अजूनकाही
१. इंग्लंडच्या रणभूमीवर चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी पाकिस्तानी संघाचा सेनापती अर्थात कर्णधार सरफराज अहमद याच्यावर ‘मॅच फिक्सिंग’च्या संशयाचे काळे ढग दाटून आले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आमिर सोहेल यानं तसा संशय व्यक्त केला आहे. सामना कुणी जिंकून दिला हे विचारू नका. ‘दुआ’ आणि ‘अल्ला-ताला’ने सामना जिंकून दिला आहे. सामना जिंकून देण्यात कुणाचा हात आहे, हे मी आता सांगणार नाही. यात तू काही कमाल केली नाहीस, हे सरफराजला सांगण्याची गरज आहे, असं म्हणून सोहेलनं पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळावरच शंका उपस्थित केली आहे. तुमचं डोकं ठिकाणावर राहू द्या. डोक्यावर बसण्याची गरज नाही. तुमची पात्रता काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. तोंड बंद ठेवून आपलं काम करा. काही चुकीचं करत असाल तर ती चूक दाखवून देणं हे आमचं काम आहे, असं सोहेलनं सरफराजसह पाकिस्तानी संघातील खेळाडूंना सुनावलं आहे.
दुआ आणि अल्लाताला ही बेटिंगच्या नव्या बादशहांची नावं आहेत की, जुन्याच बादशहांची नवी नावं? भारत आणि पाकिस्तानात पहिली लढत झाली, तेव्हाच तिच्यात काय होणार, हे लोकांना माहिती होतं आणि इंग्लंड-पाकिस्तानच्या लढतीत पाकिस्तान जिंकलं, तेव्हा भारत-बांगलादेश लढतीचा निकालही समजला होता... हा सगळा पैशाचा खेळ होऊन बसलेला आहे. तरीही, हे सगळं गांभीर्याने पाहणारे प्रेक्षक आहेत, त्यांना शुभेच्छा!
……………………………………………………………………………………………
२. राज्य सरकारकडून जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या दहा हजार पुस्तिका छापण्यात येणार आहेत. राज्य सरकार त्यांसाठी तब्बल ४.५ कोटी रुपये खर्च करणार आहे. दीनदयाळ उपध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले आहेत. केंद्र सरकार हे वर्ष ‘गरीब कल्याण वर्ष’ म्हणून साजरं करत आहे. त्याअंतर्गत राज्य सरकार या पुस्तिका छापणार आहे. ४०० ग्रंथालयांमध्ये या पुस्तकांचे वाटप केले जाईल. या पुस्तकांमध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचे वर्णन करण्यात आले आहे. हे पुस्तक वाचून ग्रामीण भागांमधील गरीब मुलांना प्रेरणा मिळेल, असं सरकारचं म्हणणं आहे.
गरिबांच्या कल्याणाचा हा थोर मार्ग आहे. एकतर प्रकाशन, छपाई, वितरण आणि त्यावरची निर्णयप्रक्रिया या क्षेत्रांमधल्या काही गरिबांची गरिबी या पुस्तकामुळेच दूर होईल. शिवाय उपाध्याय हे गरिबीतून मोठे होऊन नामवंत उद्योगपती बनलेले असल्याने त्यांच्या चरित्रातून गरिबांना गरिबीबाहेर पडण्याची प्रेरणाही मिळेल... नव्हते का ते उद्योगपती? गरिबीतून श्रीमंत तर झालेच असतील? अर्रर्र... पण, जन्मशताब्दी आहे ना, ती साजरी होणं महत्त्वाचं. इतके दिवस कार्यक्रम सुरू असूनही कोणालाही त्यांच्याविषयी काही माहिती नाही, ती होणं महत्त्वाचं. काही प्रकारच्या दारिद्र्याचं निर्मूलन अवघडच असतं एकंदर.
……………………………………………………………………………………………
३. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी वेगवेगळी नावं चर्चेत येऊ लागली आहेत. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अजूनही कोणालाही याचा थांगपत्ता लागून दिलेला नाही. लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुर्मू या आदिवासी नेत्या, सरसंघचालक मोहन भागवत, शरद पवार यांच्या यादीत आता ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांचे नाव अचानक चर्चेत आलं आहे.
राष्ट्रपतीपदासाठीच्या स्पर्धेत आता इतक्या नावांचा गिल्ला सुरू झाला आहे की, दिल्लीच्या हायफाय वर्तुळात ‘अरे भाई, अभी तक आपका नाम नहीं लिया किसीने प्रेसिडेंट के लिए? मेरा तो बिजू जनता दलवालोंने कब का सजेस्ट कर रखा है’ असं म्हणून एकमेकांना हिणवतात म्हणे. राष्ट्रपतीपदासाठी नाव चर्चेत नसलेल्या माणसाला पार्टीला बोलावत नाहीत आजकाल.
……………………………………………………………………………………………
४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मुस्लिम गट असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे (एमआरएम) अयोध्येत आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झालेल्या मुस्लिमांनी गाईचे दूध पिऊन उपवास सोडला. आम्ही गोमांस खाणार नाही, असा निर्धारही मुस्लिमांनी या इफ्तार पार्टीत व्यक्त केला. गाईचे दूध आरोग्यासाठी उत्तम असून, त्यामध्ये वैद्यकीय गुण आहेत, हे मुस्लिमांनी मान्य केले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि मंचाचे आश्रयदाते इंद्रेशकुमार यांनी सांगितले.
आता हे सर्वज्ञानी इंद्रेश कुमार एखाद्या दिवशी संकष्टीचा उपवास बीफ चिल्ली फ्राय खाऊन कधी सोडतायत, ते पाहायला हवं. ज्या गायीच्या दुधापासून शेणमुतापर्यंत सगळं पवित्र, तिचं मांस अपवित्र ठरवणं हा गोमातेचा अपमान नाही का? इंद्रेश कुमार यांनी मेघालयातल्या हिंदूंसाठी असाच एखादा कार्यक्रम आयोजित करायला काय हरकत आहे?
……………………………………………………………………………………………
५. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत आल्या-आल्याच शहा यांनी थेट शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. पार्कातील या 'खेळी'नं त्यांनी शिवसैनिकांना खिशात टाकल्याची चर्चा आहे.
शिवसैनिकांना शिवसेनेचे सगळे नेते असेही गृहीत धरत असतात आणि ‘तुमचा वडापाव, आमचा कोहिनूर’ असं वागवत असतात. त्यात आता बाहेरच्यांचीही भर पडलेली दिसते. शिवसैनिकांनी आपल्या भावनांची खिसापाकीटं सांभाळायला शिकण्याची गरज आहे, नाहीतर कायम त्यांच्यातून विविधरंगी जाकिटांची भर होत राहते.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment