हे पुस्तक मध्यमवर्गाने ‘हिंदू’चा कसकसा अर्थ लावला यातील मैलाचा दगड ठरेल!
ग्रंथनामा - झलक
डॉ. प्रकाश पवार
  • ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन - एक प्रबोधनात्मक मंथन’
  • Fri , 09 November 2018
  • ग्रंथनामा झलक हिंदू हिंदुत्व आणि हिंदू संघटन Hindu Hindutva Hindu Sanghatan रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन - एक प्रबोधनात्मक मंथन’ हे सामाजिक कार्यकर्ते रा. ना. चव्हाण यांच्या लेखांचं पुस्तक त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी संपादिक केलं आहे. नुकत्याच पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला राजशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार यांनी लिहिलेला ‘परामर्श’...

.............................................................................................................................................

भारतीय समाजकारण आणि राजकारणात भारतीय संकल्पना आणि हिंदू संकल्पना यांच्यामध्ये मोठे वादक्षेत्र उभे राहिले, त्यास दोन शतके पूर्ण झाली आहेत. ‘भारतीय’ म्हणजे काय हा गुंतागुंतीचा प्रश्न १८१८ नंतरच्या मध्यमवर्गीय हिंदू पुढे दिसतो. त्या प्रश्नांची ही एक कथा या पुस्तकाच्या रूपाने रमेश चव्हाणांनी विकसित केली आहे. ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन’ हे पुस्तक रा. ना. चव्हाणांच्या विखुरलेल्या लेखांचे संकलन आहे. यामध्ये मुख्य असे विवेचन पुस्तकाच्या नावामध्ये संपादकांनी आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे सर्व लेख जवळपास स्वातंत्र्योत्तर काळात लिहिले गेले आहेत. परंतु बेळगावच्या ‘राष्ट्रवीर’मध्ये प्रकाशित झालेला लेख स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. तर ‘वादसंवाद’ हा ‘साधना’मध्ये प्रकाशित झालेला लेख नव्वदीच्या दशकातील आहे (१९९२). सर्वसाधारणपणे पाच दशकांमध्ये लिहिलेले लेख आहेत. त्यांची सुरुवात चाळीशीच्या दशकात होते व शेवट जवळपास ऐंशीच्या दशकाच्या शेवटी होतो. चाळीशीच्या दशकामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारत आणि पाकिस्तान असे दोन देश स्वतंत्रपणे अस्तित्वात आले. यामुळे भारताची संकल्पना (Idea of India) नवीन संदर्भात मांडण्यास सुरुवात झाली. हिंदू संकल्पनेपेक्षा वेगळी संकल्पना भारताची मांडली गेली. या पार्श्वभूमीवर आधारीत हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटनविषयक लेखन रा. ना. चव्हाण यांनी केले.  

गेल्या दोन शतकात मध्यमवर्गाने हिंदूंशी संबंधित हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन या तीन संकल्पना मांडल्या. हिंदू संकल्पनेचा पुनर्विचार, पुनर्मांडणी आणि पुनर्व्यवहार गेल्या दोन शतकामध्ये झाला. याबद्दलचे चर्चाविश्व रा. ना. चव्हाणांनी विकसित केले. त्या चर्चाविश्वात मध्यमवर्ग आणि हिंदू या दोन घटकांचे संबंध त्यांनी मांडले आहेत. १८१८ नंतर भारतामध्ये मध्यमवर्ग उदयास आला. त्या मध्यमवर्गाच्या द्विशतकी वाटचालीतील हिंदू संकल्पनेचे विविध कंगोरे या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. मध्यमवर्गाने हिंदू संकल्पनेचा लावलेला अन्वयार्थ या संकल्पनेमधून स्पष्ट होतो. त्यामुळे मध्यमवर्गाची हिंदू दृष्टी, अंतरदृष्टी आणि दूरदृष्टी या पुस्तकामध्ये स्पष्ट झाली आहे. रा. ना. चव्हाणांनी लिहिलेल्या लेखांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. या वर्गीकरणामुळे त्यांचा हिंदूविषयक विचार जास्त अचूक व स्पष्टपणे समजेल.

उदारमतवादी हिंदू

रा. ना. चव्हाणांचे या पुस्तकातील सर्वांत जास्त लेख ‘उदारमतवादी हिंदू’ या प्रकारचे आहेत. या पद्धतीची मांडणी राजा राममोहन रॉय (एकेश्वरी हिंदूवाद), स्वामी विवेकानंद, न्या. म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी इत्यादींनी केली, असे विवेचन रा. ना. चव्हाणांचे दिसते. या मांडणीतून त्यांच्या लिखाणामध्ये उदारमतवादी हिंदूचे तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. त्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये पुढील आहेत.

एक, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य यास विरोध हा उदारमतवादी हिंदूचा एक महत्त्वाचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे. हिंदूचा अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, अशी त्यांची भूमिका दिसते. त्यांनी हिंदूचा सुधारकी अर्थ लावला, त्याचे विवेचन त्यांनी केले आहे. बुद्ध, शिवाजी, तुकाराम, राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, न्या. रानडे, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी यांच्या लिखाणांची त्यांनी या चौकटीमध्ये चर्चा केली.

दोन, समन्वय हे हिंदू परंपरेचे वैशिष्ट्य त्यांनी नोंदवले आहे. म्हणजेच द्वैताच्या ऐवजी अद्वैत अशी त्यांना हिंदूची परंपरा अपेक्षित दिसते. धर्मविद्वेषी विचारांचा त्यांनी प्रतिवाद केला आहे. त्याऐवजी त्यांनी बंधुभाव, विवेकवाद यांचा पुरस्कार केलेला दिसतो.

तीन, हिंदू अशी जीवनप्रणाली स्वीकारूनही धर्मनिरपेक्षता, सहिष्णूता, सर्वधर्मसमभाव अशी मूल्यव्यवस्था उदारमतवादी हिंदूमध्ये दिसते, असे रा. ना. चव्हाणांचे विवेचन आहे. याबरोबरच स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या मूल्यांची हिंदूमधील उत्पत्ती त्यांनी स्पष्ट केली आहे.

चार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि हिंदू यांचा संबंध या प्रकारच्या हिंदू अन्वयार्थामध्ये दिसतो, असे त्यांचे विवेचन आहे. १८१८ नंतरच्या मध्यमवर्गाने या गोष्टीचा पुरस्कार केल्याची उदाहरणे त्यांनी नोंदवली आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माची चिकित्सा करणाऱ्या मध्यमवर्गावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. विज्ञानवादी हिंदूची संकल्पना त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी यामुळे सावरकरांचा सुधारणावाद आणि विज्ञानवाद यांचे समर्थन केले. त्यांचे हे विवेचन साकलिक स्वरूपाचे आहे. विज्ञानाच्या विवेचनांचे सौक्षमिक सूत्र त्यांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टिकोन आणि इतरांचा विज्ञानवादी दृष्टिकोन यांची सौक्षमिक तुलना न होता, केवळ विज्ञानाचे समर्थन त्यांनी केले आहे. सावरकरांच्या उपयुक्ततावादाची चिकित्सक चर्चा मात्र झाली नाही.

पाच, रा. ना. चव्हाणांच्या लिखाणातील हिंदू संकल्पना ही अध्यात्माशी जोडलेली दिसते. त्यामुळे रा. ना. चव्हाणांनी गांधी, गोखले यांच्या अध्यात्माचे समर्थन केले आहे. परंतु हा अध्यात्मवाद सुधारकी दिसतो.

सहा, रा. ना. चव्हाणांच्या दृष्टीने उदारमतवादी हिंदू हा अहिंसा स्वरूपाचा आहे. त्यांना राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, न्या. रानडे, गांधी, गोखले इत्यादींच्या विवेचनात अहिंसक हिंदू दिसतो. ही उदारमतवादी हिंदूची तत्त्वे त्यांनी ऐतिहासिक पद्धतीने शोधली आहेत. त्यामुळे रा. ना. चव्हाण १८१८ च्या मागेदेखील जातात. त्यांनी बौद्ध परंपरा, जैन परंपरा, वारकरी परंपरा, शिवाजी महाराजांची परंपरा यामध्य देखील उदारमतवादी हिंदूचा अर्थ शोधला आहे. त्यांचा संबंध अहिंसेशी जोडला आहे. ही त्यांची संकल्पना व्यापक अशी दिसते. त्यामुळे काही त्यांचे दावे समजून घ्यावे लागतात. त्या दाव्यांना समजून घेतले नाही तर अंतर्विसंगती दिसते.

सात, रा. ना. चव्हाणांनी उदारमतवादी हिंदू संकल्पना आणि राष्ट्रवाद यांची सांगड घातली आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये सुधारणावाद हा विचार उदारमतवादी राष्ट्रवाद म्हणूनही अभिव्यक्त होतो. त्याचे स्वरूप मात्र बहुलतेवर आधारलेले आहे (विविधतेत एकता). म्हणजेच रा. ना. चव्हाणांच्या दृष्टीने उदारमतवादी हिंदू राष्ट्रवाद हा बहुल राष्ट्रवाद आहे. राष्ट्र, राष्ट्रक आणि राष्ट्रवाद या संकल्पनांमधील मानवी मनाची सूक्ष्म स्पंदने, संवेदनशील रा. ना. चव्हाणांनी गृहित धरली आहेत. हा त्यांच्या दृष्टीने साधा व सरळ विचार आहे. हा राष्ट्रवाद युरोपीयन राष्ट्रवादापेक्षा वेगळा आहे. हा राष्ट्रवाद एक भाषा, एक धर्म, एक वंश या संकल्पनांना मान्य करत नाही. या प्रकारचा विचार सध्या सदानंद मोरे मांडतात. तसेच भारतातील विविध विचारवंत आणि लेखक त्याचे समर्थन करतात.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

एकसंघीकरणवादी हिंदू

रा. ना. चव्हाणांचे या पुस्तकामधील काही लेख हे एकसंघीकरणवादी हिंदू या चौकटीमधील आहेत. भोपटकर, मुंजे, सावरकर, हेगडेवार, गोळवलकर इत्यादी मध्यमवर्ग एकसंघीकरणाची हिंदू संकल्पना मांडत होता. हिंदू महासभा, संघ, जनसंघ, भाजप असा संघटनात्मक पसारा आणि एकसंघीकरण यांची वीण त्यांनी स्पष्ट केली. अर्थातच हा हिंदू बहुविविधतेची परंपरा स्वीकारत नाही. बहुलवाद हा या प्रकाराला नकारात्मक विचार मानतो. गेल्या दोन शतकामध्ये या प्रकारचा अर्थ लावला गेला. त्यांचे विवेचन रा. ना. चव्हाणांनी केले आहे. सावरकरांचा समावेश उदारमतवादी हिंदू म्हणून किंवा एकसंघीकरणवादी हिंदू म्हणून करण्याबद्दल अस्पष्टता लिखाणात दिसते. परंतु संघ, जनसंघ, भाजप यांची हिंदू संकल्पना मात्र त्यांनी एकसंघीकरणवादी हिंदू म्हणून स्पष्ट केली आहे.

रा. ना. चव्हाणांना उदारमतवादी हिंदूची वैशिष्ट्ये एकसंघीकरणवादी हिंदूमध्ये दिसत नाहीत. एकसंघीकरणवादी हिंदूची वैशिष्ट्ये पुढील रा. ना. चव्हाणांच्या लिखाणात व्यक्त होतात.

एक, हिंदू जाणीवेचा वर्ण व जात या संरचनात्मक चौकटीत विस्तार. म्हणजेच हिंदू अस्तित्वभान विकसित करण्यावर भर दिसतो.

दोन, हिंदू तत्त्वज्ञानाचा पुरस्कार. हिंदू तत्त्वज्ञानाची अध्यात्माशी सांगड त्यांनी घातली आहे. अर्थातच हा अध्यात्माचा विचार गांधी व गोखले यांच्यापेक्षा वेगळा त्यांनी करून दाखविला आहे.

तीन, हिंदू पासून हिंदुत्वाचा विकास व हिंदुत्वाचा राष्ट्रवादाशी संबंध ही त्यांनी वैशिष्ट्ये मांडली आहेत.

चार, एकसंघीकरणवादी हिंदू संघटन हे हिंदू परिघामध्ये सर्वांचे समावेशन करते. इथे जुळवून घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरते. असे विवेचन सुप्तपणे आले आहे.

अंतरायप्रणीत हिंदू

ऐंशी दशकामध्ये आक्रमक हिंदू ही संकल्पना नवहिंदुत्ववादी संघटनांनी स्वीकारली. शिवसेना ही संघटना आक्रमक हिंदू संकल्पना महाराष्ट्रात मांडते. या संकल्पनेत अंतराय निर्माण करण्यावर भर राहिला आहे (हिंदू-मुस्लीम द्वैत).

रा. ना. चव्हाणांनी आक्रमक हिंदू संकल्पनेची चिकित्सा केली आहे. त्यांनी अंतरायावर आधारलेली हिंदू संकल्पना उदारमतवादी हिंदूविरोधी म्हणून नाकारली. विविध जातसंघटनांचे हिंदुत्व त्यांनी अंतरायावर आधारलेले म्हणून नाकारले. हिंदू एकता आंदोलन, पतितपावन संघटना, श्रीराम सेना, परशुराम सेना, शिवसेना इत्यादी संघटनांचा हिंदू अंतरायावर आधारित हिंदू विचार मांडतो. हा अंतरायप्रणीत हिंदू विचार त्यांना लोकशाही विरोधी, अहिंसा विरोधी, मानवीहक्क विरोधी, नकारात्मक हक्क व स्वातंत्र्य विरोधी वाटतो. रा. ना. चव्हाणांची ही खरी वैचारिक दूरदृष्टी होती.

पर्यायी परंपरा

गेल्या दोन शतकात मध्यमवर्गाने हिंदू अस्मितेला पर्याय शोधला. त्यामध्ये रा. ना. चव्हाणांच्या या लिखाणात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आले आहेत. शिवाय धर्मांतराची चर्चा केली आहे. रा. ना. चव्हाणांनी हिंद चौकटी बाहेरील स्थान मात्र दिलेले नाही. त्यांनी या चिकित्सक परंपरेला हिंदू सांस्कृतिक परंपरेचा भाग संबोधिले आहे. राममोहन, दादोबा व जोतीबा यांनी स्वतंत्रपणे ब्राह्मसमाज, परमहंस, सत्यशोधक समाज स्थापिले. स्वधर्मशुद्धीचा स्वधर्मांतर्गत सत्यशोधनाचा स्वावलंबी मार्ग म्हणून बहुजनांची सत्यशोधक समाज ही प्रोटेस्टंट स्वदेशी चळवळ ठरते. डॉ. आंबेडकर यांनी इतर धर्म न स्वीकारता ज्यांची पितृभू, मातृभू व पुण्यभू हिंदुस्थान म्हणजे भारत आहे असा भारतीय धर्म विवेकाने स्वीकारला. हे जसे हिंदुत्वावर अनेक उपकार झाले, तसेच त्यांच्यापूर्वीचे राममोहन, दादोबा व जोतीबा यांचे हिंदूधर्मावर अनंत कोटी उपकार झाले. रा. ना. चव्हाणांनी त्यांचे स्थान हिंदू म्हणून आडमार्गाने स्वीकारलेले दिसते. अप्रत्यक्षपणे हा मुद्दा त्यांच्या लेखनात येतो. पर्यायी परंपरेची चिकित्सा रा. ना. चव्हाणांनी केली आहे. या परंपरेतील विविध मुद्दे त्यांनी स्वीकारले आहेत.

गेल्या दोन शतकातील मध्यमवर्गाने हिंदूचा लावलेला अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी त्या काळातील सुधारणा चळवळी, दलितमुक्ती चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, हिंदुत्व चळवळ, धर्मांतर चळवळ, आस्तिक धार्मिक चळवळ, वारकरी चळवळ इत्यादी चळवळीचे विवेचन केले आहे. त्यामुळे त्यांचे हे पुस्तक चळवळी आणि हिंदू, तत्त्वज्ञान यांची एकत्र चर्चा करणारे राजकीय विचार आणि चळवळ केंद्रीत आहे.

भारतातील मध्यमवर्गाला दोनशे वर्ष पूर्ण होताना हे पुस्तक प्रकाशित होत आहे. हिंदूकरण, हिंदू राष्ट्र, हिंदू समाज, या संकल्पनांची चर्चा त्यांनी हिंदुत्व परिप्रेक्षापेक्षा वेगळी केली आहे. ही संकल्पना त्यांनी चिकित्सकपणे मांडली आहे. या काळातील बुवाबाजी हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. सत्तरीच्या दशकानंतर विविध बुवा व महाराज यांची वाढ झाली. त्यामध्ये रा. ना. चव्हाणांना खरा हिंदू धर्म दिसत नाही. बाबा व महाराज यांचे प्रस्थ समाजात वाढले. सार्वजनिक संस्था, सहकार चळवळ, राजकीय नेतृत्त्व यांच्याभोवती बुवा व बाबा यांची कुंपणे तयार झाली. त्या पार्श्वभूमीवर रा. ना. चव्हाणांनी बुवांच्या हिंदुत्वाला व हिंदू संघटनाला विरोध केला. अंधश्रद्धा व हिंदू यांचा संबंध तोडण्याचा प्रयत्न रा. ना. चव्हाणांचा होता.

काँग्रेस परंपरेतून गांधी, गोखले यांच्या परंपरेपेक्षा वेगळी परंपरा अध्यात्माची सुरू झाली होती. उदा. काँग्रेस परंपरेतील मल्हारराव देसाई होत. त्यांचा मुलगा दत्ताबाळ देसाई (३ एप्रिल १९४१-३ सप्टेंबर १९८२) यांनी अध्यात्माचा पुरस्कार केला. ही घडामोड नवहिंदुत्वाच्या काळातील होती. श्री दत्ता बाळ मिशन डिव्हाईन या चॅरिटेबल ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. या चौकटीतील हिंदू-हिंदुत्वाची ओढाताण एकसंघीकरण, अंतरायप्रणीत हिंदू यांच्यामध्ये झाली. त्याची चिकित्सा रा. ना. चव्हाणांनी केली. त्यांनी असा धरसोडीचा विचार नाकारला; कारण अशा प्रकारचे अस्पष्ट हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन रा. ना. चव्हाणांना मान्य दिसत नाही.

चव्हाणांची हिंदू, हिंदुत्व व हिंदू संघटन संकल्पना उदारमतवादी होती. तिचा विकास समकालीन काळात सदानंद मोरे, भालचंद्र नेमाडे करत आहेत. अशा प्रकारची मांडणी करण्याची दिशा या आधी यशवंत सुमंतांचीदेखील होती. ही सर्व मांडणी एकसंघीकरण आणि आंतरायवादी हिंदू संकल्पनेशी शत्रूभावी नाते मांडत जाते. त्यामुळे उदारमतवादी हिंदू ही संकल्पना हिंदू चौकटीत राहून हिंदू समाजाची पुनर्रचना समतेवर आधारित करण्याचा आशावाद उराशी बाळगून केलेला एकतत्त्वनिष्ठ प्रयोग ठरतो. ही चौकट रा. ना. चव्हाणांनी आरंभी विकसित केली. या चौकटीमध्ये मोठ्या प्रमाणावर महा डायलेक्टीक्स त्यांनी घडवून आणले. हीच रा. ना. चव्हाण यांची मर्मभेदी दृष्टी या पुस्तकाचा मध्यवर्ती गाभा आहे.

हे तत्त्वज्ञान एकारलेल्या समाजात ओळखण्याची दृष्टी राहिलेली नाही. मात्र ही वडिलांची अचूक दृष्टी रमेश चव्हाण यांनी ओळखली आणि त्या दृष्टीचा त्यांनी विकास केला. त्यामध्ये भर घातली. १९७७ नंतर नवहिंदुत्व हा विचार वाढला. त्या नवहिंदुत्वामधील हिंदू संघटनांची चर्चा चव्हाणांनी केली आहे. गोरक्षण यासारख्या चळवळीची त्यांनी चर्चा केली आहे. विशेष म्हणजे सर्वांत जास्त गुंतागुतीचा विषय रा. ना. चव्हाणांनी सरळ व सोप्या पद्धतीने हाताळला आहे. त्यांची मांडणी अतिव्यापक पद्धतीने रमेश चव्हाण यांनी केली आहे. हे पुस्तक मध्यमवर्गाने हिंदूचा कसकसा अर्थ लावला या वैचारिक घडामोडीतील मैलाचा दगड ठरेल. कारण व्यापक दूरदृष्टी त्यामध्ये व्यक्त झाली आहे.

.............................................................................................................................................

‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक डॉ. प्रकाश पवार शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

prpawar90@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......