टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, प्रशांत दामले, स्वदेशी जागण मंच, शाहरूख व आर्यन खान
  • Mon , 26 June 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump प्रशांत दामले Prashant Damle स्वदेशी जागण मंच Swadeshi Jagran Manch शाहरूख खान Shahrukh Khan आर्यन खान Aryan Khan

१. भारत स्वत:चे संरक्षण स्वत: करू शकतो आणि हे भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करून जगाला दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत बोलताना म्हटले. ‘भारतीय लष्कराने सीमारेषा ओलांडून दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या कारवाईवर कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही. भारतीय लष्कराचे सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिले आहे,’ असे पंतप्रधान मोदी व्हर्जिनियातील टायसन्स कॉर्नरमधील रिर्ट्झ कार्लटन येथे म्हणाले.

गेली ६० वर्षं भारताच्या संरक्षणासाठी नेपाळमधून सैनिक येत होते की म्यानमारमधून? पंतप्रधानांना परदेशात जाऊन आपल्या देशाची नालस्ती करण्याचा छंद आहे काय?‌ जगाला आपली संरक्षणसिद्धता दाखवण्यासाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची परेड असतेच की! शिवाय जगाला शून्य रस आहे आपल्या संरक्षणसिद्धतेविषयी जाणून घेण्यात. लष्कराच्या ‘रेड्स’ आधीही होत होत्या. त्या गुप्तपणे होत होत्या. आता त्यांचं नामांतर करून त्या चव्हाट्यावर आणल्या जात आहेत, इतकंच. त्यांनी पाकिस्तानवर काही परिणाम झाला का, या प्रश्नाचं उत्तर आहे का? ते महत्त्वाचं आहे.

.............................................................................................................................................

२. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने शाही सोहळ्याचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला आहे. जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असून यामुळे चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल अशी भीती स्वदेशी जागरण मंचाने व्यक्त केली आहे. १.५ कोटी रुपयांपर्यंत उत्पादन असलेल्या लघु उद्योजकांना अबकारी करातून सूट देण्यात आली आहे. जीएसटीमध्ये २० लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावीच लागेल. या नियमामुळे लघुउद्योगांवर कराचा बोजा वाढणार असून लघुउद्योगांवर याचा परिणाम होईल असा दावा त्यांनी केला.

अरे वा, जीएसटी विरोधातील संभाव्य उद्रेकाची वाफ नियंत्रित करण्यासाठी स्वदेशी जागरण मंचाची शिट्टी बसवलेली दिसते. निर्णयही आमचा आणि विरोधही आमचा असा हा अजब प्रकार भासतो. प्रत्यक्षात सरकारही आमचं आणि शिवसेनेच्या रूपाने प्रमुख विरोधी पक्षही सरकारमध्येच, या धोरणाचीच ही राष्ट्रीय आवृत्ती दिसते.

.............................................................................................................................................

३. कोणत्याही मुलीला किस करू नकोस, नाहीतर मी तुझे ओठ चिरेन’, असं शाहरूख खानने त्याचा मुलगा आर्यन खान याला बजावलंय. आर्यन लवकरच हिंदी सिनेमात पदार्पण करणार, अशी चर्चा आहे.

प्रेम कसं करायचं हे एका अख्ख्या पिढीला शिकवणारा किंग खान इतक्या बुरसटलेल्या विचारांचा आहे? बापाचं हृदय, बापाला वाटणारी काळजी वगैरे ठीक आहे. पण, आर्यन आणि त्याच्याशी ओष्ठसंपर्क प्रस्थापित करू इच्छिणारी मुलगी यांच्यामध्ये अशी टांग घालण्याचा शाहरुखला अधिकार काय? आर्यनने कुणा मुलीचं बळजबरीने चुंबन घेतलंच, तर त्यावरही काय ते कायदेशीर होईलच की. शाहदादा, तुम्ही जरा पुन्हा एकदा डीडीएलजे पाहाच राव वेळात वेळ काढून.

.............................................................................................................................................

४. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील चिरतरूण अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची नात अनायरा हिचे फोटो फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ‘नात मोठी होतेय’, अशा शीर्षकाने त्यांनी नातीबरोबरचा फोटो शेअर केलाय. त्यात दामलेंच्या चेहऱ्यावरून सुख म्हणजे नक्की काय असतं, याची झलक मिळते. अनायरा ही प्रशांतजींच्या मुलीची मुलगी आहे.

हे सगळं खूपच गोड आहे प्रशांतजी; पण, आपल्या चाहत्यांना, खासकरून महिला चाहत्यांना असं दुखावण्याचा तुम्हाला काय अधिकार होता? नात मोठी होतेय, असं म्हणता म्हणता तुम्ही आजोबा होण्याच्या वयाचे झालात, हे सांगून टाकलंत राव त्यांना. गोंडसपणाचं मूर्त रूप असे तुम्ही आजोबा? अहो, तुमच्या अनायरालाही तुम्ही तिच्या बाबांपेक्षा छोटे आहात, असं वाटत असेल.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री उशीरा मोदी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले. मोदींसाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत खरा मित्र असल्याचे सांगून द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करू, असे म्हटले आहे.

अरे देवा, भारतीय गोटात सुतकी वातावरण असेल आता. ट्रम्प महोदयांना भारत हा खरा मित्र वाटू लागला असेल, तर आपली काही खैर नाही. हे गृहस्थ सगळ्या जगाला अडचणीत आणणाऱ्या लीलांसाठी कुप्रसिद्ध होत चालले आहेत. त्यात ते मित्रांसाठी अधिक घातक बनत चालले आहेत. भारत खरा मित्र असेलच, तर संबंध सुधारण्याइतके बिघडले कसे, हे त्यांना विचारण्यात हशील नाही. खऱ्या मित्रांमध्येच खूप रुसवे-फुगवे होतात, असं विधान ते तोंडावर फेकतील.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......