परवाच्या पराभवाला जबाबदार काँग्रेस!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 20 June 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप ‌BJP RSS पाकिस्तान Pakistan काँग्रेस Congress

ज्या करंडकावर आपल्या संघाचं केवळ ना कोरायचं बाकी होतं, तो करंडक प्रतिस्पर्धी संघाने आपला मानहानीकारक पराभव करत, दात विचकत (त्यांच्या) स्वदेशी घेऊन जावा? ही अशी अतर्क्य घटना २०१७ साली घडावी? २०१४नंतर या देशात काहीच अशुभ घडलेलं नसताना इतिहासातला सोन्याचा धूर पुन्हा वर्तमानात निघून, त्या सोन्याच्या धुराची पुटं पार अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या केसांवर चढून तेही चमचमू लागले असताना हा असा पराभव? पानिपताचीही पतमानांकनात पत खाली घालवणारा हा पराभव. जिव्हारांपासून शिवारापर्यंत सर्व सुन्न झालं.

तसे पराभव काही आम्हाला नवे नाहीत. चेंडू-फळीच्या खेळात तर याची आम्हाला सवयच झालीय. जिंकणारी लढाई हरायची आणि जिंकण्याची अजिबात शक्यता नसलेली लढाई मधूनच जिंकून दाखवायची. भारतीय वेधशाळांचे अंदाज, पवारसाहेबांचे निर्णय आणि आपला क्रिकेट संघ या तिघांना ‘बेभराशी’ हे विशेषण संयुक्तपणे लागू शकतं.

तर रविवारचा पराभव. तोही शेजारी राष्ट्राकडून. बरं हा शेजारी सख्खा नाही आणि निंदक म्हणावा इतका उपयोगीही नाही. शेजारी राष्ट्र हे नुसतं शेजारी राष्ट्र नाही, तर शेजारी शत्रू राष्ट्र आहे. बरं शत्रू पण परवा प्लॉट घेतला आणि शेजारी राहायला आला आणि त्रास देत, वाढवत शत्रू शेजारी झाला, असा शत्रू नव्हे! तर सनातन शत्रू! बघताक्षणी तळपायाची आग मस्तकात जावी, तरीही मस्तक ताब्यात ठेवत ज्याचा शिरच्छेद करावा असा अखंड शत्रू! २०१४ पासून तो शेपूट घालूनच बसला होता. हूं नाही की चूं नाही. सीमेवर घुसखोरी नाही, उलट वाघा बॉर्डरवर मिठाईचे पेटारेच ठेवलेत सदैव. आपल्या सैन्यावर गोळीबार दूरच, इस्लामाबादेतून मान वळवून बघायचीही हिंमत नाही. गिरनारचा सिंह दिल्लीत वास्तव्याला आल्यापासून पार गळपटलाय शेरखान! निमूट शाल पांघरून, दिलेली मिठाई खात बसतो! अशा शोचनीय शत्रू राष्ट्राच्या अकरा लोकांनी १२५ करोड जनतेच्या हातातोंडातला घास नाक खाजवून दाखवत घेऊन जावा? स्वत:च फस्त करावा?

या शोचनीय पराभवाला, मानहानीला कारण काँग्रेस!

चेंडू-फळीचे समीक्षक, वृत्तवाहिन्यांवरचे कलपांकित अथवा विग मास्टर समीक्षक काही म्हणोत. भारताच्या जर्स्या घालून रडवेले झालेले वार्ताहर, निवेदकही काही म्हणोत. महायुद्ध बघायला बगीचा उपहारगृहात गेलेले उकळीबहाद्दर चेंडू-फळी प्रेमी, त्यांची कुटुंबं, त्यांचे लिटिल मास्टर काहीही म्हणोत, दारात विराट नि घरात अनुष्का काहीही म्हणोत, हा पराभव झाला याचं कारण काँग्रेस!

६० वर्षं या पक्षानं देशावर राज्य केलं. पण देशासाठी काही केलं? अजिबात नाही. पार खैबरखिंडीपर्यंत असणाऱ्या देशाचे तीन तुकडे केले. शिवाय काश्मीर खोरं घालवलं ते वेगळंच. संघ नसता तर जम्मूही हातचं गेलं असतं. पण ३३ कोटी देवांना त्यावेळच्या ५०-६- कोटी जनतेची काळजी होती. त्यामुळे काँग्रेस नावाच्या रावणापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला घातला. रामअवतार तो! आणि संघाने आधी जनसंघ व नंतर भाजपला जन्म दिला! त्यामुळे ६० वर्षांनी का होईना देशातून पुन्हा सोन्याचा धूर निघू लागलाय.

तर परवा नाव कोरायचा बाकी असलेला करंडक ज्यांनी मानहानीकारकरीत्या आपल्या मुलांच्या हातून हिसकावून त्यांना रीत्या हाती माघारी पाठवलं, त्या शत्रू राष्ट्राचा जन्मच मुळी काँग्रेसमुळे झालेला. आता हा शेजारी जन्मालाच घातला नसता तर तो आज मैदानात उतरला असता का? नकाशावर नसलेली गोष्ट यांनी नकाशावर आणली! किती त्रास झाला आम्हाला! आमच्या मनात, स्वप्नात एक नकाशा आणि प्रत्यक्ष शालेय पुस्तकात विखंडित नकाशा! नतद्रष्ट काँग्रेसवाले ज्याला भूमी म्हणतात ती खरं तर आमची भूमाता. मातेचे तुकडे? (कोण तो टवाळ, पशुरामाचं काय म्हणून विचारतोय? त्याला ‘मॉर्निंग वॉक’ला न्या!) तर या काँग्रेसवाल्यांनी आपल्याच घरातलं सामान, भांडीकुंडी, कपडालत्ता वर ५५ कोटी देऊन या शत्रू राष्ट्राला शेजारी बनवला. मग तो मुजोर नाही का बनणार?

आता आमचा आजचा गिरनारचा सिंह असता त्यावेळी, तर ५५ कोटी दिले असते. पण रात्री बारा वाजता त्या नोटाच बाद केल्या असत्या! अस्सा कचरा केला अस्ता ५५ कोटींचा! पण इफ्तार पार्ट्यांना लालचावलेले काँग्रेसवाले, त्यांना काय! सशस्र क्रांतिकारकांना भिवून इंग्रजांनी आपली भाऊच्या धक्क्याला लावलेली बोट नांगर काढून सपासपा पाणी कापत मायदेशी नेली, युनियन जॅक उतरवून ठेवत. आणि या काँग्रेसवाल्यांना वाटतं गांधींच्या उपोषणांना, नैतिक दबावाला बळी पडून इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेले! गांधी माणूस मोठा होता. पण चतुर बनिया होता हे विसरून कसं चालेल? बनियागिरी करत कधी त्यांनी एका वाट्याचे तीन वाटे केले, कुणालाच कळलं नाही. नेहरूंना पंतप्रधान व्हायची घाई झाली होती. ते कोटाला फूल लावून लेडी माउंटबॅटनचा ट्रे टी पित बसले होते. त्यांचं म्हणणं- तीन-चार काय करायचेत तेवढे भाग करा, मी एका भागाचा पंतप्रधान होणार बास! या देशाचं काही कळत नाही. आज साठ वर्षांनंतर चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला. ६० वर्षांपूर्वी मुलीला पत्र लिहिणारा माणूस पंतप्रधान झाला होता.

पाहिलंत का? या निमित्तानं काँग्रेसवाले त्यांचा इतिहास सांगायला लागले की नाही? आता यांचा कसला आलाय इतिहास? पहिल्या जॉर्जपासून तिकडे कसा पाचवा, आठवा जॉर्ज, तसा यांचा पहिला गांधी, दुसरा गांधी, तिसरा गांधी आणि पाचवाही गांधीच! त्यामुळे काय झालं की, शेजारी शत्रू राष्ट्राची हिंमत वाढली. त्यांना वाटलं इथं परमनंट काँग्रेस व गांधी यांच्या हातीच देश राहणार. हे कबुतरं उडवणार. तेव्हापासून आपण कबुतरं उडवली की, त्यांनी गावठी कट्ट्यानं टिपायची असं सुरू झालं. त्यातून दोन युद्धं झाली. ती जिंकली आपण, पण काँग्रेसमुळे नाही तर आपल्या शूर जवानांमुळे!

तर असे हे काँग्रेसवाले! युद्धं केली, करार केले, अलिप्तता चळवळ वगैरे फॅडं केली, पण त्यामुळे शेजारी अधिकच आक्रमक झाला. गल्लीतल्या दादाला चार गल्ली पलीकडच्या एरियातल्या भाई धमकवावा, तसं शत्रू राष्ट्र मोठमोठ्या राष्ट्रांना घेऊन आपल्याला घाबरायला लागला. आज ६० वर्षांनी बघा! जगातला असा कुठला देश नाही, जो आज आपल्या देशाकडे महासत्ता म्हणून बघत नाही. कारण आमचे आजचे प्रधानसेवक. ते देशोदेशी फिरून देशाची महासत्ता ठसवण्याच्या कामात असताना हा पराभव झाला, याला कारण काँग्रेस!

तीन वर्षं सगळं शांत होतं! ‘प्रगती’ हा एकच शब्द देशात ऐकू येत होता. चुली बंद झाल्या, गॅस आले. कंदील जाऊन एलईडी आले, वावर जाऊन संडास आले. रस्ते, पूल, मेट्रो, स्मार्ट सिटी, नवं चलन, डिजिटल व्यवहार आणि पारदर्शी सरकार. अशात तेंडुलकर, द्रविड, धोनी नसताना कोहली, शिखर, युवराज ही मुलं चेंडू-फळीत पराक्रम गाजवत होती. फळी कसली, धगधगतं खङगच ते. विजयामागून विजय मिळवत अश्वमेध चालू होता. करंडकावर नाव कोरायचं बाकी असताना या काँग्रेसवाल्यांनी शेतकऱ्यांना फूस लावून संप घडवला! ऐन परीक्षेच्या काळात लाईट व पाणी तोडलं तर मुलं अभ्यास कसा करणार? कोहली आणि मुलांचं तेच झालं. कोहली तर दिल्लीचा. त्याला डाळ किती महत्त्वाची! या लोकांनी तुरीचा मुद्दा काढून त्याचं लक्ष विचलित केलं. युवराज, शिखर पांड्या वगैरे दूधपित्या मुलांसमारे दुधाचे कॅन ओतून टाकले! कसला सराव करणार? काय खाणार? पिणार? सँडविचला ठेवला नाही यांनी टोमॅटो फेकून!

बरं शत्रू राष्ट्राला एकदा पाणी पाजून मुलं ऐटीत परतली होती. शत्रू राष्ट्र गाशा गुंडाळायच्या तयारीत होतं. पण या काँग्रेसवाल्यांनी अन्नधान्यांची एवढी नासाडी केली की, सरकारला धान्य आयात करावं लागलं. त्यात पुन्हा शत्रू राष्ट्रातून कांदे-बटाटे आयात करावे लागले. वाघा बॉर्डरवरून हे ट्रक तसे कायमच येत-जात असतात. आता मला सांगा कांदाच फांदेबाज शेजाऱ्याकडून घ्यायला लागल्यावर मुलांच्या मनावर काय परिणाम होणार? तिथूनच वांदे सुरू झाले.

पण २०१४ नंतर अपयश, पराभव, नामुष्की हे जे शब्द हद्दपार झाले होते, ते काहीही करून परत आणायचेच या हट्टाला पेटून काँग्रेसने महाराष्ट्, मग मध्यप्रदेश, राजस्थान इथं शेतकऱ्यांना बिथरवलं! बरं एकदा भारतीय संघातून खेळला की, तो खेळाडू धोट का होईना फार्म हाऊस बांधतोच! ते तो शेतकरी असल्याचा सात-बारा देऊन बांधावं लागतं. थोडक्यात ते आधुनिक फार्मरच! तर त्यांना या संपाने अशी भीती वाटली की, दूध, कांदा, टोमॅटो, भाजी रस्त्यावर टाकली तशी फार्म हाऊस तोडायला लावतील का? एकदा हे मनात आल्यावर तो साईड स्क्रीन नीट दिसेल का स्कोअर बोर्ड नीट दिसेल? शत्रू राष्ट्राला हे कळलं होतं. ते पव्हेलियनमधून येता-जाता विचारत ‘तुझी किती एकर शेती आहे?’, ‘हमीभाव मिळाला?’, ‘कर्ज माफ होणार का?’ गोंधळली ना पोरं! आयपीएलमधne पैसा कुठे गुंतवलाय तो या शेजारी शत्रू राष्ट्राला कसा कळला? त्यात तुमच्या मानधनावर जीएसटी लागणार असं पवार पुटपुटले म्हणे! तिथंच पडझडीला सुरुवात झाली!!

आता तरी येतंय का लक्षात तुमच्या, केवढं मोठं षंडयंत्र होतं या पराभवामागे? त्यात कुणी तरी सचिन तेंडुलकरला राष्ट्रपती करू शकतात हे सांगितल्याने सचिनची त्रिसदस्य समिती आणि खेळाडू, बाकी सर्व सोडून राष्ट्रपतीभवनाच्या समोर २०-२० खेळवता येतील का, याचा विचार करू लागले. त्यावेळी ती चर्चा जाता जाता ऐकणारे पवार म्हणाले म्हणे, ‘२०-२०मध्ये फार वेळ जातो. टेन ऑन टेन किंवा फाईट फॉर फाइव्ह अशी दहा किंवा पाच ओव्हरच्या मॅचेस होऊ शकतात. विजय पथावर किंवा इंडिया गेट जवळ. मानधनही वाढेल.’ झालं पुन्हा सगळे विचलित झाले.

आता पवार २०१४च्या विजयाचे भीष्म! त्यामुळे ते आपलेच वाटत असताना त्यांचं मूळ काँग्रेसमध्ये आहे हे विसरून कसं चालेल? तर काँग्रेस ७६च्या आणीबाणीचा बदला घेतेय. स्थिर सरकारं अस्थिर करायची; शेतकरी, कामगार, मच्छिमार, सरकारी नोकर सगळ्यांना उचकवतंय. त्याचा परिणाम रविवारी दिसून आला. नाव कोरायचं बाकी असलेला करंडक हातचा गेला.

काँग्रेसमुक्त भारत करूनही परत काँग्रेस कशी काय दिसू लागली पुन्हा? काय म्हणता तुम्ही? गोळ्या घालून गांधी मेला नाही, तशी काँग्रेसही मरणारी नाही? काँग्रेसने परकाया प्रवेश केलाय. सत्ताधारी काँग्रेससारखेच वागू लागलेत आणि काँग्रेस विरोधकांसारखी, यालाच गुगली म्हणतात?

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......