भारत-पाक फाळणीच्या शोकांतिकेची वेदना अनेक पिढ्यांच्या हृदयामध्ये सलत राहिली. लेखकांच्या पिढ्या त्यावर लिहित्या झाल्या. अनुभवलेली दु:खे, पाहिलेल्या वेदना, करुण कहाण्या शब्दांमधून व्यक्त होत राहिल्या. हिंदू, उर्दू, पंजाबी, सिंधी, बंगाली, डोगरी अशा विविध भाषांमधल्या कथा ‘फाळणी’ या नावाने नरेंद्र मोहन यांनी हिंदीमध्ये काही वर्षांपूर्वी संपादित केल्या होत्या. त्या दोन्ही खंडांचा मराठी अनुवाद वसंत केशव पाटील यांनी केला आहे. पुण्याच्या सायन पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या द्विखंडी पुस्तकाला नरेंद्र मोहन यांनी सविस्तर प्रस्तावना लिहून आपली संपादनामागची भूमिका सविस्तर विशद केली आहे. तिचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
आज आपण सर्वदूर काळवंडलेल्या ज्या काळातही जगत आहोत, त्यात फाळणीच्या काळ्या दिवसांची आठवण होते आणि एखाद्या दु:स्वप्नागत आपले अवघे अस्तित्व दारुण अशा कडवटपणाने वेढून जाते. अ़फ़ज़ल अहसन रंधावाने ‘हरवलेला सुगंध’ या आपल्या कथेत एका ठिकाणी म्हटले आहे, ‘माझ्या कथा रक्तलांछित आहेत, त्यांचे मस्तक उघडेबोडके आहे, केस विसकटलेले आणि शरीर क्षत-विक्षत. माझ्या हातात तुटकी लेखणी आहे नि फुटलेले पात्र, ज्यात मी आपल्या कथांसाठी आनंद भरून आणण्याकरता घरातून निघालो होतो. माझ्या डोळ्यांत पाणी आहे. मला पायांखालचा रस्ताही दिसत नाही. माझी अवस्था माझ्या कहाण्यांसारखीच आहे, मग मनात विचार येतो, आता कसली गोष्ट लिहू?’
या कथनामध्ये संकटाच्या घडीला रचनाकाराला-कथाकाराला ज्या अडचणी जाणवतात; त्यांकडे थेटच बोट दाखवले आहे. संकटसमयी परिचित मूल्यांची चौकट तर कोलमडतेच, संवेदनेचे स्वरूपही बदलते. दु:ख, भीती, नि आपले-तुपलेपणाची असंख्य पुटे माणसावर चढत जातात आणि लेखक आठवणींच्या आधारे हरवलेल्या सुगंधाचा शोध घेत या माणसाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करतो.
‘मी कसली कथा लिहू?’ ही एकट्या अ़फ़ज़ल अहसन रंधावाचीच समस्या नाही, तर फाळणीसारख्या शोकांतिकेच्या संदर्भात; संवेदनात्मक, वैचारिक व सांस्कृतिक मनोभूमीवर जे विक्षुब्ध आणि व्यथित आहेत त्या साऱ्या लोकांचीसुद्धा आहे. रचनाकर्मीसाठी ही बाब अधिकच क्लेशकायक असते, कारण त्याला आपली कैफियत फक्त सांगायचीच नसते, तर ती लोकांपर्यंत पोचवायचीही असते. रंधावाच्या या कथनात त्यांच्याच कथांमधील कन्टेंट नि कला यांकडे निर्देश केलेला नाही तर भारतीय भाषांतील त्या सर्वच कथांकडे केलेला तो संकेत आहे. - ज्यांतील कथावस्तूमध्ये पाहाता-पाहाता बदल झाला होता आणि कथेचे मोठ्या सायासाने घडवलेले फ्रेमवर्क पार कोसळले होते.
ही गोष्ट वेगळी आहे - की फाळणी का झाली? संवाद नि संवेदना कशा व का बोथटल्या? आमच्यात विसंवादाची दरी का निर्माण झाली? गुण्यागोविंदाने एकत्र राहाणाऱ्या लोकांमध्ये विद्वेष आणि वैरभाव कशामुळे निर्माण झाला? एकाच राष्ट्रीय भावनेच्या आणि संस्कारांच्या मुशीत जन्मले-वाढलेले लोक हिंदू-मुसलमान नि शीख एकमेकांच्या जिवांवर का उठले? ज्या झाडाने त्यांना आधार आणि सावली दिली, तेच झाड ते का म्हणून तोडत होते? हे प्रश्न केवळ भावुक उद्गार म्हणून टाळता येऊ शकत नाहीत. या प्रश्नांशी आपल्या सार्वभौम देशाचा सांस्कृतिक व राजकीय इतिहास संलग्न आहे.
१९४७ मध्ये जी फाळणी झाली, त्याची अनेक कारणे असू शकतात आणि आहेतही. परंतु फाळणीच्या वेळी व त्यानंतरही, आजवर जे म्हणून आपले परंपरागत संलग्न व सामायिक संस्कार होते, पारस्परिक आस्था, आपुलकी होती; त्याला उतरती कळा लागली आणि त्यातून जे भयंकर चित्र समोर आले, ते कोण नाकारू शकेल? वस्तुत: फाळणी हा वरकरणी नि भौतिकदृष्ट्या एक अपघात नव्हता. ही एक मानवी शोकांतिका होती. ज्यामुळे लाखो लोकांवर भावनिक, मानसिक, वैचारिक व आत्मिक स्तरांवर आघात झाले होते. हा धक्का फक्त राजकारण किंवा एखाद्या विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नव्हता, तर तो कोट्यवधी लोकांची संस्कृती आणि त्यांच्या वर्तन-व्यवहारांदीशीही संलग्न होता. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय मन:पटलावर फाळणी आजदेखील एक ठसठसणारा संदर्भ म्हणून ताजी आहे. आणि तिचा भारतीय भाषा-साहित्यावर दूरगामी असा परिणाम दिसून येत आहे. विशेषत: उर्दू, पंजाबी, हिंदी, बंगाली आणि सिंधीतील साहित्यावर. याचे पुरावे आत्मचरित्र व डायऱ्यांमध्ये तर आहेतच, कविता नि नाटकेही लिहिली गेली आहेत. परंतु यावरती ज्या कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, त्यांत एक वेगळी प्रवृत्ती दिसून येते. साहित्य आणि इतिहास, साहित्य व संस्कृती यांतील अंत:संबंधांत यामुळे बदल झाला व सृजनशील लेखनाची एक नवी सुरुवात झाली. ती आजही चालू आहे. तेव्हा सुरू झालेल्या अध:पतनाचे स्वरूप अधिकच विकट आणि भयावह झाले आहे. फाळणीच्या वेळचा हिंसाचार जागा बदलून सुरू आहे आणि त्याचे प्रतिबिंब विविध वाङ्मयप्रकारांमध्ये दिसून येत आहे.
फाळणीवर आधारित बहुतेक कथांमध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भ थेटपणे आले आहेत. आपला अस्सल चेहरामोहरा घेऊन वास्तवदर्शी आणि वस्तुनिष्ठ संदर्भ नि अनुभवांच्या आधारे कथालेखन करताना एक धोका संभवतो - तो म्हणजे, कथाकार एखाद्या बंदिस्त संवेदनगत आणि शिल्पात्मक पॅटर्न तर स्वीकारत नाही किंवा कृत्रिम अशा त्रैराशिकाला बळेच गवसणी घालण्याच्या नादात तो मानवी दिसण्याच्या प्रघाताला बळी तर नाही पडत! जेव्हा कोणी लेखक भावविवश होऊन भाबडेपणाने अमूर्त व अतर्क्य अशा मानवतेचा संदेश देण्यासाठी लिहितो, तेव्हा संदर्भाचा मूळ चेहरा धूसर होतो नि लेखक एक चूष म्हणून त्याकडे बघतो - वास्तवापासून खूप दूर. फाळणी एक दुर्दैवी घटना होती, म्हणूनच तीमुळे निर्माण झालेला जातीय ताण-तणाव व विद्वेष यांवर लिहिलेल्या साहित्यात कलात्मक संतुलनच नव्हे तर एक वैचारिक तटस्थताही आवश्यक आहे. तेव्हाच घटना-प्रसंगांतील विदारक वास्तव, त्यातून उफाळलेला तात्कालिक आवेश-अभिनिवेश तसेच वाचकांना अतिपरिचित असलेला एकूण आशय-विषय एका वेगळ्या कलात्मक उंचीवर जाऊ शकतो.
भारतीर भाषांत लिहिलेल्या काही कथांच्या आधारे आपणाला ही गोष्ट पारखून बघता येऊ शकते. या दृष्टीने सर्वप्रथम सआदत हसन मंटोची उर्दू कथा- ‘टोबा टेकसिंह’ घेऊ. या कथेतील शब्दांचा मार जीवघेणा आहे. इथे फाळणी फक्त एक घटना किंवा विषय म्हणून येत नाही; तर एक सचेतन संदर्भ म्हणून येते. हा संदर्भ मंटोसाठी बहि:स्थही होता आणि अंत:स्थसुद्धा… एकूण असतेपणाला आव्हान देणारा, सामाजिक-राजकीय संदर्भांच्या पार चिंध्या उडवणारा, अगदी वेड लावणारा!
या विषयावर मंटोने खूप समरसून १५-१६ कथा लिहिल्या, ‘कृष्ण किनारे’ सोडून. पहिल्या खंडात त्याच्या दोन कथा ‘टोबा टेकसिंह’ आणि ‘मांसाचा थंड गोळा’ घेतल्या आहेत. आणि दुसऱ्या खंडामध्ये ‘खोल दो’ नि ‘टिथवालचा कुत्रा’.
फाळणीमुळे निर्माण झालेली भीती आणि भीषणता यांचे प्रतिबिंब या चारही कथांमध्ये दिसेल. सांस्कृतिक आशयाला स्वरांकित करत- ‘टोबा टेकसिंह’मध्ये वेड्याच्या मन:स्थितीच्या फोकसमध्ये फाळणीचे चित्र साकारले आहे. तर्कसिद्ध ऐतिहासिक गतीविधींना- घडोमोडींना अतार्किक होऊन पाहाणारी ही कथा दृष्टी सामायिक संस्कृती आणि मानवतेचे प्रश्न प्रकर्षाने समोर मांडते. या कथेत टोबा टेकसिंह आणि तो जमिनीचा तुकडा, ज्याला काही नाव नाही; फक्त हे शब्द नाहीत, ते जातीपातींना आणि संस्कृतींना अगदी क्षितिजापार घेऊन जातात; जिथे एक सडा-एकटा माणूस आहे - मुळांना घट्ट धरून असलेल्या वृक्षासारखा; निश्चल! आणि इथे, जिथे राजकीय सत्तेचा बळी ठरलेला टेकसिंह चीत्कारतो आणि धाडकन कोसळतो. त्याच्या आकांतामुळे द्विराष्ट्रवादाचा तत्त्व-विचार कोलमडून पडतो.
.............................................................................................................................................
‘फाळणी’ या द्विखंडी आणि एक हजाराहून अधिक पृष्ठे असलेल्या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4788/Falani-Khand-1-Va-2
.............................................................................................................................................
याच पद्धतीने ‘टिथवालचा कुत्रा’ या कथेमध्ये कुत्रा गूढ प्रतीकार्थ घेऊन समोर येतो. हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या फौजा परस्परांविरुद्ध मोर्चे साधून सज्ज आहेत. तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा ‘चपड झुनझुन’ कानांवर पडतो. इकडच्या लोकांना शंका येते की हा पाकिस्तानचा तर नाही? तिकडच्यांना वाटते की, हा हिंदुस्थानचा आहे की काय! या गदारोळात, कुत्रा दोन्ही बाजूंच्या गोळ्या खाऊन आपला जीव गमावतो. या कथेत सामान्य माणसाची व्यथा-वेदना, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली त्याची धडपड राजकीय संदर्भांच्या प्रकाशात ठळकपणे अधोरेखित झाली आहे. ‘टिथवालचा कुत्रा’ इथे सर्वसामान्य माणसाचे प्रतीक म्हणून आला आहे; जो बापडा कधी हिंदुस्थानी, तर कधी पाकिस्तानी बनून राजकीय उन्मादाचा बळी ठरतो. मंटोच्या काही कथा फाळणीमुळे निर्माण झालेल्या भावनात्मक आणि मानसिक स्तरांवर विकलांग करणाऱ्या प्रभाव-परिणामांच्या कथा आहेत.
‘खोल दो’ व ‘मांसाचा थंड गोळा’ या कथांमध्ये फाळणीच्या वेळचे घटना-प्रसंग येत नाहीत; तर त्या घटना प्रसंगांमुळे शारीरिक, मानसिक व आत्मिक विश्व कसे आरपार ढवळून निघते, त्याकडे या कथा लक्ष वेधतात. ‘खोल दो’ ही कथा फाळणीचे वर्णन करत बसत नाही; पण फाळणीत होरपळून निघालेल्या पात्रांच्या मन:स्थितीचे इतके काही उत्कट चित्रण करते की, त्यामुळे फाळणीमागच्या मानव-विरोधी भूमिकेची दाहकता जाणवू लागते. म्हातारा सराजुद्दीन आपल्या एकुलत्या एका तरुण मुलीला शोधत फिरत असतो. शेवटी त्याला त्याची मुलगी, सकीना भेटते हॉस्पिटलमध्ये! डॉक्टरने सराजुद्दीनला ‘खिडकी खोल दो’ म्हणून सांगितले, तेव्हा सकीनाच्या रक्तबंबाळ शरीरात काहीशी हालचाल जाणवली. म्हातारा सराजुद्दीन आनंदाने ओरडला, ‘माझी मुलगी जिवंत आहे’ डॉक्टर अगदी नखशिखान्त घामाने डबडबून गेला. त्याच्या एका साध्या वाक्याने सकीनावर जो परिणाम झाला तो तिच्या अनिवार यातनांची गाथा - आपल्याच स्वधर्मीयांनी वारंवार केलेल्या तिच्यावरील बलात्काराच्या घटनेला अशा काही मार्मिक बिंदूवर घेऊन जातो, की जिथे आपल्या रानटी वर्तन-व्यवहाराचे पुरते वस्त्रहरण होऊन जाते. सराजुद्दीनची शेवटची प्रतिक्रिया आणि सकीनाची हालचाल पाहून डॉक्टरची झालेली हालत फाळणीशी निगडीत स्वप्न आणि दु:स्वप्न कृती नि विकृतीला एक उंची देऊन जाते.
‘मांसाचा थंड गोळा’ या कथेत देखील फाळणी फक्त एक घटना म्हणून येत नाही, एक शोकात्म जाणीव म्हणून येते व ती साकारते ती पात्रांच्या वर्तन-व्यवहारांतून, हालचालींमधून. लुटालुटीच्या धामधुमीत ईश्वरसिंह एका मुस्लिम तरुणीला उचलून घेऊन येतो आणि त्याने तिच्यापासून शरीरसुखाची आशा बाळगलेली असते. परंतु तिने धसक्यानेच त्याच्या खांद्यावर श्वास सांडलेला असतो. तो जेव्हा मुलीच्या थंड गोळा झालेल्या शरीरावर झडप घालण्यासाठी वाकतो, तेव्हा त्याचे पौरुष गोठून गारठून जाते. जबर धक्याने मुलीचा झालेला मृत्यू ही गोष्ट फाळणीच्या वेळच्या अमानुष हिंसाचारापासून वेगळी करून कशी पाहाता येऊ शकते?
मंटोच्या या दोन्ही कथांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे घटना आणि आकडे नाहीत, आहे ते पूर्णपणे अत्याचार-पीडित, भयग्रस्त आणि मुळापासून हादरलेले शरीर आणि मन आणि मौनात नि:शब्द झालेली एक किंकाळी, जी आपला पाठलाग करत राहते.
फाळणीच्या शोकांतिकेमुळे संबंध आणि मूल्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला होता. स्वातंत्र्याला जोडूनच इतिहासाचे हे नवे पान समोर आले आहे. यामुळे आपले चिंतन, विचार नि व्यवहार, मूल्य, संबंध, श्रद्धादींवर व्यापक परिणाम झाला आहे.
मनोज बसूची ‘सरहद्द’ (बंगाली) आणि मोहन राकेशची ‘मलब्याचा मालक’ या कथांमध्ये परस्पर नात्यातील यातना आणि करुणाच नव्हे, तर मानवतेच्या पातळीवरील मर्यादांच्या उल्लंघनाकडेही बोट दाखवले गेले आहे. ईस्माइल आणि मंजू यांच्यातील विशुद्ध मानवी संबंधांचे चित्र साकारले आहे. दंगाधोप्यांमुळे बाहेर भडकलेला वणवा ईस्माइलला सलत असतो, तर वैयक्तिक जीवनात भावावर बरसलेल्या लाठ्या-काठ्या त्याच्या मनात रुतून आहेत. बंगालच्या फाळणीच्या वेळी दोन्हीकडचा भूभाग म्हणजे एक स्मशान झाले आहे. मंजू विश्वासाने ईस्माईलकडे येते, पण ईस्माइल आपल्याच जंजाळातून कसा मुक्त होणार? शेवटी मंजूचा भरवसा त्याला यातून सोडवतो. तो मंजूची सोन्याच्या नाण्यांची गुंडी चालत्या ट्रेनमध्ये ठेवून देतो. त्या नाण्यांमुळे तो आपल्या भावाच्या आत्म्याला शांती देऊ इच्छित होता. त्यातूनच तो मंजूच्या भविष्याचीही तरतूद करून देतो. ट्रेन वळण घेऊन केव्हाच दृष्टिआड झाली आहे. अवघ्या आयुष्यातील आशा-अपेक्षा नि आधार सोबतीला घेऊन एक मुलगी निघून गेली. कुठल्याच दृष्टीने ती त्याची कुणीच लागत नव्हती. ना रक्ताचे नाते, ना धर्माचे किंवा परिस्थितीच्या दबावाचे, मानवी संबंधाची ही जाणीव सर्वच कृत्रिम सीमा पार करून जाते. सीमा कायम राहतात, पण त्यांचा अर्थ गळून जातो.
मोहन राकेशने हाच मुद्दा ‘मलब्याचा मालक’मधे एका नव्या दृष्टिकोनातून समोर आणला आहे. कथेतील गनीमिया लाहोरहून अमृतसरला आला आहे. कशासाठी? तर फाळणीपूर्वी आपण बांधलेले घर बघण्यासाठी. साडेसात वर्षांनंतर जेव्हा गनीमिया आपल्या गल्लीमध्ये येतो, तेव्हा आपल्या पडक्या घराचे सामान तो ओळखतो आणि हमसून रडू लागतो. रक्खा पैलवानाने त्याच्या मुलाला-चिरागला सुरा भोसकून मारले होते हे त्याला माहीत नव्हते. त्याची बायको आणि बहिणींवर बलात्कार करून त्याने त्यांना कालव्यात फेकून दिले होते. एकीकडे गनीची भाबडी श्रद्धा आणि दुसरीकडे रक्खाचे क्रूर रानटीपण परिस्थितीचे व्यंग-विडंबन घेऊन सहजपणे समोर येते - ‘माझा चिराग असो-नसो, पण तुम्ही लोक तर आहात. आल्यावर मला एवढेच समाधान आहे की, चला, त्यावेळची काहीतरी निशाणी शिल्लक आहे. तुम्हाला पाहिले म्हणजे मी माझ्या चिरागला पाहिले.’ परिस्थिती वरील या उपहासात्मक भाष्याला कारुण्याची एक दुखरी किनार आहे. फाळणीमुळे मानवी संबंधांत झालेला बदल आणि मूल्यांची एकूण पडझड या गोष्टींचे एक ठसठशीत असे प्रतिबिंब या सर्वच कथांमध्ये दिसून येते.
फाळणीने मानवी मूल्यांच्या मुळावर जो आघात केला होता, त्यामुळे मानवी संवेदना-संबंधांना काहीच अर्थ उरला नव्हता. जमीला हाशमी, हरातुल्लाह अन्सारी, कुर्रतुल-ऐन-हैदर, कृष्णा सोबती, राजी सेठ, रामलाल यांच्या कथा या दृष्टीने लक्षणीय आहेत. ‘वनवास’ या कथेत सीतेच्या वनवासातील प्रसंग फाळणीमुळे निर्वासित झालेल्या अत्याचार-पीडित, हताश नि निराधार झालेल्या स्त्रीच्या दु:खभोगाशी असा काही एकरूप झाला आहे की, त्यामुळे सांस्कृतिक अध:पतनाची जाणीव प्रकर्षाने होऊ लागते.
याच पद्धतीने ‘मायलेक’मधील मोमिना जातीयवादाच्या वणव्यात होरपळून गेल्याने खूप खचून जाते आणि विचार करते की, हज्जेप्रमाणे आपणालाही आत्महत्या करता आली असती तर! कथेच्या शेवटी जातीयवादी विचारांच्या मर्यादा झुगारून ती एका अस्सल मानवी अस्तित्वाकडे निर्देश करते, ‘खरोखर तिथे एक औरस चौरस असा मजबूत खडक होता. त्यावर शिवालय म्हणा किंवा मशीद म्हणा उभी होती. कधीपासून उभी होती. हे फक्त काळालाच माहीत होते. दंगेधोपे, जाळपोळ आणि कत्तली वगैरेचा त्याच्यावर काही परिणाम झाला नव्हता.’ फाळणीच्या धामधुमीतील अमानुष स्थिती-गतीच्या संदर्भात मोमिनाची माणूसपण जपण्याची असोशी आणि आंतरिक आसक्ती लेखकाने खूप मोठ्या ताकदीने चितारली आहे.
‘पानगळीचे सूर’मध्ये परस्पर संबंधातील एक नवा संदर्भ समोर आला आहे. ‘मी’च्या आठवणींना फाळणीपूर्व आणि फाळणीनंतरच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उजाळा दिला आहे. ‘मी’ अर्थात तनवीर फातिमाचे खुशवक्तसिंहबरोबर मधुर संबंध आहेत, पण पूर्वसंस्कारांमुळे ती त्याच्याशी लग्न करत नाही. फाळणीमुळे सगळाच पट विस्कटून जातो. ती दिल्लीहून लाहोरला जाते. आणि पन्नास वर्षांच्या खेबड्या सैरद बकारखांशी लग्न करते, पण तिला खुशवक्तसिंहचा विसर पडत नाही.
कृष्णा सोबतीच्या ‘सत्तांतर’ या कथेतील शाहनीच्या दृष्टीने फाळणीमुळे झालेल्या बदलाला काहीच अर्थ नाही. मानवी मूल्यांचे निकष बदलणे आणि परस्पर संबंधांना अर्थहीन करून टाकणे, या गोष्टींचे तिला दु:ख आहे. हीच गोष्ट मदद अली सिंधीच्या ‘नवी सकाळ’मध्ये दिसून येते. ‘मी जिवंत असेन’ या कथेमध्ये फाळणीच्या धुमश्चक्रीत आप्तजनांची झालेली ताटातूट व अनपेक्षितपणे झालेली त्यांची पुनर्भेट यांमुळे परस्पर संबंध व मूल्यांमध्ये झडलेला संघर्ष याची झलक पाहण्यासारखी आहे.
‘कुणाचा इतिहास’ या कथेत फाळणीच्या पार्श्वभूमीवर दोन पिढ्यांचे विचार आणि संवेदनांच्या स्तरांवर उडालेला भडका समर्थपणे समोर येतो. एकीकडे विभाजनाच्या हृदयविदारक आठवणी आणि कापाकापी, जाळपोळ, लुटालूट नि निर्वासित झाल्याचे दु:ख यांत अडकलेला वडील; तर दुसरीकडे यांतील कशाचेच काही सोयरसुतक नसलेला तरुण मुलगा जो शमीमशी लग्न करायचे म्हणून हटून बसला आहे, कारण फाळणी म्हणजे एक ऐतिहासिक घटना आहे, राहून त्याला काही अर्थ नाही, ही त्याची धारणा. एका ठिकाणी चिडून वडील म्हणतो, ‘शेवटी, हा माझा इतिहास आहे, त्याचा नाही. त्या माझ्या जखमा होत्या, त्याच्या नाहीत. हे दु:खही माझेच आहे, बस्स माझे... वगैरे.’
हे खरेच आहे की, फाळणीमुळे उद्ध्वस्त झालेली पिढी विविधांगी संदर्भांच्या परस्पर संबंधांमधून चित्रित केली जाऊ शकते आणि लेखिकेने दोन पिढ्यांतील संवेदनात्मक जाणिवांच्या पातळीवर आपले लक्ष केंद्रित करून तेच केले आहे.
.............................................................................................................................................
‘फाळणी’ या द्विखंडी आणि एक हजाराहून अधिक पृष्ठे असलेल्या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4788/Falani-Khand-1-Va-2
.............................................................................................................................................
‘एक रहिवासी पाकिस्तानचा’ ही कथा सारेच उलटे-पालटे झालेल्या फाळणीच्या काळातील कत्तलींवर जळजळीत कटाक्ष टाकते. विशेषत: या कथेतील बलदेव आणि सरस्वतीची जटिल मनोदशा आणि दु:ख मोजक्याच शब्दांत व्यक्त झाले आहे. पात्र-प्रसंगांतील गुंतागुंत, क्रौर्य आणि करुणा यांचे ‘जक्स्टोपोझिशन’ फाळणीवरती लिहिलेल्या भारतीय भाषांतील कथांचे वेगळे नि विलोभनीय असे वैशिष्ट्य आहे.
फाळणीसारख्या भयावह परिस्थितीत परस्परसंबंध आणि मूल्यादीचे विघटन कसे होत गेले आणि नंतर याच विघटनातून हरवलेल्या मूल्यांचा शोध कसा सुरू झाला, यावर आधारित अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत. ‘तारणहार’ आणि ‘बदला’ या कथांमध्ये आलेले घटना-प्रसंगांचे अस्सल तपशील अंतर्मनातील परिवर्तन अधोरेखित करण्यासाठी उपयोजिले आहेत. रफीकुद्दीन आपल्या जुन्या जिगरी दोस्ताला हिंसाचाराच्या गदारोळात हिंदुस्तानात जाऊ देत नाही. त्याला आपल्याकडेच ठेवून घेतो. परंतु प्रत्यही वाढत चाललेला नरसंहार व क्षणोक्षणी भडकत जाणाऱ्या वणव्यात देविंदरलालच्या बाबतीत त्याच्या वागण्याबोलण्यात एक तुटकपणा व कोरडेपणा येऊ लागतो. तिथे त्याला अन्नातून विष दिले जाते, पण शेखसाहेबांच्या मुलीमुळे, जेबुन्निसामुळे ते वाचतात. त्या कुटिल वातावरणातही शरणागताचे, आश्रिताचे रक्षण करण्याचा धर्म जैबू निभावते. तिचा आग्रह इतकाच आहे की, हिंदुस्थानातही असा जीवघेणा प्रसंग एखाद्यावर बेतला तर... हा वसा, हा धर्म निभावला जावा, त्याचा विसर पडू नये.
त्या काळ्याकुट्ट दिवसांतही मानवी कारुण्याचा हा आदर्श एक मूल्यगत झलक म्हणून ‘बदला’ या कथेतसुद्धा बघता येऊ शकते. कथेमधला सरदार एका ठिकाणी म्हणतो, ‘शेखपुऱ्यात आमच्या बाबतीत जे घडले ते घडले, परंतु मला त्याचा सूड घ्यायचा नाही. कारण त्याचा काही बदला असूच शकत नाही. मी बदला घेऊ शकतो आणि तो म्हणजे हाच की, माझ्या बाबतीत जे झाले तसे अन्य कुणाच्या बाबतीत न होवो. फाळणीच्या दुर्घटनेचे पडसाद आणि मानवी सहानुभवांचे प्रतिबिंब इथेही पाहाता येते.
‘शेवटचा आधार’ या कथेत ‘तारणहार’ व ‘बदला’ या कथांसारखी घट्ट वीण नाही, पण कथेच्या शेवटी आलेला मानवी नात्यांतील विरूपता नि कारुण्य यांचे भीषण दर्शन घडवणारा प्रसंग नितांत मर्मस्पर्शी आहे. या दृष्टीने, कर्तारसिंह दुग्गलची ‘भूतदया’, देवेंद्र सत्यार्थाची ‘जन्मभूमी’ या आणि इतर कथा लक्षणीय आहेत. उदा. गुरूदेवसिंह रूपाणाची ‘भूतबाधा’ आणि नारायण भारतीची ‘दस्तऐवज’.
फाळणीच्या संदर्भात मानवी संबंध-संस्कारांदीच्या विघटनाबद्दल आधी जे उल्लेख केले गेले आहेत, त्यांमध्ये मानवी मूल्यांची आशा अपेक्षा तगून होती. याचबरोबर एक दुसरी बाजू होती - परस्पर संबंधांतील वाढती संघर्षात्मकता, जटिलता आणि गाठाळलेपण ‘अमृता निवास’, ‘मुबीना की सकीना’, ‘दीड माणूस’, ‘माझी आई कुठे आहे’ या कथा परस्परसंबंधांवर, त्यांतील गूढ जटिलतेवर जळजळीत कटाक्ष टाकतात. ‘अमृता निवास’मध्ये आठवणींचा गोफ असा काही विणला आहे की, फाळणीशी निगडीत मन:स्थितीमधील तणाव तीव्र होत जातो. इतिहासातील मोठ्या शोकांतिकेचा परिणाम म्हणून सलीम शेखला या आठवणी छळत राहतात. पंचवीस वर्षांनंतरही अमृताविषयीच्या आपल्या चंचल आणि गूढ प्रेमभावनेची याद त्याला येते, जणू ती कालचीच हकीगत असावी. अमृता निवासाजवळ आल्यावर त्याला आपण या जगात एकटे पडल्याची जाणीव होते.
याच पद्धतीने, जिथे ‘मुबीना की सकीना’मध्ये फाळणीशी संलग्न दाहक घटना संघर्षपूर्ण मानवी संबंधांना जोडून येतात; तिथे ‘दीड माणूस’मध्ये फाळणीच्या गदारोळात एका स्त्रीच्या जीवनातील सातत्याने यातनामय होत जाणाऱ्या प्रसंगांची शृंखला उलगडत जाते. ‘माझी आई कुठे आहे’मध्ये तीव्र मानसिक आघात झालेली एक हिंदू मुलगी आहे. एक बलोच तिला वाचवतो, परंतु ती त्याला घाबरली आहे. खान आपला खातमा करील, अशी तिला भीती वाटते. तिच्या भावाला कोयत्याने कापून काढण्यात आले होते. प्रत्येक मुसलमानाविषयी तिरस्काराची एक अढी तिच्या मनात खोलवर रुतली आहे. वर्तनातील अपसामान्यतेचे चित्रण लाउड आणि एकतर्फी वाटते.
संबंधांमधील ही गुंतागुंत आणि घाट-काठ, तसेच वळण-वाटा अपहृत स्त्रियांची समस्या, त्या परतल्यावरची पुरुषी मानसिकता आणि बलात्काराचे प्रसंग यांतही आहेतच. फाळणीच्या काळातील दंगलींमध्ये स्त्रियांचे अपहरण, बलात्कार तसेच त्यांतून उद्भवलेल्या मानसिक विकृती आणि अपसमजादींच्या आधारावर काही कथा साकारल्या आहेत. राजेंद्रसिंह बेदीची कथा ‘लाजवंती’मध्ये समस्या आणि संबंध हे एकाच नाण्याच्या बाजू म्हणून समोर येतात. ‘लाजवंती’मधील सुंदरलाल पळवून नेलेल्या स्त्रिया परत आल्यावर त्यांना हृदयात स्थान देण्यासाठी अथक प्रचार करतो, वेडापिसा होऊन लाजोच्या आठवणीने डोळे गाळतो. मात्र तोच तिला ती परत आल्यावर स्वीकारत नाही. तिला तो ‘देवी’ वगैरे बनवतो. पण मनात मात्र थारा देत नाही. वास्तव समोर ठाकल्यावर त्याचे तत्त्वसिद्धांत विरून जातात आणि आपल्या निग्रहाचे ओझे तो वाहत राहातो. रामानंद सागरची कथा ‘सांभाळ या बायांच्या तस्करांपासून’मध्ये ‘लाजवंती’ कथेतील गुंतागुंत आणि विसंगतीचे वर्णन भलेही नसेल, परंतु बायकांच्या तस्करीत गुंतलेल्या लोकांच्या जाळ्यात फसलेल्या स्त्रियांची तगमग आणि ताणतणावांचे मोठे प्रभावी चित्रण आले आहे. अमृतरायची ‘दु:खाचे सप्तसूर’, देवेंद्र इस्सरची ‘मुक्ती’, जयंती दलालची ‘लुटलेला’ आणि गुरूमुखसिंह जीतची ‘विरक्त भिंती’ या कथांमध्ये प्रसंग-घटनादींचे थेट तपशील येत नाहीत, तर त्यांतून निर्माण झालेल्या सूक्ष्म, जटिल नि खडतर संबंधांचा ऊहापोह येतो.
भारतीय भाषांतील कथांमध्ये ही शोकांतिका व्यापक सांस्कृतिक सामाजिक पैलूंशीही निगडित आहे. या दृष्टीने अशफ़ाक अहमदची ‘धनगर’, अफ़ज़ल अहसन रंधावाची ‘हरवलेला सुगंध’, ए. हमीदची ‘डाळिंबाची पाने’, गुलजारची ‘फाळणी’, कुदरतुल्ल शहाबची ‘अरे देवा’ आणि अहमद नदीम कासमीची ‘परमेशर सिंह’ या कथा मोठ्या लक्षणीय आहेत.
‘धनगर’मध्ये समान सांस्कृतिक संस्कार-सोपस्कारांच्या पार्श्वभूमीवर फाळणीच्या भीषणतेचे चित्रण आले आहे. कथेचा शेवट, कथेची संपूर्ण पृष्ठभूमी कथेच्या साधासुध्या कथाद्रव्याला बहुआयामी उंचीवर घेऊन जाते. दाऊजी हिंदू असूनही मुस्लीम सभ्यता नि संस्कृतीच्या मुशीत घडला आहे. त्याच्याएवढा मुस्लीम धर्मग्रंथांचा व्यासंग कदाचित एखाद्या मुसलमानाचासुद्धा नसेल. त्याने मुलासारखाच आफ़ताबचा सांभाळ केला. फाळणीनंतर त्याच दाऊजीला मुस्लीम धर्माची दीक्षा देण्यात आली आणि रानोने आपली काठी त्याच्या हातात देऊन पिटाळले, ‘चल बे! मेंढरं तुझी वाट बघत असतील’ आणि आपले बोडके डोके घेऊन दाऊजी मेंढरांच्या मागे निघून गेला. जणू एखादे केसाळ भूतच चालत निघालेले! कथेतील तपशील कलात्मक कारुण्याने भरलेले आहेत. हे कारुण्य सांस्कृतिक-पारिवारिक संबंधांच्या उडालेल्या चिरफळ्यांचे विदारक दर्शन घडवते.
‘हरवलेला सुगंध’मध्ये समाईक संस्कृतीचे ताणे-बाणे विसकटल्याचे चित्रण येते, त्याचबरोबर वैचारिक समृद्धीचे सूचनसुद्धा. आठवणी आणि इतिहासाचा असा कलात्मक विन्यास, अनुभूती आणि विचारांची व्यामिश्र कटुता (जी राजकीय-सांस्कृतिक संदर्भातून निर्माण झाली असावी) फार थोड्या कथांत पाहायला मिळेल. या कथेत एकीकडे दर्वळणारा सुगंध आहे व दुसरीकडे क्रूर नि भीषण दुर्घटना. कथेतील आठवणी फक्त कथेमधल्याच कुठे आहेत; त्या आपल्याच जीवनाला आरपार चिरत गेल्या आहेत आणि इतिहासालाही वेढत आहेत. आठवणी म्हणजे इतिहास नाही; हे खरे, पण सांस्कृतिक-साहित्यिक साक्षी-पुरावे समोर येतात, तेव्हा त्यांना इतिहासातून वगळणे शक्य आहे काय? आपल्या स्मृतिकोशात एकरूप झालेला सुवास फाळणीच्या काळात व त्यानंतर कोण जाणे कुठे हरवून गेला? सुगंध एक मेटॅफर बनून जातो.
ए. हमीदच्या ‘डाळिंबाची पाने’मध्ये फाळणीच्या दिवसांतील सांस्कृतिक स्तरावरील पतन आत्मकथात्मक शैलीत व्यक्त झाले आहे. ‘झाड उखडल्याबरोबरच आम्ही लोकसुद्धा मुळासकट उखडले गेलो आणि बघता बघता तिथे फक्त उखडलेल्या मुळांशिवाय दुसरे काही उरले नव्हते...’ याच रीतीने, ख्व़ाज़ा अहमद अब्बासच्या ‘सरदारजी’मध्ये सुरुवातीला निवेदक म्हणतो, ‘लोकांना वाटतेय, सरदारजी मेला. नाही हे माझे मरण होते. जुन्यापुराण्या ‘मी’चा मृत्यू माझ्यातील धर्मांधतेचा अंत...’
गुलज़ारची कथा ‘फाळणी’तही स्मृतिकोशात खोल विरघळलेले असेच प्रसंग आहेत, जे सतत आपल्याला घेरून आहेत. कुदरतुल्ल शहाबच्या ‘अरे देवा’मध्ये दिलशादच्या जगण्या-भोगण्याचे पदर असे काही उलगडले आहेत की, त्यांतून कळते ती दोन्हीकडची भयावह परिस्थिती आणि काळाचे विकट तांडव.
अहमद नदीम कासमीच्या ‘परमेशरसिंह’मधील परमेशरसिंह पाच वर्षांच्या अख्तरला वाचवण्यासाठी घरातील लोकांशी भांडतो, धार्मिक संकीर्णतेशी संघर्ष करतो आणि शेवटी अख्तरला तिकडे पोचवतो, तेव्हा तिकडून फायर होतो. जखमी अवस्थेत पडून तो म्हणतो, ‘मला का मारलं? मी तर अख्तरचे केस कापायचं विसरून गेलोवतो.’
अनेकदा ही कथा जातीयवादी दृष्टिकोणातून लिहिलेली कथा म्हणून पाहिले जाते आणि परमेशर सिंहच्या पात्याला ‘कॅरिकेचर’ म्हटले जाते. वास्तविक दोन-तीनदा ही कथा वाचल्यावर ही शंका फिटून जाते. जातीयवादी परिस्थितीच्या वर्णनामुळे लेखकाची भूमिका जातीरवादी ठरत नाही व कॅरिकेचरसारख्या वाटणाऱ्या पात्राचे चरित्रगत चढ-उतार त्यावेळच्या संदर्भांशी जोडून पाहिले; तर ते एक परिपूर्ण पात्र म्हणूनच समोर येते. तेव्हा त्याची मन:स्थिती समजणे कठीण जात नाही. त्यावेळच्या जातीयवादाची छाया परमेशरसिंहच्या मनाच्या आरशात प्रकर्षाने झिळमिळते आणि त्याची तगमग अगदी गडद होऊन जाते. मानसिक पातळीवर याला आपण फाळणीचा एक्सरे-रिपोर्ट म्हणू शकतो.
फाळणीने सरहद्दीच्या दोन्ही बाजूला सर्वसामान्य लोकांसमोर अस्तित्वाचे ज्वलंत प्रश्न उभे केले होते.
.............................................................................................................................................
‘फाळणी’ या द्विखंडी आणि एक हजाराहून अधिक पृष्ठे असलेल्या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4788/Falani-Khand-1-Va-2
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 26 February 2019
फाळणीच्या वेळेस संवेदना कशा बोथटल्या म्हणून गळे काढण्यात काय अर्थ आहे? महमंदअली जिनाने ऑगस्ट १९४६ पासनं डायरेक्ट अॅक्शन चे दंगे सुरू केले होते ना? त्यांच्याकडे उघड्या डोळ्यांनी कोणी पहायचं? गांधीनेहरूंना उरावर चढवून घेतलं की अत्याचारच येणार ना नशिबी? सिकंदर हयत खानच्या युनियानिस्ट पार्टीचं सरकार पंजाबात होतं. पार्टीचं नावंच मुळी युनियानिस्ट, म्हणजे तो अखंड भारतवादी पक्ष होता. ते सरकार दंगली करून पाडण्यात आलं. यावरून शहाणं व्हायला हवे होते ना हिंदू? झाले का? नाही ना, मग भीषण अत्याचारांना निमंत्रणंच दिलं की नाही हिंदूंनी? सावरकर बोंबलंत होते ना बेंबीच्या देठापासनं की, 'छोडो भारत' मधून 'तोडो भारत' चळवळ सुरू होत्येय म्हणून? कोणी दिलं का लक्ष त्यांच्याकडे? सालं चुलीकडे हगायचं नि म्हणायचं नशिबात हेच लिहिलं होतं! (हे वाक्य जितेंद्र आव्हाड यांच्या मातोश्री लीलाबाई आव्हाड यांचं आहे. संदर्भ: http://www.lokprabha.com/20090918/alke.htm ) तात्पर्य काय की, हिंदूंनो, मोदींना मत द्या. -गामा पैलवान