“भला तेरा ‘दलित’ मेरे ‘दलित’ से ज्यादा ‘दलित’ कैसा?”
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 27 June 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भाजप ‌BJP RSS काँग्रेस Congress मीरा कुमार Meira Kumar

सध्या देशात भाजपला चांगले दिवस आलेत, याची प्रचिती दिवसेंदिवस वाढच चाललीय. नरेंद्र मोदी ‘चांगले दिवस’ या संज्ञेचेच जनक असल्यानं ‘बेटी से ज्यादा बाप की खुशी’ असल्यास नवीन नाही. अमित शहा ‘दिवस’ उगवला की, तो कुणाचा चांगला आणि कुणाचा खराब करायचा हे ठरवूनच मग त्याला पुढे पाठवतात. उद्धव ठाकरे आपण सरकारमध्ये असून विरोधी पक्षाचंही काम करतो, या दुहेरी आनंदात असतात. राहुल गांधी अजून तरी काँग्रेसचे अध्यक्ष होत नाहीत, यापेक्षा ‘चांगले दिवस’ कोणते, असं काँग्रेसच्या निष्ठावान नेता कम कार्यकर्त्याला वाटतं. पवारसाहेबांची ‘चांगले दिवस’ संबंधीची भूमिका नेहमीप्रमाणे ‘कात्रजच्या घाटा’त फिरत राहते. छगन भुजबळ ‘आत’ आहेत हे ‘चांगले दिवस’ की, अजित पवार बाहेर आहे हे ‘चांगले दिवस’? वर्षानुवर्षं तेच ते शेतकरी नेते दाखवून दमलेल्या वृत्तवाहिन्यांना प्रा. अजित नवलेंच्या रूपानं नवा ब्ल्यू आय बॉय सापडल्यानं त्यांच्या चर्चांना ‘चांगले दिवस’ आलेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानं सेनेच्या मंत्र्यांना राजीनामा न देता सरकारी बंगल्यात राहण्याचे ‘चांगले दिवस’ टिकून राहिलेत. तर ‘कर्जमाफी मुळीच नाही’ या शाश्वत धर्मातून आपण अत्यंत पारदर्शीपणे ‘सरसकट महाकर्जमाफी’ या आपदधर्मापर्यंत सहीसलामत पोहचतो म्हणजे अजूनही ब्राह्मण मुख्यमंत्र्याला ‘चांगले दिवस’ आहेत, हे देवेंद्रजींना आणि पर्यायानं त्यांच्या सहकाऱ्यांना कळलंय. मधल्या मध्ये सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दोन-तीन लाख परत केल्यानं आत्मक्लेषानंतर अचानक धनलाभ झाल्यानं राजू शेट्टींना दोन ‘दिवस चांगले’ गेले! थोडक्यात देशात, राज्यात एकुणातच ‘चांगले दिवस’ तेजीत आहेत!

पण या सर्वांपेक्षा सगळ्यात जास्त, सर्वोच्च चांगले दिवस आलेत ते फक्त दलितांना! छोट्या छोट्या गोष्टींसाठी आरक्षणाचा लढा देत विकसित झालेला हा वर्ग- सरकारी भाषेत ‘प्रवर्ग’ - सध्या ‘पाँचो उंगलीया घी में’ अशा अवस्थेत आहे. थेट राष्ट्रपतीपदासाठीच दलिताची निवड झालीय. तेही भाजपच्या बहुमतीय राजवटीत! यापेक्षा ‘चांगले दिवस’ कशाला म्हणतात?

त्यातली आणखी महत्त्वाची बाजू म्हणजे हे राष्ट्रपतीपदाचे चांगले दिवस वर्तमानपत्रातलं राशीभविष्य वाचून किंवा घरातले फर्निचर बदलून किंवा योग किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा पतंजलीची उत्पादनं वापरून नाही आलेत. तर दस्तुरखुद्द ‘चांगले दिवस’चे जनक नरेंद्रजी मोदीजी यांनी थेट भेट दिलेत. म्हणजे पुराण किंवा संतांच्या कहाण्यांत कसा प्रत्यक्ष देव दर्शन देऊन डोक्यावर हात ठेवतो, साधारण तसंच घडलं आणि दलितांना ‘चांगले दिवस’ आले!

आणि हा ‘चांगले दिवस’ येण्याचा प्रत्यक्ष क्षण ही तितकाच रोमांचक व अदभुत असा होता.

आपल्या सर्वांना ‘चला हवा येऊ द्या’ नावाचा एक कार्यक्रम बेहद्द आवडतो बघा. त्या कार्यक्रमात काही स्त्री व्यक्तिरेखा असतात. पण या व्यक्तीरेखा प्रत्यक्ष स्त्री कलाकार साकारतच नाहीत, तर चक्क पुरुष कलाकार साकारतात. पण ते त्या इतक्या हुबेहूब साकारतात की, कार्यक्रम संपेपर्यंत आपल्याला शंकासुद्धा येत नाही की, हा स्त्री वेषातला पुरुष कलाकार आहे. म्हणजे बालगंधर्वांनंतर थेट ‘चला हवा येऊ द्या’मधले पुरुष कलाकार. तर त्या हुबेहूब अभिनयानं आपली फसगत होते आणि सत्य कळल्यावर आपल्या तोंडून कसे ‘अग बाई! बाई नव्हतीच होय!!’ असे सहजोदगार बाहेर पडतात, अगदी तसंच परवा भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आदरणीय मोदीजींनी राष्ट्रपतीपदाचं नाव जाहीर केलं आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ‘रामनाथ कोविंद’ असं नाव उच्चरताच जो तो इतकडेतिकडे पाहू लागला. काहींना वाटलं- आजच पक्षप्रवेश, आजच पद की काय! तर मग कळलं हे पक्षातलेच जुने. राज्यसभा खासदार अमूक, तमूक परिचय सांगितला जात होता. त्यात शेवटी अमित शहा म्हणाले की, एवढं सगळं आहेच, पण मुख्य म्हणजे ते दलित आहेत.. भाजपीय दलित!

अगदी ‘चला, हवा येऊ द्या’ स्थिती झाली. ‘राम’ म्हणताच पुढे काहींनी ‘नाईक’ समजून मान डोलवायची तयारी केली, तर काहींना ‘राम’ नंतर ‘पासवान’ ऐकायला लागतं काय म्हणून धडकी भरली. म्हणजे एवढे पतंग उडवून ही आपली कन्नी कापली गेली या जाणीवेनं संसदीय मंडळ शरमलं. आपल्याच पोटातली कस्तुरी शोधत आपण माध्यमातून, माध्यमं आपल्यातून फिरत राहिली आणि हा असा इतका मोठा चकवा? म्हणजे मागे प्रतिभा पाटलांचं नाव जाहीर झाल्यावर बसला नाही, किंवा त्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले असं जाहीर होताच ‘कोण?’ म्हणून जो भूकंप झाला होता, त्यापेक्षाही अधिक रिश्टर स्केलचा धक्का पचवत संसदीय मंडळ बाहेर पडलं. आणि आसमंतात एकच शब्द घुमत राहिला- दलित… दलित… दलित!

तिकडे सोनिया गांधींच्या माजघरात लग्नाच्या फराळासाठी नणंदा, भावजया, दीर, साडू जमा व्हावेत, तसे विरोधी पक्षनेते जमले होते. भाजपा कुठल्या योगीला, साध्वीला किंवा उद्योगपतीला किंवा महानायकाला उमेदवारी देतो यावर हसतखेळत हरणाऱ्या लढाईची तयारी सुरू होती. त्यातूनही काहींनी ‘धाकटा रात्री तापानं फणफणला’ म्हणून भावनिक बुट्टी मारली, तर काहींनी ‘लग्नाला अजून वेळ आहे, आतापासून सुट्ट्या घेऊन काय करू’, म्हणत वेळेला पोहचतो असा व्हॉटसअॅप केला. सोनियामायने जे जमले त्यांना चहापाणी करून कामाची वाटणी करायला सुरुवात केली. अशा वेळी तिथं पवारांची उपस्थिती हा एकाच वेळी आनंद व चिंतेचा विषय असतो. गडी मांडव बांधण्यात पुढे पण नंतर मांडवातच सापडेल याची खात्री नाही. कम्युनिस्टांना चोवीस तास चहा दिला तर ते कुठेही, कितीही वेळ बसतात हे सोनियामायला अनुभवांती समजलं होतं.

कायम सायलेंट मोडवर असणारे मनमोहन सिंग म्हणजे घरात पडवीत खुर्चीत बसणारं वडीलधारी व्यक्तित्व. त्यांचं असणं ही आकड्यात भर एवढंच. अशा बैठकीत भावी अध्यक्ष राहुलबाबा नसतात. कारण ‘सर्व सहमती’ व ‘ज्येष्ठ’ या दोन शब्दांचा त्यांच्याशी परिचयच नाही. त्यामुळे हात दाखवून अवलक्षण नको म्हणून त्यांना श्वानासोबतचे खेळ खेळण्यास सांगण्यात येतं. घरातल्या भांडणांमुळे मुलायम नवीन भांडण नको म्हणून घरूनच हात हलवतात. तो नक्की कुणासाठी हे स्पष्टपणे अस्पष्ट असतं. मायावती ‘थांब, माझ्या बाळाला…’ या चिमणीमूडमध्ये वेळ लांबवण्याचा खेळ खेळतात. तर पुलंच्या नारायणसारखे नीतीश, ‘हे काय मी इथंच आहे’ म्हणत परत कुठं तरी जातात. अशा वातावरणात बाहेर घुमणारा तो शब्द माजघरात येऊन आदळला…दलित!

झालं, ऐन वरातीत वर पक्षानं हुंड्याचा आकडा वाढवून प्राण कंठाशी आणावे, तसा भाजपचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार दलित! या बातमीनं मांडवच कोसळला. त्यात भर म्हणून नीतीश यांनी बाहेरूनच निरोप दिला, ‘माझा गाववालाच निघाला! त्याला कसं टाळू?’ पुन्हा दलित, त्यात भाजपने भेट दिलेला!! आधी हृदयविकाराचा सौम्य झटका, नंतर तीव्र झटका तसं झालं. लगेच सगळे मायावतींकडे आशेनं बघू लागले, तर त्या म्हणाल्या ‘मैं दलित की बेटू हूँ, पर वो भी दलित का बेटा है. बरं, राष्ट्रपतीप्रासादाचं मला काय कौतुक? मी काय मोठी घरं पाहिली नाहीत?’ करावं काय? हा एकच सवाल! आता मुस्लीम द्यावा तरी ध्रुवीकरण, ब्राह्मण द्यावा तरी ध्रुवीकरण. ओबीसी देऊन फायदा नाही, कारण पंतप्रधानही ओबीसी. मग आता उरतं कोण? दलित! इथंही तोच आवाज घुमला.

आधी मांडव टाकूनही आपली अवस्था वरातीमागून घोडं अशी झालीय हे सगळ्यांना कळून चुकलं. तोवर तिकडे कुंपणावरच्या लोकांनी दलित राष्ट्रपतीचा पाळणा तयार करायला घेतला- ‘कुणी राम घ्या, कुणी कोविंद घ्या’. त्यात कुणी तर म्हणालं- ‘या दलितांचं काही कळत नाही. गोविंद की कोविंद? नक्की काय?’ मग एकानं माहिती पुरवली ‘गोविंद नाही कोविंद’! त्यावर पुन्हा ‘कोविंद हे काय प्रकरण आहे?’ तर नवीन माहिती आली ते कोळी समाजाचे आहेत. त्यामुळे ‘गो’ ऐवजी ‘को’! हाच तो भाजपचा ‘गो’कडून ‘को’पर्यंतचा दलित मार्ग!

अचानुक हसमुख दलित सुशीलकुमार आठवले. पण ते ओळखीचे दलित. एकदम अनोळखी दलित हवा. कुणीतरी प्रकाश आंबेडकरांचा अपमान करत अनोळखी दलित म्हणून त्यांचं नाव सुचवलं! प्रकाश आंबेडकर म्हणजे रामदास आठवले नव्हे असं पवारांनी सांगून अगदीच कुणी सापडलं नाही, तर जयदेव गायकवाडांना तयार राहायला सांगा असा निरोप काकडेंना दिला. शेवटी दलितातली दलित म्हणजे स्त्री! त्यातून दलित स्त्री म्हणजे दलितातली दलित दलित! मग मीरा कुमार यांना पर्यायच नव्हता. त्या वाटच बघत असल्यासारख्या तयार झाल्या. पंचाईत अशी की, भुवया कोरलेल्या आणि त्याहून कोरून बोलल्यासारखं हिंदी बोलणाऱ्या मीरा कुमार यांचं हिंदी सोनिया गांधींपेक्षा अवघड वाटायला लागलं. पण आता प्रतीकाचीच आणि प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवायची असल्यानं ‘मीरा कुमार यांचे ढोल वाजवा’ असं कुणी तरी म्हणालं. त्यावर पवार म्हणाले- ‘ढोल बडवणं हे दलितांचं काम, ते त्यांनाच देण्याऐवजी सिताराम येचुरींनी करावं.’ येचुरींनी यावेळी अजिबात घोडचूक करायची नाही आणि इतिहासात जायचं नाही हे ठरवून ढोल गळ्यात घातला.

आता खरी प्रचाराला रंगत येणार. तुम्ही दलित आणलात आम्ही दलितातली दलित आणली. म्हणजे कास्ट आणि जेंडरमध्ये आमचा सामाजिक न्याय मोठा. आणि तुमचा दलित हा दलित कसला! तो तर स्वयंसेवक! दलित भाजपीय म्हणजे भगवी झाक असलेला निळा, सॅफरोनिक ब्ल्यू!  आमचा उमेदवार तसा नाही. दलित आणि स्त्री असा दुहेरी शोषणाचं प्रतीक असलेला, पार ‘मनुस्मृती’ने बडवलेला दलित उमेदवार आहे. आणि आधी नारायणन यांच्या रूपात दलित पुरुष होता की राष्ट्रपती. तुमचं हे असंच. आम्ही मुस्लीम राष्ट्रपती दिल्यावर तुम्हाला कलाम दिसले, नारायणन नंतर कोविंद आणले. आम्ही आधी महिला आणली, आता दलित महिला आणली. बोला. आमच्या क्रांतीमुळे तुमची समरसता म्हणजे चुलीवरच्या मटणासमोर गोड वरण! तुलनाच नको.

आणि दलिताला राष्ट्रपती केल्याचं पुण्य तुम्हाला मिळू देणार नाही आम्ही. कारण दलिताकडून दलितातील दलिताचा पराभव करायचं पाप करताय तुम्ही!

आता केजरीवाल म्हणे, या दोन दलित, दलितातील दलित यापेक्षा कुणी ‘ज्यादा दलित’ मिळतोय का ते शोधताहेत!

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......