‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि द वर्ल्ड इज फ्लॅट’ हे नितिन भरत वाघ यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. नवता बुक वर्ल्ड, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला वाघ यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अशं...
.............................................................................................................................................
या लेखसंग्रहात एक समान सूत्र आहे, ते म्हणजे देशीवाद आणि जागतिकीकरण. आजच्या जगण्यात या दोन परस्परविरोधी विचारधारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यावर थेट प्रभाव आहे. तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक असा अनेक प्रकारचा आहे आणि हे प्रभाव अटळ आहेत. जगभरात कदाचित कधीही नव्हती अशी अस्वस्थ परिस्थती उद्भवली आहे. खरं तर जेव्हा केव्हा इतिहासात या काळाची नोंद होईल ती ‘एज ऑफ इनसॅनिटी’ अशीच होणार आहे, इतका विलक्षण विरोधाभासी केऑस जगभर जागतिकीकरणाच्या माध्यमातून पसरला आहे. अत्यंत व्यक्तिकेंद्री समाजव्यवस्थेत व्यक्तीच्या अस्तित्वाला स्वतंत्र स्थानच नाही. तो केवळ माणूस नसतो तर इतर अनेक ओळखी त्याच्यासोबत जोडलेल्या असतात. त्याची जात, धर्म, व्यवसाय, लिंग, वय, भाषा, प्रदेश, विचारसरणी, आवडनिवड, पेहराव, आर्थिकस्थिती, त्याचा राहण्याचा पत्ता, या आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टीत माणूस बांधला गेलाय आणि तरी समाजाची वाटचाल व्यक्तिकेंद्रित्वाच्या दिशेने होतेय. ब्लॅक आणि व्हाईट यात एक ग्रे पट्टा असतो. त्यात कुणालाही राहू द्यायचं नाहीये, शिवाय असं करताना स्वत:चं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचंय पण इतरांवर नियंत्रणही ठेवायचंय. बरं या सगळ्या घटकांमध्ये सर्वसामान्य ते असामान्य सगळेच मेटाकुटीला आलेयत, जगण्यासाठी स्वत:ला टिकवून ठेवण्याच्या संघर्षात जगणं कुठे तरी मागेच सुटून गेलंय, ही जाणीव छळत असते. जगणं अंगावर येत चाललेला हा अटीतटीचा हा काळ. विखुरलेल्या तुटलेपणाची वेढून असलेली भावना आणि सततचं होणारं विस्थापन, हे सगळंच अस्थिर करणारं.
भारतातल्या सगळ्या गोंधळाचं, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांचं थोडक्यात बहुतेक सगळ्या समस्यांचं मूळ भारतीय इतिहासाच्या मांडणीत आहे, हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे. हा देशीवादी विचारातील एक धागा पकडून देशीवादी विचारांची मुळापासून तपासणी करून संपूर्ण नव्याने मांडणी करण्याचे ठरवून या समीक्षालेखांतील सूत्र मांडण्यासाठी एक जोडलेख लिहायला घेतला होता. एकामागून एक संदर्भ – भारतीय समाजाची बदलत गेलेली संरचना, मूल्यधारणा, वास्तवाचे, तथ्यांचे सर्वात महत्वाचे म्हणजे इतिहासाचे केलेले विकृतीकरण, एका जातीच्या न्यूनगंडापायी, स्वार्थापायी केल्या गेलेल्या उलथापालथी त्यात देशाचे झालेले अपरिमित नुकसान असा सगळा प्रवास सापडत गेला. या सगळ्या प्रयत्नात एक समांतर परंतु देशीवादाचीच नवी मांडणी आणि स्वरूप लक्षात आले, त्यात दडलेली नेमाडेंची काही स्पष्ट न झालेली अधोरेखिते सापडली. आज नेमाडे किंवा देशीवाद, (खरंतर) देशीवाद नाहीच फक्त भालचंद्र नेमाडे एक व्यक्ती म्हणून केंद्रस्थानी ठेवून टीका विरोध वगैरे होतोय, हा गुंतागुंतीचा भाग होऊन बसलाय. त्यातल्या त्यात सोपा सुटसुटीत करून घेता येणारा भाग म्हणजे काही टीका अत्यंत वैयक्तिक व्यक्तीद्वेष स्वरुपाची हीन दर्जाची असून तिच्याकडे दुर्लक्ष करणे वेळ आणि ऊर्जा वाचवणारे ठरेल. या सगळ्या वैचारिक भांडणात भाग घेण्याचं कारण नेमाडेंच्या बाजूने थेट कोणी उतरत नाही, आणि विरोधकांचे मुद्दे खोडून काढत नाही, केवळ दुर्लक्ष करून किंवा अनुल्लेखाने मारून प्रश्न व केलेले आरोप खोडून काढता येत नाही. नेमाडे जो काही विचार मांडतायत तो समजावून घेण्यासाठी थोडे प्रयत्न, कष्ट करावे लागतात, स्वत:ची अशी विचारदृष्टी उभी करावी लागते, हे विरोध करणाऱ्यांना कळत नाही आणि त्यांचे समर्थन करणारे आंधळेपणाने विचार न करता समर्थन करतात. मी या संग्रहातल्या एका लेखात मांडले होते की नेमाडेंना हिंदू मानसिकता समजत नाही. मात्र कालांतराने अनेक गोष्टी समोर आल्या, त्यात नेमाडेंचा नेमका विचारव्यूह त्यांच्या २०१० नंतरच्या विविध मुलाखतीमधून, भाषणातून स्पष्ट होत गेला. त्यांच्या विचारांचं नेमकेपण फक्त त्यांच्या सनातनी हिंदुत्ववादी विरोधकांच्या लक्षात आलेले आहे. नेमाडेंचे प्रमुख विरोधक सनातनी हिंदुत्ववादी आणि स्यूडो-आंबेडकरवादी आहेत.
मी स्यूडो ही संज्ञा वापरण्याचे कारण बाबासाहेबांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, की शोषणाचं भांडवल केलं नाही. त्यांनी कधीही जात हा घटक राजकीय शक्ती म्हणून वापरला नसता. बाबासाहेब स्वत: प्रखर देशभक्त होते आणि त्यांची देशीयता इतर कोणत्याही भारतीय नेत्यांपेक्षा अस्सल होती. बाबासाहेबांनी इंडॉलॉजिस्ट म्हणून जी काही भारतीय इतिहासाची आणि समाजाची मांडणी केली आहे ती पूर्णपणे भारतीय अब्राह्मणी परिप्रेक्ष्यातच केलेली आहे. हिंदूवादी (बहुजनवादी) देशीवाद जेवढी हिंदू जगण्याची, जातिव्यवस्थेची, धर्माची चिकित्सक समीक्षा करतो किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून देतो तेवढी चिरफाड आधुनिक पुरोगामी किंवा डावे विचार करत नाही. भारतात दोन प्रकारचे देशीवाद अस्तित्वात आहेत एक वैदिक-ब्राह्मणी हिंदुत्ववादी (इथे वैदिक-ब्राम्हणी, हा शब्द वापरण्याचे कारण यात फक्त त्याच ब्राह्मणांचा समावेश केलाय, जे वर्णव्यवस्था, जातिप्रथा, जातीयता समर्थक आहेत, ज्यांचा आंधळेपणाने वेद, पुराणांवर विश्वास आहे, ज्यांचा उच्च-नीचतेवर आणि जन्मनिष्ठ श्रेष्ठत्वावर विश्वास आहे, त्यामुळे बाकीचे आपोआप वगळले गेले आहेत. सरसकट ब्राम्हण जात म्हणून नाही तर ब्राम्हण्य ही वृत्ती अभिप्रेत आहे) तर दुसरा आहे- बहुजनांचा हिंदूवादी, हा सूक्ष्मभेद लक्षात घेतला पाहिजे.
हिंदुत्ववादात आणि हिंदूवादात ब्राह्मण आणि बहुजन इतका दीर्घ फरक आहे. या दोन स्वतंत्र आणि परस्परविरोधी विचारधारा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘हिंदुत्व’ हे वैदिक-ब्राह्मणी समाजाचे उत्तर आधुनिक स्वरूप आहे तर नेमाडे यांचा हिंदू देशीवाद त्याच्या विरोधात उभा रहाणारा आधुनिक विचार आहे. फक्त ‘हिंदू’ या नामसाधर्म्यामुळे संदिग्धता निर्माण झालीये. नेमाडेंनी दुसरा पर्यायी शब्द वापरला असता तर कदाचित इतका गोंधळ उडाला नसता आणि कदाचित सर्व बाजूंनी नेमाडेंवर टीका झाली नसती. कदाचित सिंधू संस्कृतीचा अपभ्रंश म्हणून नेमाडेंनी हा शब्द वापरला असावा. कट्टर सनातनी हिंदुत्ववाद्यांकडून होणारा विरोध हा अगदी टोकाचा जीवे मारण्याची धमकी देण्याइतका खतरनाक आहे, कारण वैचारिक विरोध त्यांच्या कुवतीची गोष्ट नाही. ते काम त्यांनी काही ‘समरसतावादी’ अब्राह्मणी विचारवंतांवर सोपवलेले आहे.
हे समरसतावादी स्यूडो-आंबेडकरवादी आणि सनातनी हिंदुत्ववादी एकमेकांचे कायमचे वैचारिक विरोधक, हे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्रितपणे नेमाडेंचे विरोधक. शत्रूचा शत्रूचा तो आपला मित्र असे कोणतेही सामरिक सूत्र नाही. असं कसं काय होऊ शकतं? हा प्रश्न माझ्या समोर होता आणि मार्गदर्शनासाठी शरद् पाटील यांची नेमाडेंच्या संदर्भातली मांडणी. अगदी मुळापासून खोलवर अभ्यास करून जातिव्यवस्था अंताची मांडणी करण्यासाठी आपली संपूर्ण हयात, आयुष्य, आजच्या भाषेत राजकारणातलं करिअर ‘वाया’ घालवलेला, एकट्या योदध्यासारखा लढणारा मनुष्य जातिव्यवस्था समर्थक ‘मूलतत्त्ववादी, जातीवादी वगैरे’ नेमाडे नावाच्या व्यक्तीचं समर्थन करून त्याच्याकडे अब्राह्मणी बहुजनांचं वैचारिक नेतृत्वं देण्याची भाषा कशी काय करतो? असा दीर्घलांब प्रश्न होता. अर्थात शरद् पाटलांच्या भूमिकेवर किंवा त्यांच्याही ‘जातीवर’ जाण्याची मुभा ज्याला त्याला आहेच. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नुसतं वरवर सापडणार नाहीत याची खात्री होती, आणि हे समजण्यासाठी सुलभ गाईडही शरद् पाटील यांनी उपलब्ध करून दिलेले नाही. ती शक्यता कधीही असणार नव्हती. कळीचा प्रश्न होता जातिव्यवस्था, त्याचा माग घेत घेत भारतीय इतिहासाच्या निबिड अरण्यात शिरलो, त्यात वर्णव्यवस्थेच्या आणि जातिव्यवस्थेच्या श्वापदाने किती आणि काय काय गिळंकृत केलंय ते दिसलं. उत्खननाशिवाय सत्य हाती लागणार नव्हतं, त्यात अनेक गोष्टी स्पष्ट होत गेल्या. जात, जातिव्यवस्था हा भाग बाजूला ठेवून भारतीय इतिहासातले घोळ लक्षात आले आणि नेमाडेंना जीवे मारण्याची धमकी नेमकी कोणत्या कारणासाठी दिली जातेय तेही समजले.
नेमाडे आणि देशीवाद समजून घ्यायचे असतील तर खरा भारतीय इतिहास समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे इतिहासासंदर्भातील विधान लक्षात घेतले पाहिजे, जो समाज स्वत:चा इतिहास विसरतो, त्याला कोणताही वर्तमान किंवा भविष्यकाळ राहत नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतीय दलित व बहुजन समाज आपल्या स्मृतीभ्रंशांत इतका रमलाय की, त्याला त्यातून उठवण्याचा प्रयत्न करणारे दुश्मनच वाटतायत आणि हे कायम होत आलेले आहे. एक असे प्रमेयही मांडून सोडवता येऊ शकते की, भारतातील जी जी व्यक्ती येथील बहुजन, दलित यांच्याविषयी काही चांगलं करत असेल, भल्याचं सांगत असेल ती वैदिक-ब्राह्मणांची शत्रू असेल. बिनदिक्कतपणे हे मान्य करावं की, त्या व्यक्तीने अब्राह्मणी लोकांच्या भल्याचा विचार केला आहे. एकूणातच भेसळयुक्त आणि अनेक खऱ्याखोट्या ढिगाऱ्यांखाली दडपलेल्या भारतीय इतिहासाची सर्वांगीण मांडणी करणे कुणालाही शक्य नाही, एखाद्या जिगसॉ पझलसारखा तो अस्ताव्यस्त पसरलेला आहे. त्याचे तुकडे जोडतजोडत काहीतरी हाती लागते. कोणत्याही एकांगी विचाराने भारतीय इतिहास शोधला तर कधीही काही हाती लागणार नाही. सगळ्या पूर्वधारणा, स्वत:ची बरी-वाईट मते, पूर्व संस्कारित धूळ झाडून, सगळे चष्मे उतरून आणि सर्वांत महत्त्वाचे आपले अजेंडे बाजूला ठेऊन बघता आलं पाहिजे.
या पार्श्वभूमीवर काही वेगळं सापडतं का याचा प्रयत्न केला. नेमाडे विरोधकांमध्ये स्यूडो-आंबेडकरवाद्यांना फार महत्त्व देण्याचं किंवा गंभीरपणे घेण्याचं अजिबातच कारण नाही, मात्र वर्तमान संदर्भात सामाजिक संक्रमणाच्या दृष्टीने जी भूमिका ते घेऊ पाहतायत, त्या भूमिकेवर आक्षेप घेणे आवश्यक वाटते. बेडूक जसे आपल्या सुप्तावस्थावधी कालानंतर (हायबरनेशन) जागे होऊन बाहेर येतात आणि डरावं डरावं करतात त्यासारखंच स्यूडो आंबेडकरवादी (बहुतेक) व्यक्तीद्वेषापोटी नेमाडेंवर तुटून पडलेले दिसतायत, अन्यथा पस्तिस वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखावर आता अचानक तुटून पडते ना. एखाद्याला काही बोलण्याआधी आपला झोत दिशा भरकटून कुठे उजेड पाडतोय याचा विचार करणे गरजेचे आहे. वैचारिक प्रोस्टिट्युशन करून समरसतेचे मंच सजवणाऱ्यांनी कुणाला ब्रीदहीन म्हणणे कुठल्या नैतिकतेत बसते याचाही विचार केला पाहिजे. तेव्हा अशा पावसाळी विचारजंतांकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे इथे मांडण्याचं कारण नेमाडेंच्या संदर्भात ही मांडणी, ती मांडणी पाहिलीयेका असं कोणी विचारू नये म्हणून ही दखल घेतली आहे.
नेमाडेंचे दुसरे (वैचारिक!) विरोधक सनातनी हिंदुत्ववादी मंडळी आहेत, त्यांना गंभीरपणे घेणं आवश्यक आहे, कारण जोवर ‘त्यांच्या’ मुळावर कोणी उठत नाही तोपर्यंत जीवे मारण्याच्या शक्यतेपर्यंत ते जात नाही. वैदिक सनातनी ज्या पद्धतीने विचार करतात, त्याचा थोडाफार अंदाज असला तरी नेमाडेंची तिसरी बाजू लक्षात येऊ शकते. जिचा विचार विरोध करताना कुणाला करावासा वाटत नाही. दुर्दैवाने आपल्या वर्तमानाची सगळी पाळंमुळं फार खोलवर इतिहासात दडलेली आहेत. मात्र कुणालाही या इतिहासात शिरून सत्याचा पाठपुरावा करावासा वाटत नाही. भारतीय वैदिक-ब्राम्हणी परंपरांचा लेप खरवडून काढला की त्याच्या आत असणारं खरं बहुजन स्वरूप प्रकट होतं. तो शेंदुराचा लेप खरवडून काढण्याचं हत्यार सध्या बहुतेक नेमाडेंकडे आहे. त्या हत्याराची भीती त्यांच्या शत्रू क्रमांक एकला वाटते. आजचा भीषण जातीय, मूलतत्त्ववादी माहोल बघता, जातिव्यवस्था अंत ही एक अशक्यप्राय गोष्ट वाटू लागली आहे. कारण जातिव्यवस्था अंतासाठी लढणारेच आता कट्टर जातीयवादी होऊन बसले आहेत. आता जातिव्यवस्था अंत सोडा, आडव्या जातिव्यवस्थेचं प्रारूप तरी शक्य होईल का इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमाडे जेव्हा या आडव्या जातिव्यवस्थेचं समर्थन करतात तेव्हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार मोडीत काढतात हे गृहितक कशाच्या आधारावर मांडले आहे? कारण आजची जी समूहकेंद्रांची जाणीव आहे ती केवळ जात्याधारित आहे, कारण राजकारणात सर्वांत महत्त्वाचा घटक जात होऊन बसलाय, या वास्तवाचं काय करणार? ज्या भयावह पद्धतीने जाती आज कप्पेबंद झाल्यायत तशा त्या कधीही नव्हत्या.
जातिव्यवस्था म्हणजेच उभी उतरंड, हे एक समाजशास्त्रीय सर्वमान्य गृहीतक आहे. मग एखादी व्यक्ती जातिव्यवस्था आडवी करायची भूमिका मांडत असेल तर, त्याचा नेमका अर्थ काय होतो? जर मूळ गृहीतकच मोडीत निघत असेल तर, उभ्या-आडव्याला काय अर्थ उरतो. तरीही ज्याअर्थी नेमाडे आडव्या जातिव्यवस्थेचं समर्थन करतात तेव्हा अशी आशा बाळगायला हरकत नाही की, जातिव्यवस्था ‘आडवी’ करण्यासाठी नेमाडेंकडे काहीतरी सूत्र नक्कीच असणार, त्याहून पुढे जाऊन मला असंही वाटतं (जे सत्य असण्याची साधार शक्यता आहे), ते म्हणजे आडव्या जातिव्यवस्थेचं समर्थन हे कदाचित नेमाडेंचं छद्मावरण असेल. त्यांना जसा भारतीय समाजाचा मानसिक डायस्पोरा समजलेला आहे, त्यावरून एक संदिग्ध आवरणी भूमिका घेणे त्यांना अत्यावश्यक वाटत असावी, जेणेकरून वास्तवापर्यंत लोकांना ते हाकत नेऊ शकतील. यातलं खरं काय ते येणारा काळच सांगेल. मात्र आजतरी जातिव्यवस्थेचा अंत करता करता समाजमनाचा अंत व्हायला सुरुवात झाली आहे, जो कायमच वैदिक-ब्राम्हणांच्या पत्थ्यावर पडला आहे. हा जातिनिहाय मनामनातला दुभंग त्यांची शक्ती वाढवत असतो.
नेमाडे यांच्या विरोधी बाजू मांडताना त्यांच्या विचारव्यूहातील एकूण मांडणीत फक्त ‘जात’ हा एकच घटक का केंद्रस्थानी ठेवला जातो? जणू पुष्यमित्र शुंगसारखं वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे हेच नेमाडेंचे अवतार कार्य आहे. जात या घटका व्यतिरिक्त बहुजनांनी निर्माण केलेल्या अनेक गौरवास्पद गोष्टी, प्राचीन भाषा, वाङमय, सांस्कृतिक संचित, कलात्मक श्रीमंती, गर्वाने मिरवावी अशी बौद्धिक संपदा याविषयी मांडलेला विचार, वैदिक ब्राम्हणांसोबत असलेला सांस्कृतिक लढा असे खूप काही सांगितले आहे. भारतीय संस्कृतीची दुर्दशा कोणी केली ते साधार मांडले आहे, त्यासाठी जीव धोक्यात घालून ते जगत आहेत याचा विचार कोणीही करत नाही. एकूणातच सद्यस्थितीतील जातिव्यवस्था अत्यंत निसरडी शेवाळी झालेली आहे, जिला सोडायची आहे मात्र घट्ट धरूनसुद्धा ठेवायची आहे. मुळात एकीकडे जातीच्या आधाराने आरक्षणाची मागणी करायची, दुसरीकडे जाती अंताची भाषा करायची, दोन परस्परविरोधी ध्रुव कसे एकत्र साधता येणार? एकीकडे दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं आणि आपण स्वत: किती जातीवादी वागतो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचं हा विलक्षण विरोधाभास आहे. जे कोणी जातपात मानत नाही, त्यांनी जाती अंताच्या भानगडीत पडायची गरजच नाही. जो जात मानत नाही म्हणजेच जाती अंतही मानत नाही. जाती अंतासाठी आधी स्वत:ची जात संपवावी लागते हे समजून घ्यायला हवे, ते न केल्याने विचित्र त्रांगडे निर्माण झाले आहे. हा गुंता कसा सोडवायचा? याची जबाबदारी कोणी घ्यायची?
वास्तव-अवास्तव, भ्रम-भासांच्या मायाजालात गुरफटलेल्या सापेक्ष अशा सत्याला भिडताना अनेक गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. त्यासाठी प्रचंड उत्खनन करायला हवं. केवळ जातीच्या अंगाने जर नेमाडेंची चिकित्सा होत राहिली तर नेमका ध्रुव सापडणार नाही. एका गोष्टीकडे फक्त लक्ष वेधायचं आहे. ती म्हणजे काही गोष्टींबाबत नेमाडेंनी ठेवलेली संदिग्धता. ज्यांचा फायदा दोन्ही बाजूचे विरोधक तर घेतातच परंतु समर्थकही घेतात. कारण या समर्थकांनीच नेमाडेंना जातीवादी रूप देण्यास हातभार लावला आहे. अॅनॉलॉजिकली बोलायचे झाल्यास शंकराचार्य आणि नागार्जुन यांचं उदाहरण देता येईल. ज्याप्रमाणे हे दोघे प्रच्छन्न समजले जातात, त्याचप्रमाणे नेमाडेदेखील प्रच्छन्न समजले जातील. नेमाडेंची गोंधळात टाकणारी जी प्रच्छन्न भूमिका आहे, तिचा परामर्श घेण्यासाठी आणि सगळ्याच देशीवादासंबंधी झाडाझडती घेण्यासाठी एक दीर्घ लेख लिहायला घेतला होता. त्या लेखाचे नाव आहे ‘ट्रोजन हॉर्स’. मात्र त्या लेखाची लांबी वाढत जाऊन लेख न राहता एक संपूर्ण पुस्तकच होईल इतकी त्याची व्याप्ती वाढली म्हणून या लेख संग्रहात तो न घेता त्याचे स्वतंत्र पुस्तक करण्याचा विचार आहे.
देशीवाद काय किंवा जागतिकीकरण काय या घटना समष्टीवरूनच नीट तपासून पाहता येतात. कुठल्याही विचाराचे चिकित्सेशिवायचे पूर्ण समर्थन किंवा विरोध त्या विचाराच्या विकासासाठी आणि पुढे नेण्यासाठी खूपच घातक असतो. आपल्या भूमिका स्पष्ट होण्यासाठी विचारांची चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक असते. त्यातून क्लिष्टता संपून पुढे वाट सापडते. गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीविषयीचं माझं मत काळानुरूप पूर्ण भिन्न दिसत असेल तर दुसरं (नंतरचं) मत ग्राह्य धरावं. मलाही माझ्या संदर्भात तेच योग्य वाटतं.
.............................................................................................................................................
रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि द वर्ल्ड इज फ्लॅट – नितिन भरत वाघ
नवता बुक वर्ल्ड, मुंबई
पाने – १६०, मूल्य – १८० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3508
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
SACHIN PATIL
Sat , 24 June 2017
लेख समजायला खूप अवघड आहे.