‘जाहीर प्रदर्शन मांडलं नाही तर ती भावना तुमच्यात नाही’, अशी वृत्ती असणाऱ्या मंडळींना ‘महात्मा गांधी’ कळणं अशक्य आहे!
दिवाळी २०२० - लेख
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 November 2020
  • दिवाळी २०२० लेख महात्मा गांधी Mahatma Gandhi सोशल मीडिया Social Media

जागतिक कीर्तीचे न्यूरोसायंटिस्ट डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांनी मेंदूतील ‘mirror neurons’च्या बाबतीत काही महत्त्वाचं संशोधन केलं. त्याला त्यांनी ‘Gandhi neurons’ असं नाव दिलं. हे ‘Gandhi neurons’ सहसंवेदनासाठी जबाबदार असतात. याचाच असाही अर्थ काढला जाऊ शकतो की, ज्याच्या मेंदूत हे ‘Gandhi neurons’ आहेत, त्या सगळ्यांच्या मेंदूत ‘महात्मा गांधी’ आहेत! 

मेंदूवर संशोधन करणाऱ्या डॉ. रामचंद्रन यांनी या ‘neurons’ला गांधींचं नाव दिलं, कारण या neuronsमुळे आपण दुसऱ्या व्यक्ती/प्राणी यांना झालेला मानसिक व शारीरिक क्लेश/त्रास/वेदना समजून त्या स्वतः अनुभवतो आणि त्याचा आपल्याला त्रासही होतो.

सहसंवेदना ही सहानुभूतीपेक्षा वेगळी आहे. सहानुभूतीमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीची वेदना अनुभवू शकत नाही. त्यामुळे त्याने जास्त त्रासही होत नाही. महात्मा गांधींना लोकांची वेदना जाणवली. ते ज्या अहिंसेच्या मार्गाने गेले तो सगळ्यात कठीण मार्ग होता. ज्याला सहसंवेदना आहे, तीच व्यक्ती अहिंसेच्या मार्गानं जाईल. दुसऱ्यावर जुलूम/जबरदस्ती करून पाहिजे ते मिळवता येईल, पण दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाचं काय? सहसंवेदनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणचे दुसऱ्याचा द्वेष न करणं. अगदी आपलं ज्याने नुकसान केलं, त्यामागेही काहीतरी कारण असतं, प्रत्येकाची मजबुरी असते. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीलाही त्रास असतात, हे समजणं म्हणजेच ‘सहसंवेदना’!

Daniel Goleman या मानसशास्त्रज्ञाने मांडलेल्या ‘social intelligence’च्या थिअरीनुसार आई-वडील/काळजीवाहू व्यक्ती व मूल यांच्यातील भावनिक देवाणघेवाणीतूनच सहसंवेदनेचा पाया घातला जातो. ज्या मुलाला आईवडिलांकडून सहसंवेदना मिळत नाही - नकारात्मक भावना मिळतात - ते मूल पुढे जाऊन दुसऱ्यासाठी सहसंवेदना अनुभवू शकत नाही. हे लहानपणी झालेलं भावनिक कुपोषण गुन्हेगारी, खून, समाजविघातक गोष्टींना जन्म देतं.

इतिहासात होऊन गेलेल्या अनेक हुकूमशहांचा/गुन्हेगारांचा अभ्यास केल्यावर हे आढळून आलेलं आहे (उदा. हिटलर, मुसोलिनी). ६० लाखांपेक्षा अधिक ज्यूंची क्रूरपणे हत्या करणाऱ्या हिटलरचं बालपण कसं असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. लहानपणापासून छळ व क्रूरपणा अनुभवलेल्या व्यक्ती अनेक वेळा भावनिकदृष्ट्या चतूर असून त्या ती क्षमता दुसऱ्याला भावनिकदृष्ट्या वापरून हवी ती कामं करवून घेण्यात सराईत असतात. खून व बलात्कार करणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांच्या बळीला काय वाटेल हे कळत नाही किंवा ते त्यातूनच आनंद मिळवतात. पाहा :

https://www.psychologytoday.com/us/blog/blame-the-amygdala/201309/dissecting-empathy

माणूस हा समाजशील प्राणी आहे. उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार आपला मेंदू प्रत्यक्ष समोर दिसत असलेल्या व्यक्तीच्या हालचाली, हावभाव व आवाज अशा अशाब्दिक संकेतानुसारच संवाद साधू शकतो. कारण आपल्या मेंदूला याच गोष्टी कळतात, असंच प्रोग्रॅमिंग आपल्या मेंदूत आहे. मनुष्य/प्राणी याच्याशी आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधतो, तेव्हा आपल्यात एक भावनिक सर्किट तयार होत असतं. आपण एकमेकांचे अशाब्दिक संकेत स्मरणात ठेवून त्यानुसार नातं पुढं न्यायचं वा नाही, कसं न्यायचं हे ठरवतो. हीच मेंदूची सवय गेली शेकडो वर्षं आहे, पण गेल्या काही वर्षांत आलेल्या समाजमाध्यमांनी आपल्या या मेंदूतील मूळ साच्याला पूर्णपणे धक्का लावलेला आहे. त्याचा परिणाम आपल्याला वाढलेला मानसिक ताण, दुभंगलेली नाती, गुन्हे, जात/धर्मद्वेष व एकटेपणा यांत दिसतो. 

गेल्या १०-१५ वर्षांत माणसाची खरी गरज असलेली भावनिक देवाणघेवाण अत्यंत कमी झालीय. अशाब्दिक देवाणघेवाण अल्प होऊन मातृभाषा नसलेल्या इंग्रजी भाषेचा वापर (बोली व काम) बेसुमार वाढला. वैज्ञानिक शोधानुसार आपल्या मेंदूतील subcortical भागात आपली जीवनमूल्यं ठसलेली असतात. त्यांचा थेट संबंध आतड्याशी असतो, मात्र अत्यंत कमकुवत संबंध मेंदूतील prefrontal cortex यातील शाब्दिक केंद्राशी असतो. त्यामुळेच काय खरं-खोटं आहे, याची जाणीव पहिली पोटात होते (gut feeling) आणि नंतर ती शब्दांत व्यक्त होते. त्यामुळे भाव ही आपली मूळ भाषा आहे. दुर्दैवानं सोशल मीडियावर आपली मूळ भाषा नाही, सगळे शब्दबंबाळ आहेत. त्यामुळे जे लोक आपल्याला सोशल मीडियावर दिसतात, ते फक्त त्याची तयार केली गेलेली प्रतिमा आहे.

Curated profileवरून आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल काहीच कळत नाही. त्यातही असंख्य लुभावणाऱ्या गोष्टी आपल्या आदिम भावना (लैंगिक सुख, भय व हिंसा) चाळवतात. त्या आपल्या समोर नाचत असल्यामुळे आपली एकाग्रता सगळीकडे तुकड्यातुकड्यांत विखुरली जाते. सहसंवेदना जाणवण्यासाठी आपल्याला स्वतःच्या भावना कळणं आवश्यक आहे. त्यासाठी एकाग्रतेची गरज आहे. ती कमी झाल्यामुळे स्वतःतील स्पंदनं कळत नाहीत. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीतील भावनिक स्पंदनं जाणवत नाहीत. आपण जितके विचलित राहतो, तितकी आपली दुसऱ्याची काळजी घेणं वा त्याच्याशी समरूप होणं कमी होत जातं.

सहसंवेदना नैतिक भावनेवर प्रभाव टाकते. परमार्थ हाही सहसंवेदनावर आधारलेला आहे. मात्र जे लोक आपल्याला आवडत नाहीत, ते लोक जर दुःखी दिसले तर अगदीच विरुद्ध भावना (‘schadenfreude’) जागृत होते. त्यातही जेव्हा दोन समाजात मुद्दाम दुही निर्माण केली जाते, त्यामुळे आपलं नुकसान होतं. ‘त्यांनी’ आपला देश लुटला, ‘ते’ लोक ‘आपले’ नाहीत, अशा प्रकारच्या विचारांमुळे सहसंवेदना जागृत न होता द्वेष निर्माण होतो. सहसंवेदना बहुतेक सगळ्यात असतेच, पण ती जागृत करणं गरजेचं आहे.

सोशल मीडियावर संवाद साधताना आपल्या मेंदूतील नैसर्गिक ‘social circuit जागृत नसतं. त्यामुळे जे काही बंध निर्माण होतात, ते कुचकामी, भावनेचा ओलावा नसणारे असतात. सोशल मीडियामुळे लोक आत्मकेंद्री झाले आहेत. आपला तार्किक मेंदू आभासी जगात काम करत नाही. सगळं मोहात टाकणारं खोटं असूनही आपण तर्कात कमी पडतो आणि त्याचं हळूहळू व्यसन लागतं.

..................................................................................................................................................................

शरीराने व मनाने कमकुवत समाजाला दाबून ठेवणं सोपं आहे. असा समाज प्रतिकार करणार नाही, कारण पैशामुळे उच्चशिक्षित मध्यमवर्ग आळशी, भावनाहीन व विचारशून्य झाला आहे की, गरीब लोक मरत असतानासुद्धा कुणी एक प्रश्न विचारत नाही. हे लोक त्यांच्या आयुष्यातील नाती किती सांभाळतात, हाही एक प्रश्नच आहे. असे लोक परक्याचं दुःख कसं समजतील? सांपत्तिक स्थिती व सहसंवेदना यांचा ३६चा आकडा आहे. उचशिक्षित व सधन कुटुंबातील गांधींनी भारतातील गरीब व्यक्तीचं आयुष्य स्वीकारल्यानं ते इतरांची ‘वेदना’ समजू शकले. 

..................................................................................................................................................................

आभासी जगातील मैत्री, दिखावा व मोहाच्या जाळ्यात अडकून प्रत्यक्ष जगाशी संबंध तुटत चालले आहेत. भारतीय लोकांना देवांच्या व नट/नट्यांच्या प्रतिमेचं इतकं वेड आहे की, त्यामुळेच फेसबुक लोकप्रिय आहे. भक्त/चाहते मिळवण्यासाठी असंख्य क्लृप्त्या वापरणारी मंडळी त्या ‘आभासी’ प्रतिमेला स्वतःचं खरं रूप समजतात.

कुठल्याही नात्यात दोन व्यक्ती जी काही देवाणघेवाण करतात, ती समान पातळीवर चालते (आई वडील व मुलं हे नातं सोडून), पण गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे narcissistic वर्तन वाढीला लागून कमालीचा अहंकार वाढला आहे. तो बोलला नाही तर मी कशाला बोलू, मलाच गरज आहे का? अशा विचारामुळे नाती तुटली आहेत. आपला समाज transaction based नात्यांकडे झुकला आहे.

जगात सगळीकडेच उदयाला आलेलं कडवं नेतृत्व हे अशा कोरड्या समाजाचं प्रतीक आहे. प्रतिमेवर अतोनात प्रेम करणारा भारतीय समाज आज सोशल मीडियाने व वृत्तवाहिन्यांनी निर्माण केलेल्या खोट्या प्रतिमेला भुलला आहे. माणसाच्या शारीरिक व मानसिक गरजा समोरासमोरच्या नात्यातच पूर्ण होतात, त्या आभासी जगात पूर्ण होत नाहीत. त्यामुळे भूक तशीच राहते. भुकेली व्यक्ती भूक भागवण्यासाठी काहीही करू शकते.

अशा शरीराने व मनाने कमकुवत समाजाला दाबून ठेवणं सोपं आहे. असा समाज प्रतिकार करणार नाही, कारण पैशामुळे उच्चशिक्षित मध्यमवर्ग आळशी, भावनाहीन व विचारशून्य झाला आहे की, गरीब लोक मरत असतानासुद्धा कुणी एक प्रश्न विचारत नाही. हे लोक त्यांच्या आयुष्यातील नाती किती सांभाळतात, हाही एक प्रश्नच आहे. असे लोक परक्याचं दुःख कसं समजतील? सांपत्तिक स्थिती व सहसंवेदना यांचा ३६चा आकडा आहे. उचशिक्षित व सधन कुटुंबातील गांधींनी भारतातील गरीब व्यक्तीचं आयुष्य स्वीकारल्यानं ते इतरांची ‘वेदना’ समजू शकले. पाहा :

https://healthland.time.com/2010/11/24/the-rich-are-different-more-money-less-empathy/

Abraham Maslow या मानसशास्त्रज्ञाने मांडलेल्या जगप्रसिद्ध ‘Need satisfaction’ सिद्धान्तानुसार प्रत्येक व्यक्ती त्याच्या गरजेनुसार वर्तन करतो. गरज वर्तन घडवून आणते. गरजेचे वेगवेगळे टप्पे पूर्ण झाल्यशिवाय आपण पुढच्या टप्प्यात जात नाही, मात्र सगळ्या गरजा पूर्ण झाल्यावरच माणूस गाठतो. तो शेवटचा टप्पा फार कमी व्यक्तींना लाभतो. म्हणजे ‘self realization’मुळे व्यक्ती अत्युच्च असं विधायक समाजपयोगी काम करते.

Abraham Maslowने अशा self actulized/realized व्यक्तींमध्ये अब्राहम लिंकन, अल्बर्ट आईन्स्टाऊन यांच्यासोबत महात्मा गांधींचा समावेश केला आहे. सध्याच्या आपल्या समाजरचनेत दुर्दैवाने आपण सगळेच ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यापुढे जातच नाही. त्यामुळे self realization ही मानवी जीवनातील अत्युच पातळी गाठणं बहुतेकांना अशक्य होतं. लोक वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जाऊन self realizationकडे जाणारा मार्ग बंद करत आहेत. अपुरी गरज माणसाला अतृप्त ठेवते. स्वतःची गरज पूर्ण करण्यात मग्न व्यक्ती दुसऱ्याला मदत करू शकत नाही. पाहा :

https://www.interaction-design.org/literature/article/self-actualization-maslow-s-hierarchy-of-needs

जाती-धर्मावरून दुही पडलेल्या समाजात सहसंवेदना अत्यल्प असते. त्यामुळे गरिबांची कत्तल बघून लोकांची हृदयं हेलावणं कठीण होतं. यालाही अपवाद आहेत, बरेच लोक आवाज उठवत आहेत, पण जवळपास ८० टक्के मध्यमवर्ग गप्प आहे. कुठलीही क्रांती रक्त सांडल्याशिवाय घडत नाही. अंगावर मार खाऊन, जीव धोक्यात घालून, जीव देऊन बदल घडवून आणले गेले आहेत, मात्र आता रक्त खर्च न करता मोबाईल डाटा खर्च केला जातो. माराऐवजी ट्रोलिंग अंगावर येतं. खोटी ओळख (fake profile) बनवून एका व्यक्तीचा विखारी विचार ‘मार्केटिंग’च्या नवनवीन युक्त्या वापरून असंख्य लोकांच्या थेट मेंदूत टाकला जातो. information overloadने थकलेले मेंदू कुठल्याही मजकुरावर शांतपणे लाईक्स-कॉमेंट्स टाकतात, भांडतात. म्हणजे सगळंच आभासी, खोटं… अंगाला धक्का न लागता सुरू आहे. असे लोक खरंच क्रांती घडवून आणतील? बदल घडवतील?

समाजमाध्यम हे विचारांचं आदानप्रदान करण्याचं माध्यम आहे. पण त्याला मर्यादा आहेत. ज्यांचा ‘उदो उदो’ केला जातो, ते हाडांमासाचे लोक नसून प्रतिमा आहेत, एका विशिष्ट विचारधारेची प्रतिमा (नाव कुठलंही असू देत), जीचा अत्यंत हुशारीनं वापर करून आपल्यातील सहसंवेदना कमी केली जातेय. भूक व लैंगिक भूक या नैसर्गिक गरजा शमवण्यासाठी सामाजिक रचना आहे, ज्यात मानवी नाती आकाराला आली व भावनिक बंध घडत गेले. त्याचा पाया असलेला मानवी मेंदू इंटरनेटमुळे बदलला आहे. ज्याला ‘मिलेनिअल पिढी’ म्हणतात! १९८० ते २००० दरम्यान जन्माला आलेल्या लोकांमध्ये सहसंवेदना कमी आहे. सुख मिळवण्यासाठी माझा जन्म आहे, मला ‘स्पेस’ पाहिजे, लोकांशी काय करायचं असं वर्तन असणारी पिढी क्रांती घडवून आणणं जवळपास अशक्य आहे (आणल्यास चांगलंच!). पाहा :

https://time.com/247/millennials-the-me-me-me-generation/

ही ‘मिलेनिअल पिढी’ पिढी पैसा व त्यातून येणारी सुखं याच्याच विचार करणारी असल्याने ‘सामाजिक बांधीलकी’ हा त्यांच्यासाठी इतर घटना जशा ‘इव्हेंट’ असतात, तसाच ‘corporate social responsibility, CSR’सारखा ‘इव्हेंट’ असतो. त्यामुळेच ‘इव्हेंट’ साजरे करणारी नेतेमंडळी यांना खूप भावतात. प्रत्यक्ष काम करणारी, बदल घडवून आणणारी मंडळी सोशल मीडियासाठी काम करत नसतात, तर त्यांच्या आतील भावनेसाठी काम करतात. त्याला अनेक वर्षं लागतात, हे गेल्या काही वर्षांतील वाढलेल्या दिखाऊवृत्तीमुळे कळणं अवघड झालं आहे.

सोशल मीडियावर टाकलं नाही तर ते घडलंच नाही, जाहीर प्रदर्शन मांडलं नाही तर ती भावना तुमच्यात नाही, अशी वृत्ती असणाऱ्या मंडळींना महात्मा गांधी कळणं अशक्य आहे. ‘असणं व दिसणं’ यातील फरक जोपर्यंत उमजत नाही, तोपर्यंत हा ‘तमाशा’ सुरूच राहील. जे मोबाइल/टीव्हीच्या स्क्रीनवर दिसतंय तेच खरं मानणाऱ्या लोकांना कुणीही उल्लू बनवू शकतं. आणि तेच सध्या जगभर सुरू आहे.

जे काही सुरू आहे, ते विघातक असून त्याने सगळ्या मानवजातीचं नुकसान झालं आहे. मुके प्राणी आपल्यातील एखादा प्राणी गेला तरी शोक करतात, मात्र आपण आपल्यासारखीच माणसं मरत असताना गप्प राहतो. आभासी जगातील नशा उतरल्यावर जे काही दिसेल ते भयानक राहील. त्यामुळे जरा विचार करायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही.

जसे मुन्नाभाईला गांधीजी भेटले, तसे आपल्यालाही भेटू शकतात, फक्त काही वेळा ‘ऑफलाईन’ जाण्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......