मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून ‘गांधी उद्यासाठी’ हे पुस्तक पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी गांधींच्या १५०व्या जयंतीवर्षानिमित्त संपादित केलं आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केेलेल्या या पुस्तकाला कुलकर्णी यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
१.
गांधींच्या विचारांकडे, दृष्टिकोणाकडे एका व्यापक परिप्रेक्ष्यात बघायला हवं, असं मला नेहमीच वाटतं. हा परिप्रेक्ष्य प्रदीर्घ काळातल्या मानवी वर्तनाचा आहे. प्राचीन काळापासूनचा मानवी इतिहास पाहिला तर असं दिसतं की, अनेक सद्गुण आणि दुर्गुण मानवांत आरंभापासून आहेतच. प्रेम, वात्सल्य, करुणा, ममता, उदारता, सहानुभूती, नैतिकता, ध्येयनिष्ठा, सहकार्याची वृत्ती, इ. सद्गुण जसे मानवांत आहेत; तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, द्वेष, असूया, हिंसकता, खुनशीपणा, परपीडनाची वृत्ती, इ. दुर्गुणही आहेत. आणि ‘मानवांत आहेत’ म्हणजे काही माणसं पूर्ण सद्गुणी आणि काही पूर्ण दुर्गुणी असा ‘काळा-पांढरे’पणाही नाही : प्रत्येक व्यक्तीत ह्या दोन्ही प्रकारांच्या गुणांचं मिश्रण आहे. आणि ‘माणसातील दुर्गुणांचा क्रमश: लोप होऊन सद्गुणांचं अधिकाधिक प्रकटीकरण व्हावं’ ही मानव-विकासाची दिशाही प्राय: सर्वमान्य आहे. सारी तत्त्वज्ञानं, प्राय: सारे धर्म हे माणसातला चांगुलपणा कसा वाढेल ह्यासाठी प्रयत्न करतात. गीतेत ह्यांना ‘दैवी संपत्ती’ आणि ‘आसुरी संपत्ती’ असं म्हटलेलं आहे, आणि मुक्तीच्या ध्येयाकडे जाण्यासाठी दैवी संपत्तीचा, सद्गुणांचा स्वीकार करायला सांगितलेलं आहे.
तथापि, सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती ह्या दोन्ही सनातन असल्यानं, त्यांच्यात निरंतरपणे एक संघर्ष चाललेलाही दिसतो. भारताचा विचार केला, तर रामायण आणि महाभारतात त्याचंच चित्रण आहे. रामायणात ह्या प्रवृत्ती व्यक्तिगत आहेत, तर महाभारतात सामूहिक. अशा सर्व संघर्षांमध्ये एक गोष्ट सामायिकपणे दिसते : एका बाजूला ‘उपभोगवाद’ आहे, नि दुसरी बाजू त्याविरुद्ध लढत आहे. भरताला ‘राज्य मिळावं’ ही कैकयीची मनीषा आहे; तर, सीता ‘उपभोगायला मिळावी’ म्हणून रावणानं तिला पळवून नेली. कौरवांनी अन्यायानं पांडवांचं राज्य बळकावलं नि त्यांना वनात पाठवलं. ह्यातून जे ‘महाभारत’ घडलं, ते फार कोणत्या उदात्त ध्येयासाठी नव्हेच : गीतेत अर्जुन म्हणतो तसं ‘राज्यं भोगा: सुखानि च’ ह्यासाठीच!
एकूणातच, जगभरात जिथे कुठे, जेव्हा केव्हा अशा प्रकारची युद्धं झाली, संघर्ष झाले, तेव्हा ते एखाद्या ‘तत्त्वा’साठी, ‘उदात्त ध्येया’साठी फार कमी वेळा झाले. बहुतेकदा ते-आजच्या परिभाषेत सांगायचं तर-संसाधनं आणि ऊर्जांसाठी झाले! कारण, अधिकाधिक भोग आणि तज्जन्य सुखं देते ती भूमी; नि म्हणून तिच्या अधिकाधिक मोठ्या भागावर ताबा मिळवण्यासाठी सारी धडपड-सारी युद्धं. साधारणत: सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत जगात हेच चालत आलं होतं. ख्रिस्त्यांनीही तेच केलं, नि महंमद्यांनीही. हिंदूंनी इतरांची भूमी बळकावली नाही हे खरं; पण, भारताच्या अंतर्गत अशी आक्रमणं हिंदू राजांनी परस्परांवर केलीच.
तथापि, ह्या काळापावेतो जी युद्धं झाली, त्यांचं मान ((scale) छोटं होतं. बाण, तलवारी, भाले अशा शस्त्रांनी ही लढली जायची. घोडे, उंट, हत्ती हीच काय ती वाहनं. साहजिकच त्यांची विध्वंसक्षमता कमी होती. ज्याला ‘युद्धाची धार’ म्हणतात-संहारक्षमता, क्षेत्र, गती-ती कमी होती.
