अजूनकाही
श्री सदगुरू जंगली महाराज समाधी मंदिर, पुणे येथे प्रख्यात शिवचरित्रकार, ज्येष्ठ संशोधक, इतिहासाचार्य श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे १० जुलै २०१५ रोजी एक व्याख्यान झाले. विषय होता, ‘श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन’. शिवाजीमहाराजांचे मुसलमान सहकारी अशी जी मांडणी होते, त्याला शिवचरित्रावरील आक्षेप समजून त्याचे सप्रमाण खंडन, असे त्या व्याख्यानाचे मध्यवर्ती सूत्र आहे. ज्यांच्या आयुष्यातील ४५ वर्षं फक्त शिवचरित्रविषयक कागदपत्रांचा अभ्यास करण्यात गेली, ज्यांनी ७००० संदर्भ असलेले २५०० पानी शिवचरित्र लिहिले त्या इतिहासाचार्य भास्कर गजानन मेहेंदळे यांच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने हा लेख...
.............................................................................................................................................
आदरणीय गजानन भास्कर मेहेंदळे सर,
आपल्याकडून आलेला इमेल म्हणून जी पोस्ट फेसबुकवर गाजतेय, ती आपलीच असावी असे गृहीत धरून हे पत्र लिहिण्याचे धाडस करतोय. त्या इमेल/पोस्टमध्ये आपण म्हणता की, “कोणत्याही समाजात बरी-वाईट माणसे असतातच? त्यांतून काय घ्यायचं ते आपण ठरवायचं असतं.” हे १०० टक्के बरोबर! पण आपण मांडत असलेला हा विचार अथवा तत्त्वज्ञान जंगली महाराज मंदिरात भिडे आणि त्यांच्या अनुयायांच्या समोर भाषण करताना आपण का नाही मांडला?
कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजीची प्रचलित अशी मुस्लिमद्वेषी प्रतिमा खोडून काढण्यासाठी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजीच्या धर्माने मुसलमान असलेल्या सरदारांचा आणि सैनिकांचा उल्लेख केला आहे. पानसरे इतिहासकार नव्हते. वंचित समाजाच्या लढ्यात गुंतून राहिलेल्या कॉम्रेडला पूर्णवेळ इतिहासकार बनून इतिहास संशोधन करण्यासाठी वेळ असतोच असं नाही. अपवाद कॉ. शरद पाटलांचा. कॉ. पानसरे हे तुमच्याप्रमाणे स्वतःला शिवचरित्रासाठी वाहून घेतलेले संशोधकही नव्हते. तुम्ही काय आणि पानसरे काय, तुम्हा दोघांचा शिवाजीबद्दल लिहिण्याचा हेतू हा इतर शिवशाहीर, शिवव्याख्याते आणि शिवचरित्रकार म्हणवून घेणाऱ्यांसारखा खिसे भरू तर नक्कीच नव्हता. त्यामुळे कॉम्रेड पानसरेंनी शिवाजीसंबंधीच्या उपलब्ध इतिहासलेखनाचा वापर करून ते पुस्तक लिहिलं. त्यांच्या हेतूचा वर मी उल्लेख केला आहेच. तर त्या हेतूनं त्यांनी उपलब्ध इतिहासलेखनाचा वापर करून शिवाजीच्या मुसलमान सरदारांचा उल्लेख केला.
पानसरेंचा हा मुद्दा खोडून काढण्यासाठी जंगली महाराज मंदिरात तुम्ही दिलेल्या व्याख्यानाला तुम्ही अथवा तुमचं व्याख्यान म्हणून त्याला प्रसिद्धी देणाऱ्यांनी ‘शिवचरित्रावरील आक्षेपांचे खंडण’ असं नाव दिलं. हे नाव देण्यामध्ये तुम्हाला एक प्रकारची नकारात्मक दिसत नाही का? शिवाजीकडे जातीने बरेच मराठा, ब्राह्मण आणि इतर अनेक जातींचे लोक तसेच काही फिरंगी लोक चाकरीला होते, हे सांगणं भूषणावह असेल, तर शिवाजीकडे धर्माने मुसलमान असलेले अनेक सरदार अथवा सैनिक चाकरीला होते, हे सांगणं याला ‘शिवचरित्रावरील आक्षेप’ म्हणणं हे आक्षेपाहार्य नाही का? त्यातले काही धर्माने मुसलमान असलेले सैनिक नंतरच्या काळात चाकरी सोडून गेले, म्हणून त्यांनी शिवाजीच्या पदरी केलेली चाकरी शून्य ठरते का? तुम्ही शिवाजीच्या पदरी चाकरीला असलेले मराठा, ब्राह्मण आणि इतर जातीतले सरदार, सैनिक अथवा कारकून नंतरच्या काळात ती चाकरी सोडून दुसरीकडे गेले, त्या संबंधीचे पुरावे शोधून ते का नाही मांडले? शिवाजीची चाकरी सोडून गेलेल्या मुसलमान सरदार/ सैनिकांवर ‘जायचा तिकडे गेला’ असा शेरा तुम्ही मारला. मग शिवाजीकडे जे मुसलमान लोक आले त्यांना काय म्हणणार? जे मराठा, ब्राम्हण आणि इतर जातीतले सरदार, सैनिक अथवा कारकून शिवाजीची चाकरी सोडून गेले त्यांना काय म्हणणार? किंवा जे मराठा, ब्राह्मण आणि इतर जातीतले सरदार, सैनिक अथवा कारकून आदिलशाही अथवा मोगलांकडून शिवाजीच्या पदरी चाकरीला आले, त्यांना पण तुम्ही ‘यायचा तिकडे आला’ असं म्हणणार का? ‘जायचा तिकडे गेला’ असं म्हणून शिवाजीच्या चाकरीत असलेल्या मुसलमान सरदारांची आणि सैनिकांची ते धर्माने मुसलमान आहेत म्हणून त्यांची मराठा सत्तेतील भूमिका का नाकारायची? ‘वेडात धावले वीर मराठे सात’मधला एक सिद्दी हिलालही होता. तो लढाईत मरून जन्नतमध्ये गेला की, स्वर्गात गेला हे महत्त्वाचं की, मराठा राज्यासाठी तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्यासारखा धारातीर्थी पडला हे महत्त्वाचं? का तुम्ही तुमच्या जवळच्या उपलब्ध पुराव्यांवरून एकही मुसलमान सरदार किंवा सैनिक शिवाजीकडून लढताना मारला गेला नाही, हे सिद्ध करणार?
तुम्हाला जर आदर्श म्हणून हंबीरराव मोहितेंसोबत पंताजी गोपीनाथ आठवत असतील, तर मुसलमान समूहाला शिवाजीबरोबर मुसलमान असलेले सरदार/सैनिक आठवत असतील तर त्यात चूक काय? तुम्ही या आदर्शांसोबत त्यांना आपल्या बरोबर घेणार की झिडकारून फेकून देणार?
कॉम्रेड शरद पाटलांनी भाकीत केले होते की, ‘हिंदुत्ववादी विचारसरणीसाठीची शिवाजीची उपयुक्तता संपेल.’ हिंदुत्ववाद्यांचे जाऊ द्या पण तुम्हाला पण असं वाटतं का, शिवाजी गोब्राह्मणप्रतिपालक नव्हता असं म्हटलं की, त्याच्या इतिहासाची उपयुक्तता संपते का? पुढे जाऊन असंही म्हणता येईल का, शिवाजीचा इतिहास जर मुस्लिमद्वेषी नसेल तर त्या इतिहासाची प्रासंगिकता संपते?
तुकोबांच्या ‘नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||’ या अभंगाचा दाखला तुम्ही देता.
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥1॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥3॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥3॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥4॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥5॥
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥6॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥7॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥8॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥9॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥10॥
तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥11॥
पण तुकोबांच्याच या अभंगाचं काय करायचं? तुकोबांच्या पालखी मागे आणि माऊलींच्या पालखी पुढे तलवारी घेऊन वारीत शिरू पाहणारे आणि मुस्लिमद्वेषाने पछाडलेले आणि तुम्ही ज्यांच्या पुढे व्याख्यान दिले, ते या अभंगावर आचरण करायला तयार होतील का?
जात काढणं नक्कीच वाईट, मग धर्म काढणं वाईट नाही का? ज्यांच्या समोर तुम्ही जंगली महाराज मंदिरात भाषण केलं, त्यांनी लोकांचा धर्म काढून त्यांना साप, विषाणू, कॅन्सर आणि लांडे इत्यादी विशेषणं नाही का दिली? तुम्ही केलेली मांडणी भिडे आणि त्यांचे अनुयायी कोणत्या प्रकारे वापरतात आणि वापरतील याची तुम्हाला खरंच कल्पना नाही का? तशी तुम्हाला कल्पना असेल आणि तरीही तुम्ही शिवाजीच्या सरदार वा सैनिकांचा धर्म काढणार असाल तर भिडे व त्यांच्या अनुयायांद्वारे जे काही घडलं आहे अथवा घडणार आहे, त्यात तुमचाही वाटा असेल, असं तुम्हाला नाही का वाटत?
जेम्स लेन प्रकरणात मा. श्रीकांत बहुलकरांवर शिवसेनेने (तुम्हीच सांगा यांना शिवसैनिक म्हणावं का?) हल्ला केला, तेव्हा आपण सेना भवनासमोर स्वत: लिहीत असलेल्या शिवचरित्राची हस्तलिखितं जाळली. हे करायला नक्कीच हिंमत लागते आणि ती तुम्ही दाखवली! इतिहासकाराला जर आपली मतं मांडण्याचे स्वातंत्र्य नसेल, त्याच्यावर कायम भीतीचं सावट राहणार असेल तर त्याने काहीही लिहून फायदा नाही. म्हणूनच त्याने त्याची हस्तलिखितं जाळणं ही अतिउच्च पातळीवरची आणि खोलवर अर्थ असलेली निषेधाची कृती होती. त्याबद्दल आणि शिवचरित्र लिहिण्यासाठी तुम्ही घेतलेल्या कष्टाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळेच पत्राच्या सुरुवातीला ‘आदरणीय’ असं लिहिलं आहे. पण तथ्यांच्या विश्लेषणाबाबत माझे तुमच्याशी नक्कीच मतभेद आहेत. पण तुम्ही ज्यांच्या समोर भाषण दिलं, ते लोक मतभेद ठेवण्याच्या माझ्या हक्काशी सहमत होण्याची आशा ठेवणं म्हणजे मूर्खपणा होय. म्हणजेच तुम्ही ज्या मुद्द्याकरता लिहिलेल्या शिवचरित्राची हस्तलिखितं जाळली, त्या मुद्द्याविरोधातच त्यांची भूमिका आहे, याची आपल्याला कल्पना नाही का?
राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा. त्यांचं राजकारण मी तुम्हाला सांगण्याची गरज नक्कीच नाही. पवारांना जी मंडळी शिव्या घालतात, त्यांची बरीच संख्या ज्या अनेक संस्थांमध्ये आहे, त्या अनेक संस्थांना पवारांचे ट्रस्ट सढळ हातानं मदत करतात. दुसरीकडे काही लोक त्यांना गृहीत धरून ब्राह्मणद्वेषाचं राजकारण करतात. याच राजकारणामुळेच तर तुम्ही तो इमेल लिहिल्याचं दिसून येतं. असल्या राजकारणामुळे जातीने ब्राह्मण असलेल्या निष्पाप लोकांना ज्या प्रकारच्या भीतीचा अनुभव येत आहे, तशाच प्रकारची अथवा किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणातील दहशतीचा अनुभव मुसलमान असलेल्या निष्पाप लोकांना येत असावा. ज्यांचे मेंदू द्वेषानं आणि हात रक्तानं बरबटले आहेत, अशा कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांची आपण कशाला चिंता करावी? पण निष्पापांचं काय? कोणत्याच प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणात इतिहास अभ्यासक म्हणून मी भागीदारी करू इच्छित नाही, मग ते ब्राम्हणद्वेषाचं असो, मराठाद्वेषाचं असो, दलित द्वेषाचं असो किंवा मुसलमान द्वेषाचं असो. महाराष्ट्राच्या म्हणजे तुमच्या-माझ्या-पवारांच्या आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच्या मानगुटीवर बसलेल्या इतिहासरूपी समंधाचं नेमकं काय करायचं, याचा आपल्या सर्वांनी विचार करायला हवा.
तुमच्या जंगली महाराज मंदिरातील व्याख्यान होऊन आता बराच काल लोटला आहे. त्यावेळीही असं काहीतरी लिहावंसं वाटलं होतं, पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता म्हणून नाही लिहिलं. पण ताज्या इमेल/पोस्टमधल्या “कोणत्याही समाजात बरी-वाईट माणसं असतातच? त्यांतून काय घ्यायचं ते आपण ठरवायचं असतं,” या तुमच्या वाक्याने लिहिण्याचा हुरूप आला. पण याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. कारण त्या व्याख्यानापासून या इमेल/पोस्टपर्यंत महाराष्ट्रातील परिस्थिती अजूनच शोचनीय झाली आहे, याची तुम्हालाही कल्पना आहे.
पत्राखाली नाव-गाव-जात-धर्म मुद्दामच लिहीत नाही. काय माहीत, जात-धर्म बघून भिडे आणि अनुयायांकडून हल्ला व्हायचा. मी तुमच्या इतका धाडशी नाही आणि माझ्यामागे तितकं समर्थनही नसेल. माझ्या बाबतीत असं काही बरं-वाईट झालं तर तुम्ही मा. बहुलकरांसाठी जे केलंय, ते माझ्यासाठी करणार नाही, याची मला आता खात्री आहे. कारण तुम्ही तर शिवाजीच्या सरदार/सैनिकांचा धर्म काढला. त्यांच्यापुढे माझ्यासारख्यांची लायकीच काय?
(शिवाजीचा एकेरी उल्लेख हा तुम्ही लिहिलेल्या शिवचरित्रातील एकेरी उल्लेखासंबंधीच्या भूमिकेला अनुसरूनच केला आहे. तुमच्या त्या भूमिकेशी मी सहमत आहे.) लोक म्हणतील, ‘याने तर नुसत्याच भावना मांडल्या ऐतिहासिक पुराव्यांचं काय?’ पण मी तुम्हाला पुरावे दाखवणे म्हणजे काजव्यानं सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. महत्त्वाचा मुद्दा ऐतिहासिक पुराव्यांच्या विश्लेषणाचा आहे. पुरावे बोलत नसतात, पण इच्छा असेल तर इतिहासकार एकाच पुराव्याकडून अनेक वेगवेगळ्या साक्षी काढू शकतो, हे तुम्हालाही माहीत आहे.
इति लेखनसीमा.
कळावे.
.............................................................................................................................................
गजानन भास्कर मेहेंदळे यांचे ‘श्री राजा शिवछत्रपती (भाग १ व २)’हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3505
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment