अजूनकाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुबेहूब नक्शे कदम चालायचं ठरवलेलं दिसतंय. निवडणूक प्रचारातच दिलेले संकेत, मोदींनी त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून प्रत्यक्षात आणले. तेव्हा अत्यंत विनम्र, विनय देहबोली दर्शवत ते पादुका ठेवून राज्य करणार असा भरतभाव मुखी बाळगून होते.
हळूहळू या विनम्र, विनयी भरतभावाची जागा आत्मविश्वासाने घेतली. सुरुवातीला या आत्मविश्वासाला समन्वयाची जोड होती. राजकारण नाही तर विकासकारण करायचेय, असा अभ्यासू चेहरा ठेवून ते वावरत होते. त्यामुळे अल्पावधीतच ते प्रसारमाध्यमांचे ‘डार्लिंग’ झाले. सध्या डायनिंग टेबलवर राजकीयदृष्ट्या धीट (व काहीसा घमेंडखोर) झालेल्या वनश्रीमंत वर्गाचेही ते स्वच्छ राजकारणी म्हणून लाडके झाले. मुख्यमंत्र्यांचे कौतुक, कामाला दाद, राजकीय-सामाजिक समस्यांना न डगमगता सामोरं जाऊन संकेट विमोचक म्हणून तयार झालेली प्रतिमा विरोधकांसह मित्रपक्ष आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही वेळोवेळी गारद करत गेली.
अडीच वर्षांत लावून सुलाखून निघालोय, आता कुणीही या, असा खास मुरब्बी राजकारण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांच्या देहबोलीतून प्रकटू लागलाय. दिल्लीहून दीक्षा घेतल्याप्रमाणे राज्यातही मंत्रिमंडळाचं अस्तित्व जाणवू न देता, अत्रतत्रसर्वत्र मुख्यमंत्रीच दिसतील अशीच कारभाराची रचना केली गेलीय. मुनगंटीवार, तावडे आणि अधूनमधून बापट सोडले तर बाकी सगळे मंत्री फुकट अनुदान लाटणाऱ्या शाळांच्या हजेरीपटावरील मुलांसारखे केवळ दप्तर दाखल! पहिल्याच आंतर मंत्रिमंडळ कुस्तीत खडसेंसारखा पैलवान चितपट केल्यानं तर मुख्यमंत्र्यांच्या गालातल्या हसूची इतरांनी धास्तीच घेतली. दिल्लीचा आशीर्वाद असल्यानं आणि दिल्ली म्हणजे प्रतिपरमेश्वर, त्यामुळे मंत्रिमंडळ ‘होयबा’ होत गेलेय.
या सगळ्या बदलत्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्याच्या देहबोलीत आता आत्मविश्वासाची जागा अतिआत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वासाची जागा फाजील आत्मविश्वास घेऊ लागलाय. कुठल्याही नेतृत्वासाठी ही ऱ्हासपर्वाच्या आरंभाची धोक्याची घंटा असते. पण दिल्लीचाच अहंगड, स्वप्रतिमाप्रेम, बेफिकिरी, ‘हम करे सो कायदा’ या प्रवृत्तीसह मुख्यमंत्री वेगानं आत्मसात करत चाललेत. कोवळा चेहरा निबर होत चाललाय.
याची धक्कादायक प्रचिती गेल्या आठवड्यात, ऑर्थर रोड तुरुंगात तुरुंग पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या मंजुळा शेट्ये प्रकरणावर बोलत असताना, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने हसत, भायखळा तुरुंग प्रकरणाचे सत्य लवकरच कळेल, असे जे म्हणाले ते संतापजनक तर होतेच, पण स्वत: गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना अशोभनीय असेच होते!
मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहेत. हट्टाने स्वत:जवळ ठेवलेल्या गृहमंत्रालयाबाबत ते गंभीर दिसत नाहीत. त्यांच्या स्वत:च्या प्रांतात, नागपुरात तर कैद्यांनी तुरुंगातून पळून जाण्यापासूनची रोजी वाढती गुन्हेगारी आकडेवारी समोर आली आहे.
आर.आर. आबांच्या ‘बडे बडे शहरों में…’ सारखं वाक्य किंवा चाकुरकरांचं रात्रीत तीन सफारी डोळ्यात तेल घालून बाहेर काढणारी माध्यमं राज्याचा मुख्यमंत्रीच गृहमंत्री असून, ढासळती सुरक्षा व्यवस्था, वाढती गुन्हेगारी याबद्दल मौन बाळगून आहेत. निवडणूक प्रचारात ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’, म्हणून मुलीची काळजी करणारी आई जाहिरातीत भाजपने दाखवली होती. पण आता त्यांच्याच राज्यात स्त्री तुरुंगातही सुरक्षित नाही.
खरं तर मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. आज फडणवीस विरोधी पक्षनेते असते, तर त्यांनी गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. पण त्यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाबाई रहाटकर हे प्रकरण सौम्य करून, फार काही घडलं नाही, थोडीफार कारवाई करावी लागेल असं म्हणून एकुणच या प्रकरणावर पांघरून घालून सरकार, गृहमंत्री पर्यायानं मुख्यमंत्र्यांची बेअब्रू होऊ नये याचीच काळजी घेताना दिसताहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाबाई रहाटकर यांनी समन्स वगैरे काढून तुरुंग निरीक्षक, उपनिरीक्षक यांना आयोगासमोर हजर राहायला लावून सरकारनं तातडीने पावलं उचलली, हे दाखवून देण्याचा यशस्वी प्रयोग केला.
पण यातली धक्कादायक आणि अनाकलनीय बाब पुढीलप्रमाणे. आयोगाच्या अध्यक्ष म्हणून माध्यमांशी बोलताना विजयाबाई म्हणाल्या की, ‘इंद्राणी मुखर्जी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेलीय. त्यांचा जबाब नोंदवण्यात आलाय आणि वैद्यकीय अहवालात त्यांच्या अंगावर मारहाणीच्या (मुका मार) खुणा आढळल्या आहेत. मात्र मृत मंजुळा शेट्येच्या शरीरावर किंवा गुप्तांगावर कुठल्याच जखमा आढळलेल्या नाहीत!’
आता यातला विरोधाभास बघा कसा. मंजुळा शेट्येला पुरुष तुरुंग अधिकाऱ्यांनी महिला पोलीस, सुरक्षा रक्षक यांच्या मदतीन थर्ड डिग्रीसारखी अमानुष मारहाण केली. तिला नग्न करून बदडून काढलं, तिच्या गुप्तांगात काढ्या घातल्या गेल्या.
याबाबत तुरुंगातच आवाज उठवणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला बराकीतील दिवे बंद करून मारहाण केली जाते. ‘प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झालीस तर तुझीही मंजुळा करू’ अशी धमकी दिली जाते. इंद्राणीने आवाज उठवल्यावर दोनशे महिला कैद्यांनी केलेला उद्रेकही या पद्धतीनेच ‘शांत’ केला जातो. इंद्राणीवर तुरुंगात प्रक्षोभक वातावरण तयार केल्याचा आरोप ठेवला जातो. पोलिसांच्या मारहाणीत जबर जखमी मंजुळाचा मृत्यू होतो आणि प्रकरण बाहेर येते.
म्हणजे मंजुळाच्या अमानुष मारहाणीबाबत तक्रार करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीलाही मारहाण होते. त्याची दखल घ्यावी लागते. तिच्या अंगावर खुणाही सापडतात, पण जबर मारहाणीत जिचा मृत्यू झाला, तिच्या शरीरावर मात्र जखमेचा लवलेश नाही!!! हा असला अतर्क्य अहवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष माध्यमांसमोर शांतपणे मांडतात?
मग प्रश्न असा उभा राहतो, अंगावर जखमा नसलेल्या मंजुळाचा मृत्यू कशानं झाला? मृत्युनंतर जो प्राथमिक अहवाल माध्यमातून जाहीर झाला त्यात ‘मारहाणीने मृत्यू’ असं मृत्यूचे कारण दिलं होतं. असं जर आहे तर ही कोणत्या प्रकारची मारहाण आहे, जी जबर केली तरी जखमा होत नाहीत? यातला विरोधाभास कुणाच्याच लक्षात येत नाही? की मंजुळा शेट्ये गुन्हेगार, इंद्राणी मुखर्जी गुन्हेगार, इतर दोनशे बंदिवान स्त्रियाही गुन्हेगार, त्यामुळे त्यांना काहीच किंमत नाही? नेहमीप्रमाणे गुन्हेगारांच्या मानवी हक्कांबद्दल बोलणाऱ्यांना सीमेवरील जवान, २६\११ तले शहीद यांचे दाखले देत ‘राष्ट्रद्रोही’ ठरवलं जाईल.
खरं तर हे सगळंच प्रकरण स्त्री आणि सत्ता यांचे विविध पैलू दाखवणारं आहे. मंजुळा आणि तिची आई, भाऊ, वहिनी व त्यांच्या मुलांसोबत भांडूपच्या चाळीत राहत होते. भांडाभांडीत भावाच्या बायकोनं पेटवून घेतलं. मृत्यूपूर्व जबानीत ‘मुलांना मारून टाकीन’ अशी धमकी देऊन बहीण व आईला त्यात गोवलं!
पुरुषसत्तेनं बायको नावाच्या शोषिताला नणंद-सासू या सत्तास्थानाविरुद्ध जबानी द्यायला लावून आपला मार्ग मोकळा करून घेतला. खलनायिका ठरून आई आणि मुलगी तुरुंगात गेल्या. प्रामाणिकपणे शिक्षा भोगत आईने तिथंच प्राण सोडला, तर मंजुळा चांगली वर्तणूक आणि क्रियाशीलतेमुळे लवकरच लोकप्रिय वॉर्डन झाली. म्हणजे शिक्षेतूनही तिनं एक सत्तास्थान मिळवत त्या सत्तेचा फायदा इतर कैद्यांत सुधारणा, मदत यासाठी केला. येरवड्याहून ऑर्थर रोडला येऊन अल्पावधीतच तिनं इथंही तीच लोकप्रियता आणि सत्ता मिळवली. तिचं वाढतं प्रस्थ (प्रेमाचं) बहुधा तुरुंगातील सरकारी सत्ताधीसांना सहन झालं नाही. त्यांनी किरकोळ निमित्त शोधून तिचा खातमा केला.
इथं तुरुंग अधिकारी, कर्मचारी म्हणून असलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार केला, तर त्यांच्यातल्या सत्तेच्या माजानं त्यांच्यातल्या स्त्रित्वाचा पराभव करत, पाशवी सत्तेचा वापर करत, मंजुषाला नग्न करून मारून, तिच्या वेदनांनी आक्रंदणाऱ्या शरीरावर अधिकाधिक घाव घालत क्रौर्याच्या विकृतीचा आनंद घेताना वर्दी उतरवून त्या देखील एक प्रकारे नग्नच झाल्या आणि त्यांनी अक्षरक्ष: नंगानाच केला. हा एका सत्तेनं दुसऱ्या सत्तेवर क्रूरतेनं मिळवलेला विजय! सत्ता जात, धर्म, प्रांत, भाषा आणि लिंगभेदापलीकडे जाऊन कशी भिनते याचं हे उदाहरण.
स्वत:च्या सौंदर्यानं आर्थिक सत्ता आणि त्या सत्तेतून उच्चभ्रू जगणं, या सत्ताकांक्षेनं इंद्राणीने स्वत:च्याच मुलीचा ठरवून खून केला. त्यासाठी आजी-माजी पतींचा वापर केला. मुलीचा जीव घेताना ती ना आई होती ना स्त्री. अनिर्बंध सत्ताकांक्षेनं आंधळी झालेली ती सत्ताप्रवृत्ती होती.
तिचा गुन्हा लपला नाही. खुनाला वाचा फुटली. फाशीचा फास तिच्या मानेभोवती आहे. पण म्हणून तिनं दुसऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवायचा अधिकार गमावलाय? कदाचित नैतिकदृष्ट्या वादासाठी ‘हो’ म्हणू. पण कैदी म्हणून ती व तिचे सहकैदी यांचे कायद्यान्वये मिळालेले हक्क जपण्यासाठी तिनं आवाज उठवला तर चूक काय? गुन्ह्याची शिक्षा कायदा, न्यायालय देईल. पण तुरुंग अधिकारी, कर्मचारी यांना अकारण सत्ता गाजवता येणार नाही असं कायदाच सांगतो.
मंजुळा चाळीतली, इंद्राणी महालातली. इतर दोनशे जणी आणखी कुठल्या कुठल्या. गुन्हेगार, कैदी व स्त्रिया हा समान धागा. अजस्र भिंतीमागे कुणी अपराध गंडानं मूक झालेल्या, काही पश्चातापानं दग्ध पण आणखी एक संधी मिळेल या प्रतीक्षेत, तर काही मुळातच निबर होऊन आलेल्या. आणि आता कफन बांधून तयार असलेल्या! अर्धी लोकसंख्या असणाऱ्या वर्गाचे हे प्रतिनिधी. कुठल्या ना कुठल्या सत्तेचे बळी!
सध्या जे सरकार राज्यात व देशात आहे, ज्या पक्षाचं आहे, तो पक्ष त्यांची विचारधारा स्त्रीला देवी, माता किंवा थेट दासी मानते. त्यांचं स्त्री उदात्तीकरण देशाच्या भूप्रदेशाला भारतमाता संबोधतं, तर गायीला गोमाता. परंपरेच्या मर्यादित अवकाशात स्त्रीस्वातंत्र्य ही त्यांची पारंपरिक व्याख्या आहे.
त्यांच्या राज्यात, तुरुंगात असे व इतके अत्याचार घडावेत? कैद्याचा मृत्यू व्हावा? आणि महिला आयोगाच्या अध्यक्षबाई जखम नाही म्हणून मृत कैद्याच्या आप्तस्वकीयासह कायदाप्रेमी जनतेच्या जखमेवर मीठ चोळतात?
एका बाजूला गोरक्षक, दुसऱ्या बाजूनं अँटी रोमिओ स्क्वॉड, सनातन संस्कृती रक्षकांच्या विकृत पौजा, अशा वातावरणात पेशव्यांचा हात डोक्यावर असलेला ‘घाशीराम’ मोकाट सुटला तर आश्चर्य कसलं?
मी मराठा मोर्चा विरघळवला, मी सेनेचा वाघ दारी बांधला, मी शेतकऱ्यांना कानगोष्टी देऊन, कागदाचा असा चिटोरा हाती दिला की, ते आता आपसांत भांडतील. विरोधी पक्षांना, नेत्यांना चौकशी आणि तुरुंग एवढ्या दोन शब्दांनी ताब्यात ठेवलंय. पक्षात तर आता अशी नाकाबंदी केलीय की, रस्ता सोडाच हवेतही उडता येणार नाही कुणाला… फडणवीस देवेंद्र नाना आपल्याच कारभारावर खुश होऊन, रेशीम बागेकडे डोळे लावून मंद हसताना, त्यांचे ‘घाशीराम’ मस्तवाल होत चाललेत.
प्रश्न असा आहे की, गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री राज्याचे कोतवाल की, खाकी वर्दीतले घाशीराम?
लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Tue , 04 July 2017
सडेतोड!