अजूनकाही
‘भाजपाचे गांधी’ या पुस्तकाची सुरुवात भारताचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणानं होते. त्यात ते म्हणतात, “भारताच्या यशाची किल्ली ही त्याच्या विविधतेत आहे आणि आपली विविधता हेच आपणास विशिष्ट बनवणारे केंद्र आहे.” आपल्या भाषणाचा शेवट त्यांनी ‘समतामूलक समाज निर्माण करण्याच्या आवाहनानं केला’, जशी कल्पना म. गांधी आणि दीनदयाळ उपाध्यायजी यांची होती, असे ते म्हणतात.
संघानं जरी अपरिहार्य अशा मजबुरीतून गांधीजींना प्रातःस्मरणीय केलं असलं तरी गांधीहत्येच्या आरोपाचं भूत त्यांची पाठ सोडत नाही. सावरकर, गोळवलकर यांना ‘स्वीकारार्ह नायक’ म्हणून स्थापित करता येत नाही आणि गांधींना नाकारता येत नाही अशी कोंडी आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणून दीनदयाळ उपाध्याय या आपल्या वर्तुळाच्या बाहेर फार परिचित नसलेल्या व्यक्तीची एकात्म मानववादाच्या आधारे प्रतिष्ठापना करण्याचा संघाचा प्रकल्प असल्याचं सुभाष गाताडे यांचं म्हणणं आहे.
गांधी हे कधीच संघाच्या एखाद्या नेत्याच्या पंगतीला जाऊन बसू शकत नाहीत. पण संघस्वयंसेवक ते राष्ट्रपती झालेल्या भाजपप्रणित राष्ट्रपतींनी गांधींना त्यांच्या एका स्वयंसेवकाच्या पंगतीला बसवल्याचं स्पष्ट होतं.
बऱ्याच लोकांना दीनदयाळ उपाध्याय कोण होते, याची तसूभरही कल्पना नसेल. संघाच्या क्षेत्राबाहेर व संघविचाराच्या कक्षेबाहेर त्यांचं कुठलंही महत्त्वपूर्ण योगदान नाही. उपाध्याय यांची ओळख, त्यांच्या विषमतेवर आधारीत विचारांची ओळख आणि त्यांना कोणत्या पद्धतीचा समाज निर्माण करायाचा होता, याची माहिती ‘भाजपचे गांधी’ या छोटेखानी पुस्तकातून होते.
सुभाष गाताडे यांचे हे पुस्तक आजच्या असंतोषाच्या, वाढत्या हिंसेच्या काळात, जिथं जागोजागी अशांतता पेरली जात आहे, धार्मिक-जातीय कलह पेरला जात आहे, आभासी ‘आयकॉन्स’ कसे समाजापुढे उभे केले जात आहेत, याची चर्चा करते.
‘एका प्रतीकाच्या शोधात’ या पहिल्या प्रकरणात गाताडे म्हणतात- सध्या प्रतीकांचे राजकारण हे फार मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यात प्रतीकांचा शोध घेताना आपल्या समाजातील, भारतीय लोकशाहीतील ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर प्रतीकं आहेत, त्यांना त्यांनी कायम विरोध केला आहे. भारतीय संविधानाला त्यांचा झालेला विरोध व ‘मनुस्मृती’ हेच आमचे संविधान असे मानून शोषणाधिष्ठित समाजव्यवस्थेचा त्यांनी नेहमी केलेला पुरस्कार, याची चर्चा गाताडे करतात. हिंदू स्त्रियांना कुटुंबात समान अधिकार मिळावा म्हणून आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला संघानं फार मोठा विरोध केला होता. मुळात त्यांचे सर्व नेतेच समतेविरोधात काम करत असताना ते समतामूलक म्हणून आपल्या आयकॉन्सना समाजापुढे कसे आणत आहेत, याविषयीची चर्चा गाताडे यांनी केली आहे. संघ व भाजप कायम दुटप्पी भूमिका घेतात, असे लेखक साधार सिद्ध करतात.
‘नायकांची निर्मिती कशी केली जाते’ या प्रकरणात गाताडे यांनी महत्त्वाची मांडणी केली आहे. गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेला ‘राष्ट्रभक्त’ ठरवून, त्याचे पुतळे उभारून, त्याचं सार्वजनिक ‘गौरवीकरण’ कसं केलं जातं, याची विस्तृत चर्चा आहे. कारण प्रधानसेवक गोडसेच्या प्रतिमेला नमस्कार करताना दिसतात, तेव्हा आपण कोणत्या वाटेनं प्रवास करत आहोत, हा प्रश्न निर्माण होतो. तसंच हिंदुत्ववादी गटांनी केलेल्या दहशतवादी कारवाया असो, त्यांच्यावर हिंदुत्ववादी गटांनी केलेली फुलांची उधळण असो किंवा बाबरी मशिद पाडणाऱ्यांचं केलेलं उदात्तीकरण असो, यांसारख्या घटनांवर गाताडे यांनी साधार प्रश्न उपस्थित केले आहेत.
म. गांधी आणि आंबेडकर यांना संघानं कसं ‘हायजॅक’ केलं आहे, याचंही वर्णन गाताडे करतात. आजकाल तर राष्ट्रीय नेत्यांना ‘हायजॅक’ करण्याची परंपराच संघात निर्माण झालेली दिसते. ‘आंबेडकर आमचेच’ असं जेव्हा संघ म्हणतो, तेव्हा आंबेडकरांनी हिंदू धर्मातल्या वाईट परंपरांना विरोध करून केलेल्या धर्मांतरावर ते काहीच बोलत नाहीत आणि तरीही त्यांना देशाचं हिंदुत्वीकरण करायचं असतं, हे फार घातक आहे असं गाताडे म्हणतात.
सावरकरांच्या संदर्भात गाताडे बरंच भाष्य करतात. तथाकथित देशभक्तीचा उसना आव आणून सावरकरांना ‘देशभक्त’ ठरवणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांना गाताडे संदर्भांसह चपराक लगावतात.
‘दीनदयाळ कथा’ या प्रकरणात त्यांना कसं भाजपनं आपला ‘स्वतंत्र तथाकथित गांधी’ बनवलंय, याचं विस्तृत विवेचन आहे. सुरुवातीलाच गाताडे म्हणतात, ‘भाजपकरता दीनदयाळ उपाध्याय यांचे महत्त्व तितकेच आहे, जितके काँग्रेससाठी गांधींचे.’ म्हणजे भाजप गांधींना व उपाध्याय यांना एकाच पारड्यात बसवतात. यामागचं जे राजकारण आहे, त्याची सखोल माहिती या प्रकरणातून मिळते. उपाध्याय यांचा दुटप्पीपणा एवढा होता की, १९३७ साली देश स्वातंत्र्यासाठी झगडत होता, तेव्हा ते संघाच्या दावणीला बांधले गेले. स्वातंत्र्यापेक्षा त्यांना संघाची दावण चांगली वाटली. जसे आज तथाकथित आंबेडकरवादी सत्तेसाठी भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत.
उपाध्याय यांना आयकॉन बनवण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली जाते. त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले तथाकथित प्रधानसेवक करतात. म्हणजे ज्यांना देशाचा स्वातंत्र्यलढा महत्त्वाचा न वाटता संघाची दावण महत्त्वाची वाटते, ती व्यक्ती आता आपला आयकॉन ठरवला जाणार आहे. आणि हे घडवण्यासाठी सरकार किती वेगवेगळे व घातक उपक्रम राबवत आहे याची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. हे कारस्थान समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणं गरजेचं ठरतं.
हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या जमाती सध्या भारतीय राजकारणात सर्वोच्च ठिकाणी आहेत आणि हेच सर्वांत जास्त घातक आहे. जिथं बुद्ध, गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, फातिमाबा यांनी जन्म घेतला, भारत घडवला, तिथं अशी परिस्थिती निर्माणच कशी होते, असा प्रश्न गाताडे उपस्थित करतात.
ज्यांनी कायम ‘आम्ही विरुद्ध ते’ अशी भूमिका घेतली, तेच या देशात राज्यकर्ते होऊन ‘फक्त आम्हीच’ ही भूमिका घेऊ लागले आहेत. ‘ते’ या घटकाला निर्माणच होऊ द्यायचे नाहीत आणि जरी झाले तरी त्यांना जगू द्यायचं नाही, अशी यंत्रणा आजचं सरकार राबवत आहे. याची ‘अलार्म बेल’ म्हणजे हे पुस्तक.
मूळ हिंदीतून अनुवादित केलेलं हे छोटेखानी पुस्तक संघाची नायकनिर्मिती, अंतर्भूतीकरण शुद्धीकरण या रणनीतीचा आढावा घेतं. उदा. विविध समाजनायकांच्या बाबतीत - जसं की, बाबासाहेब, गांधी यांच्या समायोजनाचा प्रयत्न करणं अथवा दीनदयाळ यांच्यासारख्या नव्या नायकांची निर्मिती करणं. ‘नायक निर्मिती’, ‘दीनदयाळ कथा’, ‘हिंदूच राष्ट्राचे निर्माते’, ‘मुसलमान - एक जटील समस्या’ अशा दहा प्रकरणांतून हे पुस्तक अतिशय सुंदरपणे व तत्कालीन संदर्भांसह साधार मांडणी करतं. या पुस्तकाचा अनुवाद दयानंद कनकदंडे यांनी तितक्याच कलात्मक व ओघवत्या शैलीत केला आहे. ‘मैत्री पब्लिकेशन’नं हा अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देऊन सध्याच्या चालू आयकॉनधिष्ठित राजकारणाबाबत वाचकांची समज वाढवण्यासाठी केलेला स्तुत्य असा प्रयत्न आहे.
............................................................................................................................................
‘भाजपाचे गांधी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
लेखक शेखर चोरघे पुणे विद्यापीठात शिकत आहेत.
shekharchorghe9@gmail.com
............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 15 October 2018
आयला, १९३७ साली भारतात कसली चळवळ चालू होती म्हणायची? इंग्रजांनी १९३५ च्या कायद्यान्वये प्रांतिक निवडणुका घ्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी नेहरूंना लगेच सत्ताप्राप्तीची घाई झाली होती. भले त्यासाठी १९३२ च्या कम्युनल अॅवार्ड चं घोंगडं भिजत पडलं तरी चालेल. काँग्रेसने कम्युनल अॅवार्ड स्वीकारलंही नाही अन नाकारलंही नाही. स्वीकारलं असतं तर दलित उर्वरित हिंदूंहून राजकीयदृष्ट्या वेगळे पडले असते. ते गांधींना मान्य नव्हतं. जर नाकारलं असतं तर इंग्रज सरकारने प्रांतिक निवडणुका घेतल्या नसत्या. मग nehru कसला सत्तेत येतोय! त्याला दोन्ही दगडांवर पाय ठेवायचे होते ना. निवडणुकांची लालूच दाखवून इंग्रजांनी नेहरूंना छानपैकी गप्प बसवलं. या धरसोडीमुळेच दीनदयाळ उपाध्याय बहुधा संघाकडे आकर्षित झाले असावेत. संघाने असल्या तडजोडी अजिबात केल्या नाहीत. ही पार्श्वभूमी गाताड्यांच्या पुस्तकात विशद केली नसेल तर ते पुस्तक अपूर्ण आहे. - गामा पैलवान