टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उद्धव ठाकरे, ई. श्रीधरन, सरस्वती, नितेश राणे आणि खजुराहो
  • Thu , 15 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray ई. श्रीधरन E. Sreedharan सरस्वती Saraswati नितेश राणे Nitesh Rane खजुराहो Khajuraho

१. ‘आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढू’, हे वाक्य सर्वाधिक बोलण्याचा विक्रम केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, असं काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं असून त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’कडे तसं रीतसर पत्रही पाठवलं आहे. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. आपल्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावं, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

आता यावर गिनीजकडून अपेक्षित उत्तर पुढीलप्रमाणे : आपलं पत्र पावलं. मात्र, तत्पूर्वी, आता मी काँग्रेस सोडलीच, असा आविर्भाव आणून पत्रकार परिषद घ्यायची आणि त्यात देशाच्या हितासाठी काँग्रेसचाच हात बळकट करणार असल्याचं सांगायचं, असं सर्वाधिक वेळा केल्याबद्दल कोणा एन. टी. राणे यांच्या नावावर विक्रम नोंदवण्यासाठी छाननी सुरू आहे. तो नोंदवला की याकडे वळू. धन्यवाद, निलेशजी (इतकी वर्षं राजकारणात राहूनही निलेश कोण आणि नितेश कोण हे भल्याभल्यांना समजत नाही, हाही एक विक्रमच आहे. नोंदवताय का?)
……………………………………………………………………………………………

२. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला फाटा देण्यासाठी मुख्यमंत्री मध्यावधी निवडणुकीचे मनसुबे आखत असतील तर ते आम्ही उधळून लावू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपकडे मध्यावधी निवडणुकांसाठी एवढा पैसा असेल तर तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा. त्या मोबदल्यात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल. मात्र, कर्जमाफी टाळण्यासाठी मध्यावधी निवडणुका घ्यायचे मुख्यमंत्र्यांचे मनसुबे असतील, तर ते यशस्वी होऊ देणार नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं.

‘निवडणुकांसाठी एवढे पैसे असतील तर’ या वाक्यातला दर्द समजून घ्या. नोटबंदीमुळे ‘सामान्य माणसा’चं जे काही कंबरडं मोडलंय, ते सरळ व्हायचं नावच घेत नाही. मध्यावधी निवडणुकांचा स्टंट टाळायचा तर दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला लागेल किंवा त्यांच्या सरकारला पाठिंबा द्यायला लागेल. त्यांची वाईट अवस्था आहे खरी, पण ती इतकीही वाईट नसावी.

……………………………………………………………………………………………

३. भारताची सांस्कृतिक ओळख असलेल्या खजुराहो मंदिरातील शिल्पांवर मध्य प्रदेशातील बजरंग सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. खजुराहो मंदिरातील आक्षेपार्ह शिल्पं आणि मंदिराच्या परिसरात कामसूत्र पुस्तक विकण्यावर बंदी घालावी, अशी मागणी बजरंग सेनेनं केली आहे. या प्रकरणी बजरंग सेनेकडून छत्तरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गायीबैलांबरोबरच माकडांनाही ‘अच्छे दिन’ आलेले दिसतायत सध्या. खजुराहोच्या मंदिरातली शिल्पं कोरणाऱ्या कारागिरांचे हातही तोडले असते या वानरांनी पूर्वलक्ष्यी प्रभावानं. यांच्या मातापित्यांनी कोणती पौराणिक छद्मवैज्ञानिक पद्धत वापरून यांना कामक्रीडेविना जन्माला घातलं असेल, याचं संशोधन करायला पाहिजे गर्भवतींसाठी पुस्तिका काढणाऱ्या दिल्लीतल्या स्वघोषित संस्कार मंत्रालयाने. काय करावं, हे एकवेळ कळलं नाही, तरी चालेल; काय टाळावं, हे मात्र कळायलाच हवं.

……………………………………………………………………………………………

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोचीतील मेट्रोचं उद्घाटन होत असताना केंद्र सरकारने ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांना निमंत्रित केलेलं नाही. ई. श्रीधरन यांनी नुकतीच कोची मेट्रोची पाहणी केली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद निर्माण करण्याचं काहीच कारण नाही. निमंत्रण न दिल्याने मी निराशा झालेलो नाही. पंतप्रधानांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे.’

सुरक्षा? अहो, शत्रुसंहारक सर्जिकल स्ट्राइक्सच्या ५६ इंची छातीच्या जन्मदात्याला साक्षात् कळिकाळाचंही भय नाही. विषय सुरक्षेचा नाही. मुळात, २०१४आधीच्या अंध:कारपर्वात काहीतरी उभं राहिलं आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच कुणीतरी काहीतरी तयार केलं आणि देशात एक बुलेट ट्रेन मॅन असताना कुणीतरी वेगळाच ‘मेट्रो मॅन’ आहे, अशा अफवांचा प्रसार व्हायला नको, या अर्थानं ती सुरक्षा आहे.

……………………………………………………………………………………………

५. स्टेटस सिम्बॉल म्हणून बीफ खाणाऱ्या लोकांना खरं तर भरचौकात फाशी दिली पाहिजे. तेव्हा त्यांना गोमातेचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, हे समजेल, असं खळबळजनक वक्तव्य हिंदू जनजागृती सभेत सरस्वती यांनी केलं आहे. याबाबत आपण केंद्र सरकारला विनंती करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. महिलांचं ‘लव्ह जिहाद’पासून संरक्षण करण्यासाठी हिंदूंनी घरात शस्त्रांचा साठा करून ठेवावा, असंही त्या म्हणाल्या. हिंदू जनजागृती समितीतर्फे गोव्यात आयोजित चार दिवसांच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. आधी हिंदूंनाच हिंदू करायचं आहे. सध्या हे आपल्यासमोरील मोठं आव्हान आहे, असं त्या म्हणाल्या.

या बाईंचा ‘साध्वी’ असा उल्लेख केला गेला आहे मूळ बातमीत. त्या शब्दाच्या मूर्त विटंबनांमध्ये ही आणखी एक भर. यांना प्राथमिक शिक्षण वगैरे देतात की हिंदू मदरशांतच शिकतात या? फाशी दिलेल्या माणसाला गोमातेच्या रक्षणाची महती बहुधा नरकात वगैरे कळेल. आंतरधर्मीय प्रेमविवाहात कोणी जबरदस्तीने कोणाला पळवून नेत नाही; मग शस्त्रांनी भेंडी चिरायची की नखं कापायची? हिंदूंना हिंदू केलं पाहिजे, हे हिंदू जीवनपद्धतीचा मूलभूत अर्थच न कळलेली आणि या जीवनपद्धतीच्या वैविध्याला नख लावायला निघालेली एक प्राथमिक शिक्षणवंचित महिला सांगते आहे, हे उदाहरणार्थ थोर आहे.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......