'माचीवरला बुधा' : रूपेरी पडद्यावरील उत्तम निसर्गचित्र
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'माचीवरला बुधा'चं पोस्टर आणि त्यातील नायक
  • Sat , 17 June 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie माचीवरला बुधा Machiwarla Budha गो. नी. दांडेकर G. N. Dandekar सुहास पळशीकर Suhas Palshikar

प्रख्यात लेखक गो. नी. दांडेकर यांची 'माचीवरला बुधा' ही कादंबरी एकेकाळी खूप गाजली होती. गोनीदांना त्यांच्या भ्रमणकाळात एका दुर्गम माचीवर 'बुधा' नावाची व्यक्ती सापडली आणि 'माचीवरला बुधा' या कादंबरीचा जन्म झाला. त्यामध्ये 'बुधा'चं जिवंत शब्दचित्र होतं. काळाच्या दृष्टीने दोन पिढ्यांचं अंतर पडल्यामुळे हे 'शब्दचित्र' रूपेरी पडद्यावर साकारणं तसं खूप अवघड काम होतं, मात्र दिग्दर्शक विजयदत्त लोळे यांनी हे आव्हान स्वीकारलं. 'बुधा'च्या रूपाने पडद्यावर एक उत्तम निसर्गचित्र साकारण्यात त्यांना यश आलं आहे. निसर्गाशी एकरूप झालेला हा 'माचीवरला बुधा' मनोहारी आनंद तर देतोच, शिवाय व्यवहारी जग आणि निसर्ग यांच्यातील फरक स्पष्ट करून निसर्गाचं मोठेपणही सिद्ध करतो.

गोनीदांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला हा 'माचीवरला बुधा' नेमका आहे तरी कोण आणि त्याचं पडद्यावरील 'व्यक्तिचित्र' कसं असेल याची उत्सुकता लागून राहिलेली असल्यामुळे 'बुधा'चं आकर्षण आणखी वाढतं. वास्तविक बुधा हा गावाकडचा एक साधासुधा माणूस. सुरुवातीला तो मुंबईत आपल्या मुलाकडे राहत असतो. मात्र शहरी जीवनात त्याचा जीव रमत नाही म्हणून तो आपल्या गावाकडे परत येतो आणि दुर्गम भागात उंच डोंगरावर असलेल्या एका वस्तीत आडबाजूला स्वतःचं एक खोपटं बांधून त्यात राहतो. आल्या दिवसापासूनच बुधा निसर्गालाच 'सोबती' मानतो आणि झाडाला 'झाडोबा' संबोधून 'निसर्गसेवक' बनतो. आजूबाजूचे डोंगर, नद्या-नाले, वृक्ष-वेली एवढंच नव्हे तर वेगवेगळे पक्षी, प्राणी यांना जिवलग 'मित्र' मानून त्यामध्ये तो इतका रमतो की, व्यवहारी जगापासून दूर गेल्याचा त्याला ठायीठायी आनंद होतो. बुधा या निसर्गात म्हणजे आपल्या वेगळ्या दुनियेत रममाण झाला असतानाच मुंबईहून अचानक एके दिवशी त्याचा मुलगा त्याला पुन्हा मुंबईत घेऊन जाण्यासाठी येतो. पुन्हा मुंबईला परत जायचं आणि व्यवहारी जगात सामील व्हायचं या विचाराने अवघडलेला बुधा मुलाचा आग्रह नाकारून तिथंच राहणं पसंत करतो (हा प्रसंग पडद्यावर छान रंगवण्यात आला आहे) आणि निसर्गाशी आणखी जवळीक वाढवतो. आणि शेवटी वार्धक्यामुळे थकलेला बुधा आपला देह निसर्गाच्याच हवाली करून मुक्ती मिळवितो.

बुधा या व्यक्तिरेखेप्रमाणेच या चित्रपटात 'निसर्ग' ही आणखी एक (अदृश्य) व्यक्तिरेखा आहे. निसर्गाची ही व्यक्तिरेखा प्रभावी करण्यात छायालेखक अनिकेत खंडागळे व योगेश कोळी यांना चांगलं यश मिळालं आहे. प्रत्येक फ्रेममध्ये हा निसर्गाविष्कार फार सुंदरपणे चित्रित करण्यात आला आहे. बुधाने आपल्या घरासभोवती 'मित्र' म्हणून गोळा केलेले चिमण्या आणि इतर पक्षी, खारुताई, शेळी आणि प्रत्येक क्षणी त्याला सोबत करणारा त्याचा सर्वांत लाडका 'टिप्या' हा कुत्रा. घरासमोर असलेली 'आवळी' ही पात्रं चित्रपटातील इतर मानवी पात्रापेक्षा जास्त प्रभावी ठरली आहेत. बुधाचे पक्षी आणि प्राण्यांवरील प्रेम दर्शवण्यासाठी दाखवलेले 'विविध पक्षी स्वतः गात असलेलं गाणं' ही कल्पना तर अफलातून आहे. 'बुलबुल', 'सुतार', 'कोकीळ' आदी पक्ष्यांचा पक्ष्यांच्या कंठातील आवाज असलेलं हे गाणं चांगलं आणि श्रवणीय झालं आहे. निसर्गाचा हा आनंद किती मोठा असतो याचं प्रत्यंतर या गाण्यातून मिळतं. अतिशय मेहनतीनं हे गाणं स्वरबद्ध केल्याबद्दल संगीतकार धनंजय धुमाळ हे अभिनंदनास पात्र आहेत. 

चित्रपटात पक्षी आणि इतर प्राणी जशी प्रभावी पात्रं ठरली आहेत, त्यामानाने बुधाखेरीज इतर मानवी पात्रं मात्र तेवढी प्रभावी नाहीत. ती सारीच नवखी वाटतात. 'फुला' (स्मिता गोंदकर) ही घरगुती औषध देणारी तरुणी एक-दोन प्रसंगातच दिसते. तिची व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. वस्तीवरील गाई-गुरे राखणाऱ्या मुलांचे ड्रेस शहरी मुलांप्रमाणे कसे चकचकीत असतात, हाही प्रश्न चित्रपट पाहताना पडतो.

सुहास पळशीकर या ज्येष्ठ अभिनेत्याने 'बुधा'ची भूमिका चांगली रंगवली आहे. पक्षी आणि प्राण्यांवर त्यांनी व्यक्त केलेलं प्रेम, निसर्गाच्या सानिध्यात जीव हरखून गेल्यामुळे झालेला आनंद, त्यांचा लाडका टिप्या (कुत्रा) वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर झालेलं दुःख, जंगलात 'वणवा' पेटल्यानंतर झाडं जळताना पाहून होणारी तडफड, वृक्षतोड होऊ नये म्हणून जिवाच्या आकांतानं केलेले प्रयत्न, त्यांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे व्यक्त केले आहेत. मात्र बुधाचं शब्दचित्र लक्षात घेता त्यांचे शब्दोच्चार (आणि काही प्रसंगातील पेहरावही) काही वेळा खटकतात. शेवटचा प्रसंग हृदयद्रावक असला तरी बुधाचा देह निसर्गाशी एकरूप करण्याची दिग्दर्शकाची कल्पना चांगली असल्याने तो प्रभावीपणे वठला आहे.

थोडक्यात, कॅमेऱ्याच्या साहाय्याने रूपेरी पडद्यावर चितारलेलं एक उत्तम 'निसर्गचित्र' पाहायचं असेल तर हा चित्रपट अवश्य पाहावा.  

……………………………………………………………………………………………       

माचीवरला बुधा - गो. नी. दांडकेर

मृण्मयी प्रकाशन, पुणे

पाने - १२०, मूल्य - १२५ रुपये.

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3503

……………………………………………………………………………………………

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......