अजूनकाही
नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तकांविषयीचं पुस्तक मला अतिशय आवडलेलं आहे, हे सुरुवातीलाच सांगून टाकतो. खरं तर रिंढे यांचं हे पुस्तक पुस्तकांविषयीच्या पुस्तकांविषयीचं आहे, हे म्हणणं अधिक सार्थ ठरेल. पुस्तकांविषयीचं पुस्तक म्हणजे काय? ज्या पुस्तकाचा विषय पुस्तक ही वस्तू असतो, ते पुस्तकांविषयीचं पुस्तक असं प्रस्तावनेत त्यांनी म्हटलेलं आहे. अशा पुस्तकांचा विषय साहित्यकृती हा नसतो, साहित्यकृतीकडे एक अस्तित्व म्हणूनही इथं पाहिलं जात नाही, एक भाषिक, सांस्कृतिक कृती म्हणूनही पाहिलं जात नाही; तर पुस्तक ही जड, भौतिक वस्तू इथं अभिप्रेत असते, ही वस्तू जिथं केंद्रस्थानी असते ते पुस्तक म्हणजे पुस्तकांविषयीचं पुस्तक होय. अशा प्रकारच्या मराठीत लिहिल्या गेलेल्या काही पुस्तकांचा उल्लेख रिंढे यांनी केलेला असला तरी प्रस्तुत पुस्तकातील विषयाचा व्याप लक्षात घेता हे अपूर्व असं पुस्तक आहे, असं निश्चितपणे म्हणता येईल.
पुस्तक म्हटलं की लेखक आणि वाचक एवढ्या दोनच गोष्टी सर्वसाधारणपणे लक्षात घेतल्या जातात, पुस्तकाशी निगडित इतर व्यवहारांकडे दुर्लक्ष केलं जातं. मुद्रणपूर्वकाळात पोथी लिहून घेणारा, पोथीची नक्कल करणारा घटक महत्त्वाचा होता. तसंच पोथीत चित्रं काढणारा घटकही होता. जुनी हस्तलिखितं पाहिली तर पोथी लिहिण्यासाठी विशिष्ट शाई व रंग तयार करणारे, बोरू तयार करणारे लोकदेखील होते हे जाणवतं. सुरुवातीच्या काळात पोथी श्रवण करणारे असत, कालांतरानं अल्प का होईना वाचकवर्ग उदयास आला. त्यासाठी पोथ्या नकलून घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवणारा विक्रेत्यांचा तितकाच अल्प असा वर्ग तयार झाला. मुद्रणकाळात लेखकाप्रमाणेच प्रकाशक, संपादक, चित्रकार, पुस्तक-रचनाकार, अक्षररचनाकार, मुद्रक, वितरक, जाहिरातकार, ग्रंथपाल, वाचक-ग्राहक, संग्राहक, दुर्मीळ पुस्तकांचे लिलाव करणारे हे घटकही महत्त्वाचे ठरले. लेखक साहित्यकृतीची निर्मिती करतो, आणि वाचक त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतो. अन्य घटक पुस्तक या वस्तूशी अधिक निगडित आहेत.
वाचक-ग्राहक हा पुस्तकप्रेमी म्हणण्यापेक्षा साहित्यप्रेमी अधिक असतो, तो पुस्तकाकडे पुस्तक म्हणून पाहण्यापेक्षा साहित्य म्हणूनच पाहतो, आणि त्याला संग्राह्य वाटलेल्या साहित्यकृतींचा तो संग्रह करतो. संग्राहक ही कोटी जरा वेगळी आहे. तो वाचक आहे किंवा नाही ही गोष्ट इथं दुय्यम ठरते. त्याला संग्राह्य वाटणाऱ्या विविध पुस्तकांचा तो संग्रह करतो आणि कोणतं पुस्तक त्याला संग्राह्य वाटेल याचा काही नियम नसतो. तो झपाटल्यासारखा एखाद्या पुस्तकाचा शोध घेतो. त्याला हव्या असलेल्या पुस्तकांच्या संग्रहासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. त्यामुळे त्याला ‘पुस्तकप्रेमी’ न म्हणता ‘पुस्तकवेडा’ म्हटलं जातं. जगातल्या पुस्तकप्रेमींनी आणि पुस्तकवेड्यांनी पुस्तकसंस्कृतीला आकार दिला आणि ती आजपर्यंत टिकवून ठेवली.
प्रस्तुत पुस्तकात रिंढे यांनी पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचा उदबोधक परिचय करून दिला आहे. तो अत्यंत वाचनीय तर आहेच, त्याचबरोबर वास्तविक पुस्तकसंस्कृती म्हणजे काय असते याची खोलवर जाणीव करून देणारा आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच पुस्तकसंग्रहाविषयीचा ‘अनपॅकिंग माय लायब्ररी’ हा अजरामर निबंध लिहिणाऱ्या वॉल्टर बेंजामिन या जर्मन लेखकाविषयीचा लेख आहे. तो एक महान लेखक होता, त्याप्रमाणेच तो पुस्तकप्रेमी आणि पुस्तकवेडाही होता. रिंढे म्हणतात, वॉल्टर बेंजामिन कोणीही असो किंवा काहीही असो, माझ्यासाठी तो जिवलग आहे, कारण तो पुस्तकवेडा होता. त्याच्या लेखनात कितीही वैविध्यपूर्णता दिसत असली तरी सर्व लेखनात एक धागा ठळकपणे दिसतो तो म्हणजे पुस्तक. या लेखात रिंढे यांनी अगदी थोडक्यात बेंजामिनचं व्यक्तिचित्र रेखाटलं आहे, ते विलोभनीय आहे. वॉल्टर बेंजामिनला पुस्तकेच नव्हे तर तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू जमवण्याचा नाद होता. याच नादातून त्यानं शेकडो पुस्तकांमधून निवडलेल्या उताऱ्यांचाही प्रचंड संग्रह केला. त्यातून त्याला युरोपीय आधुनिकतेच्या इतिहासाचा पट साकारायचा होता.
असाच नाद असलेल्या आणखी एका लेखकाविषयी या पुस्तकात लेख आहे. तो लेखक म्हणजे उम्बेर्तो इको. त्याच्या ‘द नेम ऑफ द रोझ’, ‘फुकोज पेंडुलम’, ‘प्राग सिमेटरी’ इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्धच आहेत. ‘धिस इज नॉट दि एंड ऑफ द बुक’ या पुस्तकाविषयीच्या पुस्तकातून उम्बेर्तो इकोचे पुस्तकप्रेम आणि पुस्तकवेड या दोन्ही गोष्टी उलगडल्या आहेत. इको हा केवळ कादंबरीकार नव्हता, तो समीक्षक, तत्त्वज्ञ आणि चिन्हमीमांसक म्हणूनही जगप्रसिद्ध आहे. अलीकडेच फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याचे निधन झाले. ‘धिस इज नॉट द एंड...’ या पुस्तकात प्रसिद्ध फ्रेंच पटकथाकार-अभिनेता जँ क्लॉद कॅरिए यांच्याशी इकोने केलेल्या गप्पा समाविष्ट आहेत. हा लेख वाचत असताना मूळ पुस्तक आपण वाचलं पाहिजे अशी प्रेरणा मला झाली! इकोचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. बाराशे दुर्मीळ पुस्तकांसह पन्नास हजार पुस्तकं त्याच्या संग्रहात होती.
पुस्तकं-हस्तलिखितं या विषयाभोवती गुंफलेल्या कादंबऱ्या लिहिणारा लेखक हेही इको यांचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, ‘द नेम ऑफ द रोझ’ या त्यांच्या कादंबरीतील मठात ज्या हत्या झाल्या, त्याचं कारण एक दुर्मीळ व दडपून ठेवलेलं हस्तलिखित होतं. ते हस्तलिखित कोणी वाचू नये म्हणून त्याच्या कडांना विष लावलेलं होतं. ते हस्तलिखित कशाचं होतं? अॅरिस्टॉटलचं पोएटिक्स आपल्याला ठाऊक आहे. उपलब्ध पोएटिक्समध्ये केवळ ट्रॅजेडीविषयीचं विवेचन आहे. कॉमेडीविषयीचं विवेचनही अॅरिस्टॉटलने केलेलं असणार. ते कुठं आहे? तेच हे हस्तलिखित, मठात दडपून ठेवलेलं, अनेकांच्या मृत्यूला कारण झालेलं! ते असो. फुकोने आपल्या जवळच्या संग्रहातील अनेक चित्रं, रेखाटनं अन्य कादंबऱ्यांत वापरलेली आहेत.
या लेखात इकोने पुस्तकाविषयी मांडलेला एक विचार दिलेला आहे, तो मननीय आहे. इकोने म्हटलं आहे, पुस्तकं मानवी जीवनातून नाहीशी होतील अशी भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. जोवर मानवजात भाषेचा वापर करते आहे आणि जोवर वाचन ही क्रिया टाळता येत नाही, तोवर पुस्तक ही वस्तू या ना त्या रूपात वापरात राहणारच. इकोविषयी आणखी एक लेख या पुस्तकात आहे- ‘एका तरण्या कादंबरीकाराचा कबुलीजबाब’. कादंबरीलेखनाला सुरुवात करण्यापूर्वी इको किती परिश्रम घेत असे हे या लेखातून कळतं. कादंबरी लिहिण्याची कल्पना मनात आली की, आपण काय करतो, याविषयी इकोने म्हटलं आहे- कागदपत्रं जमवतो, संबंधित ठिकाणांना भेटी देतो, नकाशे काढतो, इमारतींचे\जहाजांचे आराखडे तयार करतो आणि पात्रांची रेखाचित्रं काढतो. मराठी कादंबरीकार अशीच काही पूर्वतयारी करत असतील तर त्याविषयीही एक पुस्तक होऊ शकेल!
या पुस्तकातील लेखांमध्ये आणखीही काही पुस्तकवेड्यांची शब्दचित्रं आहेत. ‘अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम’ या लेखात झॅक ग्युरीन या पुस्तकवेडानं, मुख्यत: मार्सेल प्रूस्त या लेखकानं, झपाटलेल्या इसमाची कहाणी आलेली आहे. त्यानं शेकडो दुर्मीळ पुस्तकं, चित्रं, जुन्या वस्तू जमवल्या होत्या. त्यानं जमवलेला व जतन केलेला प्रूस्तसंग्रह मार्सेल प्रूस्तवर संशोधन करणाऱ्यांना नंतर खूपच उपयुक्त ठरला.
‘प्राध्यापकाचा बनला पुस्तकविक्या’ या लेखात रिक गेकोस्की हा प्राध्यापक पुस्तकवेडामुळे पुस्तकविक्या कसा बनला त्याची कहाणी आलेली आहे. काही व्यक्तींचं जगणं या ना त्या प्रकारे पुस्तकांशीच कसं निगडित झालेलं असतं याविषयीचे काही लेखही या पुस्तकात आहेत.
‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’च्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात नाहीशा झालेल्या पुस्तकांचं नाहीसं होणं हे किती वेगवेगळ्या पातळ्यांवर होत असतं हे दाखवलं आहे. स्टुअर्ट केली या गृहस्थाने नाहीशा झालेल्या पुस्तकांची एक यादीच केली. केली यांच्या मते साहित्याचा इतिहास म्हणजे खरं तर नाहीशा झालेल्या पुस्तकांचाच इतिहास आहे. मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहास वाचताना असं वाटत राहतं की, कितीतरी हस्तलिखितं काळाच्या ओघात नाहीशी झाली असावीत. महानुभाव पंथीयांनी हस्तलिखितं टिकून राहावीत यासाठी विविध उपाय केले होते. अॅरिस्टॉटलच्या पोएटिक्सचा दुसरा भाग अद्याप सापडलेला नाही. याच लेखात रिंढे यांनी म्हटलं आहे, एखाद्या वैचारिक प्रवाहात चार-पाचशे वर्षं निर्माण होत राहिलेली सर्व पुस्तकं समूळ नाहीशी करणं ही अशक्य वाटणारी गोष्ट भारतीयांनी शक्य करून दाखवली आहे! स्टुअर्ट केली यांच्या पुस्तकात पुस्तकांचे नाहीसं होणं जसं सांगितलेलं आहे, तसंच पुस्तकं टिकवून ठेवण्यासाठी माणसांची चाललेली धडपडही सांगितली आहे. वेगवेगळ्या लिप्यांमध्ये बंदिस्त असलेलं महानुभावी साहित्य संशोधकांनी परिश्रम करून अभसकांसाठी उपलब्ध करून दिलं ही आपल्याकडची हकीकत आहे.
‘पुस्तकी कथा’, ‘वाचक जेव्हा कादंबरीचं पात्र बनतो’, ‘फिक्शनमधली पुस्तकं’, ‘द्युमा क्लब’ हे या पुस्तकातले लेख पुस्तक हे केंद्र असलेल्या कथात्म साहित्याविषयीचे आहेत. ‘पुस्तकी कथा’ या लेखात झोरान झिवकोविच या लेखकाच्या ‘द लायब्ररी’ या संग्रहातल्या कथांचं जग पुस्तकांनी कसं भरलेलं आणि भारलेलं आहे हे रिंढे दाखवतात. ‘होम लायब्ररी’ या कथेतील नायकाला त्याच्या पत्रपेटीत एके दिवशी गडद पिवळ्या रंगाचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक आढळतं. पुन्हा तो पत्रपेटी उघडतो तेव्हा आणखी एक तसंच गडद पिवळ्या रंगाचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक आढळतं. काही वेळानं तो पत्रपेटी उघडतो तेव्हा तसंच पुस्तक पुन्हा तिथं आढळतं. हा क्रम अव्याहतपणे सुरू राहतो. दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आठ हजार पुस्तकांनी त्याचं घर भरून गेलेलं असतं. वाचत बसायला खुर्ची ठेवायलाही जागा उरत नाही. ‘इन्फर्नल लायब्ररी’ या कथेचा नायक मृत्यूनंतर नरकात गेल्यावर त्याला अनंत काळर्पंत वाचत बसण्याची शिक्षा दिली जाते. जिवंतपणी त्यानं एक पुस्तक चौथ्या पानार्पंत वाचलेलं असतं, तर दुसऱ्या पुस्तकातला परिचयपर परिच्छेद नजरेखालून घातलेला असतो. तेव्हा त्याला मिळालेली शिक्षा योग्यच आहे असं म्हटलं पाहिजे! ‘स्मॉलेस्ट लायब्ररी’च्या नायकाच्या हाती असं एक पुस्तक येतं की, जे मिटलं आणि नंतर उघडलं की त्यात नवीच कादंबरी असते. ‘नोबल लायब्ररी’मध्ये हार्डकव्हर पुस्तकांचाच संग्रह केलेल्या नायकाला पेपरबॅक पुस्तकाविषयी कमालीचा तिटकारा असतो. तर एके दिवशी त्याच्या कपाटात एक पेपरबॅक पुस्तक आढळतं. तो ते पुस्तक कचराकुंडीत टाकून येतो, तर ते पुस्तक पुन्हा कपाटात हजर. शेवटी ते तो खाऊन टाकतो. ‘वाचक जेव्हा कादंबरीचं पात्र बनतो’ या लेखात इतालो कॅल्विनो या लेखकाच्या ‘इफ ऑन अ विंटर्स नाइट अ ट्रॅव्हलर’ या कादंबरीत वाचकच त्या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असतो.
या पुस्तकातला प्रत्येक लेख वाचनीय असाच आहे. त्यातही निवडाचे झाल्यास ‘पुस्तकांच्या सहवासात’, ‘बुकशेल्फचा इतिहास’, ‘समासातल्या नोंदी’, ‘एका शब्दकोशाची जन्मकथा’, ‘पुस्तकांनी रचलेली चरित्रं’ इत्यादी सांगता येतील. पुस्तक या एका गोष्टीचे किती पैलू आहेत, आणि त्या प्रत्येक पैलूबद्दल कुतूहल असणाऱ्या लोकांनी अतिशय कष्ट घेऊन पुस्तकं लिहिलेली आहेत, हे एक आपल्याला सर्वस्वी अनोळखी असं जग ‘लीळा पुस्तकांच्या’मधून साकारत जातं. याच लेखांमध्ये आणखी एका लेखाचा समावेश करतो. तो म्हणजे ‘हाऊ टू टॉक अबाऊट बुक्स यू हॅवन्ट रेड’ या पुस्तकाविषयी लिहिलेला ‘न-वाचनाचं संकीर्तन’ हा लेख होय. न वाचलेल्या पुस्तकाविषयी जाहीरपणे बोलावं अथवा लिहावं कसं याविषयीचा काहीएक नुस्खा त्या पुस्तकात आहे म्हणे! ते पुस्तक मी न वाचलेलं नसल्यामुळे ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक न वाचताच मला लिहिणं शक्य झालं नाही. परंतु पिएरे बायर्ड यांचं ते पुस्तक मी वाचलेलं असतं तरी मला ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक अखेरच्या पानापर्यंत वाचतच राहावं असंच वाटलं असतं. अशा प्रकारची आणखी काही पुस्तकं नीतीन रिंढे यांनी लिहावीत, अशी अपेक्षा निर्माण करणारं प्रस्तुत पुस्तक निश्चितच आहे.
.............................................................................................................................................
लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे
प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई
मुखपृष्ठ - नीतिन दादरावाला
पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383
.............................................................................................................................................
लेखक वसंत आबाजी डहाके प्रसिद्ध कवी, समीक्षक आहेत.
vasantdahake@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment