टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, एम.एस. स्वामीनाथन, तरुण विजय, आयुष मंत्रालय, आयआयटी कानपूर आणि संजय राऊत
  • Wed , 14 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी एम.एस. स्वामीनाथन M. S .Swaminathan तरुण विजय Tarun Vijay आयुष मंत्रालय AYUSH Ministry आयआयटी कानपूर IIT Kanpur संजय राऊत Sanjay Raut

१. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जाहीरपणे ‘पप्पू’ असा उल्लेख केल्याबद्दल मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला सर्व पदांवरून दूर करण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नुकतीच मंदसौरला भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मेरठ जिल्हाप्रमुख विनय प्रधान यांनी व्हॉटसअॅप आणि सोशल मीडियावर राहुल गांधींचे कौतुक करणारे काही संदेश पाठवले होते. मात्र, त्यात राहुल यांचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला होता. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण द्विवेदी यांनी प्रधान यांना सर्व पदांवरून दूर केल्याचं जाहीर केलं. मात्र, प्रधान यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून अशा प्रकारचे कोणतेही मेसेजेस न पाठवल्याचा, तसंच स्क्रीनशॉटस् बनावट असल्याचा दावा केला.

काँग्रेसमध्ये, तेही उत्तर प्रदेशात जिल्हा प्रमुखपदावर पोहोचलेला अस्सल काँग्रेसी माणूस गफलतीने असं काही करील, असं वाटत नाही. ही मंडळी गांधी घराणेभक्तीच्या लोणच्यात अशी मुरलेली असतात की, रात्री झोपेतून उठवून विचारलं, तरी विनम्रपणे त्यांच्या आरतीची टेप लावतील. बाकी, पप्पूला पप्पू म्हटलं तर इतकं काय चिडायचं, काँग्रेसमध्ये काही लोकशाहीच नाही ब्वॉ, अशा छापाच्या प्रतिक्रिया देणाऱ्यांनी ‘फेकू चांगलं काम करतो, फेकूने देशाला दिशा दिली’ वगैरे कौतुकाची ट्वीट्स करून आपल्या पक्षातून येणारी प्रतिक्रिया जरूर पाहावी.

……………………………………………………………………………………………

२. देशात गोहत्या आणि बीफबंदीच्या मुद्द्यावरून वादविवाद सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’चे माजी संपादक आणि भाजपचे माजी खासदार तरुण विजय यांनी उत्तर भारतीयांच्या खानपानाच्या सवयी संपूर्ण देशावर लादू शकत नाही, असं म्हटलं आहे. कथित गोरक्षकांनी स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना पुन्हा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी वीज, रेल्वे, महामार्ग बांधणी आणि महिला सशक्तीकरण आदी मुद्द्यांवर काम करत आहेत. पण तुम्ही मात्र आपापल्या आवडीनिवडींवर देश चालवण्याचा प्रयत्न करत आहात, असे खडे बोलही त्यांनी गोरक्षकांना सुनावले आहेत.

तरुण विजय यांनी हा डोस जाहीरपणे दिला, याबद्दल अभिनंदन. मात्र, खासगीतलाही संदेश हाच असेल तर तोच आहे, हे या गो-गुंडांपर्यंत पोहोचवण्याची काही कठोर व्यवस्था व्हायला हवी. नाहीतर शून्य परिणाम होईल. त्यांना जाहीरपणे एक बोलल्यानंतर प्रत्यक्षात दुसरंच, त्याविरुद्ध करायचं असतं, अशी सवय अंगवळणी पडली आहे. त्यामुळे ते साक्षात पंतप्रधानांच्या कानपिचक्याही गांभीर्याने घेत नाहीत, तरुण विजय यांना कोण जुमानणार?

……………………………………………………………………………………………

३. कानपूरच्या प्रतिष्ठित आयआयटी संस्थेने विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभाच्या वेळी नेहमीच्या काळ्या रंगाच्या झग्याच्या पेहरावाऐवजी कुर्ता, पायजमा आणि चुडीदार असा पेहराव करण्याचे आदेश दिले आहेत. यंदा प्रथमच विद्यार्थी पदव्या स्वीकारताना ब्रिटिशकालीन झग्याऐवजी कुर्ता-पायजमा (मुलांसाठी) आणि कुर्ता-चुडीदार (मुलींसाठी) परिधान करणार आहेत, असे आयआयटी-के मधील प्राध्यापक इंद्रनील मन्ना यांनी सांगितले. यापुढील सर्व दीक्षान्त समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांना भारतीय वस्त्रे परिधान करावी लागणार आहेत, असेही ते म्हणाले.

ही मुलं या संस्थांमध्ये जे काही शिकतात, त्यातले नेमके किती शोध भारतात लागले, भारतीयांनी लावले; किती तंत्रज्ञान इथं विकसित झालं, किती मूळ कल्पना इथं जन्मल्या, किती शाखांचा विकास इथं झाला, याचा विचार केला, तर भारतीय वेषाचा आग्रह विनोदी वाटायला लागतो. अर्थात, असं बोलण्यात अर्थ नाही. हे कपड्यांच्या बाबतीत आग्रही आहेत, तिथवर ठीक आहे. भारतीय ‘ज्ञाना’च्या नावाखाली सध्या जे काही उच्छाद मांडतंय, ते इथं हट्टानं शिकवायला लागले, तर आयआयटीमधून बाहेर पडणाऱ्यांना गोशाळा काढायला जमतील फार फार तर.

……………………………………………………………………………………………

४. भूकंप हा चिलटा-झुरळांच्या सांगण्यावरून होत नसतो, अशी खिल्ली भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी उडवली. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास राज्यात भूकंप होईल, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

ही एक वेगळीच गंमत आहे. राऊत यांचा आव आणि आविर्भाव खूप मोठा असला, तरी त्यांची महाराष्ट्रात बरी-वाईट अशी काही ना काही ओळख आहे. त्यांना चिलट आणि झुरळ म्हणायला किमान त्या वकुबाचा, त्यांच्या वरचा नेता तरी निवडायचा (ती हिंमत होत नाही, कुठे फटके पडतील किंवा शाई फासली जाईल, हे सांगता येणार नाही; शिवाय राऊत व्यक्तिश: पिसं काढतील ती वेगळीच); त्यांना चिल्लर ठरवायला कोणीतरी हाके पुढे येतात, त्यांच्या मोजमापासाठी कीटक तरी सापडेल का? थेट जिवाणू-विषाणू-अमीबाविश्वातच उतरायला लागेल.

……………………………………………………………………………………………

५. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामिनाथन यांनी मोदी सरकारच्या शेती विषयक धोरणाचं कौतुक केलं आहे. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आखलेली धोरणं आणि योजना या खरोखरच शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आहेत, असं स्वामिनाथ यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यासाठी अनेक शिफारसी येत असतात. त्या शिफारसींचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतं आहे, असं ते म्हणाले आहेत.

हा हा हा, हे गृहस्थ आवडले आपल्याला. गेले काही दिवस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते आहे, म्हणून जो काही प्राप्तिकरदात्या मध्यमवर्गीय नोकरदारांचा विलाप सुरू होता, त्यात उत्पादनखर्च अधिक ५० टक्के असा हमीभाव देण्याची आणि तात्पुरता उपाय म्हणून का होईना, कर्जमाफी मान्य करण्याची सूचना करणाऱ्या स्वामीनाथन यांची अक्कल काढणाऱ्यांची बहुसंख्या होती. आता स्वामीनाथन यांनी मोदीस्तुती करून यांच्या पायाखालचं जाजम खेचलं आहे आणि इतके दिवस त्यांच्या सूचना कशा क्रांतदर्शी होत्या, असं सांगत फिरणाऱ्या शेतकरी नेत्यांवर तोंड लपवत फिरण्याची पाळी आणली आहे.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......