गरीब लोक काय खातात?
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ‘दारिद्रयाची शोधयात्रा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 February 2019
  • ग्रंथनामा झलक दारिद्रयाची शोधयात्रा Daridryachi Shodhyatra हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतल्या १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाविषयी जाणून घेतले. त्या अनुभव\निरीक्षणांच्या आधारे त्यांनी ‘दारिद्रयाची शोधयात्रा’ हा पुस्तकरूपी अहवाल तयार केला आहे. नुकत्याच पुण्याच्या समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

शहापूर तालुक्यात कातकरी मजुरांना भातकाढणीनंतर काम मिळत नाही. त्या काळात ते काय खातात हे तिथल्या महिलांना विचारले. त्यांच्या शेतात पिकलेले धान त्यांना फक्त सहा महिने पुरते. त्यांच्या रोजच्या जेवणात डाळ नसते. शेतात पिकलेली उडीद डाळ ते अधूनमधून खातात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने मासे व खेकडे असतात. सोबत काही जुनी मासळी आणि सुकवून ठेवलेल्या जुन्या भाज्या शिजवून खाल्ल्या जातात. या महिला बाजार संपताना तिथे जाऊन भाजी आणतात, म्हणजे स्वस्तातल्या टाकाऊ भाज्या मिळतात, असेही समजले. पावसाळ्यात जंगलातल्या रानभाज्या आणल्या जातात. ही माणसे स्वयंपाकात मोहाचे तेल वापरतात. मात्र, तेलाचा वापर खूप कमी असतो. कातकरी कुटुंबांत जनावरे फारशी पाळली जात नाहीत. एक तर अनेकांकडे स्वतःची शेती नसते, शिवाय जवळपास जंगल नसल्याने चराईला गवत नसते. याचा दुसरा परिणाम म्हणजे घरात दूधदुभते अजिबातच नसते. लहान मुलांना आधी आईचे दूध असते; पण आईलाच जिथे पुरेसे खायला मिळत नाही, तिथे मुलाचे पोषण कसे होत असेल? आणि आईच्या दुधानंतर मुलांना थेट जेवणाची सवय लावली जाते.

भटक्या विमुक्तांची स्थिती तर अधिक विदारक असते. त्यांच्याकडे स्वतःचे घर, शेती-व्यवसाय, काहीच नसते; त्यामुळे चांगल्या अन्नाची वानवाच असते. निलंगा शहरातल्या भटक्या लोकांना भेटलो. हातात जितके पैसे असतील त्या प्रमाणात ते किराणा घेतात. तेल तर अगदी एका फोडणीचेही विकत आणले जाते. बाकी मग गावच्या बाजारातून भाज्या मागून आणल्या जातात. चिकन-मटणाच्या दुकानात कोंबड्या कापल्यावर त्या कोंबड्याचे खूर, मुंडके टाकून दिले जाते, ते सर्व हे लोक स्वस्तात विकत आणतात. चिंगरी जातीचे स्वस्तातले मासेही त्यांच्या आहारात असतात. महिला-मुले जवळच्या घरांमधून भाकरी मागून आणतात. त्यांच्या कोणत्याच पालावर दूध दिसले नाही. लहान मुलेही जे मिळेल ते खातात. त्यांना तशीच सवय लावली जाते. फळे तर त्यांना अप्राप्यच. आजारी पडलो तरच फळ खातो, असे एका व्यक्तीने तिरकसपणे सांगितले. उस्मानाबादच्या भटक्या वस्तीत स्वयंपाकाची चौकशी केली तेव्हा एक महिला म्हणाली, “तांदूळ असला तर भात करीन, पीठ असलं तर भाकरी करीन आणि काहीच नसेल तर भीक मागून आणीन.”

अनेक गावांत लोकांच्या रोजच्या जेवणात हिरवी भाजी नसल्याचे दिसून आले. बाजाराच्या दिवशी आणलेल्या हिरव्या भाज्या पुढे दोन दिवस पुरतात. मग डाळ-रोटी खाल्ली जाते. डाळ नसेल त्या दिवशी चटणीवर भागवले जाते.

चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यात लोकांच्या जेवणात ज्वारीच्या कण्या असतात. जात्यात भरडलेली ज्वारी गरम पाण्यात उकळून खाल्ली जाते. त्याला ‘ज्वारीच्या कण्यांचा घाटा’ म्हणतात. त्यांच्या गावापासून तीन किमी अंतरावर पिठाची गिरणी आहे. त्यामुळे त्यांना दळण आणून पोळी-भाकरी करणे शक्य होत नाही. आठवड्यातून तीन वेळा ज्वारीच्या कण्या खायच्या, महिन्यातून एकदा बाजारातून हिरवी भाजी आणायची, एक किलो तेल महिना-दीड महिना पुरवायचे, असा त्यांचा आहार असतो. मटण आणले तरी ते तेल-मसाल्याविना केवळ गरम पाण्यात उकळून खाल्ले जाते. पावसाळ्यात हे लोक ज्या शेतात कामाला जातात तेथूनच रानभाज्या आणतात.

मोखाडा तालुक्यात बोटाच्या वाडीत एक महिला दोन-तीन दिवस फक्त डाळ व भात खात होती. घरात नागली असूनही केवळ दळायला पैसे नव्हते म्हणून ती भाकरी करू शकत नव्हती. १० किलो दळणाचे ३० रुपयेही तिच्याकडे नव्हते, हे त्यामागचे प्रखर वास्तव होते.

अन्नावर खर्च किती?

गोंदियात भटक्यांच्या वस्तीत किराणा कसा भरला जातो याची चौकशी केली. तिथल्या महिला नुकत्याच भंगार गोळा करून आल्या होत्या. भंगार विकून त्यांना ८० रुपये मिळाले होते. तेवढ्या पैशांतून त्यांनी तांदूळ, मीठ, तेल, चहापत्ती, साखर, हळद, टोमॅटो, बटाटे आणि कांदे अशा वस्तू थोड्याथोड्या प्रमाणात आणल्या होत्या. त्यांच्याजवळ रेशनकार्ड नसल्याने त्यांना रेशनवरचे धान्य मिळत नाही. मटण आणले तरी त्या दुकानाबाहेरच्या टाकाऊ भागातून विकत आणतात असे समजले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात नंदनमाळ गावात एका किराणा दुकानदाराला भेटलो. त्याच्याकडून कळले, की गरीब लोक अगदी दोन-पाच रुपयांची साखर, १० रुपयांची डाळ अशा वस्तूही नेतात. तेल पाच रुपयांच्या पटीत नेले जाते. त्या दुकानदाराने पाच ग्रॅम तेल मावेल इतके छोटे माप बनवून घेतलेले आहे. एका मजूर महिलेने सांगितल्यानुसार ४० रुपयांचे तेल एक आठवडा वापरले जाते. भाज्या शिजवायला तेल जास्त लागते, म्हणून भाजीपाला जास्त आणला जात नाही.

रेशनची स्थिती काय आहे?

बहुतेक गावांत रेशन मिळते; परंतु नियमानुसार माणशी नेमके किती धान्य मिळायला हवे व प्रत्यक्षात किती मिळते याबाबत लोकांना माहिती नसल्याचे आढळले. वास्तविक एका व्यक्तीमागे पाच किलो धान्य मिळायला हवे; पण नंदुरबार जिल्ह्यातील चिंनिपाणी येथे लोकांची रेशनकार्डे बघितली, तेव्हा आठ युनिट असलेल्या कुटुंबाला केवळ पाच किलो गहू आणि १० किलो तांदूळ मिळालेले होते. परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यातील एका गावातही असे व्यस्त प्रमाण दिसले. याचा अर्थ सर्वदूर मंजूर धान्याचा पूर्ण कोटा मिळत नाही.

काही गावांत महिन्याचे धान्य मिळण्याची तारीख उलटून गेली तरी रेशन आलेले नव्हते. सरकारने रेशनमध्ये बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला तरी रेशन न मिळण्याच्या तक्रारी अजूनही कायम आहेत. गावोगावी रेशन मिळण्याचा दिवस सांगितलेला असतो. त्या दिवशी मजुरांना काम सोडून घरी थांबावे लागते. म्हणजे धान्यात पैसे वाचले तरी मजुरी बुडतेच. त्यापेक्षा बाजाराच्या सुटीच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळात रेशन वाटप करणे शक्य होणार नाही का?

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बिलोली जागीर येथील महिला बचत गटाने रेशन दुकान चालवायला घेतले होते. दुकान चालवायला एक माणूस नेमला होता. रेशन दुकानापोटी दर महिन्याला तहसीलदार कार्यालयात १००० रुपये आणि तेथील गोडाऊनवाल्याला १००० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे त्यांना दुकान चालवणे परवडेना. मग त्या महिलांनी दुकान बंद करून सरकारला परत करायचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या तहसीलदारांना भेटायला गेल्या. त्या दिवशी तहसीलदार कार्यालयात नव्हते, त्यामुळे भेट झाली नाही. तिथपर्यंत जाण्यासाठी या महिलांना प्रत्येकी ७० रुपये भाडेखर्च आला होता. त्यांच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे. पुन्हा तेवढा खर्च करून तहसीलदारांना भेटायला जाणे त्यांना शक्य नव्हते. परिणामी, तीन महिन्यांपासून दुकान आणि रेशन मिळणे दोन्ही बंद होते.

दिवाळीनंतर अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. स्थलांतर केलेल्या ठिकाणी रेशनचे धान्य मिळत नाही. तेथे त्यांना बाजारभावाने धान्य घ्यावे लागते. परिणामी मजुरीचा बराच भाग धान्यखरेदीवर खर्च होतो.

बीपीएल रेशनकार्डवर जास्त धान्य मिळते. गावातील बहुतेक कुटुंबांकडे रेशनकार्डे आहेत, पण बीपीएलचे रेशनकार्ड कुणाकडेच नाही असे दिसून आले. त्यामुळे गरजू व पात्र कुटुंबांनाही आपल्या गरजेपोटी अधिकचे धान्य खुल्या भावाने घ्यावे लागते. इथेही भटक्या विमुक्तांची अधिक दैना आहे. त्यांच्यापैकी अनेकांकडे रहिवासी दाखलाच नसतो. त्यामुळे त्यांना रेशनकार्डेही मिळत नाहीत. गोंदिया जिल्ह्याच्या गावात भटक्यांची ५० घरांची वस्ती आहे. तिथली माणसे भंगार विकून मिळालेल्या पैशांत १८ रुपये किलोचा तांदळाचा चुरा विकत घेतात व त्यावर गुजराण करतात असे आढळून आले.

रेशन न मिळण्याची कारणेही खूप किरकोळ असतात. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक कातकरी मजूर काळू दिवे. आम्ही भेट दिली त्या दिवशी त्याच्या घरात एकही रुपया नव्हता. या काळूला रेशन मिळत नाही, कारण त्याचे आधारकार्ड अजून आलेले नाही. काही महिन्यांपासून रेशन दुकानदाराने आधारकार्ड मागायला सुरुवात केली होती. परिणामी, काळूच्या मजुरीतला निम्मा हिस्सा केवळ धान्यखरेदीवर जातो आहे.

तरीसुद्धा रेशन व्यवस्था आणि अन्नसुरक्षा योजना गरिबांना जगवते आहे. पावसाळ्यात गरीब माणसांना रोजगार मिळू शकत नाही, त्या काळात या योजनांची त्यांना मदत होते.

 

.............................................................................................................................................

'दारिद्रयाची शोधयात्रा' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4720/Daridryachi-Shodhyatra

.............................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 08 February 2019

भारत खरंच स्वतंत्र झालाय? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......