अजूनकाही
१. जगाच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये भूतान सर्वोच्च स्थानावर असला, तरी प्रत्यक्षात तो काही फार आनंदी देश नाही, असा दावा चिनी प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्या देशातील लोक आनंदी नाहीत, असं चिनी मीडियानं म्हटलं आहे. भूतान हा भारताच्या दबावाखाली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या हुकूमशाहांचा आदेश मानण्याशिवाय भूतानकडे दुसरा पर्याय नाही. भारताच्या दबावामुळेच भूतानमधील लोक नाखूश आहेत. भूतानमधील जवळपास एक लाख लोकांना निर्वासित करण्यात आलं आहे. भारताच्या चुकीमुळेच भूतानला असं करावं लागलं आहे, असे दावे चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने केले आहेत.
आता या सगळ्या निर्वासितांबद्दल चीनला खूप उमाळाही दाटून आला असेल आणि भूतानच्या जनतेतमध्ये भारताच्या जोखडापासून सुटण्याची जी तीव्र आस असेल, तिलाही चीनचा बिनशर्त पाठिंबा असेल. मग हा ड्रॅगन प्रेमभराने भूतानला असा जवळ घेईल की, दोन्ही एकरूपच होऊन जातील... चीनने गिळलेल्या तिबेटप्रमाणे. तेव्हा कुठे भूतानमध्ये खऱ्या अर्थाने ‘आनंदीआनंद’ निर्माण होईल.
.............................................................................................................................................
२. डिजिटल जगात मोबाइल फोनशिवाय जगता येत नाही. फोनचा सतत वापर अनिवार्य होऊन बसलेला आहे आणि तो बॅटरीच्या मर्यादित क्षमतेमुळे तापदायक होऊन बसतो. संपूर्ण चार्ज केलेली बॅटरी अर्ध्या दिवसात उतरते, त्यामुळे पॉवर बॅंक नसेल तर मोठी अडचण होते. या बॅटरीच्या कटकटीपासून मुक्त करणारा विनाबॅटरीचा फोन आता लवकरच बाजारात येणार आहे. त्याला चार्जिंगची गरजच नाही. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी तयार केलेला फोन बॅकस्केटर या टेक्नोलॉजीवर चालतो. आजूबाजूचे रेडिओ सिग्नल आणि उपलब्ध प्रकाशाच्या सहाय्याने हा फोन चार्ज होतो.
अहो वॉशिंग्टनवाले काका... आईका ना... आता इथपर्यंत पोहोचलाच आहात, तर इथेच थांबू नका... आणखी थोडं पुढे जा... ज्यात सिमकार्डच टाकावं लागणार नाही, ज्यातून कधीही कोणाशीही बोलावं लागणार नाही, फक्त व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर २४ तास पडीक राहता येईल, हवे तेवढे गेम खेळता येतील, हवे तेवढे सिनेमे, गाणी पाहता येतील, ऐकता येतील, असा एखादा फोन शोधून टाका... आसपासच्या उपलब्ध प्रकाशावरच टॉकटाइम आणि डेटा पॅक यांचा सेल्फ-टॉपअप करून घेणारा.
.............................................................................................................................................
३. भारतीय रेल्वेमधल्या हॉटेल हस्तांतर घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नाही. सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. सर्व काही एनडीएच्या काळात झालं होतं. मला अडकवण्यासाठीच भाजप-आरएसएसनं कट रचला आहे. मी आणि माझा पक्ष घाबरणार नाही. मोदी आणि भाजप सरकारला हटवूनच स्वस्थ बसेन, असा निर्धार लालूप्रसाद यादव यांनी बोलून दाखवला.
लालूजी, आपली लढाई काय कोर्टात लढायची ती लढाच. फक्त आता मी सरकारला आणि मोदींना हटवूनच स्वस्थ बसेन, वगैरे वल्गना टाळत्या आल्या तर पाहा. तुम्ही जेमतेम बिहारपुरते उरला आहात आणि तिथेही योग्य वेळी नितीशकुमारांचा पल्लू पकडला, म्हणून बचावले आहात. तुमचीच हटण्याची वेळ आलेली आहे. काळाची पावलं ओळखण्यातच हुशारी असते, हे आपल्या जुन्या बारामतीकर मित्रांकडून तरी शिकून घ्या.
.............................................................................................................................................
४. सौभाग्याचं लेणं समजल्या जाणाऱ्या मंगळसूत्राबद्दल पसरलेल्या एका अफवेमुळे देशाच्या काही भागांमध्ये महिलांनी चक्क मंगळसूत्र तोडून टाकायला सुरुवात केली आहे. मंगळसूत्रामध्ये असलेल्या लाल मण्यांमुळे पतीचे निधन होतं, अशा अफवांचं पेव फुटल्याने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागातल्या महिलांनी मंगळसूत्र तोडायला सुरुवात केली आहे. पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी इच्छा असेल तर मंगळसूत्र फेकून द्या किंवा लाल मणी तोडून टाका, अशा प्रकारच्या अफवा कोप्पल, चित्रदुर्ग, बल्लारी, देवनागरी, रायचूर जिल्ह्यात पसरल्या आहेत.
बायको वारंवार मंगळसूत्राचं डिझाइन बदलते, नव्या फॅशनचं मंगळसूत्र खरेदी करते आणि खिशाला चाट लावते, याने वैतागलेला एखादा नवरा या अफवेमागे आहे काय, याची शहानिशा करायला हवी. कारण काही का असेना, यानिमित्ताने पती म्हणजेच बाईचं सौभाग्य आणि तो नसला तर बाई अभागी होते, अशा समजुतींच्या फासातून काही महिला मुक्त झाल्या तर ती वेगळ्या प्रकारची मंगळसूत्र-मुक्ती ठरेल.
.............................................................................................................................................
५. उत्सवांचं बाजारीकरण थांबवा असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत राज ठाकरेंची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. बाजारीकरण आणि भपकेबाजी थांबवलीत तर आयोजनावर कुणीही कोणताही आक्षेप घेणार नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सव असो, दहीहंडी किंवा नवरात्र त्यामध्ये डीजे, सेलिब्रिटी, लाऊडस्पीकर यांचा वापर करू नका असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. ढोल ताशांच्या पारंपरिक गजरात दहीहंडी साजरी करा अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. दहीहंडीपर्यंत नियमात बदल झाला नाही तर राज्य सरकार विशेष अध्यादेश काढेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रगतिशील आणि सुधारक म्हणवल्या जाणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री कायदेशीर कोलांट्या मारून सणांच्या नावाखाली केला जाणारा उच्छादी कोलाहल नियमित करून घेण्याच्या मागे आहेत, ही लोकानुनयाची हद्द झाली. पारंपरिक सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या संस्कारी परिवारातून येत नाही, हेही विलक्षण बोलकं आहे. राज ठाकरे हे मात्र राजकीयदृष्ट्या तोट्याची ठरेल अशी, पण सामाजिक शहाणीवेची भूमिका मांडतायत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. सगळे सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे व्हायला हवेत, त्यात बीभत्स बाजारीकरणाचं ओंगळ प्रदर्शन नको, असा आग्रह किती तथाकथित धर्मवादी धरतात, ते आता पाहायला हवं.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment