इंद्रजित भालेराव हा खऱ्या अर्थानं पहिला ‘शेतकरी कवी’ आहे! (पूर्वार्ध)
दिवाळी २०२० - लेख
विनय हर्डीकर
  • इंद्रजित भालेराव आणि त्यांच्या ‘सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ या संग्रहाचं मुखपृष्ठ
  • Tue , 17 November 2020
  • दिवाळी २०२० लेख इंद्रजित भालेराव Indrajit Bhalerao सारे रान Sare Ran शेतकरी संघटना Shetkari Sanghatna शरद जोशी Sharad Joshi विनय हर्डीकर Vinay Hardikar

‘सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ हा संग्रह २०१६मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. तेव्हा नुकतीच भालेराव यांनी वयाची ५१ वर्षं पूर्ण केली होती. त्यानिमित्ताने त्यांच्या तोवर प्रकाशित झालेल्या १० कवितासंग्रहांतील समग्र कविता या नव्या, देखण्या संग्रहात एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन ३१ जुलै २०१६ रोजी परभणीमध्ये समारंभपूर्वक झाले. त्यावेळी पत्रकार, लेखक आणि शेतकरी चळवळीचे एक नेते विनय हर्डीकर यांचं भालेराव यांच्या एकदंर कवितेविषयी भाषण झालं. या भाषणात त्यांनी भालेराव यांच्या कवितेचं सामर्थ्य, वेगळेपण आणि वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्या भाषणाचं हे शब्दांकन...

१.

आजचा कार्यक्रम कौतुक करण्याचा आहे. विनय हर्डीकर बोलणार म्हणजे बोळकांडीमध्ये डायनॉसॉरस शिरला तर धडाधडा घरं कोलमडून पडतात तसं काही घडेल अशी अपेक्षा आज कोणी ठेवू नये. कौतुक इंद्रजितचं आहे. इंद्रजित भाग्यवान आहे! शिवाजीच्या दोन जन्मतारखा होत्या, तशा इंद्रजितच्याही आहेत! इथं बोलताना शरद जोशींची आठवण अपरिहार्य आहे. जिवंतपणी ‘समग्र’ प्रकाशित होण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं. कवितेत बोरकरांनंतर ते इंद्रजितला लाभलं. राजकारणात असे लोक आहेत, जे जिवंतपणी स्वतःचे पुतळे उभे करतात. परंतु साहित्यामध्ये जिवंतपणी ‘समग्र’ हे मोठं भाग्य आहे.

शरद जोशींची आठवण अशा कारणानं झाली की, त्यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त काय करावं अशी चर्चा चालली होती. तेव्हा शरद जोशी नाटकी कळकळीच्या आवाजात म्हणाले, ‘काहीही करा, पण माझे चौकात कटआउटस् लावू नका.’ मग अर्थातच लोक म्हणाले की, साहेबांची पुस्तकं पुन्हा प्रकाशित करूया. त्यांचा एक सेट करू या. त्याची एक योजना करूया. त्या वेळी शरद जोशी पुन्हा म्हणाले, “समग्र शरद जोशी’ला अजून वेळ आहे!’ तसं असतानासुद्धा इंद्रजितची समग्र कविता आली हे चांगलं झालं.

अजून एक पार्श्वभूमी अशी की, आठ-दहा वर्षांपूर्वी इथं जवळाबाजारला एक कार्यक्रम होता. त्यात इंद्रजितचा सत्कार होणार होता. त्याला शंकरराव चव्हाण आणि शरद जोशी म्हणजे (त्यांचे राजकीय संबंध लक्षात घेता) अक्षरशः सापा-मुंगसाची जोडी व्यासपीठावर असणार होती आणि संयोजकांनी इंद्रजितला सांगितलं की, तुमच्यावर कोणी बोलायचं ते तुम्ही ठरवा. तेव्हा इंद्रजितने मला सांगितलं, ‘तुम्ही माझ्यावर बोलायचं आहे.’ मी म्हटलं की, हे दोघं आणि कविता हा विषय हेच मला इतकं विजोड वाटत आहे की, मी काही या कार्यक्रमाला येणार नाही. तुझ्या कवितेवर मी योग्य वेळेला परभणीतच बोलेन. त्यामुळे श्रीकांतने हे पुस्तक पाठवल्याबरोबर मी त्याला कळवलं की, हा कार्यक्रम आपण करूया. तो आम्ही एप्रिलमध्ये करणार होतो. पण एप्रिलमध्ये तुमच्या तोंडचं ‘पाणी’ पळालेलं होतं. म्हणून मी संयोजकांवर मेहेरबानी केली आणि म्हटलं की, आता नको. पण त्यामुळे इंद्रजितला पुण्याच्या एका पुरस्काराला मुकावं लागलं. तो त्याला पुढच्या वर्षी मिळेल अशी अपेक्षा ठेवूया.

शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांना काय आणि किती दिलं हा स्वतंत्र विषय आहे. पण मला मात्र भरभरून दिलं. आणि काही वेळा मी हिसकावूनही घेतलं. परभणीला मी आधी पत्रकार म्हणूनही आलो होतो, मित्रांच्या घरी आलो होतो. परभणी, शेतकरी संघटना, उमरीकरांचं घर; आणि मी परभणीत आलोय, हे कळल्यावर हजर होणारा इंद्रजित असं हे ८६ सालापासून चालू आहे. इंद्रजित जर परभणीत असला तर मी ज्या दिवशी इथं येतो, त्या दिवसापासून मी पुन्हा परभणी सोडेपर्यंत तो (त्याचे कॉलेजचे तास सोडून) माझ्या ताब्यात असतो, असं म्हणायला हरकत नाही.

दुसरं कौतुक करायचं आहे ते श्रीकांतचं. इंद्रजितचं पुस्तक देखणं झालेलंच आहे. पण नुकतीच शेक्सपियरची चारशेवी मृत्युशताब्दी साजरी झाली. आणि सबंध महाराष्ट्रातून शेक्सपिअरवर फक्त दोन पुस्तकं प्रकाशित झाली. आणि ती दोन्ही जनशक्ती वाचक चळवळीची आहेत, याचा मला अत्यंत अभिमान आहे. श्रीकांतला शेक्सपिअरसंबंधी आवड निर्माण व्हायला मीही थोडाफार कारणीभूत आहे, हे श्रीकांतला मान्य आहे आणि ते खरंच आहे. 

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

औरंगाबादच्या इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापक लता मोहरीर यांचं ‘शेक्सपियर आणि मराठी नाटक’ हे एक अत्यंत जबरदस्त अभ्यासपूर्ण पुस्तक काढलेलं आहे. तेही या पुस्तकाइतकंच देखणं आहे. शेक्सपिअरच्या सगळ्या नाटकांच्या कथा पाच खंडांमध्ये मराठीत आणण्याचं कामही श्रीकांतने केलेलं आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम या दोघांचं कौतुक करण्याचा आहे. ही पुस्तकं देखणी झालेली आहेत. परवा माधव वझेनेही परीक्षणात असा उल्लेख केला आहे की, मुद्रणदोष नसते तर ही पुस्तकं अजून सुंदर झाली असती. तेव्हा श्रीकांतने यापुढे महत्त्वाचं पुस्तक असेल तर निदान एक प्रूफ मला वाचायला द्यावं असं मी त्याला सांगतो. कारण अशी कामं पुन्हा होत नाहीत. चारशे-साडेचारशे पानांची दोन पुस्तकं एका महिन्यामध्ये काढायची यात फार मोठी गुंतवणूक असते. आणि ती पुन्हा पुन्हा करता येत नाही. गंभीर मराठी पुस्तकांचा खप लक्षात घेता ती गुंतवणूक वसूल व्हायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपण जे काम करू, ते उत्कृष्टच झालं पाहिजे. ही जागरूकता एक प्रकाशक म्हणून श्रीकांतने ठेवली पाहिजे.

२.

१९८६-८७ मधली गोष्ट आहे. त्या वेळेला ‘इंडियन एक्सप्रेस’मधली नोकरी सोडून मी नुकताच शेतकरी संघटनेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उपलब्ध झालेलो होतो. त्यावेळचा शिरस्ता असा होता की, शरद जोशी जाऊ शकत नसतील तर ज्या माणसांनी जायचं आहे, अशी चार-पाच माणसांची यादी असायची. त्याच्यामध्ये माझं नाव असायचं. त्यासंदर्भात मी परभणीला आलेलो होतो. मराठी साहित्यावर एका कॉलेजमध्ये बोला, असं मला अनंतरावांनी सांगितलं. मी नेहमी म्हणतो की, माझं थोडंसं ‘विठाबाई’सारखं आहे. मी एखाद्या गावी गेलो की, जितक्या ठिकाणी नाचवतील तितक्या ठिकाणी मला पायात चाळ बांधून नाचावं लागतं! मघाशी श्रीकांतने त्याचा उल्लेखही केला. अनंतराव म्हणताहेत म्हणजे जायला पाहिजे.

ते ‘ज्ञानोपासक’ नावाचं कॉलेज होतं. तिथं मोठी बरॅकवजा लांबलचक जागा होती. त्यात खच्चून मुलं भरलेली होती. तेव्हा माझं वय ३७-३८ होतं. आणि तिथं २४-२५ वर्षांच्या, पाणीदार डोळ्यांच्या एका गोऱ्यापान तरुण (मराठवाड्यात गोरा रंग किती दुर्मीळ आहे, हे बाहेरच्या माणसाला जास्त जाणवतं!) प्राध्यापकाने माझी ओळख करून दिली. ओळख ठीक करून दिली. योग्य ओळख करून घ्यायलासुद्धा वक्त्याला भाग्य लागतं. नाहीतर लोक तुमच्या नावावर काय वाटेल ते ठोकून देतात. पण ती सत्य ओळख होती.

इंद्रजितच्या सुदैवानं माझं त्या वेळेला एकच पुस्तक आलं होतं. त्या पुस्तकाचा त्याने चांगला परामर्श घेतला आणि विनय हर्डीकर बोलायला उभे राहिले. माझ्या पहिल्याच तिरकस वाक्याला त्याचा एवढ्या मोठ्यानं प्रतिसाद मिळाला की, माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. मी असं म्हटलं होतं, “गाव सोडलं की, निसर्ग सुरू होतो आणि तिथं लोक नैसर्गिक क्रिया करत असतात.” असं म्हटल्याबरोबर सगळ्यात मोठ्यानं जे हास्य ऐकू आलं, त्याच्यामुळे हा चावट माणूस माझ्या लक्षात राहिला. माझा चावटपणा त्याच्या हृदयाशी जाऊन भिडला! आणि त्यानंतर जे जे मार्मिक किंवा महत्त्वाचं वाक्य असेल त्याला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद येत होता. मुलांना ते किती समजत होतं मला माहीत नाही, पण भालेराव सर हसले की, मुलं हसत होती (आणि भालेराव सरांना किंवा मला हसत नव्हती) आणि भालेराव सरांनी टाळ्या वाजवल्या की, मुलं टाळ्या वाजवत होती; भालेराव सरांनी ‘व्वा’ म्हटलं की, मुलं ‘व्वा’ म्हणत होती. मी म्हटलं हा भालेराव सर आपल्याला पाहिजे! आपल्याला या भागात पुन्हा पुन्हा यायचं आहे. कॉलेजेसमध्ये जायचं आहे. मग त्याची जास्त ओळख झाली.

इंद्रजित भालेरावचं कविता लेखन ९० सालानंतर सुरू झालं. पण त्या वेळी त्याच्या मनात कविता घोळायला सुरुवात झालेली असणार. या प्रसंगापासून जी सुरुवात झाली, त्याला आता जवळजवळ ३० वर्षं झाली. आमच्यातला हा संवाद अतिशय उत्कट आणि अतिशय हृद्य आहे.

इंद्रजितचं आणि माझं नेमकं नातं काय आहे? कधी मला तो धाकट्या भावासारखा वाटतो. कधी मला तो मराठीतला एक महत्त्वाचा कवी वाटतो. कधी मला तो हल्ली फारच सुस्तावला आहे, सुखासीन झाला आहे असंही वाटतं. मग मी त्याला काहीतरी टोमणे मारतो, खरवडतो. कधी कधी मला तो उगीच भलत्यासलत्या काळज्या करत बसला आहे, असं वाटतं. अजूनही इंद्रजितकडून जे सर्वोत्कृष्ट किंवा सर्वश्रेष्ठ अपेक्षित आहे, ते आलेलं नाही, असं असमाधान कधीकधी मला त्याच्याबाबतीत वाटतं.

३.

कधीकधी मी त्याला रागावलेलो आहे. उदाहरणार्थ, सहा वर्षं रोज त्याला जिंतूरला जावं लागत होतं. मराठी लेखक आणि विशेषतः कवी यांची हृदयं नाजूकच असतात. ते कशाला संकट म्हणतील आणि कशाला नाही याचा काही नेम नसतो. इंद्रजितने आता आपल्यावर अस्मान कोसळून पडलं आहे, असा चेहरा केलेला होता. (जिंतूरचं ते कॉलेज फार सुंदर आहे. तिथं माझा एक कार्यक्रम झाला, त्या वेळी मला हे लक्षात आलं.) तेव्हा मी त्याला म्हटलं, ‘तू मुंबई, हैदराबाद, बंगलोर इथं राहणाऱ्या लोकांचा विचार कर ना! कर्जत-डोंबिवलीपासून रोज माणसं ‘व्हीटी’ला जातात आणि परत येतात. आणि मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतात.

मर्ढेकरांनी म्हटलं आहे,

या नच मुंग्या हीच माणसे

आणि

दहा दहाची लोकल गाडी

सोडित आली पोकळ श्वास

घड्याळयातल्या काट्याचा अन

सौदा पटला दीन उदास

असं जगणारी माणसं इतकं सोसून हसतमुख असतात आणि इथं तर तुझी सगळीकडे ओळख आहे. भालेराव सर गाडीत आहेत म्हटल्यानंतर ड्रायव्हरसुद्धा - तुला ड्रायव्हिंग येत असेल तर - तुला आपली जागा देईल. हे सोसावंच लागतं. आणि बहिणाबाईनेच सांगितलं आहे ना बाबा तुला?

हास हास माझ्या जीवा असा प्रपंचात हास

डापीडा संकटाच्या तोंडावरी काळं फास

मग आठवड्यातून पाच-सहा दिवस जिंतूरला अप-डाऊन करावं लागतं याचं इतकं वाईट वाटून घेऊ नको.’ खूप माणसांना हे सहन करावं लागतं. असे काही वेळेला रागवण्याचेही प्रसंग आमच्यामध्ये येऊन गेले. 

..................................................................................................................................................................

मी प्रश्न विचारला, “या कविता लिहायला तुम्हाला किती वेळ लागला?” ते सगळे नौजवान, चुस्त फुर्तिले कवी! त्यांना वाटलं हा कुणीतरी गद्य माणूसच आहे. ते म्हणाले, “वेळ कसला लागतो? स्फूर्ती आली की, राहवतच नाही.” मी त्यांना म्हटलं, “इथंच घोटाळा होतो आहे. या तुमच्या कविता नाहीत. हे कवितेचं ‘रॉ मटेरियल’ आहे. आणि या ‘रॉ मटेरियल’वर तुम्ही शांतपणे बसून नीट प्रक्रिया केली असती तर यातल्या काही मटेरिअलच्या चांगल्या कविता झाल्या असत्या.” असं म्हटल्यावर तिथेच बॉम्बच पडला! ते म्हणाले, ‘असा प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता?कवीचं काही आविष्कारस्वातंत्र्य वगैरे...” (आविष्कार हा मोठा शब्द आहे बाबांनो! ‘ट’ला‘ट’ आणि ‘री’ला‘री’ जुळवलं म्हणजे काही आविष्कार होत नाही!) अर्धा तास तरी मी शिव्या खाल्ल्या तिथं.

..................................................................................................................................................................

इंद्रजित उमदा आहे आणि बेरकीही आहे. एकाच प्रसंगात त्याने हे दोन गुण मला दाखवून दिले. बेरकीपणा हा मी गुणच समजतो. तो आवश्यक आहे. बावळट माणसाला लोक विकून खातील! इंद्रजितला एकदा गोव्याला जायचं होतं. गोव्यामध्ये धारगळ नावाचं एक गाव आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर ते आहे. गोव्यातले सगळे कार्यक्रम देवळांमध्ये होतात. तिथं ख्रिश्चनांच्या कार्यक्रमांसाठी थिएटर्स आणि हॉल असतात, पण हिंदूंचे सगळे कार्यक्रम देवळांमध्ये होतात. गोव्यातली देवळं ही देशातल्या सगळ्यात स्वच्छ, सुंदर आणि देखण्या देवळांमधली आहेत. तुम्ही देवासमोर काही ठेवत आहात की, नाही याचा पहारा करणारे, पंढरपूरसारखे आशाळभूत पुजारी तिथं नसतात! पण जिथं पुजारी नाही, तिथंही देऊळ स्वच्छ असतं.

धारगळला महालक्ष्मीचं एक देऊळ आहे. तिथं दरवर्षी एक शेकोटी साहित्य संमेलन भरतं. खरं तर तिथं येणाऱ्या कवितांचा दर्जा असा असतो की, दोन-चार कवींनाच त्या शेकोटीत टाकावं. इंद्रजित म्हणाला, “मला गोव्याला जायचं आहे आणि मला रस्ता माहीत नाही. मागच्या वेळेला कोल्हापुरातून बाहेर पडता पडता माझी पंचाईत झाली होती. त्यामुळे तुम्ही सोबत याल का? मी गाडी घेऊन येतो आहे.” मी मोकळा होतो. त्यामुळे ‘हो’ म्हणालो. सुरुवातीलाच त्याने मला मराठवाडी हिसका दाखवला. मी त्याला म्हटलं होतं की, सात वाजता तू एस. पी. कॉलेजपाशी ये. तो फर्ग्युसन कॉलेजपाशी जाऊन थांबला होता. मी पावणेसातला एस. पी. कॉलेजपाशी जाऊन उभं राहिलो. त्या वेळेला दोघांकडेही मोबाईल नव्हता. त्याने कुठून तरी घरी फोन केले. आता चार-पाच दिवस कटकट नाही म्हणून बायको आनंदानं साखरझोपेत असताना याचे फोनवर फोन! शेवटी बायको एस. पी. कॉलेजपर्यंत पळत पळत आली आणि मग एकदाची आमची गाठ पडली. मैत्री म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? सोसावं लागतं पुष्कळ!

आम्ही गोव्याला गेलो. तिथं भालेराव हे प्रमुख पाहुणे. आम्हाला कोण ओळखतं? त्यांना वाटलं एक-दोन दत्तू असतातच प्रमुख पाहुण्यांसोबत. त्याच्यातला हा थोडा सीनियर दत्तू दिसतो आहे. माझ्याकडे कोणाचंही लक्ष नाही. भालेराव सरांचा सत्कार झाला, भालेराव सरांचं स्वागत झालं. आणि त्यांनी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरू केला. संध्याकाळी शेकोटी पेटवली की, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, म्हणजे अक्षरशः ती शेकोटी विझेपर्यंत (कवितांच्या गोंगाटानं) ते कवितावाचन चालू ठेवतात. मग दुपारी जेवणानंतर प्रमुख पाहुण्यांचं भाषण होतं, आणि महाराष्ट्र शारदेच्या सुदैवानं ते संमेलन विसर्जित होतं.

निवेदकानं ओळख करून दिली आणि एकेक कवी आपापल्या कविता वाचायला लागले. त्या कविता ऐकताना वाटत होतं, वैऱ्यावरही अशी पाळी येऊ नये! साताठ कवी झाल्यावर संयोजकांनी एक घोडचूक केली. ते म्हणाले, “इतक्या छान कविता या सगळ्या कवींनी वाचल्या. आता श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारावेत.” म्हणजे त्यांनी अक्षरशः सापाला डिवचलं!

हल्ली मी एक चांगली रणनीती आखली आहे. माझ्याकडे तरुण पोरं येतात आणि म्हणतात, ‘तुम्ही कविता वाचता का?’ मी म्हणतो, ‘हो, पण मी फक्त मेलेल्या कवीच्या कविता वाचतो.’ (कारण ते अभिप्राय विचारायला येत नाहीत.) फुग्याला टाचणी लागली किंवा फुगा फुगवून गाठ न मारता सोडून दिला तर तो जसा कुठेतरी वेडावाकडा जाऊन पडतो, तसा त्या कवीचा चेहरा होतो. पण मलाही स्वतःचा बचाव केला पाहिजे. गावोगावी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलं की, साताठ कवितासंग्रह भेट मिळतात. मग मी ती पिशवी कार्यक्रमाच्या ठिकाणीच विसरायचा प्रयत्न करतो. पण तिथला शिपाई जर भयंकर कार्यक्षम असेल तर तो ती पळत पळत आणून देतो. मग मी ती गाडीत विसरायचा प्रयत्न करतो; ड्रायव्हर आणून देतो. मग मी ज्यांच्या घरी उतरलो असेल तिथं प्रयत्न करून पाहतो; तेही आणून देतात. लॉजवर उतरलो असेल तर अटेंडंट आणून देतो. एसटीमध्ये तर कुणी तुम्हाला पिशवी विसरूच देत नाही. असं करत करत ती पिशवी घरी आलीच तर मी एके दिवशी त्याच्यावरचं ‘यांना सप्रेम भेट’ लिहिलेलं पान फाडतो आणि एखाद्या ग्रंथालयाच्या दारात, आपल्याला कुणी पाहत नाही ना याची खात्री करत, ठेवून येतो. सध्या जो कवितांचा भडिमार चालला आहे, माझ्या मते त्यातल्या ९० टक्के ‘कविता’च नसतात!

मी प्रश्न विचारला, “या कविता लिहायला तुम्हाला किती वेळ लागला?” ते सगळे नौजवान, चुस्त फुर्तिले कवी! त्यांना वाटलं हा कुणीतरी गद्य माणूसच आहे. ते म्हणाले, “वेळ कसला लागतो? स्फूर्ती आली की, राहवतच नाही.” मी त्यांना म्हटलं, “इथंच घोटाळा होतो आहे. या तुमच्या कविता नाहीत. हे कवितेचं ‘रॉ मटेरियल’ आहे. आणि या ‘रॉ मटेरियल’वर तुम्ही शांतपणे बसून नीट प्रक्रिया केली असती तर यातल्या काही मटेरिअलच्या चांगल्या कविता झाल्या असत्या.” असं म्हटल्यावर तिथेच बॉम्बच पडला! ते म्हणाले, ‘असा प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता?कवीचं काही आविष्कारस्वातंत्र्य वगैरे...” (आविष्कार हा मोठा शब्द आहे बाबांनो! ‘ट’ला‘ट’ आणि ‘री’ला‘री’ जुळवलं म्हणजे काही आविष्कार होत नाही!) अर्धा तास तरी मी शिव्या खाल्ल्या तिथं.

त्यानंतर प्रमुख पाहुणे भालेराव सर यांना आपल्या मित्राची दया आली. ते म्हणाले, “प्रश्न कोण विचारतं आहे, ते तुम्हाला माहीत नाही. हे विनय हर्डीकर आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे चार-पाच अध्यक्ष एका पारड्यात (खरं म्हणजे हासुद्धा माझा अपमानच आहे!) आणि विनय हर्डीकर दुसऱ्या पारड्यात ठेवले तर हर्डीकरांचं पारडं खाली राहील.” तिथं सन्नाटाच पसरला. आता हा हर्डीकर आणखी काय ऐकवतो कोण जाणे! तिथून पुढे ते संमेलन संपेपर्यंत, (एकट्या इंद्रजितचा अपवाद) सगळे कवी दबकत दबकत यायचे (आणि मला आसुरी आनंद व्हायचा, हे मी कबूल करतो!) आणि प्रत्येकाचं पहिलं वाक्य असायचं, ‘हे रॉ मटेरियल आहे की, कविता आहे, ते मला माहीत नाही. पण मी ‘मनापासून’ (हासुद्धा फार डेंजरस शब्द आहे) लिहून आणलं आहे, तर मला सादर करू द्यावं.’

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

गोव्याचे माजी मंत्री गोपाळराव मयेकर मला म्हणाले, “हर्डीकर, काय करून ठेवलंत? हे सगळे आपण व्यास-वाल्मिकी आहोत, अशा समजुतीत कालपर्यंत होते.” पण इंद्रजितच्या उमदेपणाचा पुरावा असा की, त्याने त्यांना सांगितलं, “हर्डीकरांच्या दृष्टीनं मर्ढेकरांच्या निम्म्या कविता ‘रॉ मटेरियल’ आहेत आणि माझ्या ८० टक्के कविता कदाचित (हा शब्द मी वापरतो आहे, पण त्याने वापरला नव्हता) रॉ मटेरियल असतील.’

प्रमुख पाहुण्यांनीच मला असा फ्री पास दिल्यावर मग मीही झाला एवढा विध्वंस पुरे झाला असं म्हणून आवरतं घेतलं. (हा माझाही उमदेपणा!) पुढे पाच वर्षांनी मी मडगावला व्याख्यानाला गेलो होतो. तिथं व्यवस्थित सुस्थितीतला एक माणूस माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मला म्हणाला, ‘ओळखलं का?’ मला आठवायला एक मिनिट लागलं. मग मी म्हटलं, ‘धारगळ ना? शेकोटी साहित्य संमेलन?’ तो मोठमोठ्यानं हसायला लागला. मी म्हटलं, ‘सध्या काय चालू आहे?’ तो म्हणाला, ‘रॉ मटेरियल नाही, कविता नाही. त्या दिवसापासून आपण लिहिणंच बंद केलं.’ मी म्हटलं, ‘महाराष्ट्र सारस्वताच्या वतीनं मी तुझा ऋणी आहे.’

हा झाला इंद्रजितच्या उमदेपणाचा पुरावा; बेरकीपणाचा पुरावा असा की, त्याने आजतागायत मला पुन्हा कधीही आपल्या बरोबर नेलेलं नाही. या बेरकीपणाचंही स्वागत आहे, तोही मला तितकाच आवडतो.

४.

इंद्रजितच्या उमदेपणाचं आणखी एक उदाहरण सांगतो. मी कुठे गेलो की, तिथल्या माझ्या काही मित्रांना वाटतं की, ह्याचं व्याख्यान आपल्या इथं झालं पाहिजे. आणि काही वेळा मला त्यांना ‘नाही’ म्हणता येत नाही. इंद्रजितच्याच कॉलेजमध्ये त्याने एकदा मला बोलायला सांगितलं. मी काही ‘सांबार’पंथी नाही. महाराष्ट्रात असे काही वक्ते आहेत, ज्यांचा विषय कोणताही असो, आशय तोच असतो. या आशयाला मी ‘सांबार’ म्हणतो. आणि हे सगळे फार मोठे वक्ते आहेत. सुदैवानं त्यातले काही गेले. ते विचारायचे, ‘तुमच्या गावी बोलायचं आहे? मागच्या वेळी मी गांधींवर बोललो होतो का? यावेळी विनोबा घ्या.’ किंवा ‘मागच्या वेळी मी रामावर बोललो होतो का? आज कृष्ण घेऊ’. किंवा उदाहरणार्थ, सावरकर आणि एखादा हिंदुत्ववादी विचारवंत’ अशा जोड्या घेतल्या की, जास्त काम करावं लागत नाही. तिकीट काढून या माणसाचं व्याख्यान एकदा ऐकल्यावर एका गावची माणसं दुसऱ्या गावी येण्याची शक्यताही नसते. त्यामुळे यांची रॅकेटस चालू राहतात. माझ्याकडे असे तयार विषय नसतात. आणि हल्ली कॉलेजमध्ये करमणूकप्रधान कार्यक्रमांचाच धुमाकूळ चालू असतो. तिथं टीव्हीवरचे स्टार्स बोलावतात. त्यात मुलांची काही चूक नाही. त्यांना ग्लॅमरचं, दृश्य प्रतिमांचं आकर्षण आहे, देखण्या व्यक्ती पाहायला त्यांना आवडतात.

देखणे ते चेहरे

जे प्रांजळाचे आरसे

सावळे वा गोरटे

त्या मोल नाही फारसे

अशी बोरकरांची सुंदर कविता आहे. पण हे कळण्याचं त्या मुलांचं वय नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की, मला त्यांच्यासमोर कशाला न्यायचं? पण तरी मी ‘हो’ म्हटलं. ‘कवितेतला पाऊस’ या विषयावर मी बोलायचं ठरवलं. रामायणाल्या किष्किंधा कांडात ‘वर्षावर्णन’ असा सर्ग आहे, तिथून सुरुवात करून मी आधुनिक कवितेपर्यंत आलो. आणि शेवटी म्हटलं, ‘आता भालेराव सरांनी त्यांची एखादी पावसावरची कविता आम्हाला ऐकवावी.’ त्यावर इंद्रजित मला म्हणाला, ‘पावसावर माझ्या फारशा कविताच नाहीत.’ मला पहिला धक्का तिथं बसला. ही घटना घडली तेव्हापर्यंत इंद्रजितच्या दोन-अडीचशे कविता आलेल्या होत्या. आमच्याकडे ‘गडद गडद निळे’ ढग कवीच्या कल्पनेत जरी आले तरी कविता ‘पाडायला’ सुरुवात होते. निसर्गातला पाऊस थांबेल, पण कवितांचा पाऊस थांबत नाही. मंगेश पाडगांवकरांसारख्या कवीची पावसावरची कविता सात जूनला लिज्जत पापडच्या पुरस्कारानं येणार म्हणजे येणार! त्याचं पुलंनी फार चांगलं विडंबन लिहिलं होतं,

येता आषाढु आषाढु

लागे पावसाची झडु

आले मनात माझिया

आपणही गीत पाडु

अशा त्या सगळ्या कविता असतात. मला आठवतं त्याप्रमाणे (धक्का बसू देऊ नका) मीही पहिली कविता पावसावरच लिहिली होती. असा एकही मराठी कवी मला माहीत नाही, ज्याने पावसावर कविता लिहिलेली नाही. उन्हाळ्यावर, हिवाळ्यावर कमी कविता लिहिल्या जातात. पण प्रत्येक कवीनं पावसावर कविता लिहिलीच पाहिजे अशी मराठी कवितेत काहीतरी जणू काही सक्तीच आहे. ‘ये रे ये रे पावसा’सारख्या बालगीतांमुळे ‘पाऊस’ हा कवितेचा विषय आहे, असे संस्कार लहानपणापासूनच आपल्यावर होत असतात.

इंद्रजितने मला सांगितलं, ‘पावसावर माझी एकच कविता आहे; पण ती अवकाळी पावसावर आहे.’ शेतकऱ्यानं जमवलेलं सगळं आता तो विस्कटून टाकेल अशा काळजी त्या कवितेत आहे. मी महाराष्ट्रभर फिरलेलो आहे, ‘पाऊस आणि कविता’ या विषयावर दोन तास बोलण्याइतकी माझी तयारी आहे; पण पावसावरची अशी कविता मी वाचलेली नाही.

आलं आलं हे आभाळ नाही वारं-वावधान

वऱ्ही बसलंय्‌ हाटून खात्री फुलोऱ्यात धान

आलं आलं हे आभाळ आलं काळोख्या वानाचं

आता करील वाटोळं फुलावरल्या धानाचं

आलं आलं हे आभाळ आता पाडील इघीनं

जव्हा यावं तव्हा नाही आलं एवढ्या बिगीनं

आलं आलं हे आभाळ आता धुरडली तूर

माकोडला झाडपाला खाल्ली लागला उकीर

आलं आलं हे आभाळ आलं सुगीच्या दिसांत

माती कालविली त्यानं हातामधल्या घासात

आलं आलं हे आभाळ काय म्हणू आता याला

काळतोंड्यानें लावली कड आपली काठाला

आलं आलं हे आभाळ काळा दगोड होवून

बसलंय उरावर हात गळ्यावं ठिवून

पावसावर माझी कविता नाही हे मोकळेपणाने सांगण्यात इंद्रजित उमदेपणा तर आहेच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पावसाचा धिक्कार करणारी ही मराठीतली एकमेव कविता असेल. पावसावर आजवर किती कविता लिहिल्या गेल्या आहेत. ‘पाऊस आणि विरह’ ही परंपरा मेघदूतापासून आहे. (‘मेघदूत’ हा भारतातला पहिला पोस्टमन ना!) शास्त्रीय संगीतातही तेच. पण पाऊस हा कुणासाठी तरी चिंतेचा, घात करणारा विषय असू शकतो, हे या कवितेत पहिल्यांदा आलं आहे.

..................................................................................................................................................................

निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे, हे फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही. बालकवी कुठेही असते तरी त्यांनी अशीच कविता लिहिली असती. दुर्गाबाईंना ‘ऋतुचक्र’बद्दल लोक विचारायचे. तेव्हा दुर्गाबाई म्हणायच्या, ‘मी हे पुस्तक लिहायला कुठेही डायरी घेऊन नोट्स काढत फिरत नव्हते. मुंबईच्या माझ्या दोन खोल्यांच्या जागेच्या खिडकीतून मला जेवढं ऋतुचक्र दिसलं, तेवढंच मी नोंदवलेलं आहे.’ पण ते मराठीतलं एक अप्रतिम ‘निसर्ग-उपनिषद’ आहे, असं त्या पुस्तकाविषयी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे आणि ग्रामीण कविता म्हणजे शेतकऱ्याची कविता नव्हे.

..................................................................................................................................................................

मृगामध्ये येणाऱ्या पावसाचं स्वागत असतं; तोच पाऊस पिकं तयार झाल्यानंतर आला तर घात करतो. पण महाराष्ट्रात हे काही नवीन नव्हतं. आपल्याकडे दर दोन-चार वर्षांनी तयार पिकांवर पाऊस पडतो. ज्वारी काळी पडते. बाजरी मुळातच काळी असल्यामुळे ती काळी पडत नाही, पण तिला अरगट वगैरे रोग लागतात. कोकणामध्ये कापून ठेवलेलं भात भिजतं. हे काय मराठी कवींना माहीत नव्हतं? मग कुणी तसं का लिहिलं नाही? कविता सहज अनुभवातून येण्यापेक्षा, म्हणजे कविता स्फुरण्यापेक्षा, आतून येण्यापेक्षा; ती कोण वाचणार आहे, कोणाला ऐकवायची आहे, त्यानुसार लोकांच्या आवडीची कविता (चांगला शब्द वापरायचा तर) रचणं किंवा (वाईट शब्द वापरायचा असेल तर) ‘पाडणं’ कवींना अधिक सोयीचं जातं?

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली की, इंद्रजितचा हा मोकळेपणा आणि उमदेपणा उठून दिसतो. ‘ज्या प्रकारच्या पावसाच्या कवितांची ‘फॅशन’ आहे, तशा कविता मी लिहिल्या नाहीत आणि त्या लिहिल्या नाहीत म्हणून मला त्याचं काही कमीपणाही वाटत नाही’ हा त्याचा स्वाभिमान आहे.

टप टप पडती थेंब

मनीवनीचे विझती डोंब

वत्सल ये वास

भूमी आशीर्वच बोले

 

गडद निळे गडद निळे

जलद भरुनी आले

शीतलतनु चपलचरण

अनिलगण निघाले

अशा आशयाची कविता या सबंध पुस्तकामध्ये एकही नाही. अर्थात बोरकरांची ही कविता काही वाईट नाही. हाही अनुभवच आहे. पण इंद्रजितच्या कवितेतला अनुभव अतिशय दाहक आहे. पण हा अनुभव फक्त शेतकऱ्याचा आहे. ग्यानबाची मेख इथं आहे!

आपल्याकडे ‘ग्रामीण कविता’ आणि ‘निसर्ग कविता’ असे दोन शब्द वापरले जातात. निसर्ग कवितांमध्ये बालकवींसारखी मोठमोठी नावं आहेत. बालकवींमधूनच निघणाऱ्या परंपरेत पाडगावकरांसारखे लोक आहेत. वसंत बापटांची ‘दख्खनची राणी’ हीसुद्धा निसर्ग कविताच आहे. पण निसर्गकवितेमध्ये बालकवींनी जी उंची गाठली, ती त्यांच्यानंतर कुणालाच गाठता आलेली नाही. बालकवींनी निसर्गकविता एका अद्भुत जगामध्ये नेली.

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे,

त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती.

गूढ निळ्या वातावरणात, निर्व्याज मनाने होती डोलत,

प्रणयचंचला त्या भृलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला.

आईच्या मांडीवर बसुनी; झोके घ्यावे गावी गाणी,

याहुनि ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?

हे संपूर्ण सुसंगत आहे. बालकवींची ही जादूच आहे की, त्यांची कविता झपाट्यानं अद्भुतामध्ये जाते.

आकाशामधुनी जाती

मेघांच्या सुंदर पंक्ती

इंद्रधनूची कमान ती

ती संध्या खुलते वरती

रम्य तारका लुकलुकती

नीलारुण फलकावरती

शुभ्र चंद्रिका नाच करी

स्वर्ग-धरेवर एक परी

ही दिव्ये येती तुजला

रात्रंदिन भेटायाला

वेधुनि त्यांच्या तेजाने

विसरुनिया अवघी भाने

धुंद हृदय तव परोपरी

मग उसळी लहरी लहरी

त्या लहरीमधुनी झरती

दिव्य तुझ्या संगीततती

नवल न, त्या प्राशायाला

स्वर्ग धरेवर जरि आला

गंधर्वा तव गायन रे

वेड लाविना कुणा बरे

या उंचीला कुणाला जाता आलेलं नाही. मग त्यातल्याच एक-दोन कल्पना घ्यायच्या आणि त्यांचा विस्तार करायचा असं बालकवींच्या नंतरच्या कवींच्या निसर्गकवितांमध्ये दिसतं. पाडगावकरांची ‘सत्कार’ ही कविताही चांगली आहे. पण बालकवींची उंची तिथं नाही.

५.

निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे, हे फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही. बालकवी कुठेही असते तरी त्यांनी अशीच कविता लिहिली असती. दुर्गाबाईंना ‘ऋतुचक्र’बद्दल लोक विचारायचे. तेव्हा दुर्गाबाई म्हणायच्या, ‘मी हे पुस्तक लिहायला कुठेही डायरी घेऊन नोट्स काढत फिरत नव्हते. मुंबईच्या माझ्या दोन खोल्यांच्या जागेच्या खिडकीतून मला जेवढं ऋतुचक्र दिसलं, तेवढंच मी नोंदवलेलं आहे.’ पण ते मराठीतलं एक अप्रतिम ‘निसर्ग-उपनिषद’ आहे, असं त्या पुस्तकाविषयी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निसर्ग कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे आणि ग्रामीण कविता म्हणजे शेतकऱ्याची कविता नव्हे. इंद्रजित, तुझ्यामध्ये आणि महानोरांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. महानोर हा ग्रामीण कवी आहे, पण तो शेतकऱ्याचा कवी नाही. नाहीतर त्यांनी ही आचरट कविता लिहिली नसती-

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लहडून यावे...

चांदण्याचा भाव २०० रुपये क्विंटल! हे वास्तव दिसलंच नाही की, पाहिलं नाही?

चिमणे इवलाले बीज

रम्य त्या होती शेज

दीड वितीचे कुणी रोप

घेत तिथे होते झोप

ऊन म्हणाले उठ गड्या

पाऊस वदला मार उड्या

जगांत येरे या उघड्या (हा ‘उघड्या’ शब्द खरं म्हणजे इथं बसत नाही, पण शांताबाई फार लक्ष द्यायच्या नाहीत)

करी जळाच्या पायघड्या

वायु बोलला ठ की रे

माझ्याशी धर फेर बरे

हंसले जर आम्हा कोणी

दावु वाकुल्या नाचोनी

भूमी म्हणाली चल बाळा (अरे, त्या रोपाला वाढवलं कुणी त्याच्यासाठी एखादं वाक्य लिहाल?)

वाजव पाण्याचा वाळा

अंगी हिरवी सोनसळा

घालुन ही दावी सकळा

झोप झटकुनी ते उठले

नंदबाळ जणु अवतरले

पाऊसवारा ऊन तसे

जमले भवती गोप जसे

अदभुत त्यांचा खेळ अहा

जरा येऊनी पहापहा

उगवे चमके पहा तरी

मोरपिसांचा तुरा शिरी

सबंध कवितेत शेतकऱ्याचा उल्लेखच नाही! केवळ निसर्ग कविता म्हणून चांगली आहे. इंद्रजित हा खऱ्या अर्थानं पहिला ‘शेतकरी कवी’ आहे, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. तसं म्हणायला शेतकरी कवी इतरही काही झालेले आहेत. मात्र ‘आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याची कविता लिहितो’ याच्याबद्दल इंद्रजितला कोणताही न्यूनगंड नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

..................................................................................................................................................................

इंद्रजितच्या नसांनसांत जे शेतकरीपण भरलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला गळेकाढू किंवा उद्दाम अभिमान नाही. पण ते त्याला सोडवत नाही आणि त्याने ते सोडायची गरजही नाही. थॉमस हार्डी नावाचा एक प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार होऊन गेला. त्याने असं म्हटलेलं आहे की, लेखक दोन प्रकारचे असतात. एक, प्रत्येक विषयातलं त्यांना थोडं थोडं कळतं. (माझ्यासारखे! हर्डीकरांचा मूळ विषय काय हा शेरलॉक होम्सलाही न सुटणारा प्रश्न आहे.) आणि दुसरे, त्यांना एका विषयातलं सगळं माहीत असतं.

..................................................................................................................................................................

‘सारे रान’मधल्या या साडेतीनशे-चारशे कविता वाचल्यानंतर मला असं दिसलं की, ही कविता शेतीतून सुरू झाली आणि ती परत शेतीमध्ये गेलेली आहे. २५ वर्षांत इंद्रजित भालेरावच्या विकसनशील जाणीवेचं वर्तुळ पूर्ण झालेलं मला या पुस्तकात वाचायला मिळालं. असंही कुणी लिहिलेलं नाही. याची खूप चर्चा करता येईल. इंद्रजित, ही वेळ अजून आली आहे की, नाही मला माहीत नाही. पण लवकरच लोक तुझ्यावर पीएच.डी. वगैरे करतील. तुला भलतेच गुण चिकटवतील. त्याला तू तयार राहिलं पाहिजेस. हे संकट प्रत्येक चांगल्या लेखक - कवीवर केव्हातरी येणार. गाईडसची दुकानं चालली पाहिजेत ना!

इंद्रजितची शब्दकळा, प्रतिमासृष्टी, भाषाशैली; इंद्रजित आणि मराठी भाषा; इंद्रजित आणि मराठवाडी भाषा असं त्याच्यावर पुढे खूप लिहिलं जाईल. पण इंद्रजितच्या कवितेत त्याच्या जाणीवेचा झालेला विकास कुणी नोंदवेल असं वाटत नाही. त्याच्या कवितासंग्रहांची नाव बघा : ‘पीकपाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, ‘दूर राहिला गाव’, ‘कुळंबिणीची कहाणी’ (दीर्घ कविता), ‘गावाकडं’, ‘पेरा’, ‘टाहो’, ‘मुलुख माझा’ (यात मराठवाड्यातलं नेहमीचं राजकारण नाही, हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे), ‘भूमीचे मार्दव’.

इंद्रजितच्या नसांनसांत जे शेतकरीपण भरलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला गळेकाढू किंवा उद्दाम अभिमान नाही. पण ते त्याला सोडवत नाही आणि त्याने ते सोडायची गरजही नाही. थॉमस हार्डी नावाचा एक प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार होऊन गेला. त्याने असं म्हटलेलं आहे की, लेखक दोन प्रकारचे असतात. एक, प्रत्येक विषयातलं त्यांना थोडं थोडं कळतं. (माझ्यासारखे! हर्डीकरांचा मूळ विषय काय हा शेरलॉक होम्सलाही न सुटणारा प्रश्न आहे.) आणि दुसरे, त्यांना एका विषयातलं सगळं माहीत असतं.

इंद्रजित हा दुसऱ्या प्रकारातला कवी आहे. त्यामुळे इंद्रजितचा पडता काळ आला की, कुणीतरी त्याच्याविषयी म्हणतील, ‘इंद्रजित भालेराव पुनरुक्ती करायला लागले’. पुनरुक्तीचं हे प्रकरण गमतीदार आहे. उदाहरणार्थ, आमचे आवडते गायक भीमसेन जोशी - ज्यांच्याकडे मी नेहमी समीक्षक वृत्तीनेच पाहिलं आहे – ‘ते नेहमी तेच तेच राग गातात’ असा आक्षेप त्यांच्यावर मीसुद्धा घ्यायचो. मी आकडा काढला की, भीमसेन जोशींना मैफिलीमध्ये गाण्यासाठी २० राग येतात. संगीत समीक्षक अशोक रानडे मला म्हणाले, ‘२० म्हणजे तू जास्त म्हणतो आहेस, भीमसेन म्हणजे १६ राग.’

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एके दिवशी माझ्या मनात विचार आला की, शेकडो माणसं आपल्या ओळखीची असतात, हजारो माणसं आपण पाहिलेली असतात. पण खरे मित्र किती असतात? मग एखाद्या कलाकाराला तोच परिसर किंवा गायकाला तेच राग हे आपल्या जीवाभावाचे मित्र वाटत असतील तर ते त्याचं वैगुण्य किंवा तो त्याचा दोष असं म्हणता येणार नाही. फार तर तुम्ही असा उल्लेख करा की, याने जास्त मित्र करायला हवे होते. काही माणसांशीच आपलं हृदय उघड करण्याची सवलत जशी सर्वसामान्य माणसाला आहे, तसंच भीमसेनांच्याही बाबतीत हे शक्य आहे की, गायक म्हणून असलेली त्यांची प्रतिभा काही रागांमध्येच मनापासून रमते आणि तेच राग भीमसेन गातात.

दुसरा मुद्दा असा की, त्यांच्यासारखे गायक हे शास्त्रीय संगीताचे श्रोते तयार करण्याची प्राथमिक शाळा असते. पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकाचं ज्ञान केवळ पहिलीपुरतं नसतं. (हेही म्हणायला पहिजे की, काहींचं तेवढंही नसतं) शिक्षक प्रामाणिक असेल, त्याची संस्था प्रामाणिक असेल आणि त्याला निवडणाऱ्या समितीनं प्रामाणिकपणाने मुलाखत घेतली असेल तर पहिलीला शिकवणं सगळ्यात अवघड आहे. सगळ्यात चांगला शिक्षकच पहिलीतल्या मुलांना शिकवू शकतो. ‘अर्भकाचे साठी | पंते हाते धरिली पाटी’ असं तुकारामाने म्हटलंच आहे. मराठवाड्यातली कोरडवाहू शेती, तिचे रंग, तिच्यातली पिकं, तिच्यातली माणसं, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्यामधली गुंतागुंत, त्यांच्या आशा-निराशांचे प्रसंग; माणसांकडून, निसर्गाकडून, शासनकर्त्यांकडून त्या माणसांवर होणारे अन्याय, तिथल्या दंतकथा, गूढ प्रतीकं या प्राथमिक आशयापासून इंद्रजितच्या कवितेची सुरुवात झाली. ‘पीकपाणी’ हे त्याच्या पहिल्या कवितासंग्रहाचं नाव रोखठोक आहे. पण ‘भूमीचे मार्दव’ हे अलीकडच्या कवितासंग्रहाचं नाव रोखठोक नाही; ते अमूर्त आहे. सगळे विषय तेच ठेवून इंद्रजितच्या कवितेचा विकास होताना आपल्याला या संग्रहामध्ये पाहायला मिळतो. 

या लेखाच्या उत्तरार्धासाठी इथे क्लिक करा 

शब्दांकन : सुहास पाटील

..................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......