शरदाजी पौवारांचे थोर्थोर बखरकार श्रीमंत कोकाटेचरणीं माफीपत्र
संकीर्ण - व्यंगनामा
वीस कलमी बखरकार विसाजीपंत
  • ‘विसाजीपंताची वीस कलमी बखर’ या पुस्तकाचे वसंत सरवटे यांनी केलेले मुखपृष्ठ
  • Thu , 22 June 2017
  • व्यंगनामा शरद पवार श्रीमंत कोकाटे छत्रपती शिवाजी महाराज वसंत बापट विसाजीपंताची वीस कलमी बखर

काल पुण्यात महात्मा फुले अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र चरित्राचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्त झाले. या प्रसंगी केलेल्या भाषणात पवारांनी ‘शिवाजी महाराज ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ होते, हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे’ इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांचा हवाला देत सांगितले. तसेच ‘सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश’ हे छत्रपतींच्या स्वराज्याचे सूत्र होते, शिवाजीमहाराज मुस्लीम द्वेष्टे नव्हते, असेही सांगितले. यात त्यांनी नवे काय सांगितले अशी चर्चा सोशल मीडियावर काल बरीच रंगली. मात्र खरी गोष्ट विसाजीपंतांना माहीत होती. ती त्यांनी बंद लखोट्यातून आमच्याकडे पाठविली. ती येथे देत आहोत.

.............................................................................................................................................

त्रिकालवंद्य गुरू जनीजनार्दन स्वामी यांचे चरणीं पोष्य विसाजीपंत याची विज्ञापना अैसा जे. स्वामींचे कृपापत्रात आज्ञा जालेप्रमाण आजमित्तीस हे प्रथम वर्तमान लिहौन थैली रवाना करीत आहे. पुनवडी अर्थात पुण्यनगरीस थोर्थोर बखरकार श्रीमंत कोकाटेरचित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ किताबाच्या स्वागतार्थ ऐसा थोर उच्छाव जाला की सर्व सामान्य रयतेस तो उपद्रवसमान. उच्छाव समारंभाचे खासे प्रयोजन ते येकच : शरदाजी पौवार बारामतीकर यांणी आपले मरहट्टें बिग्रेडी बखरकार श्रीमंत कोकाटेचरणीं लोटांगण घालावे ऐसा बेत तडीस नेला. हाच तो महदानंद. ऐसी घडामोडी आम्ही पामरांनी काय सांगावी? ती हकीकत शरदाजींचे जे माफीपत्र बोलले, तेयात विस्तारे करौन आली हे जाणौन माफीपत्राचा तर्जुमा करौन आपले चरणीं धाडिला आहे. या उपरी भाष्य करावे ऐसी तो पोष्य याची योग्यता नव्हे. माफीपत्र येणे प्रमाणे असे :

“राजराजेश्वर थोर्थोर बखरकार श्रीमंत कोकाटे वा जगदीश्वरो वा ऐसी जेयांची त्रिभुवनीं दुंदुभी झडत असे तेयांचे चरणीं पोष्य शरदाजी पौवार याचे उदंड दंडवत. आम्ही मंडलेश्वर मात्र असौन सार्वभौम सम्राटांची आजवरी व्हावी तैसी सेवा आमचे हातौन जाली नाही एतावता हे माफीपत्र लिहौन देतो ऐसा जे. आम्ही मरहट्टे मरौन जाऊ किंतु हटणार नाही ऐसा वृथा बदलौकिक दुनियाभर जाला असे. त्याचा लटकेपणा आम्ही आमचे जीवित्वबळें प्रकट करीताहोत. बिग्रेडी बखरकार समोर राष्ट्रवादी कांग्रेसचे बुजगबाहुले सेवकाने उभे करौन दंड थोपटल्याचे यद्यपि लळीत केले तरी कुवत आमची ती किती ते स्वामींस विदित होतेच. तेणे कारणें दिल मोठा करौन आमचा बाळपुंडावा राजेश्वरें आजवरी सहन केला. मोठाच सोशीक सोभाव दाखविला. या उपरी आमच्या धाकुटेपणाची लाज ब्रह्मांडात मावेना ऐसी वाढौन तियेच्या भाराखाली दासाची दीनावस्ता होवौन गेली. स्वामींचे प्रतापसूर्यावरी मूग गिळौन आमचे मुख मळीण मात्र जाले. थोरले जितेंद्राजी आव्हाड महाराज बुजुर्ग असामी. तेयांचा वकूब मोठा, दरारही दरोबस्त. तेयांची मात्रा जेथ चालैना तेथ वास्तविक आमच्यासारख्यांची गोस्ट ते काय. परंतु यौवनमंदें आम्ही फुंद. मशक असलो तरी मतंगजाशी जुंझावयाचा आव आणिला. डोंगरी आडौसा करौन गरजना केल्या. शेवटी फजीत पावलो. राजराजेश्वर विशाल वृषभासमान. तेयांसमोरी आम्ही मंडुकप्रमाण. फुगौन फुगौन डेरकी फुटायाचा येत्न मात्र जाहला. आपुलिया  बळे काहीच रेटेना तेव्हा उपरती जाली. हुजुरांची हांजी करणे हेचि हुजरियांचे कर्म. खाविंदचरणारविंदीं मिलिंदायमान होण्यापरती धन्यता ती दुसरी दिसेना. दैववशात योग चालौन आला. बिग्रेडी बखरकार इरेला बैसले. हालता म्हणौन येईना. वर सरकावे तरी बामनांचा पंजा पिंजऱ्याऐसा जालेला. त्याचे मागे जोर बाबासाहीब पुरंदेरवादी याचा. डावे बाजूस सरकावे तरी बहुत शह देतात. घरची प्यादी ती तमाम बिनजोर. प्रतिपक्षाचे मोहोरे तमाम जोरावर. ऐसी संधी भाग्यवशें येताच पोष्य शरदाजी पौवारें निश्चो केलासे जे ये समयीं स्वामींस जावौन मिळावे. सरकार कदरदान आहेती. सेवा रुजू करौन घेतील. परवरदिगार गरीबनवाज आहेती. शरणागतासी अभयच नोहे, उजवा काऊल देतील. ऐसे ऐसे काम करावयाचे तरी धिटावा मोठा असावा. तो मनीं धरिला. मूपनार नामे वजीर वश केला. तेयाने वकिली करौन स्वामीसी अनुकूल करौन आम्हीसी इशारा केला जे तुम्ही धर्मसिंहादि सिलेदार बारगिरांसमवेत, रुमालीं हात बांधौन हुजुरांसमोर हाजीर व्हावे. खुशमिजाज थोर्थोर बखरकार श्रीमंत कोकाटे तुम्हासी दसहजारी, लेकरा-लेकावळ्यांस पंचहजारी सरदार करतील. पोष्यास तरी हे मान्यच. पुनवडीस मजलीस भरविण्याचा मांड केला. तीन लक्ष हाशम घेवौन पातशहांचे पायी मुंडासे ठेवण्याचा मनसुबा केला. खुशमिजाज थोर्थोर बखरकार लवाजम्यानिशी येतील हा खलिता आला. शर्कराखंडेश्वरांचे खंडणीबळें मंडपही मोठा घातला. ऐसा सामान तो आमचे राजराजेश्वरापासीही नाही म्हणौन मूपनारखानें मुंडी डोलवीली. आम्ही तो एक घुंगुरटे, क्षुद्र चिलीट. किंतु अंबिका आम्हासी पावली. वाको मलबाऱ्यानेही खजिना पाताणा केला. मोठीच आरास सजवून स्वामींची मार्गप्रतीक्षा केली. तो यकायकी आभाळात नौबती झडों लागल्या. दहा दिशांत देवांची दाटी जाली. दानव-दैत्य तेही देवांचे मेळ्यात मिळौन गेले. फुलांची व्रिष्टी सुरू जाली. गंधर्वकिन्नर गावों लागले. स्वर्गींचे आबासाहेब आणि आमचेही गागाभट्ट आनंदाश्रू ढाळू लागले. मग एकच हाकारा जाला. श्री श्री श्री एक सहस्र श्री राजेश्रीया विराजित महाराजाधिराज थोर्थोर बखरकार दर्यादौलत श्रीमंत कोकाटे आ रहे हैं…खबर्दार…होशियार. इकडे माजी मंडलेश्वर पौवार शरदाजी म्हणजे अस्मादिक भूमीवरील रेणू मस्तकीं घालौन, मुखीं राष्ट्रीय हित नामें बोथी बुचाऐसी घट्ट बसवौन, राजीवेश्वरचरणीं विलीयमान जाले. ये उपरी बंडाची भाषा मुखीं येईल तर आम्हासी शंभूमहादेवाची आण असे. पूजाविधीचे वेळी तीन लक्ष मुखें आरती जाली. गागाभट्टें गतिमान लयीत सुरवात केली :

सदा सर्वदा होता स्मरण, राज्यकर्त्यांचे ओढवे मरण, यावरी मात्रा विस्मरण, हेमगर्भ सुवर्णाची ||

सोयिस्कर ते आठवावे, गैरसोयीचे विसरौन जावे, हे मर्म जेयाला ठावे, तोचि मंत्री यशश्वी ||

खुशाल करावे अनाचार, चालवावे वेडेचार, मनमानी हा आचार, असों द्यावा नित्याचा ||

मात्र येता कठोर परीक्षा, स्मरावी विस्मरण-दीक्षा, असत्य बोलौन सत्पक्षा, मेळवावे धुळीसी ||”

.............................................................................................................................................

हा लेख कवी वसंत बापट लिखित ‘विसाजीपंताजी वीस कलमी बखर’ या पुस्तकातील ‘शरदाजी पौवारांचे राजीवेश्वरास माफीपत्र’ या लेखाचे नव्याने केलेले पुनर्लेखन आहे. 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Shriniwas Hemade

Sun , 02 July 2017

'माफिपत्राचे वाचन करोनी मनास बहुत संतोष जाहला ! ऐसेची लेखन दिसामाजी कर्ते र्हावे .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......