१.
खरं तर हे अगदी नाइलाजास्तव लिहावं लागत आहे.
कारण मी काही क्रिकेटप्रेमी नाही, क्रिकेटवेडा तर अजिबात नाही…आणि ही फार अभिमानानं सांगण्याजोगी बाब आहे, असंही मला वाटत नाही. विशेषत: क्रिकेटवेड्या भारतात तर नाहीच नाही.
पण मी क्रिकेटद्वेष्टाही नाही. हा खेळ आवडत नाही, बस्स एवढंच.
मुळात क्रिकेट हा काहीसा संथ व रटाळ वाटणारा खेळ असला तरी तो प्रचंड उत्साहानं फसफसायला लावणाराही खेळ आहे. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी आणि त्यापासून दूर राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या माहोलात तुम्ही ओढले जाताच. या खेळाची एक गंमत अशी आहे की, हा खेळ तुम्हाला स्वत:ला खेळताच यायला हवा असंही नाही. तसा तो आला तर उत्तमच, पण नाही आला तरी फारसं काही बिघडत नाही. (…आणि कळायला हवा असंही नाही.) तुम्ही तो पाहू शकता. अगदी तुमच्या सोयीनुसार आणि तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं. तो जगभरात कुठेही सुरू असला तरी तुम्ही त्याचा घरबसल्या आनंद घेऊ शकता. त्यात तुमच्या बाजूनं सामील होऊ शकता. आणि शिवाय नंतर त्यावर चर्चाही करू शकता. कुणाचं काय चुकलं आणि कुणी काय गाढवपणा केला, याची उठाठेव करणं ही तर खास भारतीय परंपराच आहे.
असो.
त्यामुळे लंडनमध्ये होत असलेल्या चॅम्पियन ट्रॉफीबाबतची बातमी वाचून थोडंसं कुतूहल चाळवलं गेलं होतंच.
आणि नंतर भारत-पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना होत असल्याने थोडीशी उत्सूकताही वाढली होती. पण शेवटी रविवारी ही ट्रॉफी पाकिस्तानने भारताचा दणदणीत पराभव करून पटकावली. तेव्हाही फार वाईट वगैरे वाटलं नाही.
कोणत्याही खेळाचं हे एक वाईट असतं. सालं, त्यात कुणाला तरी जिंकावं लागतं आणि कुणाला तरी हरावं लागतं. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ कधीच एका वेळी जिंकत वा हरत नाहीत. त्यामुळे, ‘चलो, नेक्स्ट थिंग इज बेटर वे’ असं म्हणून स्वत:ची समजूत घालावी लागते.
पण भारतीय समाजमन एवढं संवेदनशील व हळवं झालं आहे की, त्यांना काही हा धक्का सहन झाला नाही. आपल्या भावनांना आवरता आलं नाही. त्यांच्या प्रक्षुब्ध मनाचा स्फोट झाला. असे अनेकांच्या अनेक प्रकारचे स्फोट हल्ली सोशल मीडिया (नावाच्या स्मशानभूमी)वर होतच असतात! त्यामुळे हाही तिथंच मोठ्या प्रमाणावर झाला. तसा तो होणंही साहजिकही होतं म्हणा! पण भारत-पाकिस्तान यांच्यामधला शेवटचा सामना व्हायच्या आधी भारतातील वृत्तवाहिन्यांनी – विशेषत: हिंदी जे काही हिडीस आणि विकृत म्हणावं असं वर्तन केलं, त्याने मात्र कुठलाही सच्चा भारतीय व्यथित व्हावा!
सध्या भारतात बेगडी राष्ट्रप्रेमाचं, अल्पसंख्याकांना हिणवण्याचं आणि गोमाता वगैरे भाकडकथांचं उदात्तीकरण करण्याचा जो राष्ट्रवादी उन्माद उचंबळला आहे, त्यात शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा द्वेषही समाविष्ट आहे. अशा शत्रू राष्ट्राकडून भारताला पराभव स्वीकारायला लागणं ही नामुष्कीच. खेळात हार-जित असते याचं किमान भान तर सर्वांनाच असतं. पण भारत-पाकिस्तान यांच्यामधल्या कुठल्याही सामन्यात राष्ट्रवादी उन्मादाला, राष्ट्रप्रेमाला उधाण येतंच. ते परवा तर खूपच आलं होतं. तिकडे इंग्लंडमध्ये या सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली होती आणि इकडे भारतात तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष टीव्हीच्या पडद्यावर खिळलं होतं!
प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला तरी आपण जिंकण्याच्या ईर्ष्येनेच खेळायचं असतं आणि ही ईर्ष्या शेवटपर्यंत टिकवायची असते! पण भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला, त्याला कुणीही या संघाला ती ईर्ष्या होती असं म्हणायला धजावणार नाही.
पण हे पहिल्यांदाच घडलं का? तर अजिबात नाही. आपल्या खेळात सातत्य न ठेवणं व अटीतटीच्या प्रत्येक सामन्यात सुमार खेळाचं प्रदर्शन करणं हे तर आता भारतीय संघाचं व्यवच्छेदक लक्षण बनत चाललं आहे.
भारतीय संघ फक्त एकाच देशाबरोबर ईर्ष्येनं खेळतो. तो म्हणजे पाकिस्तान. भारत-पाक सामने दोन्ही देशातील राजकीय पुढारी, क्रिकेटपटू आणि क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीसारखे असतात. त्यात थरारक चुरस, अटीतटीचा खेळ आणि उत्सूकता काठोकाठ भरलेली असते. त्यामुळे तो खेळ राहत नाही, तर त्याला एक प्रकारच्या युद्धाचं रूप येतं. परवाही तेच झालं.
हे असं का होतं? तर पाकिस्तान हे सख्खं शेजारी शत्रू राष्ट्र! त्याचा आपल्या बिमोड करता येत नाही. त्याच्या सीमेवरच्या आणि आपल्या देशात घुसखोरी, दहशतवादी पाठवून केल्या जाणाऱ्या उचापतीही थांबवता येत नाहीत. मग निदान खेळात, क्रिकेट सामन्यात तरी त्याचा पराभव पाहणं, हे भारतीय जनमानसाला सुखावून जातं. परिणामस्वरूप भारतीय क्रिकेट संघ हा आपल्या अस्मितेचा, मर्मस्थानाचा विषय असतो आणि क्रिकेटपटू आपल्यालेखी ‘हिरो’ असतात.
२.
भारतीय लोकांचा एक स्वभावधर्म आहे. त्यांना कुणीतरी सतत डोक्यावर घेऊन मिरवायला लागतं. त्यामुळे थोडीफार बरी कामगिरी करणाऱ्या कुणाचाही ही मंडळी उदोउदो करायला लागतात. हे सर्रास चित्र आहे. क्रिकेट तर भारतीय लोकांचा आजघडीलाही (आयपीएलने त्याचा पुरता बाजार करून टाकला असला तरीही) सर्वांत आवडता खेळ आहे. भारतीय लोक आपल्या राष्ट्रपुरुषांचं दैवतीकरण करून त्यांच्याबाबत अतिसंवेदनशील बनण्यात माहीर असतात! तसे ते आता क्रिकेटबाबतही झालं आहे. भारतीय संघ हा त्यांना त्यांच्या साऱ्या आशा-आकांक्षा पूर्ण करू शकणारी कामधेनू वाटायला लागली आहे, तर क्रिकेटपटू तारणहार! त्यामुळे त्यांनी एखाद्या सामन्यात बरी कामगिरी केली की, देशभर त्यांच्या नावानं प्रचंड जल्लोष केला जातो आणि वाईट कामगिरी केली की तेवढ्याच तत्परतेनं त्यांचा धिक्कारही केला जातो. परंतु हे दुसऱ्या क्रमाकांचे प्रसंग हल्ली वारंवार येत आहेत आणि त्यांचं स्वरूप ज्या विकृतीकडे चाललं आहे, तो काळजीचा मुद्दा आहे.
क्रिकेट आणि क्रिकेटपटू लोकांच्या फाजील अपेक्षांचे बळी होण्याची खरं तर अनेक कारणं आहेत. त्याला प्रसारमाध्यमं मोठ्या प्रमाणावर जबाबादार आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण आहे भारतीय क्रिकेटचा इतिहास. तिसरं कारण आहे ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) क्रांती. आणि चौथं कारण आहे या खेळाचे स्तुतिपाठक.
ब्रिटिशांनी आपल्या करमणुकीचं साधन म्हणून क्रिकेट भारतात आणलं. पण सुरुवातीला ते त्यांच्या क्लबपुरतंच मर्यादित होतं. भारतीयांना त्यात प्रवेश नसे. ब्रिटिशांचा क्लब व त्यातील त्यांचे खेळ हे फक्त त्यांचेच होते. पण कालांतरानं ते तसं राहिलं नाही, राहू शकलं नाही. भारतीयांना ब्रिटिशांच्या या चार भिंतीच्या आत खेळल्या जाणाऱ्या खेळाची मोहिनी पडली. त्यांनी तो उचलला. तेही हा खेळ आपल्यापरीनं खेळू लागले. यात मुंबईतील पारशी लोक आघाडीवर होते. त्यांनीच १८९५मध्ये ब्रिटिशांबरोबर पहिला जाहीर सामना खेळला. तेव्हापासून त्यात भारतीयांचा प्रवेश होऊन तो भारतात रुजायला सुरुवात झाली. पुढे हिंदू लोकांनी (१९०७) व मुस्लिमांनी (१९१२) आपले संघ या सामन्यात उतरवून ब्रिटिश-पारशी असे दुरंगी होणारे सामने चौरंगी केले.
भारतीय क्रिकेटचा इतिहास लक्षात घेताना हा घटनाक्रम व त्यावेळची परिस्थिती समजावून घेणं महत्त्वाचं आहे. नेमक्या याच काळात भारतीय स्वातंत्र्यलढ्याला चांगला वेग आला होता आणि बॅ. जीना यांच्या स्वतंत्र पाकिस्तानच्या राजकारणाची सुरुवातही याच सुमारास झाली होती. भारताच्या इतिहासात हिंदू-मुस्लिमांमध्ये फार सख्य कधीच नव्हतं. त्यामुळे क्रिकेटचे सामने चौरंगी व्हायला लागले, त्याला जनाधार मिळायला लागला, हा खेळ लोकप्रिय व्हायला लागला, तशा त्याला राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रवाद या गोष्टी जोडल्या गेल्या.
मुळात क्रिकेट हा इतर कोणत्याही खेळापेक्षा जास्त पटीनं स्वत:चं अंगभूत सामर्थ्य असलेला खेळ आहे! कारण तो एकाच वेळी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांनाही गुंतवून ठेवतो, त्यांनाही सामील करून घेतो. त्यांची उत्सूकता ताणून धरतो. उट्टं काढणं, परतफेड करणं, मानापमान, नामुष्की, आशा-अपेक्षा-निराशा अशा भावभावनांचं मिश्रण या खेळात पाहायला मिळतं. त्यामुळे प्रेक्षकही रोमांचित होतो. यामुळे क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. त्याला मोठा प्रतिसाद मिळत गेला. मग ब्रिटिशांनी भारतीयांनी आपणहून उचललेल्या या खेळाचा काहीसा फायदा घ्यायला सुरुवात केली. या खेळाला उत्तेजन द्यायला सुरुवात केली.
भारतीय क्रिकेटची सुरुवातच धार्मिक आधारावर झाली. म्हणजे पारशी, हिंदू, मुस्लीम आणि इतर विरुद्ध इंग्रज यांचे संघ. शिवाय तत्कालिन परिस्थिती – म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं राजकारण, जीनांचे अलगतावादी राजकारण यामुळे क्रिकेट हा खेळ एकीकडे सार्वजनिक होत असला तरी तो धार्मिक द्वेषांना खतपाणी घालणाराही होऊ लागला होता. कारण हे सामने प्रचंड चुरशीचे, अटीतटीचे होऊ लागले. सुरुवातीला सर्वांचा कॉमन शत्रू ब्रिटिश असल्याने त्यांच्यावर पारशी, हिंदी, मुस्लिम यापैकी कोणत्याही संघाने विजय मिळवला की, प्रचंड जल्लोष होत असे. ‘राज्यकर्त्या ब्रिटिशांचा आपण निदान खेळात पराभव करू शकतो’ या भावनेनं क्रिकेटपटूंना व क्रिकेटप्रेमींना प्रचंड स्फुरण चढत असे. या सामन्यांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होत गेलं, तशी या जल्लोषाला ‘राष्ट्रीयता’ मिळू लागली.
आणि याचमुळे हा खेळ भारतीय लोकांचा खेळ बनला. तो सार्वजनिक बनला. या खेळानं बहुतांश भारतीयांना एकत्र आणण्याचं काम केलं.
३.
राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट हे भारतीय जनमानसाचे विक पॉइंटस मानले जातात. या तिन्हींची क्रमावरी ठरवायची झाली तर ती क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण अशी ठरवावी लागते. चित्रपट पाहणाऱ्या, त्यांचं वेड असणाऱ्या भारतीयांची संख्या आजही मोठी आहे. राजकारणाबाबत मात्र दोन दृष्टिकोन दिसतात. एक राजकारण आवडणारे आणि दुसरे न आवडणारे. ही दुसरी मंडळी बहुतांशपणे सुशिक्षित असतात. आणि तीच मोठ्या प्रमाणावर राजकारणाचा तिरस्कार करत असतात. क्रिकेटबाबत मात्र असं पाहायला मिळत नाही. हा खेळ सर्वदूरच्या, सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांतल्या, सर्व जाती-धर्माच्या, वंश-पंथांच्या लोकांच्या आवडीचा खेळ आहे. या खेळाएवढा भारतीय लोकांना वेडावून टाकणारा इतर कोणताच खेळ नाही आणि त्याला पर्यायही नाही. त्यामुळे क्रिकेट न आवडणाऱ्या वा क्रिकेटद्वेष्ट्या लोकांची संख्या अगदीच नगण्य म्हणावी अशी आहे. आणि त्यांचा आवाज तर त्याहून क्षीण आहे.
त्यामुळे या खेळानं भारतीय जनमानसावर एक प्रकारची सुप्त अशी निरंकुश सत्ता मिळवली आहे. भारतीय लोकही या खेळाच्या प्रचंड आहारी गेले आहेत. मात्र हा खेळ भारतीयांना न परवडणारा खेळ आहे, असा इशारा म. म. द.वा. पोतदार यांनी १९६०साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत दिला होता. नंतर त्यांनी त्याविषयी ‘साप्ताहिक साधना’मध्ये सविस्तर लेख लिहून आपली भूमिका मांडली होती. ‘क्रिकेटच्या भ्रमातून मुक्त व्हा!’ हे त्यांच्या लेखाचं शीर्षकच पुरेसं बोलकं आहे. मात्र पोतदारांच्या इशाऱ्याकडे आजवर कुणी गांभीर्यानं पाहिलेलं नाही.
४.
या खेळाचं अंगभूत सामर्थ्य कितीही जोरावर असलं तरी त्याने केवळ त्या आधारेच भारतीय लोकांना वेडं केलं आहे, असं अजिबात नाही. त्या सामर्थ्यामुळे हा खेळ खेळणं व पाहणं यात चुरस निर्माण होते आणि तो खेळणाऱ्यांच्या व पाहणाऱ्यांच्या अंगात उत्साह संचारतो एवढंच! या खेळाशी राजकारण, समाजकारण व भारतीय जनमानस जोडलं गेल्यानं आणि मुळात हा खेळ प्रचंड खर्चिक असल्यानं त्याच्या प्रचंड पैसाही जोडला गेला. (त्याचबरोबर अनेक अनिष्ट गोष्टीही जोडल्या गेल्या आहेत. उदा. आयपीएलपासून पैशाबरोबर चीअर लीडर्सही!) याचा फायदा सर्वांत आधी प्रसारमाध्यमांनी उठवला. त्यांनी या खेळाचं थेट प्रेक्षपण करून तो शहरोशहरी, खेडोपाडी, घराघरांत आणि गल्लीबोळांत पोहचवला. तो प्रत्यक्ष मैदानावर ज्या पद्धतीनं खेळला जातो, त्यापेक्षा जास्त रंगतदार व आकर्षक केला. बारीकसारीक तपशीलानिशी घटना टिपून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सूकता निर्माण केली. चार-चार कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून एका-एका शॉटला, खेळाडूला विविध कोनांतून टिपून टीव्हीच्या पडद्यावर दाखवलं. त्यामुळे प्रेक्षकांना जगभरात कुठेही सुरू असलेला सामना बघणं शक्य होऊ लागलं. १९८०च्या दशता टीव्ही माध्यमाचं स्पेशलायझेशन होऊन चित्रपट, बातम्या, कार्यक्रम आणि खेळासाठी स्वतंत्र वाहिन्या सुरू झाल्या. त्याआधी १९७५ साली जागतिक विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. आणि १९८३साली भारतानं ही स्पर्धा अनपेक्षितपणे जिंकली. तेव्हा तर भारतीय संघ खरोखरच चिमुकला होता! त्यामुळे हा संघ ही स्पर्धा जिंकेल अशी कुणाला अपेक्षाही नव्हती. पण भारतीय संघानं ती तिसरी विश्षचषक स्पर्धा जिंकली आणि स्वत:बद्दल भरपूर अपेक्षा निर्माण केल्या. ‘मनात आणलं तर आपण जिंकू शकतो, आपल्याला अशक्य असं काहीच नाही,’ हा विश्वास या स्पर्धेनं भारतीय संघात निर्माण केला. किंबहुना तो खऱ्या अर्थानं क्रिकेटवेड्या भारतीयांत निर्माण केला. प्रसारमाध्यमांनी याचा पुरेपूर फायदा उठवून भारतीय संघ व खेळाडूंच्या प्रतिमा अवास्तव पद्धतीनं रंगवल्या. क्रिकेटपटूंना ‘हिरो’ केलं, भारतीय तरुणांचं त्यांना ‘रोल मॉडेल’ बनवलं.
आणि येथून खऱ्या गडबडीला सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांच्या आततायीपणामुळे क्रिकेटपटूंच्या प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ झाल्या. त्यांना लोकप्रियतेबरोबर जाहिरातींच्या माध्यमातून प्रचंड पैसा मिळू लागला. त्याचबरोबर ते स्वत:च्या, क्रिकेट बोर्डाच्या, जाहिरातदारांच्या आणि भारतीय जनमानासाच्या इच्छा-अपेक्षांचे बळी बनत गेले. आता तर त्यांची जाम गोची होऊ लागली आहे. या सर्वांमुळे त्यांचा खेळ दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. त्यांची गुणवत्ता वाढण्याऐवजी ढासळत चालली आहे. आजघडीला तर अशी परिस्थिती आहे की, आपल्या गुणवत्तेचा आलेख किमान स्थिर राहावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यांची सारी शक्ती जाहिरातींच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवण्यात आणि त्यासाठी आपलं संघातलं स्थान टिकवून ठेवण्यातच खर्च होऊ लागली आहे. तर दुसरीकडे क्रिकेटच्या सर्वदूरच्या प्रसार-प्रसारानं भारतीय जनमानासाच्या त्यांच्याविषयीच्या अपेक्षा अनाठायी पद्धतीने वाढत गेल्या आहेत. भारतीयांचं क्रिकेटप्रेम खूपच एकांगी होत चाललं आहे. खरं तर एखादा सामना हरल्यानंतर संघाला गरज असते ती पाठिंब्याची-आधाराची. पण भारतीय संघाच्या वाट्याला या गोष्टी आता अपवादानेही येताना दिसत नाहीत. यामुळेच कुठलाही, विशेषत: पाकबरोबरचा सामना हरल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतल्यावर त्यांचं स्वागत तर सोडाच, पण त्यांना समजावून घेण्याचाही फारसा प्रयत्न कुणी करत नाही.
५.
आता थोडंसं क्रिकेटच्या स्तुतिपाठकांविषयी.
क्रिकेटला अवाजवी महत्त्व देण्यात प्रसारमाध्यमानंतर या मंडळींचा नंबर लागतो. क्रिकेट कसं खेळावं आणि कसं खेळू नये हे यांच्याइतकं इतर कुणालाच कळत नसावं, अशा थाटात ही मंडळी बोलत\लिहीत असतात. या लोकांना टीव्हीच्या संचासमोर बसून ज्या गोष्टी दिसतात, त्या प्रत्यक्ष मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना तर कधीच कळत नाहीत! तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या सामन्यात एखाद्या खेळाडूनं बरी कामगिरी केली, चार-दोन चौकार-षटकार लगावले की, ही मंडळी त्या खेळाडूचं अख्खं ‘पुराण’च लिहून काढतात, कूळ-गोत्रासह.
या स्तुतिपाठकांमध्ये आणखी एक छोटासा गट आहे. तो आहे या खेळाची आणि जीवनाची तुलना करणाऱ्यांचा. जीवन आणि क्रिकेट या दोहोंत कसं साधर्म्य आहे, हा खेळ कसा जीवनाकडे बघावयास शिकवतो वगैरे बढाया ही मंडळी मारत असतात! क्रिकेट हा कसा अनिश्चित खेळ आहे, त्यात कोण केव्हा जिंकेल, कोण हरेल, कोण हिरो होईल, कोण झिरो होईल हे सांगता येत नाही. तो सारा योगायोगाचा आणि नशिबाचा भाग आहे. जीवन हे जसं उन-सावल्या, सुख-दु:ख, आशा-निराशा, जय-पराजय यांनी भरलेलं असतं, तसं क्रिकेटही असतं. त्यामुळे क्रिकेट हा जीवनाकडे समंजसपणे पाहण्याची दृष्टी देतं, असा सिद्धान्त ही मंडळी मांडत असतात!
वरकरणी या युक्तिवादामध्ये काही गडबड वाटत नाही. कारण त्यासाठी ही मंडळी जी उदाहरणं देतात ती खूपच आकर्षक व आपला पराभव इतरांच्या (म्हणजे नशीब, योगायोग यांच्या) माथी मारण्यासाठी सोयीस्कर अशी असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा पटकन विश्वास बसतो.
इथं प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की, मनुष्यजीवन ही एक अवाढव्य आणि सर्वव्यापी अशी बाब आहे, तर क्रिकेट हा एक छोटासा - जीवनापुढे तर किरकोळ व फुटकळ म्हणावा असा – खेळ आहे. त्यामुळे या दोन्हींची तुलना केली जाऊ शकत नाही, त्यात साम्यही दाखवता येत नाही. कारण साम्य-भेद दाखवण्यासाठी प्रतिस्पर्धी तुल्यबळ असावे लागतात. त्यांचा मूळ परीघ एक असावा लागतो. तसा तो असेल तरच त्यांच्यातील साम्य-भेदाला काहीएक अर्थ प्राप्त होतो. या कसोटीवर जीवन आणि क्रिकेट या दोन्ही पूर्णपणे विसंगत अशा बाबी आहेत.
हे समजून न घेणाऱ्यांना जीवनही कळत नसावं आणि क्रिकेटही कळत नसावं अशी साधार शंका येते.
६.
भारतीय लोक क्रिकेटचे एवढे वेडे होण्यामागे जी काही कारणं आहेत, त्यांची आतापर्यंत थोडक्यात मांडणी केली. आता शेवटचं कारण पाहू. ते आहे राष्ट्रवाद.
क्रिकेटशी राष्ट्रवाद कसा जोडला गेला आणि त्याला खतपाणी कसं मिळालं याची चर्चा यापूर्वी आलीच आहे. जगप्रसिद्ध विचारवंत एडवर्ड सैद यांनी राष्ट्रवादाची फार छान व्याख्या केली आहे. ते म्हणतात – “राष्ट्रवाद म्हणजे फाजील देशाभिमान, संकुचितपणा, परक्यांबद्दलची अनाठायी भीती आणि स्वत:बद्दलचं अतिरेकी प्रेम.” काहींना सैद यांची ही व्याख्या थोडीशी एकांगी वाटू शकते, पण आज जगभरातील अनेक राष्ट्रांत राष्ट्रवादाची वाढ ज्या पद्धतीने होत आहे, त्याकडे पाहता ही व्याख्या जास्तच यथार्थ आणि समर्पक वाटते. भारतीय क्रिकेटशी जो राष्ट्रवाद जोडला गेला आहे, त्याला तर ही व्याख्या फारच फिट बसते. भारतीय लोक राष्ट्रवादी आहेत, तेही याच अर्थानं. भारत-पाक सामने हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.
भारत-पाक सामना कुठेही खेळला जात असो, त्याला युद्धाचंच स्वरूप येतं. दोन्ही देशांतले क्रिकेटपटू लढाई खेळत असल्यासारखे खेळत असतात आणि दोन्ही देशातले क्रिकेटप्रेमी युद्ध पाहत असल्यासारखा सामना पाहत असतात! सामन्यानंतर दोन्हीकडे जे वातावरण असतं तेही युद्धानंतरच्या जल्लोषाचं वा मानहानीचं असतं!! या राष्ट्रवादाला कुठल्याही परिस्थितीत ‘विधायक’ म्हणता येणार नाही वा त्याचं समर्थनही करता येणार नाही. हा ‘अतिरेकी राष्ट्रवादा’चाच प्रकार आहे आणि यापुढील काळात तो भारताला न परडवणारा आहे.
७.
यावर उपाय काय?
भारतीय जनमानस ज्या गोष्टीचं बळी होत आहे, त्याची मीमांसा ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांनी नेमक्या पद्धतीनं केली आहे. ते म्हणतात – “झुंडीचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत आहे. झुंडीच्या आक्रमणाला होणारा विरोध हळूहळू मावळत चालला आहे. परिणामी सामाजिक समतोल बिघडत आहे. झुंडीच्या मताला पूर्वी फारशी किंमत नव्हती. राज्यकर्ते झुंडीच्या मताची पूर्वी फारशी पर्वा करीत नसत. आज दिवस बदलले आहेत. आज सगळ्यात आधी झुंडीच्या मताची दखल घ्यावी लागते. झुंडीचे मत मोडणे हे सर्व संबंधितांना आज अडचणीचे व नुकसानीचे ठरते. अनेक प्रकारच्या कल्पना आज मांडल्या जाऊ शकतात. त्यांतील काही हितकारक असतात, काही अहितकारक. परंतु त्यांचे खरे स्वरूप उघड होण्यापूर्वीच जनता त्यांच्या आहारी जाते. विचार व्यक्त करण्याच्या आड आज कोणीही व काहीही येऊ शकत नाही. झुंडींना नव्याचे आकर्षण असल्याने, कारण नवे म्हणजे प्रगितकारक असे त्यांना वाटत असल्याने झुंडी नव्या विचारांच्या बळी ठरतात. कारण कोठल्याही प्रकारच्या आवाहनांना त्या वश होतात.”
थोडक्यात भारतीय जनमानस पोकळ व उथळ विचारांचं बळी होत आहे. आपल्यापर्यंत पोहचणारी प्रत्येक गोष्ट हेच अंतिम सत्य आहे अशी त्यांची धारणा होत चाली आहे. अपेक्षा, वास्तव आणि सत्य यातला फरक ती समजून घ्यायला तयार नाहीत. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळही प्रसारमाध्यमं मिळू द्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर रोजच्या रोज थोपवले जाणारे विचार नीट पारखून घेता येणं दुष्कर होत चाललं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य काय, अयोग्य काय हे ठरवण्याचे पॅरामिटर प्रसारमाध्यमं, राजकीय पुढारी, बुवा-बाबा व तथाकथित सामाजिक विचारवंत यांनी हाती घेतल्याने, ते सांगतील तेच ‘ब्रह्मज्ञान’ अशी ‘सकळाची आनंदा’ची परिस्थिती निर्माण होऊ पाहात आहे.
यामुळे भारतीय लोक कुठल्याही गोष्टीकडे फार तटस्थ, निरपेक्ष व खिळाडूवृत्तीनं पाहू शकत नाहीत. ते विचारांपेक्षा भावनांवर जगायला लागले आहेत. आणि त्यामुळेच अतिरेकी राष्ट्रवादाचे बळी होत चालले आहेत.
त्यांनी क्रिकेटच्या भ्रमातून मुक्त व्हावं वा इतर खेळांकडे लक्ष द्यावं असं सांगण्याचा शहाजोगपणा अस्मादिकांना अजिबात करायचा नाही. कारण ते शक्य नाही हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि इतर कोणताही लोकशाही पद्धतीचा मार्ग तूर्तास तरी दिसत नाही. पण भारतीय क्रिकेटप्रेमी व क्रिकेटवेड्यांना एक करता येणं निश्चितच शक्य आहे. त्यांनी ठरवलं तर त्यांना या ‘अतिरेकी राष्ट्रवादा’च्या मानसिकतेतून बाहेर पडणं शक्य आहे. आणि तसं ते शक्य झालं तर क्रिकेटबरोबर इतरही बऱ्याच समस्या सुटण्यास मदत होईल.
८.
‘बायबल’मध्ये एक वचन आहे. त्याचा सारांश असा – “शंभर माणसं ज्या रस्त्याने चालली आहेत, त्याच रस्त्याने आपणही जाणं म्हणजे आपण योग्य मार्गाने चाललो आहोत, असं नाही.”
सुज्ञांना अधिक सांगणं न लगे, अज्ञांना काहीही आणि कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही उपयोग नसतो!
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment