अजूनकाही
आपल्याकडे आजूबाजूला होणाऱ्या अनेक आत्महत्यांची दखलच घेतली जात नाही. शांतपणे या आत्महत्या होतात आणि जग शांतपणे चालूच राहतं. माझ्या एका मित्राला क्रिकेटर बनायचं होतं. एकाला राजकारणी, तर एकाला इतिहास संशोधक. त्यांची त्या दिशेनं वाटचालही चालू होती. स्वतःला मस्त जोजावणं चालू होतं त्यांचं, पण नंतर काहीतरी बिनसलं. क्रिकेटर मित्राला परवा फोन केला आणि सध्याच्या आयपीएलबद्दल मत विचारलं तर तो म्हणाला की, तो सध्या मिटिंगमध्ये आहे आणि क्रिकेट हा वेळेचा अपव्यय आहे. राजकारणी मित्राचा परवा फोन आला. तेव्हा तो म्हणत होता की, राजकारण ही दलदल आहे. आणि एकदमच त्याला ऑफिसमध्ये मिळालेल्या इन्क्रिमेंटबद्दल उत्साहानं बोलायला लागला. इतिहाससंशोधक होणारा मित्र सिगरेट फुंकता फुंकता ऑनसाईट जाण्याचे बेत सांगत असतो. 'रॉकेटसिंग - सेल्समन ऑफ द इयर'सारखा एखादा चित्रपट येतो आणि मी या आत्महत्यांपलीकडे किंवा निराश व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन झगडणाऱ्या तुरळक लोकांना बघायला लागतो. चित्रपट काल्पनिक दृश्य -ध्वनीचा खेळ आहे हे माहीत असूनही आपण पण हरप्रीत बेदी होऊ शकतो की, अशी आशेची तिरीप अनेकांना हा चित्रपट बघितल्यावर अनेकांना दिसायला लागते.
काही लोक म्हणतात की, 'रॉकेटसिंग - सेल्समन ऑफ द इयर' हा फक्त मार्केटिंग करणाऱ्या किंवा सेल्समधल्या लोकांचं आयुष्य दाखवणारा चित्रपट आहे. मला वाटतं नायकाचा सेल्स क्षेत्रातला संघर्ष दाखवून दिग्दर्शक शिमीत अमिन आणि पटकथा लेखक जयदीप साहनीनं एक मस्त चाल खेळली आहे. आपण सगळेच आयुष्याच्या अनेक टप्प्यावर सेल्समन असतो. 'मी' नावाचं प्रॉडक्ट विकणारे. मग आपण कधी लग्नाच्या बाजारात स्वतःच मार्केटिंग करतो, तर कधी नोकरीच्या सुपरमार्केटमध्ये स्वतःला विकायला काढतो. काही तर तर चक्क स्वतःच्या आत्मा विकायला काढतात. या सगळ्या 'सेल्समन' लोकांना रॉकेटसिंगमधला हरप्रीत बेदीचा सेल्समन भावला, यात आश्चर्य वाटायला नकोच. हरप्रीत बेदी (रणबीर कपूर) हा अगदी तुमच्या माझ्यासारखा. शंभरातल्या नव्याणवांसारखा. दहावीला छत्तीस टक्के आणि बारावीला अडतीस टक्के मिळालेला अगदीच ऑर्डिनरी विद्यार्थी. बी.कॉम.ला पण एक वर्ष गचकलेला. लहानपणीच आई-बाबांचं छत्र हरवलेला हरप्रीत त्याच्या प्रेमळ आजोबांसोबत (प्रेम चोप्रा) राहत असतो. आपल्या या सरळ साध्या, जगाचे छक्केपंजे न कळणाऱ्या नातवाचं कसं होईल, अशी काळजी आजोबाला सतत लागलेली असते. ज्याला काहीच जमत नाही, तो पत्रकार बनतो असं एक काहीसं विनोदी, काहीसं उपरोधक आणि काहीसं क्रूर विधान आहे. पण याबाबतीत पत्रकारितेला टक्कर देणारं अजून एक क्षेत्र आहे. सेल्सचं. आपल्या मर्यादांची जाणीव असणारा आणि आपण 'स्मार्ट' नाहीत हे माहीत असणारा हरप्रीत सेल्समध्ये जायचं ठरवतो. त्याचा AYS या कॉम्प्युटर असेम्ब्ली आणि सर्व्हिस कंपनीमधला इंटरव्ह्यूच भन्नाट होतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला सेल्समधला सनातन प्रश्न विचारला जातो. ही टेबलावरची पेन्सिल विकून दाखव. हरप्रीत सुरुवातीला गोंधळतो, मग सावरतो. पेन्सिलच्या रबराच्या सुवासापासून ते पेन्सिल कानात टाकून खाजवताना कसली मजा येते, हे सांगायला लागतो. मुलाखत घेणारा नितीन (नवीन कौशिक, एक जबरदस्त नट) वैतागून हरप्रीतला रिजेक्ट करतो. पण त्यादिवशी हरप्रीतच नशीब जोरावर असतं. कंपनीचा मालक सुनील पुरी (मनीष चौधरी) ही मुलाखत शांतपणे उभा राहून बघत असतो. त्याला हरप्रीत आवडतो. तो नितीनला हरप्रीतला हायर करायला सांगतो. 'गिव्ह अप नहीं किया इसने' असं स्वतःच्या निर्णयाचं स्पष्टीकरण पुरी देतो. त्याच्या तोंडातून प्रॉफेसीच बोलते जणू.
पुरी आणि हरप्रीत ही दोन टोकावरची दोन व्यक्तिमत्त्वं. पुरी म्हणजे रूथलेस, आक्रमक आणि धंदा घोल के पिया हुआ इन्सान. त्याच्या स्वतःच्याच शब्दात सांगायचं तर स्वतःच्या बापालाही काहीही फुकट न देणारा माणूस. उलट हरप्रीत म्हणजे भाबडा, अव्यवहारी आणि धंद्यापेक्षा माणसं मोठी असं मानणारा नवोदित. या दोन टोकांवरच्या माणसांमध्येच पुढचा संघर्ष होणार हे उघड आहे. पुरी आणि हरप्रीतच स्वतःचं असं आपापलं आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. माणसाला त्याच्या क्षेत्रात वर जायचं असेल तर, अनेक लोकांच्या डोक्यावर पाय ठेवून वर जावं लागत अशी पुरीची श्रद्धा आहे. तर कुठल्याही धंद्यांच्या नियमांपेक्षा कंपनीत काम करणारी हाडामाणसाची माणसं महत्त्वाची असं हरप्रीतला प्रामाणिकपणे वाटत असतं. पुरीचा व्यवहारवाद आणि हरप्रीतचा आदर्शवाद एके दिवशी समोरासमोर उभे ठाकणार असतात.
हरप्रीतच सेल्समधलं ट्रेनिंग, ज्याने त्याचा इंटरव्हयू घेतलेला असतो त्या नितिनसोबत सुरू होतं. नितीन मार्केटिंगमधला जुना खेळाडू. कंपनीत बरीच वर्षं टिकून आहे. पुरीने व्हाईस प्रेसिडेंटच्या पोस्टच आमिष दाखवून त्याला आपल्या ताटाखालचं मांजर बनवून टाकलेलं असतं. पण माणूस सेल्स कोळून प्यायला आहे. हरप्रीतला घेऊन तो 'फिल्ड'वर जातो, त्या प्रसंगात सेल्समध्ये काम न केलेल्या प्रेक्षकांनाही सेल्सचा एक क्रॅश कोर्स बघायला मिळतो. बाईकवर प्रवास करताना उलटा कोट घालणं, टेबलावर ठेवलेले प्रतिस्पर्धी कंपनीचा उलटा कोटेशनचा कागद वाचण्याची हातोटी, क्लायंटच्या ऑफिसमधल्या रिसेप्शनिस्टशी फ्लर्ट करून तिच्या बॉसच्या केबिनमध्ये प्रवेश मिळवणं, क्लायंटच्या ऑफिसमधल्याच चपराशाला सिगरेट देऊन आतली खबर मिळवणं असले भन्नाट प्रकार नितीन हरप्रीतला शिकवतो. हरप्रीतच्या ऑफिसमध्ये नितीनसारखेच अजूनही अर्क लोक असतात. रिसेप्शनवर बसणारी, वेळप्रसंगी 'कोल्ड कॉलिंग' करणारी आणि ऑफिसमधल्या पुरुषांच्या लोचट नजरा झेलणारी सुंदर कोयना शेख (गौहर खान), ऑफिसमध्ये फावल्या वेळात पॉर्न पाहण्याचा नाद जडलेला गिरीश (डी संतोष), ऑफिसमधला भावखाऊ चपराशी छोटेलाल (मुकेश भट्ट - प्रोड्युसर मुकेश भट्ट वेगळे) असे अतरंगी नमुने ऑफिसमध्ये असतात.
हरप्रीत हळूहळू तिथं रुळायला लागतो. पण हे सगळं फार काळ टिकणार नसतं. शेवटी चित्रपटात 'कॉन्फ्लिक्ट' हवाच. तसा तो लवकरच येतो. सेल्स व्हिजिटला हरप्रीत एका कंपनीच्या ऑफिसमध्ये जातो. तिथला एक अधिकारी हरप्रीतला ऑर्डर पास करण्यासाठी लाच मागतो. आदर्शवादी हरप्रीतचा फ्युज उडतो. तो ताडकन उठतो आणि तक्रारीच्या बॉक्समध्ये त्या लाचखोर अधिकाऱ्याची तक्रार करून मोकळा होतो. पुरीला जेव्हा हे कळतं तेव्हा गहजब होतो. हरप्रीतच्या आदर्शवादामुळे एक महत्त्वाचा क्लायंट हातातून जायची शक्यता निर्माण झाल्यामुळे पुरी अक्षरशः बिथरतो. तो भर ऑफिसात सगळ्यांसमोर हरप्रीतचा प्रचंड पाणउतारा करतो. त्या प्रसंगातला मनीष चौधरीचा अभिनय प्रेक्षकांना पुरीबद्दल प्रचंड चीड आणतो. पण एवढ्यावरच पुरीचं समाधान होत नाही. हरप्रीतच्या अपमानाची एक मालिकाच सुरू होते. पुरी अतिशय अपमानास्पदरीत्या ज्या अधिकाऱ्याने हरप्रीतकडे लाच मागितली, त्याची माफी हरप्रीतला मागायला लागतो. युट्युबवर या चित्रपटातले काही डिलीटेड सीन्स उपलब्ध आहेत. त्यात हरप्रीतच अंगावर येणार 'ह्युमिलिएशन' बघता येतं.
पुरीने हरप्रीतच्या कारनाम्यामुळे भडकून ऑफिसमधल्या सगळ्या लोकांची सेल्स टार्गेट्स वाढवून दिलेली असतात. त्यामुळे ऑफिसमधले सहकारीही हरप्रीतवर खार खाऊन असतात. ते नानाप्रकारे हरप्रीतला त्रास द्यायला लागतात. इतक्या अपमानाला सामोरं जाऊन एखाद्यानं ऑफिस सोडलं असतं, पण हरप्रीत तिथंच टिकून राहतो. त्याला लहानपणापासून समस्यांपासून पळण्याचा कंटाळा आला असतो. ही नोकरी सोड असं सुचवणाऱ्या मित्रांना हरप्रीत सांगतो, "मी आता पळणार नाही. रिस्क तो स्पायडरमॅन को भी लेना पडता हैं, मैं तो फिर भी एक सेल्समन हू." रिसेप्शनिस्ट कोयना या हरप्रीतबद्दल सहानुभूती बाळगून असते. आपण या ऑफिसची आयटम गर्ल आहोत, तर हा पोरगा जोकर. दोघंही बाकी लोकांसाठी टाईमपास. या आपलेपणाच्या दुव्यातून ती हरप्रीतला एक पोटेन्शियल बिजनेस लीड देते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी झपाटलेला हरप्रीत तिथं जातो. पण आपल्या कंपनीच्या चौकटीत आपण ही डील करू शकत नाही हे त्याला जाणवतं.
मग तो एक अनेक लोकांची आयुष्य बदलणारा निर्णय घेतो. हरप्रीत स्वतःची 'रॉकेटसिंग सेल्स कॉर्प.' नावाची कंपनी सुरू करतो. ही कंपनी पुरीच्या कंपनीच्या प्रिमाईसमधूनच ऑपरेट करून चालवायला लागतो. पुरीला कंटाळलेले नितीन, कोयना, गिरीश, छोटेलाल यात सामील होतात. प्रामाणिकपणा, चांगली सर्व्हिस आणि काय क्लायंटशी कधी खोटं बोलायचं नाही, अशी या कंपनीची पॉलिसी असते. कंपनीला छपरतोड प्रतिसाद मिळायला लागतो. पुरीच्या कंपनीचे क्लायंट पुरीला टांग मारून रॉकेटसिंग कॉर्पकडे जातात. अतिशय स्पर्धात्मक असणारा पुरी या नवीन कंपनीचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो. बराच द्राविडी प्राणायाम केल्यावर जेव्हा त्याला कळतं की, आपल्याच कंपनीच्या पोटात ही नवीन कंपनी चालू आहे, तेव्हा त्याला धक्का बसतो. तो रॉकेटसिंग कॉर्पशी संबंधित लोकांना रस्त्यावर आणण्याचा पण करतो. अतिशय क्रूरपणे तो अंमलात आणतो.
पण हा रॉकेटसिंगचा शेवट नाही. रॉकेटसिंग कॉर्पच्या प्रामाणिक सेवेला सरावलेले क्लायंट पुन्हा पुरीकडे यायला तयार नसतात. पुरी जंग जंग पछाडतो. पण आयुष्यात पहिल्यांदाच दारुण अपयशाला सामोरं जातो. ज्याची आपण सतत 'अ बिग झिरो' म्हणून हेटाळणी केली, त्याच कालच्या पोराने, हरप्रीतने आपल्याला हरवलं आहे हे कटू वास्तव तो पचवतो. एक छोटी नोकरी करणाऱ्या हरप्रीतच्या शोरूममध्ये जातो आणि रॉकेटासिंग कॉर्पची कागदपत्रं तो पुन्हा हरप्रीतकडे सुपूर्द करतो. 'फिल्डवर स्पर्धक म्हणून भेटू' असं निक्षून सांगतो आणि निघून जातो.
चित्रपटातला नायक शीख सरदार दाखवण्यामागे शिमीत अमीनचे काही आडाखे असावेत. जाती -धर्माच्या पूर्वग्रहांनी बजबजलेल्या या देशात सरदार लोकांबद्दल एक 'गुडविल' आहे. साधे, सरळ, स्पष्टवक्ते, प्रामाणिक अशी सरदार लोकांची देशभरात प्रतिमा आहे. या चित्रपटात एक अतिशय सुंदर प्रसंग आहे. हरप्रीतला रॉकेटासिंग कॉर्पसाठी मोठी ऑर्डर मिळाली आहे. पण त्याच्यासाठी बरेचसे स्पेयर पार्टस लागणार असतात. तो एका सप्लायरकडे जातो. पण तो हरप्रीतकडे अॅडव्हान्सची मागणी करतो. हरप्रीतकडे पैसे नसतात. हरप्रीत आजोबांनी प्रेमानं आपल्या बचतीमधून त्याला घेऊन दिलेली स्कुटर गहाण ठेवण्याची तयारी दाखवतो. तो सप्लायर एकदा वरून खालपर्यंत हरप्रीतला न्याहाळतो. आणि दुकानातून वाटलं तेवढं सामान क्रेडिटवर देण्याची तयारी दाखवतो.
"पण पैसे?" हरप्रीत विचारतो.
"नंतर दे."
"पण तुम्ही तर मला ओळखत पण नाहीत नीट?"
"तुला मी ही सवलत का देत आहे माहितीये? मी कुठल्याही सरदाराला आतापर्यंत चोरी करताना नाही पाहिलं."
सरदार लोकांना चित्रपट माध्यमातून मिळालेली मोठी दादच.
चित्रपटात रणबीरशिवाय अजून कुणीही 'स्टार व्हॅल्यू' असणारा नट नाहीये. नितीनच्या भूमिकेत नवीन कौशिक आणि पुरीच्या भूमिकेत मनीष चौधरींनी कमाल केली आहे. खरं तर पुरीच्या भूमिकेत ऋषी कपूरला घ्यावं अशी दिग्दर्शक शिमीत अमिनची इच्छा होती. प्रेक्षकांना बाप आणि पोराच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळावी अशी त्याची इच्छा होती. पण ती इच्छा काही फलद्रुप झाली नाही. मग चित्रपटात मनीष चौधरीची एंट्री झाली. त्यानं या भूमिकेचं सोन केलं. पुरीच्या भूमिकेत मनीषशिवाय अजून कुणाची कल्पनाही करता येत नाही. चित्रपटाचा शेवटचा प्रसंग मनीष किती समर्पित अभिनेता आहे हे दाखवून देतो. पावसाळी रात्र. आपण ही लढाई हरलो आहोत याची पुरीला जाणीव झाली आहे. तो आपली गाडी काढून एका मोठ्या शोरूम समोर जाऊन उभा राहतो. तिथं त्याच्या 'प्रतिस्पर्धी' सध्या कामावर आहे. पुरी तिथं जाऊन पहिल्यांदाच हरप्रीतशी बरोबरीचा संवाद साधतो. आपली हार मान्य करतो. कुठंही आपला माज कमी न करता. हरप्रीतच्या खांद्यावर हात टाकून त्याला आयुष्यात कधीच न बदलण्याचा सल्ला देतो. एक रुपया घेऊन कंपनीची कागदपत्रं पुन्हा हरप्रीतच्या हातात सुपूर्द करतो आणि 'आय विल सी यु इन द फिल्ड' असा इशारा देऊन टेचात निघून जातो. हा चित्रपटातला सगळ्यात महत्त्वाचा सीन. समोर रणबीरसारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना हा सीन मनीषने खिशात घातला आहे. रॉकेटसिंगनंतर मनीषला काही चित्रपट मिळालं. पण इतकी चांगली लिहिलेली आणि महत्त्वाची भूमिका त्याला नंतर कधीच मिळाली नाही. प्रेक्षकांचंच दुर्दैव. दुसरं काय?
दिग्दर्शक शिमीत अमिनचा हा तिसरा चित्रपट. 'अब तक छप्पन' आणि 'चक दे इंडिया' हे त्याचे पूर्वीचे चित्रपट. हा दिग्दर्शक किती वैविध्यपूर्ण विषय हाताळू शकतो, याचं ही तिन्ही चित्रपट उदाहरण आहेत. ‘चक दे’च्या दणदणीत यशानंतर शिमीत अमिन कुठल्याही सुपरस्टारला घेऊन अजून एक सेफ बेट खेळू शकला असता. पण त्याने तसं करायचं नाकारून त्यावेळेस नवोदित असणाऱ्या रणबीर कपूरला घेऊन या वेगळ्या विषयावर सिनेमा बनवला. त्याची किंमत त्याला मोजावी लागली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. पण नंतर टीव्ही, पायरेटेड व्हर्जन्स, सीडीजमधून चित्रपटाची लोकप्रियता वाढत गेली. 'रॉकेटसिंग' आवडला या कारणाने लोकांची मैत्री होऊ लागली. पण शिमीतला चित्रपटाच्या अपयशाचा धक्का बसला. तो जवळपास अज्ञातवासात गेला. त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे तो लवकरच कमबॅक करत आहे. यावेळेस रणवीर सिंग सोबत काम करत आहे.
रणबीर कपूरच्या उल्लेखाशिवाय लेख पूर्ण कसा होणार? रणबीर कपूर हा किती जबरदस्त अभिनेता आहे, हे या चित्रपटातून पहिल्यांदाच लोकांच्या लक्षात आलं. इम्तियाज अली हा चित्रपट बघून रणबीरच्या इतका प्रेमात पडला की, त्याने ‘रॉकस्टार’साठी त्याला साइन केलं. स्मार्ट नसणारा, आक्रमक नसणारा, सिक्स पॅक्स अॅब्ज नसणारा नायक कारकिर्दीच्या सुरुवातीला साकारणं ही व्यवसायिक आत्महत्या आहे, असा सल्ला अनेक बॉलिवुड पंडितांनी रणबीरला दिला होता. पण चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडलेल्या रणबीरने हा सल्ला फारसा मनावर घेतला नाही. चित्रपटात हरप्रीत हरप्रीतच वाटतो, रणबीर कपूर एकदाही वाटत नाही. रणबीरच्या आयुष्यातल्या सर्वोत्तम परफॉर्मंन्सपैकी हा एक आहे हे नक्की.
चित्रपटात वर उल्लेख केल्याप्रमाणे छोटेलाल नावाचं एक चपराशाचं पात्र आहे. तोही रॉकेटसिंग कॉर्पमध्ये सामील होतो. हरप्रीत सगळ्यांसमोर सांगतो, छोटेलाल जरी चपराशी असले तरी रॉकेटसिंग कॉर्पमध्ये बरोबरीचे पार्टनर आहेत. आजपासून आपण सगळ्यांनी त्यांचा सन्मान करायचा आणि बरोबरीने वागवायचं. बाकी पार्टनरना ते सुरुवातीला आवडत नाही, पण नंतर छोटेलालला ते सन्मान द्यायला लागतात. जेव्हा पुरी रॉकेटसिंग कॉर्पला बर्बाद करतो आणि या सगळ्यांना कामावरून काढून टाकतो, तेव्हा छोटेलाल चहाच्या टपरीवर चहा बनवण्याच्या कामाला लागतो. तेव्हा त्याला आर्थिक दुरावस्थेचा त्रास होत नाही. त्रास होतो तो आपल्याला बरोबरीनं वागवणारे 'पार्टनर्स' दुरावल्याचा.
चित्रपटात अतिशय सुंदर गाणं आहे , 'पंखो को हवा जरा सी लगने दो '. चित्रपटाचा मूड सेट करणारं. त्या गाण्यात फार सुंदर ओळी आहेत-
पंखों को हवा जरा सी लगने दो
दिल बोले सोया था अब जगने दो
दिल दिल में है दिल की तमन्ना सा
तो चलो जरासी तपने दो
उडने दो
हवा जरा सी लगने दो
आयुष्यात तुमच्या कार्यक्षेत्रात राहून काही वेगळं करायचं आहे, तर 'रॉकेटसिंग - सेल्समन ऑफ द इयर' तुमचा पिक्चर आहे. काही टीकाकारांच्या मते चित्रपट अतिशय संथ आहे. पण संथ नदीचं पात्र सुंदरच दिसतं. हा चित्रपट मानसिक कोंडमारा होणाऱ्या समाजात काही लोकांना तरी नक्कीच आशेचं टॉनिक देऊ शकतो. काही आत्महत्या या खूप जास्त क्रूर असतात. यातली एक आत्महत्या जरी टळली तर शिमीत, रणबीर, जयदीप ही लोक यशस्वी झाली असं म्हणता येईल.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Mon , 03 July 2017
भारी परीक्षण! शुभेच्छा!
Bhagyashree Bhagwat
Mon , 03 July 2017
भारी परीक्षण! शुभेच्छा!