पण, जेव्हा ‘विज्ञाना’चा उदय झाला, तेव्हा उपभोगवादी, विस्तारवादी (‘साम्राज्यवादी’) अशा-प्राय: युरोपीय-देशांच्या हातीं अधिक प्रगत, प्रभावी अशी साधनं, वाहनं आली. ही दोन प्रकारांची होती. पहिला प्रकार म्हणजे स्वत:च्याच भूमीचं, निसर्गाचं अधिकाधिक शोषण करून उपभोग वाढवायला मदत करणारी. उदाहरणार्थ, झाडं तोडण्याचा, उत्खननाचा, विविध प्रक्रियांचा, वाहतुकीचा... सार्याचा वेग आणि क्षमता वाढवणारी. ह्या साधनांना आपण आज ‘तंत्रज्ञानं’ म्हणतो. ही तंत्रज्ञानं वापरून स्वत:चा ’विकास’ करून घेताना युरोपीय देशांना ‘resource crunch’ जाणवणं अपरिहार्य होतं. मग त्यांनी, ज्यांना ’शस्त्रं’ म्हणता येईल अशा दुसर्या प्रकारच्या साधनांच्या आधारे पृथ्वीवरचे इतर भूभाग ताब्यात घ्यायला; तिथली संसाधनं, ऊर्जा, आणि गुलामांच्या रूपातलं मनुष्यबळ ह्यांच्या आधारे स्वत:चा ‘विकास’ पुढे चालू ठेवायला सुरुवात केली. त्यासाठी पुन्हा विज्ञानाचाच उपयोग झाला. दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी नकाशे तयार करणं; नौकानयन, तोफा, बंदुका, रूळगाड्या, टपालसेवा, तारायंत्र : सारी वैज्ञानिक प्रगती ही मूलत: ‘उपभोग वाढते ठेवणं’, त्यासाठी ‘उत्पादन वाढतं ठेवणं’, त्यासाठी ‘सातत्यानं वाढत्या प्रमाणात संसाधनं आणि ऊर्जांचा पुरवठा होत राहणं’, ‘बाजारपेठा विस्तारत राहणं’ ह्यासाठी होती. ह्या साऱ्याला मिळूनच आज ‘विकास’ म्हटलं जातं. ‘तंत्रं’ आणि ‘शस्त्रं’ ह्यांच्या आधारे ह्याच काळात वसाहतवाद ‘जागतिक’ बनला.
२.
भारताच्या पारतंत्र्याकडे आपण जेव्हा ह्या जागतिक घटनाक्रमाचा भाग म्हणून बघतो, तेव्हा पारतंत्र्याच्या कारणांची व्यापकता, वैश्विकता आपल्या लक्षात येते. आशिया, आफ्रिका, दक्षिण आणि उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा सर्वच खंडांतल्या, तंत्र आणि शस्त्रदृष्ट्या मागास राष्ट्रांना युरोपीयांनी आपल्या टाचांखाली चिरडलं.
ह्या पारतंत्र्यातून, गुलामीतून मुक्त होण्याचे दोन मार्ग ह्या राष्ट्रांपुढे होते. पहिला म्हणजे जेत्यांचंच तंत्रबळ आणि शस्त्रबळ स्वत: प्राप्त करून ‘ठोशास ठोसा’, ‘जशास तसे’, ‘eye for an eye’ अशाच पद्धतीनं त्यांना उत्तर देणं. हा मार्ग अत्यंत तार्किक, कोणालाही सकृद्दर्शनी पटण्याजोगा नि म्हणून प्रचलित आहे, ह्यात शंका नाही. ‘असंच वागायचं असतं’ हे आपण गृहीतच धरून चालतो. पण, ह्या मार्गात अनेक अडचणी होत्या. मागास अशा जित देशांकडे ना ती तंत्रं होती, ना ती शस्त्रं, ना ती विकत घेण्यासाठी पैसे. आणि पैसे असले, तरी त्यांना ती विकत मिळणार होती थोडीच! दुसरी अडचण म्हणजे, अशा प्रकारे सशस्त्र प्रतिकार करण्याचं धैर्य फारच थोड्या जणांकडे असतं. त्यामुळे, ह्या मार्गानं ‘स्वातंत्र्य’ ही एक व्यापक जनचळवळ होऊ शकत नव्हती.
आणि घटकाभर असं धरून चालू की, सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळालं; तरी ही मूळ समस्या-माणसाचा उपभोगवाद, त्यासाठीचं अतिरेकी उत्पादन, पृथ्वीचं वाढतं शोषण-प्रदूषण, यांत्रिकीकरण, उद्योगीकरण, त्यासाठीचा वसाहतवाद, हिंसा, इत्यादि-कशा सुटणार? हे जित देश प्राय: तिसऱ्या जगातले होते; त्यांना वसाहतवाद गाजवण्यासाठी ‘चौथं जग’ कुठून मिळणार?
ह्या प्रश्नांचाच तार्किक विस्तार म्हणजे स्वातंत्र्यानंतर हे देश आपला विकास कोणत्या पद्धतीनं करून घेणार? व्यवस्थेचं, रचनेचं स्वरूप कसं राहणार? ती रचना जर पुन्हा जेत्या-युरोपीय-देशांप्रमाणेच अत्याधुनिक-तंत्राधिष्ठित, संसाधन-सघन, ऊर्जा-सघन, रोजगार न वाढवणारी, पर्यावरण-विनाशक, शोषण-विषमता वाढवणारी... अशीच असणार असेल, तर त्या राष्ट्रांमधल्या बहुसंख्यांसाठी तो अनुभव ‘आगीतून फुफाट्यात’ असाच असणार. पुन्हा आजच्या परिभाषेत बोलायचं, तर जे विकास-प्रतिमान (model) मूलत:च समस्या-निर्मायक आहे-जेत्यांनाही ज्यानं समस्या- ठास्त, नकोसं करून सोडलेलं आहे-तेच राबवून जितांपुढच्या समस्या कशा सुटणार? भारत हा अशा जित देशांपैकीच एक होता आणि हे सारं विवेचन, हे प्रश्न भारतालाही लागू होते.
३.
‘गांधी’ हे नाव नेमक्या ह्या ठिकाणी जागतिक रंगमंचावर प्रवेश करतं. ‘वरच्यापैकी पहिल्या मार्गानं जाऊन जरी राजकीय स्वातंत्र्य मिळालं, तरी त्यानं मूळ समस्या सुटणारच नाही,’ ह्या मुद्द्यापासूनच त्यांची मांडणी सुरू होते. त्यांना रस केवळ राजकीय स्वातंत्र्यात नाही; तर, मानवाच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यात, ‘स्वराज्या’त आहे. पश्चिमी सभ्यता ही वर उल्लेखिलेल्या सर्व समस्या वाढवते, म्हणून तिलाच त्यांचा ठाम विरोध आहे. ती सभ्यता अनीती दृढ करत असल्यानं तिच्यातल्या सर्व बाबींना तो आहे : सर्वंकष आहे. तो आधुनिक तंत्रज्ञानाला आहे, आधुनिक वैद्यकाला आहे, रेल्वेला आहे. ’खरी सभ्यता ही नव्हे’ असं ठामपणे म्हणून ते एका वेगळ्याच सभ्यतेची-विकासाच्या एका वेगळ्याच प्रतिमानाची-मांडणी करतात. हे प्रतिमान खूप व्यापक आणि सखोल आहे. केवळ भौतिक-आर्थिक वाढीचं नाही; तर, मानवाच्या सर्वागीण विकासाचं आहे. भौतिकतेला न नाकारता; पण, तिला आवश्यक तेवढंच स्थान/महत्त्व देऊन, सारा भर माणसाच्या नीतीच्या वाढीवर-‘आंतरिक विकासा’वर-देणारं असं ते आहे. त्यांना हवी आहे मानवाची उपभोगवादापासूनची मुक्ती. साऱ्या दुष्प्रवृत्तींपासूनची मुक्ती. षड्रिपूंपासूनची मुक्ती. ते स्वप्न पाहताहेत ते नीतीनं वागणाऱ्या मानवसमाजाचं. शासनविहीन समाजाचं.
एक मार्ग राजकीय स्वातंत्र्याचा; तर, गांधींच्या मनातला हा दुसरा मार्ग : खूपच व्यापक, सार्वकालिक, वैश्विक. तो प्रथम शब्दांकित झाला ‘हिंद-स्वराज्य’मध्ये; नि नंतर त्यांच्या असंख्य लेखांतून. एकदा गांधींची ही व्यापक वैचारिक भूमिका आपल्याला समजली की, मग ‘हिंद-स्वराज्य’ काय, किंवा एकूणच गांधी काय, समजणं सोपं जातं.
४.
गांधीचं ध्येय हे असा मानवसमाज घडवणं हे होतं. ते खूप दूरचं आहे; आज अशक्यप्राय वाटणारं आहे, हे त्यांनाही पुरतेपणीं ठाऊक होतं. म्हणूनच ‘हिंद-स्वराज्या’च्या विस्तारित प्रस्तावनेत (मुळात यंग इंडिया, जानेवारी १९२१मध्ये) ते लिहितात : ‘ह्या पुस्तकात वर्णिलेले स्वराज्य हे माझे आज उद्दिष्ट आहे, असे मानू नये. देश अजून त्यासाठी तयार झालेला नाही, हे मी जाणतो. ह्यात रेखाटलेल्या स्वराज्यासाठी माझा व्यक्तिश: प्रयत्न आहे; परंतु, माझे सामूहिक कार्य भारतीय लोकांच्या इच्छेनुसार सांसदीय स्वराज्याची स्थापना करण्यासाठीच आहे.’
गांधीचं संपूर्ण जीवनच ह्या विचार-व्यवहार-द्वंद्वात अडकलेलं होतं. त्यांचे विचार फारच वरच्या पातळीवरचे होते, नि ते कायमच ‘अव्यवहार्य’ वाटत राहिले. कारण, ज्या जनतेसाठी हे विचार होते, तिची वैचारिक पातळी फारच निम्न होती. गांधींनी तिला समजेल, झेपेल असे व्यावहारिक कार्यक्रम दिलेही; पण, त्यातून जनतेचा वैचारिक स्तर फारसा उंचावणं शक्य नव्हतं. अहिंसेची, धर्माची ती पातळी गाठणं लोकांच्या आवाक्याबाहेरचं होतं. सर्वच महान व्यक्तींच्या बाबतीत हाच अनुभव येतो. अशा व्यक्ती खूप वरच्या पातळीवरून विचार करतात-मांडतात. समस्त मानवजातीच्या उन्नतीची आंतरिक आस त्यांना असते. पण, त्या सामान्य माणसांचं आकलन आणि आचरण हे दोन्हीही खूप तोकडं पडतं. प्रसंगविशेषी अशा महामानवांचे विचार बाजूला ठेवून त्यांच्यातील षड्रिपू उसळी मारून मारून बाहेर पडतात.
पण, म्हणून, लोकांना हे विचार सांगण्याचं; त्यांना योग्य मार्गाला लावण्याचं; त्या मार्गावरून त्यांना पुढे नेत राहण्याचं काम थांबवूनही चालत नाही. ते नेटानं; फलाची आशा न ठेवता करतच राहावं लागतं. प्रत्येकच माणूस त्रिगुणांचा-सत्त्व, रज, तमांचा-बनलेला असतो. त्याच्यातल्या तमोगुणाचा क्षय आणि सत्त्वाची वृद्धी ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. योग्य विचार त्याला सांगत राहायचे; नि केवळ उपभोग जाणणारा त्याच्यातला रजोगुणी ‘पशू’; किंवा, अतिरेकी उपभोगांची अनावर लालसा असणारा त्याच्यातला ‘राक्षस’, ह्यांना संयमित उपभोगाच्या सात्त्विक ‘मानवा’कडे जायला प्रेरणा देत राहायची.
ब्रिटनापासूनचं राजकीय स्वातंत्र्य; किंवा, सांसदीय स्वराज्य ह्यांच्या पलीकडे जाऊन गांधींना असा मानवसमाज हवा होता-घडवायचा होता : अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंठाह ह्यांचं पालन करणारा. आंतरिक विकासावर भर देणारा. नीतीनं वागणारा. पर्यावरणाची जपणूक करणारा. श्रमाधारित जीवन जगणारा. स्त्रियांना आणि सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी असणारा. भयमुक्त. ‘सांसदीय स्वराज्य’ ह्या तात्कालिक ध्येयासाठी तर त्यांनी कार्य केलंच; पण, आपल्या कल्पनेतल्या ‘खऱ्याखुऱ्या स्वराज्या’-साठीही खूप काही केलं. स्वत:ही केलं, नि अनेकांना ते करण्याची दृष्टी, प्रेरणा दिली. ह्यातून अनेक व्यक्ती उभ्या रिाहल्या. संस्थांचं जाळं विणलं गेलं.
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
५.
तथापि, स्वातंत्र्यापूर्वी ह्या सार्यात जो जोम, उत्कटता होती. ती नंतर कमी झालेली दिसते. आधुनिक आणि आधुनिकोत्तर काळात हा प्रवाह क्षीण, अवरुद्ध होत गेलेला दिसतो. समाजासाठी काही तरी करण्याच्या प्रेरणेचे झरे आटल्यासारखे दिसतात. दुसरीकडे, उपभोगवाद-स्वार्थ-लालसा-शोषण-वसाहतवाद... सारं वाढलेलंच दिसतं. दुसऱ्या महायुद्धानंतर ‘राजकीय वसाहतवादा’नं ‘आर्थिक वसाहतवादा’चं सभ्य रूप घेतलं. शोषण आणि वसाहतवादालाच ‘जागतिकीकरण’ असं गोंडस नाव दिलं गेलं. उपभोगांच्या नित्य वाढत्या लालसेतून सारा मानवसमाज त्या स्पर्धेत-गांधींनी जिला ‘पागल दौड’ म्हटलं आहे, तीत-इच्छेनं-अनिच्छेनं सहभागी झालेला दिसतो. मानव स्वतंत्र, मुक्त, स्वावलंबी, आत्मनिर्भर असा होण्याऐवजी, अधिकाधिक बद्ध, परावलंबीच होताना दिसत आहे! भारताला राजकीय स्वातंत्र्य तर सत्तर वर्षांपूर्वीच मिळून गेलं; पण, गांधींना अपेक्षित असलेलं खरं ‘स्वराज्य’ येणं अजून बाकीच आहे. ते ‘आलेलं नाही’ एवढंच नाही; तर ते अधिकाधिक दूर जाताना दिसत आहे!
अन् ही परिस्थिती केवळ नवस्वतंत्र राष्ट्रांची नाही; तर, तथाकथित ‘विकसित’ राष्ट्रांचीही आहे. एवढा ‘विकास’ होऊनही ती समस्यांनी ग्रस्तच आहेत. एवढे उपभोग घेत असूनही ती समाधानी नाहीत; एवढी शस्त्रास्त्रं असूनही सुरक्षित नाहीत; जीवनस्तर उच्च असूनही चिंतामुक्त-तणावमुक्त नाहीत. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरांवर एक असमाधान, अशांती, भीती भरून राहिलेली आहे.
६.
ह्यामागच्या कारणांचा शोध घेता घेता तिथले विचारवंत येताहेत काही मूलभूत बाबतींतल्या चुकांकडे : चुकीची जीवनदृष्टी, चुकीचं जीवन-तत्त्वज्ञान, चुकीची जीवनध्येयं आणि चुकीची जीवनशैली. अन् अशा वेळीं त्यांचं लक्ष जातंय गांधींकडे. आज जगभरच गांधी-विचारांकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं जातंय. त्यांचे विचार अभ्यासले जाताहेत. त्यांच्या उपायांचं कुठे कुठे अवलंबनही होतंय. सर्वांगीण विनाशकारी अशा प्रचलित विकास-प्रतिमानाला एक वैध असा विकल्प गांधी-प्रतिमानातून शोधण्याचा प्रयत्न होतोय : साधी राहणी, संयमित उपभोग, स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली, बाह्य/भौतिक वाढीला धारणाक्षमतेच्या मर्यादा, आंतरिक विकासावर भर, स्थानिक उत्पादन-उपभोग, विकेंद्रीकरण, समुचित तंत्रज्ञान, शांततामय सहजीवन, सर्व समाजघटकांचा समन्यायी विकास... इत्यादि.
अन् ह्या बाबतीत झालंय असं की, ज्या राष्ट्रांच्या बाबतीत ‘विकास’ची प्रक्रिया आधी सुरू झाली, त्यांना तिचे चटके आणि फटकेही आधी बसले, नि त्यामुळे त्यांना गांधीही लवकर पटले! आपण त्या ’विकास’चा पाठलाग खूप नंतर सुरू केला, नि सध्या आपला ‘विकासा’चा आलेख वरच्या दिशेत वाटचाल करत आहे. साहजिकच, ते चटके-फटके आपल्याला अजून पुरते जाणवत नाहीयेत, नि म्हणून गांधी पुरते पटतही नाहीयेत!
