेत. कदाचित त्यांच्या विचारांत बदल होईल. ज्या लोकांनी आपली मते बनवलेली नाहीत वा ज्यांना जिज्ञासा आहे, मन खुले आहे, त्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन करील.

हजरत पैगंबरांच्या जमान्यात सातव्या शतकात, अरबस्थानातील लोकांची काय स्थिती होती? हे जाणून घेतले आणि त्यांनी जे क्रांतिकारक बदल घडवून आणले ते पाहिले की, त्यांच्या द्रष्टेपणाची दाद द्यावीशी वाटते. त्यांच्या काळात गरीब श्रीमंतातील दरी कमालीची वाढलेली होती. टोळ्यांच्या राजकारणात तर्काला विवेकाला स्थान नव्हते. श्रीमंतांना व्यापारासाठी कमी दरात मजूर हवेच असत. शो, आराम हे बड्यांचे जीवन तर दारिद्रयात पोटभर अन्न न मिळणे गरिबांचे नशीब झाले होते. एखाद्याच्या चुकीसाठी अख्ख्या कबिल्याला जबाबदार धरले जाई. न्याय्य समाजाची निर्मिती आणि त्यातून गरिबाला, शक्तिहीनाला न्याय, हा हजरत पैगंबरांचा (जन्म ५७०) उद्देश होता.

साहजिकच ज्यांचे हितसंबंध त्यामुळे दुखावले गेले होते, त्यांचा विरोध या विचारांना होता. परंतु ठोस अध्यात्म आणि क्रांतिकारक विचारसरणीला आरंभिक संघर्षानंतर हळूहळू मान्यता मिळत गेली. न्याय हा त्यांच्या आध्यात्मिक दर्शनाचा गाभा होता. कुराण, हदीस, इज्मा, कयास ही या न्यायशास्त्राची चार साधने होती. त्यातील ‘कुराण’ हे परमेश्वरी शब्द आणि ‘हदीस’ हे पैगंबरांच्या वचनांचे संकलन असल्याने विद्वानांनी आणि सामान्यजनांनी सहज मान्य केली. बदलत्या काळात ही साधने अपुरी वाटल्याने चर्चा, संवाद यातून मार्ग काढावा लागत होता. आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक पाया तोच ठेवून बदल होत असल्याने इज्माला आरंभी विरोध झाला, पण विरोध मोडून काढून प्रागतिक विचार सामावले गेले.

हे सारे संपूर्णत: विस्कळीत टोळी-कायद्याला आव्हान देत करावे लागले, हे आपल्याला ध्यानात घ्यावे लागेल. जसे आपले वेद हे अपौरुषेय मानले जातात, तसेच इस्लाममधील आयाती-श्लोक हे प्रकट झाले असे समजले जाते. ६२३० श्लोक हा या धर्माचा गाभा होय. ‘पवित्र कुराण’ म्हणजे हेच श्लोक होत. यात इस्लामचे न्यायशास्त्र अंतर्भूत आहे. बदलत्या समाजाच्या गरजांप्रमाणे त्यात बदल होत गेले. इज्मा-कायदेपंडित-संशोधक विचारवंत यांच्यातील विचारमंथन होत असे.

इस्लाममधील अनेक खलिफांनी सुरुवातीच्या काळात ज्ञानसंपादनाचे मौलिक काम केले आहे. ग्रीक भाषेतील अनेक अलौकिक तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ त्यांनी अनुवादित केले आहेत. अॅरिस्टॉटल, प्लेटो, हिपोक्रेट्स इ.चे तत्त्वचिंतन त्यांनी त्यांच्या भाषेत नेले. खगोलशास्त्र, वैद्यक, भूगोल, अंकगणित यांचा शिस्तशीर अभ्यास करून ग्रंथ सिद्ध आहेत. त्यांच्या धर्मातील अनेक तत्त्वांचे शुद्ध रूप समोर यावे म्हणून त्यातील श्लोकांचा (आयतीचा) अन्वय, जुन्या हस्तलिखितांच्या अभ्यासाने प्रमाणित प्रती तयार केल्या गेल्या. हे लोक ज्ञानसाधनेत बुडून गेलेले असत. या तत्त्वज्ञांची माहितीही मुकादम यांनी सविस्तर दिली आहे. या धर्मातील अनेक पंथ त्याचे आचारविचार, प्रथा, मतभेद यांचाही ऊहापोह त्यांनी केला आहे.

भूमी आणि पार्श्वभूमी, जन्म इस्लामचा आणि पैगंबरांचा, दिशा आणि वाटचाल, कुराण आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान, सामाजिक आणि आर्थिक क्रांती, शरियत, फिक-उगम, विकास, उत्क्रांतीचे सातत्य, इस्लामी संस्कृतीची वाटचाल, सनातनी परंपरा, इस्लाम युद्धपरंपरा आणि जिहाद, इस्लाममधील स्त्रियांचे स्थान व अधिकार, इस्लामचा अर्थविचार अशा प्रकरणांतून लेखकाने ज्ञात अज्ञात इस्लाम वाचकांपुढे मांडला आहे.

इस्लाम म्हटले की, अनेक गैरसमज इतरांनी उराशी बाळगले आहेत. आजच्या काळात ज्या रूढी मुस्लीम समाजात रुतून बसल्या आहेत, जे गैरप्रकार धर्ममार्तंडानी चालवले आहेत, जो कौटुंबिक अन्याय होतोय वा जिहादच्या नावाने दहशतवाद पसरवला जातोय, तो पाहूनच बहुतेकांनी इस्लामचा नि दडपशाहीचा संबंध जोडला आहे. याहून वेगळे जर काही आपल्या समोर आलेच नाही, तर आपण तेच सत्य मानणार ना? त्यातून आपल्याला इस्लाम म्हणजे नखशिखांत बुरखा, चार बायका, तोंडी तलाक, कुटुंबनियोजनाला विरोध इत्यादी स्त्री विरोधी चित्र दिसते. मूळ धर्मातही ते तसेच आहे असे वाटते. खरेच कुराणात असे आदेश असतील, याचा विचार आपण करीत नाही. किंवा या प्रश्नांची उकल करणारे ग्रंथ वा माहिती आपल्यापर्यंत येत नाही. त्यामुळे समाजातले गैरसमज वाढत जातात. आज या साऱ्यांची उत्तरे या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आली आहेत.

इस्लाममध्ये स्त्रियांना किती हक्क आहेत हे वाचून वाचक थक्क होतो. आपल्याला तलाकपीडित महिलाच फक्त माहीत असतात. पण स्त्रीला घरच्या मालमत्तेत हिस्सा असतो, तिलाही आपल्याला नको असलेले विवाहबंधन मोडता येते, ज्याला ‘खुला’ म्हणतात, याची बहुतेकांना कल्पना नसते. अनेक शतके स्त्रीराजे-बेगम-असलेल्या भोपाळ राज्यातील पुरुष स्त्रियांच्या या हक्काने त्यांना वचकून असत. मेहेरची रक्कम परत करून स्त्रिया स्वतंत्र होत. या कायद्याचे पुरुषी वर्चस्वाने काय केलेय ते आपण पाहतच आहोत.

तीच गोष्ट कुटुंब नियोजनाची. त्यांच्या धर्मग्रंथात सविस्तरपणे संतती नियमनाबद्दल दिलेले आहे. हे मुळातूनच वाचावे असे आहे. हजरत पैगंबरांना जो न्याय्य समाज अपेक्षित होता, त्याचे त्यांच्याच नावाने कसे धिंडवड निघालेत ते सारेच पाहत आहेत. शरीयतीचा धाक दाखवून, धर्मबाह्य गोष्टी रचून शोषणाचे सत्र सुरू ठेवलेले आहे. पण दोष मात्र मूळ विचारांवर येतोय. धर्मधुरीण पुरुषप्रधान समाजाला दृढ करीत आहेत, अन्यथा हजरतांची पत्नी ही स्वतंत्रपणे व्यवसाय करून स्वत:च्या मालकीचे धन कशी संग्रहित करू शकली असती?

हे पुस्तक इतर धर्मीयांनी वाचायला हवे, तसेच खुद्द मराठी भाषिक मुस्लिमांनीही त्याचे पारायण करून, आपल्या सच्च्या धर्माचे पालन करण्याचा आनंद लुटायला हवा, खुला श्वास घ्यायला हवा. त्याचा अनुवाद इतर भाषांत करून तेथील लोकांनाही सजग करायला हवे. चर्चा करायला हवी. बदलाचे मोकळे वारे वाहू देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मुस्लीम धर्मातील लोक त्यांची होणारी कोंडी याचाही समंजसपणे विचार करायला हवा. या विचारातील इतरही अनेक संकल्पनांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे.

मुकादमांचे मनापासून अभिनंदन. या अविश्वास, गैरसमज, संशय, अनास्था, अहंने (सगळ्यांचे अहं टोकेरी झालेत) ग्रासलेल्या काळात त्यांनी एक दिवा लावला आहे. इतरांनी त्यात भर घालावी.

.............................................................................................................................................

'इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4907/Islam---Dnyat-ani-adnyat

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vishal Kulkarni

Mon , 02 September 2019

इस्लाम विषयी गैरसमज का असावेत, जर हा उत्तम पायावर आधारित धर्म असेल तर? प्रत्यक्षात उक्ती आणि कृती यात कमालीचा फरक असलेला हा धर्म आहे हे साधारण ज्ञान असलेली व्यक्ती देखील सांगू शकेल.आणि हिंसाचार आणि त्याला उत्तेजन हे या शांतीपूर्ण धर्माचा एक मूलभूत घटक असावा असे वाटण्या सारखाच त्याचा उद्गम आणि आजवरचा इतिहास आहे आणि ही मते अधिकच गडद होत चाललेली आहेत आणि दलवाई,मुकादम यांच्या सारख्या सुधारकांना या धर्मात काडीचीही किंमत नाही हे दिसून आले आहे


Gamma Pailvan

Fri , 07 June 2019

उत्तम लेख आहे. विशेषत: शेवटल्या दोन परिच्छेदांशी पूर्णपणे सहमत. इस्लामचा वैयक्तिक फायद्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला आहे. त्यातून सुटण्यासाठी मुकादम साहेबांनी योग्य दिशेने पाउल टाकलं आहे. -गामा पैलवान


Milind Kolatkar

Fri , 07 June 2019

"सारे दहशतवादी मुस्लीम असतात, ..."? या पुढच वाचण सोडून दिल! :-)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......