क्षुल्लक देवदेवतांचा व त्यांच्या पूजेचा निषेध करणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येईल काय?
दिवाळी २०२० - लेख
विजय बाणकर
  • पंढरपूरचा विठोबा आणि तुकाराम महाराजांचे एक पेंटिंग
  • Tue , 17 November 2020
  • दिवाळी २०२० लेख तुकोबा Tukoba तुकाराम महाराज Tukaram Maharaj तुकोबाची अभंगगाथा Tukobachi Abhanggatha विठोबा Vithoba विठ्ठल Vithhal

‘देव पहावयासी गेलेले’ तुकोबा ‘देवचि होऊनि ठेले’ आणि ‘आता उरलो उपकारापुरता’ अशी त्यांना आपल्या उर्वरित जीवितकार्याची खात्री झाली. धर्माचे रक्षण आणि आत्मज्ञानाच्या अभावी समाजात खोलवर फैलावलेल्या पाखंडाचे खंडण करणे, हे द्विविध परमार्थिक कार्य ते करत राहिले. ते करण्यासाठीच ‘आम्ही वैकुंठवासी’ आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे -

१) धर्माचे पाळण । करणे पाखांडखंडण ॥१॥

हेचि करणे आम्हां काम । बीज वाढवावे नाम ॥२॥  

२) उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥१॥

‘पाखंड’ (पाखांड) या शब्दाचे ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त जे अर्थ दिले आहेत, त्यांचे पाच वर्ग कल्पिले आहेत. ते असे -

अ) एका देवतेस पूज्यत्व देऊन इतर देवांची निंदा करावी अशी जी अनेक मते झाली आहेत, त्यापैकी प्रत्येक,

ब) नास्तिक मत,

क) धर्म-नीति-विरोधी मत व आचरण,

ड) वेदप्रामाण्य झुगारून स्वबुद्धिप्रामाण्य मानणारे मत (वितंडवाद) व

इ) दंभधर्म, ढोंग, भोंदूगिरी.

‘पाखंडी’ या विशेषणाचे नास्तिक, धर्मलंड, वाममार्गी, जडवादी, वेदांना न मानणारा मनुष्य हे अर्थ ‘आदर्श मराठी शब्दकोशा’त दिले आहेत.

वरील पाच प्रकारच्या पाखंडाचे तुकोबांनी आपल्या अभंगगाथेत अतिशय परखड व तीक्ष्ण शब्दांत खंडण केले आहे. ते समजून घेऊया.

अ) एका देवतेस पूज्यत्व देऊन इतर देवांची निंदा करावी अशी जी हिंदुस्थानात अनेक मते झाली आहेत, त्यापैकी प्रत्येकास ‘पाखंड’ म्हटले जाते :

१) हरिहरभेदभावरूप पाखंडाचे खंडण -

हरि म्हणजे श्रीविष्णू व त्याचे रामकृष्णादी अवतार. यांची भक्ती करणारे ते वैष्णव. हर म्हणजे शिव. शिवाची (शंकराची) भक्ती करणारे ते शैव. वैष्णव विष्णूस तर शैवपंथीय शिवास सर्वश्रेष्ठ समजतात. हरिचे व शिवाचे मूळस्वरूप माहीत नसल्यामुळे ते मताभिमानी असतात. मताभिमान हा मूलत: देहाभिमान असतो. देहाभिमानामुळे माझे-तुझे, आपले-परके हे भाव म्हणजे द्वैतभाव वाढत असतो. तो द्वैतभाव नाहीसा झाला की, सर्व काही मुळात देवरूपच असल्याची खात्री होते. ती झाली होती म्हणूनच तुकोबा म्हणतात- ‘दुजे खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । नलगे ठाव धुंडावा ॥१॥’. अर्थात, आपण स्वत: व इतर सर्व आत्मरूप आहेत, असा अनुभव आला की आपला/परका या भावनेने कुणी वागूच शकत नाही. हरि, शिव व आपण सारेच परमात्म्याचे अंश आहोत, असे ते अनुभवत होते. म्हणूनच हरिहरभेदभावरूप पाखंडाचे खंडण करण्यासाठी त्यांनी हरिहरैक्याचा ठसा सश्रद्ध वाचकांच्या अंत:करणावर उमटवला आहे. त्यासाठी ते म्हणतात की, एकाच परमात्म्याचे (ची) विष्णू व शिव हे (ही) गुणावतार (रूपे) आहेत. ते अनुक्रमे सृष्टीपालनाचे व सृष्टीसंहाराचे कार्य करतात. त्यामुळे विष्णू दयाळू तर रुद्र कोपधारी असल्याचे अनुभवास येते. म्हणूनच हरिहरात भेद आहे, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व आहे, असा वाद करत बसू नये. 

हरि या शब्दातील वेलांटीचा अडसर दूर केला की हर हा शब्द प्राप्त होतो. इथे वेलांटी म्हणजे भेदभावयुक्त अज्ञान व अहंकार होय. अहंकार दूर झाला की हरि व हर हे एकाच अंगाचे उजवे व डावे भाग असल्याचे स्पष्ट होते. म्हणजे ते एकरूपच आहेत व परमात्म्यानेच ‘भक्तीसाठी हरिहर’ हे आपल्या ‘अरूपींचे क्षरविभाग ॥’ केले असल्याचे मनोमन पटते. अर्थात, नाम व रूप ही दोन्हीही नसलेल्या परमात्मस्वरूपापासून नाम व रूप असलेले हरि व हर हे दोन्ही निर्माण होतात व कल्पान्तानंतर ते त्यांच्या मूळ परमात्मस्वरूपात लय पावतात.

ज्ञानेश्वरीत वर्णिल्याप्रमाणे परमात्मस्वरूपात हरि व हर हे दोन्ही भाव क्षर (लय) पावल्याचे अनुभवास येते. परिणामी, वैष्णव असो वा शैव असो, त्या सद्भक्ताची आपण सारे एकाच परमात्म्याचे अंश आहोत व त्याचीच भक्ती करत असतो असे निश्चित होते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

२) क्षुल्लक देवदेवतांचा व त्यांच्या पूजेचा निषेध करणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येईल काय? -

हरि व हर यांच्यात कुणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही, असे सांगणाऱ्या तुकोबांनीच पंढरिराव श्रीविठ्ठल हे परमदैवत असल्याचे अनेकदा म्हटले आहे. प्रसंगी त्यांनी इतर देवदेवतांना (देवी व गणपतीलाही) अवमानिले आहे. मुंजा, म्हैशासुर, वेताळ वगैरेंना तर त्यांनी अगदीच क्षुल्लक लेखले आहे. देवांचा देव असलेल्या विठ्ठलास सोडून इतर देवदेवतांची पूजा-अर्चा करणारे लोक ‘वाट चुकले’ आहेत, असेही त्यांनी पुढील दोन अभंगांमध्ये म्हटले आहे -

१) हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥

ऐशा छंदें चुकली वाटा । भाव खोटा भजना ॥३॥

२) नव्हे जाखाई जोखाई । मारराणी मेसाबाई ॥१॥

बळिया माझा पंढरिराव । जो या देवांचाही देव ॥२॥

गणोबा विक्राळ । लाडु मोदकांचा काळ ॥५॥

मुंजा म्हैसासुरे । हे तों कोण लेखी पोरे ॥६॥..

तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती ॥८॥

अशा अर्थाचे त्यांचे अनेक अभंग आहेत. म्हणून ‘पाखंड’ शब्दाच्या ‘या’ अर्थाने तुकोबांना पाखंडी म्हणता येईल काय, असा प्रश्न विचारार्थ उपस्थित होऊ शकतो.

३) देवाधिदेवाच्या प्राप्तीसाठीची ‘थोर भक्ती’ सांगणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येत नाही -

स्वपंथाभिमानी लोकांप्रमाणे तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येत नाही. कारण, अनेक देवदेवतांची पूजाअर्चा करणाऱ्यांचा ‘भाव खोटा’ असतो. तो कसा ते त्यांनी पुढीलप्रमाणे पटवून दिले आहे -

परमेश्वराच्या स्वरूपाबाबत अज्ञानी असलेले लोक अनेक देवदेवतांची पूजा करतात. त्या देवदेवतांचे मूळ रूप काय? त्यांचा निर्माता कोण? त्यांचा नियंता कोण? याबाबत त्यांचा निर्णय झालेला नसतो. परमेश्वराचा व सृष्टीशी असलेल्या त्याच्या संबंधाचा त्यांना अद्याप अनुभव आलेला नसतो. ब्रह्मादिक देवही मानवादी प्राण्यांप्रमाणे कर्माच्या कचाट्यात अडकलेले आहेत, असे त्यांना ज्ञात झालेले नसते. ‘आपुले मरण’ त्यांनी ‘डोळ्यांनी पाहिलेले’ नसते. मृत्यूचा व मृत्यूनंतरचा सुखसोहळा त्यांनी अनुभवलेला नसतो. त्यामुळेच ते ‘निर्भर’ झालेले नसतात. अशा लोकांच्यात विविध देवदेवतांच्या पूजाविधींचे स्तोम माजते, साकांक्ष आराधने फोफावतात, सकाम भक्ती जोरावते व देवदेवतांशी जणू देण्याघेण्याचा व्यवहार होत राहतो. म्हणजे ‘खरा परमार्थ’ साधण्याऐवजी लोक ‘संसारा(साठीचा) व्यापार’ करत बसतात, त्यातच कृतार्थता मानत राहतात.

अशा आचरणांपासून लोकांना परावृत्त करण्यासाठीच त्यांनी विठ्ठलाच्या तुलनेत क्षुल्लक असलेल्या देवदेवतांचे दोष वर्णिले आहेत. आत्मज्ञानप्राप्तीसाठी शुद्ध सात्त्विक भक्ती करणाऱ्यांच्या दृष्टीने मद्यमांस भक्षण करणाऱ्या शक्ती(देवी)प्रमाणेच जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण या तामसी विद्यांची वेताळ वगैरे क्षुद्र दैवतेही परमपूज्य/उपास्य ठरत नाहीत. कारण अशा भक्तिमुळे जन्ममृत्यूच्या येरझारा करणे कदापि चुकत नाही. दुर्लभ अशा या मानवजन्मीच जन्ममरणव्यथा दूर करावयाची असेल तर बहिरोबा, खंडोबा, गणपती इत्यादी सर्व ‘देवांचाही देव’ असलेला ‘बळिया’ (सर्वशक्तिमान) असा ‘पंढरिराव’ (आत्माविठ्ठल) हाच ‘रखुमाईचा (अचिंत्र मायेचा) पती (नियंता)’ भक्तिभावें ‘चित्तीं धरा’ असा ज्ञानेश्वरीतही वर्णिलेला ‘अव्यभिचारी भक्तिचा’ नि:श्रेयस्कर उपदेश तुकोबांनी केला आहे.

भजनाचे राजस, तामस व सात्त्विक असे तीन प्रकार आहेत. यापैकी फक्त सात्त्विक भजनाने जन्ममरणव्यथा दूर होते, मोक्ष प्राप्त होतो, अन्य प्रकारच्या भजनांनी नाही. हे पटवून देताना ते म्हणतात की शिव, शक्ती, सूर्य, गणपती हे सारे आत्मारूपी विष्णूसमान आहेत, असे मानणे म्हणजे हिरा आणि गार समान मानण्यासारखेच आहे. या देवतांचे भक्त हे ‘राजस’ (रजोगुणी) असतात. ते सकाम म्हणजे ‘राजस भजन’ करत असतात. राजस भजन करणारे वाया जातात म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतात. खंडोबा, बहिरोबादी देवतांना ‘देव’ म्हणणाऱ्यांचे जीवन ‘तमोयोग्य’ म्हणजे ‘गाढ अज्ञानमय’ असते. तमोगुणी लोकही जणू वाया जाण्यासाठीच भजन करत असतात. केशवाचे भजन करणारे वैष्णव मात्र सात्त्विक असतात व त्यांनाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणून ‘विठ्ठलावाचुनि ज्या ज्या उपासना’ तो ‘अवघाचि श्रम’ असल्याचे जाणून घ्यावयास व फक्त गोविंदालाच ‘शरण व्हा’वयास तुकोबांनी मार्गदर्शिले आहे.

जो भक्तिमार्ग अनुसरल्याने ऋषिमुनी परमेश्वराशी एकरूप झाले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मज्ञानी म्हणून थोर मानले गेले, तसेच ज्या राजपंथाने भगवान श्रीशंकरदेखील अद्याप यात्रा करत आहेत त्या ‘थोर भक्तीच्या’ मार्गावर काळाच्या ओघात आलेला अज्ञानरूप केरकचरा काढून टाकण्यासाठी, ‘तामस व राजस भजनरूप आडरानातून लोकांना बाहेर काढण्यासाठी’ आणि स्वधर्मरूपी नीती दाखवून देण्यासाठी तुकोबांनी क्षुल्लक देवदेवतांच्या मर्यादा दाखवल्या आहेत. ‘पाखंडाचे खंडण व धर्मरक्षण व्हावे’ तसेच लोक ‘साच भावें वर्तू लागावेत’, हा त्यामागील सद्हेतू आहे.

..................................................................................................................................................................

अनियंत्रित (अनैच्छिक) हालचाली आपल्या इच्छेनुसार होत नसल्या तरी जिवंत राहण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. हे जर कुणाही सामान्य तसेच विद्वान माणसाला समजू शकत असेल तर ‘माणसाची देव चालवी अहंता’ हे तुकोबांचे वचनही समजायला हवे. खरे तर, आपल्या शरिरातील अनैच्छिक (अनियंत्रित) क्रियांचा कर्ताच विज्ञानाला अजून सापडलेला नाही. श्रीज्ञानेश्वर तुकोबांसारख्या आत्मानुभवी संतांना मात्र या कर्त्याचा प्रत्यय आलेला असतो, येत असतो. म्हणूनच, उदाहरणार्थ भगवद्गीतेत, प्राण्यांच्या शरिरात ‘मी जठराग्नी होऊन चार प्रकारचे अन्न पचवत असतो’, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. श्रीकृष्णाचे म्हणजे देवाचे हे ‘अग्निरूप’ (विज्ञान याला मंदज्वलनाचे कारण म्हणते) होय. जोपर्यंत जठराग्नि प्रदीप्त (कार्यक्षम) असतो तोपर्यंतच माणूस निरोगी व जिवंत राहतो. ‘ऐशी अगम्य ईश्वरी लीला’ आपल्याला ‘ब्रह्मानंदीं गम्य’ होते, असे तुकोबांनी म्हटले आहे.

..................................................................................................................................................................

‘देवचि होऊनि गेलेले’ तुकोबा विठ्ठल हाच देवांचा देव आहे, असे अनुभवत होते. पंथाभिमानी व अज्ञानी लोकांप्रमाणे ते इतर देवदेवतांची निंदा करत नसून लोकांचे परम कल्याण व्हावे म्हणून त्यांना ‘थोर भक्तीची पायवाट’ ते दाखवत आहेत. म्हणूनच त्यांच्यावर पाखंडीपणाचा आरोप करण्याचा विचारही अनुचित ठरतो; त्यांच्या निष्कलंक व सदोदित संतपणापुढे म्हणजे त्यांच्या अंगीच्या प्रेमधगीपुढे तो क्षणार्धात नाहीसा होतो.

तुकोबा विठ्ठलाचे परमभक्त होते. तथापि, विठ्ठलाच्या सर्वव्यापकत्वावरून त्यांचे लक्ष यत्किंचितही ढळले नव्हते. विठ्ठलाची मानवकृत जडमूर्ती म्हणजेच विठ्ठल अशी त्यांची भावना नव्हती. कारण त्यांच्या ‘चित्ताची (विश्व)चैतन्याशी मिठी पडली’ होती. त्यामुळे त्यांची ‘सकळ इंद्रिये ब्रह्मरूप झाली’ होती, ‘मागे पुढे नाही । दुजे या (देवा) वेगळे काही ॥’ असे म्हणजे ‘अवघी सृष्टी हरिरूप’ असल्याचे ते अनुभवत होते. हा अनुभव त्यांनी सर्वत्र विठ्ठलाची पावले दिसत आहेत, विठ्ठलच त्रिभुवनात ‘संचला’ आहे, यासम शब्दांनीही व्यक्त केला आहे. अशा निरंतर सर्वव्यापक आत्मानुभवामुळेच तुकोबा अ-भंग वृत्तीने नामस्मरण करू शकले आणि त्यावाचून सारे काही पाखंडच आहे, या अर्थाचा ‘हरि तुझे नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणे काही ॥१॥’ हा अभंग ते लिहू शकले.

ब) नास्तिकमताचे खंडण :

आस्तिक म्हणजे विश्वनिर्माती म्हणून ईश्वरनामक एक अतिभौतिक (सुपरनॅचरल) शक्ती आहे, असे मानणारा व तिला प्रसन्न करून घेण्यासाठी कर्मे करणारा माणूस होय. याउलट नास्तिक माणसाच्या ठिकाणी आस्तिक माणसाच्या ठिकाणी असलेली ईश्वरकेंद्री श्रद्धा नसते. किंबहुना अशा श्रद्धेला खुळचट वा निरर्थक समजून ‘देहमनबुद्धी म्हणजेच मी’ असे मानून तो वागत असतो, तो निरीश्वरवादी असतो.

नास्तिकमताचे खंडण करणारे अनेक अभंग तुकोबांच्या गाथेत आहेत.

१) अहंतेचे खंडण म्हणजे नास्तिकतेचे खंडण -

अहंतारूप नास्तिक मताचे खंडण करणारा एक प्रभावी युक्तिवादयुक्त अभंग त्यांनी लिहिला आहे - 

‘चाले हे शरीर कोणाचिये सत्तें । कोण बोलविते हरीविण ॥१॥

देखवी ऐकवी तो एक नारायण । तयाचे भजन चुको नका ॥२॥

माणसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्ता म्हणो नये ॥३॥

वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥४॥

तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे कार आहे चराचरी ॥५॥’

या अभंगात एक विनम्र प्रश्न आणि त्याची आस्तिकवादी उत्तरे आहेत. आत्मदेवाच्या सत्तेने आपले शरीर चालत असते; व्यक्ती बोलत, ऐकत व पाहत असते. व्यक्तीची अहंता (अहंकर्तृभाव)देखील आत्मदेवच अखंड चालवत असतो. अर्थात, आत्मा-नारायणच खरा कर्ता आहे म्हणून ‘मीच सर्व काही करत आहे’ असे कुणी म्हणू नये. विश्वात सर्वत्र व सर्व प्राणिमात्रांच्या आत असलेला आत्मरूप विठ्ठलच झाडाचे पानही हलण्यास कारणीभूत असतो. त्यामुळे कुणाही जीवाची अहंतारूप नास्तिकता मुळापासून निरर्थक ठरते.

ज्ञानेश्वरीतील ‘अर्जुनपण न घेता । मी ऐसे जें पंडुसुता । उठतसे ते तत्त्वता । तयाचे रूप ॥’ या ओवीत देवाने अर्जुनाजवळ व्यक्त केलेल्या सत्याचा आपल्या ठिकाणी अनुभव आला की, नास्तिकाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचे खंडण होते. तसा अनुभव घेण्याबाबत तुकोबांनीही आवाहन केले आहे. माणसाची अहंता ही मूलत: आत्मरूप आहे, हे समजले की, कर्तृत्वाचा मद उतरतो आणि व्यक्ती खऱ्या अर्थाने आस्तिक होते. अशा प्रकारे आत्मज्ञानपूर्वक आस्तिक असलेले तुकोबा म्हणतात, की ज्याप्रमाणे ‘माझ्या मुखें मज बोलवितो हरी’ त्याचप्रमाणे ‘सकळांच्या (नास्तिकांच्याही) अंतरीं’ असलेला नारायणच त्यांनाही बोलवत असतो.

आधुनिक शरीरविज्ञान मानवांच्या व पशुपक्ष्यांच्या हालचालींचे नियंत्रित व अनियंत्रित हालचाली (ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया) असे दोन वर्ग मानते. उदा. हाताने काम करणे, पायाने चालणे, तोंडाने खाणे या हालचाली आपल्या इच्छेवर अवलंबून असतात, यावर आपले नियंत्रण असते. याउलट, हृदयाचे काम अखंड चालू असते, त्यावर मात्र कुणाचेही नियंत्रण नसते. जठर, अन्ननलिका इत्यादींवरही आपले नियंत्रण नसते. या अनियंत्रित (अनैच्छिक) हालचाली आपल्या इच्छेनुसार होत नसल्या तरी जिवंत राहण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. हे जर कुणाही सामान्य तसेच विद्वान माणसाला समजू शकत असेल तर ‘माणसाची देव चालवी अहंता’ हे तुकोबांचे वचनही समजायला हवे. खरे तर, आपल्या शरिरातील अनैच्छिक (अनियंत्रित) क्रियांचा कर्ताच विज्ञानाला अजून सापडलेला नाही. श्रीज्ञानेश्वर तुकोबांसारख्या आत्मानुभवी संतांना मात्र या कर्त्याचा प्रत्यय आलेला असतो, येत असतो. म्हणूनच, उदाहरणार्थ भगवद्गीतेत, प्राण्यांच्या शरिरात ‘मी जठराग्नी होऊन चार प्रकारचे अन्न पचवत असतो’, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. श्रीकृष्णाचे म्हणजे देवाचे हे ‘अग्निरूप’ (विज्ञान याला मंदज्वलनाचे कारण म्हणते) होय. जोपर्यंत जठराग्नि प्रदीप्त (कार्यक्षम) असतो तोपर्यंतच माणूस निरोगी व जिवंत राहतो. ‘ऐशी अगम्य ईश्वरी लीला’ आपल्याला ‘ब्रह्मानंदीं गम्य’ होते, असे तुकोबांनी म्हटले आहे.

थोडक्यात, आपल्यातील आत्मारूपी देवाच्या अनुभवाधारे तुकोबांनी अहंतारूप नास्तिकता निराधार असल्याचे पटवून दिले आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

२) जाणणे देहाचे नश्वरपण । हेचि नास्तिकमत-खंडण ॥ -

शरीर नश्वर आहे. म्हणून त्यावरच मरेपर्यंत प्रेम करत राहणाऱ्या लोकांचे हृदयपरिवर्तन करणारे म्हणजे नास्तिक मताचे खंडण करणारे अभंग त्यांनी लिहिले आहेत. त्यांनी केलेला पुढील अभंगातील युक्तिवाद बिनतोड आहे -

‘वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य । न करिती विचार का हिताचा ॥१॥

का ही विसरली मरण बापुडी । कार यांसी गोडी लागलीसे ॥२॥’

‘शरीर मृत्यूचे भातुके’ (खाद्य) व ‘नाना भोगांची (दु:खांची) संचिते’ असूनही शारीरिक-मानसिक-बौद्धिक सुखांना जीवनाचे सारसर्वस्व मानून लोक त्यांच्यातच रमत राहतात. म्हणून त्यांना ते सडेतोडपणे विचारतात -

‘देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥१॥

कारे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥’

बाळपण अज्ञानात जाते, तारुण्य विषयसुखात संपते, वृद्धपणी चिंता प्रवर्तते (वाढते), हे सत्य आपल्यालाही लागू आहे. अर्थात, ‘दिवसेंदिवस बळ क्षीण होत आहे’ आणि ‘मरण अटळ आहे’ म्हणून ‘अजुनि तरी होई जागा’ असा इशाराही त्यांनी अनेकदा दिला आहे. तरीदेखील लोक आपल्या म्हणण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, त्याचा गंभीरपणे विचार करत नाहीत, म्हणून जणू थोडेसे अगतिक होऊन ‘यासी सांगा कोणी तरी’ अशी कळकळही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘नाशिवंत देह नासेल’ हे जाणूनही लोक आंधळे होतात, ते स्वत:च्याच बुद्धीने स्वत:चा घात करून घेत असतात म्हणून नास्तिकांसारख्या असलेल्या अशा लोकांना ते ‘कुबुद्धी’ म्हणतात.

शरिराचे अनेक दोष तुकोबांनी वर्णिले आहेत आणि मानवी शरिराचे परम महत्त्वही सांगितले आहे : मानव-शरीर हे परब्रह्मप्राप्तीचे एकमेव साधन आहे, त्यात देव राहतो, या शरिरानेच संसार(भव)पाश तोडता येतात. 

तथापि केवळ ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’युक्त म्हणजे केवळ पशुतुल्य जीवनच जर माणूस जगणार असेल आणि विठोबाचा भक्ती करणार नसेल तर तो आपल्या ‘मनुष्यपणाची हानीच करत आहे’ आणि त्यामुळेच तो पशुहूनही हीन ठरतो, असे त्यांनी ‘तरीच जन्मां यावे । दास विठोबाचे व्हावे ॥१॥ नाही तरी काय थोडी । श्वान शुकरे बापुडी ॥२॥’, या अभंगातून सूचित केले आहे.

३) धनार्जनहव्यासरूपी नास्तिकता । खंडे, देवावरी विश्वासता ॥ -

अन्न, पाणी, वस्त्र व निवारा या गरजा भागवण्यासाठी माणूस धनसंपत्ती मिळवण्याचा अविरत प्रयत्न करतो. धनसंपत्तीसाठीची चिंता ही मूलत: पोटचिंता असते. म्हणून तुकोबा म्हणतात, ‘भूक जनां नाचवी’ आणि ‘या पोटें बहु केले खोटें’. पोटचिंतेपोटीच लोक देवापासून दूर जात असतात. नास्तिकासारखे झालेले हे लोक चिंतामुक्त व्हावेत म्हणून तुकोबा त्यांना म्हणतात की त्रैलोक्याचे पालन करणाऱ्या परमेश्वराला आपले ओझे का होणार आहे? पाण्यामध्ये बसलेल्या बेडकाच्या मुखात कोण बरे चारा घालतो? पक्षी व अजगर अन्नाचा साठा करून ठेवत नाहीत; त्यांचेही अनंत पालनपोषण करतोच की! अशा दरासिंधु देवावर आपला भार घातला तर तो आपल्यालाही उपेक्षिणार नाही.

जन्मलेल्या मुलाचे पोषण करण्यासाठी बाळाबरोबरच मातेच्या शरिरात दुधाची निर्मिती कृपाळू देवाशिवाय दुसरा कोण बरे करत असतो, हा मननीय प्रश्नोत्तरात्मक युक्तिवादही तुकोबांनी केला आहे. वर्तमानकाळी या प्रश्नांची विज्ञानात असलेली उत्तरे देणे शक्य आहे. स्त्रीचे शरीर निसर्गत: बाळंतपणासाठी तयार होत असताना दूधनिर्मितीसाठीही त्यात अनुकूल परिवर्तन होत असते, हे वैज्ञानिक स्पष्टीकरण माझ्या मते अपूर्ण आहे. कारण, वीर्याच्या एका थेंबापासून(?) तयार होत जाणाऱ्या शरिराच्या विशिष्ट दिशेने विकास होण्याला केवळ ‘निसर्ग’ म्हणणे ही शब्दांची फक्त सुरेख मांडणी आहे. या संदर्भात ‘व्हॉट द इग्नोरंट कॉल नेचर आर कॉल इट गॉड,’ हा रॉजर बेकन यांचा विचार लक्षणीय आहे. तुकोबांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामागील हेतू लोकांचा द्रव्यार्जनाचा हव्यास कमी व्हावा, हा आहे. कारण ते म्हणतात ‘वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाही ॥१॥’ अर्थात, शरिराच्या व मनबुद्धीच्या गरजा भागवण्यासाठीच जे अहोरात्र विचार करत राहतात, त्यासाठी जमीन, सत्ता व संपत्ती याबाबतचेच विचार ज्यांच्या मनात घर करून असतात, त्या लोकांना देव कधीही भेटत नाही.

यावरून, मरेपर्यंत केवळ शरीरपोषणार्थ धनार्जनाची धडपड करणारे लोक नास्तिक असतात, असे तुकोबांचे मत असल्याचे दिसते. अशी नास्तिकता कमी होण्यासाठी विश्वाचे पालनपोषण करणाऱ्या देवावर विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. देवावरील विश्वासाने द्रव्यार्जनाचा हव्यास कमी होत जातो आणि माणूस ‘पूर्णत: आस्तिक’ बनतो. प्रारब्धात असेल तेवढेच मिळत असते. म्हणून अधिक द्रव्यसंपादनासाठीचे प्रयत्न व्यर्थ होत. त्याबाबत ते म्हणतात, ‘प्रारब्ध न पालटे सोसें । तृष्णेचे हे पिसे वायांविण ॥’ कारण ‘धन मेळवूनि कोटी । सवें न रे रे लंगोटी ॥१॥’ हे तर सर्वपरिचित सत्यच आहे.

..................................................................................................................................................................

सत्य बोलणारा व सदाचरण करणारा माणूस सात्त्विक राहतो. तो कामक्रोधांच्या आहारी जात नाही. त्याच्या मनाला अनैतिक विचार शिवत नाहीत. म्हणजे त्याचे मन अशुद्ध होत नाही. त्याला सुख, समाधान व शांती आवडू लागते. सर्वोच्च सुखदाता असलेला खरा देव भेटावा अशी तीव्र इच्छा त्याला होऊ लागते. या अर्थाचा ‘सत्य बोले मुखें । तेथे उचंबळती सुखे ॥’ असा अनुभव व्यक्त करून त्यांनी सत्य बोलण्याची प्रेरणा दिली आहे आणि ‘असत्य जे वाणी । तेथे पापाचीच खाणी ॥’ अशा शब्दांत त्यांनी असत्य भाषण करणाराचा निषेधही केला आहे.

..................................................................................................................................................................

देवावर विश्वासायचे आणि द्रव्यार्जनासाठी अजिबात प्रयत्न करायचा नाही, असे त्यांचे म्हणणे नाही. कारण प्राथमिक गरजांची पुरेशा प्रमाणात पूर्तता करणे हे तर गृहस्थांचे कर्तव्यच आहे. म्हणून धनार्जनासाठीची व धनव्ययाची रीतही त्यांनी सांगितली आहे -

‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारें । उदास विचारें वेंच करी ॥१॥

उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखाणी ॥२॥’

द्रव्यार्जनासाठी अखंड हव्यास केल्याने स्वत:लाच पीडा होत असते. अशा प्रकारे स्वत:लाच दु:ख देऊ नये, हे व्यवहाराचे सुवर्म जसे त्यांनी सांगितले आहे, तसेच कष्ट केल्याशिवाय ‘वेतन घेणे व जेवणे’ अनुचित आहे असे हरामीपणाविरुद्धचे आपले स्पष्ट मतही त्यांनी नोंदवून ठेवले आहे.

क) धर्मविरोधी (अनैतिक) वर्तनाचा निषेध आणि धर्माचरणासाठी मार्गदर्शन :

परमेश्वरप्राप्तीसाठी कर्मे करणे म्हणजे धर्माचरण होय. निष्काम, निर्मळ, निर्वैर व एकनिष्ठ भावाने भक्ति करणे हे धर्मसार आहे. व्यक्तीला सुखी-समाधानी करणारे व समाजाला सुस्थिर ठेवणारे आचरणही धर्म(नीति) होय. म्हणूनच धर्मविरोधी वा अनैतिक वर्तनाचा त्यांनी निषेध केला आहे.  

सत्य बोलणे, परस्त्री मातेसमान (बहिणीसमान) व परपुरुष बंधुसमान मानणे म्हणजे लैंगिक व्यभिचार न करणे, परद्रव्याचा अभिलाष न धरणे व परद्रव्यापहार न करणे, कुणाचीही निंदा न करणे, कष्टाने संपत्ती मिळवणे, शुभ बोलणे इत्यादी नीतिमूल्यांचा तुकोबांनी जोरदार पुरस्कार केला आहे. या मूल्यांना सोडून वागणे म्हणजे धर्मविरोधी वर्तन करणे होय.

‘सत्यापरता नाही धर्म’ हे विधान सर्वश्रुत आहे. तुकोबांनीही सत्याचरणाचे महत्त्व विशदिले आहे. ते म्हणतात, ‘खरे बोले तरी । फुकासाठी जोडे हरी ॥१॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडोनिया वाया जाय ॥२॥’

सत्य बोलणारा व सदाचरण करणारा माणूस सात्त्विक राहतो. तो कामक्रोधांच्या आहारी जात नाही. त्याच्या मनाला अनैतिक विचार शिवत नाहीत. म्हणजे त्याचे मन अशुद्ध होत नाही. त्याला सुख, समाधान व शांती आवडू लागते. सर्वोच्च सुखदाता असलेला खरा देव भेटावा अशी तीव्र इच्छा त्याला होऊ लागते. या अर्थाचा ‘सत्य बोले मुखें । तेथे उचंबळती सुखे ॥’ असा अनुभव व्यक्त करून त्यांनी सत्य बोलण्याची प्रेरणा दिली आहे आणि ‘असत्य जे वाणी । तेथे पापाचीच खाणी ॥’ अशा शब्दांत त्यांनी असत्य भाषण करणाराचा निषेधही केला आहे. ज्या पुरुषाला दोन (किंवा अधिक) बायका असतात, तसेच जी स्त्री अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवते त्या दोघांच्याही ‘दोषां नाही पार’ म्हणून ते ‘अघोर कुंभपाक’ (नरकयातना) भोगतील, असे त्यांच्या दुष्कर्माचे फळ त्यांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे ‘सत्य तोचि धर्म’ आहे त्याचप्रमाणे परद्रव्य आणि परस्त्री (परपुरुष) यांच्याबाबत अभिलाषाही न धरणे हा धर्माचरणाचा (नैतिकतेचा) सर्वोत्तम आदर्श आहे. याबाबतचे त्यांचे पुढील दोन अभंग मननीय आहेत -

१) परद्रव्य परकांता । नातळे जयाचिये चित्ता ।

आणिक कर्मीं तो तत्त्वता । बांधला नवजार ॥१॥

परधन आणि परस्त्री यांच्याबाबत ज्याच्या (जिच्या) चित्तात अभिलाषा निर्माण होत नाही, जो (जी) परद्रव्यापहार व परस्त्रीगमन (परपुरुषगमन) करत नाही तो (ती) इतर कोणत्याही कर्माने तत्त्वत: बांधला (बांधली) जात नाही, म्हणजे इतर कोणतेही दुष्कृत्य सहसा त्याच्याकडून (तिच्याकडून) होत नाही.

परधनाच्या व परनारी (परपुरुषाच्या) अभिलाषेपासूनच व्यक्तीच्या भाग्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते, असा इशाराही त्यांनी दिला आहे -

२) परद्रव्य परनारीचा अभिळास । तेथोनि हरास सर्व भाग्या ॥१॥

धर्मनीति विचारात न घेता भलतेच उन्मत्त वर्तन म्हणजे दुराचरण करणे हे पाप होय. पापाचरण होण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते असे - जीवांना अनावर वासनेमुळे भ्रम होतो. त्यामुळे धर्माचरणाचे वर्म त्यांना कळत नाही. ते कामातुर होतात. परिणामी मनाची व जनाची लाज ते धरू शकत नाहीत. मायारूप चेटकीण त्यांना नाचवत असते.

अशा प्रकारे सर्व जीव मायाधीन असले तरी कामक्रोधादी षडरिपूंवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी परद्रव्य व परनारी (परपुरुष) यांचा विटाळ मानणे याशिवाय (त्यांच्या जोडीला) आवश्यक असलेले पुढील उपाय त्यांनी सांगितले आहेत -

१) युक्त आहार विहार । नेम इंद्रिरांसी सार ।

नसावी बासर । निद्रा बहु भाषणा ॥२॥

२) तुका म्हणे बुद्धी आपुले आधीन ।

करी, नारारण आतुडे तो ॥५॥

धर्मविरोधी वर्तन म्हणजे पाखंड होय. त्याचे त्यांनी परखड शब्दांत खंडण केले आहे. माणसांच्या मर्यादा ओळखून त्यांना दुराचरणापासून विन्मुख करण्यासाठी अंतर्मुख होऊन विचार करण्याचे विलक्षण विनम्र भाषेत आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणतात की, परस्त्रियांना आपल्या मुलीसमान मानण्याने आपले धन खर्च होते का? परनिंदा व परद्रव्यअभिलाषा न केल्याने तुमचे काही जाणार आहे का? खरे बोलण्यासाठी काही कष्ट का पडतात? खरे तर या प्रश्नांतच त्यांची खरी उत्तरे आहेत. केवळ या गोष्टी आचरणात आणल्याने देव भेटतो, या अर्थाची संबंधित अभंगातील ‘तुका म्हणे देव जोडे याचसाठी । आणिक ते आटी नलगे काही ॥’ हे शेवटचे चरण जसे नीतिदर्शक आहे, तसेच ते विलक्षण आश्वासकही आहे. तथापि संयमशील आचरणाच्या जोडीला देवाचे सद्भावयुक्त नामस्मरण हे सर्वोत्तम धर्मसाधनही सांगून ठेवण्यास तुकोबा विसरले नाहीत. ते म्हणतात, ‘नये वाटूं मन । काही न देखावे भिन्न ॥१॥ पार विठोबाचे चित्तीं । असो द्यावे दिवसराती ॥२॥’

ड) वेदप्रामाण्य झुगारून स्वबुद्धीप्रामाण्य मानणाऱ्या मताचे खंडण :

तुकोबांच्या अभंगांनुसार वेदप्रामाण्य झुगारून देणारांचे दोन वर्ग कल्पिता येतात : १) वेदांना प्रमाण न मानणारे व २) वेदांमधील वचनांचा अर्थ स्वबुद्धीनुसार लावणारे. (या दुसऱ्या वर्गातील लोकांना ‘वितंडवादी’ म्हणावयास हरकत नसावी.) तुकोबांनी या दोघांचेही दोष दाखवून त्यांचा निषेध केला आहे.

१) वेदांना प्रमाण न मानणाऱ्यांचा निषेध -

संत श्रीज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला तो मूळच्या भक्तिप्रधान वैदिक धर्माचेच विकसित रूप आहे. ही जाणीव मराठी संतवाङ्मयात आहे. सर्व संतांना वेदाविषयी पराकाष्ठेचा आदर आहे. ‘वाचा बोलो वेदनीति । करू संतीं केले ते ॥’, असा स्वकार्याचा उल्लेख तुकोबांनीही केला आहे. जगात सर्वत्र देव आहे, हे वेद, शास्त्रे, पुराणे व संतांच्या उपदेशाचा सार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कालमानपरिस्थितीनुसार धर्माचरणाचे स्वरूप बदलते. हे लक्षात घेऊन त्यांनी वेदातील कर्मकांड व कर्मठता बाजूला सारून भक्तियुक्त कर्माचा (हीच वेदनीति!) पुरस्कार केला आहे. ‘वेदांचा मथितार्थ’ त्यांनी अनुभवला आहे. म्हणूनच वेदांना प्रमाण न मानणाऱ्या आणि वेदांची अज्ञानास्तव निंदा करणाऱ्या लोकांचा त्यांनी दुर्जन, चांडाळ, भ्रष्ट, सुतकी, खळ या शब्दांत निषेध केला आहे. वेदबाह्य बोलण्याला तुकोबा ‘पाखंड’ म्हणतात. वेद, शास्त्र, पुराण यांची ‘जग अवघे देव’ ही ‘मुख्य उपदेशाची ठेव’ जो मानत नाही आणि वेदांनी सांगितलेल्या ‘समब्रह्म’-तत्त्वानुसार म्हणजे उच्चनीचभावरहित होऊन वागत नाही त्याला ते ‘दुराचारी’ म्हणतात.

२) वेदांचे अर्थ स्वबुद्धीनेच लावणाऱ्यांचा निषेध -

‘वेद अनंत बोलिला’ असून त्याने जो ‘अर्थ शोधिला’ आहे ‘तो आम्हां संतांनाच ठावा’ असून ‘इतर लोक वेदांचा फक्त (शब्दरूपी) भार आपल्या माथीं’ वाहत आहेत, हे तुकोबांचे विचार सर्वतोमुखी झाले आहेत. वेदप्रतिपाद्य ‘विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥’ हा सहाही शास्त्रांचा आणि अठराही पुराणांचा सिद्धान्त आहे, असे ते म्हणतात.

आत्मारूप विठ्ठलाला शरण जाण्याची तसेच निजनिष्ठेने म्हणजे ‘सोऽहं’-भावाने नाम गाण्याची रीत पूर्वोक्त ‘थोर भक्तिचे सोपी पायवाट’-रूप ‘वर्म नेणती’ म्हणजे माहीत नसते म्हणूनच शब्दज्ञानी आपापल्या बुद्धीनुसार वेदांचा वेगवेगळे अर्थ सांगत असतात, पाठांतराने वाचाळ झालेले पंडित आपली मतमतांतरे व शब्दांच्या व्युत्पत्ती लोकांपुढे मांडत बसतात, कुशल तर्कवंत वादविवाद करण्यात प्रवर्तले असून त्यांच्या पाठीमागे अहंभाव लागलेला असतो; ते खरे तर, शाब्दिक ज्ञानरूप भुसा उपणत असून ऋषीमुनिंनी व साधुसंतांनी अगोदरच मथिलेले पुन: अकारण व्यर्थ घुसळीत असतात. वेदातील विधानांच्या व शब्दांच्या अर्थांबाबत तर्कच करत राहिल्याने म्हणजे भक्तिभावेंविण घटपटवादविषयक बोलत राहिल्याने त्यांना अनेक वाटा (मते) सुचू लागतात. परिणामी तर्कट व्यक्ती ‘बहु अतिशय खोटी’ होत जाते, कारण ती वेदांच्या ‘त्या’ अर्थापासून म्हणजे अनुभवगम्य आत्मविठ्ठलापासून दूर दूर जात असते. म्हणूनच, ‘भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद’ करणाऱ्या अशा लोकांशी वाद करण्याचा प्रसंग आमच्यासारख्या भोळ्या भाविकांवर येऊ देऊ नको, अशी विनंतीही तुकोबांनी देवाजवळ केली आहे.

आत्मज्ञानप्राप्ती हे मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय होय. शाब्दिक ज्ञानाने किंवा केवळ तर्कबुद्धीने ते गाठता येत नाही. कारण, आत्मा इंद्रियांना व मनबुद्धीला कळत नाही. शारीरिक-मानसिक-बौद्धिक कर्माच्या अतीत (अलिप्त, पूर्णत: निष्काम, त्रिगुणातीत) होता आले, तरच त्याचे ज्ञान होते. पण लोक अज्ञानात, अज्ञानयुक्त भक्ती करण्यात किंवा शब्दज्ञानाच्या कसरती करण्यात म्हणजे शब्दज्ञानरूपी अरण्यात अडकून राहतात. त्यांचे हे ‘कर्मच’ त्यांना आत्मारूपी देवाचे ज्ञान होण्याच्या आड येते, असे स्पष्ट मत तुकोबांनी नोंदवले आहे -

‘एक नेणता नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥

तुका म्हणे कर्म । तुझे (देवाचे) कळो नेदी वर्म ॥४॥’

शब्दज्ञानरूपी पाखंडाचे खंडण करणारे अनेक अभंग तुकोबांच्या गाथेत आहेत. शाब्दिक ज्ञानाच्या दुराग्रहामुळे मनात ‘भक्तिभाव’ निर्माण होत नाही, भक्तिभावावाचून देवाचे दर्शन होत नाही आणि देवाचे साक्षात् दर्शन झाल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणूनच ‘वेदप्रतिपाद्य आत्मरूपा’चे दर्शन घेण्यासाठी अन्य काहीही न करता भावरुक्त नामस्मरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे,  

‘चारी वेद जरासाठी । त्याचे नाम धरा कंठी ॥१॥

न करी आणिक साधन । कष्टसी कां वायांविण ॥२॥’

इ) दंभधर्म, सोंग-ढोंग व भोंदूगिरी यांचे खंडण :

तुकोबांनी दांभिक आचरण, सोंग-ढोंग आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या भोंदूगिरीचेही (दंभधर्माचे/दांभिकतेचे) स्वरूप स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या भक्ती कोट्यवधी जन्म वा अगदी कल्पान्तापर्यंत केल्या तरी देव भेटत नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

दंभ म्हणजे वृथा अभिमान. ब्रह्मज्ञानाने ब्राह्मण (द्विज) झालेले नसताना, ब्रह्मस्थितीरूपी शांती वरून संत झालेले नसताना, आत्मानुभव आलेला नसताना किंवा देवाशी एकरूपता अनुभवणारा खरा भक्त झालेले नसताना, आपण तसे आहोत असा देखावा करणे म्हणजे दंभाचरण होय.

१) वर्ण-जाति-कुळ-अभिमानरूपी पाखंडाचे खंडण -

आपण कुणबी (शूद्र) आहोत म्हणूनच दंभमुक्त राहिलो आहोत, या विलक्षण सूचक विधानाने त्यांनी उच्च-वर्ण-कुल-जाति-अभिमानरूपी पाखंडाचे खंडण केले आहे. वर्ण, कूळ, जात यांचा अभिमान बाळगून इतरांना तुच्छ लेखणारे लोक देहाभिमानी असतात. ‘हा देह म्हणजे मी’ असा भाव असणाऱ्या लोकांना आत्मज्ञान होऊ शकत नाही. परिणामी ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतात. मी ‘शूद्र वंशीं जन्मलो । म्हणोनि दंभें मोकलिलो ॥१॥’ असे म्हणत तुकोबांनी दंभमुक्तीचा नि:श्वास टाकला आहे.

विश्वातील सारे जीव, प्राणी व मानव ही ‘अवघी एकाचीच वीण’ असून ‘इथे भिन्नाभिन्न’ म्हणजे उच्चनीच, स्पृश्यास्पृश्य असे काही नाही. तत्कालीन समाजात स्पृश्यास्पृश्य भेदभाव नांदत होता. महाराला शिवल्याने क्रोधायमान झालेल्या ब्राह्मणाच्या चित्तात महाराविषयीचा प्रतिकूल विचार प्रबळ असतो म्हणून तो ब्राह्मण नव्हे, असा सन्मार्गदर्शक विचार तुकोबांनी मांडला आहे. त्यास ‘वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभरता कुळ याती ॥’, या अभंगात पुष्टी मिळते. अर्थात, जातीने चांभार असूनही जो वैष्णव (भक्त) आहे, तोच धन्य व सर्ववंद्य होय.

परमेश्वर ‘अनन्य भक्तास अनन्य’ असतो, ‘जातिकुळ हे प्रमाण’ त्याचेजवळ नसते तर ‘गुण अवगुण हेच त्याला प्रमाण’ असतात, ‘वर्णाभिमान बाळगून कुणीही पावन होत नाही’, असे स्पष्ट करण्यासाठी तुकोबांनी ज्यांच्यामुळे तिन्ही लोक पावन होतात अशा अनेक (उदा. कुंभार, चांभार, मुसलमान, महार, पिंजारी, न्हावी, इत्यादी) जातींतील पावनकर संतांचा उल्लेख केला आहे.

देहाचा आदर किंवा देहात्मभाव हाच मोठा दोष असून अंत:करण देहाहंकाराने विटाळते. म्हणून जो निरहंकार असतो तोच सोवळा असतो, जो नवविध भक्ती करतो तोच शुद्ध असतो आणि जो ‘हरि-नाम-बीज जपतो’ (आत्मज्ञानयुक्त भक्ती करतो) तोच द्विज असतो, अशा अर्थाचे अनेक अभंग त्यांनी वर्ण-जाति-अभिमानरूपी पाखंडाचे खंडण करण्यासाठी लिहिले आहेत.

..................................................................................................................................................................

भोंदूगिरीचा कळस व अत्यंत भ्रष्ट असा दंभधर्म म्हणजे प्रवचन, कीर्तन करून पैसा उकळणे होय. देव भेटावा म्हणून तन-मन-धन समर्पित करण्याऐवजी परमार्थ सांगणारेच ‘देवाचिये दारी’ अर्थार्जन करतात. देवाधर्माच्या नावाखाली घडणारे असले वर्तन त्यांना नरकाकडे नेणारे आहे, अशा स्पष्ट शब्दात तुकोबांनी त्याचा निषेध केला आहे -जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥...तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरकां जाती ॥४॥

..................................................................................................................................................................

२) सोंग-ढोंग-खंडण -

श्रीतुकोबा स्वत: साक्षात्कारी पुरुष होते. ‘अनुभवें आले अंगां । ते या जगां’ ते देत होते. स्वत:च्या साधक-दशेतील मनोवस्थेचा त्यांनी जनहितार्थ उल्लेख केला आहे. उदा. देवाची कीर्ती ‘गातो, भाव नाही अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥’ असे ते म्हणतात. परंतु चित्तात आशा, लोभ, माया असल्यामुळे ‘पतित’ असलेल्या मला मुक्त म्हणजे पावन करून आपले ‘पतितपावन’ हे नाम सत्य करून दाखव, अशी विनंतीही ते देवाला करतात.

‘आधी केले मग सांगितले’ आणि ‘स्वत:वरोनि दुसऱ्यासी ओळखीत जावे’ या न्यायाने ते लोकांचे धर्माचरण हे प्रामाणिक (निर्दंभ) आहे की नाही ते ओळखू शकत होते. ‘मज कळो येते चाचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥’ असे म्हणत त्यांनी लोक संत असल्याचा करतात, त्या सोंगा-ढोंगांचा अगदी स्पष्ट निर्देश व निषेध केला आहे.

‘वाचेत कवित्व असावे, कवित्वात रसिकत्व आणि रसिकत्वाला परतत्त्वस्पर्श असावा’ हा ज्ञानेश्वरीतील विचार तुकोबांनाही अभिप्रेत आहे. आत्मानुभवावाचून देवाबाबत कविता, अभंग, ओव्या लिहिणे ही संतकृती ठरत नाही. आत्मानुभव नसलेले संतांचे आप्तही संत नसतात. देहाभिमान नसणे व आत्मज्ञानाने शुद्ध झालेले असणे ही संतांची पायाभूत लक्षणे होत. ही लक्षणे नसलेले संतांचे नातलग खरे तर संतांच्या जातीचेही नसतात. अशा लोकांबाबत ‘हो कां पिता पुत्र बंधु कोणी । विजाति संग्रहीं धरू नये ॥’ असे त्यांनी सांगितले आहे. संतांसारखे कपडे व संतांची आडनावे असल्याने / धारण केल्यानेही व्यक्तीत संतत्व येत नाही. कारण आपली वृत्ती जो संथ, शांत करतो तोच संत असतो; अन्यथा तो असंत असतो. वल्कले धारण करणारा, पुराणे सांगणारा, वेदपठण करणारा, तप, तीर्थयात्रा करणारा, संतांप्रमाणे माळामुद्रांची भूषणे धारण करणारा, भस्म उधळणारा माणूस संत असतोच असे नाही; तर, ज्याने आपल्या दहाही देहांचे आत्मज्ञानपूर्वक निरसन केले आहे (ते मिथ्या आहेत असे अनुभवले आहे) तोच संत होय. म्हणूनच उपरोक्त बाह्यात्कारी संतलक्षणे दाखवणारे लोक सांसारिक म्हणजे देहाभिमानी असतात.

अनुभवावाचून सोंग संपादणे । नव्हे हे करणे स्वहिताचे ॥१॥, हे त्यांचे मत सोंग-ढोंगयुक्त वर्तनाची व्यर्थता सांगते. ‘अयाचित वृत्ती’ म्हणजे श्रीकृष्णमित्र सुदाम्याप्रमाणे कुणाकडेही काही न मागण्याची, सदैव निरपेक्ष राहण्याची वृत्ती होय. अशी वृत्ती झालेली नसताना गोसाव्याचा वेष धारण करणारे लोक त्या वेषाची तसेच संत झालेले नसताना संतलक्षणे धारण करणारे लोक संतलक्षणांची विटंबना करत असतात.

तुकोबांनी देवाचे भक्तिभावयुक्त ‘गुणगान’ करण्यास सांगितले आहे; पण, त्याचबरोबर कीर्तनकारांचे सोंग-ढोंगयुक्त अंतरंगही उघड करून दाखवले आहे. देवाची पराक्रम-कथा मोठ्या प्रेमाने सांगणाऱ्यांच्या हृदयात ‘कुकर्मांचा जिव्हाळा’ असतो; कानात तुळशी खोवणे, शेंडीत दर्भ ठेवणे, खोटे खोटेच नाक धरणे, टिळे टोपी माळा वगैरे केवळ पोटासाठी धारण करणे, गोसाव्याच्या रूपात परस्त्रिया हेरणे आणि अंत:करणात कामक्रोधादी विकार असणे, कीर्तन करताना देवाविषयीचे प्रेम दाखवण्यासाठी रडणे, पळणे, लोळणे हे सारे दिखाऊ वर्तन करणाऱ्या त्या ‘मायेच्या मइंदाजवळ देव निश्चितच नसतो’, असे ठाम विधान त्यांनी केले आहे.

उपरोक्त प्रकारची सोंगे-ढोंगे करून देव भेटत नसतो; मनात शुद्ध भाव म्हणजे देवाविषयीचे अढळ प्रेम असेल तरच देव भेटतो. शुद्धभावाशिवाय जे जे काही केले जाते, ते केवळ शीण देणारेच होते, असे आपले आपल्यालाच कळून येत असते, असेही सूचक विधान त्यांनी केले आहे.

३) भोंदूगिरीचे खंडण -

सोंग-ढोंगयुक्त म्हणजे दांभिक वर्तन करणाऱ्यांना तुकोबा ‘भोंदू’ म्हणतात. - ‘टिळा टोपी घालुनी माळा म्हणती आम्ही साधू । दया धर्म चित्तीं नाही ते जाणावे भोंदू ॥’. परंतु, चित्तशुद्धी व ‘आत्मत्वाची सोय’ म्हणजे सर्वत्र एक आत्मदेवच विलसत आहे, असा अखंड अनुभव नसतानाही प्रवचनकार, कीर्तनकार वगैरे मंडळी भक्त असल्याची जी सोंगे-ढोंगे करतात त्याहून भोंदूगिरीचे तुकोबांनी केलेले वर्णन थोडेसे वेगळे आहे. म्हणून भोंदूगिरीचे स्वरूप व तिचे तुकोबाकृत खंडण यांचा स्वतंत्र विचार करूया.

आत्मज्ञानामुळे व्यक्ती निष्काम (= पूर्णकाम) होते, कर्मातीत होते. त्यामुळे तिचे अंत:करण कोणत्याही कर्माने विटाळत नाही. याउलट, आत्मज्ञानरहित कोणतेही कर्म कर्त्याच्या चित्तावर लेप चढवते, त्याचे फळ त्याला भोगावे लागते. म्हणूनच तुकोबांनी ‘कर्म करोनि’ स्वत:ला ‘साधू’ म्हणविणाऱ्यांना तसेच साधुलक्षणांचे प्रदर्शन करणारांना ‘भोंदू’ म्हटले आहे.

अहंकार नि:शेष लयास गेला की, ज्ञानाग्नीने देहात्मभावाची राख होते. देहातील आत्माच ‘विभूती’ असल्याचा अनुभव येतो, देहाची नश्वरता समजते. या अनुभवाचे सूचक म्हणून अंगाला राख लावली जाते. आत्मानुभवाशिवाय अंगाला राख फासून घेणे ही स्वत:ची व इतरांची फसवणूकच होय. वैराग्य म्हणजे ऐंद्रिय सुखाविषयी त्यागबुद्धी होय. साधूंच्या वेशात मात्र काही लोक वेगवेगळी सुखे उपभोगत असतात. अर्थात डोळे झाकून म्हणजे जाणीवपूर्वक ते पाप करत असतात. अशांची संगतीच नको, असे तुकोबांनी सुचवले आहे.

या प्रकारच्या भोंदूगिरीची आणखी उदाहरणे म्हणजे तमोगुणी लोकांचे ‘अंगीं देव संचरणे’ वगैरे प्रकार होत. अंगात देव/दैवत आल्याने ते लोक स्वत:ला धन्य समजतात, इतरांना आपल्या नादी लावतात. त्यांच्याबाबत तुकोबांनी केलेले पुढील दोन प्रश्न त्यांची भोंदूगिरी उघड करणारे आहेत -

१) तयांचे स्वाधीन दैवते असती ।

तरी का मरती त्यांची पोरे ॥

२) अंगीं दैवत संचरे । मग तेथे काय उरे ॥

नवसें कन्यापुत्र होती । तरी का करणे लागे पती ॥

भोंदूगिरीची तिसऱ्या प्रकारची उदाहरणे म्हणजे स्वत: जोगी, योगी, महाराज वगैरे आहोत म्हणजे आपण कर्मातीत आहोत, असे समजणे व इतरांनाही तसे सांगणे होय. कर्मातीत असल्यामुळे भांग, अफू, गांजा खाणे/ओढणे, स्नानादी नित्य कर्मे न करणे, मद्यपान करणे यासम कर्मांचे दोष आम्हाला लागत नाहीत, अशा ‘अखंड भ्रांतीमध्ये’ हे लोक असतात. व्यसनाधीन झालेल्या अशा ढोंगी व्यक्तींच्या संगतीत देव भेटत नाही, असा सावधानतेचा इशाराही तुकोबांनी दिला आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भोंदूगिरीचा कळस व अत्यंत भ्रष्ट असा दंभधर्म म्हणजे प्रवचन, कीर्तन करून पैसा उकळणे होय. देव भेटावा म्हणून तन-मन-धन समर्पित करण्याऐवजी परमार्थ सांगणारेच ‘देवाचिये दारी’ अर्थार्जन करतात. देवाधर्माच्या नावाखाली घडणारे असले वर्तन त्यांना नरकाकडे नेणारे आहे, अशा स्पष्ट शब्दात तुकोबांनी त्याचा निषेध केला आहे -

जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥...

तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरकां जाती ॥४॥

‘हरिचिया भक्तां भर चिंता’ नसते. कारण, त्याचे ‘दु:ख नारायण निवारीत’ असतो. म्हणून त्यास ‘संसाराचे ओझे वाहावे लागत नाही आणि देवराव भक्ताला पराधीन होऊ देत नाही’. तरीदेखील प्रवचनकार, कीर्तनकार परमार्थाची विक्री करतात. कारण, तुकोबांच्या मते संसारासाठीच्या धनसंपत्तीच्या आशेपायी त्यांचे चित्त स्वार्थाचाच विचार असल्यामुळे देव आपल्या अगदी जवळच आहे, आपला आत्मा हाच खरा देव आहे, हेच त्यांना ज्ञात झालेले नसते. आत्मारूपी हरीला न ओळखणारे असे संसारी लोक तुकोबांच्या मते आंधळे होत.

याशिवाय शुभ-अशुभ-शकुन सांगणारे, ऋद्धिसिद्धिच्या नादी लागलेले, इंद्रियसुखांचा अतिरेक करणारे शाक्तपंथी, कोपीन वा शुभ्र वस्त्रे नेसून पक्वान्ने इच्छिणारे, अस्वलासारखी जटादाढी वाढवून हिंडणारे व जमिनीत गाडून घेणारे, मायेला ब्रह्म संबोधून विषयलंपट होणारे व लोकांना कुविद्या शिकवणारे लोक ‘सर्वस्वें बुडाले’ आहेत, असे तुकोबा म्हणतात. यांना ‘स्वधर्माचरणाचे वर्म’ समजले नसल्याने ते ‘मिथ्याचरण’ व ‘मिथ्यावाद’ करत असतात.

थोडक्यात, देव भेटवणाऱ्या भक्तिचे (स्वधर्माचे) स्वरूप व्यक्त करताना भक्ताने पाळावयाच्या आचरणपथ्यांचे स्वरूप स्पष्ट व्हावे म्हणून श्रीतुकोबांनी अगदी निर्भीडपणे पाखंडखंडण केले आहे.

..................................................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......