एका मामुली आदमीची ‘असामान्य’ कथा
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘इक मामुली आदमी’ या हिंदी नाटकातील एक प्रसंग
  • Sat , 01 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe इक मामुली आदमी Ek Mamooli Aadmi इप्टा IPTA अशोक लाल Ashok Lal

मराठी भाषेइतकीच हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषांतील रंगभूमीही समृद्ध आहे. या रंगभूमीवर वेगवेगळ्या आशय-विषयांची नाटकं सादर होतात. वेगवेगळे प्रयोग होतात. यातील बरीचशी नाटकं मुंबई-पुणे-नागपूर या ठिकाणीही होतात. या रंगभूमींवर काय चाललं, कुठली नाटकं सादर होत आहेत, याची ओळख करून देणारं हे पाक्षिक सदर.

.............................................................................................................................................

भारताचं स्वातंत्र्य जसजसं जवळ येत होतं, तसतशी पाकिस्तानवादी मुस्लिमांची व अखंड हिंदुस्तानवादी हिंदूंची डोकी फिरत होती. १९४२ साली तर हिंदू-मुस्लीम दंग्यांचा कहर झाला होता. अशा स्थितीत काही पुरोगामी विचारांचे लेखक, नाट्यकर्मी, कवी एकत्र आले आणि त्यांनी याच वर्षी ‘इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएसन’ (इप्टा)ची स्थापन केली. यात पृथ्वीराज कपूर, बलराज सहानी, उत्पल दत्त, ख्वाजा अहमद अब्बास, पंडित रवी शंकर वगैरे दिग्गज होते. १९४२ साली स्थापन झालेल्या ‘इप्टा’चं २०१७ हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्तानं ‘इप्टा’ने अनेक नवी नाटकं सादर करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे काही जुन्या, महत्त्वाच्या नाटकांचे (उदाहरणार्थ ‘बकरी’) पुनरुजीवित रूपसुद्धा सादर केलं जात आहे. हा महोत्सव वर्षभर चालणार आहे. या उपक्रमातील इप्टाचं ‘इक मामुली आदमी’ हे हिंदी नाटक नुकताच बघण्याचा योग आला.

हे नाटक सुप्रसिद्ध जपानी सिनेदिग्दर्शक अकीरा कुरोसावा (१९१०-१९९८) यांच्या १९५२ साली आलेल्या ‘इकीरू’ या गाजलेल्या चित्रपटाचं नाट्यरूपांतर आहे. ते अशोक लाल यांनी केलं आहे. सुमारे अडीच तास चालणारं हे नाटक वेगळीच जीवनदृष्टी देतं आणि अर्थपूर्ण जीवन जगणं कसं शक्य आहे व त्याचा आनंद काय असतो, हे एका निवृत्तीला आलेल्या हेड क्लार्कच्या, श्रीयुत अवस्थींच्या जीवनातील नाट्यातून प्रेक्षकांसमोर आणतं.

नाटक सुरू होतं तेव्हा एक तरुण त्याच्या पत्नीबरोबर नुकत्याच दिवंगत झालेल्या वडिलांच्या तेराव्याची चर्चा करत असतो. यात मुद्दे नेहमीचेच असतात. म्हणजे श्राद्ध करायला किती खर्च येर्इल, किती लोकांना जेवण द्यावं लागेल वगैरे. हे कुटुंब ब्राह्मण असतं. हा उल्लेख महत्त्वाचा आहे. पती-पत्नींच्या चर्चेतून कळतं की, गावातल्या ब्राह्मणांनी या श्राद्धावर बहिष्कार घोषित केला आहे. मुलाला कळत नाही की, आपल्या पापभिरू वडिलांनी काय असं केलं की, ज्यामुळे ब्रह्मवृदांनं त्यांच्या श्राद्धावर बहिष्कार घालावा. त्याला सांगण्यात येतं की, याचं उत्तर त्याला त्याचे वडील नोकरी करत असलेल्या महापालिकेच्या कार्यालयात मिळेल.

मुलगा महापालिकेच्या कार्यालयात जातो. तिथं नेहमीप्रमाणे सुरुवातीला त्याला कोणी सरळ उत्तर देत नाही. नंतर त्याला तेथील कचरा व गटार साफ करणाऱ्या विभागातील मध्यमवयीन, अविवाहित व बराचसा छंदीफंदी खरे नावाचा गृहस्थ सांगतो की, तो त्याला सर्व व्यवस्थित समजून सांगेल. इथून नाटकाचं कथानक मध्यप्रवाहात येतं.

या पुढचं नाटक फ्लॅशबॅक पद्धतीनं सादर केलं आहे. अवस्थींची पत्नी दहा-पंधरा वर्षांपूर्वी वारली. मुलाचं लग्न झालेलं असतं. ते आता मुलगा व सून यांच्याबरोबर राहत असतात. अवस्थी शेवटच्या काळात फार अस्वस्थ होतात. त्यांनी जीवनात कधी कुठलं व्यसन केलेलं नसतं, महागडे कपडे घातलेले नसतात, नाटक/ सिनेमे बघितलेले नसतात. अगदी सरळमार्गी जीवन जगलेल्या अवस्थींना शेवटच्या काळात फार अस्वस्थ वाटायला लागतं. आपण जीवनात काही भव्यदिव्य केलं नाही, फक्त मान मोडून नोकरी केली आणि सर्व कष्ट कुटुंबासाठी केलं. यात आपल्यासाठी काहीही नव्हतं.

एका संध्याकाळी अवस्थी त्यांचा कार्यालयातला मित्र खरेबरोबर बाहेर पडतात. ती वेळ खरे यांची मद्यपान करण्याची असते. जीवनात कधीही मद्यपान न केलेले अवस्थी त्या संध्याकाळी झिंगून जार्इपर्यंत मद्यपान करतात. त्यादरम्यान त्यांच्या झालेल्या गप्पांतून खरेसमोर त्यांचं सर्व वैफल्य बाहेर येतं. ते खरेला सांगतात की, त्यांच्या मुलाला व सुनेला त्यांची काही काळजी नाही, त्यांचं सर्व लक्ष आहे मला किती प्रॉव्हिडंड फंड मिळेल, किती ग्रॅच्युईटी मिळेल याकडे. म्हणून जेव्हा अवस्थींचा मुलगा खरे यांना कार्यालयात प्रथम भेटतो, तेव्हा खरे त्याला सूचकपण सांगतो की, ते जरी तुझे वडील होते तरी तुला माहिती नसलेले तुझे वडील मला माहिती आहेत. मानवी जीवनाची ही शोकांतिका झेन तत्त्वज्ञानात चांगल्या प्रकारे व्यक्त झाली आहे – ‘ज्या व्यक्ती जवळ आहेत, त्याच फार दूर आहेत.’

या दरम्यान अवस्थींना वैद्यकीय तपासणीत कळतं की, त्यांना पोटाचा कर्करोग झाला असून ते आता जास्तीत जास्त सहा महिने जगणार आहेत. जवळजवळ येणारी निवृत्ती आणि त्याचप्रमाणे जवळ येत असलेला मृत्यू, यामुळे अवस्थींमध्ये अमूलाग्र बदल होत जातो. हा बदल त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना तसंच त्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना तापदायक ठरतो.

त्या शहराच्या विकासाच्या मास्टर प्लॅनप्रमाणे एक मोठा भूखंड बगीच्यासाठी राखीव असतो. पण गावातील धनदांडगे, धर्ममार्तंड व ज्येष्ठ नोकरशहा एकत्र येऊन तिथं एक भव्य मंदिर बांधण्याची योजना आखतात. एक मंदिर बांधलं की, शेपन्नास पुजाऱ्यांच्या पोटापाण्याची तहहयात सोय झाली असा त्यामागे साधा विचार असतो. एवढी वर्षं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना निमूटपणे प्रत्यक्षात आणणारे अवस्थी अचानक मास्टर प्लॅनमध्ये बदल करून बगीच्याची जागा मंदिरासाठी देण्यास नकार देतात. मग सुरू होता जीवघेणा संघर्ष- अवस्थी विरूद्ध इतर प्रस्थापित शक्ती. अवस्थी जीवाच्या करारानं ही लढाई लढतात व जिंकतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे मंदिर होऊ शकलं नाही म्हणून त्यांच्या श्राद्धावर धर्ममार्तंडानी बहिष्कार घातलेला असतो. या सर्व प्रकारात अवस्थींचा अपेक्षेप्रमाणे मृत्यू होतो, पण मरतेसमयी त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीची, काहीतरी करून मेल्याची भावना असते.

अशी ही एक प्रकारे साधीसरळ कथा. पण आपण जेव्हा याचा खोलात जाऊन विचार करू लागतो, तेव्हा जाणवतं की अर्थपूर्ण जगणं आणि साधं किड्या-मुंग्यासारखं जगणं यात किती फरक आहे! त्याचबरोबर हेही लक्षात येतं की, अर्थपूर्ण जगण्याची जबरदस्त किंमत द्यावी लागते. अशी किंमत देण्याची तयारी असेल तरच या दिशेनं प्रयत्न करावा. अन्यथा आपली रूळलेली वाट बरी म्हणत जगून घ्यावं व एके दिवशी मरून जावं, या सूत्रावर हे नाटक संपतं.

या नाटकाचं दिग्दर्शन रमण कुमार या ज्येष्ठ रंगकर्मींनी केलं आहे. त्यांनी नाटकाचा आत्मा ओळखून नाटक बांधलं आहे. सुदैवानं नाटक प्रभावी करणारे इतर घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यातील पहिला घटक म्हणजे अभिनय. यातील अवस्थीची प्रमुख भूमिका ‘इप्टा’चे ज्येष्ठ सभासद व आदरणीय अभिनेते अंजन श्रीवास्तव यांनी केली आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यांनी १९९० च्या दशकात सादर केलेली ‘वागळे की दुनिया’ या टीव्ही मालिकेतील वागळेची भूमिका हमखास आठवेल. त्यांनी या नाटकातील अवस्थीच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे. अशा दिग्गज अभिनेत्यांना रंगमंचावरच बघावं. त्यांच्या अभिनयक्षमतेचा कस तिथं लागतो.

अंजन श्रीवास्तव यांनी सुरुवातीचा पापभिरू अवस्थी, मृत्यूची चाहूल लागल्यावर अंतर्मुख झालेला अवस्थी, आपलं जीवन बेकार गेलं अशा भावनेनं उदध्वस्त झालेला अवस्थी आणि शेवटी त्या जागेवर बगीच्याच होर्इल अशी ठाम भूमिका घेणारा अवस्थी, ही सर्व स्थित्यंतरं फार सफाईनं सादर केली आहेत. अवस्थी ही व्यक्ती निवृत्तीच्या दारात उभी आहे म्हटल्यावर त्याची देहबोली कशी असेल याचं अचूक भान अंजन श्रीवास्तव यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.

त्यांना अप्रतिम साथ दिली आहे खरेच्या भूमिकेतील निरज पांडे या तरुण रंगकर्मीनं. त्याने चंगीभंगी खरे छान सादर केला आहे. जेव्हा त्याला अवस्थीत होणारे बदल दिसतात, तेव्हा तोसुद्धा कार्यालयीन लढाईत त्यांच्या बाजूनं उतरतो. हा महत्त्वाचा बदल निरज पांडेना परिणामकारकरीत्या व्यक्त केला आहे. यांच्या जोडीला शिवकांत लखनपाल (अवस्थींचा मुलगा), निवेदिता बाँथियाल (अवस्थींची सून), पूजा भवोरिया (अवस्थींच्या कार्यालयातील महिला सहकारी) ही नटमंडळी आहेत. या सर्वांनी आपापल्या भूमिका समजून केल्या आहेत. परिणामी ‘एक मामुली आदमी’तील  अभिनयाचा एकंदर दर्जा वरचा आहे.

अभिनयाप्रमाणेच या नाटकातील नेपथ्याचा खास उल्लेख करावा लागेल. हे नाटक वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा नाट्यगृहात सादर करण्यात आलं. हा रंगमंच बराच प्रशस्त आहे. ज्येष्ठ नेपथ्यकार एम.एस. सथ्यू यांनी उपलब्ध जागेचा कल्पकतेनं वापर केला. म्हणून नाटकातील फ्लॅशबॅक योग्य पद्धतीनं सादर करता आले. रंगमंचाच्या पुढच्या बाजूत खरेच्या घरातील अवस्थीबरोबरचा मद्यपानाचा प्रसंग आहे, तर पुढच्या भागातील उजव्या कोपऱ्यात अवस्थीच्या मुलाचा संसार आहे. रंगमंचाच्या मागच्या बाजूला अवस्थींचं कार्यालय आहे, जिथं अवस्थींच्या सोबत दोन-तीन सहकारी बसलेले असतात. अशा नेपथ्याचा परिणामकारक वापर करण्यासाठी प्रकाशयोजनासुद्धा तशीच कल्पक हवी. ही बाजू धिरेन मर्चंट यांनी सांभाळली आहे. प्रसंग बदलताना होत असलेली प्रकाशयोजना प्रेक्षकांना अंदाज देते की, या पुढचा प्रसंग कोणता असेल. हे जमवून आणणं सोपं नसते.

या सर्वांमुळे ‘एक मामुली आदमी’चा प्रयोग बघणं हा एक आगळा आनंद ठरतो. आजच्या यू- ट्यूबच्या जमान्यात कुरोसावांचा ‘इकीरू’ घर बसल्या सहज उपलब्ध असताना ‘एक मामुली आदमी’चा प्रयोग मंचित करण्याचं धाडस केल्याबद्दल ‘इप्टा’चं खास अभिनंदन. हीच रंगभूमीची खरी जादू आहे!

लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख