पटकथा लेखक साहित्यिक असतात का?
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 17 June 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar स्किप्ट हे साहित्य आहे Is a script Literature नागराज मंजुळे Nagraj Manjule फँड्री Fandry मेघना पेठे Meghana Pethe नातिचरामि Naticharami

प्रख्यात पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर त्यांच्या भाषणांमधून आणि मुलाखतींमधून एक महत्त्वाचा मुद्दा मांडत असतात. जावेदसाहेबांच्या मते ते स्वतः लेखक तर आहेतच. त्यामुळे ते साहित्यिकही आहेत आणि त्यांचं साहित्यामधलं योगदान म्हणजे त्यांनी चित्रपटांसाठी केलेलं लिखाण आहे. चित्रपटासाठी लिहिलेली कथा-पटकथा हा साहित्याचा भाग होऊ शकतो का, हा एक सनातन वादाचा मुद्दा आहे. म्हणजे कादंबरी, कथा, लघुकथा, कविता, ललितलेख इ. ज्याप्रमाणे साहित्याचे प्रकार मानले जातात, तशी चित्रपटाची कथा-पटकथा मानली जात नाही हे उघडच आहे. पण चित्रपटाची कथा-पटकथा ही वर उल्लेखित साहित्यिक प्रकाराप्रमाणेच सृजनशील लिखित निर्मिती आहे. मग त्याला साहित्याचा दर्जा का नको, असा प्रश्न उद्या कुणी विचारला तर त्याचं उत्तर काय असावं? हा प्रश्न जसा गुंतागुंतीचा आहे, तसंच त्याच उत्तरही गुंतागुंतीचं आहे. या प्रश्नाच्या उत्तराला होकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. 

चित्रपटाची पटकथा ही चित्रपटाची 'ब्ल्यूप्रिंट' आहे असं मानलं जातं. चित्रपट हे मुळात दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटाची पटकथा हा चित्रपट निर्मितीमधला महत्वाचा असला तरी फक्त एक टप्पा आहे. चित्रपट बनवणं हे एक टीम वर्क आहे. शेकडो लोक या निर्मिती प्रक्रियेत गुंतलेले असतात. कथा -पटकथा लेखक हा चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत योगदान देणाऱ्या शेकडो लोकांपैकी एक. या उलट साहित्याचे जे इतर फॉर्म असतात, त्यांची सृजनशील प्रक्रिया ही बहुतेक वेळा एकट्या माणसाची आहे. म्हणजे एखादा लेखक कथा लिहिताना किंवा एखादी कादंबरी हातावेगळी करत असताना एकट्याने हे काम करत असतो. त्या अर्थाने ही प्रक्रिया खूप वैयक्तिक असते. पटकथा लिखाणात तुम्ही एकटे राहून काम करू शकत नाही. साहित्य निर्मितीमध्ये लेखक हाच 'कॅप्टन ऑफ द शिप' असतो. चित्रपटनिर्मितीमध्ये दिग्दर्शक हा 'कॅप्टन ऑफ द शिप' असल्यामुळे चित्रपटनिर्मितीच्या सगळ्याच विभागांमध्ये दिग्दर्शकाचा शब्द हाच शेवटचा शब्द असतो. हा पटकथा निर्मिती प्रक्रिया आणि इतर साहित्य निर्मिती प्रक्रियेमधला सगळ्यात मोठा फरक आहे. पटकथेच्या निर्मिती प्रक्रियेचा उद्देश हा ती वाचकांनी वाचावी या उद्देशाने झालेला नसतोच. चित्रपटाच्या दृकश्राव्य माध्यमासाठी एक फाउंडेशन तयार करणं हा त्याचा उद्देश असतो.

सध्या हॉलिवुडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा प्रकशित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अर्थात तो पण प्राथमिक अवस्थेत आहे. आपल्याकडे पटकथा लेखन हे क्षेत्रच एवढं दुर्लक्षित आहे की, चित्रपटनिर्मितीशी प्रत्यक्ष संबंध असणाऱ्या लोकांनाही पटकथा वाचण्यात फारसा रस नसतो. आमिर खानसारखे काही तुरळक अपवाद वगळता कोणी नट पटकथा वाचण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे उद्या आपल्याकडे 'मुघले आझम', 'शोले' किंवा 'दंगल'चा स्क्रीनप्ले पुस्तकरूपात प्रकाशित झाला तर किती वाचक ते विकत घेऊन वाचतील याबद्दल शंका आहेत. काही बॉलिवूड पोर्टल्स भारतीय चित्रपटांना वेगळं वळण देणाऱ्या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या संकेतस्थळांवर प्रकाशित करायला लागले आहेत, हा एक स्वागतार्ह बदल आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन चित्रपट बघू इच्छिणाऱ्या किंवा चित्रपटाचं गांभीर्याने विश्लेषण करू पाहणाऱ्यांची एक मोठी सोय त्यामुळे झाली आहे हे खरं. पण पुन्हा त्या पटकथांचा वाचकवर्ग अतिशय मर्यादित आहे हे मान्य करावं लागेल.

पटकथा या वाचनासाठी लिहिल्या जात नाहीत तर चित्रपटनिर्मितीमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बनवल्या जातात. त्यामुळे वाचनमूल्य किंवा साहित्यनिर्मितीचा जो मुख्य उद्देश असतो, त्याच्या निकषांमध्ये पटकथा बसत नाहीत हेच खरं. पटकथा लेखकाला पटकथेत मनाप्रमाणे बदल करण्याचं स्वातंत्र्य नसतं. दिग्दर्शक किंवा काही केसमध्ये निर्माता हा पटकथेत शेवटी काय राहील यासंदर्भात अंतिम शब्द असतो. इतर साहित्यांच्या फॉर्ममध्ये लेखक हाच अंतिम शब्द असतो. मोठमोठ्या प्रकाशन संस्थेमध्ये तिथले संपादक लेखकाला त्यांच्या लिखाणाच्या खर्ड्यात बदल सुचवतात. पण ते बदल करायचे किंवा नाही करायचे याबद्दल लेखकाची ठाम मतं असतील तर असे बदल करण्याचे बंधन त्याच्यावर लादता येत नाही. हा अजून एक महत्त्वाचा घटक. 

पण पटकथा लेखन हे शेवटी एका लेखकाची कलात्मक अभिव्यक्तीचं असतं हे अमान्य करून चालणार नाही. ती कितीही डेडलाईनला बांधलेली गेलेली असली, जरी सर्वसामान्य वाचकाशी जोडलेली गेली नसली आणि खुद्द लेखकाचा शब्द इथं अंतिम नसला तरी ती शेवटी एका लेखकाची कलात्मक अभिव्यक्ती आहेच.

साहित्याची व्याख्या आणि साहित्याचे निकष या प्रांतात दरवेळी जायची गरज आहेच का? मला आठवतं 'नातिचरामी'च्या प्रकाशनानंतर तिचा नेमका फॉर्म कुठला, यावर जड साहित्यिक चर्चा झडल्या होत्या. त्यावर लेखिका मेघना पेठे यांनी साहित्याला कुठल्या तरी 'फॉर्म'मध्ये अडकवल्याशिवाय आपल्याला चैन का पडत नाही, असा प्रतिसवाल केला होता. हा घटनाक्रम अनेक वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात वाचला होता. त्यामुळे तपशिलात काही गल्लत असल्यास चूक भूल द्या घ्या. पण मूळ मुद्दा हा की कुठल्याही क्षेत्राचे काही निकष असणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा प्रमाणाबाहेर बाऊ केला जाऊ नये. काही काही पटकथा दर्जाच्या बाबतीत इतक्या उच्च पातळीवरच्या असतात की, त्या कुठल्याही साहित्यिक कलाकृतीला स्पर्धा देऊ शकतात. रजत कपूरच्या 'आंखो देखी'च्या पटकथेचं उदाहरण इथं घेता येईल. 'आंखो देखी'च्या पटकथेच्या मागचा अनवट विचार, त्याचे संवाद आणि एकूणच वीण एवढी घट्ट आहे की, दाद दिल्याशिवाय राहवत नाही. रजत कपूर हा दिग्दर्शकच चित्रपटाचा लेखक असल्याचा हा परिणाम असावा. अशा अनेक चित्रपटाच्या पटकथा या साहित्यिक मूल्य याबाबतीत उच्च दर्जाच्या आहेत. नागराज मंजुळेच्या 'फॅन्ड्री'ची पटकथा पण अशीच असावी. दुर्दैवाने मराठी चित्रपटांच्या पटकथा प्रकाशितही होत नाहीत किंवा त्या ऑनलाईनही उपलब्ध नाहीत. आपल्या बॉलिवुडच्या सहकाऱ्यांकडून मराठी इंडस्ट्रीने हे शिकायला हवं. 

चित्रपटाची पटकथा 'लिटरेचर' आहे का, यासंदर्भात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करता येतात. पण मुळातच किती पटकथा लेखकांना स्वतःला साहित्यिक म्हणून घेण्यात रस असेल, हाही प्रश्न आहेच. पण समजा उद्या चित्रपट लेखनाला उद्या साहित्य म्हणून दर्जा मिळालाच (तो कोण देणार आणि कसा देणार या तपशिलात तूर्त जायचं टाळून) तर ते चित्रपट क्षेत्राच्या आणि साहित्य विश्वाच्या फायद्याचं असेल हे नक्की. चित्रपटांच्या पटकथेचं प्रकाशन आणि त्यासंदर्भात वितरणव्यवस्था व अर्थव्यवस्था उभी राहिली तर त्याचा एकूणच मराठी साहित्यविश्वाला फायदाच होईल असं वाटतं. 

……………………………………………………………………………………………

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Chandrakant Kamble

Wed , 28 June 2017

good.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......