अजूनकाही
मी मूळचा सोलापूरचा. अकलूजचा. दहावीपर्यंत तिथंच शिकलो. दहावीत ८० टक्के मार्क्स मिळाले. म्हणजे झकासच. मग पुण्यात शिकायला आलो. एस. पी. कॉलेजला सायन्सला अॅडमिशन घेतली. सुरुवातीला एकदम भारी वाटत होतं. इतकं मोठं शहर. मस्त कॉलेज. अकलूजमध्येही एकदम ग्लॅमरस झालो होतो... शिकायला पुण्यात... ते ही सायन्सला वगैरे... पुण्यात असताना एकांकिका, नाटकांशी ओळख झाली. वाटलं, हेच आपल्याला करायचंय. एकदम नाटकं आवडला लागली. अभिनयात जाम इंटरेस्ट वाटायला लागला. ठरवून टाकलं, आपण अॅक्टर व्हायचं. पण हे वेड लवकरच ओसरलं. अगदी दोन-तीन महिन्यांत. सुट्टीत समर नखातेंचा फिल्म अप्रेशिएशनचा कोर्स केला आणि मग लक्षात आलं सिनेमा हेच माझं क्षेत्र आहे... अॅक्टिंग वगैरे काही नाही. मला दिग्दर्शक व्हायचंय. सिनेमा करायचयाय.
अगोदरपासूनच मला सिनेमांचा खूप शौक. नाद म्हणावा असा. सुट्टी लागली की, आम्ही सोलापूरला जायचो, सिनेमा पाहायला. दहा रुपये तिकीट असायचं. वाट्टेल ते सिनेमे पाहायचो. मजा यायची. तेव्हा आपण सिनेमा करायचा असं काही डोक्यात नव्हतं. पण समर नखातेंच्या कोर्सनंतर ते डोक्यात पक्क होत गेलं.
११ वीला माझे ४ विषय राहिले. सायन्स अजिबात आवडेना. घरातलेही चिडले. मग परत घरी आलो. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावी दिली. तिथंच वाचनाचं वेड लागलं. नाद म्हणावा इतकं वेड. अभ्यास राहिला बाजूला. मी सतत काहीतरी वाचत असायचो. अधाशासारखं. तिथंच नेमाडेंच्या पुस्तकांची ओळख झाली. ‘कोसला’ वाचायला घेतलं. पहिल्यांदा कंटाळलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला परत वाचायला घेतलं. मग मात्र नेमाडे यांच्या पुस्तकांनी वेडच लावलं. त्याच काळात त्यांची ‘हिंदू’ प्रकाशित होणार होती. मी तेव्हा परत पुण्याला आलो होतो. मास कम्युनिकेशन्स करायला. आता सायन्स सुटलं होतं, पण सिनेमा आणि वाचनाचं वेड कायम होतं. मी ‘हिंदू’ अप्पा बळवंत चौकातल्या ‘रसिक साहित्य’ची मिनतवारी करून मिळवली होती. नेमाडेंच जे जे मिळेल ते सारं वाचून काढलं. त्यांच्यावर सिनेमा करायचाच असं हळूहळू मनात पक्कं होत गेलं. डोक्यात स्क्रिप्ट पक्की होत गेली. टिपणं तयार होतीच. खरं सांगायचं तर काय करायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. त्यातूनच मग काय सांगायचंय आणि कसं सांगायचंय हे आकाराला येत गेलं.
‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा डॉक्यूफिक्शन चित्रपट करण्यासाठी नेमाडेंची परवानगी मिळवणं हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट. त्यांना संपर्क केला आणि मुंबईत साहित्य अकादमीमध्ये त्यांना पहिल्यांदा भेटलो. इतका साधा माणूस. मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्या ‘देखणी’ या कवितासंग्रहातली एक कविता वापरण्याची परवानगी घेण्यासाठी. ‘कोसला’ ते ‘हिंदू’पर्यंत आपल्या साहित्यातून भाषेचे इतके विविध प्रयोग केलेला हा लेखक... त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं, कसं वागायचं हे सारं ठरवूनच मी त्यांच्याकडे गेलो होतो. पण ते इतक्या मोकळेपणाने भेटले. सहजतेनं त्यांनी ती कविता वापरायली परवानगी दिली. त्यांचा साधेपणा मला अधिकच भावला. त्यांच्यावर डॉक्युफिक्शन फिल्म करायची हे तिथंच ठरलं. त्यांनी पूर्ण सहकार्य देण्याचं कबूल केलं. तीन दिवस ते आम्हाला त्यांचं शूटिंग करू देणार होते. मग त्यांचे काही मोंताज शूट केले. त्यांनी खूपच सहकार्य केलं. आम्हा साऱ्यांशी ते अगदी आपुलकीनं वागायचे. त्यांची व्याख्यानं, इतर कार्यक्रम याविषयी नेहमी कळवायचे. जिथं त्यांना शक्य असेल तिथं ते मदत करायचे. त्यांच्याबरोबर असणं हा समृद्ध अनुभव होता.
नेमाडे यांचं साहित्य आवडणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या साहित्यामधली अनेक पात्रं त्यांनी त्यांच्या लेखणीतून कशी जिवंत केलीत, त्याविषयीही वाचकांना ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या चित्रपटामधून ऐकायला आणि पाहायला मिळेल. त्यांनी कथा-कादंबऱ्यांमध्ये लिहिलेली पात्रं जसं की, पांडुरंग सांगवीकर, मनू इत्यादी आम्ही काल्पनिकरित्या जिवंत केली आहेत. ज्या परिसरात नेमाडेंनी त्यांच्या कादंबऱ्या लिहिल्या, जिथं जिथं त्यांच्या कथांचे नायक वावरले, त्या परिसराचं चित्रण आम्ही केलंय. त्यासाठी आम्ही गोवा, मुंबई, पुणे असं खूप भटकलोय. नेमाडे यांच्या लिखाणात मौखिक परंपरेची नोंद अत्यंत समर्थपणे घेतलेली दिसते. तीच परंपरा मला मांडायची होती. चित्रपट डॉक्युफिक्शन असल्यामुळे मला ते सारं मांडणं सोपं गेलं. खानदेशातले सण, तिथल्या स्थानिक लोककला, उत्सव या साऱ्यांचा समावेश आम्ही केलाय. त्यांच्या साहित्यामधली पात्रं नेमकी कुठून आली, कशी आली हे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही ‘उदाहरणार्थ नेमाडे’मधून केलाय.
मात्र हे सारं करताना शूटिंग कृत्रिम प्रकारे असू नये याची मात्र मी पुरेपूर काळजी घेतली आहे. नेमाडेंबरोबर शूटिंग करताना ते जसे आहेत, तसंच शूटिंग आम्ही करत गेलो. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत भरपूर प्रवास केला. सुरुवातीला ते कॅमेरासमोर जरा अवघडलेलेच होते. थोडा वेळ गेला आणि ते समोरच्या कॅमेराला रूळले. त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळंच आहे. प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक रूपं आमच्या समोर आली. स्वभावाचे वेगवेगळे पैलू कळत गेले. त्यांच्याशी आम्ही खूप गप्पा मारल्या. विविध विषयांवर त्यांना बोलतं केल. त्यांना कधी गाणी आठवतात, कधी कविता, कधी आणखी काही... त्यांच्या आठवणींच्या कप्प्यातून ते हळूहळू उलगडत जातात...त्यांचे साहित्य, त्यातली पात्रे, साहित्य, कला आणि या साऱ्यांचा एकमेकांशी असलेला संबंध, असे सारे पदर उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. त्यांची ‘आत्मचरित्र’ ही कविता त्यांना वाचायला सांगितली. ती वाचत असतानाच आम्ही त्यांच्या जुन्या फोटोंचं शूटिंग केलं. फक्त साहित्य, त्याची माहिती असं सांगण्यात मला रस नव्हता. त्यांच्या पात्रांविषयीची त्यांची भूमिका मला जाणून घ्यायची होती. मलाच का, त्यांच्या असंख्य वाचकांना त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तेच जाणण्याचा ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी ते जसं बोलत गेले, तसंच त्यांचं शूटिंग केलय. त्यांना आम्ही कोणताही कृत्रिम अभिनय करायला लावलेला नाही.
हे करताना आव्हानंही बरीच आली. खानदेशातल्या खेड्यांमध्ये लोकोत्सवाचे प्रसंग चित्रित करायचे होते. पण त्यासाठी थांबावं लागलं. पण स्थानिक लोकं, नेमाडे यांनी आम्हाला खूप मदत केली. सुरुवातीला तीन दिवसांचं शूटिंग करायला परवानगी देणाऱ्या नेमाडे यांनी नंतर मात्र आमच्याबरोबर ३५ दिवसांचं शूटिंग केलं. फक्त आमच्या टीमचा उत्साह आणि प्रामाणिकपणा पाहून...
आपल्याकडे चित्रपटाचे काही संकेत रुढ झालेले आहेत. परदेशात सिनेमाक्षेत्रात खूप वेगवेगळे प्रयोग केले जातात. आपल्याकडे, मराठीमध्ये डॉक्युफिक्शन चित्रपट पहिल्यांदाच होतो आहे. आम्ही पारंपरिकतेला छेद देत या सिनेमाची निर्मिती केली आहे. अशा पद्धतीने सिनेमा करताना आम्हाला खूप कष्टही पडले. अर्थात अनेकांनी मदतीचे हात पुढे केलेत. गोव्याचे राजन गानू यांसारख्या कित्येकांनी मदतीचा हात दिला. चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी कॅलिफोर्निया आर्टस असोशिएशन ही संस्था पाठीशी उभी राहिली. चित्रकथी निर्मिती या संस्थेचे अरविंद पाखले निर्माते झाले. आमच्याकडे फार पैसे नाहीत. एका वेडाने झपाटले जात आम्ही ‘उदाहरणार्थ नेमाडे’ तयार केलाय. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज न करता महाराष्ट्रातले विविध जिल्हे, तालुक्यांची प्रमुख ठिकाणं अशा ठिकाणी आम्ही ‘उदाहरणार्थ नेमाडे’ दाखवणार आहोत. विविध कॉलेजेसच्या मराठी वाङ्मय मंडळांनी, फाऊण्डेशन्सनी ‘उदाहरणार्थ नेमाडे’चा शो आयोजित करावा असं मला वाटतं. अशा पद्धतीचा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत आहे. एका वेगळ्या वाटेवर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मला खात्री आहे की, लोकांना हा प्रयोग नक्कीच आवडेल.
लेखक ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या डॉक्युफिक्शनचे दिग्दर्शक आहेत.
akshayindikar1@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Mayuri Sawant
Wed , 13 September 2017
खूप छान!कुठे पाहायला मिळेल ही फिल्म सध्या?
Ajaiz Shaikh
Tue , 21 February 2017
mast akshay......