अजूनकाही
नुकतीच कणकवलीमध्ये युनिसेफ आणि चरखा कम्युनिकेशन डेव्हलपमेंट नेटवर्कतर्फे तेथील मुलांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल मनमोकळेपणानं लिहिलं. त्यातून कोकणातल्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थितीवर काही प्रमाणात प्रकाश पडतो. मुलांची ही मनोगतं संपादित स्वरूपात पण त्यांच्याच भाषेत.
.............................................................................................................................................
‘उद्या गवळदा असा रे!’
कट्टयावरचे बोलत होते, ‘उद्या गवळदा असा रे!’ वनातल्या पाणवठ्याजवळ नैवेद्य दाखवून भोजन करायचे आणि गाऱ्हाणे घालायचे- ‘आमच्या गार्इ-गुरांचं रक्षान कर रे’... एवढीच आर्ततेची हाक... आस्था गाववाल्यांची. मात्र गवळद्याची रीत ऐेकून मुंबर्इकर चाकरमानी शंकेने ग्रस्त होतो. ‘देवाला साकडं घालणं बालीशपणा आहे’, त्याला वाटतं. त्याच्या नजरेकडे बघून त्यातला एक उठतो आणि म्हणतो- ‘रानात जातंय, मानलेल्या देवाक सर्वांसाटी साकडं घालतंय, काय वार्इट आसा?’
मुंबर्इकर विचार करतो...‘यांच्या रीतीभातीत स्त्री कुठे आहे? ग्रामीण भागात स्त्रियांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की काय? गावची स्त्री अजून त्रिसूत्रात अडकलेली आहे- प्रथा- परंपरा- रीत. शहरातली स्त्री... तिला या परंपरांमध्ये अडकून राहणं शक्य नसतं... ती शिक्षण-नोकरी या द्विसूत्रात अडकलेली. पण गावी आल्यावर मासिक पाळीत कोपऱ्यात बसण्याची सक्ती करतात. देवा-धर्माचा कोप होर्इल अशी भीती घातली जाते. शहरात दहा बाय दहाच्या खोलीतही देवदेवक बसवतात. त्यांच्यावर देव कोपला असं पाहिलं का?’
गावावाले म्हणतात- ‘तां तुमचा मुंबर्इत चलत असात पण ह्या नाय चलाचा.’
गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होते.
- कालचो पोर ह्या, आमका शिकूक इलो हा मुंबर्इवरना.
- उभो जन्म गेलो माझो ह्या सर्वा करून, मुंबर्इची येडा...म्हनतंत ना हेंका धड काय माहिती नसता आणि उगाचच येवन शहरी तोरो दाखवतत.
- ह्या म्हणजे आसां झाला- ‘वाघ बसलो झाळी आणि केडली दाखवतत नाळी’.
- अरे, हे मुंबर्इचे येतत शिकान आणि गावच्या प्रॉपर्टीवर डोळो ठेवतत.
मुंबर्इकराच्या काकाचा संयम सुटतो- ‘गवळद्याक नाव ठेवतंस? अंधश्रद्धा म्हनतंस? ह्यात कसली आली अंधश्रद्धा? आमी देवाधर्माच्या नावानं कोनाक लुटलंव? की बळी देतंव? की कोनाचं वार्इट करतंव? ही एक परंपरा असा. आमका पन समजता...फक्त देवाक साकडा घालून काय होनार नाय...कष्ट करूक व्हया... ता तर करतंवच... दिसता ना तुका ही नारळी -पोफळी... काजी... भात... कलमां?... तू काय आमका शिकवतंस... कष्ट खय चुकले हत आमचे? आता पेरनी झाली हा. चिखल होउक होयो. मगे लावनी करूक व्हर्इ. पौस वार्इच मोठ्यान पडाक होयो... मेलो वार्इच पडान डोळ्याक पानी लावता नी पळॉन जाता... शिरा पडली त्याचार ती... ऱ्हवता हा खय?... कष्ट खय चुकले हत आमचे? पुन्ना पेरनी करूची लागतले... मी, माझी बायेल, माझी पोरां कष्ट करतत. तू तुझो वाटो मागाक येतलंस...’
मूळ लेखन - प्रदीप जाधव, मधुरा गावकर, वैभवी आजगावकर, पूजा राणे, प्रियांका मेस्त्री
.............................................................................................................................................
शरीफाचा शिरखुर्मा आणि परबीणीची खीर
हो, मलाही एक बुरखा आणून द्या. मीही आनंदाने घालेन तो. तसं पाहिलं तर बुरखा म्हणजे संपूर्ण अंग झाकणारा काळा पोषाख, पण त्याची कीर्ती एवढी आहे की, तो माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचं प्रतीक आहे असं अनेकांना वाटतं. रोज घालते मी जीन्स आणि टी शर्ट. नेसते मी साडी अधूनमधून. लावते मी टिकली. पण या गोष्टी माझे स्वातंत्र्य दाखवतात? माझ्यावरला अन्याय दाखवण्यासाठी तरी मला बुरखा द्या.
जेव्हा साडी, सौभाग्य अलंकार परिधान केलेली हिंदू स्त्री आणि आपादमस्तक बुरखा परिधान केलेली मुस्लीम स्त्री आपल्या डोळ्यासमोर येते, तेव्हा बुरखा धारण केलेली स्त्री हिंदू स्त्रीपेक्षा जास्त शोषित आहे असा समज निर्माण होतो. प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा बाह्यरूपामुळे समाजामध्ये असे समज पसरताना दिसतात.
कोकणातल्या मुस्लीम स्त्रीच्या पेहेरावात गेल्या काही वर्षांत बदल झाले आहेत हे खरे आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी साडी आणि मंगळसूत्र घालणारी आणि केवळ कपाळावर कुंकू नसणारी मुस्लीम स्त्री कोकणात दिसायची. आता बुरखा आणि स्कार्फ आल्यामुळे शोषण आले, असे वाटायला लागले. प्रत्यक्षात तसे नसते.
खाण्यापिण्यातही हिंदू-मुसलमानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक नसतो. वरण भात, भाजी, चटणी, कुळथाची पिठी, घावणं, काळ्या वाटाण्याची उसळ, मच्छी हे पदार्थ आणि सगळ्यात नारळाचा भरपूर वापर दोघांच्याही घरात होते.
शिवाय सर्व मुस्लीम घरांमध्ये पदार्थ बनवण्याच्या पद्धती एकसारख्या नसतात. वेंगुर्ल्याची शरीफा शिरखुर्म्यात शेंगदाणे टाकते, तर कणकवलीची कमरून्नीसा ओले खोबरे आणि काजू टाकते. ‘हयल्या परबिनीनी बनवल्यास ती खीर होतां’. मुसलमानांच्या घरी खिरीचा शिरखुर्मा होतो इतकेच. आणि हो, मुसलमानांना रोज मास लागतं असाही एक गैरसमज आहे. हिंदू-मुस्लीम दोघांवरही स्थानिक प्रभाव दिसून येतो.
शिवाय आमच्या कोकणात आम्ही फार मोठा धर्मभेद नाही मानत. दोन्ही समाज आपल्या सणावाराला एकमेकांना निमंत्रण पाठवतात. मुस्लीम गणपतीला येतात. वंदन करतात. काही मुस्लीम स्त्रिया गळ्यावर कंकू लावून घेतात.
हिंदूही मुसलमान शेजाऱ्यांच्या घरी इफ्तार आणि र्इद साजरा करण्यासाठी जातात.
दोन्ही धर्मातल्या स्त्रियांची स्थिती सारखीच आहे. बुरखा घातल्यामुळे मुस्लीम स्त्री अधिक शोषित ठरत नाही की, हिंदू स्त्री अधिक स्वतंत्र ठरत नाही. बाह्यरूपांवरून अंदाज येत नाही हेच खरे.
अजून एक... सिंधुदुर्गात शहरीकरण वाढतेय. त्याबद्दल तक्रार नाही, पण अस्वच्छता, जंगलतोड, प्लॅस्टिकचा कचरा वाढायला लागलाय. आधी आमचा जिल्हा लखलखीत असायचा. आता सगळीकडे, इथेतिथे वेडीवाकडी बांधकामे... मध्येच जुने घर... घराशेजारी सांडपाणी. कणकवली बाजाराच्या रस्त्याचे रूंदीकरण सुरू आहे. उकरून ठेवले आहे. तेथे काम सुरू असताना चिखल उडतो. तेथेच छत्र्या दुरुस्त करणारा कारागीर बसतो. त्याच्या अंगावर चिखल उडतो, तरी तो आपले काम करत असतो. बाजारातही घाण दिसते. पालेभाजीच्या टोपल्यावर असंख्य डास आणि माशा घोंघावत असतात.
मूळ लेखन - भाग्यश्री घोळगे, मयुरी पडवळ, मंदार हर्णे, मंजुनाथ पाचंगे, भावना पेडणेकर, नताशा हिंदळेकर
.............................................................................................................................................
काय मेल्यांनी कपडे घातल्यानी हत?...
सिंधूदुर्गात गावोगावी धबधबे कोसळतायत... हवा सर्द, सुखद आहे. मग पर्यटक, विशेषत: जोडपी का नाही आकर्षित होणार? वातावरणात रोमान्स आहेच. तोकडे कपडे घातलेली आणि आपापसांत लगट करणारी जोडपी धबधबे असलेल्या गावांत अवतीर्ण होतायत. पर्यटकांचा हा पावसाळी धबधबा बघून गावकरी खास सिंधूदुर्गीय मल्लिनाथी का बरे नाही करणार?
‘शिरा पडों हेंच्या तोंडार...काय मेल्यांनी कपडे घातल्यानी हत?...त्यापेक्षा नाय घातल्यानी असता तर बरा झाला असता...’
‘काय मेली आकडतत... जसा काय मुंबयकच ऱ्हवतत... जसा काय ह्या मुंबर्इच आसा... नुसती झगामगा नि माज्याकडं बघा...काय मेल्यांचो तो नखरो... तोंडाक पावडर कमी रकाच जास्ती दिसता...’
‘चळ्ळहत दुसरा काय? जनाची नाय तरी मनाची लाज नाय?’
ही अशी टीकाटिपणी बघून हा दोन संस्कृतीचा संघर्ष कोठपर्यंत पोचणार असे वाटू लागते.
पण सर्वच काही संघर्षमय आहे असे नाही. हायवेपासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका गावकऱ्याने दुकान थाटले आहे आणि ग्राहकाची प्रतीक्षा सुरू आहे.
हायवेवरील गॅरेजजवळ एक बस ड्रायव्हर कचकचून ब्रेक लावतो. बस बिघडली की काय, दुकानदाराच्या मनात विचार येतो. ती पर्यटकांची बस असते. बसमधील सर्वजण खाली उतरतात आणि डावीकडे वळणाऱ्या आणि सुंदर वनरार्इने नटलेल्या रस्त्याकडे त्यांची नजर आपसूक पोचते. तिथे असलेल्या दुकानाकडे त्यांची पावले वळतात. त्यात एक विदेशी जोडपेही असते. ते पाण्याची बाटली विकत घेतात आणि समोर दिसणाऱ्या कोकणी मेव्याची विचारपूस करू लागतात. दुकानदार त्यांना खाजे, कोकम सरबत, काजू मोदकचे नमुने खायला आणि प्यायला देतो. परदेशी पर्यटक आश्चर्यचकित होतात. सर्व खाऊ ते खरेदी करतात. येथे आडवळणावरील गावातील दुकानात छापलेल्या किमतीत सर्व मिळाल्यामुळे पर्यटक खुश झालेले असतात.
सिंधुदुर्गात पर्यटक आकर्षित होतायत याचा प्रत्यय स्थानिकांना यायला लागलाय. कोल्हापूरहून दहा-बारा मित्र पहाटेच हजर झाले. त्यांच्यासाठी मच्छीची मेजवानी ठेवली होती. खूश होऊन गेले. ‘गोव्याला निघालांत?’. तर म्हणाले, ‘गोवा कशाला? तिथे आहे ते सर्व इथे आहे. शिवाय एकेका रार्इडसाठी तिथे साताठशे पडतात, इथे फक्त तीनशे मग आम्ही कशाला जातोय गोव्याला?’
‘नारळी पौर्णिमेच्या मुहुर्तार तुका श्रीफळ दिलेला आसा. भरपूर पर्यटक येवांदेत, ता मान्य कर रे म्हाराजा’. समुद्राला साकडे घातले होते गेल्या वर्षी. मगे का नाही ऐकनार समुंदर?
मूळ लेखन - नेहा घोणे, वृषाली तांबे, उमा पोयेकर, प्रथमेश कांबळे, प्रसाद बुचडे, गुरूप्रसाद तेंडोलकर, सत्यन मुंबरकर
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment