अजूनकाही
‘मुरांबा’मधल्या आलोकला समजून घेणारे, त्याला दिशा दाखवणारे वडील नसते तर मराठीत आपल्याला पहिलावहिला ‘देवदास’ बघायला मिळाला असता. कारण देवदास (चित्रपट नव्हे, व्यक्तिरेखा) आणि या आलोकमध्ये काहीही फरक नाही. अं हं! देवदासप्रमाणे तो वैफल्यग्रस्त होऊन दारूच्या आहारी वगैरे काही गेलेला नाही. पण त्याला जे वडील लाभले आहेत, तसे जर देवदासला लाभते, तर त्याच्याही आयुष्याची फरफट नसती झाली. बाकी त्याच्यात आणि आलोकमध्ये काहीही फरक नाही. अप्पलपोटा, स्वार्थी, कमालीचा आत्मकेंद्री आणि पुरुषी वर्चस्ववादी ही देवदासची सर्व (अव)गुणवैशिष्ट्ये आलोकमध्ये ठासून भरली आहेत आणि म्हणूनच आयुष्यात त्याची ठासली गेली आहे. देवदास ही असफल प्रेमाची उदात्त कहाणी आहे, वगैरे गैरसमज आपल्याकडे फार घट्ट आहेत. प्रत्यक्षात ती स्वत:च्या पलिकडे बघू न शकणाऱ्या स्वार्थी, अहंकारी तरुणाची गोष्ट आहे. ‘मुरांबा’मधला आलोक नेमका असाच आहे.
‘मुरांबा’च्या कथेचा परिघ खूपच मर्यादित आहे. अमेय आणि इंदूचं ब्रेकअप होतं आणि मग कसे ते पुन्हा एकत्र येतात, इतकीच या चित्रपटाची वन लाइनर आहे. हे पुन्हा एकत्र येण्याचा प्रवासही खूप नाट्यमय वगैरे आहे, अशातला भाग नाही. कारण मुळात चित्रपटाचा तो हेतूच नाही. ही कथा केवळ आलोक आणि इंदू यांच्यातल्या प्रेमाची किंवा भांडणाची नाहीच. ती अनेक पातळ्यांवर फिरते. आजच्या पिढीचा उतावीळपणा, आत्मकेंद्रीपणा आणि आधीच्या पिढीची दुसऱ्याला समजून घेण्याची तयारी यांची ही गोष्ट आहे. नात्यांमधल्या समजूतदारपणाची ती जशी आहे, तशीच ‘गिरे तो भी टांग उपर’ या असमंजस वृत्तीचीही आहे.
‘मुरांबा’ची कथा भलेही प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना समजून घेण्याची असेल; पण केवळ प्रियकर-प्रेयसीच नव्हे, तर प्रत्येक नात्यातच एकमेकांना समजून घेण्याची गरज असते, असं हा सिनेमा कुठलाही प्रचारकी आव न आणता सांगतो. त्यामुळेच नायक-नायिकेच्या जोडीपेक्षाही महत्त्वाचं नातं इथं बाप-लेकाचं आहे. बाप मुलाशी त्याच्या पातळीवर येऊन बोलतोय, त्याच वेळी तो आपल्या पत्नीचा आब राखला जावा, यासाठीही दक्ष आहे. त्यासाठी तो आक्रस्ताळेपणा करत नाही, पण वेळ येताच मुलाला अतिशय संयत शब्दांत आईची जागा काय आहे, ते दाखवून देतो.
‘मुरांबा’ ही म्हटलं तर आजच्या काळातल्या एका तरुण जोडप्याची आणि त्यांच्या अपवर्डली मोबाइल फॅमिलीची गोष्ट आहे. या तरुण जोडप्याची भाषा, त्यांची लाइफस्टाइल, त्यांचा आयुष्याकडे, रिलेशनशिपकडे बघायचा आउटलुक अतिशय कंटेम्पररी आहे. त्यांचे आई-वडीलही पुढारलेले, मुलांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, या विचारांचे आहेत. पण तरीही या सर्व आधुनिक मंडळींची ही अत्यंत सनातन गोष्ट आहे आणि आलोक हा या सनातनतेच्या वाईट बाजूचा आणि त्याचे वडील चांगल्या बाजूचे प्रतीक आहेत. आलोक आत्मकेंद्री आहे. इतरांना काय वाटतंय याचा तो फारसा विचार करत नाही. याचा अर्थ तो बेपर्वा आहे, उर्मट आहे, असं नाही. इन फॅक्ट इंदूच्या म्हणण्याप्रमाणे तो खूप डिपेंडेबल आहे. आई-वडलांनाही तो उलट उत्तरं देत नाही. एकदाच फक्त तो आईला ती अजूनही २७ वर्षांपूर्वीच्या धारवाडमधल्यासारखीच (थोडक्यात मागास) वागत असल्याचा दुखरा टोमणा हाणतो. त्याबद्दल तो माफी मागत नाही, पण चुकीचं बोलून गेल्याचं त्याला जाणवल्याचं लगेचंच त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. इंदूशी फाटल्यानंतर पुन्हा जुळावं, यासाठी आई-वडील जे काही प्रयत्न करतात, ते पसंत नसून आणि तसं त्यांना स्पष्ट सांगूनही तो आपली मर्यादा सोडत नाही.
त्यामुळे आलोक हा अभ्यासात हुशार (एमबीए गोल्ड मेडलिस्ट), मित्रांचा लाडका, आई-वडलांच्या आँख का तारा, उज्ज्वल भवितव्य असलेला असा अतिशय गुणी मुलगा असावा, असा आपला समज होतो. साधारण दोन तृतीयांश चित्रपट तो कायमही राहतो. पण जसजशी आपल्याला इंदूची बाजू कळत जाते, तसतसं आलोकच्या स्वभावातलं वैगुण्य स्पष्ट होत जातं.
आलोकच्या नेमके उलट त्याचे आई-वडील आहेत. दुसऱ्याची बाजू समजून घेणं, त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं आणि आपल्या मुलापेक्षाही इंदूविषयी त्यांना अधिक विश्वास आहे. असंख्य घरांमध्ये लहान मूल रडत रडत आपल्या मित्र/मैत्रिणीची तक्रार करत आलं तर आई-वडील ‘तूच काही तरी केलं असशील’ असं हमखास म्हणतात. आलोकचे आईवडील याच कॅटॅगरीतले आहेत.
इंदूची बाजू कळण्याचा जो भाग आहे, तो या चित्रपटाचा वेगळेपणा आहे. सामान्यपणे ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत अशा गोष्टी पोहोचवण्याची सवय आपल्या चित्रपटांनी लावली आहे, तशा पद्धतीने हा भाग पडद्यावर उलगडत नाही. इंदूची बाजू इंदूच्या नजरेतून कळत नाही, तर आलोकच्याच नजरेतून कळते. आपलीच बाजू कशी बरोबर आहे, हे आलोकच्या नजरेनं मांडलं जात असताना प्रेक्षकांसमोर आलोकमधल्या उणिवा येतात आणि त्याच वेळी आलोकलाही आपलं चुकत असल्याची जाणीव होत जाते. ही जाणीव होत असली तरी तिचा तो चटकन स्वीकार करत नाही, कारण त्याचं मन ते मानत नसतं. त्याचा अहंकार त्याच्या आड येत असतो. इथे त्याचे वडील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
सुरुवातीला म्हटलं तसं आलोकला असे वडील लाभले नसते तर त्याचा देवदास व्हायला वेळ लागला नसता. तो आजच्या काळातला मुलगा आहे, आजच्या काळातली मुलं रिलेशनशिप फारशी मनावर घेत नाहीत, वगैरे बोललं जात असलं तरी इंदूशी झालेल्या ब्रेक अपमुळे आलोक आतून पुरता हलला आहे. जी अनेक वर्षं आपल्या आयुष्याचा भाग होती, तिचा आणि आपला आता संबंध नाही, ही भावना त्याला अस्वस्थ करतेय. अशा परिस्थितीत त्याच्याशी संवाद साधणारे आई-वडील, त्यातही अधिक वडील नसते तर कदाचित चित्र वेगळं असतं.
बाप-मुलाचं हे नातं हा या चित्रपटाचा सर्वांत सुरेख भाग आहे. बाप-मुलाचं नातं रूपेरी पडद्यावर फार क्वचित हाताळलं जातं. आणि इतका उमदा बाप तर रूपेरी पडद्यावर फारच क्वचित बघायला मिळतो. मराठीपुरतं बोलायचं तर ‘वाजवा रे वाजवा’मधल्या अशोक सराफच्या वडलांच्या भूमिकेनंतर असा बाप झालेला नाही. सचिन खेडेकरने रंगवलेला इथला बाप प्रेमात पाडावा असा आहे. मुलाशी मित्रत्वाच्या नात्याने बोलणारा, त्याची काळजी करणारा, मुलगा कुठलं चुकीचं पाऊल तर टाकत नाही ना, याबाबत जागरूक असलेला, पण तरीही त्याला त्याची स्पेस देणारा, त्याचे निर्णय त्याचे त्यालाच घेऊ देणारा असा हा बाप सचिन खेडेकरने कमालीचा रंगवलाय. हिरोच्या बरोबरीने त्याने ही व्यक्तिरेखा आणून ठेवलीये. सचिनपेक्षा किंचितसा कमअस्सल कलावंत जरी या भूमिकेत असता तरी या व्यक्तिरेखेचा आलेख घसरला असता आणि मग चित्रपटाचाच तोल बिघडला असता.
प्रचंड नैसर्गिक सहजोत्स्फूर्तता हे या चित्रपटाचं महत्त्वाचं बलस्थान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांमध्ये आजच्या काळातली मुलं, त्यांचं भावविश्व, त्यांचे प्रश्न दाखवताना ओढूनताणून टिपिकल लिंगो वापरली जाते. ‘मुरांबा’मध्ये त्यापासून पूर्ण फारकत घेण्यात आली आहे. इथला मुलगा, मुलगी, आई, बाप सगळेच कमालीचे नॉर्मल आहेत. ते ओढूनताणून काहीच करत नाहीत. बाप मुलाच्या पातळीवर येऊन त्याच्याशी संवाद साधतोय, पण तेही अगदी सहज आहे. म्हणजे या दोघांमधलं नातंच इतकं मोकळेपणाचं आहे, त्यासाठी वडलांना विशेष काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीयेत, हे बघितल्याबरोबरच आपल्याला पटून जातं. किंवा मुलाशी त्याच्या पातळीवर येऊन बोलायचंय, म्हणून त्याच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणं किंवा दोघांनी एकत्र दारू पिणं, असले टिपिकल प्रकारही यात नाहीत. इथली आई गृहिणी असली तरी शामळू नाही, बुजरी नाही. तिला तिचं एक स्वत:चं अस्तित्व आहे, जे तिच्या नवऱ्याला मान्य आहे. मुलगा ज्या वेळी भावनेच्या भरात हे विसरतो, त्यावेळी वडील संयतपणे, पण नेमक्या शब्दांत ते त्याच्या लक्षात आणून देतात.
सहज संवादांमधून आणि नैसर्गिक प्रसंगांमधून विनोदाचा शिडकावाही सतत होत राहिल्यामुळे चित्रपटाचा मूड प्रसन्न आहे. मुळात चित्रपटाचं लेखन दमदार आहे आणि कसलेल्या अभिनेत्यांबरोबरच अन्य सर्व तंत्रज्ञांची अव्वल कामगिरी यामुळे कथेच्या अनुषंगाने फारसं नावीन्य नसूनही हा चित्रपट एक उत्तम अनुभव देतो. लेखक-दिग्दर्शक वरुण नार्वेकरने पटकथेची वीण छान बांधली आहे. दोन तृतीयांश चित्रपट तो आलोकच्या नजरेनं दाखवतो आणि अखेरच्या एक तृतीयांश चित्रपटात तो पटकथेची लय न बिघडवताही असा काही ट्विस्ट घेतो की, इंदूची बाजू आपल्यासमोर येते, ती देखील आलोकच्याच नजरेतून. ही वेगळीच गंमत आहे. इंदू कधीही थेट तिची बाजू मांडतच नाही. जे काही बोलतो, सांगतो ते आलोकच. चित्रपटात फ्लॅशबॅकची जी काही दृष्य दिसतात तीदेखील आलोकच्याच नजरेतून. त्यामुळे त्याची बाजू आणि इंदूचीही बाजू आपल्याला आलोकच्याच नजरेतून दिसते आणि या संपूर्ण प्रकरणात माती खाणारा आलोकच आहे, याची जाणीव आलोकला आणि प्रेक्षकांना एकदमच होते. हे फारच भारी आहे.
पटकथेची लय सांभाळतानाही दिग्दर्शक या नात्याने वरुण कुठेही घिसाडघाई करत नाही. तो पुरेसा वेळ घेतो. प्रत्येक प्रसंग त्याच्या पूर्ण क्षमतेनं फुलू देतो. आपल्या कथेवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास असलेल्या दिग्दर्शकाचं हे निदर्शक आहे.
चित्रपट कमी पडतो तो आलोक आणि इंदूच्या केमिस्ट्रीत, तो अशा अर्थानं की, हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत, असं दाखवणारे प्रसंगच चित्रपटात नाहीत. चित्रपटाची सुरुवातच ब्रेक अपने होते आणि आलोकच्या नजरेतून फ्लॅशबॅकमधून चित्रपट उलगडत जातो. फ्लॅश बॅकच्या या सर्व प्रसंगांमध्ये, केवळ एका प्रसंगाचा अपवाद वगळता आलोक आणि इंदू यांच्यातलं अंतरच बघायला मिळतं. त्यामुळे इंदूशी फाटल्यानंतर आलोकविषयी जे पोटतिडिकीनं प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटायला हवं, ते वाटतच नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेक अप झाल्यानंतरच्या दिवसभरात कथानक घडतं आणि दिवस मावळता मावळता आलोकला आपली चूक उमगतेही. मुळातच ‘मुरांबा’ या कन्सेप्टशी हे विसंगत आहे. मुरांब्याला जसा मुरण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तसाच तो नात्यांनाही द्यावा लागतो, हे दिग्दर्शकाला सांगायचंय. इंदूचं आणि आपलं जमू शकत नाही, या निर्णयापर्यंत येण्यासाठी आलोकच्या म्हणण्याप्रमाणे त्याला आणि इंदूला तीन महिने लागले आहेत. त्या आधी किमान पाचेक वर्षं ते एकत्र होते. म्हणजे नात्यात एकमेकांना आजमावायला त्यांनी पुरेसा वेळ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे काही कारणानं आपलं जमू शकत नाही, या निर्णयापर्यंत आल्यानंतर सर्व बाजूंचा सारासार विचार करून खरा दोष कोणाचा, या निर्णयापर्यंत येण्यासाठीही काही वेळ जाऊ द्यायला हवा होता. विशेषत: आलोक ज्यापद्धतीनं इंदूवर सगळं खापर फोडून मोकळा होतो, ते बघता केवळ वडलांच्या ‘काउन्सिलिंग’मुळे त्याला एकाच दिवसात (खरं तर एकाच प्रसंगात) आपली चूक उमगून तो लगेच इंदूची माफी मागायला तयार होतो, हे संभवत नाही. याबाबतीत हा मुरांबा अजून थोडा मुरू द्यायला हवा होता, असं वाटत राहातं.
पार्श्वसंगीत (सौरभ भालेराव) एक स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून इथे समोर येतं आणि फार कमी मराठी चित्रपटांच्या बाबतीत हे विधान करता येतं. अनेक प्रसंगांमध्ये ड्रम्स आणि टाळ्यांच्या इफेक्टमधून जो काही अद्भुत पीस तयार केलाय, तो कमाल आहे. पार्श्वसंगीतावर विशेष मेहनत घेण्यात आली आहे, याचं हे निदर्शक आहे. तीच गोष्ट आर्ट डिरेक्शनची (सिद्धार्थ तातूसकर) आहे. आलोकचं घर पाहताक्षणीच एका उच्चभ्रू आणि उच्च अभिरूची असलेल्या कुटुंबाचं घर आहे, हे लगेच लक्षात येतं. तिथली रंगसंगती, भिंतींवरच्या फ्रेम्स, विविध वस्तूंची मांडणी यातून ‘क्लास’ दिसतो. छायालेखनातून (मिलिंद जोग) हा क्लास अधिक ठाशीव केलाय.
कलाकारांमध्ये सचिन खेडेकरचा उल्लेख वर आलाच आहे. चिन्मयी सुमीतच्या रूपाने एक नवी, समंजस आई चित्रपटसृष्टीला मिळाली आहे. अर्थात चिन्मयी जेवढं मोजकं काम करते, ते पाहता ती बिल्कुल स्वत:ला आईच्या भूमिकेत टाइपकास्ट करणार नाही, याची खात्री आहे. ती उत्तम कलावंत आहेच, पण इथलं तिचं कास्टिंगही अचूक आहे. आईच्या भूमिकेतली ठरलेली अभिनेत्री किंवा प्रेक्षकांसमोर अनेकदा आलेली एखादी अभिनेत्री घेण्याऐवजी चिन्मयीची या भूमिकेसाठी निवड केल्यामुळे ती आलोकची खरीखुरी आई वाटते आणि प्रेक्षक तिच्याशी सहज रिलेट होतात. त्यामुळे चिन्मयीच्या कास्टिंगला पैकीच्या पैकी मार्क दिले पाहिजेत.
मिथिला पालकर हा फ्रेश चेहरा इंदूच्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण करता झालाय. तिचं दिसणं, तिचं हसणं आणि तिचं एकंदरीत अस्तित्वच प्रसन्न आहे. दुर्दैवानं तिच्या वाट्याला फारसे खेळकर प्रसंग आलेले नाहीत, पण गंभीर प्रसंग तिने बारकाव्यांनिशी समजून उमजून केले आहेत. ती कुठेही नवखी किंवा कॅमेऱ्यासमोर बुजलेली वाटत नाही. अतिशय सराईतपणे तिने ही भूमिका केली आहे.
अमेय वाघने आलोक टेचात केलाय. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘कास्टिंग काऊच’मुळे अमेयचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे आणि या फॅन्सचं समाधान करणारी त्याची कामगिरी आहे. त्याचा वावर नैसर्गिक आहे आणि तेच त्याचं बलस्थान आहे.
कुठल्याही प्रकारचा विशेष आव न आणता, १०० टक्के निखळ, निर्मळ मनोरंजन करणं फार अवघड काम असतं. ‘मुरांबा’ ते काम पुरेपूर करतो. महत्त्वाचं म्हणजे एक अतिशय आश्वासक असा नव्या दमाचा दिग्दर्शक ‘मुरांबा’ने चित्रपटसृष्टीला दिलाय. त्यामुळे भविष्यातही अधिक सकस, दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपट पाहायला मिळतील, याची खात्री ‘मुरांबा’ देतो.
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment