२०१४ मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशात हिंसा आणि जमातवादाने उच्चांक गाठला. गेल्या काही वर्षांत धर्मांधतेच्या विरोधात भूमिका घेणारे, सांस्कृतिक विविधता आणि बहुलतावादाचा पुरस्कार करणारे विवेकवादी विचारवंत, पत्रकार, साहित्यिक-कवी-कलाकार, वैज्ञानिक यांना धमक्या, हल्ले आणि खुनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सामाजिक माध्यमांतून नियोजनपूर्वक ट्रोलिंग होते आहे. जात, धर्म, वंश, भाषा अशा मुद्द्यांवर आधारित विद्वेष पसरवण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दलित, अल्पसंख्याक व स्त्रियांवरील अत्याचार, गोरक्षणाच्या नावाखाली हत्या यातून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संघ परिवार आणि भाजपचे पदाधिकारी, मंत्री जाहीरपणे संविधान विरोधी वक्तव्ये करत आहेत. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे आता हे सारे राष्ट्रवादाच्या नावाखाली केले जात आहे. एका बाजूला मानववंशशास्त्रज्ञ हे ठामपणे सांगताहेत की, आज जगातील कोणताही वंश स्वत:ला विशुद्ध मानू शकत नाही. भौगोलिक एकात्मता, वंश, धर्म, भाषा, संस्कृती यावर आधारित ऐक्य आणि सामाईक इतिहास या सर्व अटी पूर्ण करणारे एकही राष्ट्र आज या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही. स्थलांतर, युद्धातील जय-पराजय, वसाहतवाद यामुळे सर्वच राष्ट्रे मिश्रवंशीय बनली आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘शुद्ध हिंदुत्वाचा नारा’ हे एक राजकीय अस्त्र बनले आहे. हिंदुत्ववाद ही एक राजकीय परिभाषा बनली आहे.
भौगोलिक, आर्थिक ऐक्य आणि सामाईक इतिहास हे राष्ट्र म्हणून भारतीय लोकांना जोडणारे घटक आहेत. विशेषत: हजारो वर्षांचा सामाईक इतिहास हा आपला सर्वांत दृढ, सामर्थ्यशाली बंध आहे. गेल्या दहा हजार वर्षांत या भूमीवर मध्य व पश्चिम आशिया, पश्चिम युरेशिया, तिबेट-बर्मा अशा विविध प्रदेशांतून आर्य, मंगोलियन, कुशन, शक, ग्रीक, हूण, अरब, पर्शियन, तुर्क अशा वंशांचे लोक स्थलांतरित होऊन आले. इथेच स्थिर झाले. इथल्या लोकांत मिसळून गेले. गेल्या हजार वर्षांत इथे संत आणि सुफींनी सहिष्णुता, सुसंवाद आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण केले. जेव्हा हिंदू आणि मुस्लीम राजे सत्तेसाठी लढत होते, तेव्हा सर्वसामान्य लोक परस्परांचा विद्वेष न करता एकत्र राहत होते. इतिहासात कधी शासक असलेले इथले मुस्लीम हिंदूंप्रमाणेच वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या शोषणाचे बळी होते. तेही स्वातंत्र्यलढ्यात उतरले. इतकेच नव्हे तर भारतातील मुघल साम्राज्याचा अखेरचा शहेनशहा व नामांकित उर्दू शायर बहादुर शाह ज़फर (१७७५-१८६२) याने १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध सैन्याचे नेतृत्व केले. युद्धात हार झाल्यानंतर इंग्रजांनी त्याला बर्मा (आताचे म्यानमार) येथे पाठवले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास हिंदुस्तानात घेता यावा आणि आपल्या जन्मभूमीवर दफन व्हावे अशी बहादुर शाह ज़फरची अंतिम इच्छा होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. “कितना है बदनसीब ‘ज़फर’ दफ्न के लिए, दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार (प्यार की गली) में॥” या त्याच्या काव्यपंक्ती आजही त्याचे भाव व्यक्त करतात.
तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत विविध जाती-धर्म-वर्ग, सामाजिक स्तरांतील स्त्री-पुरुष नागरिकांनी सहभागी होऊन आपापल्या परीने योगदान दिले. त्याग केला, बलिदान दिले, हे लक्षात घेतले पाहिजे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कबीर, गुरु नानक, अकबर या व्यक्तींचे विचार, भक्ती व सूफी चळवळ, उर्दू भाषा, अमीर खुस्रो, मिर्जा गालिब यांच्या कलाकृती आणि भारतीय तत्त्वज्ञान, चित्रकला, वास्तुशिल्प, संगीत, पाककला, पेहराव, उत्सव यांचा परस्परांवर गहिरा प्रभाव पडला. गंगा-जमुना संस्कृती हा आपला एक सशक्त वारसा आहे. म्हणूनच तर देशाची फाळणी रोखण्यात अपयश आल्याची प्रचंड वेदना असूनही आपल्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तसे संविधान बनवले. धर्म आणि राज्यसंस्था यांची फारकत केली. कलम २९ नुसार अल्पसंख्याकांना संरक्षण दिले. परंतु हजारो वर्षे देशातील विविध वंश-जाती-धर्म-पंथ, भाषा, प्रदेश, बहुसंख्याक व अल्पसंख्याक या सांस्कृतिक स्तरांत विभागलेल्या आणि तरीही सहिष्णूतावादी, शांततापूर्ण व संवादी राहिलेल्या समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार, या परिवारातील विविध नावांनी काम करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे राजकीय अंग असलेला भारतीय जनता पक्ष यांनी एका विसंवादी, हिंसक वळणावर आणून ठेवले.
१९४८ मध्ये महात्मा गांधींचा खून हे या विद्वेषी व हिंसक विचारधारेची ठळक दृश्य कृती होती. स्वातंत्र्यानंतर भारताची जनता व नेतृत्वाने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू राष्ट्र निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आले नाही. नथुराम गोडसे याने जरी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या असल्या तरी गांधी खुनाच्या कट-कारस्थानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदुत्ववादी होते. त्यात हिंदुत्वाची वैचारिक मांडणी करणारे वि. दा. सावरकर हे एक संशयित होते. गांधीजींच्या खुनानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर आजही तितकाच प्रस्तुत आहे. ते लिहितात, “आर.एस.एस. आणि हिंदू महासभा यांच्या बाबतीत आमचे अहवाल खात्रीशीरपणे सांगतात की, या दोन संघटनांच्या, खास करून आर.एस.एस.च्या कृतींच्या परिणामी देशात असे वातावरण निर्माण केले गेले होते की अशा प्रकारची भीषण शोकांतिका शक्य झाली.” (संदर्भ : सरदार पटेल पत्रव्यवहार, खंड ६, संपादक दुर्गा दास,१८ जुलै, १९४८.)
१९६१ ते १९८५ या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील अनेक शहरांत साधारण २८ मोठ्या हिंदू-मुस्लीम दंगली घडल्या. त्यातील २० ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सरकार होते. १९८५ मध्ये शहाबानो विवाद, त्यानंतर हिंदुत्ववाद्यांची रथ यात्रा, राम मंदिर प्रश्न यातून देशातील वातावरण कमालीचे सांप्रदायिक बनले. हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण झाले आणि दंगली उसळल्या. असंख्य निरपराध हिंदू-मुस्लीम लोक मारले गेले.
१९९९ सालच्या एका घटनेने जमातवादी हिंसेचे आणखी क्रौर्य समोर आले. ऑस्ट्रेलियाचा ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स हा १९६५ पासून ओरिसात राहून बारीपदा इथे कुष्ठरोगी रुग्ण आणि आदिवासी समूहात काम करत होता. २२ जानेवारी, १९९९ रोजी स्टेन्स मनोहरपूर खेड्यात उत्सवाला गेला असताना रात्री चर्चसमोर मुलांसह स्टेशन वॅगनमध्ये झोपला होता. दारा सिंग आणि त्याच्या साथीदारांनी ती कार पेट्रोल टाकून पेटवून दिली. सुटकेचा प्रयत्न करणाऱ्या तिघांनाही त्यांनी बाहेर येऊ दिले नाही. स्टेन्स (५८), फिलिप्स (१०) आणि टिमथी (७) कारमध्ये जळून मृत्यू पावले. स्टेन्स जबरदस्ती आदिवासींचे धर्मांतर करतो, असा दारा सिंगचा आरोप होता. वाधवा आयोगाने चौकशीअंती दारा सिंगला दोषी ठरवले. परंतु त्याचे बजरंग दलाशी संबंध असल्याचे नाकारले. त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने पुन्हा चौकशी करून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध केले. त्याच्या नावावर इतरही अनेक गुन्हे होते. दारा सिंगला न्यायालयाने आधी फाशी व अपिलानंतर जन्मठेपेची शिक्षा दिली. ग्रॅहम स्टेन्सची पत्नी ग्लॅडिया तिची मुलगी एस्थरसह आजही ओरिसात राहते. १९९८ मध्ये ख्रिश्चनांच्या बाबतीत ११६ जमातवादी हिंसेच्या घटना घडल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी तेव्हा दिली होती. “मी गुन्हेगारांना क्षमा केली आहे. माझ्या मनात कटुता नाही. कारण क्षमाशीलतेने घाव भरून येतात. आपल्या भूमीला विद्वेष आणि हिंसेसाठी उपचार हवेत”, ही तिची अलीकडील प्रतिक्रिया कोणाही संवेदनशील माणसाला अंतर्मुख करते. भारतात केवळ २०१८ मध्ये ख्रिश्चन धर्मियांवरील हल्ल्यांच्या २५० घटनांची नोंद झाली आहे. ख्रिश्चनांवरील अत्याचारांत भारत आज जगातील सर्व देशांत ११व्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर जमातवाद, विद्वेषावर आधारित राष्ट्रवाद आणि इतिहास यांचा परस्परसंबंध आणि त्यातील गुंतागुंत यांचे विश्लेषण अतिशय महत्त्वाचे आहे.
आपण आज अशा देशात जगतो आहोत, जिथे भूतकाळाबद्दल निराशा आहे. वर्तमानाबाबत आत्यंतिक असमाधान आहे आणि भविष्याबद्दल अनिश्चिततेची भावना आहे. हा अत्यंत अस्थिर असा कालखंड आहे. आणि ही अतिशय धोकादायक स्थिती आहे. अशा काळात बहुधा लोक आपली अपयशे आणि असुरक्षितता यासाठी कोणाला तरी दोषी ठरवण्याचा विचार करतात. अन् अशा परिस्थितीत परकीयांना दोष देणे हा सर्वांत सोपा मार्ग असतो. लोकांच्या या भावावस्थेचा लाभ आज असहिष्णू, राष्ट्रवादाने प्रेरित चळवळी व विचारधारा यांनाच होतो. या चळवळी लोकांसमोर १९४७ पूर्वीच्या काळात परत नेण्याचे स्वप्न ठेवत आहेत.
एरिक हॉब्जबॉम त्याच्या ‘ऑन हिस्टरी’ (१९९७) या ग्रंथात इतिहास आणि धार्मिक मूलतत्ववाद व राष्ट्रवाद यातील संबंध उलगडून दाखवतो. तो म्हणतो की हेरॉइन या अंमली पदार्थाच्या व्यसनाचा जसा ‘अफू’ हा कच्चा माल असतो, तसा वांशिक, राष्ट्रवादी वा मूलतत्त्ववादी विचारधारांसाठी ‘इतिहास’ हा कच्चा माल असतो. ‘भूतकाळ’ ही त्यांच्यासाठी अत्यावश्यक बाब असते. भूतकाळ जर सोयीस्कर नसेल तर त्यांना तो हवा तसा रचता येतो. संपूर्णपणे सोयीचा भूतकाळ बहुधा नसतोच. कारण या विचारधारा ज्या घटितांचा दावा करतात, ती घटीते प्राचीन वा शाश्वत नसतात, तर ऐतिहासिकदृष्ट्या नवी असतात. भूतकाळाचा वापर ते त्यांच्या मांडणीला वैधता देण्यासाठी करतात. ज्या वर्तमानाकडे उत्साहाने साजरं करण्यासारखं काही नसतं, त्याला भूतकाळ अधिक मोहक पार्श्वभूमी देतो. हे धार्मिक मूलतत्त्ववाद आणि आधुनिक राष्ट्रवाद या दोन्हींना लागू होते. याची काही उदाहरणे एरिक हॉब्जबॉम देतो. प्राचीन सिंधु संस्कृतीतील शहरांचा अभ्यास मांडणाऱ्या एका संशोधनाचं शीर्षक ‘पाकिस्तानची पाच हजार वर्षे’ असे होते. वास्तविकत: १९३२-१९३३ पूर्वी पाकिस्तान हे नावही कुणी ऐकले नव्हते. १९४० पर्यंत त्याची राजकीय मागणी सुद्धा गंभीरपणे केली गेली नव्हती. पाकिस्तान हा देश १९४७ला अस्तित्वात आला. पण ‘पाकिस्तानची पाच हजार वर्षे’ हे ऐकायला छान वाटते. अभिमानास्पद वाटते. अशा परिस्थितीत इतिहासकारांवर अनपेक्षितपणे राजकीय भूमिका घेण्याची जबाबदारी येते. त्यांचे संशोधन स्फोटक ठरू शकते. ऐतिहासिक वस्तुस्थिती मांडण्याची आणि खास करून इतिहासाच्या राजकीय-विचारधारात्मक गैरवापराची समीक्षा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते.
६ डिसेंबर १९९२ या दिवशी हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. जिथे राम या देवाचा जन्म झाला होता, त्या पवित्र स्थानी मुस्लीम मुघल जेता बाबरने मशीद बांधली, हा दावा या हिंसक कृतीचा आधार होता. याचा परिणाम हिंसेला उत्तेजन देणाऱ्या हिंदुत्ववादी राजकीय पक्षाचा उदय होण्यात झाला. भारतातील अनेक इतिहास संशोधकांनी अभ्यासातून अशी मांडणी केली की एकतर १९व्या शतकापर्यंत अयोध्या हीच रामाची जन्मभूमी आहे, असे कुणीच सुचवले नव्हते. आणि दुसरे म्हणजे ती मशीद बाबरच्या काळात बांधली गेली होती याचा निश्चित पुरावा नाही. विवेकवादी विचारवंत, लेखक, इतिहासकारांनी हे जाहीर करून किमान त्यांचे कर्तव्य पार पडले. प्रा. नलिनी पंडित एकदा म्हणाल्या होत्या- “बॉम्बस्फोट हा नुसता गुन्हा नव्हे. राष्ट्राविरोधी केलेला तो एक कट होता, अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र सरकार गुन्हेगारांच्या बायका-मुलांनाही टाडाखाली अटकेत ठेवत आहे. पण बाबरी मशीद पाडणे, हेही एक राष्ट्रद्रोही कृत्य होते. त्यामधून बहुरंगी संस्कृतीवर आधारलेले एक उदारमतवादी राष्ट्र ही जगात असलेली भारताची प्रतिमा मलीन झाली. भारतातीलच नव्हे तर जगातील मुसलमानांच्या भावना त्यामधून दुखावल्या गेल्या.’ तसेच शासनाला परखडपणे सुनावणे, प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवणे आवश्यक आहे.
असहिष्णुतेच्या विचारधारा काही साध्या असत्य विधानांवर किंवा कल्पित गोष्टींवर आधारित असतात. अशा विधानांचा पुरावा अस्तित्वात नसतो. इतिहासाच्या जागी मिथके व रचलेल्या गोष्टी पेरण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होतात. शालेय पुस्तकांत ती मिथके व रचलेल्या गोष्टी नव्या पिढीची मानसिकता घडवण्याचे काम करतात. ओळखीच्या व अस्मितेच्या राजकारणात याचा उपयोग होतो. आज लोकांचे गट वंश, धर्म, किंवा भूतकाळ किंवा राज्याच्या वर्तमान सीमा यानुसार स्वत:ची व्याख्या करतात आणि भोवतालच्या अनिश्चित, अस्थिर जगात काही निश्चितता शोधण्याचा प्रयत्न करतात. ‘आम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत’, अशी भावना जोपासतात. महत्त्वाचे म्हणजे अशी मिथके व गोष्टी रचणारे हे शिक्षित लोक असतात. अनेकदा साहित्य, चित्रपट, नाटक अशा कलाकृतींत ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि काल्पनिकता यांतील सीमारेषा धूसर बनवलेल्या असतात.
अलीकडेच ‘पद्मावती’ चित्रपटावरून झालेले राजकारण आपण पहिले आहे. इतिहास म्हणजे पूर्वजांची स्मृती किंवा सामूहिक परंपरा नव्हे. धर्मगुरू, शिक्षक, इतिहासाच्या पुस्तकांचे लेखक, मासिकांतील लेखांचे वा टीव्ही कार्यक्रमांचे संपादक, संकलक यांच्याकडून लोकांना जे समजते तो म्हणजे इतिहास नव्हे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना ज्येष्ठ इतिहासकार म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. पुरंदरेंनी लिहिलेले शिवाजी महाराजांची भव्य-दिव्य प्रतिमा निर्माण करणारे रंजक चरित्र व त्याचे नाट्य रूपांतर समाजमानसात खरा इतिहास म्हणून रुजले. त्यातील असंख्य अनैतिहासिक बाबी, मिथके पुसून खरा शिवाजी राजा लोकांना स्वीकारायला लावणे, हे कठीण काम आहे.
‘प्राचीन काळापासून हिंदू हा एकसंध धर्म होता’ किंवा ‘प्राचीन काळापासून या भूमीवर एकात्म हिंदू समाज अस्तित्वात आहे’ अशा प्रकारची मिथके जशी हिंदू मानसात रुजली आहेत. तशीच ‘जगातील सर्व धर्मांत इस्लाम हा धर्म श्रेष्ठ व पवित्र आहे’ किंवा ‘या देशात आपले वेगळेपण जपले नाही तर आपण नष्ट होऊन जाऊ’ हे मुस्लीम जनमानसातील समज जाणीवपूर्वक रुजवले जातात. अशा राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व इतर रचलेल्या मिथकांचा प्रतिकार केला पाहिजे. रोष पत्करूनही त्यांची असत्यता सांगितली पाहिजे.
इतिहासात अंतिम सत्य असत नाही. एखादी व्यक्ती होऊन गेली किंवा एखादी घटना घडून गेली, हे सत्य असतं. पण त्या संबंधीचे इतिहासकालीन पुरावे, दस्तऐवज सापडत राहतात. परिणामी कालचं सत्य आज असत्य ठरतं, ठरू शकतं. तेव्हा जोपर्यंत नवीन पुरावा सापडत नाही तोपर्यंत आधीचं खरं, असंच इतिहासाच्या संदर्भात मानून वाटचाल करावी लागते. दुर्दैवाने आपल्याकडे तसं होत नाही. एखाद्याला थोर मानलं, देवत्व दिलं की त्याच्याविषयी तटस्थपणे चर्चा करायला, लिहायला, बोलायला कोणीही तयार होत नाही. लगेच भावना दुखावल्या जातात. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्यांच्या कार्याचं योग्य मूल्यमापन न करता त्यांची ‘हिंदू धर्मरक्षक’ व ‘मुस्लीमविरोधी हिंदू राजा’ अशी धर्माधारित ओळख जनमानसात कशी रुजली? कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक या प्रश्नाचे उत्तर देते. इतिहासाचे ऐतिहासिक संदर्भावर आधारित तार्किक विश्लेषण कॉम्रेड पानसरे करतात. एका बाजूला शिवाजी महाराजांचा कार्यकाल आणि त्यांचे कर्तृत्व यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांची चुकीची प्रतिमा रंगवून जमातवादी हेतूने विद्वेष, हिंसा व राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या ब्राह्मण्यवादी व शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा खरा चेहरा हे पुस्तक उघड करते. विशिष्ट ‘उच्च’ जातीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी इतिहास लेखन कसे केले जाते, ते स्पष्ट होते. वस्तुस्थितीचा, घटनांचा अनुल्लेख करून, अर्धसत्य वा पूर्ण असत्य मांडणी करून इतिहासाचा गैरवापर केला जातो. कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहासाची नोंद न करणे, वर्ण-जात-धर्माचे महत्व जोपासण्यासाठी व्यक्तींचे उदात्तीकरण करणे ही त्याचीच उदाहरणे आहेत.
अखिल भारतीय हिंदू महासभा, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, जय श्रीराम सेना, भारतीय गोरक्षक दल, दुर्गा वाहिनी या हिंदू संघटना, तसेच इस्लामिक संघटना, इस्लाम-ए-हिंद, मुस्लीम लीग, जमात-ए-इस्लामी व शिवसेना, भारतीय जनता पक्ष, अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) सारखे राजकीय पक्ष भारतात जमातवादी राजकारण करत आले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या डावपेचवादी राजकारणातून जमातवाद वाढला. काँग्रेसचा मुस्लीम अनुनय, अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक राजकारण, डाव्या धर्मनिरपेक्ष शक्तींमधील फाटाफूट, अयोध्या प्रकरण ही काही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. शंबुकाचा वध करणारा, सीतेचा त्याग करणारा आणि चातुर्वर्ण्याचे रक्षण करणारा राम हा संघ परिवाराने धर्मरक्षणासाठी उभा केला आहे. हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यावर नव्या स्वरूपात चातुर्वर्ण्य व पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीचे पुनरुज्जीवन होईल अशी भीती अनेक लोकांना वाटते आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचा हिंसात्मक कृतींतील सहभाग सातत्यपूर्ण राहिला आहे. २००६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्ब स्फोटांची मालिका झाली. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्यासाठी हिंदू अतिरेकी संघटना ‘अभिनव भारत’ ला दोषी ठरवले होते. २००८ मध्ये झालेल्या वाशी, पनवेल व ठाणे येथील बॉम्ब स्फोटासंदर्भात मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. २००९मध्ये गोव्यातील मडगाव येथे सनातन संस्थेचे दोन सदस्य एका बॉम्बस्फोटात जखमी झाले. ते स्कूटरवरून स्फोटक साधने घेऊन जात असताना त्याचा आधीच स्फोट झाला आणि त्यात ते दोघेही मरण पावले. गोवा पोलिसांच्या आरोपपत्रात उल्लेख होता की, २००९मध्ये सनातन संस्थेच्या सदस्यांनी शस्त्रे खरेदी केली होती, शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. लवकरच गोवा,कर्नाटक व महाराष्ट्रात या हिंदुत्ववादी संघटनांचे जाळे पसरले. परंतु बहुतेक प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपींना न्यायालयात शिक्षा झाली नाही. अलीकडेच साध्वी प्रज्ञा सिंग, स्वामी असीमानंद यांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रीयेबाबत आज सर्वसामान्य लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. पुरावे गायब होणे, वकिलांवर दडपण आणणे अशा बाबी माध्यमांतून समोर येत आहेत.
२००२ मध्ये गुजरातमध्ये झालेली भीषण दंगल ही तर राज्य शासन पुरस्कृत दहशतवादी कृती होती. तिथे झालेले मुस्लिमांवरील अत्याचार व मृत्यू याचे स्वरूप आत्यंतिक क्रूरतापूर्ण होते. दंगलींतील असंख्य पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. परिणामी अल्पसंख्याक जमाती भयग्रस्त जीवन जगत आहेत.
भारतातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध व इतर अल्पसंख्याक लोकांना ज्या राजकीय वातावरणात राहावे लागत आहे, ते वातावरण प्रामुख्याने हिंदू धर्माने प्रभावित आहे. त्यामुळे आपण दडपले गेलो आहोत, शोषित वर्गात ढकलले गेलो आहोत, अशी त्यांची भावना झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी प्रथमच मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांचा अभ्यास झाला. त्याच्या निष्कर्षात न्या. सच्चर यांनी असे नमूद केले आहे की, इथल्या बी.सी. समाजापेक्षाही येथील मुस्लिम समाज मागासलेला आहे. ‘मुसलमानांचे लाड होतात’ हा हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचा आरोप खोटा ठरलेला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
समाजातील बहुसंख्य हिंदू जेव्हा जमातवादी, विद्वेषी भावना भडकवून-भडकून हिंसक बनतात तेव्हा मानवता, करुणा विरून जाते. याचे दाहक अनुभव आजही देशातील विवेकवादी आणि निरपराधी अल्पसंख्यांक, दलित, स्त्रिया घेत आहेत. असंख्य मोहसीन, जुनैद, अखलाक, दलित बांधव आणि स्त्रिया हिंसेचे बळी ठरत आहेत. खैरलांजी हत्याकांड, रोहित वेमुला आत्महत्या, उनामधील अत्याचार, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केलेल्या तरुण जोडप्यांच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसा अशा असंख्य प्रकरणांत जातीआधारित मानसिकतेचे क्रौर्य समोर येते. गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या हिंसेतील ८२ टक्के बळी मुस्लीम होते, पण १८ टक्के हिंदूही होते. प्रशासकीय उदासीनता, न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाई व त्रुटी यातून मानवी हक्क, सामाजिक न्याय व समता या तत्त्वाला हरताळ फसला जातो आहे.
जमातवादामुळे समाजातील सहिष्णुता व सहजीवन उद्ध्वस्त होते. सर्वत्र हिंसा व विध्वंस होतो. सामाजिक शांतता आणि राजकीय स्थैर्य धोक्यात येते. कायदा-सुव्यवस्था कोसळून उत्पादन प्रक्रियांना खीळ बसते. अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य व रोजगार या मूलभूत प्रश्नांपासून दूर नेणारे जमातवादाचे, धर्मांधतेचे राजकारण लोकशाही देशासाठी घातक आहे. राजकीय क्षेत्रात संसदीय लोकशाही आणि आर्थिक क्षेत्रात मुक्त बाजारी भांडवलशाहीची परम अवस्था हे प्रतिमान एक विरोधाभास दर्शवते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान एक समतावादी लोकशाही विकसित होण्याची अपेक्षा करते. इथले मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध व इतर अल्पसंख्याक मुख्यतः याच भूमीवरील धर्मांतरीत आहेत. हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेने केलेल्या अनन्वित अत्याचारामुळे हिंदू धर्मातील, विशेषत: अस्पृश्य जमातीने, हिंदू धर्माचा त्याग करून कोणी मुस्लिम, कोणी ख्रिश्चन तर कोणी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे ते सर्व या देशाचे भूमिपूत्र आहेत. तेव्हा या सर्वांना भारत राष्ट्रात समान स्थान असले पाहिजे. भारताची धर्मनिरपेक्ष घटना कायम ठेवूनच ते करावे लागेल. तसेच जो जो भारतीय वंशांचा आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो, त्या प्रत्येकाला इथे राहण्याचा, आपला विकास करून घेण्याचा हक्क आहे.
.................................................................................................................................................................
‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या डॉॅॅॅ. मेघा पानसरे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या दीर्घ प्रस्तावनेचा संपादित अंश.
.................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
लेखिका डॉ. मेघा पानसरे रशियन भाषेच्या अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
megha.pnsr@gmail.com.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment