बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (पूर्वार्ध)
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
चैताली भोगले
  • बॉब डिलन आणि त्याचे काही म्युझिक अल्बम
  • Mon , 31 October 2016
  • बॉब डिलन ‌Dylan चैताली भोगले Chaitali Bhogle

१.

….then take me disappearing

 through the smoke rings of my mind

down the foggy ruins of time,

far past the frozen leaves,

the haunted, frightened trees,

out to the windy beach

far from the twisted reach of crazy sorrow

yes to dance beneath the diamond sky with one hand waving free

silhouetted by the sea, circled by the circus sands

with all memory and fate driven deep beneath the waves

let me forget about today until tomorrow....

बॉब डिलननं १९६० च्या दशकात लिहिलेल्या ‘Mr. tambourine man’मधल्या या काही ओळी. स्वप्नील प्रतिमांच्या लडीच्या लडी वाक्यावाक्यागणिक उलगडत जाणारं हे गाणं, मनाला सतत वेढून असणारा विस्मयकारक थकवा, शरीराला गलितगात्र करणारे सारे बंध मागे टाकून चकाकत्या आभाळाखाली विमुक्त नाचण्याचं निमंत्रण देतं. आवडत्या ठिकाणाला पुन:पुन्हा भेट द्यावी, तसे डिलनचे चाहते या गाण्याशी पुनःपुन्हा परतत राहतात...

आताही या गाण्याची आठवण जागी व्हायचं कारण गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून डिलनचं नाव सतत बातम्यांमध्ये आहे. १३ ऑक्टोबरला ते पहिल्यांदा बातमीत आलं, ते साहित्यासाठीच्या नोबेलसाठी त्याचं नाव जाहीर झालं तेव्हा. साहित्यासाठीचा हा सर्वोच्च सन्मान. अनेक गुणी कथा-कादंबरीकारांना, कवींना डावलून पॉप्युलर कल्चरमधल्या एका गीतकाराला हा पुरस्कार दिला जावा का, त्यासाठी अधिक पात्र अशी किती नावं स्पर्धेत आहेत, कित्येक वर्षं कुणावर किती अन्याय होत राहिला आहे, अमेरिकन साहित्यकारांना नोबेल सततच कसं हुलकावणी देत राहिलं आहे वगैरे सगळ्या चर्चा सालाबादाप्रमाणे यंदाही झडल्या. तरीही बॉब डिलनला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद या सगळ्या वादांना पुरून उरला. पाच दशकांहून अधिक काळ त्याच्या गाण्यांशी जोडल्या गेलेल्या ऋणानुबंधांचा हा महिमा. पण नोबेल पुरस्काराचा स्वीकार करणं सोडाच, त्याची साधी दखल घेण्याचंही बॉब डिलननं टाळलं, तेव्हा ती आणखी मोठी बातमी बनली. हा निव्वळ तुसडेपणा की, एखाद्या ठोस भूमिकेतून जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले गेले. अखेर दोन आठवड्यांपूर्वी, ‘आपण या पुरस्काराचा अत्यंत आनंदानं स्वीकार करत आहोत,’ असं डिलनने जाहीर केलं आणि जवळजवळ तोंडघशी पडलेल्या नोबेल पुरस्कार समितीचा आणि त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. अर्थात त्याचं सुरुवातीचं मौन आणि आताचा दिलखुलास स्वीकार यातलं काय, किती खरं-खोटं हे खुद्द डिलनच जाणो. आपल्याच आतल्या गाण्याच्या शोधात आजतागायत अखंड भटकंतीवर असलेल्या या अवलियाला चिमटीत पकडणं कठीण आहे.

तसंही डिलनच्या कोणत्याही गाण्याबद्दल, कृतीबद्दल ठोस विधानं करण्याच्या फंदात फारसं कुणी पडत नाही.  ‘माहीत नाही’, ‘नक्की सांगता येत नाही.’, ‘कदाचित असू शकेल’ वगैरे शक्यतांच्या भाषेतच बोललं जातं. पण २००५ साली आलेलं डिलनचं पुस्तक ‘क्रॉनिकल्स (भाग १), त्याने अधूनमधून देऊन ठेवलेल्या (खऱ्याखुऱ्या) मुलाखती, त्याच्यावर बनलेल्या फिल्म्सचे तुकडे आणि खुद्द त्याची गाणी यातून तुकड्यातुकड्यांनी थोडाथोडका डिलन जरूर हाताशी लागतो.

नोबेल देताना स्वीडीश अकादमीने डिलनने अमेरिकन संगीताच्या प्रदीर्घ परंपरेत काव्यात्म अभिव्यक्तीची भर टाकल्याचं म्हटलं आहे. बॉब डिलन हा अमेरिकेच्या लोकसंगीत परंपरेतला आधुनिक शिलेदार. वर्षानुवर्षं चाललेल्या स्थलांतराच्या प्रक्रियेत अमेरिकन भूमीवर येऊन वसलेल्या इंग्लिश, आफ्रिकन, स्पॅनिश इत्यादी लोकसमूहांनी सोबत आणलेली पारंपरिक गाणी, गोष्टी सांगणारी गाणी, लोकधूना, वाद्यं, ताल-ठेके, स्थानिक इंडियन लोकांची स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक परंपरा यांच्या मिलाफाने इथलं लोकसंगीत समृद्ध बनलेलं आहे. डिलनचं झिमरमन कुटुंबही अशा स्थलांतरितांपैकीच. रॉबर्ट झिमरमनचा जन्म मिनासोटा राज्यातील डुलुथ इथं झाला. तो सहा वर्षांचा होता, तेव्हा त्याचं कुटुंब मिनासोटामधल्याच हिबिंग इथं रहायला आलं. तिथं रेडिओवर सतत वाजणारं उडत्या चालींच्या ‘रॉक अँड रोल’ संगीत त्याने खूप ऐकलं. एल्विसवर तर जवीच जडला होता त्याचा. तरीही लोकसंगीत त्याला अधिक सखोल, गूढ वाटलं. आपल्या अंतरी दडलेलं गाणं या लोकसंगीताशीच मेळ खाणारं आहे, याचं भान त्या लहान वयातही त्याला आलं होतं. तसं त्याचं लहानपण बरंचसं भटकंतीतच गेलं.

इथं एका योगायोगाचा उल्लेख अनाठायी ठरू नये. बॉब डिलनच्या आधी केवळ एकाच गीतकाराची निवड नोबेल पुरस्कारासाठी झाली आहे. रवीन्द्रनाथ टागोर! टागोरांच्या सगळ्याच लेखनात मनाची हाक ऐकून आपल्याच एकांड्या वाटेनं चालण्याची इच्छा सतत डोकं वर काढताना दिसते. गावाबाहेरचा कच्च्या मातीचा रस्ता त्यांच्या पात्रांना खुणावतो आणि घर सोडायला लावतो. हा आपणच आपल्यावर लादलेला विजनवास डिलनच्याही आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच हे पोर घरातून पळ काढायचं. मग कुणीतरी त्याला पकडून पुन्हा घरी आणून सोडायचं. असं तब्बल सतरा वेळा झालं. या खेळातली निरर्थकता लक्षात आल्यावर तो थांबला, पण घरात रमला मात्र नाही. शिक्षणातही नाही. या भटकंतीतून आपल्या गीतांसाठी भरपूर ऐवज त्याने मिळवला. गिटार, हार्मोनिकावर प्रभुत्व मिळवलं. गाणं तर खूप ऐकलंच, पण जगणंही खूप पाहिलं.

२.

१९६० साल डिलनच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये पहिलं महत्त्वाचं वळण देणारं ठरलं. तेव्हा तो वयाच्या अवघ्या विशीत होता. ६० सालीच कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून डिलन न्यू यॉर्कला आला. इतकी वर्षं रेडिओवर ज्यांची गाणी ऐकली, त्या लोकसंगीतातल्या सिताऱ्यांना, त्यातही त्याला दैवतासारख्या वाटणाऱ्या वुडी गुथरीला भेटायला तो या अफाट शहरात एकटाच उतरला. वुडी गुथरी म्हणजे पन्नासच्या दशकातला सुप्रसिद्ध लोकगीत-संगीतकार. परंपनेनं चालत आलेल्या गाण्यांमध्ये आजच्या जगण्याचे प्रश्न गुंफण्याचं काम त्याने केलं आणि मुख्य म्हणजे गाणं हे फक्त भावना नव्हे तर विचार मांडण्याचं कामही करू शकतं हेही दाखवण्याचा प्रयत्न केला. वुडीने गायलेली शेकडो गाणी घडत्या वयातल्या डिलननं आपल्या मेंदूत कोरून घेतली होती.

१९६०मध्ये न्यू जर्सीमधल्या हॉस्पीटलमध्ये अंधरुणाला खिळलेल्या वुडीला तो अनेकदा भेटला. (त्याने अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या गाण्यांमध्ये ‘साँग फॉर वुडी’ हे लोकपरंपरेतल्या पूर्वसुरींचं ऋण व्यक्त करणारं एक सुंदर गाणं आहे. तोवर परंपरेनं चालत आलेली गाणीच प्रामुख्याने म्हणणाऱ्या डिलनच्या या पहिल्यावहिल्या गाण्यानंच त्याला लोकप्रियतेचं दार किलकिलं करून दिलं.)

त्या सुरुवातीच्या काळात न्यू यॉर्कमधल्याच छोट्या छोट्या कॉफी जॉइंट्समध्ये स्थानिक स्टार्स म्हणून बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवून असलेल्या लोकगायकांबरोबर कधी हार्मोनिकाची साथ करणं, कधी गाणं म्हणणं आणि प्रेमळ आचाऱ्यांच्या मेहरबानीने फुकट मिळणाऱ्या फ्रेंच फ्राइजवर आणि हॅम बर्गरवर ताव मारणं असा त्याचा दिनक्रम होता. हेच सारं करत असताना एकदा रेडिओवर सुरू असलेल्या आपल्या समवयीन गायकाचं गाणं त्याच्या कानावर पडलं. आपल्यालाही हेच तर करायचंय, याचं विस्मृतीत गेलेलं भान या प्रसंगामुळे पुन्हा जागं झालं. ही संधी त्याला सुप्रसिद्ध कोलंबिया रेकॉर्ड्सकडून लगेचच मिळाली. कोलंबियासाठी नव्या दमाचे प्रतिभावंत कलाकार शोधण्याचं काम करणाऱ्या जॉन हॅमंडनं डिलनच्या गाण्याचं वेगळेपण अचूक हेरून त्याला रेकॉर्डिंगसाठी आमंत्रण दिलं होतं. हा प्रयोग धाडसाचा होता. तत्कालीन व्यावसायिक गायकांसारखा चकचकीत पॉलिश केलेला सफाईदार आवाज डिलनकडे नव्हता. तो बराचसा ओढगस्तीला आल्यासारखा. थकलेलाच जवळजवळ. सानुनासिक, प्रौढ, पहिल्या श्रवणात अनाकर्षकच वाटेल असा काहीसा होता. पण हा धोका पत्करूनही कोलंबियाने त्याचा पहिला अल्बम प्रसिद्ध केला. त्यात बरीचशी पारंपरिक गाणी आणि ‘साँग फॉर वुडी’सह डिलनची दोन स्वलिखित गाणी होती. या अल्बमला तसा बरा प्रतिसाद मिळाला.

३.

पण खरा झंझावात सुरू झाला तो त्याचा पुढचा अल्बम ‘फ्रीव्हिलिंग बॉब डिलन’पासून. आजतागायत त्याच्या नावाशी न चुकता जोडलं जाणारं गीत ‘ब्लोइंग इन द विंड’ हे याच अल्बममध्ये प्रथम प्रकाशित झालं. त्याखेरीज ‘मास्टर्स ऑफ वॉर’, ‘हार्ड रेन ए-गॉना फॉल’ ही युद्धविरोधी गाणीही या अल्बममध्ये आहेत. बॉब डिलनची सुप्रसिद्ध निषेधगीतं ती हीच. साठचं ते दशक अमेरिकेसाठी खऱ्या अर्थानं राजकीय-सामाजिक उलथापालथींचं होतं. नागरी हक्कांसाठीचा कृष्णवर्णीयांचा झगडा, व्हिएतनाम युद्ध, केनेडींची हत्या अशा घटनांमुळे वातावरण ढवळून निघालेलं होतं आणि अमेरिकन तरुणाईमध्ये अस्वस्थता शिगेला पोहोचलेली होती. या अस्वस्थ काळात बॉब डिलनची गाणी प्रसिद्ध झाली, तेव्हा संगीतातला कुणी नवा प्रेषितच अवघ्या मानवजातीला वाचवण्यासाठी काही संदेश घेऊन आला आहे असं सगळ्यांना वाटलं. डिलन त्या काळात ज्या पद्धतीची गाणी रचत होता, त्यांचं संगीत अमेरिकन संगीताच्या आत्म्याशी पुरेपूर निष्ठा राखणारं नक्की होतं. पण त्या सुरावटींच्या साथीनं तो जे शब्द उच्चारत होता, ते मात्र या परंपरेसाठी सर्वार्थांनी नवे होते.

Yes, and how many times must a man look up

Before he can see the sky?

Yes, and how many ears must one man have

Before he can hear people cry?

Yes, and how many deaths will it take 'til he knows

That too many people have died?

johnson my friend is blowing in the wind

असे शब्द लिहिण्याइतकं असं कितीसं आयुष्य डिलननं पाहिलं असावं? ‘बदलत्या काळाला सामोरं जा, नाहीतर बुडून मरा’ असा नि:संदिग्ध इशारा कर्मठ बुजूर्गांना ठणकावून देण्याचं बळ त्याने कुठून मिळवलं होतं?

Come mothers and fathers

Throughout the land

And don’t criticize

What you can’t understand

Your sons and your daughters

Are beyond your command

Your old road is rapidly aging

 Please get out of the new one

If you can’t lend your hand

For the times they are a-changing

ही नेमकी, खणखणीत वाक्यं आपल्या तितक्याच तटस्थ आवाजात ऐकवणाऱ्या डिलनला वंचितांच्या गटांनी लागलीच आपला प्रवक्ता बनवलं. त्याची ही गाणी म्हणजे चालू काळावरची चपखल टिपण्णी असल्याचा सोपा निष्कर्ष काढला गेला. मग ‘टाइम्स दे आर ए-चेंजिंग’मधल्या दारावर थाप देणाऱ्या घोंघावत्या वादळाचा उल्लेख व्हिएतनाम युद्धाशी जोडला गेला. ‘हार्ड रेन इज ए-गॉना फॉल’ हे गाणं प्रसिद्ध झाल्यावर काही काळात केनेडींची हत्या झाली. डिलनला अपेक्षित प्रलय तो हाच असं बऱ्याच जणांना वाटलं. ते काहीअंशी तसंच असेलही, पण कान देऊन ऐकलं तर त्या गाण्यांतून आजही दूरच्या हाका ऐकू येतात. ‘हार्ड रेन...’ हे गाणं तर ईश्वराचा सर्वसाक्षी डोळा उसना घेऊन पाहिलेल्या प्रलयाचं वर्णन करावं तसं भव्य वाटतं. एका जुन्या करुण लोकगीताच्या आधारावर डिलनने ते रचलं. मूळच्या गाण्यात विषप्रयोग झालेल्या आपल्या मुलाला पाहून त्याची आई, ‘अरे, तू गेलास तरी कुठे होतास?’ असा व्याकूळ प्रश्न विचारते. ही व्याकूळता जशीच्या तशी ठेवून डिलनने त्या गाण्याच्या कक्षा अनंतापर्यंत विस्तारल्या आहेत.

Oh, where have you been, my blue-eyed son?

And where have you been my darling young one?

I've stumbled on the side of twelve misty mountains

I've walked and I've crawled on six crooked highways

I've stepped in the middle of seven sad forests

I've been out in front of a dozen dead oceans

I've been ten thousand miles in the mouth of a graveyard

And it's a hard, it's a hard, it's a hard, and it's a hard

It's a hard rain's a-gonna fall.

‘जगभरात पसरलेल्या दैन्य आणि दु:खाची गाथा गाऊन झाल्यावर मी पुन्हा आता तिथंच परततोय’ असं तो गाण्याच्या शेवटच्या कडव्यात सांगतो.

I'm a-goin' back out 'fore the rain starts a-fallin'

I'll walk to the depths of the deepest black forest

Where the people are a many and their hands are all empty

Where the pellets of poison are flooding their waters

Where the home in the valley meets the damp dirty prison

And the executioner's face is always well hidden

Where hunger is ugly, where souls are forgotten

Where black is the color, where none is the number

And I'll tell and speak it and think it and breathe it

And reflect from the mountain so all souls can see it

And I'll stand on the ocean until I start sinkin'

But I'll know my song well before I start singing...

आपल्या देवदूतासारख्या आवाजानं तेव्हाच्या लोकसंगीताची अनभिषिक्त राणी बनलेली जोन बाएझ त्या काळात डिलनच्या खूप जवळ होती. तिने या गाण्यांचं महत्त्व योग्य प्रकारे मांडलं आहे. ती एका ठिकाणी म्हणते, ‘निषेधाची गाणी एरवी भडक, प्रचारकी असायची. डिलनने त्यामध्ये सौंदर्याची आणि शाश्वत मूल्यांची पेरणी केली.’ बाएझने डिलनची गुणवत्ता केवळ हेरलीच नाही, तर आपल्या सोबतीने त्याला अनेक कार्यक्रमांमध्ये गायची संधी दिली. स्वत:ची खास शैली, काव्यात्म मूल्य जपून असलेली त्याची शब्दकळा आणि मूळात नेमकं काय म्हणायचं याचं पक्क भान या गुणवैशिष्ट्यांमुळे डिलनने ते सारे मंच काबीज केले.

(उत्तरार्ध उद्या प्रकाशित होईल)

 

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

chaitalib6@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा