सलमानची नुसतीच फडफडणारी 'ट्यूबलाईट'!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'ट्यूबलाईट'चं एक पोस्टर
  • Sat , 24 June 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा सलमान खान Salman Khan शाहरुख खान कबीर खान Kabir Khan ट्यूबलाईट Tubelight सोहेल खान Sohail Khan

सलमान खानचे चित्रपट हे केवळ त्याच्यासाठी पाहिले जातात. त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे, कारण तेवढे 'स्टारडम' त्याने टिकवून ठेवले आहे. त्याची विशिष्ट आवाजातील संवाद-फेक आणि 'दबंग' स्टाईल मारामारी याच्यावर त्याचा प्रेक्षकवर्ग खुश असतो. अशा वेळी चित्रपटाची कथा अनेक वेळा गौण ठरते. त्याचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर हिट होतात. या सर्वांचा विशेषतः त्याच्या भूमिकेचा विचार करता त्याचा नवीन 'ट्यूबलाईट' हा वेगळ्या जातकुळीतला आहे असे म्हणावे लागेल. कारण या चित्रपटात त्याने चक्क 'गांधीगिरी' केली आहे. अर्थात चित्रपटाची कथा लक्षात घेता त्याची ही 'गांधीगिरी' फारशी प्रभावी ठरलेली नाही. त्यामुळेच त्याची 'ट्यूबलाईट' प्रखर प्रकाश न देता 'फडफडत'च राहिली आहे.

कोणतीही गोष्ट एखाद्याला लवकर न समजता उशिराने समजणे वा त्याबाबत त्याचा गोंधळ उडणे त्यासाठी त्याला 'ट्यूबलाईट' म्हटले जाते. चित्रपटाच्या कथेनुसार सलमानचे व्यक्तिमत्त्व या 'ट्यूबलाईट'सारखे आहे. म्हणून त्याला चित्रपटात 'ट्यूबलाईट'च म्हटले जाते. चित्रपटाची कथाही जुन्या 'ट्यूबलाईट'प्रमाणे जुनीच आहे. त्याला १९६२ मधील भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी आहे. चीनच्या सीमेवर असणाऱ्या जगतपूर या छोट्याशा गावी राहणाऱ्या लक्ष्मण आणि भरत (सलमान खान आणि सोहेल खान) या दोघा बंधूंची ही कहाणी आहे. भारत-चीन युद्ध सुरू होताच गावातील काही तरुणांना लष्करात भरती होण्याचे आवाहन केले जाते. लक्ष्मण 'ट्यूबलाईट' असल्यामुळे त्याची निवड होत नाही, मात्र भरत लष्करात भरती होऊन सीमेवर लढण्यासाठी जातो. युद्ध चालू असताना भरत बेपत्ता असल्याची खबर येते. भरतची भेट पुन्हा होण्यासाठी युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशी लक्ष्मणची प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी गावातील अनाथालयाचे प्रमुख (ओम पुरी) लक्ष्मणला महात्मा गांधी यांच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देतात.

'शत्रूवरही प्रेम करावे' या गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार लक्ष्मण गावातच राहायला आलेल्या चिनी कुटुंबातील मुलाशी मैत्री करतो. त्याची ही चिनी कुटुंबाशी असलेली मैत्री गावातील त्याच्या काही तरुण मित्रांना आवडत नाही. त्यामुळे समज-गैरसमजातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करत लक्ष्मणची दृढ विश्वासावर आधारित असलेली 'गांधीगिरी' अखेर कशी यशस्वी होते, यासाठी 'ट्यूबलाईट' पडद्यावर पाहणे सोयीस्कर ठरेल.

'ट्यूबलाईट'ची कथा 'लिट्ल बॉय' चित्रपटाच्या कथेवर आधारित असून दिग्दर्शक कबीर खान आणि सलमानच्या याआधीच्या 'बजरंगी भाईजान'प्रमाणे तिलाही द्विपक्षीय संबंधाची किनार आहे. 'बजरंगी भाईजान'मध्ये भारतात चुकून आलेली पाकिस्तानची मुलगी परत पाकिस्तानात तिच्या घरी पाठवण्यासाठी सलमानने केलेले प्रयत्न होते, तर या चित्रपटात भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सलमानने चिनी मुलाशी 'दोस्ती' करून पुन्हा एकदा मानवता श्रेष्ठ असल्याचा आणि अढळ विश्वासाच्या आधारे आपले इप्सित साध्य होऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कथेचे हेच मुख्य सूत्र असले तरी सरधोपट मांडणीमुळे ते फारसे प्रभावी ठरले नाही. युद्धाचे काही प्रसंग प्रभावीपणे चित्रित करण्यात आले असले तरी कथेचा काळ १९६२ मधील भारत-चीन युद्धाचा वाटत नाही, तो वर्तमान काळासारखाच चकचकीत दाखवण्यात आला आहे. सलमानला या चित्रपटात कसलीही 'दबंग'गिरी नाही. त्यामुळे आपले 'ट्यूबलाईट' नाव सार्थ करण्यासाठी स्वत:ला जास्तीत जास्त बावळट दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्यासाठी 'पीके'छाप पद्धतीची भूमिका त्याने केली आहे. आणि ती फसली आहे. त्याला या चित्रपटात अनेक वेळा रडावेही लागले आहे. त्यामुळे 'यकीन नहीं होता की, ये सलमानका चित्रपट हैं' असे म्हणतच सलमानच्या चाहत्यांना बाहेर पडावे लागते.

चित्रपटात शाहरुख खान जादूगाराच्या भूमिकेत थोडा वेळ चमकून जातो. अन्य कलाकार ओम पुरी, सोहेल खान, चिनी मुलगा मैटिन रे टैनगू आणि त्याच्या आईच्या भूमिकेतील चिनी अभिनेत्री झू झू यांची कामे चांगली झाली आहेत. चित्रपटात अधूनमधून गाणी असावीत म्हणून आहेत. लडाखच्या रम्य पार्श्वभूमीवरील उत्तम छायांकनामुळे चित्रपट बराचसा सुसह्य झाला आहे. त्यामुळेच 'ट्यूबलाईट' फडफडती ठेवण्यास चांगली मदत झाली आहे.

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......