पण, ह्या ‘विकास’जन्य समस्या पुढच्या काळात वाढतच जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शिवाय, आपल्यापुढच्या समस्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. प्रचंड लोकसंख्या, तरुण लोकसंख्येचा फायदा (demographic dividend) ह्या बाबी योग्य धोरणांअभावी समस्या बनतील. प्रचलित विकास- प्रतिमानच आपण हिरीरीनं राबवू गेलो, तर समस्या वाढतील : विषमता वाढेल; बहुसंख्य समाजाची क्रयशक्ती घटेल; सर्वांच्या मूलभूत गरजांचीही पूर्तता होणार नाही, रोजगार घटतील! आधुनिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान ह्यांतून विकासाची आकडेवारी (GDP, Growth Rate, इ.) काही काळ सुधारताना दिसली; तरी ती वाट पुढे जमिनींचं शोषण, निसर्गाचं शोषण-प्रदूषण, ऊर्जा-तंत्रज्ञानाधारित उद्योगीकरण, शहरीकरण, केंद्रीकरण, घटते रोजगार, वाढते ताणतणाव-व्यसनाधीनता-हिंसा-अत्याचार-गुन्हेगारी, वाढती दडपशाही, वाढता भ्रष्टाचार... ह्या दिशेनं जाते. त्यामुळे, ह्या ‘पुढल्या हाका’ ऐकून, मानव आणि निसर्ग ह्या दोहोंच्याही हिताचा पर्यायी मार्ग आपण वेळींच स्वीकारणं आवश्यक आहे. गांधी-विचारांतून तो नेमका मिळतो.
७.
हे परिवर्तन एकदम व्यावहारिक स्तरावर होऊ शकणार नाही : आधी ते वैचारिक स्तरावर व्हावं लागेल. आधी तत्त्वज्ञान आणि दृष्टी बदलल्याशिवाय विकासाचं ध्येय बदलणार नाही. विकासनीती बदलण्याची गोष्ट तर त्या नंतरचीच. त्यामुळे, आपल्या-लाही गांधींप्रमाणेच मानवातल्या आसुरी प्रवृत्तीच बदलण्यासाठी काम करावं लागेल. हा साक्षात्कार आपल्याला जेव्हा होईल, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की, ह्याच कारणामुळे गांधी हा माणूस आजही कालोचित (relevant) आहे! अन् ह्याच्याही पुढे जाऊन आपल्या असं लक्षात येईल की, सर्व काळांतल्या समस्या निर्माण झाल्या-होताहेत त्या-आपण प्रारंभी पाहिलं तसं-माणसांमधल्या काही विशिष्ट दुष्प्रवृत्तीं-मुळेच. गांधींना समस्यांच्या तात्कालिक सोडवणुकीपेक्षा ह्या दुष्प्रवृत्तीच मुळातून नाहीशा करण्यात रस होता : जेणे करून समस्यांचा उद्भवच थांबेल. शाश्वत तत्त्वं आणि नैतिक मूल्यांवर आधारलेला गांधी-विचार हा अशा प्रकारे ह्या दुष्प्रवृत्तींच्या मुळावरच घाव घालतो. स्वाभाविकच, जेव्हा आणि जिथे ह्या प्रवृत्ती असतील, तेव्हा आणि तिथे तो उपयोगी पडतो. म्हणूनच, गांधी हे केवळ आजच कालोचित आहेत असं नाही; तर, ते नित्य-कालोचित (ever-relcvant) आहेत. अन् केवळ भारतापुरते स्थलोचित आहेत असं नाही; तर, सर्व-स्थलोचित आहेत.
आणि अशा विचारांची गरज सर्व स्थल-कालांमधल्या मानवांना भासत असल्यानंच खून केला तरी ‘गांधी’ मरत नसतात. शाश्वत तत्त्वं, शाश्वत मूल्यं, शाश्वत विचार ह्या रूपानं ते चिरंजीव असतात!
८.
हे सारं समाजाला सांगत राहण्याचं काम हे न थकता, न कंटाळता नित्य करत राहण्याचं असतं. कारण, एकदाच ते सांगून समाज बदलत नाही; आणि अनेकदा सांगितलं तरी सगळेच जण काही बदलत नाहीत. माणसांच्या तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे जाण्याच्या प्रक्रियेची, प्रवासाची गती, उत्कटता कमी-अधिक असते. सर्व मानवसमाज एकगट्ठा सत्त्वगुणी झालाय, असं कधीच संभवत नाही. आणि उन्नती झाली म्हटली, तरी ती अवस्था टिकवून ठेवणं हेही पुन्हा एक वेगळं आव्हानच असतं; कारण, कुबुद्धी, मोह ह्यांमुळे स्खलनाचा धोका सदैवच असतो. त्यामुळेही, हे काम सतत करत राहण्याचं असतं.
९.
अशी मूलभूत परिवर्तनाची कामं समाजातल्या युवक-युवतींनी अंगावर घ्यावीत, अशी अपेक्षा असते. अशा युवांपर्यंत हा विषय साक्षेपानं पोचावा असा ह्या ठांथामागचा हेतू आहे. त्याचं स्वरूप ‘वैचारिक’ आहे. व्यक्ती म्हणून गांधींच्या थोरपणाविषयी काहीही सांगण्याचा इथे उद्देश नाही-प्रयत्न नाही. तशा तऱ्हेचा फक्त एकच लेख या ग्रंथात शेवटी आहे.
ह्या ग्रंथाचं स्वरूप प्राधान्यानं ‘वैचारिक’ आहे. त्याची दृष्टी इतिहासाकडे नसून भविष्याकडे आहे. ही बाब मला अत्यंत महत्त्वाची वाटते. ‘ऐतिहासिक गांधीं’मध्ये-त्यांच्या समर्थनात वा त्यांच्यावरील टीकेत-अडकून पडायला मला आवडत नाही. ‘जर गांधीजींनी त्या वेळी असं असं केलं असतं/नसतं तर...’ अशा चर्चेला काही अर्थ नसतो. त्या वेळेस ते तसं का वागले ह्याचे सर्व तपशील आपल्याला माहीत नसतात, हे एक; नि दुसरं म्हणजे ते बरं/वाईट आता घडून गेलेलं आहे : ते बदलता येणार नाही. त्याचे जे काही सुपरिणाम/दुष्परिणाम भारताला भोगावे लागले, ते लागले. आता ‘इतिहास’ बदलता येणार नाही.
-बदलता येईल ते ‘भविष्य’. ‘गांधी-विचारांपैकी जे आज आपल्याला योग्य वाटतात, त्यांच्या आधारे आपल्याला पुढची वाट कशी शोधता येईल हे बघावं’ असं माझं मत असतं. त्यामुळे, सध्या भेडसावणाऱ्या, आणि भविष्यात भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता असलेल्या समस्यांवर गांधी-विचारांतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न इथे आहे. त्यातून युवांना एक व्यापक-मूलगामी दृष्टी, विचारांना योग्य दिशा, आणि कृतीला प्रेरणा मिळेल असं आम्हाला वाटतं. कालच्या घटितांमुळे उद्भवलेल्या आजच्या समस्यांना उद्या कशी उत्तरं द्यायची; गांधी-विचारांतून ती कशी मिळतात/शोधायची, हे सांगणारा हा ठांथ आहे.
इथे ‘गांधी-विचार’ असं म्हणत असताना त्याचा जो व्यापक अर्थ माझ्या मनात आहे, तो स्पष्ट करणं आवश्यक वाटतं. ‘गांधी-विचार’ म्हणजे फक्त ‘गांधीजींच्या शब्दांतले त्यांचेच विचार’ असं नाही. समतेकडे नेणारा, सत्य-अहिंसेकडे नेणारा, नीतीकडे नेणारा, शोषणमुक्तीकडे नेणारा, खऱ्या ‘स्वराज्या’कडे नेणारा, ’धर्मा’कडे नेणारा, शासनाविहीन समाजाकडे नेणारा... असा कोणताही विचार म्हणजे ‘गांधी-विचार’. ह्या ग्रंथात जे विविध लेख आहेत, त्यांच्या लेखकांनी असा ‘विस्तारित गांधी-विचार’ पुढे ठेवलेला आहे. गांधी हा गतिशील, प्रवाही (dynamic) माणूस होता. स्वत:चे विचार बदलायला सदैव तयार असणारा होता. त्यामुळे त्यांच्या विचारांचं आजच्या काळातलं गतिशील उपयोजन (dynamic application) कसं असू शकेल, ह्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. स्वाभाविकच, ’हाच विचार परिपूर्ण’ असं मी किंवा अन्य लेखक मानत नाही; नि वाचकांनीही तसं मानू नये, ही नम्र विनंती.
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
१०.
ह्या ग्रंथातील विषयांची निवड करताना, वर म्हटल्याप्रमाणे, युववर्ग डोळ्यांसमोर ठेवलेला आहे. ह्या वयोगटातील युवांचा विचार करताना असं जाणवतं की, जुन्या पिढीला ज्या बाबी महत्त्वाच्या वाटतात, त्यांचं त्यांना फारसं काहीच वाटत नाही. उदाहरणार्थ, ‘अखंड भारत’, किंवा ‘भारताची फाळणी’. त्यांच्यासाठी त्यांच्या जन्मापूर्वीपासूनच भारत आणि पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र असल्यानं ती ‘गृहीत’ (taken for granted) अशी बाब आहे. ते त्या बाबतीत ‘भावनिक’ नाहीत. ‘फाळणीच्या जखमा’ वगैरे बाबी त्यांच्या बाबतीत अस्तित्वात नाहीत. ‘अखंड भारता’चं स्वप्न त्यांच्या पैकी किती जण पाहत असतील?
हे सारं युव जन्मले आहेत ते १९९१मध्ये भारतात जागतिकीकरणाचं युग आरंभ झाल्यानंतर. त्यामुळे त्यांची विचारपद्धतीही आता ‘राष्ट्रवादी’ न राहता, बर्याच प्रमाणात ‘वैश्विक’ बनली आहे. ‘'Going Global’ हा परवलीचा वाक्प्रचार बनलेला आहे. हे युवक-युवती कामं-नोकऱ्यांसाठी सहज आखाती देशांत, अमेरिकेत वा ऑस्ट्रेलियात जातात. जगभरात कुठेही बनलेल्या वस्तू वापरतात. वाहिन्यांवर जगभरातले कार्यक्रम पाहतात. ‘नेट’च्या माध्यमातून सतत जगाशी जोडलेले असतात.
पण, त्याचमुळे की काय, या पिढीपुढच्या समस्याही जागतिक-वैश्विक आहेत. तथापि, आश्चर्य असं की, तिला त्यांचं गांभीर्यच जाणवत नाहीये! सर्व राष्ट्रांची विनाशक विकासनीती; आंतरराष्ट्रीय शोषण आणि वसाहतवाद; तंत्रज्ञानाचं सर्वंकष आक्रमण; निसर्गातली घटती संसाधनं; वाढणारं प्रदूषण; जागतिक तापमानवाढ; अण्वस्त्रस्पर्धा; रासायनिक शेतीचे दुष्परिणाम; वनसंहार; शासनांची दमनकारी धोरणं; प्रशासनातला भ्रष्टाचार; वाढती लोकसंख्या; घटते रोजगार; ढासळणारी कुटुंबव्यवस्था; वाढती विषमता; वाढता चंगळवाद; वाढत्या शारीरिक व्याधी आणि दुर्बलता; मनावरचा अतिरेकी ताण आणि तज्जन्य व्याधी... किती तरी! एकीकडे ह्या समस्यांशी ह्या युवांना प्रतिक्षणी झुंजावं लागतंय; अन् तरीही त्या सोडविण्यासाठी ते फारसं काहीच करत नाहीयेत. मोबाइलवरच्या आणि संगणकावरच्या निरर्थक माहितीत, करमणुकीत, भासमान विश्वात ते रमलेले आहेत. दुसरीकडे, निरुपयोगी शिक्षण, बेकारी अशांमुळे वैफल्यग्रस्त झालेले जे युवक आहेत, ते व्यसनं-गुन्हेगारीचा रस्ता धरताहेत.
अशा सर्वांना ह्या समकालीन समस्या जाणवून द्याव्यात, हा ह्या ग्रंथाचा एक हेतू आहे. पण, समस्या नुसत्या सांगून उपयोग नाही : त्यांवरचे उपायही सांगायला हवेत. पण, सध्याच्या प्रतिमानात असे उपाय अस्तित्वातच नाहीत! हे प्रतिमान समस्या फक्त निर्माण करणारं आणि वाढवणारं आहे. समस्या कमी व्हायच्या असतील-सुटायच्या असतील, तर एका वेगळ्याच वैचारिक प्रतिमानाची गरज आहे. ह्या वेगळ्या प्रतिमानाला ‘गांधी-प्रतिमान’ असं एक ढोबळ, समावेशक नाव देता येईल. ह्या ठांथात त्याची मांडणी करण्याच्या यथाशक्ती, यथामती प्रयत्न केलेला आहे.
तथापि, कोणत्याही काळातील ‘सर्व’ समस्यांचा ऊहापोह एखाद्या ग्रंथात करणं शक्यच नसतं. त्यामुळे, ज्यांचा ह्या ग्रंथात समावेश नाही, अशा अन्य समस्यांच्या सोडवणुकीसाठी युवांना ह्या विचार/दृष्टिकोणाच्या आधारे स्वत:लाच मार्ग शोधावा लागेल.
११.
एकाच लेखकानं लिहिलेला संपूर्ण ग्रंथ; आणि विविध लेखकांच्या लेखांचा संग्रह ह्या दोन्हींचीही आपापली बलस्थानं असतात आणि मर्मस्थानंही. एकच लेखक जेव्हा संपूर्ण ग्रंथ लिहितो, तेव्हा त्यात एक वैचारिक सुसूत्रता असते. ओघ असतो. भाषेतलं, शैलीतलं सातत्य असतं. पण त्याच वेळी, सर्व विषयांवर लिहिण्याइतकी एकाच लेखकाची विद्वत्ता, पात्रता क्वचितच असते. लेखसंग्रहात अनेक विषयतज्ज्ञ लिहीत असल्यानं मांडणी अधिक पूर्ण, सर्वांगीण होऊ शकते. तथापि, मांडणी-शैलीत लेखागणिक फरक पडतो. शिवाय प्रत्येक लेखकाची मतं भिन्न असल्यानं वैचारिक सुसंगती राहत नाही. क्वचित दोन लेखक दोन परस्परविरोधी मतं मांडतानाही दिसू शकतात. प्रस्तुत लेखसंग्रह हा देखील ह्या गुण-दोषांना अपवाद नाही.
मात्र, विचारभिन्नता आणि मतभिन्नता असूनही आम्ही लेखकांना त्यांची मतं मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, आणि मान्य नसणाऱ्या मतांचाही आदर केला आहे. लेखकांची भाषा, शैली, मांडणी ही देखील तशीच ठेवलेली आहे. ‘संपादक’ म्हणून मी केलेलं काम हे अधिक तर ‘संकलना’चं आणि ‘समन्वया’चं आहे : ‘कात्री चालवण्या’चं नाही. विषय परस्परांत गुंतलेले असल्यानं काही मुद्दे समव्याप्त असणं क्रमप्राप्त होतं. कात्री चालवली आहे, ती अशी समव्याप्ती (overlapping) काही ठिकाणी कमी करण्यापुरतीच : ती टाळायची तर नव्हतीच; किंबहुना, ती आवश्यक होती.
प्रारंभीच्या आराखड्यात १५ विषयांवर १५ तज्ज्ञांचे लेख, अशी रचना अभिप्रेत होती. पण, नंतर असं जाणवू लागलं की, कोणताही एक लेखक-मी सुद्धा-फक्त त्याच्या दृष्टिकोणातूनच लिहिणार. त्यामुळे, कदाचित त्या विषयाचे/समस्येचे सर्व आयाम चर्चिले जाणार नाहीत. म्हणून मग मराठी-हिंदी-इंग्रजीतील प्रकाशित साहित्याचा धांडोळा घेऊन असे अन्य, विविध आयाम समोर आणणारं वाङ्मय संकलित आणि अनुवादित करून ग्रंथात समाविष्ट केलेलं आहे.
मग, असंही वाटलं की, गांधी हा काही केवळ ‘विचारवंत’ नव्हता : तो तितकाच ‘आचारवंत’ही होता. मग, गांधींच्या त्या त्या क्षेत्रातील विचारांनुसार आज कुणी, कुठे जगतंय का; कामं करतंय का? म्हणून मग अशाही काही व्यक्तींचा, संस्थांचा परिचय करून देण्याचं ठरवलं. ग्रंथातील ह्या ‘काहीं’ची संख्या इतकी कमी आहे की, त्यातून इतरांवर अन्याय होतोय, असं मला सदैव जाणवत राहिलं. एकदा असंही वाटलं की, प्रस्तुत ग्रंथाचं स्वरूप फक्त वैचारिक ठेवावं; नि त्याला पूरक असा ‘गांधी : जगताना’ नावाचा एक स्वतंत्र ग्रंथच समांतरपणे तयार करावा. तूर्तास ते शक्य नसल्यानं ती कल्पना भविष्यातील कार्यवाहीसाठी मनातच ठेवली आहे. तथापि, ह्या ग्रंथात जी अशी व्यावहारिक उदाहरणं प्रस्तुत केलेली आहेत, त्यांवरून गांधी-विचार वास्तवात जगण्याच्या, त्या आधारे कार्य करण्याच्या काही दिशा वाचकांना निश्चितपणे गवसतील. स्व-प्रतिभेनं त्यात भर घालून स्वत:करताची जगण्याची, कार्याची दिशा युवांना ठरवता येऊ शकेल.
गांधींवर मराठीत अनेक पुस्तकं आहेत : मुलांसाठी, चरित्रात्मक, गोष्टिरूप, वैचारिक... अनेक प्रकारची. त्यांची अल्पशी माहिती देणारी एक सूची शेवटी परिशिष्ट म्हणून दिलेली आहे. ‘गांधी’ समजण्यासाठी त्यांचं यथारूची वाचन अवश्य करावं, असं आग्रहपूर्वक सुचवावंसं वाटतं.
१२.
ह्या महात्म्यानं ज्या जगाचं स्वप्न बघितलं; जे वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्न केले, ते स्वप्न कधी पूर्ण होईल-कधी तरी होईल का-हे कुणालाच सांगता येणार नाही. त्या दिशेनं स्वत: पुढे जाणं, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं.
त्या महात्म्याच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं त्या स्वप्नाचं आकलन करून देण्याचा हा प्रयत्न, ते कार्य ज्यांनी करायचं आहे अशा युवक-युवतींपुढे विनम्रपणे ठेवत आहे.
.............................................................................................................................................
'गांधी उद्यासाठी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4773/Gandhi-Udyasathi
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 17 February 2019
नमस्कार ramesh singh, रावण, नरकासुरा, होलिका यांचं दहन करतातच ना दरवर्षी लोकं? तसंच गांधींचं परलोकगमन साजरं केलं . किमान शब्दांत कमाल परिणाम साधण्यासाठी टपकावला हे क्रियापद वापरलं. असो. आता एक गंमत सांगतो. गोडसेंनी केलेल्या गांधीहत्येचं प्रत्यक्षांतलं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं. त्यास टपकावणं म्हणणं हे गँगस्टर लोकांचं अवमूल्यन आहे. असो. मात्र असं असलं तरीही तुमचा उचित भाषेचा मुद्दा पटला. माझ्याकडून काळजी घेईन. आपला नम्र, -गामा पैलवान
ramesh singh
Sun , 17 February 2019
गामा, हा लेख मलाही आवडला नाही. पण ""गोडसेंनी त्याला टपकावला ते चांगलंच केलं."" हे तुमचे वाक्य उत्तर प्रदेशात गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडणाऱ्यांची मनोवृत्ती दाखवणारे आहे. आपण टीका करावीत, परंतु खुनाचे समर्थन आणि अशी भाषा वापरणे विकृत मनोवृत्तीचे आहे. असो. अक्षरनामाचे संपादक लेख न वाचताच प्रकाशित करतात, हे कळत होते. परंतु प्रतिक्रियांमधून वाचकांशी उथळपणे भांडताना त्यांना पाहिले, तेव्हा वाटले की प्रतिक्रिया तरी ते वाचत असावेत. परंतु हाही एक भ्रमच होता. असो.
Gamma Pailvan
Fri , 15 February 2019
दिलीप कुलकर्णी, तुमच्या लेखावरनं वाटतंय की गांधी एकदम तत्त्वचिंतक वगैरे होते. मग गपचिप आश्रमात राहून सत्याचे प्रयोग करायला हवे होते. राजकारण तयांचा प्रांत नोहे. गांधी लई थोर माणूस होता हो. पण अडचण काये माहितीये? त्याच्या थोरपणाचा हिंदूंना फुटक्या कवडीइतकाही उपयोग झाला नाही. उलट भयंकर हानीच झाली. तीच गत भारतवादी मुस्लिमांचीही झाली. तुम्ही म्हणता की गांधी एक आचारवंतही होता. असू द्या. मग पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत म्हणून उपासास बसणे, हा कोणता थोर आचार झाला बरें? गांधी हा एक नंबरचा बथ्थड इसम आहे. आपलं घरदार सोडून निर्वासित झालेले हिंदू दिल्लीत आले. त्यांना राहायला जागा नव्हती. दिल्लीतनं ज्या मुस्लिमांना हाकलून लावलं गेलं त्यांच्या रिकाम्या झालेल्या मशिदींत कसेबसे हिंदू रहात होते. तेव्हा याच गांधीने दुराग्रहाने त्या मशिदी मुस्लिमांना परत करायला लावल्या. नोव्हेंबराच्या ऐन थंडीत हिंदू परत उघड्यावर पडले. गांधीला हा हलकटपणा करायची काय खाज सुटली होती? गप्प बसता येत नव्हतं का? कसली नशा चढली होती? हिंदू आवाज करीत नाहीत म्हणूनंच गांधीला चेव चढायचा ना? मग गोडसेंनी त्याला टपकावला ते चांगलंच केलं. हिंदूंच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला तेव्हाच नथुराम गोडसे कार्यरत झाला ना? असो. बाकी, गांधीला काँग्रेसवाले दररोज ठार मारताहेत. नथुरामने गांधींचा फक्त देह नष्ट केला. आपला नम्र, -गामा पैलवान