नाही निर्मळ जीवन, काय करील (भाषेचा) साबण?
पडघम - सांस्कृतिक
राम जगताप
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 13 June 2017
  • पडघम सांस्कृतिक मराठी भाषा Marathi Bhasha कोश वाङ्मय Encyclopedia शब्दकोश Dictionary श्री. व्यं. केतकर S. V. Ketkar मराठी विश्वकोश Marathi Vishvkosh

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १०-११ जून रोजी मुंबईमध्ये ‘संवादसभा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११ जून रोजी ‘मराठी भाषेची सार्वत्रिक हेळसांड’ या विषयावर एक परिसंवाद होता. त्यात केलेलं हे भाषण. कुठलीही भाषा केवळ तिच्याबद्दल हळहळं-हुळंहुळं होऊन उमाळे-उसासे काढल्याने जगत, तगत नसते, हे नीट समजून घ्यायला लागेल. आम्ही फक्त मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढणार आणि भाषिक प्रेमाच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाच्या शाळा, टीव्ही यांच्यावर खापर फोडत राहणार!

……………………………………………………………………………………………

‘भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले, तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे’ असं भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर म्हणत. आपलं जीवन निर्मळ, स्वच्छ, प्रामाणिक आणि ज्ञानसंपन्न असेल तर आपली भाषाही तशीच असते. आपलं आजचं सामाजिक जीवन तसं आहे का? ते तसं नाही म्हणूनच आपली भाषाही तशी नाही, असं म्हणता येऊ शकेल असं मला वाटतं. कारण समाज आणि संस्कृतीचा विचार सामग्ऱ्याने आणि सर्वक्षेत्रीयच करावा लागतो. मराठी भाषेची आज जी हेळसांड होत आहे, त्याचाही विचार त्यामुळे सामग्ऱ्याने आणि सर्वक्षेत्रीयच करावा लागेल. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी न्या. रानडे यांनी म्हणून ठेवलं आहे की, “अपुऱ्या आणि अर्धवट राजकीय अधिकाराच्या बळावर सुयोग्य अशी समाज-व्यवस्था तुम्हाला निर्माण करता यावयाची नाही, तसेच तुमची समाज-व्यवस्थाही तर्कनिष्ठ आणि न्याय्य नसेल तर राजकीय अधिकार वा हक्क वापरण्याची योग्यताही तुमच्यापाशी असणार नाही. तुमची सामाजिक व्यवस्था सदोष असेल तर तुमची अर्थव्यवस्थाही योग्य असणार नाही. तुमची धार्मिक ध्येयधोरणे निकृष्ट आणि कुहेतूप्रधान असतील तर तुम्ही सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात यशप्राप्ती करू शकणार नाही.” ही सामाजिक ऱ्हासाची कारणपरंपरा आजही जशीच्या तशी लागू पडते. आणि मला वाटतं, ही कारणपरंपराच आपल्या मराठी भाषेच्या दुरवस्थेचं खरं कारण आहे. काही ठळक मुद्द्यांच्या आधारे पाहू या.

१. प्राथमिक भाषिक कौशल्यांबाबतची अनास्था

भाषा शिकणं म्हणजे भाषा बोलायला, ऐकायला, वाचायला आणि लिहायला शिकणं.

बोलणं, ऐकणं, वाचणं आणि लिहिणं ही चार प्राथमिक भाषिक कौशल्यं मानली जातात. ही कौशल्यं विकसित करण्याचं काम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर टप्प्याटप्प्यानं व्हायला हवं. त्याच वेळी साहित्य, पत्रकारिता यांनी त्याला समांतर जबाबदारी निभवायला हवी.

प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? शिक्षणाच्या या तिन्ही पातळ्यांवरील परिस्थिती भीषण म्हणावी इतकी वाईट आहे. ऐकणं, वाचणं, बोलणं आणि लिहिणं या भाषिक कौशल्यांचं पर्यवसान उत्तम श्रोता, चांगला वाचक, बरा वक्ता आणि जेमतेम लेखक असं व्हायला हवं. शिक्षणाचं हेच उद्दिष्ट असायला हवं. कारण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाणार असा, कोणतीही नोकरी वा व्यवसाय करणार असा, ही कौशल्यं तुम्ही आत्मसात केलीच पाहिजेत. पण या पातळीवरही प्रचंड अनास्था दिसते. प्राथमिक-माध्यमिक स्तरावरील मुलांमध्ये ही कौशल्यं चांगल्या प्रकारे अवगत झालेली नसतात, तशीच विद्यापीठीय पातळीवरील युवकांमध्येही. ‘शालेय स्तरावर भाषा शिकवलीच जात नाही, केवळ धडे शिकवले जातात’ या माधुरी पुरंदरे यांच्या विधानाकडे या पार्श्वभूमीवर पाहायला हवं. मराठी भाषेच्या प्राथमिक-माध्यमिक पातळीवरील पाठ्यपुस्तकांविषयी आत्ताच साठेमॅडम बोलल्या. ते बऱ्याच अंशी खरं आहे. भाषाच शिकवली जात नसेल तर भाषिक कौशल्यं विकसित होणार कशी? विद्यापीठीय स्तरावरील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. तिथंही हीच बोंब आहे. परिणामी कितीही पदव्या संपादन केल्या तरी तरुणांची भाषा समृद्ध होत नाही. नुसत्या शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होईल असं नाही आणि त्याची भाषा-संपन्न होईल असंही नाही! विद्यापीठीय पातळीवरील शिक्षणाचा एकंदर दर्जा आणि तेथील मराठीची स्थिती याबाबत तर न बोललेलंच बरं.

प्राथमिकपासून विद्यापीठीय पातळीपर्यंत प्राथमिक भाषिक कौशल्यं नीट विकसित न होण्याचा मोठा तोटा मराठी भाषेला होताना दिसतो. कसा पहा. ही कौशल्यं आपण प्रौढांना लावून पाहू. काय दिसतं?

सार्वजनिक समारंभ-संमेलनं-चर्चासत्रं या ठिकाणी लोकांना जेव्हा काही शंका वा प्रश्न असल्यास विचारा असं सांगितलं जातं, तेव्हाची गंमत पाहण्यासारखी असते. बहुतांश जणांना आपल्याला नेमकं काय म्हणायचंय, आपला नेमका प्रश्न काय हेच सांगता येत नाही. ते इतका पाल्हाळ लावतात की, तुमचा नेमका प्रश्न काय असं पुन्हा पुन्हा विचारावं लागतं. मुद्देसूद बोलणं ही तर अजून लांबची गोष्ट. प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळतं, तर उत्तरातून हुशारी कळते, असं म्हणतात! पण या शहाणपणाचं दर्शन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अभावानेच दिसतं.

जी तऱ्हा श्रोत्याची असते, तीच थोड्याफार फरकाने वक्त्याचीही असते. नेमक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये बरंच काही बोलता येतं. पण वक्त्याने आपल्याला जे काही बोलायचं आहे त्यासाठी निवडलेले शब्द हे अनेकदा गडबडीचे असतात. शिवाय त्यात स्पष्टताही नसते. मुद्देसूद, तर्कनिष्ठता आणि तात्त्विकता या गोष्टी वक्त्यांच्या भाषणांत अभावनेच दिसतात. पुन्हा केळकरांचा हवाला द्यायचा झाला तर ते म्हणतात - ‘भाषेवरचं प्रभुत्व तुम्हाला विचाराची शिस्त शिकवत असतं. कोणतीही भाषा पक्की आल्याखेरीज ज्ञानाची दालनं खुली होत नसतात.’ भाषेवरची ही प्रभुत्वहिनता आपल्याकडच्या पाल्हाळिक, पसरट आणि उदाहरणं, कोट्या यांच्या मोहात पडलेल्या बऱ्या, चांगल्या, प्रसिद्ध आणि नामांकित वक्त्यांच्या भाषणांत जशी दिसते, तशीच ती खाजगी स्वरूपाच्या, अनौपचारिक संवादांमध्येही दिसते. ही भाषिक प्रभुत्वहीनता वैचारिक शिस्तीला मारक असते. तर्कनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध विचार करता न येणं, तसं बोलता न येणं, हा भाषिक कौशल्याच्या अभावाचाही परिपाक असतो.

वाचनाच्या बाबतीतही अशीच तऱ्हा आहे. अनेकांना काय वाचावं हेच आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असंही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसं आयुष्यभर कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. ‘मला फक्त विज्ञान कादंबऱ्या आवडतात’ किंवा ‘मला अर्नाळकरांच्या कादंबऱ्या आवडतात’, असे जेव्हा लोक पन्नाशीच्या उंबरठ्यावरही सांगतात, तेव्हा यांना ‘काय वाचावं?’ हेच बहुधा कळलेलं दिसत नाही याची खात्रीच पटते. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.

जेमतेम लेखक म्हणजे किमान चार ओळींचं चांगलं पत्र लिहिता येणं. पण हेही अनेकांना जमत नाही. थोडक्या शब्दांत बरंच काही सांगता येतं. पण तो कौशल्याचा आणि भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण हा साक्षेप साधं पत्र लिहिण्यापासून ते कथा-कादंबऱ्यांपर्यंत कुठेच फारसा पाळला जाताना दिसत नाही. मराठी साहित्यिकांना व प्राध्यापकांना हे किमान भाषिक कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून आणि बोलण्यातून मिळत राहतात! साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणं यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत.

थोडक्यात बोलणं, ऐकणं, वाचणं आणि लिहिणं ही प्राथमिक भाषिक कौशल्यं प्राथमिक पातळीवरच कच्ची राहतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात.

२. मराठी भाषेची साहित्यातली परवड

भाषा ही सतत प्रवाही असते. त्या प्रवाहाला तुम्ही कसं वळण देता, यावर तिची वृद्धी आणि समृद्धी होत जाते. नुसत्या साहित्याने भाषेची वाढ आणि समृद्धी होत नाही. दर्जेदार साहित्य फक्त भाषेला स्थिरत्व देतं, असं ‘मराठी भाषा - उद्गम आणि विकास’कर्ते कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटलं आहे, ते खरंच आहे.

भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही. त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची निर्मिती होणं गरजेचं असतं. जागतिकीकरणाच्या गेल्या वीस वर्षात समाजजीवनात जे आमूलाग्र म्हणावे असे बदल झाले आहेत, त्या तुलनेत मराठी भाषेमध्ये साहित्याच्या माध्यमातून किती नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची भर पडली आहे? भरपूर इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरल्याने ती ‘आजच्या काळा’ची भाषा होत नाही.

मराठीतली बहुतांश मंडळी सर्वसामान्यांना पचेल, रूचेल आणि समजेल अशा भाषेत लिहिण्याऐवजी केवळ स्वत:च्या पांडित्याचं प्रदर्शन करण्यासाठीच लिहीत असतात की काय असं वाटतं! मराठी प्राध्यापक मंडळी तर विनाकारण अगम्य शब्द, वाक्यरचना आणि संकल्पना वापरून वाचकांना घाबरून टाकतात. हीच बहुतांश मंडळी मराठीमधील साहित्यिक म्हणून गणली जातात. पण यांचं लेखन वाचलं तर कुणाच्याही लक्षात येईल की, यांनी मराठी भाषेला ‘फोले पाखडितो आम्ही’ या स्थितीला नेऊन ठेवलं आहे. निरुपयोगी, कुचकामी, आशयहीन परिभाषेचा उपयोग करून आपण काहीतरी मौलिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, या अभिनिवेषापलीकडे त्यांच्या लेखनात दुसरं काहीही फारसं सापडत नाही. यूजीसीच्या नियमामुळे शोधनिबंध, पुस्तकं यांवर वेतनवाढ, पदश्रेणी अवलंबून असल्याने ही मंडळी वारेमाप लेखन करतात, पण त्याचं वर्णन ‘सुमार’ या शब्दाच्या पलीकडे जाऊन करता येणं शक्य नाही. कविता, कादंबऱ्या, कथा या ललितवाङ्मयप्रकारातही हीच मंडळी आहेत. त्यामुळे विद्यमान मराठी साहित्याने केवळ ‘आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा’ तयार करण्याचंच काम चालवलं आहे. पण हेच लोक मराठी भाषेच्या नावाने मोठ्या प्रमाणात गळे काढताना दिसतात. कारण त्यांनी स्वत:च्या नावाने छापलेली रद्दी इतरांनी वाचावी, यासाठी मराठी भाषेचं भवितव्य हे गळा काढण्याचं नामी अस्त्र आहे. आणि याचमुळे शिक्षक, प्राध्यापक, समीक्षक हे अलीकडच्या काळात कुचेष्टेचा, हेटाळणीचा आणि तिरस्काराचा विषय झालेले आहेत.

३. मराठी भाषेची प्रसारमाध्यमांतली परवड

आपला लिखित भाषेशी रोजच्या रोज संपर्क येतो, त्यातील एक प्रमुख साधन म्हणजे वर्तमानपत्रं. वर्तमानपत्रं समाजाची भाषा घडवण्याचं काम काहीएक प्रमाणात करत असतात. मराठी वर्तमानपत्रांनी ते एकेकाळी फार चांगल्या प्रकारे केलं आहे. नवनवीन शब्द घडवले आहेत. केसरी, नवाकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा वर्तमानपत्रांनी कितीतरी नवीन शब्द घडवले. ‘नोकरशाही’, ‘मध्यमवर्ग’ असे कितीतरी शब्द ‘केसरी’ने मराठीमध्ये रूढ केले. क्रिकेटमधील ‘कॅच’, ‘एलपीडब्ल्यू’, ‘आऊट’ यांसारख्या इंग्रजी शब्दांसाठी ‘झेल’, ‘पायचित’, ‘बाद’ हे सुंदर मराठी प्रतिशब्द रूढ करण्याचं श्रेयही मराठी वर्तमानपत्रालाच जातं. पण गेल्या पंचवीस वर्षांत मराठी वर्तमानपत्रांनी मराठी भाषा घडवण्याऐवजी ती उत्तरोत्तर बिघडवण्याचंच काम चालवलं आहे. मी स्वत: मराठी वर्तमानपत्रांमध्ये एका दशकाहून अधिक काळ काम केलं आहे. त्यामुळे हे मी गांभीर्यानं बोलतो आहे हे कृपया लक्षात घ्यावं. अनावश्यक भाषिक कोट्या, निरुपयोगी भाषिक खेळ, अर्थहीन शाब्दिक कसरती याच्यापलीकडे मराठी वर्तमानपत्रांची भाषिक इयत्ता जायला तयार नाही.

मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक जण रोज वर्तमानपत्रं वाचनासाठी जेवढा वेळ देत असतील, त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देतात. शिवाय ते दृक-श्राव्य माध्यम. त्यामुळे त्याचा परिणामही मोठा असतो. पण मराठी वृत्तवाहिन्यांवरील पत्रकार, अँकर आणि अगदी संपादक यांची मराठी भाषा कशी आहे? काय प्रतीची आहे? ‘भीषण’ आणि ‘भयंकर’ हेच शब्द त्यासाठी वापरावे लागतील. खरं म्हणजे टीव्ही हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने त्याचा जनमानसावरील परिणाम मोठा असतो. शिवाय तिथं वेळेची प्रचंड मोठी कसरत आणि चढाओढ चाललेली असते. त्यामुळे कमीत कमी वेळात अधिक चांगलं, नेमकं आणि अभ्यासूपणाने बोलणाऱ्या मंडळींची वृत्तवाहिन्यांमध्ये गरज असते. प्रत्यक्षात या क्षेत्रातल्या मंडळींकडे सुरुवातीला सांगितलेली प्राथमिक भाषिक कौशल्यंही असल्याचं दिसत नाही. अभ्यासूपणा, भाषिकप्रभुत्व, वाचन आणि तर्कसंगत विचार यांचा आणि टीव्ही पत्रकारांचा संबंध उंबराच्या फुलासारखा दुर्मीळ आहे. जिथं भाषेबाबत अतिशय जागरूक असायला हवं, त्या टीव्ही माध्यमात भाषेबाबत सर्वाधिक उदासीनता दिसून येते. शुद्धलेखनाचे तर रोजच्या रोज इतके खून पडतात की विचारू नका.

४. मराठी भाषेची कोशवाङ्मयांबाबतची परवड

भाषा-विवेक नसलेल्या समाजामध्ये कोशवाङ्मयाची निर्मिती आणि त्यांचं महत्त्व दुर्लक्षिलंच जातं!
मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध म्हणावी अशी परंपरा आहे. ज्ञानकोश, संस्कृतिकोश, चरित्रकोश, व्यायामकोश, समाजविज्ञान कोश, महाराष्ट्र शब्दकोश, सरस्वती कोश, अशी मोठमोठी कामं एकेकाळी झाली.  

श्री. व्यं. केतकरांनी १९२० ते १९२७ या आठ वर्षात ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. हा कोश केवळ विषयसंग्रह कोश ठरू नये, तर तो महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय उलाढालींचं साधन ठरावा, अशी केतकरांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याची रचना केली. ‘हिंदुस्थान आणि जग’ या त्यांच्या प्रस्तावना खंडावरून त्यांची कल्पना येते. पण केतकरांच्या कामाची बूज त्यांच्या हयातीत राखली गेली नाही आणि त्यानंतरही. अतिशय हालअपेष्टा सोसून केतकरांनी ‘ज्ञानकोश’ तयार करून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या काळात त्यांच्या ज्ञानकोशाची नवी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यासाठीही कुणी पुढे येऊ शकलं नाही. तशी इच्छाही कुणाला झाली नाही.

मराठी विश्वकोशाची काय स्थिती आहे हे आपण गेली ४०-५० वर्षं पाहतोच आहोत. या काळात जग ज्या गतीनं बदललं आहे, त्याचा आवाकाच या विश्वकोश नामक मंडळाला उमगला नसल्याने तो कधीच कालबाह्य झाला आहे. 

अशीच परिस्थिती शब्दकोशांची आहे. वेगवेगळ्या शब्दांचे कोश त्या भाषेत नव-नव्या शब्दांची भर घालण्याचं काम करत असतात. त्यामुळे शब्दकोशांची संख्या जास्त असायला हवी. भाषा समृद्ध करण्यासाठी ते आवश्यक असतात. पण चांगले शब्दकोशच नसतील तर ते होणार कसं? सध्या बाजारात उपलब्ध असलेला कुठला ‘इंग्रजी-मराठी शब्दकोश’ उत्तम म्हणावा असा आहे, या प्रश्नांचं उत्तर फारसं समाधानकारक नाही. कारण या कोशांच्या नव्या सुधारित आवृत्त्या, पुरवण्या ज्या सातत्यानं प्रकाशित व्हायला हव्यात, त्यांच्या अद्ययावतीकरणाचे जे प्रयत्न व्हायला हवेत, तेच होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोवनी, नवनीत आणि ऑक्सफर्ड मराठी हेच तीन कोश वापरावे लागतात. पण हे तीनही कोश फारच अपुरे आहेत, मात्र त्यांच्याशिवाय पर्यायही नाही! अशीच अवस्था मराठी-इंग्रजी आणि मराठी-मराठी या शब्दकोशांचीही आहे. मराठी-मराठी शब्दकोशामध्ये प्र. न. जोशी यांचा ‘आदर्श मराठी शब्दकोश’ हाच काय, तो त्यातल्या त्यात चांगला म्हणावा असा कोश. पण तोही बहुतेकांना माहीत नसतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ‘पदनामकोश’ तयार करण्यात आला. तो नव्या शब्दांच्या निर्मितीचा तसा चांगला प्रयत्न होता. त्यातील काही शब्द आता समाजमान्य झाले आहेत. पण या कोशाची बदनामी करण्याचा आणि त्याची टिंगलटवाळी करण्याचा विडाच तेव्हा काही मराठी साहित्यिकांना उचलला होता! खरं तर या पदनामकोशातले चांगले शब्द ठेवून बाकी शब्दांना नव्याने पर्याय शोधायला हवे होते. जेणेकरून ते शिष्टसंमत झाले असते. पण तसा प्रयत्नही कुणी केला नाही. त्याची टिंगलटवाळी मात्र आनंदानं केली!

शब्दकोश, वाक्यसंप्रदाय कोश, संज्ञा-संकल्पना कोश अशा चढत्या क्रमांच्या कोशांची सतत निर्मिती होणं आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित होणं हा भाषेच्या समृद्धीचा आणि वाढीचा उत्तम पर्याय असतो. पण तेही होताना दिसत नाही. मग भाषिक वृद्धी व समृद्धी होणार तरी कशी? 

५. हळहळे-हुळहुळे, उमाळे-उसासे

गेल्या पंचवीस वर्षांत जागतिकीकरणाने जी काही सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आव्हाने उभी केली आहेत, त्यात मराठी भाषेसमोरही मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. पण त्याविषयी कुणीही गंभीर नाही. गेल्या पंचवीस वर्षांत संगणकामुळे, मोबाईलमुळे, सोशल मीडियामुळे जे नवीन शब्द तयार झाले आहेत, त्यांना समर्पक मराठी प्रतिशब्द तयार करण्याचं काम प्रसारमाध्यमं, प्राध्यापक, साहित्यिक, कोशकार यांच्यापैकी कुणी केलं आहे का? या काळात मराठीमध्ये कुठले नवीन शब्द आले, रुळले याविषयी कुणी तपशीलवार सांगू शकेल का? सरसकट इंग्रजी, हिंदी या भाषेतून शब्दांची जी उचलेगिरी मराठीमध्ये चालू आहे, त्यावर काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न कुणी केला आहे का?

‘आपण केवळ मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगण्यासाठी काही करावं लागत नाही’ हे माधुरीताई मघाशी उल्लेख केलेल्या त्यांच्या कार्यक्रमात म्हणाल्या होत्या. कुठलीही भाषा केवळ तिच्याबद्दल हळहळं-हुळंहुळं होऊन उमाळे-उसासे काढल्याने जगत, तगत नसते, हे नीट समजून घ्यायला लागेल. आम्ही फक्त मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढणार आणि भाषिक प्रेमाच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाच्या शाळा, टीव्ही यांच्यावर खापर फोडत राहणार! दोन डॉक्टर किंवा दोन वकिल किंवा दोन शास्त्रज्ञ आपल्या कामाविषयी पूर्णपणे मराठीमध्ये एकमेकांशी संवाद साधू शकतात का? एकही इंग्रजी शब्द न वापरता ते बोलू शकतात का? मग कुठल्या तोंडाने आपण मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी कांगावा करतो?

भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही. त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची निर्मिती होणं गरजेचं असतं.

खेड्यापाड्यातल्या बायाबापड्या काबाडकष्ट करून पै-पैसा जमून, अनंत व्यवधानं असतानाही प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन हौसेनं एखादा दागिना सोनाराकडून घडवून घेतात. आणि मग तो अभिमानानं अंगावर मिरवतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्त समाधान पाहायला मिळतं. मराठी भाषेत नव्याने घडवल्या जाणाऱ्या एकेका शब्दालाही अशीच श्रमाच्या घामाची तुरट-खारट चव आल्याशिवाय आणि ते दिमाखाने मिरवल्याशिवाय त्यांना ऐश्वर्य मिळणार नाही, त्यांचा प्रसार होणार नाही आणि ते प्रचलितही होणार नाहीत.

लेखक ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Wed , 14 June 2017

अतिशय सुंदर विवेचन.... मला फार आवडले.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......