पुस्तकांनी नादावलेल्यांच्या जगाची सफर
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 July 2017
  • ग्रंथनामा Booksnama लीळा पुस्तकांच्या Leela Pustakanchya नीतीन रिंढे Nitin Rindhe पुस्तकांविषयीची पुस्तकं Book on Books लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha

‘मैं किताबों की शरण में वैसे ही जाता हूँ, जैसे लोग धुआंधार बमबारी से बचने के लिए अण्डरग्राउण्ड डेरे में जाते हैं।’ - निर्मल वर्मा

वाचन ही एकट्यानं आणि गंभीरपणे करावयाची कृती आहे. या कृतीत सातत्य आणि शिस्त असणं या अत्यंत मूलभूत व आवश्यक गोष्टी आहेत. यासाठी प्रसंगी वाचकाला सगळ्या बंधनांपासून स्वत:ला बाजूला करून घेत एकटं पडावं लागतं. यामुळे ‘स्वार्थी’, ‘तुसडा’, ‘क्रूर’ अशी विशेषणं आपल्या नावामागे लावली जातील, हे ठाऊक असूनही त्याला ही जोखीम पत्करावी लागते. निर्मल वर्मा यांनी या कृतीला म्हणूनच ‘अण्डरग्राउण्ड’ होण्याशी जोडलेलं आहे.

प्रत्येकाच्या वाचनाची निमित्तं वेगवेगळी असू शकतील, पण म्हणून या सगळ्या प्रकारच्या वाचकांना वाचन, पुस्तकं यांविषयी जिव्हाळा असेलच असं नाही. हिंदी सिनेमे, क्रिकेट यांविषयीचं प्रेम जसं आपल्या समाजात लहानपणापासून आपसूकच निर्माण होत जातं, त्याप्रमाणे पुस्तकांविषयीचं प्रेमही लहान वयातच निर्माण होईल, अशी काही ठोस व्यवस्था आपल्याकडे नाहीच.

यासाठी काहीएक व्यवस्था उभी करायची झालीच तर ‘पुस्तकांविषयीची पुस्तकं’ हा त्यातील एक महत्त्वाचा घटक होऊ शकेल. मराठीत या स्वरूपाच्या पुस्तकांचं प्रमाण तुरळकच आहे. नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक म्हणूनच या प्रकारातील अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक ठरतं. या पुस्तकाला लिहिलेल्या ‘विषयांतर...’नामक मनोगतात त्यांनी पाश्चात्य देशांतील पुस्तकसंस्कृती आणि वाचनसंस्कृती यांविषयीची त्यांची मतं, त्याचबरोबर आपल्याकडील वाचनसंस्कृती आणि ‘पुस्तकांविषयीचं पुस्तकं’ या प्रकारात केलं गेलेलं लेखन, समाजात वाचनसंस्कृती रुजावी, यासाठी ही पुस्तकं कशी साहाय्यभूत ठरू शकतात आणि या विषयासंदर्भात आपण एकूणच आजपर्यंत गाठलेली मजल यांविषयी सविस्तर लिहिलं आहे.

पाश्चात्य समाजात सगळ्या थरांतल्या लोकांत ‘पुस्तक’ या गोष्टीविषयी अपार जिव्हाळा, प्रेम असल्याचं दिसून येतं. पुस्तकं, लेखकांच्या अप्रकाशित डायऱ्या, पत्रं यांची जपणूक करण्याकडे त्या लोकांचा विशेष कल असतो. आणि म्हणूनच त्या समाजात पुस्तकांचा अनेक अंगांनी विचार, अभ्यास, संशोधन होऊ लागलं. पुस्तकांची मुखपृष्ठं, अर्पणपत्रिका, समासातल्या नोंदी, बुकमार्क्स, बुकशेल्फ, यांविषयी तिथल्या संशोधकांनी स्वतंत्र पुस्तकं लिहिली आहेत. त्यात नवनवीन विषयांची भरही सातत्याने पडत राहते. आता तर ‘पुस्तकांतल्या तळटिपांचा इतिहास’ या विषयावरही संशोधन सुरू आहे. लवकरच हे संशोधनही पुस्तकरूपाने प्रकाशित होईल. नीतीन रिंढे यांनी उपरोक्त उल्लेख केलेल्या विषयांसंबंधीच्या पुस्तकांवरील लेख आपल्या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या रहस्यकथा-कादंबऱ्या यांवरही दोन लेख आहेत. पुस्तकचोरी याविषयीची चर्चाही एका लेखात आहे. न वाचलेल्या पुस्तकांविषयी जाहीरपणे बिनदिक्कत कसं बोलावं याविषयी चर्चा करणाऱ्या एका पुस्तकावरील लेखही आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा इतिहास कथन करणाऱ्या पुस्तकाविषयी लिहिताना त्यांनी केवळ त्या मुखपृष्ठांविषयीच लिहिलंय असं नाही, तर त्या त्या पुस्तकाच्या आशयासाठी ती मुखपृष्ठं कशी समर्पक होती हेही सोदाहरण पटवून दिलं आहे.

पुस्तकांच्या विविध बाजूंविषयीचं हे लेखन वाचून आपल्याकडेही कोणाला अशा तऱ्हेचा अभ्यास-संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली तर या पुस्तकाच्या लेखनाचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल.

लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे

प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

मुखपृष्ठ - नीतिन दादरावाला

पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

नीतीन रिंढे यांनी आपल्या या पुस्तकात केवळ इतर देशांतल्या पुस्तकांच्या इतिहासाविषयीचा किंवा विविध पैलूंचा आढावा घेतलेला नाही तर प्रसंगोपात्त भारतातील पुस्तकनिर्मितीच्या इतिहासावरील संशोधन, त्याविषयी प्रसिद्ध झालेली पुस्तकं, या विषयांची माहितीदेखील दिलेली आहे. त्या त्या देशांत ज्ञानकोश, शब्दकोश यांच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर कसं काम केलं जातं, तिथले समीक्षक-संशोधक कशा तऱ्हेनं आपलं लेखन अद्ययावत, परिपूर्ण व्हावं यासाठी अपरिमित कष्ट उपसत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय परिस्थिती आहे, याबद्दलही ते भाष्य करतात.

वॉल्टर बेंजामिन, अल्बर्तो मँग्वेल, उम्बर्तो इको या समीक्षक-संशोधक-पुस्तकसंग्रहाकांविषयी स्वतंत्र लेख आहेत. या लेखकांची अनावश्यक ठरू शकेल अशी चरित्रात्मक माहिती देण्याचं त्यांनी टाळलं, हे बरंच झालं. संबंधित लेखकाचं वाचन, पुस्तकसंग्रह यांतल्या चढ-उतारांना पूरक ठरेल अशीच माहिती ते देतात. त्यामुळे लेखांची लांबी आटोक्यात आली आहे. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात मिळालेली सगळी माहिती येनकेनप्रकारेण आपल्या लेखात ‘कोंबून’ आपली ‘विद्वत्ता’ प्रदर्शित करण्याच्या घातकी लालसेपासून हे लेख कोसो दूर आहेत.

‘वाचक जेव्हा कादंबरीचं पात्र बनतो...’ या लेखात वाचकाला कादंबरीचं पात्र बनवून लिहिल्या गेलेल्या इतर भाषांतील कादंबऱ्यांबद्दल लिहिताना ते मराठीतील अशा प्रकारच्या लेखनासंबंधी काय परिस्थिती आहे, याचीही माहिती देतात. युरोपीय कादंबऱ्यांत पुस्तकाला महत्त्वाचं स्थान दिलं जातं, पण तसं भारतीय भाषांतल्या कादंबऱ्यांमध्ये मात्र होताना आढळत नाही, याचा संबंध ते ‘आपल्या समाजाच्या अविकसित पुस्तकसंस्कृतीशी’ जोडतात. किंवा कादंबरीकारांनी स्वत:च्या लेखन प्रक्रियेविषयी लिहिलेल्या पुस्तकांबाबत लिहिताना मराठीत अशा स्वरूपाचं लेखन कोणत्या स्तरावर आहे, याविषयीही ते टिप्पणी करतात. ‘फिल्शनमधली पुस्तकं’ या लेखात त्यांनी ज्या कादंबऱ्यांच्या आशयसूत्रात पुस्तकं केंद्रस्थानी आहेत, अशा मोजक्या कादंबऱ्यांचा आढावा घेतला आहे. त्या कादंबऱ्यांविषयीचं त्यांचं विवेचन आणि त्या कादंबऱ्यांची रोचक कथानकं, यांविषयी वाचल्यानंतर अशा स्वरूपाच्या अधिकच्या काही कादंबऱ्यांचा शोध घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.

उम्बर्तो इको

‘‘एका ‘तरण्या’ कादंबरीकाराचा कबुलीजबाब’ हा लेख तर कोणत्याही कादंबरीकाराला मार्गदर्शक ठरू शकेल असा आहे. उम्बर्तो इको या लेखकाच्या लेखनप्रक्रियेविषयी, लेखनासाठी तो घेत असलेल्या मेहनतीविषयीची माहिती या लेखातून मिळते. लेखकावरच्या प्रेमानं त्याच्याविषयी उपलब्ध होऊ शकणाऱ्या सर्व वस्तू जमवण्याचं झपाटलेपण काय असू शकतं याची प्रचीती ‘अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम’ हा लेख वाचल्यानंतर येते. त्या देशांत लेखकाचं साहित्य तर जपलं जातंच, पण त्याचबरोबरीने लेखकाच्या इतर बारीकसारीक वस्तू, छोटे छोटे कागदाचे चिटोरे यांचाही सांभाळ करण्याची वृत्ती दिसून येते. या विषयासंबंधी आपल्या समाजात किती ‘आनंदीआनंद’ आहे, याविषयी खरं तर रिंढे यांना स्वतंत्र लेखही लिहिता येईल.

पुस्तकं आणि वाचन यांबद्दलच अनास्था असणाऱ्या आपल्या समाजात म्हणूनच तर महात्मा गांधीजींची सही असलेलं पुस्तक रस्त्यावरच्या रद्दीवाल्याकडे मिळून जातं! (हे पुस्तकही रिंढे यांनाच मिळालं होतं). जर पुस्तकांचीच अशी दशा असेल तर त्यांच्या वस्तू संग्रहालयातून चोरीला जातात, याचं आश्चर्य वाटू नये. असो. हा लेख वाचून निदान सुजाण, जाणकार मंडळींनी तरी आपल्याकडे लेखकाची पत्रं, डायऱ्या, हस्तलिखितं, इतर सामग्री यांची जपणूक करण्यासंबंधी काहीएक सोय करता येईल का, या अंगानं विचार करायला हरकत नाही. या कामात त्या त्या लेखकांच्या प्रकाशकांनाही हातभार लावता येईल.

लेखक-समीक्षक यांनी वाचलेल्या पुस्तकांवरून त्यांची चरित्रं लिहिली गेलीत, अशा पुस्तकांविषयीचे लेखही आहेत. हिटलरच्या पुस्तकसंग्रहाविषयी, वाचनाविषयी मागोवा घेणाऱ्या पुस्तकावरील दीर्घ लेखही आहे. वाचक कसा असू नये याचं आदर्श उदाहरण म्हणजे हिटलर. जो कलाविचार, तत्त्वज्ञान यांविषयांवरील पुस्तकंही वाचत होता आणि त्याची प्रत्यक्ष कृती मात्र या प्रकारच्या पुस्तकांतून होणाऱ्या संस्कारांच्या विरुद्ध जाणारी होती. तसेच एकाच प्रकारच्या विचारांचं समर्थन करणारी पुस्तकं तो वाचत होता आणि त्यामुळे त्याच्यात संकुचितपणा, आपल्या विचारांविषयीची कट्टरता दिसून येते. म्हणूनच वाचनाविषयीची आपली भूमिका कशी असू नये, हे ठरवण्यासाठीदेखील हा लेख साहाय्यभूत ठरू शकतो.

प्रत्येक लेखात वर्णन केलेले किस्से, लेखक आणि पुस्तक विक्रेत्यांच्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमती, काही लेखकांचं तऱ्हेवाईक वागणं, दुर्मीळ पुस्तकांचे व्यवहार, ती पुस्तकं मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे संग्राहक, यांमुळे आपण कधी विस्मयचकित तर कधी स्तब्ध होऊन जातो. एखादा पट्टीचा वक्ता एखाद्या विषयाची पार्श्वभूमी, विषयप्रवेश आणि त्याचे विविध आयाम अत्यंत खेळकर, गमतीशीर शैलीत अशा प्रकारे उलगडत जातो, की आपण त्या विषयाच्या शेवटापर्यंत पोहोचलो आहोत, हेही आपल्या ध्यानी राहत नाही.

रिंढे यांच्या लेखांची शैली ही बहुतांशी अशीच आहे. हे पुस्तक हाती घेतल्यानंतर कधी वाचून संपतं, तेही कळत नाही. याचं श्रेय त्यांच्या सुबोध मांडणीला जातं. उम्बर्तो इको या लेखकाच्या भाषेबाबत ते एके ठिकाणी म्हणतात की, ‘इकोचं लेखन कोणत्याही विषयावरचं असो, ते अकादमिक क्षेत्राबाहेरच्या सर्वसामान्य वाचकाला कधीच कंटाळवाणं, अनाकलनीय होत नाही. खेळकर आणि सुबोध भाषाशैली ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्यं.’ हेच वर्णन रिंढे यांच्या लेखनशैलीबाबतही तितकंच चपखलपणे लागू होऊ शकेल. जेव्हा एखादा विषय लिहिणाऱ्याला पूर्णपणे कळलेला असतो, तेव्हाच अशी मांडणी शक्य होते. पुस्तकाविषयी किंवा लेखांविषयी लिहिताना अत्यंत साध्या भाषेत त्यांचं मर्म सांगण्याची हातोटी त्यांना लाभलेली आहे.

काही लेखांत एखाद्या पुस्तकाविषयी लिहिताना दुसऱ्याच एखाद्या पुस्तकातील कथेचा उल्लेख येतो; एखाद्या पुस्तकातील लेखाविषयी लिहिताना एखाद्या कादंबरीचा उल्लेख येतो, पण त्यात काहीएक सूत्र असतं. एखादं पुस्तक कोणत्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं, त्यातील आशय-विषय काय इथवरच विवेचन करून ते थांबत नाहीत, तर ते पुस्तक वाचकाने का वाचायला हवं याचंही मार्गदर्शन करतात.

नीतीन रिंढे यांच्या या सर्व लेखनातील वेगळेपण असं की, त्यांनी केवळ या लेखकांचं कौतुकच केलेलं नाही तर आवश्यक तिथं त्या लेखकाने मांडलेल्या विचारांतील उणिवा, अपुरेपणा यांविषयीही अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी केली आहे.

साधारणपणे आपण म्हणू शकतो की, पुस्तकं आणि वाचन या दोन बाबी केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकांनी नादावलेल्या जगातील एका रहिवाशानं इतर समानधर्मी रहिवाशांचा, त्यांच्या वाचन आणि पुस्तकवेडाचा करून दिलेला हा परिचय आहे. अभ्यासाबाहेरची पुस्तकं म्हणजे निव्वळ रद्दी अशी समजूत असणाऱ्या घरात राहूनही निग्रहानं ग्रंथसंग्रह करू इच्छिणाऱ्या आपल्या समाजातील कोणाही ग्रंथसंग्राहकाला नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे मोठाच आधार वाटू शकेल.

हे पुस्तक वाचल्यानंतर या संग्राहकाच्या हेही लक्षात येईल की, त्याच्याकडे केवळ भरपूर पैसे आणि चांगल्या लेखकांची-पुस्तकांची यादी असून भागत नाही, तर त्याला सातत्यानं ही पुस्तकं मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. यासाठी त्याला पुस्तकांच्या दुकानांना, रस्त्यावरच्या पुस्तकविक्रेत्यांच्या स्टॉल्सना, रद्दीच्या दुकानांना भेटी देत राहाव्या लागतात. एखादा मध्यमवर्गीय चाकरमनी ज्याप्रमाणे अधूनमधून एलआयसीची पॉलिसी कधी ड्यू होणार हे पाहत असतो, तसंच पुस्तकसंग्राहकाला अधूनमधून पुस्तक प्रदर्शनांच्या तारखांकडे लक्ष ठेवावं लागतं.

वाचनाला जगण्यातील महत्त्वाची, प्राधान्याची बाब समजणारा कोणताही वाचनवेडा हा कोणत्याही टप्प्यावर समाधानी नसतोच. नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे आपण समृद्ध होऊ, पण समाधानी नक्कीच होणार नाही. वाचावयाच्या पुस्तकांच्या यादीत आणखी काही नावांची भर पडेल. विनोद कुमार शुक्ल या हिंदीतील थोर लेखकाने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, नुसत्या वाचनासाठी किमान ५०० वर्षांचं आयुष्य असायला हवं किंवा संपूर्ण आयुष्य रविवारच्या दिवसासारखं तरी असायला हवं. या वक्तव्यातून स्पष्ट होते ती वाचनाविषयीची प्रचंड असोशी. तळमळ. नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे ही असोशी, तळमळ यांत आणखीच वाढ होते आणि हेच या पुस्तकाचं खरं यश आहे.

लेखक प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......