कुमार केतकरांच्या भविष्यवाणीतल्या खाचाखोचा
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • कुमार केतकर यांचं एक छायाचित्र
  • Wed , 28 June 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar रामनाथ कोविंद Ram Nath Kovind अमित शहा Amit Shah नरेंद्र मोदी Narendra Modi कुमार केतकर Kumar Ketkar

ज्येष्ठ संपादक, विचारवंत कुमार केतकर यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात भाषण करून चर्चेला नवं तोंड फोडलं आहे. या भाषणात केतकर म्हणाले की, २०१९ला प्रत्यक्ष राम जरी आला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाहीत. अशी भविष्यवाणी करताना केतकरांनी विश्लेषण केलं की, आजच्या इतके खासदार मोदी २०१९ला निवडून आणू शकणार नाहीत. तेव्हा १५० ते २२० पर्यंत भाजप खासदारांचा आकडा जाऊ शकेल. पण या आकड्यांच्या आधारे आघाडीचं सरकार येईल. आणि आघाडीचं सरकार चालवण्याची नरेंद्र मोदी-अमित शहा यांची मानसिकता नाही. मोदींची ही मानसिकताच त्यांना सत्तेपासून रोखेल, असं विश्लेषण केतकरांनी या भाषणात केलं आहे.

केतकरांच्या या मतांवर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केतकरांवर काँग्रेसवादी असा शिक्का त्यांचे वैचारिक विरोध मारतात. ‘मोदीभक्त’ तर केतकरांवर ‘सोनिया भक्त’ असा शेरा मारतात. अजून केतकरांना कुणी ‘राहुल भक्त’ म्हणालेले नाही हा भाग वेगळा. सोशल मीडियावरच्या मोदीभक्तांना केतकरांची भविष्यवाणी खूपच झोंबली आहे. एका मोदीभक्ताने तर केतकरांना ‘रावण’ ही उपाधी दिली. ‘येत्या दसऱ्यापर्यंत या रावणाला धडा शिकवावा लागेल’, अशी दर्पोक्तीही या भक्ताने केली आहे.

ते असो. एक मात्र खरं की, केतकर जे बोलतात, लिहितात ते अभ्यासपूर्ण असतं. त्यात सद्यस्थिती, आकडेवारी आणि विविधांगी विश्लेषणाची जोड असते. केतकरांना सोनिया भक्त म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय होईल. लोकशाहीवादी, सेक्युलर भूमिका घेऊन केतकर काँग्रेसपूरक विचार मांडत असतात. ती भूमिका ते काही लाभासाठी घेत नाहीत. त्यांना त्यातून काही मिळवायचे नसते. शुद्ध वैचारिक प्रामाणिकपणाला स्मरून ते अशी मांडणी करत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मांडणीवर अविचारी शेरेबाजी करणं बरोबर नाही.

तेही असो. मोदी २०१९ला जिंकणं अवघड आहे किंवा त्यांना सरकार चालवता येणं कठीण दिसतं, हे म्हणत असताना मोदींना सक्षम पर्याय कोण देऊ शकेल किंवा त्यांची जागा कोण भरून काढू शकेल याबद्दल केतकरांचं विश्लेषण थोडं तपासून पाहायला हवं. मोदी अडतील आणि ती जागा काँग्रेस भरून काढू शकेल, हा केतकरांचा थोपट ठोकताळा असतो. मात्र तो काँग्रेसनेच स्वत:च्या वर्तनाने वेळोवेळी अडचणीचा कसा आहे हे दाखवून दिलं आहे.

काँग्रेस या पक्षाचा विचार लोकशाही, सेक्युलर असला तरी व्यवहार मात्र अचंबित करणारा असतो. २०१४चा ऐतिहासिक पराभव अंगलट येऊनही हा पक्ष व्यवहारात जुन्या चुका पुन्हा पुन्हा करताना दिसतो आहे.

ताजं उदाहरण राष्ट्रपती निवडणुकीचा उमेदवार ठरवण्याचं आहे. ३ जून २०१७ला चेन्नईमध्ये नीतिशकुमार, सीताराम येचुरीसह सर्व विरोधी पक्षांनी एकमताने ठरवलं की, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून आपला उमेदवार लवकर ठरवावा. भाजपच्या आधी उमेदवार ठरवून एक पाऊल पुढे चालावे. मागून भाजपला फरफटत यावं लागेल असं करावं. या डावपेचासाठी नीतिशकुमार यांचा खूप आग्रह होता. पण काँग्रेसने त्यात खोडा घातला. काँग्रेसमध्ये कुणाचा कुणाला मेळ नाही. सोनिया गांधी एकीकडे, राहुल गांधी दुसरीकडे आणि त्यांची सल्लागार मंडळी तिसरीकडे. डावे आणि लाल प्रसादांसारखे लोक चौथीकडे. शरद पवारांची चाल पाचवीकडे. ममता बॅनर्जी यांचा ताफा सहाव्या दिशेने. अशा गोंधळात उमेदवार ठरवण्यात विलंब झाला. त्याचा फायदा बरोबर अमित शहांनी घेतला. त्यांनी रामनाथ कोविंद यांचं नाव घोषित केलं. त्यांची जात सांगून ‘दलित व्होट बँके’चं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. मग काँग्रेसची पळापळ सुरू झाली. त्यानंतरही दोन दिवस त्यांना उमेदवार ठरवायला लागली. म्हणजे पराभूत होण्यासाठी बळी कोणाचा द्यावा, मीराकुमार की सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर की प्रकाश आंबेडकर, हे ठरवण्यासाठी दोन दिवस!

ही काँग्रेसची व्यवहाराची पद्धत त्यांच्या अंगलट येते. दुसरं उदाहरण गुजरात या राज्याचं घेता येईल. गुजरातमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात काँग्रेसची अवस्था भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असूनही केविलवाणी आहे. इथले काँग्रेसचे प्रमुख नेते शंकरसिंह वाघेला हे पक्षावर आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांनी नुकताच गुजरातमध्ये स्वत:च्या समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी गुजरात काँग्रेसची दयनीय अवस्था कथन केली.

वाघेला हे प्रकरण तसं खूप गमतीशीर आहे. ते मूळ भाजपचे. नरेंद्र मोदी यांच्या मित्र परिवारातले. भाजपमध्ये त्यांची मोदींशी दोस्ती एवढी घनिष्ठ की, हे दोघे एका स्कुटरवर बसून फिरत. आजही सोशल मीडियावर वाघेला स्कुटर चालवताहेत आणि मोदी मागे बसलेत, अशी छायाचित्रं झळकतात. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल. हे गुजरातचे महान काँग्रेस नेते! ते मूळचे मोदींचे दोस्त. अदानी, अंबानी ही उद्योजक मंडळी पटेल आणि मोदी यांच्या कॉमन मित्रांपैकी, असे हे नातेसंबंध. हे अहमद पटेल गुजरात काँग्रेसची सूत्रं हलवत आहेत, तोपर्यंत गुजरातमध्ये काँग्रेसचा अभ्युदय कधीही होणार नाही, हे लिहून घ्या अशा तक्रारी सोनिया गांधींपर्यंत पोहचवल्या गेल्या आहेत, पण त्यांनी त्या कधी मनावर घेतल्या नाहीत.

वाघेला आणि पटेल यांचे संबंधही लव-हेट रिलेशनशिपचे. पण आता वाघेलांना साक्षात्कार झालाय की, येत्या निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठींची अशीच धरसोड राहिली तर आपण डुबले जाऊ. भाजपमधून वाघेला पटेल लॉबीविरोधात बंड करून काँग्रेसवासी झाले. पण काँग्रेसमध्येही काही खरं नाही म्हणून ते आता तळमळत आहेत.

नुकत्याच झालेल्या मेळाव्यात वाघेलांनी समर्थकांना भाजपविरोधी कमी आणि काँग्रेसविरोधी जास्त भाषण दिलं. काँग्रेसचे काही खरं नाही हा संदेश काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आपल्या समर्थकांना देतो, यावरून या पक्षाची, त्यातील नेत्यांची निवडणुकांना समोरं जाण्याची मानसिकता दिसून येते.

याहून जास्त गंभीर बाब अशी की, गुजरात काँग्रेसची ही खदखद बघून त्यावर काही औषधोपचार करावा, अशी दिल्लीतल्या सोनिया-राहुल गांधींसह काँग्रेसश्रेष्ठींची मानसिकता नाही. जणू हे राज्य भाजपला आंदण दिलंय, असा सगळा काँग्रेसचा व्यवहार आहे. काँग्रेसची अशीच नेतृत्वहीन अवस्था गुजरात व्यतिरिक्त राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पं. बंगाल, तमिळनाडू अशा बहुतेक मोठ्या राज्यांत दिसते.

महाराष्ट्रात नारायण राणे यांचं वर्तन शंकरसिंह वाघेला यांच्यापेक्षा वेगळं नाही. राणे ही महाराष्ट्रात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय शिजतंय याची चुणूक म्हणता येईल.

वाघेला, राणे असे उसने नेते काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्यांत आहेत. अशा नेत्यांना घेऊन २०१९ला केतकर म्हणतात तसा काँग्रेस मोदींचा रथ कसा अडवणार? याचं केतकरांकडे चमचमीत विश्लेषण नक्कीच असणार. काँग्रेसकडे शहाण्या लोकनेत्यांची वाणवा आहे. आणि इतर पक्षांबरोबर व्यवहार करताना मोदींसारखाच काँग्रेसचा इगोही आडवा येताना अनेकदा दिसतो.

अशी काँग्रेस आपल्या आत्मघाती व्यवहाराने भाजपला, मोदींना बळ मिळेल असा कारभार करताना दिसते. त्यामुळेच लोक काँग्रेसपेक्षा भाजपला जास्त पसंती देतात, हे अनेक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.

केतकर म्हणतात तसं लोकशाही, सेक्युलर विचार देशात राहिले पाहिजेत यात वाद नाही, पण बेभरवशाचे, लेचेपेचे सैन्य घेऊन ही लढाई थोडीच जिंकता येणार आहे? वाजपेयी, अडवाणींचा भाजप वेगळा होता, आताचा मोदी-शहा यांचा भाजप वेगळा आहे. हा भाजप लोकशाही, सेक्युलर असल्याचं हुशारीने भासवून सत्तास्थानी स्थिरावलाय. पुढची वाटचाल करतोय. त्याला रोखायचं असेल तर त्यापेक्षा जास्त हुशारी दाखवावी लागेल. ती हुशारी राहुल गांधींकडे कधी येणार? २०१९ ला की २०२४ला?

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......