लालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • लालकृष्ण अडवाणी
  • Mon , 26 June 2017
  • पडघम देशकारण लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी मोहन भागवत नरेंद्र मोदी Narendra Modi

सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालीन राजकारणावर वास्तववादी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, तर त्या अत्यंत कसदार शोकात्म ललितकृती होईल. शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंबऱ्यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील! शरद पवार आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांनाही पंतप्रधानपद आणि ते मिळणार नाही हे पूर्णपणे स्पष्ट झाल्यावर आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रपतीपदाची (सुप्त आस) होती. मात्र महाराष्ट्रापुरत्या जेमतेम विस्तार असलेल्या, पण स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या पवार यांचा सवतासुभा असलेल्या कोणत्याही काँग्रेसला आजवर ना कधी राज्यात स्वबळावर सत्ता संपादन आली आणि ना कधी किमान २५ खासदारही निवडून आणता आले.

एक स्मरण असं- पंतप्रधानपदासाठी कायम उत्सुक असलेले, पण ते पद मिळालं नाही म्हणून चेहऱ्यावर कधीही नैराश्य न दर्शवणारे पश्चिम बंगालचे एक नेते एकदा काही पत्रकारांशी या महत्त्वाकांक्षेच्या संदर्भात बोलताना म्हणाले होते, ‘ज्याच्या पाठिशी त्याचं राज्य पूर्ण ठामपणे नाही, त्याचं पंतप्रधानपदाचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही, हे वास्तव मी स्वीकारलेलं आहे.’ ‘यूपीए’चे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे हे नेते नंतर राष्ट्रपती झाले ही बाब अलाहिदा. शरद पवार यांच्याबाबतीत नेमकं असंच घडलं. महाराष्ट्र एकदिलानं आणि एकमुखानं त्यांच्या पाठीशी कधीच उभा राहिला नाही. पण असं का घडलं वगैरे तो आताचा विषय नाही.

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाचा हिंदुत्ववाद, राजकारणाची (क्वचित हिंसक झालेली व त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागलेली) शैली आणि धर्मांधता पूर्णपणे अमान्य असली तरी त्यांचं राजकीय कर्तृत्व वर उल्लेख केलेल्या सर्वच नेत्यांपेक्षा फार मोठं, व्यापक, राष्ट्रीय पातळीवरचं, महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर स्वच्छ चारित्र्याचं आहे (हवाला प्रकरणात त्यांचं नाव आलं, पण पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जात त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं). त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा आणि अविश्रांत राजकीय तपस्या तब्बल साडेसातपेक्षा जास्त दशकांची आहे.

आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीनंतर भारतात आले आणि इथल्या समाज जीवनाचं एक कट्टर व अभिन्न अंग झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले ते १९४२ पासून. तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत. संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते. नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आलं. जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. तो प्रचंड खाचखळग्यांचा तसंच अनेक नैराश्यपूर्ण घटनांचाही असला तरी कधी खचल्याची पुसटशीही रेषा त्यांच्या करड्या चेहऱ्यावर उमटलेली दिसली नाही.

लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला, देशभर पक्षाची पाळंमुळं रुजविली. पक्षाचा चेहरा उदारमतवादी अटलबिहारी वाजपेयी आणि कठोर श्रम लालकृष्ण अडवाणी यांचे, अशी कायम कामाची विभागणी राहिली. ती जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांनी नेहमीच कोणतीही कुरकूर न करता स्वीकारली. विचारी, संयमी पण ठाम, जहाल पण शांत, धोरणी आक्रमकता असं गुणवैशिष्ट्य असणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. राजकीय लाभासाठी रामजन्मभूमी आंदोलनाचा भडका अडवाणी यांनीच उडवला (आणि समाज दुभंग करणाऱ्या धर्मांध राजकारणाला देशात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. म्हणूनच जातीय आणि धार्मिक समीकरणांचा ‘सांगोपांग’ विचार करून राजकारण करणाऱ्या देशातील मायावती, मुलायमसिंह, ओवेसी अशा अनेकांचे अडवाणी हे ‘गुरू’ शोभतात.) त्यासाठी अडवाणी आणि प्रमोद महाजन देशात वणवण फिरले. प्रमोद महाजन यांचं सारथ्य आणि अडवाणी यांची यात्रा हे समीकरणच एकेकाळी देशाच्या राजकारणात रूढ झालं होतं.

बाय द वे, राजकीय जीवनात लालकृष्ण अडवाणी यांनी एकूण पाच ‘यात्रा’ काढल्या, देशभर लक्षावधी किलोमीटर्स प्रवास केला आणि गाव पातळीवर देश पिंजून काढला, हे त्यांचे राजकीय श्रम केवळ अतुलनीय आहेत. लोकसभेत केवळ दोन सदस्य अशा खाईत भारतीय जनता पक्ष कोसळला, पण वाजपेयी आणि अडवाणी यांनी त्या खाईतून पक्षाला बाहेर काढलं. सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष हे स्थान प्राप्त करून दिलं. पुढे जाऊन केंद्रात इतर पक्षांसोबत युती करून का होईना, पण आधी तेरा दिवस-मग तेरा महिने-नंतर पूर्ण टर्म सत्ता मिळवून दिली. आता तर त्यांचा पक्ष केंद्रात आणि अनेक राज्यात स्वबळावर सत्तेत आहे. मात्र अशा या सुगीच्या दिवसात वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाजूला पडलेले आहेत, तर लालकृष्ण अडवाणी यांना पूर्णपणे बाजूला टाकण्यात आलेलं आहे.

देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले. ते जेव्हा उपपंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी थकलेले होते आणि स्वाभाविकच लालकृष्ण अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते. माझं म्हणणं अनेकांना रुचणार नाही, पण नमूद करतोच. ‘प्रथम देश आणि मग पक्ष’ अशी भूमिका घेत म्हणजे संघाचा अजेंडा बाजूला ठेवून पंतप्रधान वाजपेयी आणि उपपंतप्रधान अडवाणी यांनी केंद्र सरकार चालवताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आखून ठेवलेली परराष्ट्र धोरणांची चाकोरी बदलली नाही, देशाच्या सेक्युलर भूमिकेला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि संघ धुरिणांची इच्छा डावलून पाकिस्तानशी असलेले संबध अधिक सुरळीत व सौहार्दाचे होण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच त्या दोघांची जनमानसातली प्रतिमा उजळली. ही प्रतिमा इतकी उजळ होत गेली की, त्यापुढे सरसंघचालकांची प्रतिमा लहान आणि ते पद खुजं वाटू लागलं. संघ स्थापनेपासून असं प्रथमच घडत असल्यानं त्यामुळे संघात अस्वस्थता पसरणं अपरिहार्य होतं.

याच काळात आम्हा काही संपादकांशी बोलताना तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांच्या बोलण्यातून ती अस्वस्थता अगदी स्पष्ट नसली तरी बऱ्यापैकी व्यक्तही झाली. त्या चर्चेप्रसंगी मोहन भागवत हेही उपस्थित होते. ती अस्वस्थता मला ‘मळमळ’ वाटली. ‘कट्टर’ लालकृष्ण अडवाणी संघाच्या नजरेतून उतरण्याची ती सुरुवात आहे अशी पुसटशी जाणीवही तेव्हा झाली आणि त्या ‘मळमळी’वर मग मी ‘लोकसत्ता’तून टीकास्त्र सोडलं; तेव्हा बराच गहजब झालेला होता. (ती हकिकत ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘दिवस असे की...’ या पुस्तकात विस्ताराने आलेली आहे.)

नंतर पाकिस्तानात जाऊन लालकृष्ण अडवाणी यांनी बॅरिस्टर जीना यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि संघ आणखी बिथरला. २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या, पण भाजपचं स्वबळावरचं किंवा एनडीएचं सरकार स्थापन होण्याइतकं बहुमत मिळालं नाही; उलट काँग्रेस सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून स्थिरावला आणि (संघ आणि भाजपच्या नाकावर टिच्चून सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यावर) केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार सत्तारूढ झालं. तेव्हाच संघाच्या दृष्टीकोनातून लालकृष्ण अडवाणी यांची किंमत पूर्ण उतरलेली होती!

दरम्यान मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झालेले होते. इथं एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे– मोहन भागवत परिवारात जसजसे सर्वशक्तिमान होत गेले, तसतसं लालकृष्ण अडवाणी यांचं पक्षातलं स्थान डळमळीत होत गेलं. आधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून काढून सुषमा स्वराज यांच्याकडे दिलं गेलं. मग रा. स्व. संघाचे ( पक्षी : मोहन भागवत यांचे ) ‘ब्ल्यू आईड बॉय’ नितीन गडकरी यांना ‘रीतसर’ प्रक्रिया पार पाडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं गेलं. नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यावर ‘ब्लॉग बॉम्ब’ टाकण्याचा लालकृष्ण अडवाणी यांचा प्रयत्न बहुमिन्नतीनंतर नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांनी बारगळवण्यात यश मिळवलं. नंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून ‘मानपान’ घडवलं गेलं. लालकृष्ण अडवाणी तसंच त्यांच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची होणारी ‘तडफड’ एक पत्रकार म्हणून जवळून अनुभवता आलेली आहे.  

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत संघाच्या नियोजनाला यश आलं आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली. परिवाराचं स्वप्न साकार करणारा तो क्षण नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यानं एकहाती मिळवून दिलेला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर आपणच एनडीएचे सर्वसंमतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू ही लालकृष्ण अडवाणी यांची अंधुक आशाही मोदी आणि भाजपच्या या ऐतिहासिक यशानं पूर्ण मावळली. त्यानंतर तर लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची रवानगी पक्षाच्या ‘सल्लागार मंडळात’ म्हणजे वेगळ्या शब्दात-स्पष्टच सांगायचं तर, अडगळीच्या खोलीत करण्यात आली. या सर्व प्रसंगी ‘अडवाणी युगाचा अस्त होतोय’ आणि २०१६साली लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण हा सन्मान मोदी सरकारने जाहीर केल्यावर ‘आता काही लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती होणार नाहीत’, भाजपतील ‘अडवाणी युगाचा अस्त झालाय’ असं लिहित होतो तेव्हा, ‘भक्तां’नी हल्ले चढवत मला त्रस्त करून सोडलं होतं.

बाबरी मस्जीद पाडल्याचा खटला ऐन राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर ‘उकरून’ काढला गेला वगैरे बाबी फारच क्षुल्लक आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान न होऊ देणं ही ‘परिवारा’कडून खेळली गेलेली एक नियोजनबद्ध प्रदीर्घ खेळी होती आणि राष्ट्रपतीपद त्यांना मिळणारच नव्हतं. भारतीय राजकारणाच्या पटावर सध्या तरी इतकी मोठी इनिंग्ज खेळलेला, लालकृष्ण अडवाणी यांच्या सारखे अविश्रांत कठोर श्रम घेतलेला, अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही. मात्र त्यांची पंतप्रधान होण्याची प्रकट आणि राष्ट्रपती होण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही... ज्या राम मंदिरासाठी त्यांनी इतका हिंसक संघर्ष केला तो ‘राम’ लालकृष्ण अडवाणी यांना पावलाच नाही. लालकृष्ण अडवाणी यांची एका राजकीय महाशोकांतिकेचा महानायक अशीच दखल राजकीय इतिहासकारांना घ्यावी लागणार आहे!  

एक कोडं मात्र उलगडत नाही. आयुष्याचे तब्बल ८९ उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला या खेळी समजल्या कशा नाहीत, कुठे थांबावं हे त्यांना कळलं कसं नाही? खरं तर, दिलेल्या योगदानाच्या मोबदल्यात पक्षांनीही अडवाणी यांच्या पदरात भरपूर काही टाकलेलं होतं. या खेळी समजूनही जर महत्त्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल, तर ही महाशोकांतिका ओढावून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत, असा निष्कर्ष कोणी काढलाच तर तो अवाजवी ठरणार नाही.   

……………………………………………………………………………………………

लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......