बॉलिवूडमधला देशीयतावादाचा प्रणेता : आनंद राय
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • दिग्दर्शक-निर्माता आनंद राय
  • Sat , 10 June 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar आनंद राय Anand Rai कंगणा राणावत Kangana Ranaut हिमांशू शर्मा Himanshu Sharma

फिल्म आणि ट्रेड मॅगझिनमध्ये सिनेजगतातली सगळ्यात प्रभावी दहा व्यक्तिमत्त्वं टाईपच्या पॉवर लिस्ट यायला लागतील आणि पुन्हा त्यात निर्माता-दिग्दर्शक आनंद रायच नाव नसेल. या मॅगझिनमध्ये काम करणाऱ्या लोकांना काही विशिष्ट घराण्यांपलीकडे दिसतंच नाही की, काय असं वाटतं. गेल्या काही वर्षांतली आनंद रायची निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून असणारी कामगिरी अचाट आणि थक्क करून टाकणारी आहे. दिग्दर्शक म्हणून ‘तनु वेड्स मनू’, ‘रांझना’ आणि ‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट… निर्माता म्हणून 'नील बटे सन्नाटा' आणि 'हॅपी भाग जायेगी'सारख्या हलक्या-फुलक्या आणि मनोवृत्ती प्रसन्न करून टाकणाऱ्या चित्रपटांची निर्मिती त्याने केली आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाचा विषय एका शारीरिक वाढ खुंटलेल्या बुटक्या माणसाची प्रेमकथा हा आहे. त्यात बुटक्या माणसाच्या भूमिकेत चक्क शाहरूख खान आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित करत असलेल्या 'मुक्काबाज'ची निर्मितीही आनंदच करत आहे. मुख्य म्हणजे क्लासेस आणि मासेस या दोघांनीही आनंदचे चित्रपट उचलून धरले आहेत. हे संतुलन सांभाळणं हा येऱ्या गबाळ्याचा खेळ नाही! 

राय कुटुंब फाळणीच्या काळात सिंधहून दिल्लीला स्थलांतरित झालं. आनंदची आयुष्याची सुरुवातीची अनेक वर्षं दिल्लीत गेली. त्याच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये जो जबरदस्त 'नॉर्थ इंडियन फ्लेवर' दिसतो, तो या दिल्लीमध्ये घालवलेल्या वर्षांमधून आला आहे. आनंदने खरं तर इंजिनियरिंग केलं होतं, पण त्याच्यासारख्या सृजनशील माणसाचं दहा ते पाच नोकरीमध्ये मन रमेना. शेवटी तगमग असह्य होऊन त्याने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. तिथं त्याचा मोठा भाऊ रवी राय टेलिव्हिजनच्या क्षेत्रात चांगलाच प्रस्थापित झाला होता. रवी राय म्हणजे टीव्हीवर गाजलेल्या अनेक मालिकांमागचा ब्रेन. मराठी प्रेक्षकांना ते 'टिंग्या'चा निर्माते म्हणून माहीत आहे. तर आनंद आपल्या मोठ्या भावाचा मालिकांच्या सेटवर सहाय्यक म्हणून काम करायला लागला. आनंदला हे काम प्रचंड आवडायला लागलं. लवकरच धंद्याची गणितं समजावून घेतल्यानंतर त्याने स्वतःच निर्माता आणि दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेतला.

आनंदने या क्षेत्रात पैसा तर भरपूर कमावला, पण तरी आपण आनंदी नाही आहोत याची जाणीव त्याला होत होती. त्याला सिनेमा बनवायचा होता. पण टीव्हीतला पैसा व स्थिरता सोडून सिनेमासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जाणं म्हणजे मोठी रिस्क होती. आनंदने ती घेतली. हिचकॉकच्या कथेवर आधारित 'स्ट्रेन्जर्स' नावाचा सिनेमा त्याने बनवला. तो आपटला. मग त्याने अजून 'थोडी लाइफ थोडा मॅजिक' नावाचा चित्रपट केला. तो कधी आला अन कधी गेला हे कुणाला कळलंही नाही. एक शेवटचा प्रयत्न म्हणून 'तनु वेड्स मनू' चित्रपट करायचा आणि तो नाही चालला तर टेलिव्हिजनकडे वापस जायचं असं त्यानं ठरवलं. त्यावेळेस फारसे कुणाच्या खिजगणतीत नसणारे कंगना राणावत आणि आर. माधवन मुख्य भूमिकांमध्ये होते. चित्रपट त्याच्या अतिशय वेगळ्या दिग्दर्शकीय हाताळणीमुळे प्रेक्षकांना आवडला आणि नंतर आनंदवर मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. 

आनंदच्या कथा उत्तर भारतात घडतात, पण त्याच्या चित्रपटांत दाक्षिणात्य नायक असतात हे विशेष. आणि ते नायक पारंपरिक नायकांची इमेज तोडणारे असतात. ‘तनु वेड्स मनू’मधला नायक (माधवन) हा जाड आणि शामळू होता, तर ‘रांझना’मधला नायक (धनुष) दिसायला फटिचर आणि लोफर प्रवृत्तीचा होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला ग्रे शेड्स होत्या. अतिशय स्ट्राँग नायिका हे आनंदच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. कंगनाची तनु असो, सोनमची झोया असो वा ‘नील बटे सन्नाटा’मधली स्वरा भास्करची आई असो, या सगळ्याच नायिका रूढार्थानं सुंदर नाहीत. त्या मॉडर्न तोकडे कपडे घालत नाहीत. अगदी भारतीय पद्धतीचे कपडे घालतात. मात्र त्या जाम कणखर आहेत. इतक्या कणखर की, नायक त्यांच्यासमोर बॅकफूटवर जाताना दिसतो. पण याला आनंदचा पुढचा चित्रपट बहुतेक अपवाद असेल. त्याच्या मते यातलं शाहरूख खानने केलेलं बुटक्या माणसाचं पात्र हे पटकथेच्या मध्यवर्ती आहे. चित्रपटात दोन नायिकाही आहेत- कटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा. पण हा आउट अँड आउट शाहरूखचा चित्रपट असणार आहे. याचं सेटिंग पुन्हा आनंदच्या आवडत्या उत्तर भारतात असणार आहे. 

आनंदला दिग्दर्शक म्हणून जे यश मिळालं आहे, त्यात हिमांशू शर्माच्या लिखाणाचा मोठा वाटा आहे. सध्या आशयाच्या बाबतीत बॉलिवुडमध्ये जे नवनवीन प्रयोग होत आहेत, त्याच्यामध्ये तरुण लेखकांचा मोठा वाटा आहे. त्यात सगळ्यात आघाडीवर असणाऱ्या लोकांमध्ये आहे हिमांशू शर्मा. अवघ्या पस्तीस वर्षांच्या वयात त्याच्याकडे चित्रपट लेखनासाठीचे दोन राष्ट्रीय पुरस्कार आहेत. बहुतेक उत्तर भारतीयांप्रमाणे आयएएस करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असणारा हिमांशू आज सगळ्यात जास्त मानधन घेणारा पटकथा लेखक आहे. लेखक म्हणून त्याचा सीव्ही जबरदस्त प्रभावी आहे. ‘तनु वेड्स मनू’ (पार्ट पहिला आणि दुसरा), ‘रांझना’ आणि ‘स्ट्रेन्जर’ त्याच्या सीव्हीवर आहेत. त्याचे सगळे चित्रपट दिग्दर्शक आनंदसोबत आहेत. येत्या बुटक्या माणसाची प्रेमकथाही हिमांशूच लिहीत आहे. त्याने काही दिग्दर्शकांनाही असिस्ट केलं आहे, पण तो जॉब काही त्याला मानवला नाही. आनंदने त्याला लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘स्ट्रेन्जर’ (जिमी शेरगील आणि के.के.) फारसा चालला नाही, पण आपण चांगलं लिहू शकतो हा हिमांशूचा आत्मविश्वास वाढला. ‘तनु वेड्स मनू’च्या यशानं त्यावर शिक्कोमोर्तब केलं.

हिमांशू शर्मा

हिमांशूच्या चित्रपटातली पात्रं ही अस्सल मातीतली असतात. उत्तर भारतीय संस्कृतीचा एक ठसा त्याच्या कामावर आहे. त्याने लिहिलेल्या चित्रपटाच्या कथा उत्तर भारतातल्या शहरांमध्ये घडतात. त्याचे संवाद टाळ्याखाऊ आणि प्रेक्षकांना रूचतील असे असतात. असे संवाद सध्या हिमांशू आणि रजत अरोरा (‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘डर्टी पिक्चर’ फेम ) हे दोघेच सातत्याने लिहितात. 'तेरा प्यार ना हुआ, युपीएससी का एक्झाम हुआ. दस साल से पास ही नही हो रहा'सारखा संवाद कुठल्याही एकतर्फी प्रेम करणाऱ्या माणसाला भावू शकतो. ‘तनु वेड्स मनू’चे दोन्ही भाग संवादलेखन कस असावं याचा आदर्श आहेत. त्याने कागदावर उतरवलेली पात्रं एकाच वेळेस विश्वसनीय आणि प्रेक्षक प्रेमात पडतील अशी असतात. जिमी शेरगिलचा ‘तनु वेड्स मनू’मधला राजा अवस्थी, दीपक डोब्रियालचा पप्पी, कंगनाची  हरियाणवी दत्तो, ‘रांझना’मधला मोहम्मद झिशान अय्युबचा एकनिष्ठ मित्र मुरारी किंवा स्वराने केलेली कुंदनवर एकतर्फी प्रेम करणारी बिंदिया, ही पात्रं आपल्या आजूबाजूची वाटावीत इतकी अस्सल आहेत. हिमांशू आता दिग्दर्शक बनण्याच्या तयारीत आहे. त्याचा सिनेमा आनंदच प्रोड्युस करणार आहे.

आनंदचा संगीताचा सेन्स खूपच छान आहे. त्याच्या चित्रपटातलं संगीत हमखास लोकप्रिय होतंच. 'रांझना'मध्ये रहमानने त्याचं गेल्या काही काळातलं सर्वोत्कृष्ट संगीत दिलं आहे. रहमानला ज्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं, त्यात आनंदचं नाव खूप वर आहे हे विशेष. ‘तनु वेड्स मनू’च्या दोन्ही भागातलं संगीतही मेलोडियस होतं. आनंदच्या चित्रपटांतली गाणी प्रसंगांनुसार येतात, तांदळात खडा यावा तशी नाही. त्याच्या चित्रपटातल्या गाण्यांच्या व्हिडिओला नेहमी लाखांमध्ये हिट्स असतात. ‘रांझना’मधल्या 'तुम तक' गाण्यात आनंदने रंगांची अतिशय सुंदर उधळण केली आहे. त्याच चित्रपटातलं 'पिया मिलेंगे' हे गाणं तुकड्या तुकड्यात येतं, पण ते अतिशय तरलतेनं चित्रित केलेलं आहे. 'तनु वेड्स मनू'मधलं 'कितने दफे दिल ने कहा' हे गाणंही 'चौराहे का रोमान्स' अतिशय सुंदर दाखवतं. 

गेल्या काही वर्षांत आनंदने अतिशय जबरदस्त कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे काम रामगोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप करत होते. आता ही जबाबदारी आनंदने आपल्या खांद्यावर घेतली आहे. कोण अभिनेते आहेत या यादीत? स्वरा भास्कर, मोहम्मद झिशान अय्युब, दीपक डोब्रियाल आणि कितीतरी. या नटांना त्याने पहिला ब्रेक दिलेला नाहीये, पण अपारंपरिक लुक्स आणि अभिनयशैलीमुळे हे कलाकार विस्मृतीच्या गर्तेत जाण्याची शक्यता असताना त्यांना आपल्या चित्रपटातून अतिशय चांगल्या भूमिका आनंदने देऊ केल्या. दीपक डोब्रियालने 'ओंकारा'सारख्या चित्रपटातून जबरदस्त भूमिका करूनही तो मध्यंतरी हरवल्यासारखा झाला होता. पण 'तनु वेड्स मनू'मधल्या पप्पीच्या भूमिकेमुळे त्याच्या कारकिर्दीला नवसंजीवनी मिळाली. मोहम्मद झिशान अय्युबचंही तसंच. चॉकलेट हिरोच्या प्रतिमेत अडकलेल्या जिमी शेरगिलला त्याने 'तनु वेड्स मनू'मध्ये नकारात्मक भूमिका देण्याचं धारिष्ट्य दाखवलं. 

हा कंगनाच्या कारकिर्दीमधलाही मैलाचा दगड आहे. ती ताकदीची अभिनेत्री आहे आणि चित्रपट ती पूर्णपणे आपल्या खांद्यावर वाहून नेऊ शकते, हे बॉलीवुडला या चित्रपटातून पहिल्यांदा कळलं. आताही शाहरूखसोबतच्या आनंदच्या चित्रपटातही झिशान आणि दीपक आहेतच. 

भारतीय चित्रपट सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. आपल्या चित्रपटांच्या कथा जास्तीत जास्त शहरात घडत आहेत. नायक-नायिका डिस्को थेकमध्ये पाश्चात्य सुरावटींवर नाचतात. अंगप्रदर्शन आणि सेक्स सीन्स तर हटकून असतातच, पण आनंदचा चित्रपट या सगळ्यांपासून अजूनही दूर आहे. लेखक हिमांशू शर्माची तक्रार असते की, आनंद त्याला पटकथेत सेक्स सीन किंवा चुंबन दृश्य टाकूच देत नाही. आनंदचे नायक-नायिका पडद्यावर शारीरिक होताना तुम्हाला कधी दिसणार नाहीत. जुन्या काळातला हरवून गेलेला 'इनोसन्स' अजूनही आनंदच्या चित्रपटात टिकून आहे. त्याच्या चित्रपटाची कथानकं छोट्या शहरांमध्येच घडतात. त्या अर्थानं आनंद राय हा सध्याच्या बॉलिवुडमधला देशीयतावादाचा प्रणेता म्हणता येईल. त्याचं हे असं असणंच त्याला दिग्दर्शकांच्या भाऊगर्दीपासून वेगळं करतं. 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......