…तर कदाचित गोपाळकृष्ण गांधी राष्ट्रपती झाले असते!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • गोपाळकृष्ण गांधी
  • Wed , 05 July 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar गोपाळकृष्ण गांधी Gopalkrishna Gandhi प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar रामनाथ कोविंद Ram Nath Kovind मीरा कुमार Meira Kumar

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि मीराकुमार यांचे देशव्यापी दौरे सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आघाडीचे घटक पक्ष कोविंद यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत, तर काँग्रेसचे मित्र पक्ष मीराकुमार यांना मते मिळावीत यासाठी धडपड करताना दिसत आहेत. प्रचार सुरू आहे, पण त्यात म्हणावी तशी चुरस, रंगत दिसत नाही. दोन्ही बाजू आम्हीच जिंकणार असं म्हणत असल्या तरी कोविंद यांचं पारडं पहिल्यापासूनच जड आहे.

सुरुवातीला काँग्रेसच्या बाजूने असलेले बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी भाजपने राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला. मीराकुमार यांना बळीचा बकरा केलंय, पराभूत करण्यासाठी उभं केलंय, अशी भूमिका नीतिशकुमार यांनी घेतली आहे. हा काँग्रेसच्या आघाडीला बसलेला पहिला मोठा हादरा होता. बिहारमध्ये काँग्रेसला बरोबर घेऊन नीतिशकुमारांनी महागठबंधन सरकार स्थापन करून देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरू असलेली विजयी घोडदौड तेव्हा रोखली होती. राष्ट्रपती निवडणुकीत नीतिशकुमारांना गृहित धरून काँग्रेसने व्यूहरचना केली होती. पण त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे या व्यूहरचनेला तडा गेला. बिहारची बेटी असलेल्या मीराकुमारांना नीतिशकुमार पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे काही बरोबर नाही, अशी भूमिका घेऊन काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी नीतिशकुमार यांना दोष देण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेससोबत १७ पक्षांनी मीराकुमार यांना समर्थन दिलं आणि नीतिशकुमार यांनीच वेगळी भूमिका का घेतली? हा प्रश्न काही आता कोडं बनून राहिलेला नाही. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी एक लेख लिहून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना पडद्यामागे घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. या लेखात गुहा असं म्हणतात की, महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून विरोधी पक्षांनी पुढे आणलं होतं. या नावावर प. बंगालमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या कम्युनिस्ट आणि तृणमूल काँग्रेस यांचंही एकमत झालं होतं. कारण गोपाळकृष्ण गांधी प. बंगालमध्ये राज्यपाल होते. राज्यपाल म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची त्यांची भूमिका असे.

गोपाळकृष्ण यांची उमेदवारी काँग्रेसने भाजपच्याही आधी पुढाकार घेऊन जाहीर करावी असा आग्रह खुद्द नीतिशकुमार यांचा होता, हे आता विविध लेख, नेत्यांचे खुलासे यातून स्पष्ट झालं आहे. नीतिशकुमार यांनी ३ फेब्रुवारी २०१७ रोजी चेन्नईमध्ये एम. करुणानिधी यांच्या सत्काराच्या वेळी गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाचं सूतोवाच केलं होतं. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांना नीतिशकुमारांनी सोनिया गांधींना भेटून लवकर हे नाव जाहीर करावं, अशी सूचना केली होती. गोपाळकृष्ण यांचं नाव जाहीर केलं तर भाजप बॅकफूटवर जाईल. म. गांधी यांचा वारस आणि इतिहास विषयाचे तज्ज्ञ, पं. बंगालचे माजी राज्यपाल असा तगडा उमेदवार जनतेलाही पटेल. भाजप या तोडीचा उमेदवार उभा करू शकणार नाही. भाजपच्या मित्र पक्षांतही फूट पडेल आणि भाजपवर कुरघोडी करत गोपाळकृष्ण गांधी राष्ट्रपती होतील, हे राजकारण नीतिशकुमार खेळू पाहत होते.

मात्र गोपाळकृष्ण यांचं नाव जाहीर न करून काँग्रेसनं चूक केली. भाजपवर कुरघोडी करायची संधी गमावली. काँग्रेस नेतृत्वाच्या आळशी आणि निष्क्रिय वृत्तीमुळे हे घडलं, असं रामचंद्र गुहा यांनी नमूद केलंय. गुहा हे काही राजकारणी नाहीत. भारतीय इतिहासाचे ते भाष्यकार आहेत. ते भाजपचेही सहानुभूतीदारही नाहीत. नीतिशकुमार यांचेही प्रशंसक नाही. झालंच तर काँग्रेस पक्षाबद्दल त्यांना थोडाफार सॉफ्ट कॉर्नर आहे. गुहा यांनी काँग्रेस पक्ष भाजप आणि मोदी-शहा यांच्या राजकारणाला विरोध करताना कसा थिटा पडतोय, काँग्रेस नेतृत्व कसं कमी पडतंय, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कसा खच्ची होतोय, काँग्रेसचे मित्र पक्ष या पक्षाच्या अवसानघाताने कसे नाराज आहेत, हे मांडलं आहे. एकूणच भाजपच्या आक्रमक राजकारणाला काँग्रेस पक्ष पर्याय देऊ शकेल, यावरचा सामान्य भारतीय माणसाचा विश्वास कसा डळमळीत झालाय याची मांडणी गुहा सतत करत आहेत.

गुहा यांचा म. गांधी, पं. नेहरू, भारताची स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतरची भारताची वाटचाल या विषयांचा गाढा अभ्यास आहे. पं. नेहरू यांच्या विकासशील राजकारणाचे ते प्रशंसक आहेत. त्यांनीच काँग्रेसची भूमिका संकुचित होतेय याबद्दल चिंता व्यक्त करावी, हे अनेक धोके सुचित करणारं आहे. काँग्रेसने त्याची दखल घेतली पाहिजे.

काँग्रेसश्रेष्ठी भाजपवर मात करण्याची रणनीती ठरवायला उशीर करणार, टाळाटाळ करणार, मित्रपक्षांचं ऐकणार नाही, मित्रपक्षांना गृहित धरून स्वत:चं घोडं पुढं रेटणार, भलताच उमेदवार देणार, या गोष्टी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना पडद्यामागे घडल्या. त्यामुळे दुखावून नीतिशकुमारांनी कोविंद यांना पाठिंबा दिला, हे आता पुरेसं स्पष्ट झालंय. पण त्यातही काँग्रेसनेत्यांचा अगोचरपणा असा की, स्वत:ची चूक असून ते दोष मात्र नीतिशकुमारांना देत आहेत!  स्वत: आत्मपरीक्षण न केल्यामुळे काँग्रेस पक्षाची देशव्यापी पीछेहाट सुरू आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. निवडणुकांमध्ये होणारी हार हे त्याचं फळ आहे.

गोपाळकृष्ण गांधी काँग्रेसला का नको होते, याविषयीसुद्धा आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गोपाळकृष्ण हे ‘गांधी’ असले तरी काँग्रेसच्या पठडीतले ‘गांधी’ नाहीत. काँग्रेसच्या भूमिकांची त्यांनी सतत चिकित्सा केली आहे. काँग्रेस पक्ष जिथं चुकला तिथं त्यांनी त्यावर टीका केली आहे आणि तीही जाहीर लेख लिहून. गोपाळकृष्ण, अरुण गांधी, इला गांधी हे म. गांधींचे तिन्ही नातू आपापल्या क्षेत्रांत, वेगवेगळ्या कामांत पुढे राहिले आहेत. त्यांना काँग्रेसपक्षाने कधीही जवळ केलं नाही. विशेषत: आपली चिकित्सा करणारे नकोत, ते लांब असलेले बरे, या पारंपरिक काँग्रेसी वृत्तीने गोपाळकृष्णांना काँग्रेसपासून लांब राहावं लागलं.

यात खरी गोम अशी आहे की, आताची काँग्रेस ही म. गांधी, पं. नेहरू यांची काँग्रेस राहिलेली नाही. ती इंदिरा गांधी-राजीव गांधी यांची काँग्रेस आहे, असं आता काँग्रेसचेच अनेक सहानुभूतीदार बोलू लागले आहेत. इंदिरा-राजीव यांचा वारसा चालवणाऱ्या काँग्रेसला गोपाळकृष्ण गांधी न चालणं हे ओघानेच आलं. ‘गांधी’ न चालणाऱ्या या काँग्रेसला ‘आंबेडकर’ही चालले नाहीत, हेही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवतानाच्या घटनांआडून स्पष्ट झालंय. त्याचं झालं असं की, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं पळापळ करायला सुरुवात केली. मग नावांच्या याद्या करणं सुरू झालं. भाजपने दलित उमेदवार देऊन कुरघोडी केली. मग आपल्यालाही दलित उमेदवार द्यावा लागणार या भूमिकेतून काँग्रेसने दलित नावं काढली. त्यात मीराकुमार, सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, अॅड. प्रकाश आंबेडकर यांची नावं पुढे आली. यातून शरद पवारांनी तीन नावं शॉर्ट लिस्ट करायला सांगण्यात आलं. त्यातून अॅड. प्रकाश आंबेडकर हे नाव वगळण्यात आलं. शेवटी मीराकुमार हे नाव जाहीर झालं.

वास्तविक कम्युनिस्ट पक्ष आणि सीताराम येचुरी हे अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नावावर आग्रही होते. भाजप सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उदो उदो करताना दिसतो. म्हणून बाबासाहेबांच्या नातवाला विरोधात उतरवून देशात वैचारिक संघर्ष उभा करायचा. भाजपचं दलित कार्ड त्यांच्यावरच उलटवून शहा-मोदी यांना अडचणीत आणायचं ही कम्युनिस्टांची रणनीती होती. पण आंबेडकरही नकोत या काँग्रेसच्या हेक्यापायी कम्युनिस्टांचं तेही राजकारण बारगाळलं.

प्रकाश आंबेडकरही काँग्रेसला का रुचले नाहीत? कारण त्यांनी सतत काँग्रेसची चिकित्सा केलेली आहे. काँग्रेसच्या हो ला हो करणारे ते नाहीत.

गांधी नकोत, आंबेडकरही नकोत, या काँग्रेसच्या भूमिकेमुळे नीतिशकुमार दुखावले. कम्युनिस्ट नाराजी दाखवत नसले तरी त्यांचं मौन बोलकं आहे. आणि देशातल्या जनतेला जायचा तो संदेश गेला आहेच. मीराकुमार या हरणाऱ्या उमेदवार आहेत, असा विनोद आता रामदास आठवलेही करू लागले आहेत!

गांधी-आंबेडकरांना टाळणारा काँग्रेस पक्ष भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर कसा देणार, हा गंभीर प्रश्न राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला आहे. या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय काँग्रेस पक्षाला देशातल्या जनतेचा विश्वास संपादन करता येणार नाही.

……………………………………………………………………………………………

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Thu , 06 July 2017

विचारप्रवृत्त करणारा लेख!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......