टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नितीश कुमार, गौरीशंकर बिसेन, देवेंद्र फडणवीस, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, नायजेरियन मुलगा आणि सुप्रिया सुळे
  • Thu , 22 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नितीश कुमार Nitish Kumar गौरीशंकर बिसेन Gaurishankar Bisen देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सुनील गावसकर Sunil Gavaskar अनिल कुंबळे Anil Kumble नायजेरियन मुलगा सुप्रिया सुळे Supriya Sule

१. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा धक्का समजला जातो आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा सामना करावा, अशी भूमिका नितीश यांनी आधी घेतली होती. कोविंद बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी कधीही सरकारसाठी अडचणी निर्माण केल्या नाहीत. शिवाय, कुलगुरूंच्या निवडीलादेखील कधीच आक्षेप घेतला नाही, यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचं नितीश म्हणाले.

अरे वा, किती सुंदर आहेत ही कारणं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी! राष्ट्रीय राजकारणाची समज असलेला द्रष्टा नेता म्हणतात नितीशना ते काही उगीच नाही. कोविंद यांची उमेदवारनिवड जाहीर झाल्यावर अनेकांनी, कधी नावही ऐकलं नव्हतं यांचं, म्हणजे माणूस चांगला असणार, असं म्हणतात त्यापैकीच झालं की हेही. अर्थात, दोन डगरींवर पाय ठेवण्याची कसरत करणारा माणूस बराच काळ हुशार, चतुर, चाणाक्ष वगैरे भासला, तरी डगरींचा समतोल बदलल्यावर तोंडघशी पडतो, हे नितीश यांना माहिती असेलच.

.............................................................................................................................................

२. मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात चक्क झोप काढणं पसंत केलं. छिंदवाडामधल्या योग कार्यक्रमात या कृषिमंत्र्यांनी झोपेचा ‘योग’ साधला. योगदिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिशय उत्साहात दिसले. दोन हजार विद्यार्थ्यांसोबत त्यांनी काही योगासनेही केली. मात्र अवघ्या १० मिनिटांत कृषिमंत्र्यांचा उत्साह मावळला आणि त्यांनी चक्क झोपणं पसंत केलं. आजूबाजूची मंडळी योगासनं करत असताना कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन सोफ्यावर झोपले होते.

हा बिसेन यांच्या बदनामीचा कट आहे, दुसरं काही नाही. योगासनांमुळे माणूस कसा झटकन् रिलॅक्स होतो, याचं प्रात्यक्षिकच बिसेन यांनी दाखवलं, हे योगद्वेष्ट्या भाजपविरोधकांच्या म्हणजेच देशद्रोह्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. विचार करा, एकतर कृषिमंत्री, तेही मध्य प्रदेशासारख्या शेतकरी असंतोषाच्या होरपळीत सापडलेल्या राज्याचे, त्यांना किती टेन्शन असणार. पण, अवघ्या दहा मिनिटांच्या योगानं त्यांचं सगळं टेन्शन दूर झालं आणि निद्रासन साध्य झालं, याला कधी महत्त्व देणार आहे की नाही हा बिकाऊ मीडिया?

.............................................................................................................................................

३. नायजेरियात फेसबुकवर लाइक्स मिळवण्यासाठी एका तरुणाने एका लहान मुलाला उंच इमारतीवरून खाली फेकून देण्याची धमकी दिली. मुलाच्या बखोटीला धरून त्याने मुलाला खिडकीतून बाहेर धरलं आणि तो फोटो फेसबुक अकाऊंटवरून शेअर करून ‘या फोटोला १ हजार लाईक्स द्या, नाही तर मुलाला १५ व्या मजल्यावरून खाली फेकून देईन’ अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हा त्याचा एकट्याचा दोष नाही. लाइक म्हणजे पसंतीची दाद, शाबासकीची थाप, कौतुकाची पावती. ती मिळवण्यासाठी काहीतरी ठोस करावं लागतं, हा समजच मोडून काढला आहे आज समाजमाध्यमांनी. त्यासाठी अतिशय ओंगळ अवतारात एखादा सेल्फी काढणंही पुरेसं ठरतं आताच्या काळात. अशा स्वस्त लाइक्सची झिंग चढली की हे धंदे सुचतात. पोलिसांनी याला ३५व्या मजल्यावर उलटं पकडून तो फोटो व्हायरल करावा. लहान मुलाच्या फोटोच्या पाचपट जास्त लाइक मिळेपर्यंत त्याला खिडकीआत न घेण्याची शिक्षा फर्मावावी.

.............................................................................................................................................

४. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कुंबळे शिस्तबद्ध आहे, हेच खेळाडूंना खटकत होतं. शिस्तपालन न करणारे खेळाडूच त्याच्यावर नाराज होते आणि त्यांना त्यांच्या पसंतीचा प्रशिक्षक हवा होता, असं सुनील म्हणाला. आज सराव नाही केला तरी चालेल; बरं वाटत नाही, तर सुट्टी घ्या आणि शॉपिंग करा, असं म्हणणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा का, असा सवाल गावसकर यांनी खेळाडूंना केला. यापुढे खेळाडूंसमोर नतमस्तक तरी व्हावं लागेल किंवा अनिल कुंबळेसारखं पद तरी सोडावं लागेल, असा संदेश संभाव्य प्रशिक्षकाला यातून मिळाला आहे. ही खूपच दुःखद बाब आहे, असंही गावसकर म्हणाला.

जाऊ द्या हो गावसकर, क्रिकेटचा विद्यमान देव ज्या समितीत आहे, तीही कुंबळे यांना थांबवून अतीव उर्मट विराट कोहलीचे कान उपटू शकली नाही, यातच सगळं आलं... गंदा है पर धंदा है ये. उगाच तुमच्या काळातल्या क्रिकेटचे फंडे इथं आणू नका. तुमच्या काळापासूनच या सगळ्याची बीजं रोवली गेली आणि तुम्ही कानाडोळा करत राहिलात, हेही सगळ्यांना माहिती आहेच की. असा हंगामी उद्रेक काय कामाचा.

.............................................................................................................................................

५. राज्यात सरकारविरोधी कुणी सूर काढला की, लगेच मुख्यमंत्री त्यांना तुमची कुंडली आमच्याकडे आहे, असा धमकीवजा इशारा देतात. मुख्यमंत्र्यांना एवढीच कुंडल्या बघण्याची आवड असेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ज्योतिषी बनावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

ताई तुमचं बरोबर आहे. पण, सध्या आपलं ग्रहमान नरम आहे. कुंडली बिघडली की, भुजांमध्ये कितीही बळ असलं तरी फटका बसायचा टळत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. कुंडली निघू नये म्हणून ‘नारायण, नारायण’चा जपही करावा लागतो काहींना. तेव्हा जरा सबूर. घड्याळ नाजुक असतं... जराशा धक्क्यानेही बंद पडू शकतं, हे विसरून कसं चालेल?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......