अजूनकाही
१. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन कान टोचल्यानंतर शिवसेना नरमेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच सेनेनं भाजपवर जाहीर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत, आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. मात्र, आम्हाला मध्यावधीचे काय होणार यापेक्षा काश्मीरचे काय होणार? याची जास्त चिंता असल्याचे सांगून सेनेनं भाजपला खोचक टोला लगावला आहे.
शिवसेनेचं नामांतर ‘टाइमपास सेना’ असं करायला काय हरकत आहे? सत्तेत राहून सत्तेतल्या जोडीदाराला विरोध हा जो काही पायावर कुऱ्हाड मारण्याचा अद्भुत उद्योग सुरू आहे, त्यातून या पक्षाबद्दल काही मोजक्या मराठी माणसांच्या मनात उरलेलं उरलंसुरलं प्रेमही संपून जाईल. इकडे यांना महाराष्ट्रात शेजारच्या राज्यातले लोक आलेले, राहिलेले चालत नाहीत आणि इथं बसून थेट काश्मीरची चिंता. तिकडे शाखा काढा, सत्तेत जा आणि चिंता वाहा. प्रादेशिक संकुचितवाद्यांना राष्ट्रीय बाणा शोभत नाही.
……………………………………………………………………………………………
२. वर्ल्ड हॉकी लीग सेमिफायनल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सुपडा साफ करून टाकला. पाकिस्तानच्या संघाला तब्बल ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत करून टीम इंडियाने या स्पर्धेतली आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.
ज्या कोणा क्रीडापत्रकाराच्या लेखणीतून ही बातमी उतरली आहे, त्याच्यावर बिचाऱ्यावर क्रिकेटमधल्या भारताच्या विजयानंतर करायची ‘सुपडा साफ’ वगैरे पाकिस्तानविषयक ‘अलंकारां’ची पखरण हॉकी सामन्यावर करायला लागली आहे. चँपियन्स ट्रॉफीची मॅच भारत जिंकला असता, तर हॉकीतला हा मोठा, दणदणीत विजयही कोपऱ्यात फेकला गेला असता. काही लोकांनी बॅटी तासून हॉकीस्टिक बनवण्याची चित्रं एकमेकांना पाठवली खरी; पण, त्या स्टिक्सनेही हे लोक दोनच दिवसांत पुन्हा क्रिकेटच खेळू लागतील. आपल्याला समाज म्हणून दुसऱ्या कशात रसही नाही आणि गतीही नाही.
……………………………………………………………………………………………
३. पाकिस्तानी टीव्हीसाठी काम करणाऱ्या झैनाब अब्बास या पत्रकार महिलेबरोबर ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते अशी एक अंधश्रद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत, ते खेळाडू शून्यावर तरी बाद झाले आहेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. रविवारच्या सामन्याआधी युवराज सिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अरे देवा, म्हणजे आपल्या देशात बीसीसीआयचा क्रिकेट संघ जिंकावा म्हणून जे यज्ञयाग-होम हवन केलं गेलं, त्यातल्या सगळ्या पुण्यसंचयाला एका पाकिस्तानी तरुणीचा अपशकुन भारी पडला... म्हणजे तिचा धर्म आपल्या धर्मापेक्षा पॉवरफुल आहे की काय? ओह माय गॉड!!!
……………………………………………………………………………………………
४. गायींचा देखभाल निधी उभारण्यासाठी पेट्रोलवर एक रुपयाचा अधिभार लावण्याची कल्पना भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी ‘गौरवशाली भारतीय गाय’ या परिषदेत मांडली. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात सैन्याच्या खर्चासाठी स्त्रियांनी हातातल्या सोन्याच्या बांगडय़ा काढून दिल्या होत्या. गायींच्या संरक्षणासाठी तर सर्वच जण मदत करतील, असंही त्यांनी सांगितलं. दूध व पुनरुत्पादनाची क्षमता संपलेल्या गायी सांभाळणं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. मात्र या गायींचं मूत्र तसंच शेणापासून उत्पादनांची निर्मिती करून तसेच इतर गायींचं दुग्धोत्पादन वाढवून शेतकऱ्याला भाकड गायीही सांभाळणं कठीण जाणार नाही, असं परिषदेतील विविध सत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी सांगितलं.
बैलबुद्धीचा (म्हणजे सरकारी भाषेत गो-पुत्र हो!) आणखी एक आविष्कार. त्यासाठी सुब्रम्हण्यन स्वामींना चीनच्या युद्धाचा दाखला देण्यातही कसलीही भाडभीड वाटत नाही, यात आश्चर्य नाही. असली संमेलनं भरवणाऱ्या गो-पुत्रांनी दोनपाच आया ऐपतीनुसार सांभाळायला घ्याव्यात. घरी नेऊन त्यांचं शेणमूत काढावं. यातले जे शहरी गणंग मोठ्या सोसायट्यांमध्ये राहतात, त्यांनी आवारातच गोशाळा काढण्याची कल्पना मांडून पाहावी. यांच्यातले काही बिल्डरही आहेत. त्यांनी आपल्या आरामदायी, शाही निवासी प्रकल्पांमध्ये एकेका गोठ्याची व्यवस्था करावी फ्लॅटगणिक.
……………………………………………………………………………………………
५. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने या विजयाबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन केलं आहे. मिरवाईजच्या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मिरवाईज सीमारेषा का ओलांडत नाही? तुला तिथं चांगले (चायनीज) फटाके मिळतील? ईद तिथं साजरी केली जाते. मी तुम्हाला सामानाची बांधाबांध करण्यात मदत करेन,’ असं प्रत्युत्तर गौतम गंभीरने केलं.
गौतमने इतक्या गंभीरपणे क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं तर? गड्या, मिरवाईज आणि त्याच्या राज्यातल्या अनेकांना सीमा ओलांडून पलीकडे जाण्याऐवजी आमचीच बहुसंख्या आहे, असं दाखवून सीमाच अलीकडे आणायची इच्छा आहे. त्यांना तो सल्ला दिलास तर ते म्हणतील, मित्रा, आमचंही तेच म्हणणं आहे. आपण चिडून अशी प्रतिक्रिया द्यावी, म्हणूनच कोणी टोचणारं वक्तव्य करतं, तेव्हा आपण त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नसतं.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment