अजूनकाही
मार्च महिन्यापासून ‘आजचा सुधारक’ हे विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मासिक बंद झाले. १० जून रोजी नागपुरात त्या निमित्ताने एक कार्यक्रमही झाला. तीन वर्षांपूर्वी या मासिकाने रौप्य महोत्सवी वर्षांत पर्दापण केलं होतं. त्यावेळी ‘मी मराठी Live’ या दैनिकात लिहिलेल्या लेखाचं हे पुनर्मुद्रण.
……………………………………………………………………………………………
अलीकडच्या काही वर्षांत वर्तमानपत्रांच्या खपाचे आकडे वाढत असले, तरी साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं, त्रैमासिकं यांची संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातल्या नियतकालिकांची अवस्था तर अजूनच बिकट झाली आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पोस्ट खात्याचा सर्वाधिक फटका या नियतकालिकांना बसत आहे. केवळ वेळेवर अंक न पोहोचण्यामुळे अनेक नियतकालिकं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा दुर्धर परिस्थितीत ‘आजचा सुधारक’ या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या आणि ‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक’ असा लौकिक असलेल्या मासिकानं रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करावं, ही खचितच कौतुकास्पद गोष्ट आहे; पण याची फारशी दखल महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांकडून घेतली जाण्याची शक्यता नाही. आज सर्वच क्षेत्रातला विवेक हरवत चालला असताना, ‘आजचा सुधारक’सारख्या गंभीर मासिकाची दखल घेतली जाणं, हे स्वाभाविकच म्हणायला हवं. अर्थात, त्याची फिकीर या मासिकाच्या संपादक मंडळालाही नाही. ते आपले काम इमानेइतबारे करत आहेत.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि. य. देशपांडे यांनी ‘आजचा सुधारक’ हे मासिक एप्रिल- १९९०मध्ये सुरू केलं. सुरुवातीला त्याचं नाव ‘नवा सुधारक’ असं होतं. गोपाळ गणेश आगरकर यांच्या ‘सुधारक’ या साप्ताहिकापासून प्रेरणा घेऊन हे मासिक सुरू करण्यात आलं. (पाच-सहा वर्षांपूर्वी र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचंही पुनर्प्रकाशन सांगलीहून डॉ. प्रदीप पाटील यांनी सुरू केलं आहे.) डिसेंबर-१९९० पासून त्याचं नाव ‘आजचा सुधारक’ असं करण्यात आलं. आगरकरांच्या ‘सुधारक’चा समकालीन नवा अवतार असलेल्या या मासिकात विवेकवादी तत्त्वज्ञानाचा सर्व बाजूंनी चर्चा-ऊहापोह केला जाईल, असं देशपांडे यांनी पहिल्या संपादकीयात म्हटलं होतं, तर एप्रिल- १९९८मध्ये संपादक म्हणून निवृत्ती स्वीकारताना त्यांनी लिहिलं होतं, “मासिकाचं स्वरूप विवेकवादी आहे. केवळ विवेकवादाला वाहिलेलं दुसरं मासिक महाराष्ट्रात नाही, असं मला वाटतं. मासिकाने आपलं वैशिष्ट्य टिकवून ठेवावं. त्याचा कटाक्ष श्रद्धेचा उच्छेद, विचार आणि जीवन यात विवेकावर भर देणं, जीवनाच्या विविध क्षेत्रांत समंजसपणा, विवेकीपणा अंगी बाणेल असे प्रयत्न करणं, यावर असावा. लोक पूर्ण इहवादी होतील, अशी आशा करणं भाबडेपणाचं होईल; पण तरीही विवेकवाद जितका वाढेल, तितका वाढविण्याचा प्रयत्न करावा... मासिकाचं धोरण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी राहिलं आहे. सर्व मानव समान आहेत, त्यात स्त्रियांचाही समावेश आहे, तसेच त्यांचा विज्ञानावर भर असावा. वैज्ञानिक दृष्टी अंगी बाणेल, असा प्रयत्न करावा. विज्ञानाच्या विकृतीपासून सावध राहावं.”
त्याच धोरणानुसार, या मासिकाची आजपर्यंतची वाटचाल राहिली आहे. गेल्या २५ वर्षांत या मासिकानं कितीतरी विषय हाताळले. नागरीकरण, शेती, शिक्षण अशा अनेक विषयांवर विशेषांक काढले. नुकतीच http://aajachasudharak.in या नावानं बेवसाइटही सुरू केली आहे. त्यावर अंकातील लेख स्वतंत्रपणे आणि संपूर्ण अंक पीडीएफ स्वरूपात वाचता येतो; पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, या मासिकाची वर्गणीदारसंख्या २५ वर्षांनंतरही हजाराचा आकडा ओलांडू शकलेली नाही; पण केवळ वर्गणीदारांची संख्या वाढण्यासाठी अंकाचा दर्जा खाली आणण्याची वा त्यात रंजकता आणण्याची क्लृप्ती वापरण्याची गरज कधी संस्थापक, संपादकांना वाटली नाही आणि त्यानंतरच्या संपादकांनाही. त्यावरून या मासिकाचे आजवरचे सर्वच संपादक अल्पसंतुष्ट आहेत किंवा मिजासखोर आहेत, असं काहींना वाटू शकतं आणि ती खरीच गोष्ट आहे. गंभीरपणे काम करणाऱ्यांना, विवेकवादाला प्रमाण मानणाऱ्यांना आपल्या पाठीमागे फार लोक येणार नाहीत, असं वाटलं तर फारसं आश्चर्य नाही. आज तसं घडणं हे महदाश्चर्य ठरू शकतं.
याचा अर्थ पूर्वी महाराष्ट्राची परिस्थती फार चांगली होती असं नाही. १९व्या-२०व्या शतकातही विवेकवादाचा-उदारमतवादाचा वारसा अंगिकारण्याची जीगिषा बाळगणाऱ्यांची संख्या कमीच होती; पण तेव्हा त्याची चाड असणारा छोटा का होईना, एक वर्ग अस्तित्वात होता. आता तर तो पूर्णपणे नाहीसा झाला असावा, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. समाजाच्या कुठल्याच समूहात, गटात, वर्गात, पंथात विवेकवाद शाबूत आहे, असं म्हणण्याची सोय राहिलेली नाही.
२००४ साली ‘आजचा सुधारक’चा १५वा वर्धापन दिन साजरा झाला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना बोलावलं होतं. त्या वेळी ते म्हणाले होते, “आजचा सुधारक हे नियतकालिक वाचेपर्यंत विवेक आणि विवेकवादाशी आपला काहीही संबंध नव्हता. विवेकवादाने जगणं आज अशक्य नाही; परंतु कठीण मात्र झालं आहे.”
तेंडुलकरांच्या म्हणण्याला आता दहा वर्षे झाली आहेत. परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. सर्वसामान्य जनतेकडून विवेकवादाची फारशी अपेक्षा करता येत नाही; पण महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजाकडून तरी थोड्याफार विवेकवादाची अपेक्षा करायला फारशी अडचण पडू नये; पण महाराष्ट्रातील हा वर्ग आजघडीला सामाजिक नीतिमत्तेच्या दृष्टीनं इतका बेबंद आणि संकुचित झाला आहे की, ज्याचं नाव ते. सामाजिक नीतिमत्ता हा विषय परंपरा, आदर्श आणि प्रेरणा यांच्यावर अवलंबून असतो, असं त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात. ते पुढे लिहितात की, समाजहितासाठी स्वत:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावणं म्हणजेच सामाजिक नीतिमत्ता होय.
सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाज ज्याला म्हणता येईल, तो समाज हा नेहमी मध्यमवर्गच असतो आणि हाच वर्ग समाजाचं पुढारपण करत असतो; पण महाराष्ट्रातील मध्यमवर्गाचे गेल्या २५ वर्षांतले प्राधान्यक्रम या गतीनं आणि रीतीनं बदलत गेले आहेत, त्यावरून या वर्गाला समाजहिताची किती चाड आहे, याचा आलेख सहजपणे दिसून येतो. उदारीकरणानंतर या वर्गाची ज्या झपाट्यानं वाढ झाली, ती स्तिमित करणारी आहे. ठोकरता येईल तेवढा समाज ठोकरायचा, करता येतील तेवढ्या खटपटी करायच्या आणि ओरबाडता येईल तेवढा पैसा ओरबाडायचा, एवढीच महत्त्वाकांक्षा या वर्गाला लागलेली दिसते. आपल्या पलीकडे समाज आहे, जग आहे, याची जाणीवच हा वर्ग विसरून गेला आहे.
उदारीकरणाचा सर्वाधिक उपभोक्ता हाच मध्यमवर्ग होता, आहे आणि आज केवळ त्याच्याच इच्छा-आकांक्षांना महत्त्व आलं आहे. सरकारपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांना याच वर्गाला खुश करायचं आहे. असा सगळा ‘तुझ्या गळा-माझ्या गळा...’ छाप पद्धतीचा कारभार सुरू असताना ‘आजचा सुधारक’, ‘साप्ताहिक साधना’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अशा नियतकालिकांची ओळख कितीजणांना असणार? किती लोकांना ही नियतकालिकं वाचायची असोशी असणार? पण हेही तितकंच खरं की, ही नियतकालिकं केवळ खप वाढवण्यासाठी सुरू झालेली नाहीत, नव्हती. ‘आजचा सुधारक’ तर देणग्याही स्वीकारत नाही आणि जाहिरातीही आणि तरीही ते गेली २५ वर्षे अव्याहृत चालू आहे. ज्यांना विवेकवादाच्या मार्गानं जाण्याची इच्छा आहे, त्यांनीच या मासिकाच्या वाट्याला जावं. आजघडीला विवेकवाद हिच खरी नैतिकता आहे. ज्यांना स्वत:ला आरशात पाहायचं असेल आणि आपल्या आजूबाजूंच्या चारजणांना आरसा दाखवावासा वाटत असेल, त्यांनी ‘आजचा सुधारक’सारखी जड मासिकं प्रयत्नपूर्वक वाचायला हवीत. हे मासिक वाचताना झोप येते, असा एक आरोप काही वाचनदुष्ट लोक करतात; पण आता तर सर्वांचीच झोप हराम होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी ‘आजचा सुधारक’ खडबडून जागं करण्याचंही काम करू शकतो.
लेखक ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nandkumar More
Thu , 15 June 2017
अंतर्मुख करणारा लेख. आजचा सुधारकबद्दल काही नव्या गाेष्टी कळल्या. सुधारकचा वर्गणीदार होताे आता.