अजूनकाही
आम्ही मराठीचे कट्टर पुरस्कर्ते असलो तरी आम्हा दोघां पत्नी-पतीची पार्श्वभूमी मात्र केवळ मराठीची नाही. मी मूळचा मराठवाड्यातील. १९४७साली देश ब्रिटिशांच्या जोखंडातून स्वतंत्र झाला तरी सप्टेंबर १९४८ पर्यंत आमचा मराठवाडा निझामाच्याच अंमलाखाली होता. आमच्या पिढीपर्यंत शिक्षणातही उर्दू माध्यम होतं. माझी आई नर्स होती आणि तिची जिथं पोस्टिंग असे तिथं आमचं शिक्षण सुरू राहिलं. चौथी-पाचवीपर्यंत आम्ही मुलं संध्याकाळी मराठीच्या गुरुजीकडे ‘परवचा’ म्हणून उर्दू शिक्षकांकडे ‘अलीफ-बे’ म्हणायला रोज जात असू. नंतर उर्दू माध्यम बंद झालं (उर्दूविषयी अजूनही प्रेम वाटतं. ती भाषा शिकायची राहिली याची आजही खंत आहे.) आणि अभ्यासक्रमात उर्दू एक भाषा विषय राहिला. तरी अजूनही आमच्या पिढीच्या बोलण्यात अधूनमधून एखादा खास ‘मराठवाडी लहेजा’ असलेला एखादा उर्दू शब्द येतोच. उर्दूची कसर पुढे हिंदीच्या अनेक परीक्षा देऊन मी भरून काढली.
माझी पत्नी मंगला विंचुर्णे ही अस्सल नागपुरी; म्हणजे अगदी ‘बॉर्न अँड ब्रॉट अप धंतोलीकर!’ नागपुरी हिंदी पार्श्वभूमीवर ती पदव्युत्तर शिक्षण मराठीत घेती झाली. तिला शिकवणाऱ्यांत मुक्तिबोध, ग्रेस, सुरेश डोळके वगैरे होते. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात यमुनाताई शेवडे यांच्या हाताखाली रविवार पुरवणीचे काम पाहत असल्याने तत्कालिन बड्या मराठी साहित्यिकांत तिची चांगली उठबस होती. तिचं मराठी आणि इंग्रजी वाचन अफाट होतं, आजही आहे. तिचं इंग्रजी इतकं चांगलं की, कोणतीही महत्त्वाची इंग्रजीतील बातमी किंवा लेख मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी मंगलवर असायची आणि हे भाषांतर इतकं हुकमी असायचं की, त्या लेखकाने तो मजकूर मूळ मराठीतच लिहिला असणार आणि त्याचा इंग्रजीत अनुवाद झाला असणार याची खात्री वाचकांना व्हायची!
आमचे ‘सूर’ जुळत असतानाच मराठीसाठी जी काही आंदोलनं नागपुरात उभी राहत होती, त्यात मी आघाडीवर होतो. आघाडीवर कसला? मी तर त्या चळवळीचा एक मुख्य सूत्रधार होतो आणि आघाडीवर होते ते डॉ. भाऊसाहेब कोलते, राम शेवाळकर, भास्कर लक्ष्मण भोळे, मनोहर असे मान्यवर. त्यामुळे मराठी भाषा चळवळीला धार होती आणि विश्वासार्हताही. या चळवळीचे आम्ही तरुण आणि सडेफटिंग चौघे-पाच सूत्रधार अक्षरश: पेटलेलो होतो. मराठीचं भवितव्य आपल्याच हाती, आपणच मराठीचे ‘उध्दारकर्ते’ अशी आमची ठाम धारणा तेव्हा होती! महत्त्वाचं म्हणजे, आपण जरी मराठीसाठी आग्रही असलो आणि लढे उभारत असलो आणि अन्य भाषांचा द्वेष करायचा नाही हे भान या आघाडीवरील मान्यवरांना होतं. तेच भान आम्हालाही आलं. शिवाय मराठी भाषा आणि संस्कृती कशी ऐश्वर्यशाली आहे हे या सर्व मान्यवरांकडून उमगलं. मी आणि मंगलाने विवाह करण्याचा निर्णय घेतला घेतला, तेव्हा आमची पार्श्वभूमी मराठवाडी मराठी, उर्दू, नागपुरी हिंदी, वैदर्भीय मराठी, तसंच इंग्रजी, अशी बहुपेडी आणि समंजस होती. तरी आम्ही कट्टर मराठीवादी होतो.
‘मराठीच्या तथाकथित उद्धारकर्त्या’ असलेल्या आम्हा त्या सडेफटिंग सर्व तरुणांची साधारण एकाच वेळी लग्नं झाली आणि साधारण आगेमागे सर्वांना मुलं झाली. आम्हाला मुलगी झाली. सायली तिचं नाव. आधीच ठरल्याप्रमाणे आम्ही तिचं प्राथमिक शिक्षण मराठीत करायचं ठरवलं. माझ्यासोबतचे ‘मराठीचे उद्धारकर्ते’ त्यांच्या मुला-मुलीना ‘नर्सरी’त प्रवेश घेऊन आणि ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’चे बोल आणि ‘मम्मा-पप्पा’ या हाका ऐकायला मोकळे झाले! आम्ही मात्र मराठी ‘बालवाडी’चा शोध घेत होतो. जिथं शिक्षक मराठीत बोलतात, मराठीतून पाढे, बडबड आणि बालगाणी शिकवतात, संस्कृत श्लोक म्हणवून घेतात, रामायण-महाभारत, इसापनीतीतील गोष्टी सांगतात अशा नर्सरी नव्हे तर बालवाडीचा आम्हाला शोध होता.
तेव्हा आम्ही बजाज नगरला राहत होतो. जीव अगदी मेटाकुटीला आल्यावर एक दिवस आम्हाला हव्या असलेल्या बालवाडीचा शोध अगदी घराजवळ लागला. काखेत कळसा आणि गावाला वळसा असा हा प्रकार होता! अत्रे नावाच्या बाई ते शिशु मंदिर चालवत असत आणि ती बालवाडी अस्सल मराठी होती. सायलीचे मराठी बोल ऐकून आमच्या इमारतीतील अन्य तिघा-चौघांनीही मग अत्रे शिशुमंदिरचा पकडला. अत्रेबाईची बालवाडी संपल्याबरोबर सोमलवार शाळेत सायलीला विनासायास प्रवेश मिळाला. इंग्रजी शिक्षणाचा खर्च परवडत नाही, वगैरे मुद्देच आमच्यासमोर नव्हते. मराठी माध्यमातील शाळांचा दर्जा इंग्रजीपेक्षा कमी असतो असे कातडीबचाऊ प्रश्नही आम्हाला पडले नाहीl. ते ढोंग आमच्या आसपासही कुठं नव्हतंच.
एक विषय नव्हे तर पूर्ण मराठी माध्यम हेच आमचं प्राधान्य होतं आणि ते का आहे हे आम्ही सायलीला सतत समजावून सांगत असू. तेव्हा आमचं तिला म्हणणं किती कळलं हे तिलाच ठाऊक! प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सायलीनं पूर्ण मराठीत घेतलं. त्या काळात मी रिपोर्टिंगला आणि मंगला उपसंपादक होती. त्यामुळे आमच्या कामाच्या वेळा भिन्न असत. माझी दुपार साधारण मोकळी आणि घरी यायची वेळ रात्री उशिरा; तीही अनिश्चित, तर लेक दिवसा शाळेत आणि संध्याकाळी घरी. मी येईपर्यंत ती झोपी गेलेली असे आणि मी उठेपर्यंत ती शाळेच्या वाटेवर असे. त्यामुळे आम्ही तिघं एकत्र असू रविवार दुपारनंतर. तिचं शुभंकरोती, परवचा मला रविवारीच ऐकायला मिळे.
‘सात सक्कम किती?’ किंवा ‘त्रेचाळीस म्हणजे हाऊ मच ?’ किंवा ‘आस्वाद म्हणजे काय?’, ‘हाऊ टू स्पेल स्वीकार?’ किंवा ‘बाबा, हाऊ मम्मा प्रिपेअर थालीपीठ?’ किंवा ‘अभ्यंगस्नान म्हणजे काय रे बाबा’ किंवा घराला लागून असलेल्या दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा अर्थ काय? असे काही चारचौघांत अडचणीत आणणारे हिडगे ‘मिंग्लिश’ प्रश्न सायलीकडून आमच्यावर कोसळले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, सोमलवार शाळेत इंग्रजी एक भाषा विषय म्हणून चांगला घोटून घेतला जात असे.
शिवाय याच दरम्यान एक चांगली बाब घडत होती. मराठी आणि हिंदीसोबतच आमच्या घरात ३ इंग्रजी वृत्तपत्रं येत. आमच्यासोबत ती इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याची सवय सायलीलाही हळूहळू अगदी आपसूक लागली. इंग्रजी-मराठी, मराठी-इंग्रजी असे चार-पाच तरी शब्दकोश आमच्या बैठकीत सोफा आणि टीपॉयवर किंवा इकडे-तिकडे कायमच आरामात पहुडलेले असत (आजही असतात! आता ही संख्या दहाच्या वर गेलीये, इतकाच काय तो फरक.) आणि आम्ही त्यांचा सढळ वापर करत असूत. ती सवय सायलीला लागली. मराठीसारखीच इंग्रजी वृत्तपत्रं ती चौथी पाचवीत असतानापासून सहजपणे वाचू लागली, अडचण भासली तर आमच्यासारखेच शब्दकोश हाताळू लागली... या सवयीने तिला इंग्रजी फिक्शनकडे केव्हा वळवलं हे आम्हाला कळलंच नाही!!
आमच्या कौंटुंबिक ग्रुपमधील किंवा माझ्याकडे येणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकारी, एक्सप्रेस ग्रुपमधील घरी येणारे मुंबईचे जाहिरात किंवा वितरण विभागाचे बडे अधिकारी यासारख्या कोणाहीसोबत इंग्रजीतून बोलताना तिला अवघडल्यासारखं वाटलं नाही. किंबहुना तिची इंग्रजी संवादातली ती सफाई पाहून तिचं शिक्षण मराठी माध्यमातून सुरू आहे यावर समोरच्याचा सांगूनही विश्वास बसत नसे. अगदी कवी ग्रेस, भास्कर लक्ष्मण भोळे, डॉ.अभय बंग, राम शेवाळकर, माधव गडकरी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी नंतरच्या काळात कुमार केतकर, महेश एलकुंचवार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत मराठीत बोलताना तिला घाम फुटला नाही!
आमच्या घरात असलेल्या सर्वभाषक वाचनानुकूल वातावरणाचा फायदा सायलीला झाला. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठीत घेऊनही तिच्यात कोणताही न्यूनगंड किंचितही कधीच निर्माण झाला नाही. (मराठीतून शिक्षण घेतलं मुलांत की, न्यूनगंड निर्माण होतो. त्याला/तिला इंग्रजीची भीती वाटते किंवा शिक्षणात मूल मागे राहण्याची शक्यता असते, असा भ्रामक भयगंड निर्माण करणाऱ्या समाजात आपण राहतो म्हणून हा उल्लेख अगदी जाणीवपूर्वक केला आहे.)
हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यम घेण्याचा निर्णय सायलीने घेतला, तेव्हा आम्ही मुळीच विरोध केला नाही. कारण निर्णय घेण्याच्या कळत्या वयात ती आलेली होती, आमची भूमिका तेव्हा मार्गदर्शकाची झालेली होता. हायस्कूलच्या प्रवेशाच्या मुलाखतीसाठी ती एकटी शाळेत गेली आणि अस्सखलित इंग्रजीत मुलाखत देऊन आली. पुढे महाविद्यालयीन आणि नंतर एमबीएसाठी प्रवेश घेताना केवळ एकदा आईची लाभलेली सोबत हा अपवाद वगळता ती एकटीच सर्व प्रवेश प्रक्रियांना सामोरी गेली. नंतर नोकरीसाठी मुलाखत आणि कंपनी निवडतानाही ती एकटीच होती. मराठीत शिक्षण घेतल्यानं तिचा आत्मविश्वास कुठेही डळमळीत झालेला नव्हता, अजूनही झालेला नाही. आता एका अस्सल इंग्रजाळलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकाराच्या पदावर काम करताना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात पक्का झालेला मराठीचा तिचा पाया हे तिचं अतिरिक्त भांडवल आहे. मराठी भाषा-संस्कृती तिला मुळातून बऱ्यापैकी माहिती आहे. ती माहिती इंग्रजीत सांगणारी तिच्या ग्रुपमधील ती एकटी आहे आणि त्यामुळे ग्रुपमध्ये साहजिकच तिचा ‘रुबाब’ अर्थातच जादा आहे! मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी आणि पुढे जाऊन सिंधी भाषकाशी प्रेमविवाह केल्यानं सिंधी, अशा पाच भाषा तिच्या पोतडीत जमा झालेल्या आहेत. मातृभाषेवर प्रेम करताना इतर भाषांचा द्वेष नको हा संस्कार मराठीनं तिच्यावर केला असल्यानं तिच्यात भाषेबाबत एक स्वाभाविक उदारपण आलेलं आहे!
(या आमच्या प्रयोगाचा उल्लेख ‘न उरला ‘म’ मराठीचा!’ या ब्लॉगमधे केल्यावर अनेकांनी त्याबाबत विचारणा केली. नेमकं काय केलं याबाबत उत्सुकता दाखवली म्हणून हा लेखनप्रपंच. मराठी अभ्यास केंद्र, मुंबईच्या एका प्रकाशनासाठी केलेल्या मजकुराचा हा विस्तार आहे.)
लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment