फॅसिझम हा संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो!
संकीर्ण - पुनर्वाचन
नरहर कुरुंदकर
  • नरहर कुरुंदकर आणि ‘छाया-प्रकाश’ या पुस्तकाचे शीर्षक पृष्ठ
  • Thu , 29 June 2017
  • लोकशाही Democracy हुकूमशाही Authoritarian फॅसिझम Fascism नरहर कुरुंदकर Narhar Kurundkar अॅडॉल्फ हिटलर Adolf Hitler जोसेफ स्टॅलिन Joseph Stalin माओ झेडाँग Mao Zedong

ज्या ठिकाणी घोषणांचा वापर मूळ मुद्दा नजरेआड करण्यासाठी केला जातो त्या ठिकाणी ही शक्यता जास्त असते की, फॅसिझम-विरोधाच्या नावाने भलतीच मंडळी झोडपली जातील – आणि जे खरेखुरे फॅसिस्ट आहेत तेच जास्तीत जास्त आरडाओरड लोकशाहीच्या संरक्षणासाठी करू लागतील!

फॅसिझमच्या वाढीलासुद्धा लोकशाहीवादी राष्ट्रांनीच फार मोठे खतपाणी दिलेले आहे. हिटलर आणि मुसोलिनी यांच्या आक्रमक व अत्याचारी राजकारणाकडे दीर्घकाळ डोळेझाक करण्याचे धोरण इंग्लंड, फ्रान्स व अमेरिकेने स्वीकारलेले होते. फॅसिझमचा भस्मासूर जगाचा ग्रास करील एवढे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभा राहिला. या घटनेच्या पापाची जबाबदारी इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका यांनी स्वीकारणे भाग आहे. या विवेचनाचा एक सोपा अर्थ आहे, तो अर्थ असा की, जे रोज लोकशाहीच्या नावाने जप करतात ते लोकशाहीवादी असतीलच याची खात्री नाही. दांभिकांना नेहमीच नानाविध प्रकारच्या खोटेपणाची गरज लागत असते. ही माणसे वेगवेगळ्या मान्यवर कल्पना आपल्या स्वार्थासाठी वापरण्यात वाकबगार असतात; इसापनीतीत ज्या नानाविध पशु-पक्ष्यांच्या गोष्टी आहेत त्यांत वेगवेगळ्या दांभिकांच्याही गोष्टी आहेत. अशा गोष्टीतच एक गोष्ट मैत्रीचा पुकारा करणाऱ्या लांडग्याची आहे! असे निरनिराळे लांडगे शेळीचे कातडे पांघरून वावरत असतात. त्यांचे शब्द बाजूला सारून आपण कृतीचा शोध घेतला तर फॅसिस्ट प्रवृत्ती अधिक नेमकेपणाने ओळखता येण्याचा संभव जास्त आहे. कारण फॅसिझम हा केवळ बाह्याकार नव्हे, ती प्रवृत्ती आहे. त्यामुळे मनोवृत्तीचा शोध, वर्तणुकीचा शोध अशा वेळी महत्त्वाचा ठरतो.

फॅसिझमचे दोन प्रमुख शत्रू सर्वप्रसिद्ध आहेत. फॅसिझम हा संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो. संसदीय लोकशाहीत ठराविक काळानंतर निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुकांमध्ये पराभव होण्याची शक्यता असते. म्हणून संसदीय लोकशाही आचरणात आणणाऱ्या राजकीय पक्षांना लोकमत विरोधी गेल्यास सत्तात्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. फॅसिस्टांचे वैशिष्ट्य सत्ता ताब्यात घेणे आणि ती हर-मार्गाने ताब्यात टिकवणे यात असते. विजयाची खात्री असली म्हणजे फॅसिस्ट निवडणुका घेतातच. प्रौढ मतदानावर आधारलेल्या निवडुणका घेणे यात फॅसिझमच्याविरुद्ध काही नाही. मात्र या निवडणुकीत आपल्याखेरीज कुणी निवडून येणार नाही याची फॅसिस्ट काळजी घेतात. मुसोलिनीने इस.स.१९२२मध्ये सत्ता ताब्यात घेतली. सत्ता हाती घेतल्यानंतर मुसोलिनीने हे जाहीर केले होते की, संसदेच्या इच्छेविरुद्ध आपण राज्य करणार नाही. म्हणून त्याने इ.स. १९२४ला निवडणुकाही घेतल्या. हाती सत्ता आल्यानंतर व आपले सर्व विरोधक पाशवी शक्तीच्या जोरावर निष्प्रभ करून टाकल्यानंतर निवडणुका घेणे फॅसिस्टांनासुद्धा परवडते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ज्या वेळी आपण फॅसिझम संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो असे म्हणतो त्या वेळी त्याचा नक्की अर्थ समजून घेतला पाहिजे. संसदीय लोकशाहीचे सोंग फॅसिस्ट सजवीत नसतात असा याचा अर्थ नाही. फॅसिस्ट लोकशाहीचे शत्रू असतात याचा अर्थ असा की, फॅसिस्ट हाती आलेली सत्ता कधीही सोडीत नाहीत. सत्ता टिकवण्यासाठी सगळे मार्ग ते वापरतात. सोपे मार्ग परवडतात तोवर अवघड मार्ग वापरत नाहीत. गरज पडेल त्या वेळेला कोणताही मार्ग वापरतात. विरोधी पक्षांकडे पाहून यांना जनतेची साथ नाही असे म्हणणे हा त्यांचा दुसरा कार्यक्रम असतो. फॅसिस्टसुद्धा स्वत:ला जनतेचे प्रतिनिधीच मानतात.

अतिशय मोकळेपणाने आपण हे सगळे लोकशाहीच्या रक्षणासाठी करीत आहो असे सांगणे सहज शक्य असते. कारण विरोधकांची तोंडे बंद केल्यानंतर सत्तेकडून आलेले कोणतेही विधान खोटे ठरवणेच शक्य नसते. असत्य हे सत्य म्हणून बिनधोकपणे वावरू शकेल इतकी सोय जर करता आली तर शिष्टसंमत कल्पना म्हणून परवडणारी लोकशाही सोयीनुसार वापरणे याला फॅसिस्टांची हरकत नसते.

चालू लोकशाही ही जनतेचे प्रश्न सोडवू शकली नाही म्हणजे फॅसिझमचा उदय होतो. पण चालू लोकशाहीने जनतेचे प्रश्न का सोडवू नयेत? याचे खरे कारण असे असते की, जनतेला मते मागायची असल्यामुळे तिला आश्वासने देणे भाग असते; आणि ही आश्वासने जर पूर्ण करायची तर जे सत्ता भोगीत असतात त्यांचे हितसंबंध धोक्यात येणे भाग असते. काही काही देशांचा इतिहास मोठा चमत्कारिक असतो. हिंदुस्थानसारखा देश हा असाच चमत्कारिक देश आहे. अमुक एक पुरोगामी कार्यक्रम शासनाने स्वीकारलाच पाहिजे, या मुद्द्यावर संघटितपणे प्रभावी दडपण निर्माण करणे भारतात क्वचितच जमते. अगदीच जमत नाही असे नाही, पण सामान्यपणे जमत नाही, हे मात्र खरे. त्यामुळे अमुक एक कार्यक्रम स्वीकारलाच पाहिजे असे सत्तेवर दडपण कुणाचेच नसते. पण जनतेची अजून एक चमत्कारिक वर्तणूक चालू असते. तुम्ही उपयोगी व चांगले कार्यक्रम घ्या. प्राय: जनता कुरकुर करीत ते कार्यक्रम स्वीकारते. ती बंड करून उठत नाही. म्हणून कोणताही पुरोगामी कार्यक्रम अमलात आणत असताना सरकारला जनतेच्या बंडाची भीती नसते. एखाद्या पुरोगामी कार्यक्रमाला तर अचानकच कौतुकाने जनता असा प्रतिसाद देते की, कोणीही आश्चर्यचकित व्हावे. म्हणून कोणातही पुरोगामी कार्यक्रम शासन लोकप्रिय करते तरीसुद्धा लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. आपले हितसंबंध धोक्यात आणून लोकप्रिय व्हावे, असे शासनाला वाटत नाही. मग कोणतेच प्रश्न न सोडवता लोकप्रियता टिकवून धरण्याचा विनोदी प्रकार सुरू होतो.

ज्या देशात संसदीय लोकशाहीचे नाव घेऊन हितसंबंध जतन करणारे लोक राज्यकर्ते होतील तिथे जनतेचे प्रश्न सोडवण्यात संसदीय लोकशाहीला अपयश येणारच. लोकांवर निष्ठा नसणारे लोक एका दंभाच्या आधारे लोकनेते म्हणून सत्ताघारी होऊन बसले तर मग संसदीय लोकशाही अपयशी होणे भाग असते. आणि संसदीय लोकशाही अपयशी होऊ लागली म्हणजे त्याच हितसंबंधियांना आपले हितसंबंध टिकवण्यासाठी लोकशाही गुंडाळणे भाग असते. त्या त्या देशात, त्या त्या परिस्थितीत सत्ता टिकवण्यासाठी किती टक्के लोकशाही गुंडाळणे भाग आहे याचा निर्णय फॅसिस्ट घेत असतात. या विवेचनाचे दोन अर्थ उघड आहेत. खऱ्या लोकशाहीवर श्रद्धा नसणारे लोक लोकशाही मार्गाने सत्तेत आले म्हणजे फॅसिझमचा उदय होतो. कारण ही पुण्यवान मंडळी विरोधी पक्ष वाढूच देत नाहीत, पर्यायी पक्ष तयारच होऊ देत नाहीत, म्हणून संसदीय लोकशाही रुजूच देत नाहीत. आम्ही सत्तेत राहणे भागच आहे, नाही तर देशात अराजक येईल, हे सांगणे खपून जाईल अशी परिस्थिती ही माणसे निर्माण करतात. वरील विवेचनाचा दुसरा अर्थ असा आहे की, ज्यांचे हितसंबंध सांभाळावयाचे असल्यामुळे संसदीय लोकशाही अयशस्वी होते त्यांचेच हितसंबंध सांभाळता यावे म्हणून फॅसिझमचा उदय होत असतो. हे सूत्र लक्षात ठेवले म्हणजे फॅसिस्ट मंडळींना ओळखणे सोपे जाते. वॅटकिन्सनी सामाजिक शास्त्रांच्या ज्ञानकोशात फॅसिझमचे एक सूत्रच सांगितले आहे : सत्ता हाती घेण्याची व सर्व मार्गांनी सत्ता टिकवण्याची जिद्द म्हणजे फॅसिझम! लोकशाहीचे शत्रू हे फॅसिस्टांचे ठळक वैशिष्ट्य आहे.

फॅसिझमचे काही ठरलेले आडाखे असतात. लोकशाही असफल होऊ लागली म्हणजे बेकारी वाढते, भ्रष्टाचार वाढतो, महागाई वाढते, आणि लोक त्रस्त होऊन जातात. जिकडे तिकडे एक हलकल्लोळ आणि चीड उसळलेली असते. निदान प्रथमदर्शनी तरी अराजक माजल्याचे दिसते. असा पार्श्वभूमीवर फॅसिझमचा अवतार होत असतो. फॅसिझमचे काही आग्रहाचे मुद्दे असतात. पहिला आग्रहाचा मुद्दा हा की, आम्ही शांतता आणि व्यवस्था निर्माण केली आहे. इंग्रजांचासुद्धा हिंदुस्थान जिंकल्यानंतर हाच दावा होता. दुसरा मुद्दा असा की, आम्ही महागाई कमी करीत आहोत. तिसरा मुद्दा असा की, चोर-काळाबाजारवाले यांच्याविरुद्ध आघाडी उघडून दारिद्रय कमी करणार आहोत, बेकारी संपवणार आहोत. शांतता, स्वस्ताई, भ्रष्टाचारविरोधी मोहीम, या आजच्या नगदी तीन, आणि दारिद्रयनाश व बेकारीनाश अशा उद्याच्या उधार दोन, या पाच फॅसिस्टांच्या हुकमी घोषणा असतात.

फॅसिस्टांना सत्याची कदर करण्याचे कारणच काय? फॅसिझम कधी महागाई कमी करू शकत नाही. तो वस्तूंचे भाव कमी करील. वस्तूंचे भाव वाढवताना व पगारही वाढताना दारिद्रय कसे वाढते हे सर्व-प्रसिद्ध आहे. वस्तूचे भाव कमी करून दारिद्रय वाढवण्याच्या काही स्वतंत्र योजना आहेत! महागाई कमी करण्याचा मार्ग उत्पादनात जनतेचा वाटा वाढवणे, संपत्तीत जनतेचा वाटा वाढवणे हा असतो. फॅसिझमला भांडवलशाहीचे रक्षण करायचे असते, म्हणून महागाई कमी करता येत नाही. बेकारी मात्र फॅसिझम मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. सर्वांनाच आपल्या सोयीनुसार गुलाम म्हणून वापरायचे ठरल्यानंतर बेकारी या शब्दाला अर्थ नसतो. गुलामांना बेकार म्हणण्यात अर्थ नाही. लायकीनुसार उचित काम, आणि कामानुसार उचित पगार, या सूत्राच्या संदर्भात बेकारी या शब्दाला अर्थ असतो. सर्वांनाच गुलाम करून वेठीला धरले म्हणजे जनतेचे शोषण वाढते. यालाच फॅसिस्ट बेकारी कमी झाली असे म्हणतात. आणि जी दोन उद्याची आश्वासने आहेत त्यांबाबत तर सत्तेला प्रश्न विचारण्याची सोयच नाही. कारण फॅसिझमला टाळ्या वाजवणारे हातच हवे असतात. शंका घेणारी मूठभर डोकी केव्हाही समाजात अल्पसंख्यच असतात. या अल्पसंख्येने बहुसंख्येच्या प्रतिनिधी असणाऱ्या शासनाला त्रास द्यावा हे फॅसिस्टांना पटत नाही. म्हणून फॅसिस्ट हाताच्या पाच बोटांप्रमाणे पाच घोषणा नाचवीत असतात. या पाच घोषणा एकत्र जमल्या, जनतेच्या अवस्थेत काही बदल होत नसला म्हणजे तिथे ठळक खूण अशी समजावी की, पाच बोटे एकत्र येऊन त्यांनी आपली सलामी दिलेली आहे. अशा रीतीच्या ‌वळलेल्या मुठी फॅसिझमची खात्रीलायक खूण असतात.

या सगळ्या गदारोळात जनता म्हणजे काय, हे समजणे कठीण आहे. लोकशाही जनतेकडून आणि जनतेसाठी असते. फॅसिझम स्वत:कडूनच असतो, पण तोही जनतेसाठीच असतो. ही जनता म्हणजे कोण, याचे उत्तर देणे राजकारणात फार कठीण आहे. जेव्हा आपण निवडून येतो तेव्हा जनतेने आपल्या बाजूने स्पष्ट कौल दिलेला असतो. जेव्हा आपण निवडणुकीत पडतो, त्या वेळी जनतेच्या शत्रूंनी जनतेला धोका दिलेला असतो. ज्या वेळेला आपल्या सभेला प्रचंड गर्दी असते तेव्हा जनतेचा कौल सभाच सांगते आहे असे म्हणायचे असते. जेव्हा विरोधकांच्या सभेला गर्दी जमू लागते तेव्हा  जनतेच्या हितसंबंधाला बाधक असणारी हुल्लडबाजी सुरू झाली असा त्याचा अर्थ असतो. यामुळे जनता म्हणजे काय, हे सांगणे फारच कठीण जाते. आणि हे सांगणे कठीण व्हावे हीच फॅसिस्टांची इच्छा असते. ज्या वेळेला आपल्या पक्षाला कमी मते पडून जास्त जागा मिळत असतात त्या वेळी जनतेच्या कौलाचा पुरावा जिंकलेल्या जागा हा असतो. खरी गंमत यापुढे आहे; -कारण ज्यांना मतेही मिळत नाहीत आणि जागाही मिळत नाहीत अशी मंडळी निवडणुकीच्या मार्गाने जनतेचा आवाज व्यक्त होऊ शकत नाही असे मानतात! कित्येकदा तर नेता निवडून येतो आणि पक्ष पडतो. त्या वेळेला जनतेचा कौल नेत्याच्या बाजूने असतो. फॅसिझममध्ये या जनतेला शासन जे जे करील त्याला बिनशर्त पाठिंबा देण्याचा संपूर्ण हक्क असतो; कारण शासन जनतेचे प्रतिनिधी असते. जनतेच्या प्रतिनिधी असणाऱ्या शासनाच्याविरुद्ध बोलणारे हे जनतेचे शत्रू असतात. त्यामुळे जनतेच्या शत्रूंचा जर जनतेने नायनाट केला तर तो जनतेचा रास्त हक्क मानावा लागतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

या जनतेला एक नेता लागतो. इटलीत या नेत्याला ‘ड्यूस’ म्हणत. जर्मनीत त्याला ‘फ्यूहरर’ म्हणत. प्रत्येक देशात या नेत्याला वेगळे नाव असते. पण नाव वेगळे असले तरी नेता असतोच. या नेत्यावर सारखे विश्वासाचे ठराव पास होत असतात. जनतेचा प्रतिनिधी पक्ष असतो, पक्षाचा प्रतिनिधी नेता असतो, आणि नेता हाच राष्ट्र असतो. लोकांनी अविश्वास व्यक्त केला तर नेता सत्ता सोडीत नाही. खरे म्हणजे तो अविश्वास व्यक्त करण्यासाठी एकत्र जमण्यापूर्वीच विरोधकांची वासलात लावतो. जनतेला जनतेवर अविश्वास व्यक्त करण्याचा हक्क नसतोच! म्हणून नेत्यावर विश्वास व्यक्त करणे याशिवाय दुसरे काही करणे शक्य नसते. तरीही वेळोवेळी सर्वांनी नेत्यावर विश्वास व्यक्त करावा अशी फॅसिझमची प्रथा आहे. आमचा एकमेव नेता, आमचा महान नेता, आमचा अलौकिक नेता-फक्त तोच एक राष्ट्र तारू शकतो. तो म्हणजे राष्ट्र. अशी सगळी वाक्ये ठरलेली असतात. हा आमचा महान नेता - यापुढे मुसोलिनी म्हणायचे, हिटलर म्हणायचे, माओ म्हणायचे, की स्टॅलिन म्हणायचे हे त्या त्या देशानुसार ठरते. किंबहुना ‘गेल्या हजार वर्षांतील आमचा सर्वश्रेष्ठ नेता’ हे बिरुद कायम राहते; आणि दर दहा वर्षाला बिरुदधारी मात्र बदलतो. तरीसुद्धा हे सगळे करायचे असते. जनतेच्या नावे हे सगळे चालले असल्यामुळे नाममात्र सुधारकांचे कार्यक्रम चालू असतात; हे कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या घोषणाही चालू राहतात.

मानवजातीच्या इतिहासात लोकशाहीचा काळ फार थोडा आहे. सगळा काळ कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारच्या हुकूमशहांचाच आहे. लष्करी हुकूमशाह्या, धर्मगुरूंच्या हुकूमशाह्या, राजेशाह्या – हे सगळे हुकूमशाहीचेच प्रकार आहेत. त्याप्रमाणेच फॅसिझम हाही हुकूमशाहीचा प्रकार आहे. पण उरलेल्या हुकूमशाह्या जनतेच्या पाठिंब्यावर अस्तित्वात येत नाहीत; जनतेच्या पाठिंब्याची त्यांना गरजही नसते. फॅसिझम ही वेगळ्या प्रकारची हुकूमशाही आहे. या हुकूमशाहीला जनतेतील एका मोठ्या गटाचाच सक्रिय पाठिंबा असतो. हजारो शिस्तबद्ध, कृतिप्रवण कार्यकर्ते यांच्या ताकदीवर फॅसिझम उभा राहत असतो. निदान इटली, जर्मनीत तो अशा प्रकारे उभा राहिला. हे हजारो लोक भाडोत्री नसतात. ते ध्येयवादी आणि निष्ठावंत असतात. प्राण देण्यास आणि घेण्यास हे अनुयायी तयार असतात. अशा हजारो निष्ठावंत कार्यतत्पर कार्यकर्त्यांची फळी उभी करणे यात फॅसिझमचे यश असते.

यासाठी फॅसिझमला तत्त्वज्ञान लागते. हे तत्त्वज्ञान जितके धूसर व अंधूक असेल आणि जितके आकर्षक असेल तितके चांगले. परंपरावादी मनाला सर्वांत आकर्षक परंपरा असतात. म्हणूनच फॅसिझम परंपरा, धर्म, राष्ट्र, पंथ यांच्या वैभवाची गीते गात असतो. फॅसिझमला धर्मगुरू आणि साधुसंत आपल्या पाठिंब्यासाठी हवे असतात. स्पेनमध्ये रोमन कॅथॉलिकांनी लवकर शरणागती द्यावी ही मुसोलिनीची अपेक्षा. केवळ फौजांनी स्पेन जिंकणे लवकर जमत नाही म्हणून मुसोलिनीने फ्रँकोला पाठिंबा देणारे पोपचे फर्मानही काढवले होते! फॅसिस्ट धार्मिक नसतात, पण धर्म आणि राष्ट्रपंरपरा यांचा ते कुशल वापर करीत असतात. मुसोलिनी रोमला जुन्या वैभवापर्यंत नेण्याची पुन्हा प्रतिज्ञा करीत होता. हिटलरला जगाचे स्वामी होण्याचा हक्क असणारा जो नॉर्डिक वंश, त्याचा मोठा आधार वाटे. जपान म्हणजे तर नेहमीच उगवत्या सूर्याचा देश. म्हणून हुकूमशहांना ते धार्मिक नसूनही धर्माचा वापर सोयीचा असतो. फॅसिस्ट कधी संत नसतात, पण आपल्या काळातील साधुसंतांचे आशीर्वाद मिळवण्यात फॅसिस्टांना यश येत असते. जसे राज्यकर्ते धार्मिक नसतात तसे धर्मगुरूही धार्मिक नसतात. त्यांनाही आपल्या इस्टेटीचे संरक्षण करण्याची हमी देणारे हवेच असतात. चतुर साधुसंतांनासुद्धा आपला आशीर्वाद घेणारी सत्ता हवीच असते. म्हणून फॅसिझम इतिहास, परंपरा, राष्ट्र, वैभव या सगळ्यांच्या घोषणा करीत असतो. असल्या प्रकारचे आधार फॅसिझमला लागतातच. कारण कोणते तरी भ्रम पक्केपणी मनात रुजवल्याशिवाय आत्महत्या करणारे पिसाट श्रद्धाळू मन जन्माला घालता येत नाही. शुद्धीवर असणारी माणसे गुलामगिरी संपवून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करणार. पूर्वी रणांगणावर सैन्याला दारू पाजली जात असे. नव्या जगात तशीच धुंदी आणणारे तत्त्वज्ञान पाजण्याचा प्रयत्न होतो.

............................................................................................................................................

नरहर कुरुंदकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/search/?search=Narhar+kurundkar&search_type=Authors&doSearch=1

............................................................................................................................................

नरहर कुरुंदकर यांच्या ‘छाया-प्रकाश’ या पुस्तकातील ‘फॅसिझम…फॅसिझम…फॅसिझम’ या दीर्घ लेखाचा संपादित अंश. प्रस्तुत पुस्तक जनबोध प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. त्यात कुठेही सालाचा उल्लेख नसला तरी ते बहुदा आणीबाणीनंतर प्रकाशित झाले असावे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Machhindra Gojame

Tue , 22 September 2020

फ़ॅसिझम हे पुस्तक मला १९७५ च्या आणीबाणीत वाचण्यास मिळाले होते त्यावेळी त्या पुस्तकावर लेखकाचे नाव नव्हते अन बहुतेक प्रकाशकाचे पण ! पुस्तकातील भाषाशैली आणि विचार मांडणीच्या पध्दतीवरुन मला खात्री पटली होती की हे पुस्तक कुरुंदकर सरांचेच आहे. योगायोगाने आम्ही छात्र युवा संघर्ष वाहीनीचा माध्यमातून १९७७ ला एक कार्यक्रम घेतला होता यासाठी सरांना निमंत्रित करण्यात आलेले होते. याप्रसंगी मी सरांकडे फ़ॅसिझम पुस्तकाचा उल्लेख केला तेंव्हा सरांनी स्मितहास्य करुन ते पुस्तक त्यांचेच असल्याचे सांगितले होते. खुप दिवसापासून मी या पुस्तकाच्या शोधात होतो दोन वेळा साधना प्रकशनकडे विचारणा पण केलेली होती. हे पुस्तक उपलब्ध होणार असल्यामुळे आज मला विशेष आनंद होतोय ! – मच्छींद्र गोजमे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......