तमिळ दिग्दर्शक पा. रंजित यांनी एकदा म्हटलं होतं, “चित्रपटातील पार्श्वपटल (बॅकड्रॉप्स) हे सर्व काही असतं. ते लोकांची कहाणी सांगतं. प्रत्येक पार्श्वपटलाच्या मागे एक कहाणी असते आणि माझं म्हणणं असं आहे की, चित्रपटात त्याचं योगदान फारच महत्त्वपूर्ण असतं.”
अनेक वर्षांपासून बॉलिवुडच्या जातीयवादी दिग्दर्शक-निर्मात्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत एखाद्या अस्पृश्यासारखी वागणूक ठेवली. सुरुवातीचं स्थान तर जाऊ द्या, पण अनेक वर्षं त्यांनी चित्रपटात पार्श्वपटलावरसुद्धा डॉ. आंबेडकरांची प्रतिमा प्रदर्शित होऊ दिली नाही.
१९८२च्या हॉलिवुडमध्ये निर्माण झालेल्या ‘गांधी’ या अभिजात कलाकृतीचं उदाहरण घेऊ या. त्यात कुठेही आंबेडकरांचा साधा उल्लेखही आलेला नाही, तसेच साडेतीन तास चाललेल्या या लांबलचक चित्रपटाच्या दरम्यान त्यांची कुठेही ओझरती आठवणही केली गेली नाही.
भारताच्या इतिहासामध्ये आपण डॉ. आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले कायदा व न्यायमंत्री आणि दलित, उपेक्षित, वंचितांचे आणि महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणारे नेते म्हणून बघतो, पण त्यांचा या चित्रपटात साधा उल्लेखही न होणं ही एक अतिशय आश्चर्यकारक बाब वाटते.
चित्रपटात कोणतंही ऐतिहासिक पात्र दाखवताना त्याच्या प्रमुख विरोधी पात्रांनाही स्थान दिलं जातं. दलितांना मिळालेल्या वेगळ्या मतदारसंघाला गांधीजींनी विरोध केला आणि त्या विरोधात त्यांना आमरण उपोषणाला बसावं लागलं. गांधीजींची सामाजिक-राजकीय-धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता, आंबेडकरांचं मानस त्यांचे प्राण वाचवण्याचंच होतं असं दिसून येतं.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos
..................................................................................................................................................................
दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो यांनी ‘गांधी’ हा चित्रपट जरी हॉलिवुडमध्ये बनवला असला तरी त्यात नेमकं चित्र मांडलं नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकरांचं तैलचित्र स्वातंत्र्याच्या चाळीशीनंतरसुद्धा संसदेच्या केंद्रीय सभागृहामध्ये लागलं नव्हतं. स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकरांना भारतीय चित्रपटांमध्ये येण्यासाठी तर ३२ वर्षं लागली. शाळा-महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांमध्येसुद्धा त्यांचा देशाच्या प्रगतीमध्ये असलेल्या योगदानाचा क्वचितच उल्लेख व्हायचा. यातून भारतातील राज्यकर्त्यांनी नव्वदीच्या दशकापर्यंत वास्तव जीवनामध्ये डॉ. आंबेडकरांना कशी वागणूक दिली हे दिसून येते. आधुनिक भारताच्या निर्मात्याच्या भूमिकेतून डॉ. आंबेडकरांच्या योगदानाकडे भारतातील उच्च जातींनी लक्ष दिलं नाही. हिंदी चित्रपटांमध्ये ते सहज प्रतिबिंबित झालं असतं, मात्र कितीतरी वर्षं त्यांना दूरचित्रवाणी, रेडिओ, दृक-श्राव्य माध्यमांपासून दूर ठेवलं गेलं.
नगण्य प्रतिनिधित्व
हिंदी चित्रपटांमध्ये उच्च जातीच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी उच्च जातीचे अथवा सवर्ण पार्श्वभूमी असलेल्या महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, तसंच स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमांना पार्श्वपटलावर नेहमीच स्थान दिलं आहे.
कधी तरी बॉलिवुडच्या चित्रपटात दलितांच्या संदर्भात एखादं कथानक असायचं, तेही तुरळक प्रमाणात. पण तेथूनही डॉ. आंबेडकरांना गायब केलं जातं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विमल रॉय यांचा ‘सुजाता’ (१९५९) हा चित्रपट. यामध्ये ब्राह्मण नायक अधिर चौधरी (सुनील दत्त) हे एका अस्पृश्य असलेल्या सुजाताच्या (नूतन) प्रेमात पडतात. अधीर हे नव्या विचाराचं स्वागत करणारे. टागोर, गांधी, विवेकानंद याच्या प्रतिमा त्यांच्या घरी आहेत, पण त्यात डॉ. आंबेडकर नाहीत.
तुम्ही येथे पुरोगामी ब्राह्मणांनी आपल्या घरी आंबेडकरांची प्रतिमा ठेवलीच पाहिजे का, असा प्रतिवाद करू शकता. परंतु एक उदाहरण घेऊ या. तपन सिन्हा यांच्या ‘जिंदगी जिंदगी’ (१९७२) या चित्रपटांमध्ये सुनील दत्त यांनी एका अस्पृश्य कुटुंबातील डॉक्टरची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे एक नाही तर दोन आंतरजातीय प्रेम प्रकरणं यात दाखवली आहेत. मात्र इथंसुद्धा डॉ. आंबेडकरांची प्रतिमा अथवा छायाचित्र कुठेही दिसून येत नाही. हिंदी चित्रपटांमध्ये डॉ. आंबेडकरांची प्रतिमा प्रमुख भूमिका करणाऱ्यांच्या घरातून गायब होण्याबरोबरच ते न्यायालयातील भिंती, पोलीस ठाणी आणि सरकारी कार्यालयातूनही गायब होतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
परंतु दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (२०००) या इंग्रजी-हिंदी सुप्रसिद्ध चरित्रपटाने मात्र हे चित्र हळूहळू बदललं. त्यांनी आंबेडकरांचा म. गांधींसोबतचा ‘पुणे करारा’चा प्रसंग दाखवला आणि दोघांच्याही राजकीय विचारांना विशिष्ट शैलीत प्रदर्शित केलं. हा चित्रपट यशस्वी झाला असला तरी वास्तवात तो फारच कमी दिवस सिनेमागृहात चालला. निर्मात्याने या चित्रपटाला विविध भाषांमध्ये रूपांतरीत करण्याची इच्छाही दाखवली नाही. उदा. तमिळनाडूमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास १२ वर्षं सार्वजनिकरीत्या दाखवला गेला नाही. बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट नेण्यासाठी फारसे प्रयत्नही झाले नाहीत.
मराठी चित्रपट उद्योगाशी संबंधित असणारे डॉ. जब्बार पटेल कदाचित पहिले दिग्दर्शक असतील, ज्यांनी आपल्या चित्रपटाच्या पार्श्वपटलावर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा कौशल्यानं वापर केला. याची सुरुवात त्यांनी राजकीयनाट्य असलेल्या त्यांच्या ‘सिंहासन’ (१९७९)पासून केली. योगायोगानं त्याच वर्षी मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने डॉ. आंबेडकरांचे अप्रकाशित लेख आणि भाषणाचे खंड प्रसिद्ध करायला सुरुवात केली.
डॉ. आंबेडकरांसारख्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाची सर्व व्यापकता दाखवण्यासाठी कोणीही चित्रपटाच्या पार्श्वपटलावर प्रतिमेचा असा खुबीनं उपयोग केला नाही. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला आणि स्मिता पाटील यांची भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘उंबरठा’ (१९८२)मध्ये पाटील यांच्या महिला आश्रमातील कार्यालयाच्या भिंतीवर डॉ. आंबेडकरांची फार मोठी प्रतिमा दाखवली आहे. पटेल यांचा आंतरजातीय प्रेमकहाणीवर आधारित पुरस्कार विजेता चित्रपट ‘मुक्ता’ (१९९४)मध्येही डॉ. आंबेडकरांना पुन्हा एकदा पार्श्वपटलावर दाखवलं गेलं.
बसपा एक मोठी राजकीय ताकद
तथापि काही मराठी चित्रपट वगळता १९८५पर्यंत हिंदी चित्रपटात डॉ. आंबेडकरांना पार्श्वपटलाची जागा मिळू शकली नाही. याच काळात उत्तर भारतात कांशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीचा (बसपा) एक मोठी राजकीय ताकद म्हणून उदय झाला.
ही नवी बहुजन लाट डॉ. आंबेडकरांना पुतळ्याच्या स्वरूपात शहरं आणि खेडेगावातील कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ लागली. तसं पाहिलं तर बसपा १९९५पर्यंत औपचारिक स्वरूपात सत्तेत नव्हती. कांशीराम हे ‘दलित-शोषित समाज संघर्ष समिती’ (DS4) आणि ‘बामसेफ’चा एक भाग होते. जे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक नोकरदारांच्या संघटनेचे भाग होते. ते सर्व शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर डॉ. आंबेडकरांची प्रतिमा लावत असत.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
जसजसं बसपाचे वारं मोठ्यानं वाहू लागलं, तसतसा हिंदी सिनेमांमध्ये डॉ. आंबेडकरांचा प्रवेश होऊ लागला. या मुख्य प्रवाहाचा एका पुरावा म्हणजे १९८५मध्ये प्रदर्शित झालेला राजेश खन्ना आणि स्मिता पाटील यांची भूमिका असलेला ‘आखिर क्यो?’ हा चित्रपट. यात स्मिता पाटील यांनी भूमिका केलेल्या निशा शर्मा या शासनाद्वारे प्रसारित केल्या जाणाऱ्या दूरदर्शन नेटवर्कमध्ये कार्यरत असतात. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक जे. ओम प्रकाश हे जन्माने पंजाबी असून त्यांना बहुजन नेता कांशीराम यांच्या कार्याबद्दलची माहिती होती, म्हणूनच कदाचित डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचा यामध्ये खुबीने वापर केला गेला असावा.
१९८९मध्ये राजीव गांधी सरकार गडगडलं. या वेळी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ नावाचा ब्रँड अधिक पुढे नेला आणि संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांची भव्य प्रतिमा लावली गेली. तसेच १९९१ मध्ये डॉ. आंबेडकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला गेला, जो भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान सन्मान आहे. त्यानंतर १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शनने हिंदीमध्ये डॉ. आंबेडकरांवर चरित्र मालिका काढली.
मुख्य प्रवाहात प्रतिनिधित्व
डॉ. आंबेडकर यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची प्रक्रिया संथ आहे, मात्र वर्तमानात हिंदी चित्रपटांमध्ये त्यांची प्रतिमा ही पूर्वीपेक्षा अधिक ठळकपणे दिसून येते.
२०१७ मध्ये भारताचा ऑस्कर प्रवेश झाला. राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटात नायकाच्या घरी भिंतीवर आंबेडकरांची प्रतिमा ठळकपणे आपल्या नजरेत येते. यामध्ये मुख्य भूमिका असलेल्या न्यूटनला दलित व्यक्ती म्हणून दाखवले गेले आहे.
२०१७मध्ये अक्षयकुमार यांच्या ‘जॉली एल. एल. बी. भाग २’ या चित्रपटातील अनेक प्रसंगात डॉ.आंबेडकरांची प्रतिमा न्यायाधीशाच्या कक्षामध्ये गांधीजींच्या उजव्या बाजूला भिंतीवर दिसून येते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘न्यूटन’ (२०१७), ‘जॉली एल. एल. बी. भाग २’ (२०१७), ‘मुक्काबाज’ (२०१७), ‘आर्टिकल फिफ्टीन’ (२०१९), नेटफ्लिक्स सीरिजमधील ‘सॅक्रेड गेम्स’ (२०१८) किंवा त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘रात अकेली है’ (२०२०) यांसारख्या अनेक हिंदी चित्रपट-वेबसिरिजमध्ये आता सातत्याने डॉ. आंबेडकरांची प्रतिमा दाखवली जाऊ लागली आहे.
‘झी इंटरटेनमेंट’वर डॉ. आंबेडकरांवर ‘एक महानायक - डॉ. बी. आर. आंबेडकर’ ही मालिका आली होती. स्टार प्रवाह/हॉटस्टारवरील ‘महामानवाची गौरवगाथा’ या मराठी मालिकेचे अडीचशेच्यावर एपिसोड झालेले आहेत आणि त्या अलीकडे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आहेत. त्याचबरोबर विविध भाषांमध्ये रूपांतरण (डबिंग) आणि प्रक्षेपणही झाले आहे. (नुकतीच ही मालिका संपली आहे.)
दरम्यान मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जब्बार पटेल यांचा सामाजिक संवेदनशीलतेचा वारसा पुढे नेला आहे. ज्यात समकालीन जातीव्यवस्थेतील स्थित्यंतरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. उदा. पुरस्कारप्राप्त ‘फॅन्ड्री’ (२०१३), ‘सैराट’ (२०१६) या चित्रपटातील दृश्य. ‘फॅन्ड्री’मध्ये दलित समाजातील ‘जब्या’ ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेसमोरून मेलेलं डुक्कर घेऊन जाताना दिसतो. त्या वेळी त्याच्या पार्श्वपटलावर डॉ.आंबेडकरांची प्रतिमा दाखवली गेली आहे. भारतीय चित्रपटातील सर्वाधिक मर्मभेदक दृश्य म्हणून ते ओळखलं जातं.
तमिल फिल्म दिग्दर्शक पा. रंजित हे चित्रपटातील दृश्यात मागील भिंतीचा विचारपूर्वक उपयोग करतात. त्यांचा पहिला चित्रपट ‘अट्टाकत्थि’ (२०१२)मध्ये त्यांनी शाळेच्या भिंतीवर डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचा उपयोग करून घेतला. हिंदी रूपांतरीत ‘कबाली’ (२०१६) आणि ‘काला’ (२०१८)मध्येसुद्धा त्यांनी ते दाखवले आहे. रंजित एक पाऊल पुढे जातात आणि आंबेडकर-गांधीजी यांची तुलना करतात. चित्रपटातील एका दृश्यामध्ये दलित-बहुजन ‘जय भीम’ असा नारा देतात, तेव्हा एक पोलीस अधिकारी त्या सभेत सहभागी होतो आणि तो स्वतःला एक दलित म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. ‘काला’ चित्रपटात पहिल्यांदाच बुद्धविहार दाखवला आहे, जो यापूर्वी कोणत्याही भारतीय चित्रपटांमध्ये दाखवला गेला नव्हता.
अधिक बदलाची गरज
अलीकडच्या काळात दलित नसलेल्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांत किंवा जातपात किंवा भेदभाव यांविषयी नसलेल्या चित्रपटांतही आपल्याला डॉ. आंबेडकरांची प्रतिमा पाहायला मिळते - मग ती घराची भिंत असो वा पोलीस ठाणे असो किंवा न्यायालयाचा कक्ष. हे सारं काही डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्राच्या उभारणीसाठीच्या योगदानाचं द्योतक आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
दृक-श्राव्य आणि पॉप्युलर कल्चरमध्ये डॉ. आंबेडकरांचा उदय हा बसपाच्या उदयाशी मिळताजुळता असला तरी आता त्याने वेगळी उंची गाठली आहे. आज कोणताही राजकीय पक्ष डॉ. आंबेडकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही वा त्यांना डावलू शकत नाही. विशेष करून ओबीसी आणि मुसलमानांनीही आता डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार केला आहे.
डॉ. आंबेडकर आता केवळ दलितांचेच प्रेरणास्थान राहिले नाहीत, तर ते बहुजनांचेही प्रतीक झाले आहेत. स्त्री सक्षमीकरण, विद्यार्थी चळवळ आणि त्यापेक्षाही मानवाधिकार आणि लोकशाही मूल्यांचे ते प्रतीक बनले आहेत. राष्ट्रव्यापी नागरिकता विरोधी कायद्याचे आंदोलन ज्या वेळी सुरू होते, त्या वेळी अनेक पोस्टर्स, छायाचित्रं आणि डॉ. आंबेडकरांची पुस्तकं अनेक तरुणांच्या हातामध्ये होती, हे आपण बघितलंच आहे. गांधीवादी इतिहासकार रामचंद्र गुहा यांना जेव्हा बेंगळुरात टाऊन हॉलच्या बाहेर अटक झाली, तेव्हा त्यांच्याही हातात आंबेडकरांची प्रतिमा होती.
या साऱ्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक पा. रंजित यांनी केलेल्या “चित्रपटांत बॅकड्रॉप्सची (पार्श्वपटल) ताकद प्रचंड असते, कारण ते कोणत्याही संवाद व संगीताशिवाय सामाजिक वास्तवाला नेमकं भिडण्याचं काम करतं,” या विधानाला फार महत्त्व आहे.
..................................................................................................................................................................
लेखक रवी रतन हे भारतीय चित्रपट, सामाजिक-राजकीय विषयांवरील स्वतंत्र भाष्यकार आहेत.
अनुवादक : प्रा. प्रियदर्शन भवरे हे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे अध्यापन करतात.
priyadarshan1971@gmail.com
..................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख ‘द प्रिंट’ या पोर्टलवर ९ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment