‘निद्रानाशाची रोजनिशी’ : स्वप्नांचा, संकल्पनांचा, माणूसपणाचा पाठलाग करणारी आत्मशोधाची कविता  
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
भास्कर ढोके
  • ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 31 May 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras निद्रानाशाची रोजनिशी Nidranashachi Rojnishi महेश दत्तात्रय लोंढे Mahesh Dattatray Londhe

‘निद्रानाशाची रोजनशी’ हा महेश दत्तात्रय लोंढे यांचा पहिला काव्यसंग्रह. या संग्रहात दोन भागात एकूण ४८ कवितांचा समावेश आहे. पहिल्या ‘भर दिवसाचे साक्षात्कार’ या भागात २२ आणि ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या दुसर्‍या भागात २६ कविता आहेत. या दोनही भागांच्या शीर्षकांवरून कवितांच्या विशिष्ट दिशेने होणाऱ्या प्रवासाचे सूचन होते. पहिल्या भागातील कविता कवीच्या जीवनविषयक धारणा आणि अनुभव अभिव्यक्त होतात. ‘भर दिवसाचे साक्षात्कार’ हे शीर्षक सर्वप्रथम दिवास्वप्नांची आठवण करून देते. पण या कविता दिवास्वप्न पाहणार्‍या नाहीत, तर जगण्याविषयीच्या धारणा आदर्शाच्या कल्पना आणि प्रत्यक्षात वाट्याला येणारा अपेक्षाभंग यांचे शब्दरूप आहे. या कवितांमधून कवी निसर्गासमोर माणसाची क्षूद्रता अधोरेखित करतो. या विश्वाच्या अफाट पसार्‍यात माणसाचे स्थान काय? म्हणजे माणूस म्हणून आपल स्थान काय आहे? असा एक मूलभूत प्रश्न, आपल्या अस्तित्वाचा काय अर्थ आहे किंवा आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे का? असा जगभरातल्या तत्त्ववेत्यांना पडणारा प्रश्न येथेही उपस्थित होतो आणि ही समग्र कविता तत्त्वचिंतनाच्या पातळीवर जाते.

कुठल्याही सृजनशील माणसाला आपल्या कृतीतून काहीतरी सांगायचे असते, आणि ते सांगणे हाच त्याचा  आत्मस्वर असतो. ‘निद्रानाशाची रोजनिशी’तून महेश लोंढे यांचा हा आत्मस्वर व्यक्त झाला आहे. हा आत्मस्वर बौद्धिक आणि भावनिक असा दोनही पातळीवरचा आहे. स्वत:तल्या माणूसपणाचा आणि मर्यादांचा शोध घेताना तो आत्मचिंतनात्मक सूर लावतो. आपण निसर्गात, निसर्गाच्या चक्रात काहीच भूमिका घेऊ शकत नाही, याची  प्रकर्षाने जाणीव व्यक्त होते. या विश्वाच्या अफाट पसार्‍यात माणसाचे स्थान आणि भूमिका काय? तर जवळ जवळ काहीच नाही. केवळ जिवंत राहणे, म्हणजे काही जगणे नाही. तर जगताच न येण्याची खंत किंवा हतबलता विकसित होते -

आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर

चालत नाही

निसर्गाचे कुठलेही घडयाळ

आपण उच्चारलेल्या कोणत्याच शब्दानी

थोडीही समृद्ध होत नाही

कोण्याही पक्ष्यांची भाषा

कोणत्याच महासागराचे तापमान

संतुलीत राखत नाहीत

आपल्या रक्ताचे उष्ण प्रवाह

आपल्या अश्रुंच्या मोसमी पावसाखाली

फोफावत नाही

कुठलेच सदाहरित जंगल

आपल्या घामाची वाफ

पुरवत नाही ऊर्जा

कोणत्याही उष्णकटीबंधीय चक्रीवादळाला

आपण डोळे झाकल्याने

कुठेच होत नाही रात्र अन

उघडल्यानेही नाही उजाडत कुठला दिवस

आपल्या संतापाचा रौद्र लाव्हा

थंड होऊन पसरतो तेंव्हा पाय रोवंण्याजोगं

कोणतही पठार होत नाही निर्माण

इथपर्यंत ही कविता आपल्याला जैविक मर्यादांची जाणीव करून देत राहते आणि शेवटच्या चरणामध्ये पुन्हा मानवीय पातळीवर घेऊन येते

शेवटी जेंव्हा उडून जातो आपला प्राण

तेव्हा त्याला कुणीही

म्हणणार नसत महानिर्वाण

महानिर्वाण हे एक पद या संपूर्ण कवितेला जैविक मर्यादांकडून एकदम मानवी प्रयत्नांची, माणूस म्हणून जगण्याची आठवण करून देतं. ‘जन्मा येऊनीया सांग काय केले?’ असा प्रश्न अनेकदा कीर्तनकारबुवा उपस्थित करतात. तेव्हा त्यांना आपण मरणोत्तर लोकांच्या  स्मरणात राहू असे काही केले आहे का? असा प्रश्न उपस्थित करायचा असतो  सृष्टीतील प्रत्येक सजीवात भूक, भय आणि मैथून या नैसर्गिक प्रेरणा असतातच आणि सजीवांची धडपड या प्रेरणांच्या पूर्ततेसाठीच चाललेली असते, मग इतर क्षूद्र जीव आणि माणसात काय फरक? तर या प्रेरणांच्या पलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे का? असल्यास काय अर्थ आहे? किंवा आपले अस्तित्व कसे अर्थपूर्ण होईल याचा शोध महेश दत्तात्रय लोंढे यांची कविता सतत घेताना दिसते. आता ही अर्थपूर्णता सगळ्यांच्याच वाट्याला येऊ शकते का? तर ते शक्यच नाही. जगणे महानिर्वाणायोग्य व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी मोठा त्याग आणि आत्मक्लेशाला सामोरे जावे लागते; क्षुद्र लोभाच्या पलीकडे जाऊन अखिल मानवतेच्या हिताचा सुख-दु:खाचा विचार स्वीकारावा लागतो. त्यासाठी ‘स्व’चा त्याग करावा लागतो आणि सगळ्यांनाच ते काही शक्य होत नाही. म्हणून पाणी या कवितेतून सामान्य मानसाच्या जगण्याचा एक साचेबद्ध नाईलाज व्यक्त होतो. त्याला प्रचंड कुतूहल असते जीवनाचे, जीवनातील अनाकलनीय रहस्यांचे. पण या रहस्यांचा शोध घ्यायचा असेल तर असावी लागते दुर्दम्य इच्छाशक्ती -

ज्याना भय छेडते सतत          

कृष्णविवरातल्या एकांत वाटचालीचे

त्यानी घासू नये लोकांचे चेहरे,           

ना स्वतःभोवतीच्या भिंतींचे रंग

 नसेल खोल दमसास तर वरचेवर तरंगावे      

खोलवर मारु नये सूर

कुणाच्याही नाकातोंडापसून पाणी      

तसे कधीच नसते फार दूर 

महेश दत्तात्रय लोंढे यांची कविता ही एका अर्थाने आत्मशोधाची कविता आहे. ती सतत स्वप्नांचा, संकल्पनांचा, माणूसपणाचा पाठलाग करते. एका अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. ती एका बाजूला आत्मतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते पण देहाचे, भौतिकजगाचे बंध ती झुगारत नाही तर त्याला सामोरे जाण्याचे मार्ग शोधते. ऐहिक ध्येय्य प्राप्त करण्यासाठी करावी लागणारी धडपड हा या  कवितेतील महत्वाचा भाग आहे.

महानिर्वाणाइतके असामान्यत्व प्राप्त करणे ही आवाक्यातली गोष्ट नसली तरी समान्य माणसाला जगण्याची असामान्य लढाई लढावीच लागते. ध्येय्यासाठी संघर्ष करावाच लागतो -

ओढला पाहिजे आपला गाडा

जोमाने आता जोरशोर

अंगचोर बैल पडलाय सैल

झालाय फार कामचोर

थांबून कसे चालेल आता

सोडले पाहिजे घरदार

व्हायला पाहिजे हा ओढा

ती नदी तो समूद्र पार

पार व्हायलाच पाहिजे ते मैदान

तो डोंगर ते पठार

जगण्याची तीव्र स्पर्धा भविष्याची चिंता आणि आकसत चाललेली उदरनिर्वाहाची साधन, आधुनिकीकरणाने  प्रभावित होत असलेले, उदध्वस्त  होत  असलेले जगण्याचे पारंपरिक मार्ग, कृषी-जनव्यवस्थेची होत असलेली परवड या कवितेतून प्रभावीपणे येते.

झाडझाड चाल्लय वाळून

जलवाहिन्या निपचित

सालसाल खंगलीय किती

रसवाहिंन्या गपगार

गवताची कापणी झालीय

उरापर्यंत गळ्यापर्यंत

अंधार पोहचलाय खोलवर

मूलाधार चक्रापार

जगण्यासाठीचा संघर्ष करत असताना जाणीव आणि नेणीवेतील द्वंद्व सतत चाललेले असते. आपण ज्या नैसर्गिक परिवेशात राहतो तिथला निसर्ग हा आपल्या जगण्याचाच एक भाग झालेला असतो. सभोवताल नेणीवेत पक्का बसलेला असतो. अशा या सभोवतालचा जेव्हा त्याग करावा लागतो तेव्हा आतून काहीतरी तुटल्याचा हातातून काहीतरी निसटल्याचा भास होतो. माणूस खरेतर नेहमीच आपआपल्या भूमिशी जोडलेला असतो, ज्याची नाळ मातीशी जोडलेली असते त्याच्यासाठी सभोवताल हा केवळ भौगोलिक परिसर नसतो, तर तो त्याच्या जगण्याचाच एक अपरिहार्य भाग असतो. शेतीमातीशी जोडलेल्या माणसांचा मातीशी एक करार असतो. शेती आणि माती हे केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन नसते तर त्यांच्यात एक भावनिक, सांस्कृतिक बंध असतो. पण जेव्हा त्याला या परिवेशाचा जिवंत राहण्यासाठी त्याग करावा लागतो तेव्हा शरीरातून आत्माच सोडून चालल्याची  भावना त्याच्या मनात निर्माण होते. इंग्रजीत ज्याला आपण ‘dettachment’ म्हणतो, तशीच तुटलेपणाची किंवा विलगतेची भावना निर्माण होते. महेश दत्तात्रय लोंढेच्या समग्र कवितेत ही तुटलेपणाची भावना सतत जाणवत राहते.

निद्रानाश आणि भरदिवसा होणारे साक्षात्कार किंवा दिवास्वप्न या मुळात मनाच्या अवस्था आहेत. निद्रा शरीराची एक रूपांतरित अवस्था असते आणि निद्रानाश हा मानसिक विकार. इथे या मानसिक विकाराचा संदर्भ तुटलेपणाशी आहे. जाणीव आणि नेणीवेतील हा संघर्ष खेड आणि शहर, ग्रामसंस्कृती विरुद्ध नागरसंस्कृती, आधुनिकता आणि परंपरा असे व्यापक स्वरुपात आलेला आहे. नैसर्गिक जीवनशैलीवर कृत्रिमतेने मात केल्यानंतर येणारी हतबलता हा या कवितेचा गाभा आहे. ही हतबलता अनेक अंगांनी व्यक्त झाली आहे.

उदा.,

खिडकीबाहेरील झाडे, नद्या, डोंगर

नजरेनेच उचलून मी घरात आणले होते

पाण्याच्या नळाच्या जागी

नदी ठेऊन पहिली होती मी

अन एक मोठा वटवृक्षच ठेवला होता कुंडीतल्या रोपाऐवजी

माझ्या खुर्चीच्या जागी मी एक छोटे पठार ठेऊन पाहिले होते (जोपर्यन्त मी घरात राहणार)

किंवा

पक्ष्यांकडून ऐकायला पाहिजेत

कायम बदलणार्‍या मोसमाविषयीचे अंदाज

समजाऊन घ्यायला हवेत

हंगामी स्थलांतराच्या सगळ्या जीवनमार्गांचे नकाशे

(जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर)

गावखेड्यातून शहरात रुजू पाहणार्‍या कुणाही मानसच्या मनात येतील असे हे दृश्य आहे. शहर हे जाणिवेच्या पातळीवर सतत अनेक अभावांची साक्ष देत राहत आणि नेणीवेतील निसर्ग, झाडे पाने, फूल, डोंगर दर्‍या, त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. सतत साद घालत राहतात.

खेड आणि शहर याच्यातील अंतर दोन हे दोन संस्कृतीतिल अंतर आहे. दोन्ही संस्कृतींचा निसर्ग आणि नैसर्गिक साधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. नागरसंस्कृती निसर्ग ओरबडत असते तर ग्रामीण संस्कृती निसर्गाचे संवर्धन करत असते. ‘सहा लीटर पानी फ्लश करताना’ या कवितेतून हा संस्कृतिसंघर्ष प्रभावीपणे व्यक्त झाला आहे -

हापसून जीव जायचं तरीही

बुडालेली घागर यायची नाही वर

मैलभर पडलेली कोरड शमवायला

मग रांग लावायचो उन्हात

घशातली आग फुफाट्यापर्यंत पोचायची

माहेरून येणार्‍या भावाची वाट बघावी

तशी टँकरची वाट बघत बसायच्या

पाण्याला आलेल्या बायका

आणि बडबडत राहायच्या चुलीबद्दल

कोरड्या तोंडांनी

सर्वत्र पसरलेल्या तवाजाळ दुपारी

विहिरीत डोकावणार्‍या पोरांच्या डोळ्यात

निपजायची काठोकाठ पाण्याची स्वप्ने

टँकर निघून गेल्यावरच्या चिखलात

पोर खेळायची शेती-शेती फसल-फसल

चिखलच्या बैलाला तडे जाई पर्यन्त

सहा लीटर पाणी

एकदम फ्लश करताना

धडकीच भरते उरात

चाललेला मैल आठवतो

चिखलाचा बैल आठवतो

हतबल झालेल्या आणि मातीच्या बैलाच्या रूपाने नेणीवेत घट्ट रुजलेल्या कृषिसंस्कृतीच इतकं दाहक वर्णन क्वचितच मराठी कवितेत पाहायला मिळते. ही कविता केवळ शहरी चंगळवादाकडे निर्देश करत नाही तर दोन संस्कृतींमध्ये पडलेले अंतर अधोरेखित करते. सहज एका फ्लशमध्ये सहा लिटर पाणी वाया घालवणार्‍यांना एक हांडा पाण्यासाठी दहा दहा मैल उन्हातहात पायपिट करणार्‍या खेड्यातल्या स्त्रियांचे किंवा पाण्याअभावी करपा झालेले शिवार पाहून कोरडेठाक झालेल्या शेतकर्‍याच्या डोळ्यातले दु:ख कसे कळणार?

आधुनिकता आणि तिच्याबरोबर आलेली चंगळवादाची संस्कृती मानवी अस्तित्वावर काय परिणाम करते? माणसाच्या माणूसपणाचे नेमकी काय झाले आहे  याचाही शोध ही कविता घेते. आधुनिकीकरणाने व्यक्तिवादाचे स्तोम वाढले. समाज या घटकापेक्षा व्यक्तीचे हित महत्त्वाचे ठरले म्हणजेच स्वार्थ महत्वाचा ठरला पण स्वार्थी झालेला माणूस सुखी झाला का? या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मकच येते.

आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण आणि शहरीकरणाने त्याचे बेटात रूपांतर झाले आहे. तो एकटा पडला आहे. माणसांच्या प्रचंड गर्दीतही तो एकटाच आहे. माणसाला स्वत्वाची जाणीव झाली की, त्याला सोबतीची गरज वाटू लागते. सोबतीची गरज वाटणे म्हणजेच भय. एकटेपणा ही भयाची अवस्था आहे. पुरुषाकार आत्म्याने पहिली सोबत म्हणून स्त्रीला निर्माण केले असे मानले जाते. स्त्री म्हणजे षड्-रूपा किंवा  प्रकृतीचे एक रूप. आधुनिक काळात आपण एकटे आहोत म्हणजे प्रकृतीपासून दूर जात आहोत. निसर्गापासून नैसर्गिक जगण्यापासून, मूलभूत मानवी प्रेरणापासून दूर जाणे हेच भयाचे खरे कारण आहे. महेश दत्तात्रय लोंढे यांनी ‘भय झिंदाबाद’ या बारा तुकड्यांच्या दीर्घ कवितेतून भयाचे हे ब्रह्मरूप दर्शन घडवले आहे.

शाळेत भयाची मुळाक्षरे

फळ्यावर भयाची समीकरणे

भीती एके भीती .. भीती दुणे भीती

भीतीची बेरीज, गुणिले भीती

भीतीची उजळणी भीतीचे पढे

भीतीचे राव चिरेबंदी वाडे

 

भीतीचा  पूल भीतीचे पाणी

खिशातून पडतात भीतीची नाणी /

सोमवार मंगळवार बुधवार... भयवार /

अशा पद्धतीने भीती विविध रूपे घेऊन अवतरते. एवढेच नव्हे तर भीती एकदम रौद्र रूप घेते ती धर्म या नावाने.

सपसप खपाखप धरमके नामपर

भिताल्लाह  भयश्रीराम

झुंडीत जाऊन आरत्या गाऊन

भीतीच्या पाळख्या

झिंगायचे वाहून

खूप खूप चिकट ही भीतीची जात

अंत आरंभावरून भयंकर वाद

भयशिवाजी! भयभवाणी!  भयभीम!

भय झिंदाबाद!

‘निद्रनाशाची रोजनिशी’ मधील कविता स्वतंत्रपने वेगवेगळी अनुभूति देणार्‍या असल्या तरी त्यात एक सातत्य आहे. आत्ममग्नता हा तिचा विशेष आहे. यातील प्रत्येक कविता एक स्वतंत्र अनुभूती असली तरी त्यातून जगण्याविषयीचे सलग चिंतन आणि महत्त्वाचे म्हणजे ताटवापर्यंत पोहचण्याची धडपड दिसते आणि म्हणूनच आत्ममग्न असूनही ती कविता प्रातिनिधिक होते समाजाच्या वतीने बोलत असल्याने ती समाजाची कविता होते. कवितेची एक विशिष्ट भाषा असते. स्वतचे रूप असते. ‘निद्रनाशाची रोजनिशी’तील कविता या दृष्टीनेही अभ्यासण्यासारखी आहे. तिची स्वत:ची परभाषा आहे आणि ती कृषिकेंद्री आहे, रूपाचे आणि घाटाचे भान हे तिचे बलस्थान आहे. या संग्रहातील एकूण अट्ठेचाळीस कविता आहेत त्यातील काही कविता तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणार्‍या आहेत. संघर्षाच्या अवस्थेतील युवकाच्या मनाची लैंगिक घालमेल त्यातून व्यक्त होत असली तरी त्या या संग्रहात नसत्या तर बरे झाले असते. ग्रामीण पार्श्वभूमीतून शेतीमातीतून जगण्याचा संघर्ष करणार्‍या आणि शहरी कृत्रिम वातावरणात उपराच ठरणार्‍या प्रत्येक संघर्षशील आणि संवेदनशील माणसाचा आवाज म्हणजे ही ‘निद्रनाशाची रोजनिशी’ आहे.

 .............................................................................................................................................

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3998

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......