सन १८९९ सालीही पुण्यात प्लेगने फार कहर केला. गणपती झाले की तो यावयाचा व शिमग्यापर्यंत टिकून राहावयाचा असा जणू पायंडाच पडून गेला होता.
असा हा प्लेग पुण्यात १५-२० वर्षे भोवला. त्याचा हा येथवर झालेला विस्तार मी आता आटोपता घेतो व दुसऱ्या विषयाकडे वळतो. तथापि जाता जाता मला येथे असे सांगावेसे वाटते की, गेल्या ५० वर्षांच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या चक्रातून या देशात इतकी नवीन इंग्रजी डॉक्टरांची पैदास झाल्यानंतर त्यांपैकी कोणा एकालाही जेथे या नवीन रोगाचे निदान करण्याचे ज्ञान नव्हते, तेथे तो त्यावर औषध काय काढणार आणि उपचार तरी काय करणार?.......