अजूनकाही
‘Surely You're Joking, Mr. Feynman!’ हे इंग्रजीतील चर्चित आणि गाजलेलं पुस्तक. Richard Feynman या अवलिया शास्त्रज्ञाचं हे अनुभवकथन अफलातून आहे. या पुस्तकाचा मूळ नावानं मराठी अनुवाद माधुरी शानभाग यांनी केला आहे. मधुश्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या एका प्रकरणातला हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
मी साधारण अकरा-बारा वर्षांचा असताना माझ्या घरात माझी प्रयोगशाळा उभी केली होती. ही एका जुन्या लाकडी सामान ठेवायच्या खोक्यात होती. त्यात मी आडव्या फळ्या घालून त्याची घडवंची बनवलेली होती. माझी एक विजेची शेगडी होती. त्यावर पॅनमध्ये नेहमी तेल तापवून मी बटाट्याच्या काचऱ्या तळून खात असे. माझ्याकडे वाहनाची असते तशी एक रासायनिक बॅटरीही होती आणि विविध शक्तीचे दिवे एका पट्टीवर एकत्र ठेवलेले होते.
हा दिव्यांचा संग्रह बनवण्यासाठी मी (इथे सर्व वस्तू पाच ते दहा सेंटमध्ये मिळतात) दुकानात जाऊन दिवे बसवण्यासाठी खाली असतात, ती स्वस्त सॉकेट्स आणत असे. ती साधा स्क्रू डायव्हर वापरून लाकडी पट्टीवर बसवता येत असत. त्यांना साधी दारावरच्या घंटीला वापरतात ती तार वापरून मी जोडत असे. या दिव्यांना साध्या रेषेत (सिरीज) अन् एकमेकांना समांतर (पॅरलल) असे जोडून मी वेगवेगळी जोडणी करत असे. त्यांना बॅटरी जोडली की, ते दिवे वेगवेगळा प्रकाश देतात हे मला ठाऊक होते; पण दिव्यांचा विद्युतरोध त्यांच्या तापमानावर अवलंबून असतो हे मला ठाऊक नव्हते. म्हणून मी जेव्हा गणित मांडून असा प्रकाश मिळेल, अशी अपेक्षा करत असे, तेव्हा तो तसा कधीच मिळत नसे; पण ते तसे ठीक होते. सरळ ओळीत लावलेले दिवे जेव्हा अर्धामुर्धा प्रकाश देत चमकत, तेव्हा ती रेषा अगदी सुंदर दिसत असे. मला आपण अगदी ग्रेट आहोत, असे वाटत असे.
या साऱ्या जोडणीमध्ये मी फ्यूज वायरही वापरत असे. मी कधीही तार जोडून शॉर्टसर्किट केले, तर ही फ्यूज उडत असे. आता घरातली फ्यूज वायर जाड होती अन् मला अगदी बारीक तार हवी होती. मी जुन्या उडालेल्या फ्यूजच्या तारेभोवती पत्र्याच्या डब्याचे पातळ झाकण कापून त्याच्या पट्ट्या गुंडाळल्या. या फ्यूजला पाच वॉटचा दिवा जोडलेला होता म्हणून जेव्हा फ्यूज उडे तेव्हा त्या बॅटरीला जोडलेल्या मुख्य जोडणीतील विद्युतशक्ती दिव्याला मिळून तो चमकू लागे. हा दिवा एका वीज साठवून ठेवणाऱ्या बॅटरीला जोडलेला होता. सर्व दिवे जोडलेल्या बोर्डवर चॉकलेटभोवती कागद असतो, त्या रंगीत कागदामागे तो ठेवलेला होता. या कागदामागे दिवा पेटला की, मूळचा तपकिरी कागद लाल दिसे. आता काहीतरी होऊन फ्यूज गेला की, दिव्यांची माळ विझत असे. मग मी सर्व दिवे जोडलेल्या त्या बोर्डवरच्या लाल लाल प्रकाश दिसणाऱ्या भागाकडे जाऊन शोधत असे. उडलेली फ्यूज वायर पुन्हा जोडत असे. या साऱ्या खटाटोपात मला भलती मजा येत असे.
मला रेडिओ ऐकायला फार आवडत असे. मी एक लहानसा सेट एका दुकानातून विकत आणला. रात्री झोपताना बिछान्यात रेडिओे ऐकत निद्राधीन होत असे. त्यासाठी कानात घालायच्या एका इअरफोनची जोडीही मी घेतली होती. कधी कधी माझे आई-वडील रात्री उशिरापर्यंत बाहेर जात, तेव्हा ते खोलीत गुपचूप येऊन माझ्या कानातला इअरफोन काढत असत आणि रात्री झोपेपर्यंत माझ्या कानातून काय काय आत जाते आहे, रात्रभर झोपेत असताना डोक्यात काय काय घोळते आहे, याबद्दल काळजी करत असत.
त्याच सुमारास मी चोराने घरात प्रवेश केला, तर घंटा वाजावी असा एक कामचलाऊ अलार्म स्वतः डोके लढवून बनवला होता. तशी त्याची रचना अगदीच साधी होती. एक बॅटरी, घंटा अन् त्यांना एकमेकांशी जोडणारी तार... जेव्हा माझ्या खोलीचे दार उघडले जाई, तेव्हा ती तार मागे सरकून विद्युत मंडल पूर्ण होई, दोन्ही तार जोडली जात अन् घंटेचा गजर वाजत असे.
एके रात्री माझे आई-वडील रात्री खूप उशिरा घरी आले. मला जाग येऊ नये याची काळजी घेत त्यांनी अगदी सावकाश, हळूहळू दार उघडले. त्यांना फक्त माझ्या कानात असलेला इअरफोन काढायचा होता; पण तार मागे खेचली गेली अन् मोठ्याने घंटा वाजू लागली. बाँन्ग बाँन्ग बाँन्ग बाँन्ग बाँन्ग! मी बिछान्यातून उठून आनंदाने ओरडू लागलो, तो वाजतो आहे, वाजतो आहे, वाजतो आहे...
माझ्याकडे गाडीत पेट्रोलमध्ये ठिणगी पाडण्यासाठी वापरतात तसली एक गोल स्पार्कनळीही होती. त्याला फोर्ड कॉइल म्हणतात. मी तयार केलेल्या दिव्यांच्या बोर्डवर स्पार्क पाडण्यासाठी दोन केंद्रे ठेवली होती. मी एक ट्यूबलाइटसारखी असलेली रेथिऑन ट्यूब, ज्यात अरगॉन हा वायू भरलेला असतो, ती घेऊन त्या जोडणीच्या दोन टोकांना तारेने जोडत असे अन् मग त्या नळीत आत असलेला वायू मंद जांभळा प्रकाश देत असे. मला ते बघून खूप आनंद मिळे.
एकदा मी त्या फोर्ड नळीशी खेळत ठिणग्या कागदावर पाडत त्याला भोके पाडत होतो अन् अचानक कागदाने पेट घेतला. लवकरच मला तो कागद हातात धरता येईना कारण आग आता हाताच्या बोटापर्यंत पोचली होती. मी तो कागद लगेचच खोलीतल्या धातूच्या कचरापेटीत टाकला. त्यात जुन्या वर्तमानपत्राचे बरेच बोळे होते, त्यांनी पेट घेतला. वर्तमानपत्राचे कागद भराभरा जळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. आता त्याच्या ज्वाळा माझ्या छोट्या खोलीत अगदी मोठ्या दिसू लागल्या. मी खोलीचे दार बंद केले कारण आई बाहेर बैठकीच्या खोलीत तिच्या मैत्रिणींसोबत ब्रिज खेळत होती. तिला समजू नये म्हणून मी एक जवळचे जाडसर मासिक उचलले अन् ते कचरापेटीवर ठेवले. ज्वाळा बंद झाल्यावर मी मासिक बाजूला केले, तर धूर येऊ लागला. आता खोली धुराने भरू लागली होती. धातूची कचरापेटी तापल्याने आता ती हातात धरणे मुश्किल होते. मग मी एक चिमटा काढून त्याने ती कचरापेटी पकडली अन् सावकाश खोलीच्या दुसऱ्या टोकाला खिडकीपाशी नेली. कचरापेटी खिडकीबाहेर धरल्याने धूर बाहेर हवेत जाईल असे मला वाटले; पण बाहेर वारा वाहत होता, त्याने पुन्हा कागद पेटले. आता मासिक तर माझ्यापासून दूर खोलीच्या त्या टोकाला होते. मी पुन्हा ती कचरापेटी ओढत आत घेतली आणि मासिक आणू लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की, खिडक्यांना कापडाचे पडदे आहेत. त्यांनी पेट घेतला, तर परिस्थिती गंभीर होईल.
मी मासिक हस्तगत केले, आग पुन्हा विझवली. आता मी खिडकीकडे येताना मासिक घेऊनच आलो अन् कचरापेटी हलवून ते निखाऱ्यासारखे पेटलेले कागद खिडकीबाहेर रस्त्यावर खाली दोन मजले फेकून दिले. मग मी खोलीबाहेर आलो, माझ्यामागे दार बंद केले अन् आईला सांगीतले की, मी खेळायला बाहेर जातो आहे. सावकाश धूर खिडकीतून खोलीबाहेर निघून गेला.
मग मी जरा किचकट बाबी हाताळू लागलो. मी विजेवर चालणाऱ्या मोटर वापरून खेळत असे. मी आवाज मोठा करणारा एक अॅम्प्लिफायर बनवला. हा खास फोटोसेल असलेल्या घंटीसाठी होता. मी जेव्हा त्याच्या सेलसमोर हात पसरत असे तेव्हा प्रकाश अडला जाई अन् त्यामुळे विद्युतमंडल पूर्ण होऊन घंटा वाजत असे. मला असे अनेक प्रयोग करायचे होते; पण माझी आई मला सारखे बाहेर खेळायला पिटाळत असे. मला जेव्हा संधी मिळे तेव्हा मी माझ्या प्रयोगशाळेत खुडबुड करत नवे नवे प्रयोग करत असे.
मी जुन्या बाजारात जाऊन रेडिओे विकत घेत असे. माझ्याकडे पैसे नसत; पण त्या वेळी ते फारसे खर्चिक नसत. ते सर्व जुने, मोडलेले रेडिओे विकत घेऊन ते दुरुस्त करून ऐकायला येईल इतपत मी त्यावर काम करत असे. बहुतेक वेळा ते अगदी मामुली कारणाने बिघडलेले असत. आत उघडून बघितले की, कुठे तार लोंबत असे, आतली वायरची गुंडाळी सैल वा सुटलेली असे, तेवढे दुरुस्त केले की, पुरे होत असे. एकदा अशा दुरुस्त केलेल्या रेडिओेवर मला वाको या टेक्सासमधल्या रेडिओे स्टेशनवर वाको हा कार्यक्रम ऐकू आला आणि मी भलता खूश झालो.
याच दुरुस्त केलेल्या ट्यूब रेडिओेवर माझ्या प्रयोगशाळेत शेनेक्टडी या नावाच्या स्टेशनपर्यंतचे कार्यक्रम ऐकू येऊ लागले होते. आता आम्ही सर्व मुले, माझे दोन मावसभाऊ, माझी बहीण आणि काही शेजारपाजारची मुले खालच्या मजल्यावर रेडिओभोवती गोळा होऊन इनो क्राइम क्लब हा रहस्यकथांचा कार्यक्रम ऐकू लागलो. इनो या फ्रुट सॉल्ट बनवणाऱ्या कंपनीने हा कार्यक्रम प्रायोजित केलेला होता. हा कार्यक्रम मुलांमध्ये फारच लोकप्रिय होता. मी शोधून काढले की, हा कार्यक्रम शेनेक्टडी रेडिओे स्टेशनवरून न्यू यॉर्कपेक्षा एक तास आधी प्रसारित होतो अन् तो मी माझ्या खोलीतल्या रेडिओेवर ऐकू शकतो. असे केल्याने मला रहस्य कसे उलगडत जाणार आहे, हे आधी कळत असे. मग खाली जेव्हा सर्व जण मिळून न्यू यॉर्क येथून प्रसारित होणारा कार्यक्रम रेडिओभोवती कोंडाळे करून ऐकत असू तेव्हा मी सहज म्हणत असे, तुम्हाला माहीत आहे का? बराच वेळ झाला, त्या अमक्यातमक्याकडून अजून काहीच समजलेले नाही. आता तो येऊन सगळे शोधून काढेल पाहा, यावर मी पैज लावतो.
दोन सेकंदांनी, बप बप बप!! तो येतो! आणि सगळे उत्सुकतेने ऐकू लागतात. मी मग आणखी दोन गोष्टी अशाच अंदाज व्यक्त केल्यासारखे सांगतो. मग त्याना संशय येतो. काहीतरी युक्ती असली पाहिजे, मला कसेतरी आधी समजते आहे! मग मी पराक्रम केल्यासारखे त्यांना माझी युक्ती सांगतो की, मी आधी वरती सगळे एक तास आधीच ऐकलेले आहे.
आता याचा परिणाम काय झाला तुम्हाला ठाऊक आहे का? ते सर्व नेहमीच्या कार्यक्रमापर्यंत थांबायला तयार नसत. ते सर्व माझ्या खोलीत वरती येऊन प्रयोगशाळेतील त्या खर्रखर्र करणाऱ्या छोट्याशा रेडिओेवर शेनेक्टडी स्टेशनवरून प्रसारित होणाऱ्या इनो क्राइम क्लब कार्यक्रम ऐकायला येऊन बसत.
त्या वेळी आम्ही मोठ्या घरात राहत होतो. ते घर आमच्या आजोबांनी आपल्या मुलांना दिलेले होते. त्यांच्याकडे हे घर सोडले, तर फारसे पैसे नव्हते. ते एक लाकडी बांधणीचे मोठे घर होते अन् मी बाहेरून तारा जोडून प्रत्येक खोलीत प्लग लावून जोडण्या घेतल्या होत्या, त्यामुळे कुठल्याही खोलीत बसून मी वरच्या मजल्यावरील माझ्या प्रयोगशाळेतील रेडिओे ऐकू शकत असे. माझ्याकडे एक लाउड स्पीकरही होता म्हणजे तसा सगळा नव्हता. त्याचा कर्णा गायब होता; पण बाकी सारे होते.
एक दिवस माझ्या कानाला इअरफोन लावलेला असताना मला एकदम शोध लागला की, मी स्पीकरमध्ये बोट घातले की मला इअरफोनमधून ऐकू येते आहे. मग मी बोटाने स्पीकरच्या पृष्ठभागावर कुरकुर खरवडले अन् मला ते इअरफोनमधून ऐकू आले, तेव्हा मला कळले की, स्पीकर हा आवाज उलट्या दिशेनेही नेऊ शकतो म्हणजे माईकचेही काम करू शकतो. त्यासाठी वेगळी बॅटरी असायचीही गरज नाही. शाळेत आम्ही ग्रॅहम बेलबद्दल ऐकत होतो, तेव्हा मी तिथे एकदा स्पीकर अन् इअरफोन घेऊन त्याचे सर्वांना प्रात्यक्षिक करून दाखवले. मला अर्थात त्या वेळी ठाऊक नव्हते की, हेच प्राथमिक तंत्र वापरून त्याने टेलिफोन बनवलेला आहे.
आता माझ्याकडे मायक्रोफोन म्हणजे माईकही होता अन् मी माडीवरून खाली अथवा खालून माडीवर असे बोलणे प्रसारित करू शकत होतो. त्यासाठी मी माझ्या मीच दुरुस्त केलेल्या कामचलाऊ रेडिओेचे आवाज मोठा करणारे अॅम्प्लिफायर वापरत होतो. त्या वेळी माझी धाकटी बहीण जोआन ही माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान म्हणजे दोन-तीन वर्षांची होती. त्या वेळी अंकल डॉन नावाचे एक पात्र रेडिओे प्रसारणातून मुलांचे कार्यक्रम करत असत अन् ते तिला ऐकायला खूप आवडत. ते मुलांसाठी छोटी छोटी गाणी म्हणत अन् बरेच काही करत असत, तसेच ते काही पालकांनी आपल्या मुलांना पाठवलेली पत्रे वाचून दाखवत. त्यात मेरी अमकीढमकीचा वाढदिवस शनिवारी २५, फ्लॅशबॅक अव्हेन्यू येथे साजरा होत आहे, तिला शुभेच्छा... असले मजकूर असत.
एक दिवस मी आणि माझा मावसभाऊ फ्रान्सिस यांनी जोआनला खाली बसवले आणि सांगितले की, आज रेडिओेवर एक खास कार्यक्रम आहे आणि तिने तो ऐकायला हवा. मग मी आणि तो वर जाऊन आमचे प्रसारण सुरू केले. मी अंकल डॉन बोलतो आहे, आम्हाला एक छोटी गोड मुलगी माहीत आहे. तिचे नाव जोआन आहे अन् ती न्यू ब्रॉडवे इथे राहते, तिचा वाढदिवस जवळ आलेला आहे अन् तो अमक्यातमक्या दिवशी आहे. ती एक चांगली, सुरेख मुलगी आहे. मग आम्ही तिच्यासाठी गाणे म्हटले. मग तोंडाने आवाज काढत संगीतही दिले. डिडल लीट डीट... डुडल डुडल लूट डूट, डिडल डिडल लीट... डुडल लूट डूट डू...
असे सगळे प्रसारित करून आम्ही खाली आलो अन् तिला विचारले की, कार्यक्रम कसा झाला? तुला आवडला का?
यावर ती उत्तरली की, हो, चांगलाच आवडला... पण तू संगीत तोंडाने आवाज करून का काढलेस?
.............................................................................................................................................
'शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment