अजूनकाही
कणकवलीमध्ये नुकतीच युनिसेफतर्फे लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात मंजुनाथ पाचंगे याने लिहिलेला हा लेख… अभिनेता, लेखक, कवी, दिग्दर्शक आणि छायाचित्रकार असं बहुविध व्यक्तिमत्त्व असलेल्या पाचंगे यांचा हा लेख कोकणातल्या भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या गोंधळी समाजाचं दाहक वास्तव मांडतो.
……………………………………………………………………………………………
लहानपणी आईचा हात धरून भांडी घेऊन भंगार गोळा करायला जाताना, मुलं आम्हाला पाहून सुरात अगदी गाणं म्हणायची,
"तु तु तु तु तु ता रा,
तिकडून आला भंगारवाला..."
ते संपलं की लगेच सुरू व्हायचं,
"ये भंगारवाले, पंगा ना ले!"
या गाण्याचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता, नाही. कोण भंगार गोळा करताना पंगा घेतो? याला अतिशोक्ती म्हणून हसलेलच बरं...
रस्त्यावरून जाताना कोणी चिडवलं की, रस्त्यावरचा दगड उचलून भिरकावून मारायचो. आपल्या मुलाला दगड मारला तर पोलिसात देऊ वगैरेच्या धमक्या दिल्या जात. चूक नसतानाही माझेच आई-बाप माफी मागत. का? तर आपण दुसऱ्या मुलखातले म्हणून...
रा, भो, आ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या दर्दी शिव्यादेखील खाव्या लागत. लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून शिकण्याची ओढच कमी होत जायची.
उन्हातून डोक्यावर ओझं घेऊन अनवाणी पायानं चालताना पाहून कधी तरी एखादा देवमाणूस भेटायचा आणि आईला ओरड-ओरड ओरडायचा. मी मनातून धन्यवादही द्यायचो आणि दिलगिरीही व्यक्त करायचो. दुपार खूप झाली की आई भांडी ठेवायची आणि 'पोरगं भुक्याजलंय काय जेवायला असंल तर दे भाकर तुकडा' म्हणून मागून आणायची आणि पुढ्यात ठेवायची. कधी-कधी तर कपड्यांची अवस्था पाहून कुणी काही देत नसत. मग विकण्याच्या भांड्यातलं टमरेल उपयोगाला येई.
मग मला तसं खाताना आतून फार लाज वाटायची, तुटल्यासारखं वाटायचं. स्वतःच्याच जातीला आतून फार शिव्या घालायचो. अशी परिस्थिती का दिली म्हणत देवाला विनवण्या करायचो. मात्र जातीपुढं हिंदू लावतो म्हणून सुरक्षित आहोत याचा भास व्हायचा. फिरफिर फिरून झाल्यावर डोक्यावरती ओझं घेऊन तसंच थेट झोपडीपर्यंत जावं लागायचं. मला ते मिरवणूक काढल्यागत वाटे. मला झोपडीत जाण्याचं मनच व्हायचं नाही. बाबा नेहमी पिऊन लांबलचक हात करून झोपलेले असायचे. नशेमध्ये जिथं झोपायचे तिथंच मुतायचे, मग अंगभर तोच घाणेरडा ‘सुगंध’ दरवळत असायचा!
मी खरं पाहता तेव्हाच मॅच्युअर झालेलो, कारण बाबांची दारू उतरल्यावर त्यांना समजवण्याचं काम मला सोपवलं होतं. बाबा विनाकारण आईवरच भडास काढत. तिलाच शिव्या देत. त्या दिवशी तर त्याहून जास्त दारू प्यायचे. बुधवारच्या दिवशी तर सगळ्या झोपड्यांतच बेवड्यांचा नटसम्राट व्हायचा जणू. गोंधळातली गाणी काय, स्टिल-प्लास्टिकची भांडी आपटून वाजवणं काय... कधी-कधी तर दारू पिऊन बाबा रस्त्यावरच बडबडत झोपत. कधी शाळेकडे बडबडत झोपले की, मधल्या सुट्टीत बाहेर आलेली मुलं त्यांना पाहून चिडवत, दगडफेक करत. मग दारूच्या नशेत हुरूप येऊन बाबा अंगावर धाव घेत. मुलं घाबरून बाईपाशी तक्रार करायची. त्या विषयावरून पेटलेली भांडणं आजही आठवणीतून गेलेली नाहीत.
एकदा तर चोरीचा आरोप लावून बाबांना चप्पलेनं बाजारातून पोलिस ठाण्यापर्यंत मारत नेण्याचं प्रकरण घडलं होतं. तरी परिस्थितीशी दोन हात करून आईनं कसंबसं बाहेर काढलं.
कोणाच्या घरातलं काही हरवलं की भंगारवाले, कोणाची सायकल गेली की भंगारवाले हेच समीकरण आजही बनलं आहे. साऱ्या भंगारवाल्यांचं प्रेम फक्त रात्रीच्या गप्पापुरतंच मर्यादित. जो कोण मदतीला येत असेल तर तो फक्त स्वतःच्या स्वार्थापायीच येतोय असंच समजणं योग्य.
नवरा दारू पितोय म्हटलं की देवाला जाणं, मुलाला बरं नसलं की ताबिज बांधणं, धंद्याला बरकत नसली की गाऱ्हाणं घालणं, याही गोष्टी स्वार्थासाठी घडत. माझ्या आईनेही मला स्वार्थासाठीच शिकवलं होतं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. जी अवस्था माझ्या बालपणी होती, ती आजही झोपड्या-झोपड्यांत पाहायला मिळते... स्वतःच्या स्वार्थापायी मुलांना मोठं होताना बघणाऱ्या आईची संघर्षयात्रादेखील अशीच सुरू असते. विशेषतः स्त्रिया शिकल्या नसल्या तरी पाच-सहा मुलांना सांभाळत ही संघर्षाची गाडी चालूच असते.
कोकणात पसरलेले जवळपास ९७ टक्के भंगारवाले हे गोंधळी समाजाचे आहेत. पूर्वीचा घोडे घेऊन, त्यावर ओझं टाकून गावोगावी फिरून मागतपण करून, गोंधळ घालून पोटाची खळगी भागवणारा हा समाज. आज सर्वत्रच लोप पावत गेलेल्या लोककलेमुळे नाइलाजाने आसरा म्हणून कोकणपट्ट्यात कुठे झोपड्या बांधून तर कुठे वस्त्या टाकून तर कुठे वर्षानुवर्षं एकाच ठिकाणी पाहायला मिळतो.
या समाजातील महिलांची परिस्थिती अतिशय गंभीरच म्हणावी लागेल. अशिक्षितपणामुळे कित्येक मुलींचे बालविवाहदेखील होतात. या समाजात आजदेखील जात पंचायत भरवली जाते. त्यामध्ये पंच, नाईक, पाईक असा तीन ज्येष्ठांना न्याय देण्याचा मान असतो. कोणी समाजाविरुद्ध लग्न केलं की वाळीत टाकणं, जातीतल्या जातीत पळून लग्न केलं की मांडीवर चिलिमाचे चटके देणं, आपली प्रतिष्ठा खराब होईल म्हणून देवीला बकरं बळी देणं वगैरे प्रकार आजही पाहायला मिळतात.
यातल्या कित्येक महिला डोक्यावरचा पदरही कधी खाली पाडत नाहीत. अगदी १५-१६ वर्षाची लग्न झालेली मुलगी सुद्धा साडीमध्ये आणि डोक्यावर पदर घेतलेलीच पाहायला मिळेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे बायका नशीबाला आलेलं ओझं म्हणत, भांडी आणि भंगाराच्या व्यवसायात नकळतपणे मास्तरकी बजावतात. परिस्थिती आणि रूढी परंपरेमुळे या समाजातील महिला जेमतेम दुसरी किंवा तिसरी-चौथीच शिकलेल्या असतात. कोकणात वसलेला हा समाज ९९ टक्के भंगार व्यवसायच करताना आपल्याला आढळतो.
या गुंफलेल्या वेटोळ्यातून मुक्त होऊन मुळात महिलांना जगायचं आहे. परंतु जोपर्यंत लादलेले समाजाचे नियम मोडकळीला येत नाहीत, तोपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा भाग अर्थहीनच म्हणावा लागेल. बालावस्थेतच विवाहित झालेल्या महिलांचे ७०-८० टक्के नवरे व्यसन करताना दिसून येतात. त्यावर मारहाण, संशय घेणं, माहेरी पाठवणं, वंशाचा दिव्याकरता सतत पत्नीला गरोदर करणं, असे प्रकार विशेष करून पाहायला मिळतात. उदा. चार-पाच मुली जरी झाल्या तरी मुलगाच हवा याचा अट्टहास असतो.
यातला बराच समाज विचारांनी मागासलेला आहे.
मुळात भारत हा अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि जातीव्यवस्थेत अडकल्यामुळे उच्चनिचतेची फॅशन अंगीकारली गेलीय.
तशीच दयनीय अवस्था या समाजातून दिसून येते.
manjunathpachange3@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Tue , 20 June 2017
Atyanta dahak wastav, netki mandani